वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ४/१५ पृ. १३-१९
  • खऱ्‍या शांतीच्या प्राप्तीसाठी झटा व तिचा मार्ग धरा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खऱ्‍या शांतीच्या प्राप्तीसाठी झटा व तिचा मार्ग धरा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लोक शांतिप्रिय बनू शकतात
  • ज्यांनी शांतीचा मार्ग धरला आहे
  • बराच मोठा बदल
  • शांतीच्या अधिपतीचे राज्य
  • मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • पृथ्वीवर शांती—केवळ एक स्वप्न का?
    सावध राहा! माहितीपत्रक ६-४ (gbr6-4)
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ४/१५ पृ. १३-१९

खऱ्‍या शांतीच्या प्राप्तीसाठी झटा व तिचा मार्ग धरा!

“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल . . . त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.”—१ पेत्र ३:१०, ११.

१. यशयाचे कोणते प्रसिद्ध शब्द निश्‍चितच सफल होतील?

“ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यशया २:४) हे प्रसिद्ध वचन, न्यूयॉर्क सिटी येथील संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या जागतिक मुख्यालयाजवळ ठळक अक्षरांत आढळत असले तरीही या जागतिक संघटनेने या वचनाचे अजिबातच पालन केलेले नाही. तथापि, ही घोषणा यहोवा देवाच्या कधीही खोट्या न ठरणाऱ्‍या वचनात अंतर्भूत असल्यामुळे ती निष्फळ ठरणार नाही.—यशया ५५:१०, ११.

२. यशया २:२, ३ यानुसार “शेवटल्या दिवसांत” काय घडेल?

२ यशया २:४ येथे आढळणारे शब्द खरे पाहता एका अद्‌भुत भविष्यवादात, खऱ्‍या शांतीविषयीच्या भविष्यवादात समाविष्ट आहेत—आणि त्याची आज, आपल्या काळात पूर्णता देखील होत आहे. युद्धे आणि युद्धांतील शस्त्रास्त्रे नाहीशी होण्याविषयीच्या उत्साहवर्धक प्रत्याशांची घोषणा करण्याआधी हा भविष्यवाद म्हणतो: “शेवटल्या दिवसांत असे होईल की परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील. देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू; कारण सीयोनेतून धर्मशास्त्र व यरुलेमेतून परमेश्‍वराचे वचन निघेल.”—यशया २:२, ३.

लोक शांतिप्रिय बनू शकतात

३. आधी भांडखोर असलेल्या व्यक्‍तीमध्ये बदल होऊन ती कशाप्रकारे शांतिप्रिय बनू शकते?

३ शांतिप्रिय मार्ग धरू शकण्यासाठी आधी लोकांना यहोवाच्या मार्गांबद्दल शिक्षण देणे आवश्‍यक आहे याकडे लक्ष द्या. यहोवाचे शिक्षण घेऊन त्यानुसार आज्ञाधारकपणे चालल्यास एखाद्याची विचारसरणी आणि वागणूकही बदलू शकते, यामुळे आधी कोणी भांडखोर असल्यास तो शांतिप्रिय बनतो. हे रूपांतर कशाप्रकारे घडवून आणता येते? रोमकर १२:२ म्हणते: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” देवाच्या वचनातील तत्त्व आणि नीतिनियम यांनी व्यापून टाकण्याद्वारे आपण आपल्या मनाचे नवीकरण करतो किंवा त्यास एक नवी दिशा देतो. बायबलचा नियमितपणे अभ्यास केल्यामुळे आपल्याला हा बदल करण्यासाठी मदत मिळते. शिवाय, याद्वारे यहोवाची आपल्याकरता काय इच्छा आहे हे समजून घेण्यासाठी साहाय्य प्राप्त होते ज्यामुळे कोणत्या मार्गाने आपण जावे हे आपल्याला स्पष्टपणे दिसते.—स्तोत्र ११९:१०५.

४. एखादी व्यक्‍ती कोणत्या प्रकारे शांतताप्रेमी नवे व्यक्‍तिमत्व धारण करते?

४ बायबल सत्य केवळ आपल्या विचारसरणीतच नव्हे तर आपल्या वागणुकीत आणि व्यक्‍तिमत्त्वातही रूपांतर करते. पौलाच्या या आग्रहाप्रमाणे करण्यास ते आपल्याला साहाय्य करते: “तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्‍त असून त्याचा नाश होत आहे; आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे; आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” (इफिसकर ४:२२-२४) मनोवृत्ती ही आंतरिक असते. यहोवा आणि त्याच्या नियमांबद्दलचे आपले प्रेम जसजसे वाढत जाते, तसतसे आपल्या मनोवृत्तीचे रूपांतर होत जाते आणि त्यामुळे आपण आध्यात्मिक मनोवृत्तीचे, शांतिप्रिय लोक बनतो.

५. आपल्या शिष्यांना येशूने दिलेली “नवी आज्ञा,” त्यांच्यामधील शांतीला कशाप्रकारे हातभार लावते?

५ असे रूपांतर होण्याची आवश्‍यकता, येशूने त्याच्या शिष्यांसोबत घालवलेल्या शेवटल्या काही तासांत त्यांना दिलेल्या मार्गदर्शनातून स्पष्ट होते; तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) हे ख्रिस्तासमान, निरपेक्ष प्रेम सर्व शिष्यांना परिपूर्ण एकतेच्या बंधनात बांधते. (कलस्सैकर ३:१४) जे लोक ही “नवी आज्ञा” स्वीकारून त्या अनुषंगाने चालण्यास इच्छुक आहेत, केवळ अशांनाच देवाने प्रतिज्ञा केलेली शांती उपभोगता येईल. आज कोणी असे करत आहेत का?

६. जगाच्या लोकांच्या विपरीत यहोवाचे साक्षीदार शांती का उपभोगतात?

६ यहोवाचे साक्षीदार आपल्या जगव्याप्त बंधुवर्गात प्रेम प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात. ते जगातल्या सर्व राष्ट्रांतून आले असले तरीसुद्धा ते कधीही जगिक मतभेदांत सामील होत नाहीत, मग यासाठी त्यांच्यावर भयंकर राजनैतिक आणि धार्मिक दबाव आला तरी ते तो सहन करतात. एका संघटित समूहाच्या रूपात त्यांना यहोवामार्फत शिक्षण मिळते आणि ते शांती उपभोगतात. (यशया ५४:१३) राजकारणातील विवादांत ते तटस्थ राहतात आणि युद्धांमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांपैकी काहीजण पूर्वी स्वभावाने अत्यंत आक्रमक होते तरीसुद्धा, त्यांनी आता ती जीवनशैली त्यागली आहे. ख्रिस्त येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारे ते शांतताप्रेमी ख्रिश्‍चन बनले आहेत. तसेच, ते पेत्राचा हा सल्ला मनःपूर्वक पाळतात: “जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे; त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.”—१ पेत्र ३:१०, ११; इफिसकर ४:३.

ज्यांनी शांतीचा मार्ग धरला आहे

७, ८. युद्धे त्यागून जे खऱ्‍या शांतीसाठी झटू लागले अशांची उदाहरणे द्या. (तुमच्या माहितीतील इतर कोणाविषयी सांगा.)

७ विशेष प्रशिक्षित दहशतवादविरोधी पथकाचा भूतपूर्व अधिकारी रामी ओवेद याचेच उदाहरण पाहा. त्याला शत्रूंना ठार मारण्याचे प्रशिक्षण मिळालेले होते. त्याला आपल्या इस्राएली राष्ट्रीयत्वाचा अत्यंत अभिमान होता; तथापि, त्याचे ज्या मुलीवर प्रेम होते तिच्याशी त्याने लग्न करू नये अशी रब्बींची इच्छा होती, फक्‍त एवढ्या कारणाने की ती एक आशियाई, गैरयहूदी मुलगी होती; हे त्याला ज्या दिवशी कळले त्या दिवशी त्याच्या राष्ट्राभिमानाला धक्का बसला. तो बायबलमध्ये सत्य शोधू लागला. मग तो यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात आला. साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केल्यावर त्याला खात्री पटली की यापुढे त्याला कट्टर राष्ट्राभिमानी राहता येणार नव्हते. ख्रिस्ती प्रीतीचा अर्थ, युद्धे आणि शस्त्रास्त्रे त्यागून जातीजातीच्या लोकांवर प्रेम करण्याचे शिकून घेणे होय. एकदा त्याला एक पत्र आले; ते पत्र पाहताच त्याला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला, कारण त्या पत्राचे सुरवातीचे शब्द होते, “प्रिय बंधू रामी”! त्यात एवढे नवल करण्यालायक काय होते? पत्र लिहिणारी व्यक्‍ती एक पॅलेस्टेनियन साक्षीदार होती. रामी म्हणतो, “पॅलेस्टेनियन लोकांना मी माझे शत्रू मानत होतो आणि त्यांतल्याच एकीने चक्क मला ‘प्रिय बंधू’ म्हणावे यावर मला काही केल्या विश्‍वासच बसत नव्हता.” रामी आणि त्याच्या बायकोने आता देवाच्या खऱ्‍या शांतीचा मार्ग धरला आहे.

८ आणखी एक उदाहरण जेऑर्ज रूटर याचे आहे, जो दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात रशियावर आक्रमण केलेल्या जर्मन सैन्यात होता. संपूर्ण जगावर वर्चस्व मिळवण्यासाठी हिटलरने आखलेल्या भव्यदिव्य योजनेचा फोलपणा त्याला लवकरच लक्षात आला. युद्धावरून परतल्यावर, तो यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागला. त्याने लिहिले: “शेवटी, हळूहळू सर्व गोष्टींचा उलगडा होऊ लागला. मला जाणीव झाली की जे रक्‍ताचे पाट वाहिले गेले त्यासाठी देव जबाबदार नव्हता . . . मला शिकायला मिळाले की त्याचा उद्देश एका जगव्याप्त परादीसमध्ये आज्ञाधारक मानवजातीला चिरकालिक आशीर्वाद देण्याचा होता . . . हिटलरने आपल्या ‘हजार-वर्षीय राज्याबद्दल’ फुशारकी मारली पण ते राज्य जेमतेम १२ वर्षंच टिकलं—आणि त्याचाही किती भयंकर शेवट झाला! हिटलर नव्हे तर ख्रिस्तच . . . पृथ्वीवर हजार वर्षांचे राज्य स्थापन करू शकतो आणि करेल.” जेऑर्जला, आता पूर्णवेळेच्या सेवेत जणू खऱ्‍या शांतीचा राजदूत या नात्याने सेवा करून जवळजवळ ५० वर्षे होत आलीत.

९. नात्सी जर्मनीमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या अनुभवावरून ते धाडसी असले तरीही शांतिप्रिय आहेत हे कशाप्रकारे प्रत्ययास येते?

९ जर्मनीतील नात्सी शासनाच्या काळात यहोवाच्या साक्षीदारांनी कायम राखलेली सचोटी आणि तटस्थता, आज, ५० वर्षे उलटून गेल्यावरही, देवाबद्दल आणि शांतीबद्दल असलेल्या त्यांच्या प्रेमाची ग्वाही देते. वॉशिंग्टन, डी.सी., येथील युनायटेड स्टेट्‌स हॉलकॉस्ट मेमोरियल म्युझियमने प्रकाशित केलेल्या एका पुस्तिकेत पुढील विधान आहे: “नात्सी शासनादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांनी भयंकर छळ सोसला. . . . त्यांना यातना सोसाव्या लागल्या, छळ छावण्यांमध्ये अत्याचार सहन करावा लागला आणि कधी कधी तर मृत्यूची शिक्षाही भोगावी लागली, तरीसुद्धा [आपला धर्म त्यागण्यास] नकार देण्यात या बहुसंख्यांकांनी दाखवलेल्या धाडसामुळे अनेक समकालीन लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला.” पुस्तिकेत पुढे म्हटले आहे: “छावण्यांतून बंदिस्तांची बंधनमुक्‍ती होण्याच्या काळातही, जिवंत बचावलेल्यांपैकी अनेकांचे धर्मपरिवर्तन करण्याचे यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले.”

बराच मोठा बदल

१०. (अ) खरी शांती येण्यासाठी कोणता मोठा बदल होणे आवश्‍यक आहे? (ब) हे दानीएलाच्या पुस्तकात कशाप्रकारे चित्रित करण्यात आले?

१० त्याअर्थी, मोठ्या प्रमाणावर मतपरिवर्तन घडवून लोकांना ख्रिस्ती तटस्थतेचा विश्‍वास स्वीकारावयास लावण्याद्वारे यहोवाचे साक्षीदार सबंध जगात शांती आणू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे का? नाही! पृथ्वीवर शांती पुनर्स्थापित होण्यासाठी एक बराच मोठा बदल घडून येणे आवश्‍यक आहे. तो कोणता? विघटनात्मक, जुलमी आणि हिंसक मानवी शासनाच्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना ज्यासाठी प्रार्थना करावयास शिकविले ते देवाचे राज्य आले पाहिजे. (मत्तय ६:९, १०) परंतु, हे कशाप्रकारे घडेल? देवाकडून आलेल्या एका स्वप्नात, दानीएल संदेष्ट्यास कळविण्यात आले होते की शेवटल्या दिवसांत, एखाद्या भल्या मोठ्या पाषाणासारखे, देवाचे राज्य ‘कोणा मनुष्याचा हात न लागता’ पृथ्वीवरील मानवजातीच्या राजनैतिक शासनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या एका अक्राळविक्राळ पुतळ्याचा चुराडा करील. मग त्याने असे घोषित केले: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:३१-४४.

११. यहोवा कोणत्या माध्यमाने शांतीसाठी आवश्‍यक असलेला बदल घडवून आणेल?

११ जागतिक परिस्थितीत असा अमूलाग्र बदल का घडून येईल? कारण, यहोवाने अभिवचन दिले आहे की तो या पृथ्वीवरून तिला प्रदूषित करणाऱ्‍या आणि तिचा नाश करणाऱ्‍या सर्वांना नाहीसे करील. (प्रकटीकरण ११:१८) हे रूपांतर, सैतान व त्याच्या दुष्ट जगाविरुद्ध यहोवाच्या नीतिमान युद्धाच्या वेळेस घडून येईल. आपण प्रकटीकरण १६:१४, १६ येथे असे वाचतो: “ते चिन्हे दाखविणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांस एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात. त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.”

१२. हर्मगिदोन कशा प्रकारचे असेल?

१२ हर्मगिदोन कसे असेल? ते एखाद्या आण्विक महासंकटासारखे किंवा मानवांनी घडवून आणलेल्या विपत्तीसारखे नसेल. ते तर देवाचे युद्ध आहे, जे सर्व मानवी युद्धांचे उच्चाटन करील आणि अशा युद्धांना प्रोत्साहन देणाऱ्‍यांचाही समूळ नाश करील. ते शांतिप्रिय लोकांसाठी खरी शांती आणणारे देवाचे युद्ध आहे. होय, हर्मगिदोन यहोवाने उद्देशिल्यानुसार येत आहे. त्याला विलंब लागणार नाही. हबक्कूक या त्याच्या संदेष्ट्याने प्रेरित होऊन लिहिले: “कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) आपल्या मानवी भावनांमुळे कदाचित, त्याला विलंब होत आहे असे आपल्याला वाटू शकेल, पण यहोवा आपल्या वेळापत्रकाला चुकणार नाही. यहोवाने पूर्वनिश्‍चित केलेल्या वेळेस हर्मगिदोन अकस्मात येईल.

१३. देव, खरा दोषी अर्थात दियाबल सैतान याचा कसा निकाल लावेल?

१३ या निर्णायक कृतीमुळे खऱ्‍या शांतीचा मार्ग मोकळा होईल! परंतु, खरी शांती कायमची स्थिरावण्यासाठी आणखी काहीतरी करणे आवश्‍यक आहे—अर्थात, विघटन, वैर आणि संघर्ष उत्पन्‍न करणाऱ्‍याचाच नायनाट. आणि यानंतर नेमके हेच घडेल असे बायबल भाकीत करते—युद्धांचा प्रवर्तक आणि लबाडीचा बाप, सैतान यास अथांग डोहात टाकण्यात येईल. प्रेषित योहानाने ही घटना एका भविष्यसूचक दृष्टान्तात पाहिली; याविषयी प्रकटीकरण २०:१-३ येथे असे सांगितले आहे: “नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल, व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्‍यास धरले, आणि त्याने एक हजार वर्षेंपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले; आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रास आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला.”

१४. सैतानाविरुद्ध देवाच्या विजयशाली कार्याचे कसे वर्णन करता येईल?

१४ हे काही स्वप्न नव्हे; ही देवाची प्रतिज्ञा आहे—आणि बायबल म्हणते: “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.” (इब्री लोकांस ६:१८) यामुळेच यहोवा आपला संदेष्टा यिर्मया याच्याद्वारे म्हणू शकला: “मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्‍वर आहे . . . यांत मला संतोष आहे, असे परमेश्‍वर म्हणतो.” (यिर्मया ९:२४) यहोवा धर्माने व न्यायाने कार्य करतो आणि जी शांती तो सबंध पृथ्वीवर आणेल त्याकरवी त्याला आनंद मिळतो.

शांतीच्या अधिपतीचे राज्य

१५, १६. (अ) राजा म्हणून राज्य करण्याकरता यहोवाने कोणाला निवडले आहे? (ब) त्या शासनाचे कसे वर्णन करण्यात आले आहे, आणि त्यात कोण भाग घेतील?

१५ आपल्या राज्य व्यवस्थेच्या अधीन राहणाऱ्‍या सर्वांना खरी शांती मिळेल याची खात्री करण्यासाठी यहोवाने शांतीचा अधिपती येशू ख्रिस्त याच्या हातात शासन सोपवले आहे; याविषयी यशया ९:६, ७ येथे असे भाकीत केले आहे: “कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला अद्‌भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; . . . सेनाधीश परमेश्‍वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.” मशिहाच्या शांतीमय शासनाविषयी स्तोत्रकर्त्याने देखील लिहिले: “त्याच्या कारकीर्दींत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांति असो.”—स्तोत्र ७२:७.

१६ याशिवाय, ख्रिस्ताचे १,४४,००० आत्म्याने अभिषिक्‍त झालेले बंधू त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करतील. हे ख्रिस्तासोबत सहवारिस आहेत; त्यांच्याविषयी पौलाने लिहिले: “शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो.” (रोमकर १६:२०) युद्धपिपासू दियाबल सैतानावर ख्रिस्ताने मिळवलेल्या विजयात हे देखील स्वर्गात सहभागी होतील!

१७. खऱ्‍या शांतीचे वतन मिळवण्यासाठी आपण काय करावे?

१७ तर मग, प्रश्‍न असा उद्‌भवतो की खऱ्‍या शांतीचे वतन मिळवण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? खरी शांती केवळ देवाच्या मार्गाने येणे शक्य आहे आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही निश्‍चित पावले उचलली पाहिजेत. तुम्ही शांतीच्या अधिपतीचा स्वीकार करून त्याच्याकडे वळले पाहिजे. याचा अर्थ असा की, तुम्ही पापी मानवजातीला सोडवणारा आणि त्यांच्यासाठी खंडणी देणारा या नात्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे. येशूचे स्वतःचे पुढील शब्द सर्वज्ञात आहेत: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) खरी शांती आणि तारण आणण्यासाठी देवाचा प्रतिनिधी या नात्याने तुम्ही ख्रिस्त येशूवर विश्‍वास ठेवण्यास इच्छुक आहात का? शांती स्थापित करू शकेल किंवा तिची हमी देऊ शकेल असे स्वर्गाखाली आणखी कोणतेही दुसरे नाव नाही. (फिलिप्पैकर २:८-११) का? कारण येशू हा देवाचा निवडलेला आहे. पृथ्वीवर राहिलेल्यांपैकी तो शांतीचा सर्वश्रेष्ठ संदेशवाहक आहे. तुम्ही येशूच्या शब्दांकडे कान देऊन त्याच्या उदाहरणाचे अनुकरण कराल का?

१८. योहान १७:३ यातील येशूच्या शब्दांना प्रतिसाद देण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१८ येशूने म्हटले, “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) राज्य सभागृहांत होणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये नियमितपणे उपस्थित राहण्याद्वारे अचूक ज्ञान घेण्याची हीच वेळ आहे. या शैक्षणिक सभांमध्ये तुम्हाला तुमचे ज्ञान व आशा इतरांनाही देण्याचे प्रोत्साहन प्राप्त होईल. तुम्ही देखील देवाच्या शांतीचे राजदूत बनू शकता. यहोवा देवावर भरवसा ठेवून तुम्ही आताही शांती उपभोगू शकता, जसे पंडिता रमाबाई भाषांतरात यशया २६:३ या वचनात सांगण्यात आलेले आहे: “स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील, कारण ते तुझ्यावर भाव ठेवते.” तुम्ही कोणावर भाव ठेवावा? “परमेश्‍वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभु परमेश्‍वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे.”—यशया २६:४.

१९, २०. आज खऱ्‍या शांतीसाठी झटून तिचा मार्ग धरणाऱ्‍यांसाठी कोणते भवितव्य राखून आहे?

१९ देवाच्या शांतीमय नव्या जगातील सार्वकालिक जीवन मिळवण्याचा आजच निर्धार करा. प्रकटीकरण २१:३, ४ येथे देवाचे वचन आपल्याला खात्री देते: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” अशाच शांतिमय भवितव्याची तुम्हाला उत्कंठा नाही का?

२० तर मग, देवाची प्रतिज्ञा आठवणीत ठेवा. “पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील.” (स्तोत्र ३७:११, ३७) तो हर्षमय दिवस येईल तेव्हा आपण कृतज्ञतेने म्हणावे, “सरतेशेवटी, खरी शांती! खऱ्‍या शांतीचा उगम, यहोवा देव यास लाखोलाख धन्यवाद असो!”

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?

◻ विचारसरणीत आणि वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी एखाद्याला कशाद्वारे साहाय्य मिळू शकते?

◻ वैयक्‍तिकरित्या आणि सामूहिकरित्या यहोवाच्या साक्षीदारांनी खऱ्‍या शांतीसाठी असलेले आपले प्रेम कशा प्रकारे व्यक्‍त केले आहे?

◻ वैरभाव आणि युद्धांना प्रोत्साहन देणाऱ्‍या सर्वांचा देव कशा प्रकारे निकाल लावेल?

◻ शांतीच्या अधिपतीचे शासन मानवजातीसाठी काय करेल?

[१४ पानांवरील चित्र]

यशयाचे शब्द संयुक्‍त राष्ट्रसंघाकडून नव्हे, तर यहोवाच्या शिकवणुकीला प्रतिसाद देणाऱ्‍यांकडून पूर्ण होतात

[१५ पानांवरील चित्रं]

या दोघांनी शांतीचा मार्ग धरण्याकरता परिवर्तन केले

रामी ओवेद

जेऑर्ज रूटर

[१६ पानांवरील चित्र]

शांतीच्या अधिपतीच्या राज्याधीन खरी शांती नांदेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा