यहोवाचे अनुकरण करा—न्यायानुसार आणि धार्मिकतेनुसार वागा
“मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे, . . . यात मला संतोष आहे.”—यिर्मया ९:२४.
१. यहोवाने कोणते वैभवी भवितव्य दिले?
मला सर्वजण ओळखतील असा एक दिवस येईल, असे यहोवा अभिवचन देतो. त्याने यशया संदेष्ट्याद्वारे असे म्हटले: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) किती वैभवी भवितव्य असेल ते!
२. यहोवाला ओळखण्यात कशाचा समावेश होतो? का?
२ तथापि, यहोवाला ओळखणे म्हणजे काय? यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती याविषयी यहोवाने यिर्मयाला सांगितले: “मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर [“यहोवा,” NW] आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, . . . त्यात मला संतोष आहे.” (यिर्मया ९:२४) अशाप्रकारे, यहोवा ज्या मार्गाने धार्मिकतेचा आणि न्यायाचा अवलंब करतो तो मार्ग जाणून घेणे म्हणजे यहोवाला ओळखणे होय. आपण जेव्हा या गुणांचा अवलंब करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. आपण हे कसे करू शकतो? यहोवाने संपूर्ण काळामध्ये अपरिपूर्ण मानवांशी केलेल्या त्याच्या व्यवहाराचा अहवाल त्याच्या वचनात अर्थात बायबलमध्ये जतन करून ठेवला आहे. बायबलचा अभ्यास करण्याद्वारे, आपल्याला यहोवाच्या न्यायाचा आणि धार्मिकतेचा मार्ग समजू शकेल आणि अशाप्रकारे आपण त्याचे अनुकरण करू शकू.—रोमकर १५:४.
न्यायी आणि तरीही दयाळू
३, ४. सदोम आणि गमोराचा विनाश करण्यात यहोवा न्याय्य का होता?
३ यहोवाच्या न्यायाचे कित्येक पैलू समजण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सदोम आणि गमोरावरील ईश्वरी न्यायदंड. यहोवाने आवश्यक ती शिक्षाच दिली नाही, तर योग्य लोकांची सुटकाही केली. त्या शहरांचा विनाश खरोखरच न्याय्य होता का? अब्राहामाला सुरवातीला तसे वाटले नाही कारण सदोमच्या व्यापक दुष्टतेची त्याला इतकी कल्पना नव्हती. यहोवाने अब्राहामाला अशी खात्री दिली, की त्या शहरात किमान दहा धार्मिक लोक असले तरी तो त्या शहराचा नाश करणार नाही. यावरून स्पष्ट होते, की यहोवा कधीही घाईघाईने किंवा निर्दयीपणे न्याय करत नाही.—उत्पत्ति १८:२०-३२.
४ दोन देवदूतांनी केलेल्या पाहणीद्वारे सदोमच्या नैतिक पतनाचा स्पष्ट पुरावा मिळाला. लोटाच्या घरी दोन माणसे राहण्यास आली आहेत असे त्या शहरातील लोकांना कळले तेव्हा त्यांच्याशी सामुहिकरीत्या समागम करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याच्या घराला गराडा घातला. या लोकांमध्ये ‘तरुणांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत’ सर्वजण होते. त्यांची नीतिभ्रष्टता खरोखरच रसातळाला गेली होती! त्या देशावरील यहोवाचा न्यायदंड हा धार्मिक होता यात काही शंकाच नाही.—उत्पत्ति १९:१-५, २४, २५.
५. यहोवाने सदोममधून लोटाची आणि त्याच्या कुटुंबाची कशी सुटका केली?
५ सदोम आणि गमोराच्या विनाशाचे इशारेवजा उदाहरण दिल्यानंतर प्रेषित पेत्राने लिहिले: “भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे प्रभूला कळते.” (२ पेत्र २:६-९) सदोमच्या अभक्त लोकांसोबत धार्मिक लोटाचा आणि त्याच्या कुटुंबाचा नाश झाला असता तर तो अन्याय ठरला असता. यास्तव, येणाऱ्या विनाशाविषयी यहोवाच्या देवदूतांनी लोटाला इशारा दिला. लोट जेव्हा दिरंगाई करू लागला तेव्हा देवदूतांनी ‘परमेश्वराच्या करुणेमुळे’ लोटाच्या, त्याच्या पत्नीच्या आणि मुलींच्या हाताला धरून त्यांना नगराबाहेर आणून सोडले. (उत्पत्ति १९:१२-१६) या दुष्ट व्यवस्थीकरणावर येणाऱ्या नाशामध्ये धार्मिक लोकांप्रती यहोवा अशाचप्रकारची चिंता व्यक्त करील, अशी आपण खात्री बाळगू शकतो.
६. या दुष्ट व्यवस्थीकरणावर येणाऱ्या विनाशाविषयी आपण उगाच का चिंता करू नये?
६ या व्यवस्थीकरणाचा शेवट म्हणजे ‘सूड घेण्याचा’ काळ असला तरी त्यामुळे उगाच चिंता करत बसण्याचे काही कारण नाही. (लूक २१:२२) हर्मगिदोनमध्ये देव जो न्यायदंड बजावेल तो “सर्वथैव न्याय्य” शाबीत होईल. (स्तोत्र १९:९) अब्राहामाप्रमाणे, आपण सर्वजण यहोवाच्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेवण्याचे शिकू शकतो कारण देवाचा न्याय आपल्या न्यायापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. अब्राहामाने असे विचारले: “सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” (उत्पत्ति १८:२५; पडताळा ईयोब ३४:१०.) किंवा यशयाने अगदी योग्यपणे असे म्हटले, “कोणी त्याला [यहोवाला] न्यायाचा मार्ग शिकवला?”—यशया ४०:१४, पं.र.भा.
मानवाच्या तारणाकरता धार्मिक कार्य
७. देवाचा न्याय आणि त्याची दया यांमध्ये कोणता संबंध आहे?
७ पातक्यांना शिक्षा करण्यातूनच देवाचा न्याय दिसून येत नाही. आपण “न्यायी व तारणकर्ता” आहोत, असे यहोवा स्वतःविषयी म्हणतो. (यशया ४५:२१) यावरून स्पष्ट होते, की देवाची धार्मिकता किंवा न्याय आणि पापाच्या परिणामांपासून मानवांचे तारण होण्याची त्याची इच्छा यांमध्ये निकटचा संबंध आहे. या वचनावर टिपणी करताना द इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बायबल एन्सायक्लोपीडिया याच्या १९८२ च्या आवृत्तीमध्ये असे सांगण्यात आले आहे, “दया दाखविण्यासाठी आणि लोकांचे तारण करण्यासाठी देवाचा न्याय वास्तविक मार्गांचा शोध घेतो.” देवाच्या न्यायामध्ये दयेचा अभाव असतो असे नाही कारण दया देवाच्या न्यायाची एक अभिव्यक्ती आहे. मानवाच्या तारणासाठी देवाने केलेली खंडणीची तरतूद या ईश्वरी न्यायाच्या पैलूचे सर्वात उल्लेखनीय उदाहरण आहे.
८, ९. (अ) “धार्मिक कार्य” या वर्णनात काय समाविष्ट होते? का? (ब) यहोवा आपल्याकडून कशाची मागणी करतो?
८ देवाने दिलेल्या खंडणीची किंमत—देवाने स्वतः निर्माण केलेल्या त्याच्या पुत्राचे अर्थात येशू ख्रिस्ताचे अनमोल जीवन—फार मोठी होती कारण यहोवाचे दर्जे सर्वांना लागू होतात आणि तो स्वतः त्या दर्जांनुसार राहतो. (मत्तय २०:२८) आदामाने परिपूर्ण जीवन गमावले होते त्यामुळे आदामाच्या वंशजांना ते जीवन पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी एका परिपूर्ण जीवनाची गरज होती. (रोमकर ५:१९-२१) प्रेषित पौलाने येशूच्या सचोटीला, ज्यामध्ये त्याचे खंडणी बलिदान समाविष्ट आहे “धार्मिक कार्य” असे संबोधले. (रोमकर ५:१८, तळटीप, NW) असे का? कारण यहोवाच्या दृष्टिकोनातून खंडणी देऊन मानवांचे तारण करणे ही गोष्ट योग्य व न्याय्य होती आणि त्यासाठी त्याला स्वतःला याची मोठी किंमत मोजावी लागणार होती तरीही. आदामाचे संतान ‘चेपलेल्या बोरूसारखे’ होते आणि तो बोरू मोडण्याची यहोवाची इच्छा नव्हती. किंवा ते संतान ‘मिणमिणत्या वातीप्रमाणे’ होते आणि ती वात विझविण्याची त्याची इच्छा नव्हती. (मत्तय १२:२०) आदामाच्या वंशजांतून अनेक विश्वासू स्त्री-पुरुष येतील असा यहोवाला आत्मविश्वास होता.—पडताळा मत्तय २५:३४.
