यहोवा—खऱ्या न्यायाचा आणि धार्मिकतेचा स्रोत
“तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही.”—अनुवाद ३२:४.
१. आपल्यामध्ये न्यायाची अंगभूत गरज का आहे?
प्रेमही जन्मजात गरज प्रत्येकाला असते त्याचप्रमाणे आपल्याला न्यायाने वागवण्यात यावे, अशी इच्छा आपल्या सर्वांच्या मनात असते. अमेरिकी मुत्सद्दी थॉमस जेफरसन यांनी लिहिले, “आपल्या शरीररचनेत भावना, पाहणे किंवा ऐकणे या गोष्टींचा ज्याप्रमाणे समावेश होतो, . . . त्याचप्रमाणे [न्याय] आपल्यामध्ये उपजत आणि साहजिक आहे.” या गोष्टीचे आपल्याला आश्चर्य वाटत नाही कारण यहोवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे. (उत्पत्ति १:२६) खरोखरच, त्याचे व्यक्तिमत्त्व दर्शविणारे गुण त्याने आपल्याला प्रदान केले आहेत आणि त्यांपैकी एक गुण आहे न्याय. त्यामुळे आपण जन्माला येतो तेव्हापासूनच आपल्यामध्ये न्यायाची गरज असते तसेच खऱ्या न्यायाच्या आणि धार्मिकतेच्या जगात जगावे असे आपल्याला वाटते.
२. यहोवाकरता न्याय किती महत्त्वाचा आहे आणि ईश्वरी न्यायाचा अर्थ समजावून घेण्याची आपल्याला का गरज आहे?
२ यहोवाविषयी बायबल आपल्याला खात्री देते: “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” (अनुवाद ३२:४) परंतु अन्यायाने ग्रस्त असलेल्या या जगात ईश्वरी न्यायाचा अर्थ समजून घेणे सोपे नाही. तथापि, देवाच्या वचनाद्वारे आपल्याला हे पाहता येईल, की तो कशाप्रकारे न्याय बजावतो तसेच त्याचे वैभवी मार्ग आणखी चांगल्या रितीने आपल्याला समजून घेता येतील. (रोमकर ११:३३) बायबलमध्ये दाखवण्यात आलेला न्याय समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण न्यायाविषयीची आपली कल्पना मानवी संकल्पनांवर कदाचित आधारलेली असेल. मानवी दृष्टिकोनातून न्याय म्हणजे कायदा निःपक्षपातीपणे लागू करणे. किंवा तत्त्वज्ञानी फ्रान्सिस बेकॉन यांनी लिहिल्याप्रमाणे: “मानव ज्यास पात्र आहे ते सर्व त्याला देणे, या गोष्टीचा न्यायामध्ये समावेश होतो.” तथापि, यहोवाच्या न्यायामध्ये याहीपेक्षा पुष्कळ काही समाविष्ट आहे.
मन आनंदविणारा यहोवाचा न्याय
३. न्याय आणि धार्मिकता यांकरता वापरण्यात आलेल्या बायबलमधील मूळ भाषेतील शब्दांवर विचार करण्याद्वारे काय शिकायला मिळते?
३ बायबलमध्ये मूळ भाषेत उपयोग करण्यात आलेल्या शब्दांचा विचार केल्याने देवाच्या न्यायाची व्यापकता चांगल्याप्रकारे समजण्यास मदत होऊ शकते.a मनोरंजक गोष्ट अशी, की शास्त्रवचनांतील न्याय आणि धार्मिकता या शब्दांमध्ये विशेष असा फरक नाही. खरे तर, काही वेळा हिब्रू शब्द समान अर्थाने वापरण्यात येतात. आमोस ५:२४ येथे आपल्याला हे पाहण्यास मिळते. या वचनामध्ये यहोवा त्याच्या लोकांना प्रोत्साहन देतो: “न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो.” शिवाय, कित्येक वेळा जोर देण्यासाठी “न्याय आणि धार्मिकता” या शब्दांचा एकाच वेळी उपयोग केल्याचे दिसते.—स्तोत्र ३३:५; यशया ३३:५; यिर्मया ३३:१५; यहेज्केल १८:२१; ४५:९.
४. न्यायानुसार वागणे म्हणजे काय आणि न्यायाचा परम दर्जा कोणता आहे?
४ या हिब्रू आणि ग्रीक शब्दांतून कोणता अर्थ ध्वनित होतो? शास्त्रवचनीयदृष्ट्या न्यायानुसार वागणे म्हणजे जे बरोबर आणि निःपक्षपाती आहे ते करणे. स्वतः यहोवा नैतिक नियम आणि तत्त्वे किंवा जे बरोबर आणि निःपक्षपाती आहे ते ठरवत असल्यामुळे यहोवा ज्याप्रकारे कार्य करतो ते न्यायाच्या परम दर्जाचे असते. थियोलॉजिकल वर्डबुक ऑफ दि ओल्ड टेस्टामेन्ट म्हणते, की हिब्रू भाषांतरीत शब्द धार्मिकता (सेदेक) “नीतिविषयक, नैतिक दर्जांना सूचित करतो आणि अर्थातच, जुन्या करारामध्ये तो दर्जा देवाचा गुण आणि त्याची इच्छा आहे.” अशाप्रकारे, देव ज्याप्रकारे तत्त्वे लागू करतो आणि विशेषतः अपरिपूर्ण मानवांशी तो ज्याप्रकारे व्यवहार करतो त्यातून खऱ्या न्यायाचा आणि धार्मिकतेचा खरा अर्थ समजतो.
५. देवाच्या न्यायासोबत कोणते गुण संबंधित आहेत?
५ शास्त्रवचने हे स्पष्टपणे दाखवून देतात, की यहोवाचा न्याय हा मन आनंदविणारा आहे. तो न्याय रुक्ष तसेच कडक नाही. दावीदाने गायिले: “परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांस सोडीत नाही.” (स्तोत्र ३७:२८) देवाचा न्याय त्याला त्याच्या सेवकांप्रती विश्वासूपणा आणि दया दाखवण्यास प्रवृत्त करतो. ईश्वरी न्याय आपल्या गरजांबद्दल संवेदनशील आहे आणि आपल्या अपरिपूर्णता तो विचारात घेतो. (स्तोत्र १०३:१४) देव दुष्टतेकडे दुर्लक्ष करतो असा याचा अर्थ होत नाही, नाहीतर असे केल्याने अन्यायाला खतपाणी घातले जाईल. (१ शमुवेल ३:१२, १३; उपदेशक ८:११) यहोवाने मोशेला सांगितले, की तो “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. चुकांची आणि पातकांची क्षमा करण्यास देव तत्पर असला तरी शिक्षेस पात्र असलेल्या लोकांना तो माफ करणार नाही.—निर्गम ३४:६, ७.
६. यहोवा पृथ्वीवरील त्याच्या मुलांसोबत कसा वागतो?
६ यहोवा कशाप्रकारे न्याय बजावतो यावर आपण मनन करतो तेव्हा तो कठोर न्यायी आहे, पातक्यांना शिक्षा देण्याचीच त्याला नेहमी चिंता लागलेली असते, असा आपण विचार करू नये. उलटपक्षी, तो प्रेमळ आणि तरीही दृढ पिता आहे, असा आपण त्याच्याविषयी विचार करण्यास हवा. यहोवा त्याच्या मुलांसोबत संभाव्य उत्तम मार्गानुसार वागतो. “हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस,” असे यशया संदेष्ट्याने म्हटले. (यशया ६४:८) न्यायी आणि धार्मिक पिता या नात्याने यहोवा त्याच्या पृथ्वीवरील मुलांप्रती दृढता आणि प्रेमळ दया यांमध्ये समतोल साधतो. त्याच्या या मुलांना कठीण परिस्थितींमुळे किंवा शारीरिक कमतरतांमुळे मदतीची किंवा क्षमेची आवश्यकता असते.—स्तोत्र १०३:६, १०, १३.
न्याय म्हणजे काय ते स्पष्ट करणे
७. (अ) यशयाच्या भविष्यवाणीवरून आपल्याला ईश्वरी न्यायाविषयी काय शिकायला मिळते? (ब) राष्ट्रांना न्यायाविषयी शिकवण्याच्या बाबतीत येशूची कोणती भूमिका होती?
७ यहोवाच्या न्यायातील दयाळूपणा मशीहाच्या येण्याने अधिक स्पष्ट झाला. यशया संदेष्ट्याने भाकीत केल्याप्रमाणे येशूने ईश्वरी न्याय शिकवला आणि त्याच्या एकवाक्यतेत तो जगला. स्पष्टपणे, देवाच्या न्यायामध्ये जेरीस आलेल्या लोकांचे सौम्यपणे वागणे समाविष्ट आहे. अशाप्रकारे, ते त्यांच्या दुःखातून पुन्हा सावरू शकतात. यहोवाच्या न्यायाचा हा पैलू ‘परराष्ट्रीयांना स्पष्ट’ करण्यासाठी त्याचा “सेवक” अर्थात येशू पृथ्वीवर आला. त्याने त्याचे काम पूर्ण करण्याद्वारे ईश्वरी न्याय म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर मांडले. दावीद राजाचा ‘धार्मिकतेचा अंकुर’ या नात्याने येशू ‘न्याय आचरण्यास आणि धार्मिकतेमध्ये तत्पर राहण्यास’ उत्सुक होता.—यशया १६:६; ४२:१-४; मत्तय १२:१८-२१; यिर्मया ३३:१४, १५.
८. पहिल्या शतकात खरा न्याय आणि खरी धार्मिकता दिसेनाशी का झाली?
८ यहोवाच्या न्यायी गुणाविषयी अशाप्रकारचे स्पष्टीकरण विशेषतः सा. यु. पहिल्या शतकात फार आवश्यक होते. यहुदी प्रौढ लोकांनी आणि धार्मिक नेत्यांनी—शास्त्री, परुशी आणि इतरांनी—न्यायाविषयी आणि धार्मिकतेविषयी विपर्यस्त दृष्टिकोन सादर केला आणि ते स्वतः त्यानुसार वागले. परिणामी, शास्त्री आणि परुशी यांनी ठरवून दिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास शक्य नसलेल्या सामान्य लोकांनी कदाचित असा विचार केला असावा, की देवाची धार्मिकता साध्य करणे निव्वळ अशक्य आहे. (मत्तय २३:४; लूक ११:४६) परंतु तसे नव्हते हे येशूने दाखवून दिले. सर्वसामान्य लोकांतून त्याने त्याच्या शिष्यांची निवड केली आणि त्यांना देवाचे धार्मिक दर्जे शिकवले.—मत्तय ९:३६; ११:२८-३०.
९, १०. (अ) शास्त्री आणि परुशी लोकांनी त्यांची धार्मिकता दाखवण्याचा कशाप्रकारे प्रयत्न केला? (ब) शास्त्री आणि परुशांच्या चालीरीती वायफळ होत्या हे येशूने कसे दाखवले आणि का?
९ उलटपक्षी, परुशी लोक सर्व लोकांसमोर प्रार्थना आणि दान करण्याद्वारे त्यांची ‘धार्मिकता’ दाखवण्याची कोणतीही संधी दवडत नव्हते. (मत्तय ६:१-६) अगणित नियमांना आणि विधींना जडून राहण्याद्वारे देखील ते त्यांच्या धार्मिकतेचे प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न करत होते. त्या नियमांपैकी बहुतेक नियम त्यांनी स्वतः बनवले होते. या प्रयत्नांत या परुशांनी ‘देवाच्या न्यायाकडे आणि प्रीतीकडे दुर्लक्ष केले.’ (लूक ११:४२) बाहेरून ते धार्मिक दिसत असले तरी आतून ते “अनीतीने” किंवा अधार्मिकतेने भरलेले होते. (मत्तय २३:२८) थोडक्यात सांगायचे झाल्यास, त्यांना देवाच्या धार्मिकतेविषयी फार कमी माहीत होते.
१० या कारणास्तव येशूने त्याच्या अनुयायांना असा इशारा दिला: “शास्त्री व परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्त्व [धार्मिकता] अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.” (मत्तय ५:२०) येशूने सादर केलेला ईश्वरी न्याय आणि शास्त्री व परुशांची संकुचित फाजील धार्मिकता यांतील परस्परविरोधी मतांमुळे त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत.
ईश्वरी न्याय विरुद्ध विपर्यस्त न्याय
११. (अ) शब्बाथ दिवशी बरे करण्याविषयी परुशी लोकांनी येशूला प्रश्न का विचारला? (ब) येशूच्या उत्तरातून काय दिसून आले?
११ सा. यु. ३१ च्या वसंत ऋतूत गालीलमध्ये सेवाकार्य करत असताना येशूची नजर सभास्थानातील एका मनुष्यावर पडली. या मनुष्याचा एक हात वाळलेला होता. तो शब्बाथ दिवस असल्यामुळे परुशांनी येशूला विचारले: “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे का?” त्या गरीब मनुष्याच्या यातनेबद्दल प्रांजळ चिंता बाळगण्याऐवजी येशूवर दोष लावण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून स्पष्ट होते. यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही, की येशू त्या लोकांच्या मनाच्या कठोरपणामुळे खिन्न झाला! मग त्याने तशाच प्रकारचा प्रश्न परुशांना विचारला: “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे . . . सशास्त्र आहे?” त्यांनी काही उत्तर दिले नाही, मग येशूने त्याच्या स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना असे विचारून दिले, की शब्बाथ दिवशी खाचेत पडलेले मेंढरू कोण उचलून बाहेर काढणार नाही?b “मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे!” येशूच्या या तर्कापुढे त्यांना तोंड उघडता आले नाही. ‘म्हणून शब्बाथ दिवशी चांगल्या गोष्टी करणे सशास्त्र [किंवा योग्य] आहे,’ असे येशूने अखेरीस म्हटले. मानवी परंपरेमुळे देवाच्या न्यायाला केव्हाही प्रतिबंध होऊ नये. हा मुद्दा स्पष्ट करण्याच्या हेतूने येशूने पुढे होऊन त्या व्यक्तीचा हात बरा केला.—मत्तय १२:९-१३; मार्क ३:१-५.
१२, १३. (अ) शास्त्री आणि परुशांच्या विषमतेत, पापी लोकांना मदत करण्यातील आस्था येशूने कशी दाखवली? (ब) ईश्वरी न्याय आणि फाजील धार्मिकता यांत कोणता फरक आहे?
१२ परुशी लोकांना शारीरिक दुर्बलतांविषयी कमी चिंता होती आणि आध्यात्मिकरीत्या दुर्बल असलेल्या लोकांची त्यांना काहीही चिंता नव्हती. धार्मिकतेविषयीच्या त्यांच्या विपर्यस्त दृष्टिकोनामुळे जकातदारांना आणि पापी लोकांना ते टाळत होते आणि त्यांचा तिरस्कार करत होते. (योहान ७:४९) तथापि, अशाप्रकारच्या अनेक लोकांनी येशूच्या शिकवणीला प्रतिसाद दिला कारण न्यायदंड बजावण्याऐवजी आपली मदत करण्याची त्याची इच्छा असल्याचे त्यांनी ताडले होते. (मत्तय २१:३१; लूक १५:१) तथापि, आध्यात्मिकरीत्या आजारी असलेल्यांना बरे करण्याच्या येशूच्या प्रयत्नांची परुशांनी टीकाच केली. ते येशूवर असा दोषारोप करून कुरकूर करू लागले: “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.” (लूक १५:२) त्यांच्या दोषारोपाला उत्तर देताना येशूने पुन्हा मेंढपाळाविषयीच्या उदाहरणाचा उपयोग केला. हरवलेले मेंढरू सापडल्यानंतर मेंढपाळाला आनंद होतो त्याचप्रमाणे पापी मनुष्य पश्चात्ताप करतो तेव्हा स्वर्गातील देवदूतांना आनंद होतो. (लूक १५:३-७) जक्कयाने त्याच्या मागील पापमय मार्गाविषयी पश्चात्ताप केला तेव्हा स्वतः येशूला आनंद झाला होता. तो म्हणाला: “मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे.”—लूक १९:८-१०.
१३ या वादविवादांमधून, बरे तसेच उद्धार करणारा ईश्वरी न्याय आणि थोडक्यांची वाहवा तसेच अनेकांची निंदा करणारी फाजील धार्मिकता यांतील फरक स्पष्ट होतो. पोकळ विधी आणि मानव-निर्मित परंपरा यामुळे शास्त्री व परुशी उद्धट आणि गर्विष्ठ बनले, पण येशूने योग्यपणे हे दाखवून दिले, की त्यांनी “नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या सोडल्या आहेत.” (मत्तय २३:२३) आपण जे काही करतो त्यात खऱ्या न्यायाने वागण्यासाठी आपण येशूचे अनुकरण करावे आणि फाजील धार्मिकतेच्या सापळ्यापासून बचावून राहावे.
१४. ईश्वरी न्याय एखाद्या व्यक्तीच्या परिस्थितींचा विचार करतो, हे येशूचा एक चमत्कार कसे दाखवून देतो?
१४ परुश्यांनी तयार केलेल्या नियमांकडे येशूने लक्ष दिले नाही, पण तो मोशेच्या नियमशास्त्राचे मात्र पालन करायचा. (मत्तय ५:१७, १८) असे करत असताना, तो धार्मिक नियमशास्त्राच्या केवळ वरवरच्या ज्ञानानेच नव्हे, तर नियमशास्त्राचा खरा उद्देश आणि त्याची आंतरिक समज लक्षात ठेवून वागला. १२ वर्षे रक्तस्रावाचा त्रास होत असलेली एक स्त्री येशूच्या वस्त्राला स्पर्श करून बरी झाली तेव्हा त्याने तिला म्हटले: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.” (लूक ८:४३-४८) येशूच्या सहानुभूतीच्या या शब्दांनी या गोष्टीची खात्री दिली, की देवाच्या न्यायाने त्या स्त्रीच्या परिस्थितींचा विचार केला होता. विधीनुसार ती अशुद्ध होती आणि लोकांमध्ये आल्याने तिने मोशेच्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले होते, तरी तिचा विश्वास प्रतिफळ मिळण्याच्या पात्रतेचा होता.—लेवीय १५:२५-२७; पडताळा रोमकर ९:३०-३३.
प्रत्येकाकरता धार्मिकता
१५, १६. (अ) चांगला शोमरोनी, हा येशूचा दाखला आपल्याला न्यायाविषयी काय शिकवतो? (ब) आपण “फाजील धार्मिक” होण्याचे का टाळले पाहिजे?
१५ ईश्वरी न्यायाच्या दयाळू पैलूवर जोर देण्याखेरीज येशूने त्याच्या शिष्यांना हे सुद्धा शिकवले, की तो ईश्वरी न्याय प्रत्येकासाठी असला पाहिजे. त्याच्याविषयी यहोवाचा उद्देश होता, की त्याने ‘राष्ट्रांस न्याय प्राप्त करून द्यावा.’ (यशया ४२:१) चांगला शोमरोनी, या येशूच्या प्रसिद्ध दाखल्यामध्ये नेमका हाच मुद्दा होता. शास्त्रवचनांमध्ये पारंगत असलेल्या एका मनुष्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने हा दाखला दिला. “स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे,” अशी त्या मनुष्याची इच्छा होती. त्याने विचारले: “माझा शेजारी कोण?” केवळ यहुदी लोकांपर्यंत शेजारधर्म मर्यादित असावा, असे त्याला पक्के वाटत होते. येशूच्या दाखल्यातील शोमरोनी व्यक्तीने ईश्वरी धार्मिकता प्रदर्शित केली. कारण दुसऱ्या राष्ट्रातील अनोळखी व्यक्तीला वेळ देण्यास आणि त्याच्यासाठी पैसे खर्च करण्यास तो तयार होता. येशूने त्याच्या दाखल्याचा समारोप त्या व्यक्तीला असा सल्ला देऊन केला: “तूहि तसेच कर.” (लूक १०:२५-३७) त्याचप्रमाणे आपणही जेव्हा लोकांच्या जातीय आणि वांशिक पार्श्वभूमीचा विचार न करता त्यांच्याकरता चांगल्या गोष्टी करतो तेव्हा आपण देवाच्या न्यायाचे अनुकरण करत असतो.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
१६ दुसऱ्या बाजूला पाहता, शास्त्री आणि परुशांचे उदाहरण याचे स्मरण करून देते, की ईश्वरी न्यायाचे आचरण करत असताना आपण “फाजील धार्मिक” होऊ नये. (उपदेशक ७:१६) धार्मिकतेच्या दिखावटी प्रदर्शनाने इतरांना प्रभावित केल्याने किंवा मानव-निर्मित नियमांना फाजील महत्त्व दिल्याने आपल्याला देवाची स्वीकृती मिळणार नाही.—मत्तय ६:१.
१७. ईश्वरी न्याय दाखवणे आपल्याकरता इतके महत्त्वाचे का आहे?
१७ देवाचा न्यायी गुण येशूने राष्ट्रांना स्पष्ट केला याचे एक कारण म्हणजे त्याच्या सर्व शिष्यांना हा गुण प्रदर्शित करता यावा. ते इतके महत्त्वाचे का आहे? शास्त्रवचने आपल्याला आर्जवतात, की देवाचे “अनुकरण करणारे व्हा” आणि देवाचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. (इफिसकर ५:१) त्याचप्रमाणे मीखा ६:८ (पं.र.भा.) स्पष्ट करते, की आपण यहोवासोबत वाटचाल करत असताना “न्यायाने वागणे” ही त्याची आपल्याकडून केलेली एक अपेक्षा आहे. शिवाय, सफन्या २:२, ३ आपल्याला या गोष्टीचे स्मरण करून देते, की आपल्याला यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी दृष्टिआड व्हायचे असल्यास तो दिवस येण्याआधी आपण ‘धार्मिकतेचा अवलंब’ केला पाहिजे.
१८. पुढील लेखात कोणत्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील?
१८ यामुळे हे कठीण दिवस म्हणजे न्यायाचा अवलंब करण्याकरता ‘अनुकूल समय’ असे आहेत. (२ करिंथकर ६:२) आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो, की आपण ईयोबाप्रमाणे ‘धार्मिकतेचे पांघरूण’ आणि ‘नीतिमत्तेचा झगा’ पांघरल्यास यहोवा आपल्याला आशीर्वादित करील. (ईयोब २९:१४) यहोवाच्या न्यायावरील आपला विश्वास भवितव्याकडे विश्वासाने पाहण्यास आपल्याला कशाप्रकारे मदत करील? याशिवाय, नवीन ‘धार्मिक पृथ्वीची’ वाट पाहत असताना ईश्वरी न्याय आपले आध्यात्मिकरीत्या कसे संरक्षण करील? (२ पेत्र ३:१३) पुढील लेख या प्रश्नांची उत्तरे देईल.
[तळटीपा]
a हिब्रू शास्त्रवचनांमध्ये प्रमुख तीन शब्दांचा समावेश होतो. त्यांपैकी एका (मिशपत) शब्दाचे “न्याय” असे बहुतेक वेळा भाषांतर करण्यात येते. इतर दोन शब्दांचा (सेदेक आणि संबंधित शब्द सेदेकाह) “धार्मिकता” या अर्थाने बहुतेक ठिकाणी उपयोग करण्यात येतो. ग्रीक भाषांतरित “धार्मिकता” (दिकाईओसाईने) शब्दाची व्याख्या “बरोबर किंवा न्याय्य गुण” अशी करण्यात येते.
b येशूचे उदाहरण उत्तमपणे निवडण्यात आले कारण यहुद्यांच्या मौखिक नियमाने त्यांना शब्बाथ दिवशी संकटात सापडलेल्या प्राण्याला मदत करण्याची विशेष अनुमती दिली होती. इतर कित्येक प्रसंगी, याच विषयावर समोरासमोर संघर्ष झाले होते, विशेषतः या गोष्टीवरून, की शब्बाथ दिवशी बरे करणे सशास्त्र आहे किंवा नाही.—लूक १३:१०-१७; १४:१-६; योहान ९:१३-१६.
तुम्ही स्पष्ट करू शकाल का?
◻ ईश्वरी न्यायाचा अर्थ काय आहे?
◻ येशूने राष्ट्रांना न्याय कसा शिकवला?
◻ परुशी लोकांची धार्मिकता विपर्यस्त का होती?
◻ न्यायानुसार वागण्याची आपल्याला का गरज आहे?
[८ पानांवरील चित्र]
ईश्वरी न्यायाची व्यापकता येशूने दाखवून दिली