नाखमनडीझ—त्याने ख्रिस्ती विश्वासाचे खंडन केले का?
मध्य युगाचा काळ. असे म्हटल्यावर तुमच्या मनात काय येते? धर्मयुद्धे? धर्मसभा? यातना? तो काळ सामान्यपणे उघड धार्मिक चर्चा करण्याचा नव्हता तरी त्या काळादरम्यान म्हणजे १२६३ मध्ये युरोपिय इतिहासात अपूर्व असा एक यहुदी-ख्रिस्ती वादविवाद झाला. त्या वादविवादात कोणाचा समावेश होता? त्यात कोणत्या विषयांची चर्चा करण्यात आली? आज, खऱ्या धर्माला ओळखण्यासाठी हा वाद आपल्याला कशी मदत करू शकतो?
या वादास कशामुळे तोंड फुटले?
संपूर्ण मध्य युगात रोमन कॅथलिक चर्चने जणू आपलाच धर्म खरा असल्याचा दावा केला होता. तथापि, यहुदी लोकांनीही आपणच देवाचे निवडलेले लोक आहोत, असा दावा करण्याचे कधीही सोडले नाही. यहुदी लोकांनी धर्मांतर करावे म्हणून त्यांची खात्री पटविण्यात चर्च अयशस्वी झाल्यामुळे चर्चची निराशा झाली आणि याचा बहुतेकवेळा हिंसा तसेच छळात परिणाम झाला. धर्मयुद्धाच्या काळात हजारो यहुद्यांना बाप्तिस्मा आणि मृत्यू यांपैकी एकाची निवड करायला सांगण्यात आले तेव्हा त्यांची कत्तल तरी करण्यात आली किंवा त्यांना स्तंभावर तरी जाळण्यात आले. चर्चप्रेरित यहुदी विरोधी गट अनेक देशांत होते.
परंतु सुमारे १२ व्या आणि १३ व्या शतकांच्या आसपास कॅथलिक स्पेनमध्ये वेगळ्याच प्रकारचे वातावरण होते. यहुद्यांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले होते—जोपर्यंत ते ख्रिस्ती विश्वासावर हल्ला चढवत नाहीत तोपर्यंत—आणि त्यांना राजाच्या दरबारात महत्त्वाच्या जागा सुद्धा देण्यात आल्या होत्या. परंतु अशा प्रकारच्या अनुग्रहाच्या सुमारे एका शतकानंतर समाजातील यहुदी प्रभाव कमी करण्यासाठी आणि कॅथोलिझममध्ये यहुदी लोकांना धर्मांतरीत करण्यासाठी डॉमनिकन पाळकांनी पावले उचलण्यास सुरवात केली. ॲरगॉनचा पहिला राजा जेम्स याच्यावर डॉमनिकन लोकांद्वारे अधिकृत वादविवादाची योजना करण्यासाठी दबाव आणण्यात आला, या उद्देशाने की यहुदी धर्माची मानखंडना करावी आणि सर्व यहुदी लोकांना धर्मांतरीत करण्याची गरज शाबीत करता यावी.
यहुदी-ख्रिस्ती यांच्यातील हा पहिलाच वाद नव्हता. सन १२४० या वर्षी फ्रान्समधील पॅरीस येथे अधिकृत वादविवादाची योजना करण्यात आली होती. यहुद्यांचा पवित्र ग्रंथ तालमूद याची कसोटी पाहणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. तथापि, भाग घेणाऱ्या यहुद्यांना बोलण्याचे फार कमी स्वातंत्र्य देण्यात आले होते. या वादविवादात आपला विजय झाल्याचे चर्चने घोषित केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तालमूदच्या प्रतींची चौकाचौकांत होळी करण्यात आली.
परंतु ॲरगॉनचा पहिला राजा जेम्स याच्या अधिक सहनशीलतेच्या स्वभावाने अशा प्रकारची कुचेष्टा करणाऱ्या परीक्षेला अनुमती दिली नाही. हे ओळखल्यानंतर डॉमनिकन लोकांनी एका वेगळ्या प्रकारचा मार्ग अवलंबला. यहुदी धर्माची परीक्षा (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात खॅम मॉकोबी यांनी लिहिले, त्यांनी यहुद्यांना “पॅरीसमध्ये त्यांचे खंडन करण्यात आले होते तसे न करता सभ्यता आणि मतांतराचे ढोंग रचून यहुद्यांना एका वादविवादासाठी आमंत्रित केले.” डॉमनिकन लोकांनी त्यांचा मुख्य प्रतिनिधी म्हणून पॅब्लो ख्रिस्तिआनीची निवड केली जो यहुदी असून त्याने स्वतःचे कॅथोलिझममध्ये धर्मांतर केले होते आणि तो आता डॉमनिकन पाळक झाला होता. तालमूद आणि रब्बी लिखाणाविषयी पॅब्लो ख्रिस्तिआनीला असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून, आपण आपली बाजू मांडू शकू, असे डॉमनिकन लोकांना खात्रीशीरपणे वाटत होते.
नाखमनडीझ का?
स्पेनमध्ये यहुद्यांच्या वतीने वादविवाद करणारा—मोझेस बेन नेमोन किंवा नाखमनडीझ हा एकमेव प्रतिनिधी होता ज्याच्याकडे आध्यात्मिक स्थान होते.a सन ११९४ मध्ये जरोना शहरात त्याचा जन्म झाला, नाखमनडीझ लहानपणीच बायबल आणि तालमूदचा विद्वान म्हणून नावारूपाला आला. वयाच्या ३० वर्षांपर्यत त्याने जवळजवळ पूर्ण तालमूदवर लेखन केले आणि त्यानंतर लगेचच मैमोनाईड्सच्या लिखाणाच्या विरोधात बोलणारा प्रमुख मध्यस्थ बनला आणि त्याने केलेल्या लिखाणामुळे यहुदी समाजात दुफळी होण्याचा धोका निर्माण झाला होता.b नाखमनडीझ त्याच्या पिढीतील बायबलचा आणि तालमूदचा महान विद्वान असल्याचे मानले जाते आणि मैमोनाईड्सने यहुदी धर्मावर त्या काळात जो प्रभाव पाडला त्यानंतर कदाचित त्याचाच क्रमांक लागतो.
कॅटेलोनियातील यहुदी समाजावर नाखमनडीझचा व्यापक प्रभाव होता आणि पहिला राजा जेम्स याने देखील राज्याच्या विविध बाबतींत त्याच्याशी सल्लामसलत केली. त्याच्या सूक्ष्म विचारक्षमतेचा यहुद्यांनी तसेच यहुद्देत्तर लोकांनी देखील आदर केला. डॉमनिकन लोकांनी हे जाणले, की यहुद्यांची प्रभावीपणे मानखंडणा करण्यासाठी त्यांच्यातील श्रेष्ठ रब्बी असलेल्या नाखमनडीझला वादविवादात भाग घ्यावा लागेल.
नाखमनडीझ वादविवाद करण्यास तयार नव्हता कारण डॉमनिकन लोकांचा निःपक्षपात दाखविण्याचा कोणताही कल नसल्याचे त्याला ठाऊक होते. त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती परंतु त्याला कोणताही प्रश्न विचारण्याचा हक्क नव्हता. तथापि, प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याला बोलण्याची पूर्ण मोकळीक देण्यात यावी, असे सांगून त्याने राजाची विनंती मान्य केली. पहिला राजा जेम्स असे करण्यास तयार झाला. सापेक्षपणे मुक्त बोलण्याची देण्यात आलेली ही परवानगी संपूर्ण मध्य युगात पहिली आणि अखेरची होती आणि यावरून हे स्पष्ट होते, की नाखमनडीझविषयी राजाला किती गाढ आदर होता. तरी देखील नाखमनडीझच्या मनात भीती होती. वादविवादात त्याने अतिशय विरोध केला असता तर त्याच्यावर तसेच यहुदी समाजावर त्याचा भयंकर परिणाम झाला असता. हिंसाचाराचा कोणत्याही क्षणी उद्रेक झाला असता.
नाखमनडीझ विरुद्ध पॅब्लो ख्रिस्तिआनी
बार्सेलोनियातील राजमहाल हे वादविवादाचे मुख्य ठिकाण होते. चार बैठकींची योजना करण्यात आली होती—जुलै २०, २३, २६ आणि २७, १२६३. स्वतः राजाने प्रत्येक बैठकीची अध्यक्षता केली, चर्चमधील आणि देशातील तसेच स्थानिक यहुदी समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती देखील यावेळी उपस्थित होत्या.
या वादविवादाचा काय निर्णय लागणार याबाबतीत चर्चला पूर्ण खात्री होती. आपल्या अधिकृत अहवालात, डॉमनिकन लोकांनी असे म्हटले, की या वादविवादाचा उद्देश ‘विश्वासावर वादविवाद करणे हा नव्हता कारण त्याच्याविषयी काही शंकाच नव्हती, परंतु यहुद्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांच्यातील निःशंक विश्वास काढण्यासाठी हा वादविवाद होता.’
केवळ मूलभूत विषयांवर चर्चा मर्यादित ठेवण्याची मागणी करण्याद्वारे सुमारे ७० वर्षांच्या नाखमनडीझने आपली स्पष्ट विचारक्षमता दाखवून दिली. त्याने असे म्हणून सुरवात केली: “यहुदी आणि यहुद्देत्तर यांच्यातील [आधीच्या] मतभेदांनी अशा अनेक धार्मिक चालीरीतींच्या पैलूंचा विचार केला ज्यांच्यावर विश्वासाचे मूलभूत तत्त्व अवलंबून नव्हते. तथापि, या राजेशाही दरबारात मला केवळ अशा गोष्टींवर वादविवाद करावासा वाटतो ज्यांच्यावर संपूर्ण वादविवाद अवलंबून आहे.” त्यानंतर असे एकमत झाले, की या विषयांवर चर्चा मर्यादित असेल जसे की मशिहाचे आगमन झाले होते का, तो देव होता की मानव आणि खरा नियम यहुद्यांकडे आहे की ख्रिस्ती लोकांकडे.
मशिहाचे आगमन झाले आहे, हे आपण तालमूदमधून सिद्ध करून दाखवू, असे आपल्या आरंभीच्या वादविवादात पॅब्लो ख्रिस्तिआनीने घोषित केले. नाखमनडीझने असे म्हणून प्रत्युत्तर दिले, तर मग तालमूदचा स्वीकार केलेल्या रब्बींनी येशूला का स्वीकारले नाही? स्पष्ट शास्त्रवचनीय गोष्टींवर आपला वादविवाद केंद्रीत करण्याऐवजी, ख्रिस्तिआनीने आपली बाजू मांडण्यासाठी वारंवार अस्पष्ट रब्बी लिखाणांचा आधार घेतला. रब्बी लिखाणे संदर्भाच्या बाहेरून उद्धृत करण्यात आली होती असे दाखविण्याद्वारे नाखमनडीझने एक एक करून सर्व मतांना खोडून काढले. हे तर्कसंगत होते, की नाखमनडीझ या लेखांवर वादविवाद करण्यात स्वतःला अधिक कार्यक्षम शाबीत करू शकला कारण त्याने त्या लिखाणांचा अभ्यास करण्यासाठी स्वतःचे जीवन वेचले होते. ख्रिस्तिआनीने शास्त्रवचनांचा उल्लेख केला तरी देखील त्याने मांडलेले मुद्दे सहजगत्या प्रत्युत्तर देण्याजोगे होते.
नाखमनडीझला विचारलेल्या प्रश्नांची केवळ उत्तरे द्यायची होती तरी त्याला एक समर्थ वादविवाद प्रस्तुत करता आला ज्यामुळे हे स्पष्ट झाले, की कॅथलिक चर्चच्या स्थानाला यहुदी लोक तसेच इतर विचारशील लोक का स्वीकारत नाहीत. त्रैक्याच्या सिद्धान्ताबद्दल त्याने असे घोषित केले: “कोणत्याही यहुद्याच्या अथवा कोणत्याही मनुष्याच्या मनाला हे पटणार नाही, की स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता . . . यहुदी स्त्रीच्या पोटी जन्म घेईल . . . आणि त्यानंतर त्याला शत्रूंच्या हातात सोपवून [दिले जाईल], जे . . . त्याला ठार मारतील.” नाखमनडीझने असंदिग्धपणे असे म्हटले: “तुम्ही जे मानता—आणि ते तुमच्या विश्वासाचे मूळ आहे—ते [विचारशील] मनाला मान्य नाही.”
ज्या विसंगतेमुळे आजच्या दिवसापर्यंत अनेक यहुद्यांना येशू मशिहा असल्याच्या शक्यतेचा विचार करण्यात अडसर निर्माण झाला आहे त्या विसंगतेवर त्याने जोर दिला. नाखमनडीझने चर्चच्या बेसुमार रक्तपातावर जोर देत असे म्हटले: “संदेष्टा असे म्हणतो, की मशिहाच्या काळाच्या वेळी, . . . ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही, ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. नासोरीच्या काळापासून ते आतापर्यंत संपूर्ण जग हिंसाचाराने आणि लूटमारीने भरलेले आहे. [खरोखर], इतर राष्ट्रांपेक्षा ख्रिस्ती राष्ट्रे अधिक रक्तपात करतात आणि अनैतिक जीवन देखील जगतात. हे राजाधिपते, तुमच्या ह्या लष्करी अधिकाऱ्यांनी इतःपर युद्धकला शिकली नाही तर तुम्हा दोघांसाठी हे किती कठीण होईल!”—यशया २:४.
चौथ्या बैठकीनंतर राजाने वादविवाद थांबवला. त्याने नाखमनडीझला म्हटले: “स्वतःची पडती बाजू असतानाही तुझ्यासारखा इतक्या प्रभावीपणे वादविवाद करणारा मी कधीही पाहिला नाही.” आपल्या अभिवचनाप्रमाणे, नाखमनडीझला बोलण्याचे स्वातंत्र्य आणि त्याच्या संरक्षणाची हमी देऊन ॲरगॉनचा पहिला राजा जेम्स याने त्याला ३०० दिनारांची भेट देऊन घरी पाठविले. जरोनाच्या बिशपच्या विनंतीवरून या अहवालाचा नाखमनडीझने लिखित अहवाल तयार केला.
निर्णायक विजय घोषित झाल्यानंतर डॉमनिकन लोकांचे चित्त फार खवळले होते. त्यांनी नंतर चर्चच्या विरोधात दुर्भाषण केल्याचा नाखमनडीझवर आरोप लावला आणि या वादविवादाच्या लिखाणांचा त्यांनी आरोपाचा पुरावा म्हणून उपयोग केला. नाखमनडीझवर राजाची कृपापसंती असल्याने डॉमनिकन निराश झाले व ते पोप क्लिमेंट चौथे याच्याकडे गेले. त्यावेळी नाखमनडीझ ७० वर्षांचा होता तरी त्याला स्पेनमधून हद्दपार करण्यात आले.c
सत्य कोठे आहे?
दोन्ही पक्षांतील या वादविवादाने खऱ्या धर्माची ओळख करून दिली का? दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या चुका काढल्याने कोणत्याही पक्षाने सत्याचा स्पष्ट संदेश प्रस्तुत केला नाही. नाखमनडीझने खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचे खंडन केले नाही, उलटपक्षी येशूच्या नंतरच्या शतकांमध्ये ख्रिस्ती धर्मजगताद्वारे अस्तित्वात आलेल्या मानव निर्मित शिकवणींचे, जसे की त्रैक्याच्या शिकवणीचे त्याने खंडन केले. ख्रिस्ती धर्मजगताचे अनैतिक वर्तन आणि स्वैराचारी रक्तपात यांवर नाखमनडीझने मोठ्या धैर्याने जोर दिला आणि इतिहासातील या अहवालावर कोणाचेही दुमत नाही.
म्हणूनच हे समजणे कठीण नाही, की अशा परिस्थितींमध्ये नाखमनडीझ आणि इतर यहुदी ख्रिस्ती विश्वासाच्या अनुग्रहाच्या वादविवादांनी प्रभावित झाले नाहीत. शिवाय, पॅब्लो ख्रिस्तिआनीचा वादविवाद इब्री शास्त्रवचनांच्या स्पष्ट युक्तिवादावर आधारित नव्हता, उलटपक्षी त्याने रब्बी लिखाणांचा चुकीचा अवलंब केला होता.
निश्चितपणे, नाखमनडीझने खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचे खंडन केले नाही. त्याच्या समयापर्यंत येशूच्या शिकवणींचा खरा प्रकाश आणि त्याच्या मशिहत्वाचे पुरावे गैरप्रकारे प्रस्तुत केलेल्या लोकांमुळे अस्पष्ट झाले होते. अशा प्रकारच्या धर्मत्यागी शिकवणीचे स्वरूप येशू आणि प्रेषितांद्वारे वास्तविकरीत्या भाकीत करण्यात आले होते.—मत्तय ७:२१-२३; १३:२४-३०, ३७-४३; १ तीमथ्य ४:१-३; २ पेत्र २:१, २.
तथापि, आज खऱ्या धर्माची ओळख स्पष्टपणे पटते. येशूने आपल्या खऱ्या अनुयायांविषयी सांगितले: “त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. . . . त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते.” (मत्तय ७:१६, १७) ही ओळख करून घेण्याचे आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. शास्त्रवचनीय पुराव्यांचे प्रांजळपणे परीक्षण करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार तुम्हाला मदत करतील. अशा प्रकारे मशिहा आणि त्याच्या अधिपत्याविषयी देवाच्या अभिवचनांचा खरा अर्थ तुम्हाला शिकण्यास मिळेल.
[तळटीपा]
a अनेक यहुदी नाखमनडीझला “रामबान” म्हणून सूचित करतात, जे इब्रीमधील संक्षिप्त रूप असून ते “रब्बी मोशे बेन नेमोन” या शब्दांच्या आद्याक्षरांनी बनले आहे.
b “मैमोनाईड्स—यहुदी धर्माची पुन्हा मांडणी करणारा मनुष्य” टेहळणी बुरूज मार्च १, १९९५, पृष्ठे २०-३ वरील लेख पाहा.
c सन १२६७ मध्ये तो एका देशात स्थायिक झाला त्यास आज इज्राएल म्हणून ओळखण्यात येते. आपल्या शेवटच्या वर्षांत त्याने पुष्कळ काही साध्य केले. त्याने यहुद्यांच्या अस्तित्वाची आणि जेरूसलेममध्ये अभ्यास केंद्राची पुनर्स्थापना केली. तोराहची अर्थात बायबलच्या सुरवातीच्या पाच पुस्तकांवरचे लिखान त्याने पूर्ण केले आणि उत्तरेकडील ॲक्रेच्या किनारपट्टीवरील शहरातील यहुदी समाजाचा तो आध्यात्मिक मस्तक झाला, याच ठिकाणी तो १२७० मध्ये मरण पावला.
[२० पानांवरील चित्र]
नाखमनडीझने बार्सेलोनियात वादविवाद केला
[१९ पानांवरील चित्राचे श्रेय]
पृष्ठे १९-२० वरील चित्रे: Illustrirte Pracht - Bibel/Heilige Schrift des Alten und Neuen Testaments, nach der deutschen Uebersetzung D. Martin Luther’s