शुक्रवार, १६ ऑक्टोबर
आपलं मन तिच्या मार्गांकडे वळू देऊ नकोस. आणि तिच्या वाटांकडे वाहवत जाऊ नकोस.—नीति. ७:२५.
यहोवाच्या कुठल्याही उपासकाच्या हातून काय घडू शकतं, हे शलमोनने लिहिलेल्या या अहवालातून आपल्याला कळतं. तो कदाचित एखाद्या गंभीर पापात पडू शकतो. आणि त्याला वाटेल, की हे सगळं त्याच्याकडून अचानक झालं. किंवा तो म्हणेल की हे माझ्याकडून “नकळत घडलं.” पण तरी प्रत्यक्षात काय घडलं याचा जर त्याने विचार केला तर त्याला कदाचित कळेल, की त्याने काही चुकीची पावलं उचलल्यामुळे त्याच्या हातून असं घडलं. यात वाईट संगत, चुकीचं मनोरंजन किंवा ख्रिस्ती व्यक्तीसाठी अयोग्य असलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष किंवा इंटरनेटवरून पुन्हा-पुन्हा भेट देणं यांसारख्या गोष्टी असतील. यासोबतच त्याने प्रार्थना करणं, बायबल वाचणं, सभांना जाणं, प्रचार करणं हेसुद्धा कदाचित थांबवलं असेल. नीतिवचनांत सांगितलेल्या त्या तरुणाप्रमाणे हे पाप त्याच्या हातून नक्कीच अचानक घडलं नसेल. यातून आपण काय शिकतो? आपण पाप आणि पापाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टीसुद्धा टाळल्या पाहिजेत. या अहवालातून शलमोन हाच मुद्दा मांडतो.—मत्त. ५:२९, ३०. टेहळणी बुरूज२४.०७ १६ ¶१०-११
शनिवार, १७ ऑक्टोबर
आमची ही संपत्ती मातीच्या भांड्यांत आहे.—२ करिंथ. ४:७.
ही संपत्ती काय आहे? ही संपत्ती म्हणजे प्रचाराचं काम आहे. यामुळे लोकांचा जीव वाचतो. (२ करिंथ. ४:१) आणि मातीची भांडी काय आहेत? ती इतरांना आनंदाचा संदेश सांगणाऱ्या देवाच्या सेवकांना सूचित करतात. पौलच्या दिवसांत व्यापारी अन्नसामग्री, द्राक्षारस आणि पैसे यांसारख्या मौल्यवान गोष्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, मातीच्या भांड्यांचा वापर करायचे. त्याच प्रकारे यहोवाने आपल्याला आनंदाचा मौल्यवान संदेश सांगायची जबाबदारी सोपवली आहे. आणि यहोवाच्या मदतीने, आपल्याला हा संदेश विश्वासाने सांगत राहायचं बळ मिळतं. कधीकधी आपल्याला माणसांची भीती वाटू शकते. किंवा लोक आपला संदेश ऐकणार नाहीत याचीसुद्धा भीती वाटू शकते. मग आपण यावर कशी मात करू शकतो? प्रेषितांना जेव्हा प्रचार न करण्याचा हुकूम देण्यात आला होता, तेव्हा त्यांनी काय प्रार्थना केली याचा विचार करा. भीतीला बळी पडण्याऐवजी त्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली: ‘धैर्याने बोलत राहायला आम्हाला बळ दे.’ यहोवाने लगेचच त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. (प्रे. कार्यं ४:१८, २९, ३१) जर तुम्हालाही कधी माणसांची भीती वाटली तर लोकांवरचं प्रेम वाढवण्यासाठी तुम्ही यहोवाला मदत मागू शकता. त्यामुळे लोकांना आनंदाचा संदेश सांगायला तुम्हाला भीती वाटणार नाही. टेहळणी बुरूज२४.०४ १६-१७ ¶८-९
रविवार, १८ ऑक्टोबर
हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.—मत्त. ६:९.
यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण त्याचं नाव पवित्र करायला प्रवृत्त होतो. सैतानाने यहोवाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून त्याच्या नावावर जो कलंक लावलाय तो पुसून टाकायच्या कामात भाग घ्यायची आपली इच्छा आहे. (उत्प. ३:१-५; ईयो. २:४; योहा. ८:४४) आपल्या सेवाकार्यात यहोवाची बाजू घ्यायला आणि जे ऐकतील त्यांना त्याच्याबद्दल सत्य सांगायला आपण उत्सुक आहोत. त्याचा सगळ्यात मोठा गुण प्रेम आहे. तो नीतीने आणि न्यायाने राज्य करतो. आणि त्याचं राज्य सगळी दुःखं काढून टाकेल, तसंच मानवी कुटुंबात शांती आणि आनंद आणेल या सगळ्या गोष्टी लोकांना कळाव्यात अशी आपली इच्छा आहे. (स्तो. ३७:१०, ११, २९; १ योहा. ४:८) जेव्हा आपण लोकांना या सगळ्या गोष्टी सांगतो, तेव्हा आपण त्याचं नाव पवित्र करतो. तसंच आपण आपल्या नावाला जागतोय याचं समाधानसुद्धा आपल्याला असतं. टेहळणी बुरूज२४.०५ १८ ¶१२