वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ९/१५ पृ. २६-२९
  • मॅसोरेट कोण होते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मॅसोरेट कोण होते?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बेन अशर कुटुंब
  • विलक्षण स्मरणशक्‍ती आवश्‍यक
  • त्यांचा काय विश्‍वास होता?
  • त्यांच्या कार्यातून लाभ मिळवणे
  • मॅसोरेटीक पाठ काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची माझी इच्छा कायमची तृप्त होईल
    सावध राहा!—१९९८
  • तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • हे पुस्तक टिकले कसे?
    सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ९/१५ पृ. २६-२९

मॅसोरेट कोण होते?

‘सत्यस्वरूप देव’ यहोवाने त्याचे वचन, बायबल जपून ठेवले आहे. (स्तोत्र ३१:५) परंतु सत्याचा शत्रू, सैतान याने बायबलला भ्रष्ट व नाश करण्याचा प्रयत्न केला, तरी ते मूलतः लिहिले होते तसेच आपल्यापर्यंत कसे पोहंचले?—मत्तय १३:३९ पाहा.

प्राध्यापक रॉबर्ट गोर्डीस यांनी केलेल्या विवेचनांमध्ये त्याचे उत्तर काही अंशी प्राप्त होऊ शकते: “मॅसोरेट किंवा ‘परंपरेचे जतन करणारे’ असे संबोधलेल्या इब्री शास्त्र्यांनी जे साध्य केले त्याची पुरेशी गुणग्राहकता बाळगण्यात आली नाही. या निनावी शास्त्रांनी मोठ्या दक्षतेने व प्रेमळ काळजीने पवित्र पुस्तकाची नकल केली.” या नकलाकारांपैकी बहुतांश आज निनावी असले, तरी मॅसोरेट लोकांच्या एका कुटुंबाचे नाव स्पष्टपणे नोंदण्यात आले आहे—बेन अशर. त्यांच्याविषयी व त्यांच्या सोबतच्या मॅसोरेट लोकांविषयी आपल्याला काय माहीत आहे?

बेन अशर कुटुंब

मूलतः इब्री भाषेत लिहिलेल्या बायबलचा भाग ज्यास बहुधा जुना करार म्हटले जाते त्याची नकल यहुदी शास्त्र्यांनी विश्‍वासूपणे केली होती. सहाव्या ते दहाव्या शतकापर्यंत या नकलाकारांना मॅसोरेट म्हटले जात होते. त्यांच्या कार्यात काय समाविष्ट होते?

शतकांपर्यंत, इब्री भाषा केवळ व्यंजनांनी लिहिण्यात येत होती, वाचक स्वर लावून वाचत असत. परंतु, मॅसोरेटच्या काळापर्यंत, इब्री भाषेतील योग्य उच्चार नाहीसा होत होता कारण पुष्कळ यहुदी त्या भाषेत इतके अस्खलित नव्हते. बॅबिलोन तसेच इस्राएलमधील मॅसोरेट्‌सच्या गटांनी, स्वरांचे आघात व योग्य उच्चारासाठी व्यंजनांभोवती काही चिन्हे करण्याचे सुरू केले. कमीतकमी तीन वेगवेगळ्या पद्धती निर्माण करण्यात आल्या, परंतु बेन अशर कुटुंबाचे निवासस्थान म्हणजेच गालील समुद्राजवळ असणाऱ्‍या टायबेरीयसमधील मॅसोरेट लोकांची पद्धत सर्वात प्रभावकारी ठरली.

या एकमेव कुटुंबातील, सा. यु. आठव्या शतकाच्या एल्डर अशरने सुरू होऊन मॅसोरेटच्या पाच पिढींची नोंद सूत्रांनी केली आहे. इतरजण नेहेमाया बेन अशर, अशर बेन नेहेमाया, मोझेस बेन अशर आणि शेवटी सा. यु. दहाव्या शतकातील आरोन बेन मोझेस बेन अशर हे होते.a इब्री बायबल लिखाणाचा समजला जाणारा योग्य उच्चार उत्तमरित्या व्यक्‍त करणाऱ्‍या लिखित खुणा सुधारणाऱ्‍या लोकांमध्ये हे पुरुष अग्रगण्य होते. ही चिन्हे निर्माण करण्यासाठी त्यांना इब्री व्याकरणाचे मूळ जाणावे लागले. इब्री व्याकरणासाठी कोणतीही निश्‍चित नियमावली लिहून ठेवण्यात आली नव्हती. यास्तव, हे मॅसोरेट लोक पहिल्या इब्री व्याकरणकारांपैकी होते असे एखादा म्हणू शकतो.