९ त्याच्या या प्रेमाच्या आणि न्यायाच्या महान कार्याप्रती आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली पाहिजे? एका गोष्टीची यहोवा आपल्याकडून मागणी करतो, ती गोष्ट म्हणजे “न्यायाने वागणे.” (मीखा ६:८, पं.र.भा.) आपण हे कसे करू शकतो?
न्यायाचा शोध घ्या, धार्मिकतेचा पिच्छा करा
१०. (अ) आपण न्यायाने वागतो असा एक मार्ग कोणता आहे? (ब) आपण पहिल्याने धार्मिकता कशी मिळवू शकतो?
१० सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाच्या नैतिक दर्जांनुरूप वागले पाहिजे. देवाचे दर्जे न्याय्य आणि धार्मिक आहेत त्यामुळे आपण जेव्हा त्या दर्जांनुसार जगतो तेव्हा आपण न्यायानेच वागत असतो. यहोवा त्याच्या लोकांकडून याच गोष्टीची अपेक्षा करतो. “चांगले करायला शिका, न्याय करायला झटा,” असे यहोवाने इस्राएलांना सांगितले. (यशया १:१७, पं.र.भा.) डोंगरावरील प्रवचनात येशूने त्याचे ऐकणाऱ्यांना हाच सल्ला दिला. त्याने त्यांना म्हटले, ‘पहिल्याने राज्य व देवाचे नीतिमत्त्व [धार्मिकता] मिळवण्यास झटा.’ (मत्तय ६:३३) ‘नीतिमत्त्वाच्या [धार्मिकतेच्या] पाठीस लागण्याचे’ उत्तेजन पौलाने तीमथ्याला दिले. (१ तीमथ्य ६:११) जेव्हा वर्तणुकीबाबत देवाच्या दर्जांनुरूप आपण वागतो आणि नवे मनुष्यत्व धारण करतो तेव्हा आपण खऱ्या न्यायाचे आणि धार्मिकतेचे अनुसरण करत असतो. (इफिसकर ४:२३, २४) दुसऱ्या शब्दांत, देवाचा मार्ग अवलंबण्याद्वारे आपण न्यायाचा शोध घेत असतो.
११. पातकाच्या मालकीच्या विरोधात आपण का आणि कसा संघर्ष केला पाहिजे?
११ आपल्याला याची पूर्ण कल्पना आहे, की अपरिपूर्ण मानवाला जे न्याय्य आणि बरोबर आहे ते करणे नेहमीच इतके सोपे नसते. (रोमकर ७:१४-२०) पापाच्या मालकीच्या विरोधात संघर्ष करण्याचे उत्तेजन पौलाने रोमच्या ख्रिश्चनांना दिले जेणेकरून ते “नीतीची [धार्मिकतेची] साधने” म्हणून त्यांची समर्पित शरीरे सादर करू शकतील. देवाला त्याचा उद्देश पूर्ण करण्याकरता ही साधने उपयोगी आहेत. (रोमकर ६:१२-१४) त्याचप्रमाणे, देवाच्या वचनाचा नियमितरीत्या अभ्यास आणि अवलंब करण्याद्वारे आपण ‘प्रभूचे [यहोवाचे] शिक्षण’ आत्मसात करू शकतो तसेच त्यामुळे आपल्याला ‘नीतिशिक्षणाची [धार्मिकतेची] शिस्त’ प्राप्त होऊ शकते.—इफिसकर ६:४; २ तीमथ्य ३:१६, १७.
१२. यहोवाने आपल्याला जसे वागवावे, असे आपल्याला वाटते तसे इतरांना वागवताना आपण काय टाळले पाहिजे?
१२ दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवाने आपल्याला जसे वागवावे, असे आपल्याला वाटते तसे आपण इतरांशी वागतो तेव्हा आपण न्यायानुसार चालतो. दुहेरी स्तर बाळगणे सोपे आहे—स्वतःच्या बाबतीत सौम्य आणि दुसऱ्यांच्याबाबतीत कडक. स्वतःकडून झालेल्या चुकांबद्दल सबबी सांगण्यास आपण तयारच असतो, पण इतरांकडून चुका होतात तेव्हा आपण लगेच त्यांची टिका करतो आणि आपल्या चुकांपेक्षा त्यांच्या चुका कदाचित फारच क्षुल्लक असतील. येशूने स्पष्टपणे विचारले: “तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहातोस?” (मत्तय ७:१-३) आपण हे कधीही विसरू नये, की यहोवाने आपल्या चुकांचे सूक्ष्म परीक्षण केल्यास आपल्यांपैकी कोणीही त्याच्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. (स्तोत्र १३०:३, ४) जर यहोवाचा न्याय आपल्या बांधवांच्या उणिवांकडे दुर्लक्ष करतो, तर त्यांचा शत्रुभावाने न्याय करणारे आपण ते कोण?—रोमकर १४:४, १०.
१३. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे एखाद्या धार्मिक व्यक्तीला बाध्य का वाटते?
१३ तिसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण प्रचारकार्यात प्रामाणिकपणे सहभाग घेतो तेव्हा आपण ईश्वरी न्याय प्रदर्शित करत असतो. यहोवा आपल्याला सल्ला देतो: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.” (नीतिसूत्रे ३:२७) देवाने आपल्याला उदारतेने दिलेले जीवनदायी ज्ञान आपल्यापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य होणार नाही. हे खरे आहे, की अनेक लोक आपला संदेश नापसंत करतील, पण जोपर्यंत देव त्यांच्यावर दया दाखवतो तोपर्यंत त्यांना ‘पश्चात्ताप करण्याची’ संधी देत राहण्यास आपण तयार असले पाहिजे. (२ पेत्र ३:९) एखाद्याला न्यायाच्या आणि धार्मिकतेच्या मार्गावर आणण्यास आपल्याला शक्य होते तेव्हा आपल्याला येशूप्रमाणेच आनंद होतो. (लूक १५:७) “धार्मिकतेची पेरणी” करण्याकरता आपल्यासाठी हा अनुकूल समय आहे.—होशेय १०:१२.
‘न्यायासाठी सरदार’
१४. न्यायाच्या बाबतीत वडील कोणती भूमिका पार पाडतात?
१४ आपण सर्वांनी धार्मिकतेच्या मार्गाने चालले पाहिजे हे खरे असले, तरी ख्रिस्ती मंडळीतील वडिलांची ही विशेष जबाबदारी आहे. येशूची राजकीय सत्ता ‘न्यायाने व धर्माने स्थिर राहील.’ यानुसार, ईश्वरी न्याय वडिलांसाठी दर्जा आहे. (यशया ९:७) यशया ३२:१, येथील भविष्यसूचित वर्णन ते लक्षात ठेवतात: “पाहा, राजा धर्माने [धार्मिकतेने] राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवितील.” आत्म्याने अभिषिक्त किंवा ‘देवाचे कारभारी,’ अर्थात वडील या नात्याने त्यांनी देवाच्या पद्धतीने कार्य करावे.—तीत १:७.
१५, १६. (अ) वडील, येशूच्या दृष्टान्तातील विश्वासू मेंढपाळाचे अनुकरण कसे करू शकतात? (ब) आध्यात्मिकरीत्या हरवलेल्यांविषयी वडिलांना कसे वाटते?
१५ यहोवाचा न्याय दयाळू, कृपाळू आणि रास्त होता, हे येशूने दाखवून दिले. यास्तव, समस्या असलेल्यांना मदत करण्याचा आणि ‘हरवलेल्यांना शोधण्याचा व त्याचे तारण करण्याचा’ त्याने प्रयत्न केला. (लूक १९:१०) येशूच्या दृष्टान्तामधील मेंढपाळ हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत अथकपणे त्याचा शोध घेतो त्याप्रमाणे वडीलसुद्धा आध्यात्मिकरीत्या भरकटलेल्या लोकांचा शोध घेतात आणि त्यांनी पुन्हा कळपात यावे म्हणून त्यांना मार्गदर्शन देतात.—मत्तय १८:१२, १३.
१६ गंभीर पातके केलेल्यांवर दोष लावण्याऐवजी वडील शक्य असल्यास अशा लोकांना योग्य मार्गावर आणण्याकरता आणि त्यांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांची मदत करतात. मार्गभ्रष्ट झालेल्या एखाद्या व्यक्तीला मदत करण्यात यश आल्यास त्यांना आनंदच होतो. तथापि, एखादी अपराधी व्यक्ती पश्चात्ताप करत नाही तेव्हा मात्र त्यांना दुःख होते. देवाचे धार्मिक दर्जे तेव्हा त्यांच्याकडून ही अपेक्षा करतात, की त्यांनी अपश्चात्तापी व्यक्तीला बहिष्कृत करावे. तरीसुद्धा, उधळ्या पुत्राच्या पित्याप्रमाणे त्यांची अशी आशा आहे, की मार्गभ्रष्ट झालेली व्यक्ती एखाद्या दिवशी ‘शुद्धीवर येईल.’ (लूक १५:१७, १८) अशाप्रकारे, बहिष्कृत लोक यहोवाच्या संघटनेकडे कसे परत येऊ शकतात या गोष्टीचे त्यांना स्मरण करून देण्यासाठी वडील पुढाकार घेऊन त्यांच्याकडे जातात.a
१७. अपराध्याची बाब हाताळताना वडिलांचे कोणते उद्दिष्ट असते आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना कोणता गुण मदत करील?
१७ अपराधाच्या बाबी हाताळताना वडिलांनी विशेषतः यहोवाच्या न्यायाचे अनुकरण करण्याची गरज आहे. येशूजवळ ‘पापी येत होते’ कारण तो आपल्याला समजून घेईल, आपली मदत करील, असे त्यांना वाटत होते. (लूक १५:१; मत्तय ९:१२, १३) अर्थात, येशू अपराध्याकडे दुर्लक्ष करत नव्हता. एकदा येशूने जक्कय नामक जुलमी जकातदाराकडे जेवण केले. त्यामुळे पश्चात्ताप करण्यास आणि अन्यायाने इतरांचे घेतलेल्याची परतफेड करण्यास तो प्रेरित झाला. (लूक १९:८-१०) न्यायीक सुनावणीच्या वेळी आजही वडिलांचे हेच उद्दिष्ट असते—अपराधी व्यक्तीने पश्चात्ताप करावा. येशूप्रमाणे ते सुगम्य असल्यास अनेक अपराधी व्यक्तींना मदतीकरता वडिलांकडे जाणे सोपे वाटेल.
१८. “वाऱ्यापासून आसरा” होण्यासाठी वडिलांना कशामुळे शक्य होईल?
१८ संवेदक हृदयामुळे वडिलांना ईश्वरी न्यायाप्रमाणे वागण्यास मदत होईल. हे हृदय निष्ठुर आणि भावनारहित नाही. मनोरंजक गोष्ट अशी, की इस्राएलांना न्याय शिकवण्यासाठी एज्राने केवळ मनाचीच नव्हे, तर हृदयाचीही तयारी केली. (एज्रा ७:१०, NW) समंजसपणाच्या हृदयामुळे वडिलांना उचित शास्त्रवचनीय तत्त्वे लागू करण्यास आणि प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती लक्षात घेण्यास मदत होईल. रक्तस्राव होत असलेल्या स्त्रीला येशूने बरे केले तेव्हा त्याने हे दाखवून दिले, की यहोवाचा न्याय म्हणजे नियमशास्त्राचे केवळ वरवरचे ज्ञान नव्हे, तर त्याचा खरा उद्देश आणि त्याची आंतरिक समज असणे होय. (लूक ८:४३-४८) दयाळूपणे न्याय करणारे वडील, स्वतःच्या उणिवांमुळे किंवा आपण जगत असलेल्या या दुष्ट व्यवस्थीकरणामुळे निराश झालेल्या लोकांकरता “वाऱ्यापासून आसरा” असे होतील.—यशया ३२:२.
१९. ईश्वरी न्यायाच्या अवलंबाविषयी एका बहिणीने कशी प्रतिक्रिया दाखवली?
१९ गंभीर पातक केलेल्या एका बहिणीला ईश्वरी न्याय म्हणजे काय याचा प्रत्यय आला. ती कबूल करते: “खरं सांगायचं तर, वडिलांकडे जायला मला भीतीच वाटत होती. परंतु ते माझ्याशी दयेने आणि आदराने वागले. मंडळीचे वडील हे पित्याप्रमाणे आहेत. ते काही कठोर न्यायाधीश नाहीत. मी पुन्हा योग्य मार्गाने वाटचाल केल्यास यहोवा माझा धिक्कार करणार नाही, हे त्यांनी मला समजावून सांगितलं. प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवा आपल्याला कशी शिस्त लावतो हे मला उमगलं. यहोवा माझ्या विनंतीकडे कान देईल, या विश्वासानिशी मी त्याच्याकडे माझं मन मोकळं केलं. त्या घटनेकडे पाहिल्यावर, मी अगदी मनापासून सांगू शकते, की सात वर्षांपूर्वी वडिलांसोबत झालेली ती बैठक म्हणजे यहोवाचा आशीर्वादच होता. तेव्हापासून यहोवासोबतचा माझा नातेसंबंध अधिक मजबूत झाला आहे.”
न्यायाचे पालन करा आणि धर्माचरण करा
२०. न्यायाला आणि धार्मिकतेला समजावून घेतल्याने आणि त्यांचा अवलंब केल्याने कोणते लाभ मिळतात?
२० मानव ज्यास पात्र आहे ते सर्व त्याला देणे, यापेक्षा ईश्वरी न्यायामध्ये अधिक काही समाविष्ट असल्यामुळे अशा न्यायाचे आपण ऋणी आहोत. विश्वास बाळगणाऱ्यांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी यहोवा त्याच्या न्यायामुळे प्रेरित झाला आहे. (स्तोत्र १०३:१०; रोमकर ५:१५, १८) देव आपल्यासोबत अशाप्रकारे वागतो कारण तो आपल्या परिस्थिती विचारात घेतो आणि आपल्यावर दोष लावण्याऐवजी आपल्याला त्यातून वाचवण्याचा तो प्रयत्न करतो. खरोखर, यहोवाच्या न्यायाच्या व्यापकतेची चांगली समज झाल्यामुळे आपण त्याच्या आणखी जवळ जातो. त्याच्या व्यक्तित्वाच्या या पैलूचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न केल्यास आपले आणि इतरांचे जीवन आशीर्वादित होईल. न्यायाचे अनुकरण करण्यातील आपल्या प्रयत्नाकडे आपला स्वर्गीय पिता दुर्लक्ष करणार नाही. यहोवा आपल्याला अभिवचन देतो: “न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा; कारण माझे तारण जवळ आले आहे, माझे न्याय्यत्व प्रगट व्हावयास आले आहे. जो मानव हे करितो . . . तो धन्य.”—यशया ५६:१, २.
[तळटीपा]
a टेहळणी बुरूज, एप्रिल १५, १९९१, (इंग्रजी) पृष्ठे २२-३ पाहा.
तुम्हाला आठवते का?
◻ सदोम आणि गमोराचा विनाश आपल्याला यहोवाच्या न्यायाविषयी काय शिकवतो?
◻ खंडणी, देवाच्या न्यायाची आणि प्रेमाची एक उल्लेखनीय अभिव्यक्ती का आहे?
◻ कोणत्या तीन मार्गांनी आपण न्यायाचा अवलंब करू शकतो?
◻ वडील कोणत्या विशेष मार्गाने ईश्वरी न्यायाचे अनुकरण करू शकतात?
[१५ पानांवरील चित्रं]
आपल्या प्रचारकार्याद्वारे आपण ईश्वरी न्याय प्रदर्शित करतो
[१६ पानांवरील चित्रं]
जेव्हा वडील ईश्वरी न्याय दाखवतात तेव्हा समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना त्यांची मदत घेण्यास सोपे जाते