यहोवा धार्मिकता आणि न्याय यांचा चाहता
सारायेवो येथील एक तरुण मुलगी, तिच्या शहरातील मुलांना इतके दुःख का सहन करावे लागते, असा स्वतःशीच विचार करते. ती म्हणते, “आम्ही काही केले नाही. आम्ही तर निष्पाप आहोत.” ब्युनोस एरस् येथील एका सार्वजनिक चौकात शोकसंतप्त अर्जेंटिनियन माता सुमारे १५ वर्षांपासून बेपत्ता झालेल्या त्यांच्या मुलांच्या निषेधार्थ जमत आहेत. वांशिक हिंसाचाराचा उद्रेक झाला तेव्हा, इम्मॅन्युएल नावाच्या एका आफ्रिकी माणसाच्या आईची आणि तीन बहिणींची निर्घृण हत्या करण्यात आली; “प्रत्येकाला त्याची भरपाई मिळालीच पाहिजे. . . . आम्हाला न्याय हवा आहे,” अशी तो मागणी करतो.
न्याय, यहोवा देवाच्या प्रमुख गुणांपैकी एक आहे. “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत,” असे बायबल म्हणते. खरेच, यहोवाला “नीति व न्याय ही प्रिय आहेत.” (अनुवाद ३२:४; स्तोत्र ३३:५) देवाला चांगल्याप्रकारे ओळखण्यासाठी आपण न्याय करण्याविषयीच्या त्याच्या विचारांचा अर्थ समजून त्याचे अनुकरण करण्यास शिकले पाहिजे.—होशेय २:१९, २०; इफिसकर ५:१.
हा गुण कसा असावा याबद्दल मानव जो विचार करतात त्यानुसार कदाचित न्यायाबद्दलच्या आपल्या विचारांवर प्रभाव पडला आहे. जगाच्या काही भागांमध्ये न्यायाचे प्रतीक म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधलेली व हातामध्ये एक तलवार व तराजू घेतलेली स्त्री दाखवली जाते. मानवी न्याय निःपक्षपाती असला पाहिजे, म्हणजे धन किंवा प्रभाव यांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. आरोप लावलेल्या व्यक्तीचा अपराध किंवा प्रामाणिकपणा याला त्याने योग्य प्रकारे तोलले पाहिजे. तलवारीने त्याने प्रामाणिकांना संरक्षण आणि अपराध्यांना शिक्षा दिली पाहिजे.
राईट ॲण्ड रीझन—एथिक्स इन थिअरी ॲण्ड प्रॅक्टीस पुस्तक म्हणते, “न्यायाचा संबंध, नियम, बंधन, हक्क आणि कर्तव्य यांजशी आहे व तो निःपक्षपातीपणा किंवा योग्यतेप्रमाणे निर्णय देतो.” पण यहोवाच्या न्यायाची व्याख्या याच्याही पलीकडची आहे. येशू ख्रिस्त जो हुबेहूब त्याच्या स्वर्गीय पित्यासारखाच आहे त्याच्या कार्यांचा आणि गुणांचा विचार केल्याने आपण ते पाहू शकतो.—इब्रीयांस १:३.
शुभवर्तमान लेखक मत्तय याने, “चेपलेला बोरू तो मोडणार नाही मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्यायाची प्रवृत्ति करील” हे यशया ४२:३ चे शब्द येशूला लागू केले. चेपलेल्या बोरूसारख्या वाकलेल्या व तुडवलेल्या लोकांना येशूने सांत्वनदायक संदेश दिला. ते लोक मिणमिणत्या वातीसारखे होते, जणू काय त्यांच्या जीवनाचा शेवटचा तेजोकण जवळजवळ विझत आला होता. लाक्षणिकपणे चेपलेले बोरू तुडवण्याऐवजी आणि मिणमिणत्या वाती विझवण्याऐवजी येशूने पीडितांना दया दाखवली आणि त्यांना शिकवले, बरे केले, यहोवा देवाच्या न्यायाचे स्पष्टीकरण दिले. (मत्तय १२:१०-२१) यशयाच्या भविष्यवाणीने भाकीत केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या न्यायाने लोकांमध्ये आशा उत्तेजित केली.
दया आणि यहोवाचा न्याय
दया, यहोवाच्या न्यायाचा स्वाभाविक भाग आहे. येशू पृथ्वीवर होता तेव्हा हे दिसून आले. त्याने देवाच्या न्यायाच्या आणि धार्मिकतेच्या दर्जांचे पूर्णपणे प्रतिनिधीत्व केले. परंतु, यहुदी शास्त्री आणि परुशांनी एका कडक नियमावलीचे—जी त्यांनी स्वतःहूनच बनवली होती तिचे पालन करून धार्मिकता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कायदेशीर न्यायाने बहुधा दयेला काढूनच टाकले आहे. येशू आणि परुशांमध्ये जितके खटके उडाले ते सर्व: खरा न्याय आणि धार्मिकता काय आहे? या वादविषयाभोवती होते.—मत्तय ९:१०-१३; मार्क ३:१-५; लूक ७:३६-४७.
येशूने, इतरांशी न्याय्य आणि धार्मिकतेने कसा व्यवहार करावा याचे उदाहरण दिले. नियमात निष्णात असलेल्या एका माणसाने एकदा येशूकडे पृच्छा केली, की सार्वकालिक जीवनाचा वारसा प्राप्त करण्यासाठी कशाची आवश्यकता होती. त्याच्या प्रत्युत्तरात येशूने त्याला एक प्रश्न विचारला आणि त्याने पूर्ण हृदयाने, जीवाने, मनाने व शक्तीने परमेश्वरावर [यहोवावर] प्रीती करणे व स्वतःवर करतो त्याप्रमाणे शेजाऱ्यावर प्रीती करणे या दोन सर्वात प्रमुख आज्ञा होत्या असे उत्तर दिले तेव्हा येशूने त्याची प्रशंसा केली. मग त्या मनुष्याने विचारले: “पण माझा शेजारी कोण?” येशूने चांगल्या शोमरोन्याचा दृष्टान्त देऊन त्याला उत्तर दिले.—लूक १०:२५-३७.
यहोवाची धार्मिकता आणि त्याच्या दयापूर्ण न्यायाचे उदाहरण, येशूने दिलेल्या शोमरोन्याच्या दृष्टान्ताद्वारे देण्यात आले. शोमरोनी मनुष्याने, एका अनोळखी जखमी माणसाला निःस्वार्थीपणे मदत करून नेकीचे, न्याय्य आणि दयापूर्ण कार्य केले होते. येशू पृथ्वीवर असताना त्यानेही अशाच प्रकारचा आत्मा प्रदर्शित केला होता. तो धार्मिक व न्यायी होता. शिवाय, त्याने दुःख, आजार आणि मृत्यूच्या अधीन असलेल्या गरजू, पापी आणि अपरिपूर्ण लोकांसाठी आपले जीवन बहाल केले. प्रेषित पौलाने धार्मिकतेचा संबंध खंडणीच्या तरतुदीसोबत लावला. त्याने लिहिले: “तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या [किंवा, “एकाच धार्मिक कृत्याने,” तळटीप, NW] एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.” (रोमकर ५:१८) हे ‘एकच धार्मिक कृत्य,’ आज्ञाधारक मानवजातीला, ते थेटपणे जबाबदार नव्हते अशा आदामाच्या पापाच्या विध्वंसकारी परिणामांतून वाचवण्याचा देवाचा मार्ग होता.
देवाच्या न्यायाने पापी मानवांची सुटका करण्याचा व त्याचवेळी धार्मिक तत्त्वांना उंचावून धरण्याचा प्रयत्न केला. पापाकडे दुर्लक्ष करणे अन्यायी व प्रेमरहित कृत्य ठरले असते कारण त्यामुळे स्वैराचाराला प्रोत्साहन मिळाले असते. दुसऱ्या बाजुला पाहता, जर प्रतिफळ अथवा शिक्षा याप्रमाणे देवाचा न्याय, तोलून द्यावा लागला तर मानवजातीची अवस्था आशाहीन झाली असती. बायबलनुसार, “पापाचे वेतन मरण आहे” व “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही.” (रोमकर ३:१०; ६:२३) यहोवाला आणि त्याच्या प्रिय पुत्राला व्यक्तिगतपणे एक भारी किंमत द्यावी लागली तरीही त्याने पापासाठी एक प्रायश्चित्त बलिदान पुरवले.—१ योहान २:१, २.
ईश्वरी न्याय आणि तत्त्वबद्ध प्रीती (ग्रीक, अ·गाʹपे) या दोन्ही गोष्टी एकत्र गुंफल्या आहेत असे खंडणी दाखवते. खरेच, यहोवाचा न्याय म्हणजे त्याच्या धार्मिक कृत्यांचे कार्यान्वित होणे होय—नैतिकतेविषयी देवाच्या दर्जांचे एक प्रतिबिंब आहे. अशा प्रकारे, देव जेव्हा ईश्वरी न्याय करतो तेव्हा तो अ·गाʹपे प्रीतीवर आधारित असतो. (मत्तय ५:४३-४८) यास्तव, जर आपण खरोखरच यहोवाचा न्याय समजून घेतला तर त्याच्या न्यायिक निर्णयांवर आपल्याला पूर्ण भरवसा असेल. “जगाचा न्यायाधीश” या नात्याने तो नेहमीच उचित तेच करतो.—उत्पत्ति १८:२५; स्तोत्र ११९:७५.
यहोवाचा न्याय अनुसरा
‘देवाचे अनुकरण करणारे व्हा,’ असे बायबल आपल्याला आर्जवते. (इफिसकर ५:१) याचा अर्थ त्याचा न्याय तसेच त्याच्या प्रीतीचे अनुकरण करणे होय. परंतु, आपण अपरिपूर्ण असल्याकारणामुळे यहोवा देवाचे मार्ग जसे उदात्त आहेत त्याप्रमाणे आपले नाहीत. (यशया ५५:८, ९; यहेज्केल १८:२५) तेव्हा आपण, धार्मिकता आणि न्याय यांचे चाहते कसे ठरु शकतो? “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” केल्याने. (इफिसकर ४:२४) मग आपण, देव ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करू व त्याला ज्यांचा वीट आहे अशांचा वीट मानू. ‘खरे नीतिमत्त्व,’ हिंसाचार, अनैतिकता, अशुद्धपणा आणि धर्मत्याग यांच्यापासून दूर राहते कारण या सर्व गोष्टी जे काही पवित्र आहे त्याचा भंग करतात. (स्तोत्र ११:५; इफिसकर ५:३-५; २ तीमथ्य २:१६, १७) ईश्वरी न्याय इतरांविषयी खरी कळकळ व्यक्त करण्यास देखील आपल्याला प्रवृत्त करते.—स्तोत्र ३७:२१; रोमकर १५:१-३.
शिवाय, आपण देवाच्या न्यायाचा दयापूर्ण स्वभाव समजून घेतला तर आध्यात्मिक बंधू आणि भगिनींचा न्याय करण्यास आपण प्रवृत्त होणार नाही. यहोवाप्रमाणे कदाचित आपणही त्यांना कशा प्रकारे समजून घेऊ शकतो? आपण आपल्या पक्षपाती दृष्टिकोनाद्वारे त्यांचा न्याय करणार नाही का? म्हणूनच येशूने इशारा दिला: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यांतील मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ का पाहातोस? अथवा तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यांत तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.” (मत्तय ७:१-५) आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णतांचे प्रामाणिक मूल्यन, यहोवा ज्याला अधार्मिक कृत्य समजेल त्यानुसार न्याय करण्यापासून आपला बचाव करील.
मंडळीच्या नियुक्त वडिलांना गंभीर चुकांच्या बाबतीत न्याय करावाच लागतो. (१ करिंथकर ५:१२, १३) असे करत असताना, ते हे लक्षात ठेवतात, की देवाचा न्याय शक्य तेथे दया दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, त्यासाठी कोणताही आधार नसल्यास—जसे की, अपश्चात्तापी पापी लोकांच्या बाबतीत—तेथे दया दाखवता येणार नाही. पण अशा प्रकारच्या अपराध्याला वडील जन द्वेषयुक्त भावनेमुळे मंडळीतून बाहेर काढून टाकत नाहीत. बहिष्कृतीकरण त्या व्यक्तीला ताळ्यावर आणील अशी आशा ते बाळगतात. (पडताळा यहेज्केल १८:२३.) ख्रिस्ताच्या मस्तकपदाखाली, वडील जन न्याय हा हेतू मनी बाळगून सेवा करत असतात आणि यामध्ये “वाऱ्यापासून आसरा” याच्यासारखे होणे समाविष्ट आहे. (यशया ३२:१, २) यास्तव, त्यांनी निःपक्षपातीपणा व समंजसपणा प्रकट करावा.—अनुवाद १:१६, १७.
धार्मिकतेत बीजांची पेरणी करा
देवाच्या धार्मिक नव्या जगाची वाट पाहत असताना, ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी आपण ‘धार्मिकतेचे अवलंबन’ केले पाहिजे. (सफन्या २:३; २ पेत्र ३:१३) ही कल्पना होशेय १०:१२ वचनातील या शब्दांमध्ये अतिशय सुंदरपणे व्यक्त करण्यात आली आहे: “तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा; कारण परमेश्वराने [यहोवाने] येऊन तुम्हांवर धार्मिकतेची वृष्टि करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.”
येशूने त्याच्या चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यात दाखवल्याप्रमाणे आपल्याजवळ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये “धार्मिकतेची पेरणी” करण्यासाठी पुष्कळ संधी आहेत. आपण “प्रेमाची कापणी” करू याची यहोवा खात्री करील. आपण ‘न्यायाच्या मार्गावर’ चालत राहिल्यास, आपल्याला राज्य अधिपत्याखाली धार्मिकतेत प्रशिक्षण मिळत राहील. (यशया ४०:१४, पंडिता रमाबाई भाषांतर) वेळ निघून जातो तसे आपल्याला निश्चितच हे पूर्णपणे समजू लागेल, की यहोवाला नीती व न्याय ही प्रिय आहेत.—स्तोत्र ३३:४, ५.
[२३ पानांवरील चित्रं]
चांगल्या शोमरोन्याने यहोवाच्या न्यायाचे उदाहरण मांडले
[२३ पानांवरील चित्रं]
येशूला ‘चेपलेल्या बोरूसारख्या’ पीडित लोकांची दया वाटली