मैमोनाईड्स यहुदी धर्माची पुन्हा मांडणी करणारा मनुष्य
“मोशे ते मोशे येथपर्यंत मोशेसारखा दुसरा असा कोणी झाला नाही.” पुष्कळ यहूद्यांना ही गूढार्थक म्हण लगेच ओळखून येईल. ती १२ व्या शतकाचा यहुदी तत्त्ववेत्ता, कायदा संग्राहक आणि तालमूद व शास्त्रवचने यावरील विवेचनकार मोशे बेन मैमोन याच्या कौतुकास्तव म्हटली जाते. त्याला मैमोनाईड्स तसेच रामबाम असेही ओळखण्यात येते.a आज पुष्कळांना मैमोनाईड्स माहीत नाही, परंतु त्याच्या लिखाणांनी त्या काळातील यहुदी, मुस्लीम व चर्च विचारांवर खूपच गाढ प्रभाव पाडला. मूलभूत तत्त्वांचे कडकपणे पालन करण्यावर जोर देणारी मनोवृत्ती निर्माण करून त्याने यहुदी धर्माच्या अर्थाची पुन्हा मांडणी सादर केली. हा मैमोनाईड्स कोण होता आणि पुष्कळ यहुद्यांना तो “दुसरा मोशे” का वाटतो?
मैमोनाईड्स कोण होता?
मैमोनाईड्सचा जन्म ११३५ मध्ये स्पेनमधील कर्डोबा येथे झाला. त्याचे वडील मैमोन, प्रसिद्ध रब्बी घराण्यातील नावलौकिक मिळवलेले प्रामाण्य होते; त्यांनीच आपल्या मुलाला आरंभीचे धार्मिक शिक्षण दिले. मुस्लीमांनी ११४८ मध्ये कर्डोबावर कब्जा केला तेव्हा यहुद्यांवर एकतर धर्मांतर करण्याची अथवा पळून जाण्याची पाळी आली. यामुळे मैमोनाईड्स कुटुंबाला दीर्घकाळ भटकत राहावे लागले. सन ११६० मध्ये ते मोरोक्को येथील फेझ या ठिकाणी स्थायिक झाले आणि येथेच मैमोनाईड्सला वैद्य बनण्याची तालीम मिळाली. सन ११६५ मध्ये त्याच्या कुटुंबाला इज्राएल प्रदेशात पलायन करावे लागले.
तथापि, इज्राएलमधील परिस्थिती डळमळीत होती. यहुद्यांच्या छोट्या जमातीला ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मयोद्धे तसेच मुस्लीम सेनेकडून धोका होता. साधारण सहा महिन्याच्या आतच मैमोनाईड्स व त्याच्या कुटुंबाला इजिप्तमधील कैरोच्या जुन्या शहरी, फोस्टॅट येथे आश्रय मिळाला. येथेच मैमोनाईड्सच्या गुणांना पूर्ण वाव मिळाला. सन ११७७ मध्ये तो यहुदी समाजाचा प्रमुख बनला आणि ११८५ मध्ये तो प्रसिद्ध मुस्लीम नेता सालदीन यांच्या दरबारात वैद्य म्हणून नियुक्त झाला. मैमोनाईड्सने ही दोन्ही पदे १२०४ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत राखली. त्याचे वैद्यकीय क्षेत्रातील नैपुण्य इतके नावाजलेले होते की, इंग्लंडसारख्या दूरच्या देशातील धैर्यवान राजा रिचर्ड यानेसुद्धा मैमोनाईड्सला आपला व्यक्तिगत वैद्य बनवून घेण्याचा प्रयत्न केला असे म्हटले जाते.
त्याने कोणते लिखाण केले?
मैमोनाईड्स समृद्धपणे लिखाण करणारा एक लेखक होता. मुस्लीम छळापासून पळाल्यावर भटकत असताना त्याने आपले पहिले प्रमुख लिखाण मिशनाहवर भाष्य हे संकलीत केले.b अरबी भाषेतील या लिखाणात मिशनाहमधील पुष्कळ विचार व संज्ञांचे स्पष्टीकरण आहे, कधी कधी तर विषयांतर होऊन यहुदी धर्मावरील मैमोनाईड्सचे तत्त्वज्ञान देखील त्यात आढळते. सन्हेद्रीन याच्या अहवालाचे स्पष्टीकरण देणाऱ्या विभागात मैमोनाईड्सने यहुदी विश्वासावर १३ मूलभूत तत्त्वे तयार केली. यहुदी धर्माने कधीच औपचारिक सांप्रदायाचे स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे मैमोनाईड्सने तयार केलेली १३ तत्त्वे यहुदी सांप्रदायाला घडवून आणण्यात मूळ नमुना ठरली. (चौकोन पहा.)
मैमोनाईड्सने भौतिक किंवा आध्यात्मिक बाबीतील सर्व गोष्टींचा तर्कशुद्ध क्रम मांडण्याचा प्रयत्न केला. त्याने अंधश्रद्धेचा धिक्कार केला आणि तो ज्याकडे योग्य पुरावे आणि तर्क म्हणून पाहत असे त्याच्या आधारावर त्याने प्रत्येक गोष्टीकरता स्पष्टीकरण मागितले. त्याच्या या स्वाभाविक कलामुळे त्याचे हे सर्वथोर लिखाण सामोरे आले—मिशनाह तोराह.c
मैमोनाईड्सच्या काळी यहुद्यांचा “तोराह,” किंवा “नियमशास्त्र” याबद्दलचा दृष्टिकोन तो केवळ मोशेच्या लिखित शब्दांनाच नव्हे, तर सर्व शतकांमध्ये नियमशास्त्राबद्दल रब्बींनी केलेल्या स्पष्टीकरणाला लागू असल्याचे गृहीत धरले. त्या कल्पना तालमूदमध्ये तसेच तालमूदबद्दल रब्बींच्या हजारो निर्णयांमध्ये व लिखाणात लिखित केल्या होत्या. मैमोनाईड्सने ओळखले की, या सर्व माहितीचे भले मोठे प्रमाण व तिचा विस्कळीतपणा यामुळे सर्वसाधारण यहुदी व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेता येणे मुश्कीलीचे बनवते. बहुतेकांना रब्बी साहित्याचा अभ्यास जीवनभर करण्यासाठी वाव मिळत नव्हता कारण त्यातील बहुतेक भाग कठीण अरामी भाषेत लिहिला होता. यावर मैमोनाईड्सने तोडगा काढला की, या माहितीमध्ये बदल करावा, व्यावहारिक निर्णय ठळकपणे मांडावेत आणि विषयानुरुप विभाजन करून या माहितीचा १४ पुस्तकांचा एक पद्धतशीर संग्रह बनवावा. त्याने त्याचे लिखाण अगदी सहजपणे समजणाऱ्या, प्रवाही इब्री भाषेत कुशलपणे केले.
मिशनाह तोराह हा इतका व्यावहारिक मार्गदर्शक ठरला की, तो पूर्णतयः तालमूदची जागा घेणार की काय अशी काही यहुदी नेत्यांना भीती वाटू लागली. तथापि, ज्यांनी हरकत घेतली अशांनी देखील त्या ग्रंथाच्या अत्याधिक विद्वत्तेबद्दल आपली मान्यता दर्शवली. हा उच्चप्रतीचा संकलित संग्रह क्रांतिकारी ठरला, त्याने सर्वसाधारण माणूस ज्याचा संबंध जोडू शकत नव्हता किंवा ज्याचे पूर्ण आकलन करू शकत नव्हता त्या यहुदी धर्मव्यवस्थेला नवचैतन्य दिले.
यानंतर, मैमोनाईड्स आणखी एका ग्रंथाची रचना करण्यास पुढे सरसावला—गोंधळात पडलेल्यांकरता मार्गदर्शक (इंग्रजी). ग्रीक साहित्याचा अरबी भाषेत अनुवाद झाल्यामुळे अधिकाधिक यहुद्यांना ॲरिस्टॉटल व इतर तत्त्ववेत्यांची ओळख घडून येऊ लागली. बऱ्याच लोकांठायी गोंधळ निर्माण झाला; त्यांना बायबलमधील संज्ञांच्या शब्दशः अर्थाचा तत्त्वज्ञानासोबत मेळ घालता येईना. त्यामुळे, ॲरिस्टॉटलचे कौतुक असणाऱ्या मैमोनाईड्सने गोंधळात पडलेल्यांकरता मार्गदर्शक या ग्रंथात बायबल व यहुदी धर्म यांचा सारांश, तत्त्वज्ञानी विचार व तर्क याजसोबत मेळ बसलेल्या पद्धतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.—पडताळा १ करिंथकर २:१-५, ११-१६.
मोठमोठे साहित्य व इतर धार्मिक लिखाण याखेरीज मैमोनाईड्सने वैद्यकीय व खगोल क्षेत्रातसुद्धा प्रतिभासंपन्न लिखाण केले. त्याच्या समृद्ध लिखानातून उतरलेल्या आणखी एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. द एन्सायक्लोपिडिआ ज्युडाईका म्हणतो: “मैमोनाईड्सच्या पत्रांनी पत्रलिखाणाच्या नव्या युगाला आरंभ करून दिला. तोच एक असा यहुदी पत्र लेखक आहे, ज्याचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात जतन करण्यात आलेला आहे. . . . त्याच्या पत्रांनी त्याच्याशी पत्रव्यवहार करणाऱ्यांच्या मनावर व अंतःकरणावर भुरळ पाडली. त्याने आपली लिखाणशैली त्यांना पसंत होईल या पद्धतीने बदलती ठेवली.”
त्याने कोणती शिकवण दिली?
विश्वासाची १३ तत्त्वे या सदरात मैमोनाईड्सने विश्वासाबद्दल स्पष्ट रुपरेषा पुरविली, ज्यापैकीच्या काही शास्त्रवचनात मुळावलेल्या आहेत. (चौकोन पहा.) तथापि, सातवे व नववे तत्त्व, येशू हा मशीहा आहे या शास्त्रवचनावर आधारलेल्या विश्वासाच्या सारांशाविरुद्ध आहे.d ख्रिस्ती धर्मजगताचे त्रैक्यासारखे धर्मत्यागी शिक्षण आणि धर्मयुद्धांद्वारे वाहिलेला रक्ताचा पाट याद्वारे सूचित होणारा निर्लज्ज ढोंगीपणा पाहू जाता, मैमोनाईड्स येशूच्या मशीहापदाच्या प्रश्नाबद्दल पुढे सरसावला नाही ते काही आश्चर्याचे नव्हे.—मत्तय ७:२१-२३; २ पेत्र २:१, २.
मैमोनाईड्स लिहितो: “[ख्रिस्ती विश्वास] याशिवाय दुसरा कोणता मोठा अडथळा असू शकेल काय? सर्व संदेष्ट्यांनी मशीहा हा इज्राएल लोकांचा मुक्तीदाता व तारक असल्याचे सांगितले . . . [उलटपक्षी, ख्रिस्ती विश्वासाने] तरवारीने यहूद्यांचा संहार घडवला व त्यांच्या शेषांना पांगवले व नमवीले, तोराह बदलवून टाकला व जगातील बहुतेकांना चुका करण्यास आणि प्रभूशिवाय इतर दैवताची भक्ती करण्यास लावले.”—मिशनाह तोराह, “राजांचे नियम व त्यांची युद्धे,” अध्याय ११.
परंतु मैमोनाईड्सबद्दल मोठा आदर असला तरी पुष्कळ यहुदी, त्याने ज्या विशिष्ट विषयांबद्दल इतक्या स्पष्टपणे मत प्रतिपादन केले त्याकडे दुर्लक्ष करण्याचे पसंत करतात. गूढ यहुदी धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे (कबाला), फलज्योतिषविद्या यहुद्यांमध्ये अधिक प्रचलित होऊ लागली होती. मैमोनाईड्सने लिहिले: “जो कोणी फलज्योतिषविद्येत पडतो आणि नभोमंडळाचे परीक्षण करणाऱ्यांद्वारे ठरविलेल्या वेळेनुरुप आपले काम किंवा प्रवासाची योजना करतो त्याला चाबकाने मारले पाहिजे. . . . या सर्व गोष्टी खोट्या व फसव्या आहेत . . . जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो . . . मूर्ख आहे आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.”—मिशनाह तोराह, “मूर्तिपूजेविषयीचे नियम,” अध्याय ११; पडताळा लेवीय १९:२६; अनुवाद १८:९-१३.
मैमोनाईड्सने आणखी एका प्रथेबद्दल कडकपणे टीका केली: “[रब्बींनी] लोकांकडून व वसाहतींकडून स्वतःला आर्थिक साहाय्य मिळावे ही मागणी केली; आणि ही गोष्ट बंधनकारक व योग्य आहे असे त्यांनी अत्यंत निर्लज्जपणे लोकांना विचार करायला लावले . . . हे सर्व चूक आहे. असा विश्वासाला पुष्टी देणारा तोराह किंवा [तालमूदमधील] बोधवचनात एकही शब्द आढळत नाही.” (मिशनाहवरील भाष्य, ॲवट ४:५) या रब्बींप्रमाणे न होता मैमोनाईड्सने वैद्याचे काम करण्यास हातभार लावण्यासाठी त्याने चरितार्थ केला आणि धार्मिक सेवेकरता कधीच पगार स्वीकारला नाही.—पडताळा २ करिंथकर २:१७; १ थेस्सलनीकाकर २:९.
यहुदी धर्म व इतर विश्वासांवर कसा परिणाम घडला?
जरुसलेमच्या हिब्रु विद्यापीठाचे प्राध्यापक यशीहू लिबोविट्स म्हणतात: “कुलपिते व संदेष्ट्यांच्या युगापासून आजच्या काळापर्यंतच्या यहुदी धर्माच्या इतिहासामध्ये मैमोनाईड्सचे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे.” तसेच एन्सायक्लोपिडिआ जुडाईका म्हणते: “यहुदी धर्माच्या भावी घडामोडीवरील मैमोनाईड्सचे प्रभुत्व मोजता येऊ शकणार नाही. . . . चा. चर्नेविट्स . . . तर यापुढे जाऊन म्हणतात की, मैमोनाईड्स नसता तर यहुदी धर्माचे वेगवेगळ्या पंथात व विश्वासात विभाजन झाले असते . . . विविध प्रवृत्त्यांना संघटित करण्याची मोठी साध्यता त्याने केली.”
क्रम व तर्काच्या आपल्या कल्पनेत बसवावे म्हणून मैमोनाईड्सने यहुदी विचारांचे पुनर्संघटन करून यहुदी धर्माची पुन्हा मांडणी केली. विद्वान तसेच पुष्कळांना ही नवी मांडणी व्यावहारिक व आकर्षक वाटली. त्याच्या विरोधकांनी देखील मैमोनाईड्सच्या बहुतेक पावित्र्याचा ओघाओघाने स्वीकार केला. यहुद्यांना प्रदीर्घ टीकासंग्रहावर विसंबून राहण्यापासून मुक्त करावे हा मैमोनाईड्सच्या लिखाणाचा हेतू होता तरी त्याच्या लिखाणाबद्दलच मुळात अनेक टीकासंग्रह लवकरच लिहिण्यात आले.
एन्सायक्लोपिडिआ जुडाईका स्पष्ट करतो: “मैमोनाईड्स हा . . . मध्ययुगातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा यहुदी तत्त्ववेत्ता होता आणि त्याचा गोंधळात पडलेल्यांकरता मार्गदर्शक (इंग्रजी) हा यहुदी माणसाने निर्माण केलेला अत्यंत महत्त्वाचा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ होय.” गोंधळात पडलेल्यांकरता मार्गदर्शक हा मूळ अरबी भाषात लिहिला असला तरी, मैमोनाईड्सच्या जीवनमानातच त्याचा इब्री भाषेत अनुवाद केला गेला व त्यानंतर लवकरच तो लॅटिन भाषेत अनुवादित होऊन सबंध युरोपात अभ्यासासाठी उपलब्ध करण्यात आला. याचा परिणाम, यहुदी विचारासोबत ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाला मैमोनाईड्सने घालून दिलेल्या अप्रतिम संयोगीकरणाला ख्रिस्ती धर्मजगताच्या प्रमुख विचारधारेत शिरण्याची वाट मिळाली. त्या काळातील ख्रिस्ती धर्मजगताचे विद्वान, जसे आल्बर्टस् माग्नस व थॉमस आक्वीनस बहुतेकवेळा मैमोनाईड्सच्या दृष्टिकोनांना उद्धृत करीत असत. इस्लामी विद्वानांवर देखील याचा प्रभाव पडला. नंतर मैमोनाईड्सच्या तत्त्वज्ञानाच्या पावित्र्याचा बारूच स्पीनोझासारख्या यहुदी तत्त्वज्ञान्यावर प्रभाव होऊन तो कर्मठ यहुदी धर्मापासून संपूर्णपणे वेगळा झाला.
विद्येचे पुनरुज्जीवन होण्याआधी होऊन गेलेल्या मैमोनाईड्सला आवेशी बुद्धीनुरुप पुनरुज्जीवन घडवून आणणारा माणूस म्हणावे लागेल. विश्वासाला नेहमी कारणाची जोड असावी हे त्याचे प्रतिपादन आजही सबळ तत्त्व आहे. याच तत्त्वाने त्याला धार्मिक अंधश्रद्धेविरुद्ध जोरदार आवाज उठवण्यासाठी प्रवृत्त केले. तरीदेखील, ख्रिस्ती धर्मजगताचे वाईट उदाहरण व ॲरिस्टॉटलचा तत्त्वज्ञानी प्रभाव यामुळे त्याला अनेकदा बायबल सत्याशी सुसंगत असलेल्या निर्वाळ्याप्रत पोहंचण्यास बांध घालत असे. मैमोनाईड्सच्या थडग्यावर, “मोशे ते मोशे येथपर्यंत मोशेसारखा दुसरा असा कोणी झाला नाही,” या कोरलेल्या शब्दांसोबत सर्वच सहमत होणार नसले तरीही त्याने यहुदी धर्माची रचना व त्याचा मार्ग यांची पुनर्मांडणी केली हे मात्र कबूल करावेच लागेल.
[तळटीपा]
a “रामबाम” हे इब्रीमधील संक्षिप्त रूप असून ते नाव, “रब्बी मोशे बेन मैमन” या शब्दांच्या आद्याक्षरांनी बनले होते.
b मिशनाह हा, यहुदी ज्याला तोंडी संप्रदाय असे समजत त्यावर आधारित असलेल्या रब्बींच्या लिखित स्पष्टीकरणांचा संग्रह आहे. तो सा. यु. दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात व तिसऱ्या शतकाच्या आरंभाला लिखाणबद्ध झाला आणि त्याने तालमूदचा आरंभ तयार केला. अधिक माहितीसाठी युद्ध नसणारे जग कधी असेल का? (इंग्रजी) हे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकॉने प्रकाशित केलेले माहितीपत्रक पहा.
c मिशनाह तोराह हे नाव अनुवाद १७:१८ मध्ये आढळणाऱ्या संज्ञेवरून तयार झाले आहे, व ते म्हणजे नियमशास्त्राची प्रत किंवा पुनरावृत्ती.
d येशू हा वचनदत्त मशीहा होता याच्या पुराव्याबद्दल अधिक माहितीसाठी युद्ध नसणारे जग कधी असेल का? (इंग्रजी) या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकॉ. या संस्थेने प्रकाशित केलेल्या माहितीपत्रकातील पृष्ठे २४-३० पहा.
[२३ पानांवरील चौकट]
मैमोनाईड्सची विश्वासाची १३ तत्त्वेe
१. देव हा सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता व अधिपती आहे. त्यानेच केवळ सर्व काही केले, करीत आहे व करीत राहणार.
२. देव एकच आहे. त्याच्यासारखे एकत्व दुसरे कोठेही नाही.
३. देवाला शरीर नाही. शारीरिक विचारधारा त्याला लागू होत नाहीत.
४. देव पहिला व शेवटला आहे.
५. केवळ देवालाच प्रार्थना करणे उचित आहे. एखाद्याने दुसऱ्या कोणालाही किंवा कशालाही प्रार्थना करायची नाही.
६. संदेष्ट्यांची सर्व वचने खरी आहेत.
७. मोशेचा भविष्यवाद निःसंशये खरा आहे. तो त्याच्या आधीच्या व नंतरच्या सर्व संदेष्ट्यांमध्ये प्रमुख होता.
८. आपल्यापाशी असणारे संपूर्ण तोराह मोशेलाच देण्यात आले होते.
९. तोराह कधी बदलणार नाही आणि देवाद्वारे आणखी दुसरा दिला जाणार नाही.
१०. मानवाची सर्व कृत्ये व विचार देवाला ठाऊक आहेत.
११. देवाची आज्ञा पाळणाऱ्यांना तो बक्षीस देतो आणि त्याच्याविरूद्ध पातक करणाऱ्यांना तो शिक्षा देतो.
१२. मशीहा येईल.
१३. मृतांना पुन्हा जिवंत केले जाईल.
[तळटीपा]
e मैमोनाईड्सने या सर्व तत्त्वांच्या व्याख्या त्याच्या मिशनाहवरील भाष्य (सन्हेद्रीन १०:१) यात केल्या आहेत. यहुदी धर्माने नंतर यांना शासकीय संप्रदाय म्हणून स्वीकारले. वरील मजकूर यहुदी प्रार्थना पुस्तकात आढळतो त्यापेक्षा संक्षिप्त रुपात येथे दिला आहे.