यहोवाला सन्मानित करणारे विवाह
ख्रिस्ती विवाहावरील खालील लेख खरं तर इथियोपियामध्ये तयार करण्यात आला होता यासाठी, की त्या देशातील नवोदित ॲमहारिक भाषिक यहोवाच्या साक्षीदारांना मदतदायक मार्गदर्शन प्राप्त व्हावे. या लेखात काही स्थानिक रितीरिवाज आणि प्रघातांची चर्चा करण्यात आली आहे आणि तुम्ही जेथे राहता त्याठिकाणी कदाचित अशा प्रकारची वहिवाट नसेलही. कदाचित अगदीच वेगळ्याच प्रकारची परिस्थिती पाहणे तुम्हाला मनोरंजक वाटेल. तसेच हा लेख संतुलित बायबल सल्ला पुरवतो आणि तुमची स्थानिक विवाह पद्धत वेगळी असली तरी देखील हा सल्ला तुम्हाला व्यवहार्य असल्याचे दिसून येईल.
“ख्रिस्ती विवाह मन हर्षित करतात” हा वाचनीय अभ्यास लेख टेहळणी बुरूज एप्रिल १५, १९८४ (इंग्रजी) या लेखात आला होता. त्याच अंकातील पुढील लेखाचे शीर्षक होते, “विवाहाच्या मेजवानीतील आनंदात संतुलित असा.” (विवाहाचा विचार करणाऱ्यांसाठी अधिक माहिती तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे, अध्याय २, आणि तुमचे तारुण्य—त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या, अध्याय १९ आणि २०. [इंग्रजी])a हे लेख छापून आल्यापासून अनेक जण यहोवाचे साक्षीदार झाले आहेत म्हणून आपल्या प्रदेशात विशेषपणे लागू होणाऱ्या काही मुद्यांची आपण उजळणी करू या. तसेच काही यथोचित मुद्दे देखील आपण विचारात घेऊ या ज्यांमुळे विवाहाचा आरंभक अर्थात यहोवाला विवाहप्रसंगी आपल्याला आदर दाखविता येईल.
पहिला प्रश्न आपल्या मनात येईल तो म्हणजे, विवाह कोणत्या काळात करावा? पारंपारिक विवाह मुहूर्तावर लग्नाची तारीख ठरवावी का? वर्षातील विशिष्ट काळात लग्न केले नाही, तर तो विवाह यशस्वी होत नाही, असा स्थानिक लोकांचा विश्वास आहे. या अंधश्रद्धेला कोणत्याही प्रकारचा आधार नाही कारण अनेक अशी जोडपी आहेत ज्यांचा विवाह पारंपारिक मुहूर्तावर झाला नसला तरी ते आनंदाने आणि जोडीने यहोवाची सेवा करीत आहेत. आपण चांगल्या आणि वाईट नशीबावर विश्वास ठेवत नाही. (यशया ६५:११; कलस्सैकर २:८) आपल्या नातेवाईकांच्या अंधविश्वासानुसार आपण लग्नाची तारीख ठरवली तर सत्य आणि असत्य यांतील फरक आपण त्यांना दाखवून देणार नाही. खरं तर, ख्रिस्ती कोणत्याही महिन्यात लग्न करू शकतात.
लग्नाची योग्य ती अधिकृत नोंद झाल्यानंतर विवाहाचे भाषण देण्यासाठी पुष्कळ दिवस घालवणे सुज्ञतेचे होणार नाही. विवाहाचे भाषण राज्य सभागृहामध्ये व्हावे, असे जोडप्याला वाटत असल्यास त्यांनी राज्य सभागृह वापरण्यासाठी मंडळीच्या वडिलांना आधीच भेटले पाहिजे. हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्याची स्थानिक वडील खात्री करतील. विवाहाचे भाषण अशावेळी ठेवावे ज्यामुळे मंडळीच्या कार्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. मदतदायक सल्ला देण्यासाठी आणि विवाहास प्रतिबंधक ठरणारे कोणतेही नैतिक आणि कायदेशीर अडसर नाहीत याची खात्री करण्यासाठी तसेच भाषणानंतर होणारा कार्यक्रम समजावून घेण्यासाठी, विवाहाचे भाषण देणाऱ्या बांधवाने नवऱ्या मुलाची आणि नवरी मुलीची आधीच भेट घ्यावी. विवाहाचे भाषण सुमारे अर्ध्या तासाचे असावे आणि आध्यात्मिक बाबींवर जोर देऊन ते चांगल्या प्रकारे देण्यात यावे. विवाह भाषणानंतर होणाऱ्या मेजवानीपेक्षा विवाहाचे भाषण निश्चितपणे अधिक महत्त्वाचे आहे.
ख्रिस्ती विवाहामुळे, आपण ‘जगाचे भाग नाहीत’ हे दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळते. (योहान १७:१४; याकोब १:२७) आपला सुव्यवस्थितपणा उठून दिसला पाहिजे. याचा असा अर्थ होतो, की लोकांचा वेळ वाया घालवण्याऐवजी आपण वेळेच्या बाबतीत दक्ष असले पाहिजे अन्यथा मंडळीच्या कार्यांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असते. ही गोष्ट विशेषतः नवरीने लक्षात ठेवली पाहिजे कारण सत्यात नसणारे तिचे नातेवाईक तिला उशिरा येण्याचा आग्रह करतील—असे केल्याने जणू तिचा दिमाख वाढत असतो, असे त्यांना वाटते. वेळेवर येण्याद्वारे ख्रिस्ती बहीण आध्यात्मिक गुण प्रकट करू शकते जसे, की नम्रता तसेच विचारीपणा आणि या गोष्टी तिच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत! तसेच छायाचित्रण करण्यासाठी छायाचित्रकाराला बोलवण्यात येते तेव्हा देखील सुव्यवस्थितपणा राखणे महत्त्वाचे आहे. हे उचित आहे, की छायचित्रकाराने कोट, टाय किंवा चांगल्या प्रकारचा पोषाख घालावा आणि छायाचित्रे घेताना त्याने भाषणात अडथळा आणू नये. प्रार्थना चालू असताना कोणत्याही प्रकारचे छायाचित्र घेऊ नये. आपल्या सुव्यवस्थितपणामुळे यहोवाचा आदर होईल आणि एक चांगली साक्ष देखील देण्यात येईल. जगिक परंपरांशी जुळवून घेण्याची काहीएक आवश्यकता नाही नाहीतर या कार्यक्रमाचा खरा अर्थच नाहीसा होईल.
यशस्वी विवाहासाठी मेजवानी दिलीच पाहिजे असे नाही आणि एखाद्याने मेजवानी दिलीच तर शास्त्रवचने त्याच्या विरोधात नाहीत. जगिक मेजवान्यांमध्ये अफाट खर्च, मोठ्या प्रमाणावर खाणे-पिणे, उन्मद संगीत, अश्लिल नृत्य आणि भांडणेही होतात परंतु खऱ्या ख्रिश्चनांनी मेजवानीच्या वेळी यांसर्वांपासून वेगळे असले पाहिजे. बायबल “रंगेलपणा”ची वर्गवारी शरीराच्या कार्यांत करते. (गलतीकर ५:२१) जेव्हा समूह इतका मोठा नसतो तेव्हा योग्य ते नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ जाते. पारंपारिक वहिवाट आहे म्हणून मांडव घालण्याची गरज नाही. काही जण जागा आणि हवामान यांचा विचार करून मांडव घालण्याचा निर्णय घेतील, ही व्यक्तिगत बाब आहे.
अनुभवाने हे दाखवून दिले आहे, की पाहुण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याची प्रभावी पद्धत म्हणजे लिखित स्वरूपात ठराविक निमंत्रणाचा उपयोग करणे. संपूर्ण मंडळीला बोलवण्याऐवजी विशिष्ट लोकांना बोलावणे ही सुज्ञतेची बाब आहे आणि सुव्यवस्थित ख्रिस्ती या नात्याने आपण आमंत्रित केलेल्या मर्यादित संख्येचा आदर केला पाहिजे. मेजवानीच्या वेळी बहिष्कृत व्यक्ती आल्याचे पाहून होणारा गोंधळ लिखित स्वरूपात निमंत्रणे देण्याद्वारे टाळला जाऊ शकतो आणि असे झाले नाही तर अनेक भाऊ बहीण मेजवानीमधून निघून जातील. (१ करिंथकर ५:९-११) जोडप्याने जर विश्वासात नसलेल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना बोलावले तर यामध्ये कोणतीही शंका नाही, की त्यांची संख्या मर्यादित असावी, जोडप्याने ‘विश्वासात असलेल्यांना’ अधिक महत्त्व द्यावे. (गलतीकर ६:१०) विश्वासात नसणाऱ्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना मेजवानीच्या वेळी बोलवण्याऐवजी काहींनी त्यांना विवाहाच्या भाषणासाठी आमंत्रित केले आहे. का बरं? कारण अनेकदा विश्वासात नसणाऱ्या नातेवाईकांनी मेजवानीच्या वेळी अशा प्रकारचा गोंधळ घातला, की अनेक भाऊ बहिणींना त्याठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला. आपल्या फक्त नजीकच्या कौटुंबिक सदस्यांसोबत किंवा ख्रिस्ती मित्रांसोबत जेवणाची काही जोडप्यांनी व्यवस्था केली आहे.
योहान २:८, ९ या वचनाच्या अनुषंगाने ‘भोजनकारभाऱ्याची’ निवड करणे व्यवहार्य आहे. सुव्यवस्था आणि उच्च दर्जा राखला जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी नवरा मुलगा एखाद्या विश्वस्त ख्रिश्चनाची निवड करील. मित्रपरिवार बक्षिसे घेऊन येतात तेव्हा त्याची “फुशारकी” मारू नये. (१ योहान २:१६) शंकास्पद संगीताची लय, त्याचा कर्णकटू आवाज आणि बेफाम ताल या गोष्टी टाळल्या तर संगीताचा आनंद घेता येऊ शकतो. लग्नाच्या प्रसंगी संगीत वाजवण्याआधी ते वडिलांना ऐकवणे अनेकांना चांगले दिसून आले आहे. नृत्य हा एक मोहपाश ठरू शकतो कारण अनेक प्रकारची पारंपारिक नृत्ये जनन-क्षमतापासून केलेल्या नृत्यापासून आहेत आणि अनुचित कामुकतेकडे ते निर्देश करतात. “केक आणि शॅम्पेन ही वेळ” सत्यात नसलेल्या अनेक लोकांसाठी उच्छृंखलपणे वागण्याची घंटा आहे. म्हणूनच अनेक ख्रिस्ती जोडप्यांनी समस्या टाळण्यासाठी आपल्या लग्नाच्या मेजवानीच्या वेळी मद्यार्क न देण्याचा निर्णय घेतला आहे.
यहोवाचा आदर व्हावा असे आपल्याला वाटत असल्यामुळे आपल्याकडे अनावश्यकपणे लक्ष आकर्षित करण्यासाठी दिखाऊपणा करण्याचे आपण टाळू. प्रापंचिक प्रकाशनांनी सुद्धा धुमधडाक्यात लग्न करण्याच्या अलीकडच्या कलाच्या विरोधात भाष्य केले आहे. लग्न धुमधडाक्यात करण्याच्या नादात स्वतःवर कर्जाचा बोजा करून घेणे आणि केवळ एका दिवसाचा खर्च भरून काढण्यासाठी नंतर कित्येक वर्षे हालअपेष्टा सहन करणे हे जोडप्यासाठी किती मूर्खपणाचे होईल! अर्थात, लग्नाच्या वेळी घालण्यात येणारा पोषाख मर्यादशील आणि सुव्यवस्थित असावा, देवाचा आदर करत असल्याचे त्यावरून दिसण्यास हवे. (१ तीमथ्य २:९, १०) “ख्रिस्ती विवाहांनी नेमस्तपणा दाखविला पाहिजे” (टेहळणी बुरूज जानेवारी १५, १९६९ [इंग्रजी]) या लेखाने पोशाखावर मनोरंजक विवेचन केले:
“एखाद्याचे लग्न हा खास प्रसंग असतो म्हणून आनंदी आणि आकर्षक दिसण्याकडे सामान्यपणे लक्ष दिले जाते. म्हणून एखाद्याने खास गाऊन किंवा सूट घालावा, असा याचा अर्थ होत नाही. स्थानिक पद्धती, खर्च आणि व्यक्तिगत आवडींचा विचार करणे एखाद्यासाठी उचित होईल. . . . स्वतःवर आणि इतरांवर आर्थिक बोजा येईल इतका महाग पोषाख घेणे खरोखरच समंजसपणाचे होईल का? . . . काही वधूंनी लग्नात आपल्या मैत्रिणींचा गाऊन घातला आहे. काहींना लग्नाचा स्वतःचा पोषाख बनविल्याने मोठे समाधान प्राप्त झाले आहे आणि त्यांनी असा पोषाख बनवला आहे जो त्यांना भविष्यात इतर प्रसंगी देखील घालता येईल. जोडप्यासाठी हे निश्चितपणे उचित आहे, की त्यांनी लग्नाच्यावेळी नेहमीचे परंतु त्यातल्या त्यात अधिक आकर्षक कपडे घालावेत . . . इतर जणांची मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची ऐपत असेल तर काही जण या कठीण काळामुळे ‘साध्याप्रकारे लग्न’ करण्याचे ठरवतील.”
त्याचप्रमाणे, मेजवानीसाठी आमंत्रित जणांची संख्या (नवऱ्याचे मित्र आणि नवरीच्या मैत्रिणी) मोठी असण्याची आवश्यकता नाही. त्यांना देखील आपल्या कपड्यांद्वारे आणि वागण्याद्वारे स्वतःकडे इतरांचे अनावश्यकपणे लक्ष आकर्षित करावेसे वाटणार नाही. राज्य सभागृहात होणाऱ्या लग्नाच्या भाषणासाठी बहिष्कृत व्यक्ती येऊ शकते. या संदर्भात टेहळणी बुरूज एप्रिल १५, १९८४ (इंग्रजी), या अंकाने म्हटले: “लग्नाच्या मेजवानीच्या वेळी बहिष्कृत व्यक्तींना किंवा बायबल तत्त्वांच्या विरोधात पेहराव करणाऱ्या लोकांना बोलावणे अयोग्य होईल.”
येशू लग्नाला उपस्थित राहिला होता, पण संपूर्ण शहरात गाड्यांमधून वाजतगाजत मिरवणूक काढण्याच्या प्रचलित प्रथेला तो मान्यता देईल, याची आपण कल्पना करू शकत नाही, लग्नाच्या मिरवणुकीच्या वेळी अनावश्यक कर्कश हॉर्न वाजवल्याने पोलिसांनी काहींना दंड देखील केला आहे. (पाहा मत्तय २२:२१.) थोडक्यात सांगायचे म्हणजे, दिखावटीपणाची किंवा जगातील लोकांच्या विशिष्ट कार्यांची नक्कल करण्यापेक्षा ख्रिश्चनांनी नम्र जणांच्या ठायी असणाऱ्या सुज्ञतेप्रमाणे वागले पाहिजे.—नीतिसूत्रे ११:२.
सत्यात नसणाऱ्या सहकामगारांच्या किंवा दूरवरच्या नातेवाईकांच्या तसेच आप्तेष्टांच्या लग्नाला जाण्याबद्दल काय? प्रत्येक ख्रिश्चनाने यावर व्यक्तिगतरीत्या निर्णय घेण्यास हवा. आपला वेळ बहुमोल आहे, हे लक्षात ठेवणे चांगले आहे कारण सेवाकार्यासाठी, व्यक्तिगत अभ्यासासाठी आणि कौटुंबिक तसेच मंडळीच्या कामासाठी आपल्याला वेळ लागतो. (इफिसकर ५:१५, १६) सप्ताहांती आपल्या सभा तसेच क्षेत्रसेवा देखील असते आणि आपल्याला हे चुकवावेसे वाटणार नाही. (इब्री लोकांस १०:२४, २५) अनेक लग्नाच्या तारखा संमेलनांच्या किंवा प्रभूच्या सांज भोजनाच्या खास सेवाकार्याच्या वेळी येतात. जगभरातील आपले भाऊबहीण प्रभूच्या सांज भोजनास उपस्थित राहण्यासाठी खास प्रयत्न करतात त्यामुळे आपण देखील अशा प्रकारच्या प्रयत्नांत व्यत्यय आणू देऊ नये. सत्याच्या ज्ञानाची ओळख होण्याआधी आपण जगातील लोकांसोबत पुष्कळ वेळ घालवला, देवाचा अनादर होईल अशा परिस्थितींत देखील कदाचित आपण वेळ घालवला असेल. (१ पेत्र ४:३, ४) आता आपल्या प्राथमिकता वेगळ्या आहेत. एखादे कार्ड पाठविण्याद्वारे किंवा लग्नानंतर एखाद्या दिवशी छोटीशी भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणे केव्हाही शक्य आहे. काही जणांनी, नवोदित विवाहितांसाठी यथोचित शास्त्रवचने दाखविण्याद्वारे अशा प्रसंगांचा साक्ष देण्यासाठी उपयोग केला आहे.
लग्नातील आध्यात्मिक बाबी जेव्हा जगिक मार्गांवर वर्चस्व गाजवतात तेव्हा खरोखरच यहोवाचा आदर होईल. जगाच्या अंधश्रद्धांपासून आणि अतिरेकापासून वेगळे राहण्याची खात्री करण्याद्वारे, नेहमीच्या ईश्वरशासित कार्यांमध्ये व्यत्यय न आणण्याद्वारे आणि दिखाऊपणाऐवजी मर्यादशीलता प्रदर्शित करण्याद्वारे ख्रिस्ती या प्रसंगाचा आनंद घेतील. शिवाय, चांगला विवेक आणि गोड आठवणी म्हणून ते आपल्या गतकाळाकडे पाहतील. सुज्ञान आणि समंजसपणा दाखविण्याद्वारे आपल्या ख्रिस्ती विवाहांनी प्रांजळ निरीक्षकांना साक्ष मिळावी.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
[२४, २५ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती आंधळेपणाने विवाहाच्या प्रत्येक स्थानिक प्रघाताचे अनुकरण करत नाहीत