बेन अशर कुटुंब परंपरेतील शेवटचा मॅसोरेट आरोन, याने प्रथम ही माहिती लिहून ठेवली व ती प्रकाशित केली. “सफर डिकडूकी हा-ते‘अमीम,” या नावाच्या पुस्तकात त्याने तसे केले, ते इब्री व्याकरणाच्या नियमांचे पहिले पुस्तक होते. हे पुस्तक, नंतरच्या येणाऱ्‍या शतकांमध्ये इतर इब्री व्याकरणकारांच्या कार्याचे आधार बनले. परंतु, मॅसोरेट लोकांच्या अति महत्त्वपूर्ण कार्याचे हे केवळ एक उपउत्पादन होते. ते काय होते?

विलक्षण स्मरणशक्‍ती आवश्‍यक

बायबलच्या वचनांमधील प्रत्येक शब्दाचे व प्रत्येक वर्णाचे देखील अचूक भाषांतर करणे हीच केवळ मॅसोरेट लोकांची चिंता होती. अचूकतेची खात्री करण्यासाठी, मॅसोरेट प्रत्येक पानाच्या बाजूच्या समासात माहिती लिहित होते जेणेकरून गतकाळातील नकलाकारांनी अनवधानाने किंवा मुद्दामहून लिखाणामध्ये केलेला कोणताही संभाव्य बदल दर्शवला जाऊ शकत होता. मॅसोरेट लोकांनी या समासातील टिपणींमध्ये असामान्य शब्दाचे प्रकार तसेच संयोग देखील लिहिले व एका पुस्तकात किंवा संपूर्ण इब्री शास्त्रवचनांमध्ये ते किती वेळा आढळतात हे देखील दर्शवून दिले. जागा मर्यादित असल्याकारणाने ही विवेचने अतिशय संक्षिप्त शब्दांमध्ये नोंदवली जात होती. उलट परीक्षणाचे अतिरिक्‍त साधन म्हणून ते विशिष्ट पुस्तकांतील मधल्या शब्दाला व अक्षराला चिन्हांकित करीत होते. अचूक नकल केली जाते अशी खात्री करण्यासाठी बायबलमधील प्रत्येक अक्षराची मोजणी करण्याइतपत त्यांनी प्रयत्न केले.

मॅसोरेट लोकांनी पानाच्या वरील व खालील समासात, बाजूच्या समासातील काही संक्षिप्त टिपणींविषयी विस्तारित विवेचने लिहिली.b त्यांच्या कार्याचे उलट परीक्षण करण्यासाठी ही विवेचने मदतदायक होती. त्या वेळी वचनांना अंकित न केल्यामुळे व बायबल शब्दांची सूची नसल्यामुळे हे उलट परीक्षण करण्यासाठी मॅसोरेट लोक बायबलच्या इतर भागांचा संदर्भ कसा घेत होते? दाखवलेला शब्द किंवा अनेक शब्द बायबलमध्ये इतर कोठे आढळतात याची आठवण त्यांना करून देण्यासाठी वरील तसेच खालील समासात, त्यांनी समांतर वचनाचा भाग लिहून ठेवला होता. मर्यादित जागेमुळे, प्रत्येक समांतर वचनाची आठवण करून देण्यासाठी ते बहुतेकवेळा एकच मुख्य शब्द लिहित होते. या समासलिखित टीपा फायदेकारक ठराव्यात म्हणून, या नकलाकारांना संपूर्ण इब्री बायबल अक्षरशः तोंडपाठ असण्याची गरज होती.

समासात न पुरणाऱ्‍या याद्या हस्तलिखिताच्या दुसऱ्‍या भागात दिल्या जात होत्या. उदाहरणार्थ, उत्पत्ति १८:३ च्या बाजूच्या समासातील मॅसोरेटिक टिपण्या, קלד हे तीन इब्री अक्षर दाखवतात. १३४ या अंकासाठी तो इब्री भाषेतील समानार्थी शब्द आहे. हस्तलिखिताच्या दुसऱ्‍या भागात, एक यादी आढळते ज्यामध्ये आधीच्या मॅसोरेटिक नकलाकारांनी मुद्दामहून इब्री वचनांमधून यहोवा हे नाव काढून त्याऐवजी “प्रभू” हा शब्द दिलेल्या १३४ जागा दर्शवल्या आहेत.c हे बदल केल्याची जाणीव असूनही, मॅसोरेट लोकांनी त्यांना देण्यात आलेल्या लिखाणात स्वतंत्रपणे बदल केले नाहीत. त्याऐवजी समासलिखित टीपांमध्ये त्यांनी बदल दर्शवले. परंतु, आधीच्या नकलाकारांनी बदल केलेले असतानाही मॅसोरेट लोकांनी लिखाणात बदल न करण्याची इतकी काळजी का घेतली? त्यांच्या पूर्वजांपेक्षा यहुदी विश्‍वासाचा त्यांचा प्रकार काही वेगळा होता का?

त्यांचा काय विश्‍वास होता?

मॅसोरेटिक लोकांच्या प्रगतीच्या या काळात, यहुदी पंथ खोलवर रुजलेल्या कल्पनांविषयीच्या युद्धात गोवलेला होता. सा. यु. पहिल्या शतकापासून, रब्बींचा यहुदी धर्म आपला ताबा वाढवत होता. तालमूदचे लिखाण व रब्बींचे प्रतिपादन करण्याचे सुरू झाल्यावर, मौखिक नियमाच्या रब्बींच्या प्रतिपादनासमोर बायबलच्या लिखाणाला दुय्यम स्थान मिळू लागले.d यास्तव, बायबलच्या लिखाणाचे काळजीपूर्वक जतन केल्याने, त्याचे महत्त्व कमी झाले असते.

आठव्या शतकात करैत नावाच्या गटाने याविरुद्ध बंड केले. व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाच्या महत्त्वावर जोर देऊन, रब्बींच्या व तालमूदच्या अधिकाराचा व प्रतिपादनांचा त्यांनी धिक्कार केला. केवळ बायबलच्या लिखाणाला त्यांनी अधिकार म्हणून स्वीकारले. यामुळे त्या लिखाणाचा अचूक अर्थ देण्याची आवश्‍यकता वाढली आणि मॅसोरेटिक अभ्यासाला अधिक प्रेरणा मिळाली.

मॅसोरेट लोकांच्या कार्यावर रब्बींच्या किंवा करैत विश्‍वासाचा किती प्रमाणात प्रभाव झाला? इब्री बायबल हस्तलिखितांमधील तज्ज्ञ, एम. एच. गोशेन गॉटस्टाईन असे म्हणतात: “मॅसोरेट लोक प्राचीन परंपरा चालू ठेवत होते व मुद्दामहून त्यामध्ये लुडबूड केल्यास तो संभाव्य गुन्ह्यांपैकी सर्वात वाईट ठरेल . . . याची त्यांना खात्री पटली होती.”

बायबल लिखाणाची योग्यरीतीने नकल करणे एक पवित्र कामगिरी आहे असा दृष्टिकोन मॅसोरेट लोक बाळगत होते. इतर धार्मिक गोष्टींचा विचार केल्याने ते अधिक प्रवृत्त झाले असले, तरी मॅसोरेटिक कार्यावर कल्पनातरंगाचा प्रभाव पडला नव्हता. अतिशय संक्षिप्त समासलिखित टिपांनी धर्मशास्त्रीय वादविवादास काहीच मुभा दिली नाही. बायबल लिखाणच त्यांच्या जीवनाची चिंता होते; त्यामध्ये त्यांनी अनाधिकृत फेरबदल केले नसते.

त्यांच्या कार्यातून लाभ मिळवणे

नैसर्गिक इस्राएल देवाचे निवडलेले लोक नसले, तरी हे यहुदी नकलाकार देव वचनाचे जतन अचूकपणे करून ठेवण्याकरता पूर्णपणे समर्पित होते. (मत्तय २१:४२-४४; २३:३७, ३८) बेन अशर कुटुंबाच्या व इतर मॅसोरेट लोकांनी मिळवलेल्या साध्यतेचा सारांश रॉबर्ट गॉर्डीस यांनी योग्यपणे दिला, त्यांनी लिहिले: “त्या नम्र परंतु दुर्दम्य कामकऱ्‍यांनी . . . बायबलच्या लिखाणाला गमावण्यापासून किंवा बदल होण्यापासून सुरक्षित ठेवून व प्रकाशझोतात न येता आपले प्रयासाचे कार्य पार पाडले.” (बायबलचे लिखाण तयार करते वेळी) परिणामस्वरूप, १६ व्या शतकातील लुथर व टिंडेलसारखे सुधारक, चर्चच्या अधिकाराचा विरोध करून सर्वांना वाचता यावे म्हणून सामान्य भाषांमध्ये बायबलचे भाषांतर करू लागले तेव्हा त्यांच्या कार्याला आधार म्हणून त्यांच्याजवळ उपयोगात आणण्यासाठी जतन करून ठेवलेले इब्री लिखाण होते.

मॅसोरेट लोकांचे कार्य आपल्याला आजही फायदेकारक आहे. त्यांची इब्री लिखाणे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स या इब्री शास्त्रवचनांकरता आधार बनतात. प्राचीन मॅसोरेट लोकांनी अचूकतेसाठी दाखवलेल्या समर्पणाच्या व चिंतेच्या त्याच आत्म्यासह हे भाषांतर विविध भाषांमध्ये आजही केले जाते. यहोवा देवाच्या वचनाकडे लक्ष देण्यामध्ये आपण अशाच प्रकारची मनोवृत्ती दाखवली पाहिजे.—२ पेत्र १:१९.

[तळटीपा]

a इब्री भाषेत, “बेन” म्हणजे “मुलगा.” यास्तव, बेन अशर म्हणजे “अशरचा मुलगा.”

b बाजूच्या समासातील मॅसोरेटिक टिपणींना छोटा मसोरा असे म्हटले जाते. वरील व खालील समासांतील टिपणींना मोठा मसोरा म्हटले जाते. हस्तलिखितात इतर कोठेही लिहिलेल्या याद्यांना शेवटला मसोरा म्हटले जाते.

c न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स वीथ रेफरेन्सेस यामध्ये अपेंडीक्स १ ब पाहा.

d मौखिक नियम व रब्बींच्या यहुदी धर्माविषयी अधिक माहितीसाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका., द्वारे प्रकाशित केलेले युद्धरहित जग कधी असेल का? (इंग्रजी) या माहितीपत्रकाची पृष्ठे ८-११ पाहा.

[२८ पानांवरील चौकट]

इब्री उच्चाराची पद्धत

मॅसोरेट लोकांनी स्वरचिन्हे व आघात दर्शवणाऱ्‍या खुणा लिहून ठेवण्यासाठी सर्वात उत्तम पद्धतीचा शोध अनेक शतकांपर्यंत केला. यास्तव, बेन अशर कुटुंबाच्या प्रत्येक पिढीने पुढील प्रगती केल्याचे आढळणे आश्‍चर्याचे नाही. अस्तित्वात असलेली हस्तलिखिते, बेन अशर कुटुंबातील शेवटले दोन मॅसोरेट म्हणजेच मोझेस व आरोन यांच्याच शैली व पद्धती दर्शवतात.e या हस्तलिखितांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर असे दिसून येते की, आरोनने उच्चार व उच्चाराच्या खुणांसंबंधाच्या बारीकसारीक मुद्यांवर विशिष्ट नियम केले होते व ते त्यांचे पिता मोझेस यांनी केलेल्या नियमांपेक्षा वेगळे होते.

बेन नफताली व आरोन बेन अशर समकालीन होते. मोझेस बेन अशरच्या कायरो कोडेक्समध्ये अनेक प्रतिपादने आहेत ज्यांचे श्रेय बेन नफतालीला दिले जाते. म्हणून, एकतर नफतालीने स्वतः, मोझेस बेन अशरकडून अभ्यास केला असावा किंवा त्या दोघांनी अतिशय प्राचीन अशी सामान्य परंपरा टिकवून ठेवली असावी. पुष्कळ विद्वान बेन अशर आणि बेन नफताली यांच्या पद्धतींमधील विविधतेबद्दल बोलतात, परंतु एम. एच. गोशेन गॉटस्टाईन लिहितात: “या दोन उपपद्धती बेन अशर कुटुंबातील आहेत व त्यांच्या प्रतिपादनांमधील विरुद्धतेला बेन अशर विरुद्ध बेन अशर असे संबोधणे उचित ठरेल.” म्हणून एकाच बेन अशर पद्धतीविषयी बोलणे अयोग्य होईल. आरोन बेन अशरच्या पद्धती, अंतिम स्वीकारयोग्य प्रकार ठरल्या ते त्यांच्या स्वाभाविक श्रेष्ठत्वामुळे नव्हे. केवळ १२ व्या शतकातील तालमूदचा विद्वान मोझेस मेमोनिडस याने आरोन बेन अशरच्या एका लिखाणाची स्तुती केल्यामुळे त्यास प्राधान्य देण्यात आले.

[Artwork—Hebrew characters]

स्वर चिन्हे व ध्वनिउच्चार खुणांसह व त्यांच्याविना निर्गम ६:२ चा काही भाग

[तळटीपा]

e केवळ पूर्वीच्या व नंतरच्या संदेष्ट्यांचा उल्लेख असलेले कायरो कोडेक्स (सा. यु. ८९५) मोझेसच्या पद्धतींचे उदाहरण देते. अलेप्पो (सुमारे सा. यु. ९३०) आणि लेनीनग्रॅड (सा. यु. १००८) हे सांकेतिक शब्दकोश आरोन बेन अशरच्या पद्धतींची उदाहरणे समजली जातात.

[२६ पानांवरील चित्रं]

टायबेरीयस, आठव्या ते दहाव्या शतकापर्यंत मॅसोरेटिक कार्यहालचालींचे केंद्रस्थान

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा