मॅसोरेटीक पाठ काय आहे?
तुम्ही बायबल कोणत्याही भाषेत वाचले तरी, त्याचा काही भाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मॅसोरेटीक पाठातून भाषांतरीत करण्यात आला होता आणि तो भाग इब्री शास्त्रवचने, किंवा “जुना करार” होय. खरे पाहता, एका पेक्षा अधिक मॅसोरेटीक पाठ होते. तर मग, त्यांच्यातून कोणते निवडण्यात आले व का? पण मॅसोरेटीक पाठ म्हणजे काय, आणि ते विश्वसनीय आहे हे आपल्याला कसे माहीत होते?
यहोवाचे वचन
बायबलच्या लिखाणाला सीनाय पर्वतावर सा. यु. पू. १५१३ मध्ये सुरवात झाली. निर्गम २४:३, ४ आपल्याला सांगते: “मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले, तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढिली.”
इब्री शास्त्रवचने लिहून ठेवण्यासाठी, सा. यु. पू. १५१३ पासून सा. यु. पू. ४४३ पर्यंत एक हजारपेक्षा अधिक वर्षे लागली. बायबलचे लेखक ईश्वरप्रेरित असल्यामुळे, त्याचा संदेश विश्वासूपणे जपून ठेवण्यात येईल यासाठी देवाने त्यांना मार्गदर्शित केले असेल हे तर्कशुद्ध आहे. (२ शमुवेल २३:२; यशया ४०:८) परंतु, त्याचा असा अर्थ होतो का, की जसजसे प्रती बनवण्यात येतील तसतसे त्यातील एकही अक्षर बदलू नये यासाठी यहोवा सर्व मानवी चुकांना प्रतिबंध घालेल?
चुकांचा शिरकाव होण्यासाठी दार किंचित उघडले
देवाच्या वचनाबद्दल गाढ आदर असलेल्या लोकांनी पिढ्यानपिढ्यांपासून त्याच्या नकला केल्या तरीसुद्धा, काही प्रमाणात मानवी चुका हस्तलिखितांमध्ये शिरल्याच. बायबलचे लेखक ईश्वरप्रेरित होते, परंतु नकलाकारांनी त्यांचे कार्य ईश्वरी प्रेरणेने केले नाही.
सा. यु. पू. ५३७ मध्ये बाबेलच्या कैदेतून सुटल्यावर, यहुद्यांनी लिखाणाची नवी शैली, बाबेलमध्ये शिकलेली चौकोनी अक्षरांची पद्धत अंगीकारली. या मोठ्या बदलाने आपल्यासोबत अंतर्वर्ती समस्या आणली, सारखीच दिसणारी काही विशिष्ट अक्षरे चुकीने एकमेकांसाठी वापरली जाऊ शकत होती. इब्री भाषा व्यंजनावर आधारित असल्यामुळे व वाचकाला संदर्भाचा अर्थ ज्याप्रमाणे कळतो त्याप्रमाणे तो स्वर लावून वाचत असल्यामुळे एखाद्या व्यंजनात बदल झाला तर त्या शब्दाचा सहजपणे दुसरा अर्थ होऊ शकत होता. परंतु, बहुतेक ठिकाणी अशा चुका शोधून दुरूस्त केल्या असाव्यात.
बाबेलच्या पाडावानंतर पुष्कळ यहुदी इस्राएलला परतले नाहीत. अशाप्रकारे, संपूर्ण मध्यपूर्व आणि युरोपमधील यहुदी समाजांसाठी सभास्थान उपासना केंद्र बनले.a प्रत्येक सभास्थानामध्ये शास्त्रवचनांच्या नकला केलेल्या गुंडाळ्यांची आवश्यकता होती. या नकला जशा वाढत गेल्या तशाच नकलाकारांच्या चुकांची संभाव्यता देखील वाढत गेली.
दार बंद करण्याचे प्रयत्न
सा. युगाच्या पहिल्या शतकाच्या सुरवातीला, जरुसलेमधील शास्त्र्यांनी, इतर सर्व इब्री शास्त्रवचनांच्या गुंडाळ्यांची दुरुस्ती करता यावी म्हणून एक मूळ पाठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरीही, एखाद्या पाठाचा अस्सलपणा आणि नकलाकारांच्या चुका असलेली हस्तलिखिते यांच्यातील फरक दाखवण्यासाठी कोणतीही ठराविक पद्धत नव्हती. सा. युगाच्या दुसऱ्या शतकापासून पुढे, इब्री शास्त्रवचनांचा व्यंजनात्मक पाठ, अधिकारयुक्तपणे ठरवलेला नव्हता तरीदेखील पूर्णपणे चांगल्यारीतीने प्रमाणबद्ध केलेला होता असे दिसते. तालमूदमध्ये (सा. युगाच्या दुसऱ्या आणि सहाव्या शतकादरम्यान संग्रह केला) आलेले इब्री शास्त्रवचनांचे संदर्भ पुष्कळदा जे नंतर मॅसोरेटीक पाठ म्हणून ओळखले जाऊ लागले त्याच्यापासून एका वेगळ्याच उगमाला सूचित करतात.
इब्री भाषेत “परंपरा” हा शब्द मा·सोह·राहʹ किंवा मा·सोʹरेथ असा आहे. सा. युगाच्या सहाव्या शतकापर्यंत, इब्री शास्त्रवचनांचे अचूकपणे नक्कल करण्याच्या परंपरेचे रक्षण करणारे, मॅसोरेट्स म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी बनवलेल्या नकलांचा मॅसोरेटीक पाठ असा उल्लेख केला जातो. त्यांच्या कार्यात व त्यांनी बनवलेल्या पाठात कोणती खास गोष्ट होती?
इब्री भाषेचा जिवंत आणि राष्ट्रीय भाषा या नात्याने लोप झाला होता, आणि पुष्कळ यहुदी तिच्याशी परिचित नव्हते. यास्तव, बायबलचा व्यंजनात्मक पाठ धोक्यात होता. त्याचे संरक्षण करण्यासाठी, मॅसोरेट्स लोकांनी बिंदू, अपसारणचिन्हे किंवा टिंब यांचे प्रतिनिधीत्व करणारी एक स्वरवर्ण पद्धत निर्माण केली. ही चिन्हे व्यंजनांच्या वर किंवा खाली लावली जात होती. मॅसोरेट्स लोकांनी चिन्हांची अशी एक क्लिष्ट पद्धत बनवली जी उच्चाराच्या प्रकाराला तसेच आणखी अचूक उच्चाराचे मार्गदर्शन दोन्हींसाठी उपयोगी होती.
शास्त्र्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांनी पाठामध्ये कोठे फेरफार केला किंवा चुकीची नक्कल केली असे मॅसोरेट्सना वाटल्यास, त्या पाठामध्ये बदल करण्याऐवजी त्यांनी बाजूच्या समासात टिपा दिल्या. त्यांनी, असामान्य शब्द रचना आणि जुळवणी तसेच या गोष्टी एखाद्या पुस्तकात किंवा संपूर्ण इब्री शास्त्रवचनात कितींदा आढळतात त्याची नोंद केली आहे. मूळची माहिती बरोबर आहे की नाही, त्याचे प्रतिपरीक्षण करण्यासाठी नकलाकारांना मदत व्हावी म्हणून, जादा विवेचनांची देखील नोंद करण्यात आली होती. ही सर्व माहिती अगदी संक्षिप्त रुपात लिहून ठेवण्यासाठी संक्षिप्त “संकेत लिपी” बनवण्यात आली. वरील आणि खालील समासात, एका लहानशा सूचीक्रमात, समासातील विवेचित वचनांशी संबंधीत असलेल्या भागांची यादी दिली होती.
गालील समुद्राजवळ तिबिर्यमधील मॅसोरेट्सनी सर्वात प्रसिद्ध पद्धत प्रावीण्याप्रत नेली. सा. युगाच्या नवव्या आणि दहाव्या शतकातील बेन अशेर आणि बेन नफताली यांचे कुटुंब कदाचित करायट्स, खासकरून प्रसिद्ध झाले.b या दोन्ही संप्रदायांतील उच्चार पद्धती आणि समासलिखित टीपा यांच्यामध्ये तफावत असली तरी, त्यांच्या पाठातील व्यंजनांमध्ये, संपूर्ण इब्री शास्त्रवचनांमध्ये दहा ठिकाणी फरक होण्यापेक्षा कमी ठिकाणी फरक आहे.
बेन अशेर आणि बेन नफताली या मॅसोरेट्सच्या दोन्ही संप्रदायांनी त्यांच्या काळातील मूळग्रंथपाठाच्या ज्ञानात बरीच भर घातली. मैमोनाईड्सने (१२ व्या शतकातील एक प्रभावी तालमुदीक विद्वान) बेन अशेरच्या पाठाची प्रशंसा केल्यानंतर, इतरांनी त्याला विशेष आवड दर्शवली. लोकांनी त्याला इतकी आवड दाखवल्यामुळे बेन नफतालीची हस्तलिखिते आज आढळत नाहीत. जे काही शेष आहे ते केवळ त्या दोन संप्रदांतील मतभेदांच्या याद्या तेवढ्या उरल्या आहेत. उपरोधिकपणे, मैमोनाईड्सचे विवेचन, परिच्छेदांमध्ये जागा सोडणे यासारख्या लेखनशैली योग्यतेशी संबंधीत होते, अचूक संचाराच्या अधिक महत्त्वपूर्ण पैलूंशी संबंधीत नव्हते.
आपल्याला “शुद्ध” मॅसोरेटीक पाठ मिळेल का?
आज उपलब्ध असलेले कोणते कोडेक्स “शुद्ध” आहे यावर विद्वानांमध्ये पुष्कळ वाद आहेत, जणू काय तेच म्हणजे बेन अशेर पाठ, आपल्याला “खरा” मॅसोरेटीक पाठ देईल. खरे पाहता, अद्वितीय, “शुद्ध” आणि प्रामाण्ययुक्त असा एकही मॅसोरेटीक पाठ नव्हता. उलट पुष्कळ मॅसोरेटीक पाठ होते आणि प्रत्येक पाठ इतरांपेक्षा थोडासा वेगळा होता. सर्व कोडेक्स, मिश्रित पाठ आहेत ज्यामध्ये बेन अशेर आणि बेन नफताली लिखाणांचा समावेश आहे.
इब्री शास्त्रवचनांच्या कोणत्याही भाषांतरकारासमोर असलेले काम आज कठीण आहे. त्याला केवळ इब्री पाठाशी परिचय असून चालणार नाही तर, नकलाकारांच्या चुकीमुळे किंवा इतर कारणांमुळे जेथे जेथे पाठात फेरफार केला आहे त्या सर्व तर्कशुद्ध विकल्पांशी परिचित असले पाहिजे. विविध मॅसोरेटीक पाठ आधार ठरत असले तरी, त्याला व्यंजनात्मक पाठाच्या अति प्राचीन आणि कदाचित जास्त अचूक आवृत्तीचे तर्कशुद्ध प्रतिनिधीत्व करणाऱ्या इतर साधार उगमांना विचारात घेतले पाहिजे.
जुन्या कराराचा पाठ (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, अर्नस्ट व्रुटवीन स्पष्टीकरण देतात: “एखादा कठीण उतारा असल्यास, आपण सर्व वेगवेगळे लिखाण एकत्र करून, जसे की कधी इब्री पाठ, किंवा कधी सेप्ट्युजेंट, किंवा अरेमिक टारगम या लिखाणांपैकी सर्वात सोपा उलगडा पुरवते असे भासवणारे कोणतेही एखादे लिखाण निवडू शकत नाही. मूळ ग्रंथ चिन्हे सारख्याच प्रमाणात विश्वसनीय नसतात. प्रत्येक चिन्हाला त्याची विशेष लक्षणे व स्वतःचा विशिष्ट इतिहास असतो. अपुरा किंवा खोटा उलगडा टाळण्याची आपली इच्छा आहे तर आपल्याला या चिन्हांशी परिचित असणे आवश्यक आहे.”
यहोवाने त्याचे वचन जपून ठेवले आहे या पूर्ण आत्मविश्वासासाठी आपल्याकडे आधार आहे. शतकांदरम्यान पुष्कळ प्रामाणिक लोकांच्या एकत्र प्रयत्नांमुळे, बायबलच्या संदेशाचा महत्त्वाचा भाग, मजकूर आणि सर्व सविस्तर माहिती आज सुलभ आहे. अक्षरांमध्ये किंवा शब्दांमध्ये झालेला थोडासा फरक यामुळे शास्त्रवचनांना समजण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणाम झालेला नाही. आता, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, आपण देवाचे वचन बायबल याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करणार का?
[तळटीपा]
a इस्राएल राष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या पुष्कळ यहुद्यांना इब्री भाषा अस्खलितपणे वाचता येत नसल्यामुळे, अशा यहुदी समाजांना, जसे की इजिप्तमधील अलेक्झॅन्ड्रीया, प्रादेशिक भाषेत बायबलचे भाषांतर करण्याची गरज भासली. ही गरज पूर्ण करण्यासाठी, सा. यु. पू. तिसऱ्या शतकामध्ये ग्रीक सेप्ट्युजेंट भाषांतर तयार करण्यात आले. हे भाषांतर, पाठाची तुलना करण्यासाठी महत्त्वपूर्ण उगम ठरणार होते.
b सा. युगाच्या ७६० या वर्षी, करायट्स नावाच्या एका यहुदी गटाने शास्त्रवचनांना काटेकोर निष्ठा दाखवण्याची निक्षून मागणी केली. “तोंडी नियम” आणि तालमूद याविषयी रब्बींचा अधिकार नाकारून त्यांच्याकडे बायबलच्या पाठाचे पद्धतशीर संरक्षण केल्याचे मोठे कारण होते. या गटातील विशिष्ट कुटुंबे कुशल मॅसोरेटीक नकलाकार झाले.
[२६ पानांवरील चित्रं]
अलेप्पो कोडेक्समध्ये मॅसोरेटीक पाठ आहे