वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ९/१५ पृ. २८-३१
  • जगाचा पालट करणारे बायबल भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगाचा पालट करणारे बायबल भाषांतर
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रेरित भाषांतर?
  • शेमाच्या डेऱ्‍यात याफेथ?
  • यहुदीय मतानुसारी आणि देवभीरू
  • सेप्टुआजिंटने मार्ग तयार करण्यास साहाय्य केले
  • सेप्टुआजिंट आता ‘ईश्‍वरप्रेरित’ नाही?
  • गतकाळात आणि आजच्या काळातही उपयोगी ठरलेले “सेप्टुअजिंट”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • संवाद साधणारा देव—यहोवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग एक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ९/१५ पृ. २८-३१

जगाचा पालट करणारे बायबल भाषांतर

देवाचा संदेष्टा मोशे याने, ३,५०० पेक्षा अधिक वर्षांआधी बायबल लिहिण्यास सुरवात केली तेव्हा केवळ एक लहानसे राष्ट्र त्याचे वाचन करू शकत होते. (अनुवाद ७:७) कारण शास्त्रवचने केवळ त्या राष्ट्रात चालणाऱ्‍या भाषेतच, अर्थात मूळ इब्री भाषेतच उपलब्ध होती. परंतु हे असे जास्त दिवस चालणार नव्हते.

बायबल संदेशाचा शतकानुशतकांपासून होत असलेला प्रसार आणि त्याचा वास्तविक प्रभाव यांस, सेप्टुआजिंट अर्थात बायबलचे पहिले भाषांतर मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. हे भाषांतर का निर्माण करण्यात आले? आणि याच बायबलने जगाचा पालट केला असे उचितपणे म्हणता येईल का?

प्रेरित भाषांतर?

सा.यु.पू. सातव्या आणि सहाव्या शतकांदरम्यान बॅबिलोनच्या बंदिवासानंतर अनेक यहुदी प्राचीन इस्राएलच्या आणि यहुदाच्या बाहेरच राहिले. ज्या यहुद्यांचा बंदिवासात जन्म झाला त्यांची दुय्यम भाषा इब्री बनली. सा.यु.पू. तिसऱ्‍या शतकापर्यंत, इजिप्तमध्ये ग्रेशियन साम्राज्याचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या अलेक्झांड्रियात यहुदी लोकांचा समाज होता. या यहुद्यांनी पवित्र शास्त्रवचनांचे त्यांची मातृभाषा ग्रीकमध्ये भाषांतर करण्याचे महत्त्व ओळखले.

पण तोवर, बायबलचा प्रेरित संदेश इब्रीतच लिहून ठेवला होता; काही लहान भाग ॲरेमाइक भाषेशी जवळून जुळणाऱ्‍या भाषेत लिहून ठेवण्यात आले होते. एका वेगळ्या भाषेत देवाचे वचन व्यक्‍त केल्याने ईश्‍वरी प्रेरणेचे शक्‍तिशाली परिणाम कमी झाले असते का, कदाचित त्याचे चुकीचे भाषांतर झाले असते का? ज्यांना प्रेरित वचन सोपवण्यात आले होते ते यहुदी लोक भाषांतराद्वारे त्या संदेशाचा चुकीचा अर्थ लावू शकले असते का?—स्तोत्र १४७:१९, २०; रोमकर ३:१, २.

या नाजूक विषयांमुळे लोकांच्या मनात एकप्रकारची भीती बसली. तरीपण, यहुद्यांना देवाचे वचन आता समजणार नाही ही चिंता शेवटी इतर सर्व चिंतांपेक्षा वरचढ ठरली. मोशेने लिहिलेल्या बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांचे अर्थात तोरहाचे ग्रीकमध्ये भाषांतर करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. खरे तर भाषांतर कशाप्रकारे करण्यात आले ते आजपर्यंत अस्पष्टच आहे. लेटर ऑफ अरिसटियस नुसार, इजिप्शियन शासक टॉलमी दुसरा (सा.यु.पू. २८५-२४६) याला आपल्या राजसी ग्रंथालयासाठी पेंटाट्युख (पाच पुस्तकांचा संग्रह) (किंवा तोरह) याच्या प्रतीचे ग्रीकमध्ये भाषांतर करून घ्यायचे होते. त्याने ही कामगिरी ७२ यहुदी विद्वानांना दिली; हे विद्वान इस्राएलहून इजिप्तला आले आणि त्यांनी ७२ दिवसांत भाषांतर पूर्ण केले. हे भाषांतर नंतर यहुदी समाजासमोर वाचून दाखवण्यात आल्यावर त्यांनी त्याला सुरेख आणि अचूक असा शेरा मारला. या अहवालाला आणखी तिखट-मीठ लावून असे सांगण्यात आले, की प्रत्येक भाषांतरकाराला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले होते तरी त्यांचे भाषांतर, अक्षर-न-अक्षर तंतोतंत जुळणारे होते. सुमारे ७२ भाषांतरकारांच्या आख्यायिकेमुळे या ग्रीक बायबल भाषांतराला सेप्टुआजिंट असे नाव पडले; हे नाव “सत्तर” असा अर्थ होणाऱ्‍या लॅटिन शब्दावर आधारित आहे.

लेटर ऑफ अरिसटियस विश्‍वसनीय लिखाण नाही असे आधुनिक दिवसातील बहुतेक विद्वान कबूल करतात. टॉलमी दुसरा याने नव्हे तर अलेक्झॅन्ड्रियन यहुदी समाजाच्या नेत्यांनी भाषांतराबाबत पुढाकार घेतला असेही ते मानतात. मूलशास्त्रवचने जितकी प्रेरित होती तितकेच सेप्टुआजिंट देखील प्रेरित होते, असे पहिल्या शतकातील सर्व यहुद्यांतील सर्वसामान्य मत असल्याचे यहुदी अलेक्झॅन्ड्रियन तत्त्वज्ञानी फायलो, यहुदी इतिहासकार जोसीफस आणि टॅलमूड प्रकट करतात. हे सर्व विश्‍वास कशातून निर्माण झाले तर, संपूर्ण जगभरातील यहुदी समाजाने सेप्टुआजिंट स्वीकारावे म्हणून केलेल्या प्रयत्नामुळे.

पहिल्या भाषांतरात केवळ मोशेच्या पाच पुस्तकांचा समावेश असला तरी, कालांतराने सेप्टुआजिंट हे नाव ग्रीकमध्ये भाषांतर केलेल्या संपूर्ण इब्री शास्त्रवचनांना पडले. उरलेल्या पुस्तकांचे पुढील शंभर किंवा अधिक वर्षांमध्ये भाषांतर करण्यात आले. अख्ख्या सेप्टुआजिंटच्या निर्मिती कार्याच्या सर्व प्रयत्नांत सुसूत्रता येण्याऐवजी ते टप्प्याटप्प्याने करण्यात आले. प्रत्येक भाषांतरकाराच्या इब्री भाषेसंबंधीची क्षमता आणि ज्ञान यांत फरक होता. बहुतेक पुस्तकांचे तंतोतंत भाषांतर करण्यात आले; काही वेळा तर शब्दाला शब्द असे भाषांतर करण्यात आले, तर इतर भाषांतरे स्वैर होती. इब्री शास्त्रवचनांची काही पुस्तके मोठी तर काही लहान आहेत. सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकाच्या अंतापर्यंत इब्री शास्त्रवचनांतील सर्व पुस्तके ग्रीकमध्ये वाचता येऊ शकत होती. विसंगत परिणामातही इब्री शास्त्रवचनांचे ग्रीकमध्ये भाषांतर केल्याचा प्रभाव, भाषांतरकारांनी अपेक्षा देखील केली नव्हती इतका प्रचंड होता.

शेमाच्या डेऱ्‍यात याफेथ?

सेप्टुआजिंटची चर्चा करताना टॅलमूड उत्पत्ति ९:२७ चा उल्लेख करते; तेथे म्हटले आहे: “याफेथ . . . शेमाच्या डेऱ्‍यात राहील.” (मेगिल्लाह ९ब, बॅबिलोनियन टॅलमूड) टॅलमूड लाक्षणिकपणे सूचित करते, की सेप्टुआजिंटच्या ग्रीक भाषेच्या सौंदर्याद्वारे याफेथ (ग्रीकांचा पूर्वज असलेल्या यावानचा पिता) शेमाच्या (इस्राएल राष्ट्राचा पूर्वज) डेऱ्‍यात राहिला. परंतु, असेही म्हणता आले असते, की सेप्टुआजिंटच्या प्रभावामुळे शेम याफेथाच्या डेऱ्‍यात राहिला. ते कसे?

सम्राट अलेक्झॅन्डरने मिळवलेल्या विजयांनंतर, सा.यु.पू. चौथ्या शतकाच्या शेवटच्या काळात, विजय मिळवलेल्या प्रदेशांत ग्रीक भाषा आणि संस्कृतीचा फैलाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. या धोरणेला हेल्‌नायजेशन असे म्हटले गेले. आपल्यावर सतत सांस्कृतिक हल्ले होत आहेत असे यहुद्यांना वाटले. ग्रीक संस्कृती आणि तत्त्वज्ञान सर्वत्र पसरल्यास यहुद्यांचा धर्म दुबळा झाला असता. या हल्ल्याची लाट कशी काय रोखता येऊ शकत होती?

सेप्टुआजिंटचे भाषांतर करण्यामागच्या यहुद्यांच्या एका संभाव्य हेतूबाबत यहुदी बायबल भाषांतरकार मॅक्स मारगोलीस म्हणतात: “हे भाषांतर करण्याची कल्पना यहुदी समाजाची होती असे एखाद्याने गृहीत धरल्यास, आणखी एक हेतू यात गोवलेला असावा, व तो म्हणजे, विदेशी लोकांना यहुदी नियम उपलब्ध करून देणे आणि जगाला याची खात्री पटवून देणे, की यहुद्यांची अशी संस्कृती होती जी हेल्लसच्या [ग्रीस] बुद्धीपेक्षा कैक पटीने वरचढ होती.” यास्तव, ग्रीक भाषिकांना इब्री शास्त्रवचने उपलब्ध करून देणे स्व-रक्षणाचा आणि प्रतिहल्ल्याचा प्रकार असला असावा.

हेल्‌नायजेशनच्या ॲलेक्झॅन्डर याच्या धोरणामुळे ग्रीक भाषा जगाची आंतरराष्ट्रीय भाषा बनली. रोमनांनी ॲलेक्झॅन्डरच्या राज्यावर विजय मिळवला तेव्हादेखील राष्ट्रांमधील व्यापार आणि दळणवळण सर्वसामान्य (किंवा कॉइनी) ग्रीक भाषेतच होत असे. हा जाणूनबुजून केलेल्या प्रयत्नाचा परिणाम असो किंवा आपोआपच विकसित झालेला असो, पूर्वी देव आणि यहुद्यांच्या नियमांशी अपरिचित असलेल्या अनेक गैर-यहुद्यांनी इब्री शास्त्रवचनांच्या सेप्टुआजिंट आवृत्तीचा लागलीच स्वीकार केला. याचे परिणाम आश्‍चर्यकारक होते.

यहुदीय मतानुसारी आणि देवभीरू

“केवळ यहुदीच नव्हेत तर इतर राष्ट्रेही मोशेच्या कायद्यांच्या सौंदर्याचा आणि प्रतिष्ठेचा आदर करतात,” असे सा.यु. पहिल्या शतकाच्या सुमारास फायलो लिहू शकला. पहिल्या शतकात पॅलेस्टाईनच्या बाहेर राहणाऱ्‍या यहुद्यांविषयी यहुदी इतिहासकार योसेफ क्लासनर असे म्हणतात: “हे लक्षावधी यहुदी छोट्याशा पॅलेस्टाईनहून स्थलांतर करून एकत्र आले होते यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे. यहुद्यांच्या वाढीत मोठ्या संख्येने यहुदीय मतानुसारी स्त्रीपुरुषांचा देखील समावेश होतो हे कोणाला नाकारता येणार नाही.”

परंतु, परिस्थितीचे पूर्ण चित्र समजण्याकरता हे प्रभावशाली मुद्दे पुरेसे नाहीत. यहुदी इतिहासाचे लेखक शेय जे. डी. कोहन म्हणतात: “सा.यु.पू. च्या शेवटच्या शतकात आणि सा.यु. च्या पहिल्या शतकात अनेक विदेशी स्त्रीपुरुषांनी यहुदी धर्म स्वीकारला. परंतु, अनेक विदेशी असेही होते ज्यांनी यहुदी धर्मातील केवळ काही गोष्टींचा स्वीकार केला परंतु धर्मांतर केले नाही.” धर्मांतर न केलेल्या लोकांना, क्लासनर आणि कोहन हे दोघे, देवभीरू असे संबोधतात; ही अभिव्यक्‍ती त्या काळच्या ग्रीक साहित्यात बहुतेकदा आढळते.

यहुदीय मतानुसारी आणि देवभीरू यात काय फरक आहे? यहुदीय मतानुसारी पूर्णपणे धर्मांतर केलेले होते, त्यांना सर्वार्थाने यहुदी समजले जाई कारण त्यांनी (इतर सर्व दैवतांना नाकारून) इस्राएलच्या देवाचा स्वीकार केला होता, सुंता केली होती आणि ते इस्राएल राष्ट्रात सामील झाले होते. याच्या उलट, देवभीरू यांच्याबद्दल कोहन म्हणतात: “या विदेशी लोकांनी अनेक यहुदी प्रथा पाळल्या व यहुद्यांच्या देवाची या नाही तर त्या रुपाने उपासना केली तरी, ते स्वतःला यहुदी लेखत नव्हते व इतरांनीही त्यांना यहुदी लेखले नाही.” क्लासनर त्यांचे अशाप्रकारे वर्णन करतात, “ते मध्यममार्गी आहेत,” कारण त्यांनी यहुदी धर्माचा स्वीकार केला आणि “त्यातील काही प्रथा पाळल्या परंतु, . . . पूर्णपणे यहुदी बनले नाहीत.”

मिशनरी कार्यात गुंतलेल्या यहुद्यांबरोबरील चर्चेमुळे किंवा आचरण, प्रथा व वर्तन याबाबतीत ते कसे वेगळे आहेत हे पाहिल्यामुळे कदाचित देवभीरू लोक देवाबद्दल आवड बाळगू लागले. तरीपण, या देवभीरू लोकांना यहोवा देवाविषयी शिकण्यास मदत करण्यात सेप्टुआजिंट हेच मुख्य साधन होते. पहिल्या शतकातील देवभीरूंची नेमकी संख्या जाणण्याचा कोणताही मार्ग नसला तरी सेप्टुआजिंटमुळे संपूर्ण रोमी साम्राज्यात देवाविषयीच्या ज्ञानाचा प्रसार झाला यात काही शंका नाही. सेप्टुआजिंटमुळेच महत्त्वपूर्ण पाया देखील घालता आला.

सेप्टुआजिंटने मार्ग तयार करण्यास साहाय्य केले

ख्रिस्ती धर्माच्या संदेशाचा प्रसार करण्यात सेप्टुआजिंटचा सिंहाचा वाटा होता. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टला ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली तेव्हा उपस्थित असलेल्यांपैकी अनेक ग्रीक भाषिक यहुदी होते. मंडळीची स्थापना झाल्याच्या आरंभीच्या काळात ख्रिस्ताचे शिष्य बनलेल्यांपैकी यहुदीय मतानुसारी देखील होते. (प्रेषितांचे कृत्ये २:५-११; ६:१-६; ८:२६-३८) येशूच्या प्रेषितांचे व आरंभीच्या इतर शिष्यांचे प्रेरित लिखाण शक्य तितक्या विस्तृत प्रमाणावरील श्रोत्यांसाठी असल्यामुळे ते ग्रीकमध्ये लिहिण्यात आले.a यास्तव, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये आलेले इब्री शास्त्रवचनांतील अनेक संदर्भ सेप्टुआजिंटवरच आधारित होते.

स्वाभाविक यहुदी आणि यहुदीय मतानुसारी यांच्याव्यतिरिक्‍त इतर लोक राज्य संदेश स्वीकारायला तयार होते. विदेशी कर्नेल्य “नीतिमान्‌ व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.” सा.यु. ३६ मध्ये कर्नेल्य, त्याचे कुटुंब आणि त्याच्या घरात जमलेले इतर, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून बाप्तिस्मा घेणारे पहिले विदेशी होते. (प्रेषितांची कृत्ये १०:१, २, २४, ४४-४८; पडताळा लूक ७:२-१०.) प्रेषित पौलाने आशिया मायनर आणि ग्रीसमधून प्रवास केला तेव्हा त्याने, आधीपासूनच देवाचे भय बाळगणाऱ्‍या अनेक विदेशांना तसेच “भक्‍तिमान हेल्लेणी [ग्रीकांना]” प्रचार केला. (प्रेषितांची कृत्ये १३:१६, २६; १७:४) कर्नेल्य आणि इतर विदेशी सुवार्तेचा स्वीकार करावयास तयार का होते? सेप्टुआजिंटनेच मार्ग तयार करण्यास मदत केली होती. एका विद्वानाने असा अंदाज बांधला, की सेप्टुआजिंट “हे इतके महत्त्वपूर्ण पुस्तक आहे की त्याशिवाय आपल्याला ख्रिस्ती धर्मजगताची आणि पाश्‍चात्य संस्कृतीची समजच मिळाली नसती.”

सेप्टुआजिंट आता ‘ईश्‍वरप्रेरित’ नाही?

सेप्टुआजिंटच्या विस्तृत वापरामुळे कालांतराने यहुद्यांमध्ये खळबळ माजली. जसे की, ख्रिश्‍चनांबरोबर चर्चा करताना यहुद्यांनी दावा केला, की सेप्टुआजिंट चुकीचे भाषांतर होते. सा.यु. दुसऱ्‍या शतकापर्यंत, एकेकाळी ईश्‍वरप्रेरित म्हणून ज्याची वाहवा करण्यात आली होती त्या भाषांतराकडे यहुदी समाजाने पूर्णपणे पाठ फिरवली. रब्बींनी ७२ भाषांतरकारांच्या आख्यायिकेचा असे म्हणून नकार दिला की: “एके दिवशी पाच वडिलांनी राजा टॉलमीसाठी ग्रीकमध्ये तोरह लिहिला आणि तो दिवस, सोन्याचे वासरू बनवलेला दिवस इस्राएलसाठी जसा अभद्र होता तसाच अभद्र होता कारण तोरहचे अचूक भाषांतर होऊच शकले नाही.” आपल्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे एकमत व्हावे म्हणून रब्बींनी ग्रीकमध्ये एका नवीन भाषांतरासाठी परवानगी दिली. सा.यु. दुसऱ्‍या शतकात यहुदी धर्म स्वीकारणाऱ्‍या अक्वीला नामक एका व्यक्‍तीने याचे भाषांतर केले; तो रब्बी अकिबाचा शिष्य होता.

यहुद्यांनी सेप्टुआजिंटचा वापर करणे सोडून दिले; परंतु, जेरोम्स लॅटिन व्हलगेटने त्याची जागा घेईपर्यंत ते, उदयास आलेल्या कॅथलिक चर्चचे प्रमाणभूत “जुना करार” बनले. दुसरे कोणतेही भाषांतर मूळ भाषांतराची जागा कोणीही घेऊ शकत नसले तरी, सेप्टुआजिंटने मात्र यहोवा देवाविषयीच्या आणि येशू ख्रिस्ताद्वारे येणाऱ्‍या त्याच्या राज्याविषयीच्या ज्ञानाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. खरेच, सेप्टुआजिंट जगाचा पालट करणारे बायबल भाषांतर आहे.

[तळटीपा]

a मत्तयाचे शुभवर्तमान पहिल्यांदा इब्रीमध्ये लिहिण्यात आले असावे आणि त्यानंतर ग्रीकमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले असावे.

[३१ पानांवरील चित्र]

पौलाने जितक्या लोकांना प्रचार केला त्या बहुतेकांना “सेप्टुआजिंट” समजले

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of Israel Antiquities Authority

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा