वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१५ पृ. २८-३१
  • टॅलमूड आहे तरी काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टॅलमूड आहे तरी काय?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • टॅलमूडची निर्मिती
  • दोन टॅलमूड्‌सची निर्मिती
  • टॅलमूडने काय साध्य केले?
  • मिशना आणि देवाने मोशेला दिलेले नियमशास्त्र
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मौखिक नियमशास्त्र—लेखी स्वरूपात का मांडावे लागले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • रब्बी म्हणविण्यास कोण पात्र आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • करैत आणि सत्यासाठी त्यांचा शोध
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१५ पृ. २८-३१

टॅलमूड आहे तरी काय?

“टॅलमूड निश्‍चितच सर्व काळांतील सर्वात उल्लेखनीय वाङ्‌मयातील एक आहे.”—द युनिव्हर्सल जुईश एन्सायक्लोपिडिआ.

“[टॅलमूड] मानवाच्या सर्वात महान बौद्धिक साध्यतांपैकी एक आहे, गहन, अर्थपूर्ण, अनाकलनीय असलेल्या ह्‍या लिखाणाने दीड हजार पेक्षा अधिक वर्षांसाठी श्रेष्ठ बुद्धिवंतांनाही व्यग्र ठेवले.” —जेकब नॉईसनर, यहुदी विद्वान आणि लेखक.

“टॅलमूड हे, यहुदी जीवनाच्या अख्ख्या आध्यात्मिक व बौद्धिक इमल्याला आधार देणारे [यहुदी धर्माचा] केंद्रीय आधारस्तंभ आहे.”—एडन स्टाईनसॉल्ट्‌स, टॅलमूडीक विद्वान व रब्बी.

टॅलमूडचा शतकांपासून यहुदी लोकांवर बराच पगडा राहिला आहे, यात काहीच संशय नाही. परंतु, वर उल्लेखण्यात आलेल्या स्तुतीबोलांच्या विरोधात, टॅलमूडची बदनामी करण्यात आली आहे व त्याला “अस्पष्टता आणि गढूळतेचा समुद्र” असे संबोधण्यात आले आहे. ते दियाबलाचे ईशनिंदक पुस्तक आहे असे म्हणून त्याची टीका करण्यात आली आहे. पोपच्या हुकूमाने कित्येकदा त्याची टीका करण्यात आली, त्याला जप्त करण्यात आले आणि युरोपच्या सार्वजनिक चौकांत मोठ्या संख्येने जाळण्यातही आले.

इतका वादंग माजवणाऱ्‍या या पुस्तकात आहे तरी काय? यहुदी लिखाणांपैकी टॅलमूड इतके अद्वितीय कशामुळे होते? ते कशाकरता लिहिण्यात आले? यहुदी धर्मावर त्याचा इतका जबरदस्त पगडा कसा काय आहे? गैर-यहुदी लोकांकरता त्याचा काही अर्थ होतो का?

सा.यु. ७० मध्ये जेरुसलेममधील मंदिराचा नाश झाल्या नंतरच्या १५० वर्षांदरम्यान रब्बी विचारवंतांच्या अकादमींनी संपूर्ण इस्राएलात, यहुदी प्रथा टिकवण्याकरता नवीन आधार शोधला. त्यांनी वादविवाद केले आणि त्यांच्या मौखिक नियमांतील विविध प्रथा पक्क्या केल्या. या आधारावर त्यांनी यहुदी धर्मासाठी नवीन मर्यादा आणि अपेक्षा आखल्या, मंदिराविना दैनंदिन पवित्र जीवनाकरता मार्गदर्शन दिले. या नवीन आध्यात्मिक कल्पनाबंधाचे, सा.यु. तिसऱ्‍या शतकाच्या सुरवातीला, जुडा हा-नासी यांनी संकलन केलेल्या मिशनात स्थूलरूपाने वर्णन करण्यात आले.a

मिशना स्वयंपूर्ण होते, बायबलच्या संदर्भांच्या आधारावर त्याला समर्थनाची आवश्‍यकता नव्हती. त्यातील चर्चेची पद्धत आणि इब्री भाषेची शैली देखील अद्वितीय, बायबल मजकूरापासून भिन्‍न होती. मिशनात उल्लेखण्यात आलेल्या रब्बींच्या निर्णयाचा प्रभाव सगळीकडील यहुद्यांच्या दैनंदिन जीवनावर पडणार होता. जेकब नॉईसनर तर म्हणाले: “मिशनाने इस्राएलच्या संविधानाची तरतूद केली. . . . लोकांनी त्याला मान्यता द्यावी व त्याच्या नियमांचे अनुकरण करावे अशी मिशनाने मागणी केली.”

मिशनात उल्लेखण्यात आलेल्या विचारवंतांचा प्राधिकार खरोखरच प्रकट शास्त्रवचनांच्या बरोबरीचा होता का, अशी जर कोणी शंका केली तर काय? मिशनात आढळणाऱ्‍या तन्‍नैमच्या (मौखिक नियमाचे शिक्षक) शिकवणुकी इब्री शास्त्रवचनांच्या पूर्ण सुसंगत आहेत हे रब्बींना दाखवावे लागले असते. पुढील स्पष्टीकरण एक आवश्‍यकता बनली. खुलासा करण्याची, मिशनाचे समर्थन करण्याची व सीनाय पर्वतावर मोशेला देण्यात आलेल्या नियमशास्त्रातूनच ते आले होते हे सिद्ध करून देण्याची त्यांना गरज वाटली. मौखिक आणि लिखित नियम यांचे एकच तात्पर्य व एकच उद्देश होता हे शाबीत करण्याची त्यांना सक्‍ती वाटली. तेव्हा, यहुदी धर्माचे अंतिम विवेचन होण्यापेक्षा मिशना हे धार्मिक चर्चा आणि वादविवाद यांचा नवीन आधार ठरले.

टॅलमूडची निर्मिती

हा नवीन विडा उचलणाऱ्‍या रब्बींना ॲमोरैम, अर्थात, मिशनाचा “अर्थ सांगणारे” किंवा “विवरणकर्ते” असे संबोधले जाई. प्रत्येक अकादमीत एक प्रमुख रब्बी असे. विद्वानांचा व विद्यार्थ्यांचा एक लहान गट संपूर्ण वर्षभर चर्चासत्रांचे आयोजन करीत असे. पण, सर्वात महत्त्वपूर्ण चर्चासत्र वर्षांतून दोनदा, अदार व एलूल महिन्यात भरवण्यात येई; या महिन्यांत शेतीचे काम मंद असायचे व यामुळे शेकडो किंवा हजारोसुद्धा या चर्चांसत्रांना उपस्थित राहू शकत होते.

एडन स्टाईनसॉल्ट्‌स खुलासा करतात: “अकादमीचा प्रमुख, एका खुर्चीवर किंवा खास चटईवर बसून चर्चेचे नेतृत्त्व करी. त्याच्यासमोर, पहिल्या रांगेत खास विद्वान तसेच त्याचे सहकारी किंवा विशेष विद्यार्थी बसत असत आणि त्यांच्या मागे सर्व इतर विद्वान बसत असत. . . . म्हणजे, पहिल्या रांगेत सर्व मोठमोठे विद्वान, दुसऱ्‍या रांगेत त्यांच्यापेक्षा जरा कमी असलेले आणि त्यानंतरच्या रांगेत दुसऱ्‍या रांगेत बसलेल्यांपेक्षा कमी असलेले, अशी बैठकीची व्यवस्था होती.” मिशनातील एका भागाचे पठण व्हायचे. पठण झालेल्या भागाचे मग, तन्‍नैम यांनी गोळा केलेले परंतु मिशनात समावेश केला नाही अशा समांतर किंवा ज्यादा मजकुराशी तुलना केली जायची. यानंतर त्याचे विश्‍लेषण सुरू व्हायचे. प्रश्‍न विचारले जायचे आणि विविध शिकवणुकी परस्परांशी सुसंगत आहेत की नाहीत हे शोधण्याकरता विसंगतींचे परीक्षण केले जायचे. रब्बींच्या शिकवणुकींना आधार देण्याकरता इब्री शास्त्रवचनांतील पुष्टी देणारे मजकूर शोधले जायचे.

ह्‍या चर्चा पद्धतशीर असल्या तरी त्या खोल, कधीकधी वादंग माजवायच्या. टॅलमूडमध्ये उल्लेखण्यात आलेल्या एका विचारवंताने, चर्चेदरम्यान रब्बींच्या तोंडून जणू काय “ठिणग्या” पडत होत्या, असे म्हटले. (हुल्लीन १३७बी, बॅबिलोनियन टॅलमूड) या चर्चांसंबंधी स्टाईनसॉल्ट्‌स यांनी म्हटले: “अकादमी प्रमुख किंवा भाषण देणारा विचारवंत, समस्यांवर स्वतःचे विवेचन मांडायचा. श्रोत्यांमधील विद्वान बहुतेकदा, इतर उगम, इतर भाष्यकारांचे मत किंवा स्वतःचे तर्कशुद्ध समारोप यांच्या आधाराने त्याच्यावर प्रश्‍नाचा भडिमार करायचे. कधीकधी चर्चा संक्षिप्त असायची व विचारलेल्या प्रश्‍नाचे सुस्पष्ट व निर्णायक तेवढेच उत्तर दिले जायचे. इतर वेळेला, इतर विद्वान पर्यायी उपाय मांडायचे, यामुळे मोठ्या प्रमाणावर वादविवाद व्हायचा.” उपस्थित असलेले सर्वजण भाग घेऊ शकत होते. चर्चासत्रांमध्ये खुलासा करण्यात आलेले विषय, इतर विद्वानांच्या उजळणीकरता इतर अकादमींना पाठवले जात असत.

परंतु हे चर्चासत्र, केवळ कायद्याचा कीस काढणारे अखंड वादविवाद नव्हते. यहुदी धार्मिक जीवनाचे नियम आणि हुकूम असलेल्या कायदेशीर बाबींना हलाका म्हटले जाते. ही संज्ञा, “जाणे,” या मूळ इब्री शब्दातून येते व ‘एखाद्याने ज्या जीवनमार्गानुसार गेले पाहिजे’ त्याला सुचित करते. इतर सर्व गोष्टींना—जसे की रब्बी आणि बायबल पात्र यांच्या कहाण्या, सुज्ञ बोल, विश्‍वास आणि तत्त्वज्ञान यांची संकल्पना—हग्गदा म्हटले जाते; हा शब्द मूळ इब्री शब्दातून आलेला आहे ज्याचा अर्थ “सांगणे,” असा होतो. हलाका आणि हग्गदाचे रब्बींच्या चर्चेत एकमेकांत मिश्रण करण्यात येत असे.

टॅलमूडचे विश्‍व (इंग्रजी) नामक आपल्या पुस्तकात मॉरीस ॲडलर असे विवेचन मांडतात: “एक सुज्ञ शिक्षक लांबलचक आणि कठीण कायदेशीर वाद मध्येच थांबवून, हलका आणि अधिक उभारणीकारक असलेल्या विषयांकडे विषयान्तर करीत असे. . . . म्हणूनच आपल्याला, दंतकथा आणि इतिहास, समकालीन विज्ञान आणि लोकविद्या, बायबल स्पष्टीकरण आणि चरित्र, प्रवचन आणि तत्त्वज्ञान एकमेकांत अशाप्रकारे गुंफल्यासारखे वाटतील जसे अकादमीच्या पद्धतींशी अपरिचित असलेल्या एखाद्याला, ते अनियोजित कल्पनेचे विचित्र मिश्रण वाटते.” अकादमीतील सर्व विद्वानांच्या लेखी मात्र हे विषयान्तर काही उद्देशास्तव होते व ज्या विषयावर चर्चा चाललेली असे त्या विषयाशी संबंधित असे. हलाका व हग्गदा, रब्बींच्या अकादमीत बांधल्या जाणाऱ्‍या धार्मिक कल्पनाबंधाचे बिल्डिंग ब्लॉक्स होते.

दोन टॅलमूड्‌सची निर्मिती

कालांतराने, पॅलेस्टाईनमधील रब्बींचे मुख्य केंद्र टायबेरियसला हलविले. इतर महत्त्वपूर्ण अकादमी सेफोरीस, कैसरिया आणि लिड्डा येथे ठेवण्यात आल्या. पण, खालावत जाणाऱ्‍या आर्थिक परिस्थितीमुळे, सततच्या राजकीय अस्थैर्यामुळे व धर्मत्यागी ख्रिश्‍चनांकडून येणारा दबाव आणि छळ यांमुळे पूर्वेकडे बहुसंख्य यहुदी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी अर्थात बॅबिलोनला मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडले.

अनेक शतकांपर्यंत, अकादमींतील महान रब्बींकडून शिक्षण प्राप्त करण्याकरता विद्यार्थी बॅबिलोनहून पॅलेस्टाईनला जात असत. एक विद्यार्थी होता अब्बा बेन ईबो, ज्याला अब्बा अरीका असेही म्हटले जाई—लंबू अब्बा—पण नंतर फक्‍त रब म्हणून ओळखला जाऊ लागला. जुडा हा-नासी यांच्या प्रशिक्षणाखाली शिक्षण घेतल्यानंतर सा.यु. २१९ च्या सुमारास तो बॅबिलोनियाला परतला; त्यामुळे बॅबिलोनियन यहुदी समाजाच्या आध्यात्मिक महत्त्वाला वेगळेच वळण लागले. रबने पुष्कळ यहुदी असलेले परंतु कमी विद्वान असलेल्या सुरा येथे एक अकादमी स्थापन केली. त्याच्या ख्यातीमुळे १,२०० नियमित विद्यार्थी त्याच्या अकादमीकडे आकर्षित झाले आणि अदार व एलूल या यहुदी महिन्यांत तर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहू लागले. रबचा प्रमुख समकालीन सॅम्युलने नेहारदिया येथे एक अकादमी स्थापन केली. पुमबेडिथा आणि मेहोजा येथे इतर महत्त्वपूर्ण अकादमींची स्थापना झाली.

आता एखाद्याला पॅलेस्टाईनपर्यंत जाण्याची काही आवश्‍यकता नव्हती कारण तो बॅबिलोनमध्येच बड्या विद्वानांकडून शिक्षण प्राप्त करू शकत होता. एक वेगळा मजकूर म्हणून मिशनाच्या सूत्रबद्ध मांडणीमुळे बॅबिलोनियन अकादमींच्या पूर्ण स्वातंत्र्याचा मार्ग खुला झाला. आता पॅलेस्टाईन आणि बॅबिलोनियामध्ये अभ्यासाच्या भिन्‍नभिन्‍न शैलींचा आणि पद्धतींचा विकास झाला असला तरी, शिक्षकांमध्ये वारंवार होत असलेले दळणवळण आणि देवाणघेवाण यांमुळे अकादमींचे ऐक्य टिकून राहिले.

सा.यु. चौथ्या शतकाच्या अंतास व पाचव्या शतकाच्या सुरवातीस पॅलेस्टाईनमधील यहुद्यांसाठी परिस्थिती खासकरून कठीणच झाली. धर्मत्यागी ख्रिश्‍चनांच्या वाढत्या अधिकाराकडून येणाऱ्‍या प्रतिबंधांच्या व छळांच्या लाटांमुळे, सा.यु. ४२५ च्या सुमारास सन्हेद्रिनचा आणि नासीच्या (कुलपिता) हुद्द्‌याचा नाश झाला. या कारणास्तव, पॅलेस्टिनियन ॲमोरैमने, अकादमीदरम्यान होणाऱ्‍या वादविवादांचा सारांश एकाच संगतवार पुस्तकात एकत्र करण्यास सुरवात केली जेणेकरून ते टिकून राहतील याची खात्री होईल. सा.यु. चौथ्या शतकाच्या अंतिम भागात घाईगडबडीत संकलित केलेले हे पुस्तक पॅलेस्टिनियन टॅलमूड म्हणून प्रसिद्ध झाले.b

पॅलेस्टाईनमधील अकादमींचा अस्त होत चाललेला असताना बॅबिलोनियन ॲमोरैम आकाशाला भिडू पाहत होते. अबाय आणि राब्बा यांनी त्यांच्यातील वादविवाद क्लिष्ट व अत्यंत कठीण स्तरापर्यंत नेला जो नंतर टॅलमूडच्या पृथक्करणाचा नमुना बनला. नंतर, सुरातील (सा.यु. ३७१-४२७) अकादमीचा प्रमुख, आशी, वादविवादांचे वृत्त संकलित करून संपादन करू लागला. त्याचे असे करण्यामागचे कारण हे होते की त्याला, “यात इतकी गोची असल्यामुळे काही काळानंतर ते हळूहळू लोकांच्या स्मरणातून निघून जाण्याचा धोका असल्याची भीती होती” असे स्टाईनसॉल्ट्‌सने म्हटले.

हे मोठे पुस्तक, एका माणसाला तर सोडाच पण एका पिढीलासुद्धा व्यवस्थित लावता आले नसते. बॅबिलोनमध्ये ॲमोरैमचा काळ सा.यु. पाचव्या शतकात संपुष्टात आला; परंतु बॅबिलोनियन टॅलमूडचे शेवटच्या संपादनाचे काम सा.यु. सहाव्या शतकापर्यंत चालले; सबोरैम नामक एका गटाने ते पार पाडलं. सबोरैम ही “विवरणकर्ते,” किंवा “मत धारण करणारे,” असा अर्थ देणारी अरॅमिक संज्ञा आहे. या अंतिम संपादकांनी शतकांपासून रब्बींनी केलेल्या वादविवादाच्या माहितीचा हा ढीग गोळा केला, त्याला आकार दिला, वेगळ्या शब्दांत पुन्हा मांडून, आधीच्या सर्व यहुदी लिखाणांपासून वेगळ्या अशा शैलीचे व रचनेचे एकच बॅबिलोनियन टॅलमूड बनवले.

टॅलमूडने काय साध्य केले?

मिशनाचा उगम इब्री शास्त्रवचनांप्रमाणेच आहे हे सिद्ध करण्याचे टॅलमूडच्या रब्बींनी ठरवले. एवढा आटापीटा कशासाठी? जेकब नॉईसनर म्हणतात: “घोषित वादविवाद मिशनाचा लौकिक होता. परंतु, विचारवंतांचा अधिकारच समस्येचे मूळ असल्याचे दिसून आले.” हा अधिकार भक्कम करण्याकरता, मिशनातील प्रत्येक वाक्याचे, कधीकधी तर प्रत्येक शब्दाचे परीक्षण करण्यात आले, त्यावर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले, खुलासा करण्यात आला आणि एका विशिष्ट मार्गाने सुसंगत करण्यात आले. अशाप्रकारे रब्बींनी “मिशनाला एका मार्गाहून दुसऱ्‍या मार्गाला नेले,” असे नॉईसनर यांनी निरिक्षिले. मिशना हे एक संपूर्ण पुस्तक होते तरी आता त्याचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान त्याचे पुनःनिर्माण करण्यात आले, त्याचे पुनःपरीक्षण करण्यात आले.

या नवीन पुस्तकाने—टॅलमूडने—रब्बींचा उद्देश पूर्ण केला. त्यांनी पृथक्करणाचे नियम बनवले व अशाप्रकारे लोकांना रब्बींप्रमाणे विचार करण्यास शिकवले. रब्बींचा असा समज होता, की अभ्यास करण्याची आणि पृथक्करण करण्याची त्यांची पद्धत देवाचे मन प्रतिबिंबित करीत होती. टॅलमूडचा अभ्यास करणे त्यांचे ध्येय बनले, उपासनेचा एक प्रकार बनला; त्यांचा समज होता, की मनाचा उपयोग केल्याने ते देवाचे अनुकरण करतात. येणाऱ्‍या सर्व पिढ्यांसाठी, टॅलमूडचे याच पद्धतीने पृथक्करण केले जाणार होते. याचा परिणाम? इतिहासकार सेसील रोथ लिहितात: “टॅलमूडची [यहुद्यांवर] वैशिष्ट्यपूर्ण छाप पडली ज्यामुळे ते इतरांपासून भिन्‍न वाटत होते; शिवाय टॅलमूडने त्यांना एक लोक या नात्याने बदलण्याची क्षमता दिली. टॅलमूडच्या वादविवाद कलेने त्यांचे बुद्धिचातुर्य धारदार बनवले, त्यांना . . . मानसिकरीत्या तल्लक बनवले. . . . टॅलमूडने मध्ययुगीन काळातील छळग्रस्त यहुद्यांना जणू काय एका नवीन जगात नेले जेथे ते सुखाने जगू शकत होते. . . . त्यांना जणू एक जन्मभूमी मिळाली होती, त्यांनी स्वतःचा देश गमावला असला तरी या जन्मभूमीला ते आपल्याबरोबर कोठेही नेऊ शकत होते.”

रब्बींची विचारसरणी इतरांना शिकवण्याद्वारे, टॅलमूडकडे खरोखरच शक्‍ती राहिली आहे. परंतु, सर्वांसमोर—यहुदी आणि गैर-यहुदी असलेल्यांसमोर—एक प्रश्‍न उभा राहतो, टॅलमूड खरोखरच देवाचे मन प्रतिबिंबित करते का?—१ करिंथकर २:११-१६.

[तळटीपा]

a मिशनाचा विकास आणि आशय यांच्या अधिक माहितीकरता, नोव्हेंबर १५, १९९७ च्या टेहळणी बुरूज मधील “मिशना आणि देवाने मोशेला दिलेले नियमशास्त्र” हा लेख पाहा.

b पॅलेस्टिनियन टॅलमूड जेरुसलेम टॅलमूड म्हणूनही सर्वत्र प्रसिद्ध आहे. परंतु हे चुकीचे नाव आहे, कारण ॲमोराईकच्या बहुतेक कालावधीत तर यहुद्यांना जेरुसलेममध्ये मज्जाव होता.

[३१ पानांवरील चौकट]

दोन टॅलमूड—दोघांत कोणता फरक आहे?

इब्री शब्द “टॅलमूड” याचा अर्थ “शिक्षण” किंवा “शिकणे” असा होतो. पॅलेस्टाईन व बॅबिलोनियातील ॲमोरैमांना मिशनाचे शिक्षण घ्यायचे किंवा पृथक्करण करायचे होते. दोन्ही टॅलमूड (पॅलेस्टिनियन आणि बॅबिलोनियन) असे करतात, पण दोघांत कोणता फरक आहे? जेकब नॉईसनर लिहितात: “पहिले टॅलमूड पुराव्याचे पृथक्करण करते, दुसरे टॅलमूड पूर्वपक्षाचा बारकाईने तपास करते; पहिले टॅलमूड पूर्णपणे केसच्या चौकटीत राहते, दुसरे टॅलमूड केसच्या चौकटीबाहेर जाते.”

बॅबिलोनियन टॅलमूडचे अधिक गहन व कसून संपादन केल्यामुळे, ते नुसतेच मोठे बनले नाही तर त्याची विचारसरणी आणि पृथक्करण अधिक खोल आणि स्पष्ट झाली. “टॅलमूड” या शब्दाचा उल्लेख होतो तेव्हा सहसा ते बॅबिलोनियन टॅलमूड असते. अनेक शतकांपासून याच टॅलमूडचा अधिक अभ्यास करण्यात आला व त्यावर विवेचने मांडण्यात आली. नॉईसनर मते, पॅलेस्टिनियन टॅलमूड “कार्यक्षमतेचे फळ आहे” तर, बॅबिलोनियन टॅलमूड “अलौकिकतेचे फळ आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा