निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची माझी इच्छा कायमची तृप्त होईल
डॉरथी कॉनली यांच्याद्वारे कथित
मी लहान होते तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की मला नरकात जावं लागेल. का, तर मी एक ॲबॉरिजिन आहे म्हणून. त्याच्या कितीतरी वर्षांनंतर, १९३६ साली मी एका भाषणाचे रेकॉर्डिंग ऐकले; या भाषणाने नरकाचा अग्नी पार विझवला आणि त्या दिवसापासून माझ्या हृदयात एक नवी ज्योत तेवू लागली. आज ती ज्योत पूर्वीपेक्षा आणखी तेजस्वी झाली आहे. मी असं का म्हणते ते सांगण्याआधी तुम्हाला स्वतःविषयी थोडं सांगते.
माझा जन्म १९११ च्या सुमारास झाला. “सुमारास” म्हणते कारण त्याकाळात ॲबॉरिजिन लोकांना तारखांचं, जन्म नोंदणीपत्र वगैरेचं काही महत्त्व नव्हतं. माझे आईवडील कष्टाळू आणि देवभीरू होते. ऑस्ट्रेलियातील मध्य क्वीन्सलँडच्या राज्यात निसर्गरम्य कारनारवन पर्वतांच्या कुशीत स्प्रिंगश्युअर नावाच्या लहानशा खेड्यात आम्ही राहायचो.
माझ्या वडिलांना एका गोऱ्या लोकांच्या कुटुंबाने लहानाचे मोठे केले; लहानपणी त्यांच्यावर रोमन कॅथलिक धर्माचे संस्कार झाले. तरीसुद्धा, माझ्यावर मात्र माझ्या ॲबॉरिजिन आईवडिलांनी आमचे रुढीगत संस्कार केले आणि पृथ्वीवर प्रेम करायला मला शिकवलं. आम्ही कांगारू, एमू पक्षी, कासव, साप यांची शिकार करायचो, मासे आणि मोठ्या अळ्या (खाद्य म्हणून वापरले जाणारे सुरवंट) देखील पकडायचो. पण मी एमू कधीच खात नसे. आमच्या घरात फक्त मला हा पक्षी खाण्याची मनाई होती कारण माझं स्वतंत्र गणचिन्ह (टोटेम) एमूच होतं. ॲबॉरिजिन परंपरा किंवा “स्वप्नकाल” (ड्रीमटाईम) यानुसार जमातीतल्या प्रत्येक सदस्याचं एक स्वतंत्र गणचिन्ह असायचं आणि मग कुळीच्या आणि जमातीच्या लोकांद्वारे त्या विशिष्ट वस्तूची मनाई केली जात असे.
गणचिन्हाशी संबंधित रितीरिवाज अंधश्रद्धेवर आधारित असले तरीसुद्धा ही मनाई करण्यामागचा उद्देश असा होता की त्यामुळे जीवन किती पवित्र आहे याची आठवण व्हावी. ॲबॉरिजिन लोक नुसतीच गंमत म्हणून प्राण्यांना मारत नाहीत. लहानपणी एकदा माझ्या वडिलांनी मला जिवंत नाकतोड्यांचे हातपाय तोडताना पकडलं होतं; तेव्हा ते इतके भडकले की माझी तर भीतीनं गाळण उडाली होती. मला अजूनही आठवतं ते म्हणाले होते, “किती दुष्ट आहेस तू! देवाला अशा क्रूरपणाचा वीट आहे, हे तुला माहीत नाही का? तुला कुणी असं केलं तर?”
आम्ही असंख्य अंधविश्वास पाळत होतो. उदाहरणार्थ, विली वॅगटेल (एक लहानसा पक्षी) आमच्या झोपड्यांच्या आसपास दिसला तर काहीतरी वाईट घडणार असं आम्ही समजायचो; किंवा आसपास कुठं झाडाच्या बुंध्यावर दिवसा घुबड बसलेलं दिसलं तर कुणीतरी मरणार असा आम्ही त्याचा अर्थ लावायचो. स्वप्नांचेही विशिष्ट शुभाशुभ अर्थ लावले जायचे. उदाहरणार्थ, स्वप्नात गढूळ पाणी दिसलं तर त्याचा अर्थ कुळीतलं कुणीतरी आजारी आहे. पण पाण्यातनं चिखल निघत असला तर मग कुणीतरी मेलं असा त्याचा अर्थ होई. आम्ही कॅथलिक होतो खरे, पण आदिवासींच्या अंधश्रद्धा आम्ही तरीही मानायचो.
घरात आम्ही ॲबॉरिजिन भाषा देखील बोलण्याचं सुरूच ठेवलं होतं. अर्थात, ही भाषा आता इतर बऱ्याच भाषांसारखी जवळजवळ नामशेष झाली आहे. पण बायबलविषयी इतरांशी बोलताना मला तिचा उपयोग होतो. सहसा मी इंग्रजीत किंवा या भागात बोलल्या जाणाऱ्या मिश्रित इंग्रजी भाषेतच बोलते.
सुरवातीचे मोलाचे संस्कार
मी दहा वर्षांची असेन, तेव्हा आमचं कुटुंब स्प्रिंगश्युअरपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुरंढोरं पोसण्याच्या “स्टेशनवर” किंवा “रॅन्चवर” (कुरणावर) राहत होतं. दररोज मला काही किलोमीटर पायी चालून बंगल्यावर घरगुती कामं करण्यासाठी जावे लागत असे. माझा दररोजचा पगार म्हणजे एक “बिली” (लहानसे भांडे) भरून दूध आणि एक पावाची लादी. आमचे कुटुंब झाडाच्या सालीपासून बनवलेल्या ॲबॉरिजिन लोकांच्या परंपरागत झोपड्यांमध्ये राहात असे. पाऊस आला की आम्ही जवळपासच्या गुहांमध्ये रात्र काढायचो. हे असं खडतर जीवन मला त्रासदायक वाटायचं का? नाही. ॲबॉरिजिन लोक कितीतरी शतकांपासून अशा पद्धतीने जगत होते आणि आम्ही ही पद्धत स्वीकारली होती.
खरं तर, मला ऐषारामाचं जीवन मिळालं नाही याचा मला आनंदच वाटतो; शिवाय, माझ्या प्रेमळ आईवडिलांनी मला कष्ट करायला आणि निसर्गावरच गुजराण करायला शिकवलं याचाही मला आनंद वाटतो. १९३४ साली, आम्ही क्वीन्सलँड राज्यात वूराबिन्डाजवळ ॲबॉरिजिन लोकांसाठी असणाऱ्या विशेष राखीव क्षेत्रात राहायला गेलो; यानंतर लगेचच, मला पहिल्यांदा घर सोडून पश्चिमेकडील राज्यांत गुरामेंढरांच्या स्टेशन्सवर मोलकरीण म्हणून वरची कामं करण्यासाठी जावं लागलं. शेवटी कामाच्याच निमित्तानं पूर्व भागात रॉकहॅम्पटन या समुद्रतटावर वसलेल्या शहराच्या जवळच एका ठिकाणी मला जावं लागलं. तेथेच एका आयरिश गृहस्थाचे सुपुत्र म्हणजेच माझे पती, मार्टिन कॉनली मला भेटले; पण आता ते या जगात नाहीत. आमचे लग्न १९३९ साली झाले होते.
बायबलमधील सत्याचे शिक्षण
मला पूर्वीपासूनच बायबलविषयी आदर होता. मी किशोरवयात असताना आमच्या स्टेशनच्या मालकीणबाई आम्हा मुलांना, म्हणजे ॲबॉरिजिन आणि गोऱ्या अशा सर्व मुलांना गोळा करून आम्हाला येशूच्या गोष्टी सांगायच्या. “बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका,” या येशूच्या शब्दांचा त्यांनी आम्हाला एकदा अर्थ समजावून सांगितला. (मत्तय १९:१४) नरकात जावं लागणार असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर पहिल्यांदाच मला आशेचा किरण दिसू लागला.
नंतर, मी ते नरकात अग्नी नाही असं सांगणारं भाषण ऐकलं, ज्याविषयी मी सुरवातीला उल्लेख केला होता. ते ऐकल्यापासून माझ्या मनात विचार घोळत होते, पण त्यापुढे माझा यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्कच आला नाही, तो थेट १९४९ सालापर्यंत. तेव्हा आम्ही रॉकहॅम्पटनच्या पश्चिमेकडे २५० किलोमीटर अंतरावर एमरल्ड इथं राहात होतो. त्याच दरम्यान आर. बेनेट ब्रिकेलa हे आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला बायबलविषयी सांगितलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा बेन त्या भागात यायचे तेव्हा तेव्हा आमच्याच घरी मुक्काम करायचे. आम्हा सर्वांना, म्हणजे माझ्यासोबतच मार्टिनना आणि आमच्या चार मुलांना देखील बेनविषयी फार आदर होता. मार्टिनना बायबलच्या संदेशाबद्दल आवड नव्हती, मात्र ते साक्षीदारांचा आणि विशेषतः बेन यांचा नेहमी आदरसत्कार करायचे.
बेन यांनी मला बायबल अभ्यासाची कितीतरी पुस्तकं दिली, पण मुख्य समस्या अशी होती की मला वाचता येत नव्हतं. त्यामुळे बेन मुलांना आणि मला बायबल आणि बायबलची पुस्तकं हळूहळू वाचून दाखवू लागले, आणि वाचता वाचता ते आम्हाला अर्थही समजावून सांगायचे. बेन आमच्या पाळकांपेक्षा किती वेगळे आणि किती चांगले होते; पाळक तर फक्त त्यांचे ठरलेले धार्मिक विधी पार पाडायचे, पण ते झाल्यावर पाच मिनिटं बसून आम्हाला वाचायला शिकवावंसं त्यांना कधी वाटलं नाही! बेननी आम्हाला बायबलमधून समजावून सांगितलं की साऱ्या जगातले आणि माझे स्वतःचे लोक देखील ज्या वेगवेगळ्या अंधश्रद्धांमध्ये फसले आहेत, त्या सैतान आणि त्याचे दुरात्मे यांच्याकडून आल्या आहेत. तेव्हापासून “सत्य तुम्हाला बंधमुक्त करील,” या शब्दांचा अर्थ मला आणखी चांगल्याप्रकारे कळू लागला!—योहान ८:३२.
देवाच्या आज्ञेत राहणाऱ्यांसाठी तो पृथ्वीवर एक परादीस आणणार आहे हे समजलं तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि त्याहूनही जास्त मी मृत लोकांचं पुनरुत्थान होण्याची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहू लागले; माझ्या आईचा १९३९ साली आणि वडिलांचा १९५१ साली मृत्यू झाला होता. ज्या दिवशी मी पुन्हा एकदा त्यांना बिलगून, त्यांना अतिशय प्रिय असणाऱ्या या निसर्गरम्य पृथ्वीवर त्यांचे पुन्हा स्वागत करीन, तो दिवस पाहण्यासाठी कधीकधी मी खूप अधीर होते. यहोवा देव आणि त्याचे राज्य याविषयी त्यांना शिकवण्याचा अनुभव देखील किती आनंददायक असेल!
निरक्षर प्रचारक
माझं बायबलचं ज्ञान वाढू लागले तसतशी मला इतर लोकांना त्याविषयी सांगण्याची हुरहूर लागली. नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना तर मी सांगायचेच पण तेवढ्यावर माझं समाधान होत नसे. त्यामुळे पुढच्या वेळी बेन एमरल्डला आले तेव्हा मी मुलांना तयार केलं आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर प्रचार करायला निघालो. त्यांनी मला लोकांशी सोप्या भाषेत कसं बोलायचं ते दाखवलं आणि प्रार्थना करून यहोवावर विसंबून राहण्याचं शिकवलं. मला फार चांगल्याप्रकारे बोलता येत नव्हतं हे खरं आहे, पण मी मनापासून बोलायचे.
मला वाचता येत नाही हे घरमालकांना सांगूनच मी सुरवात करायचे; आणि मग बायबलमधून मी दाखवलेली वचने त्यांना वाचायला सांगायचे. ही वचने मी तोंडपाठ केली होती. या भागात अधिककरून गोरे लोकच राहात असल्यामुळे बरेच जण माझ्याकडे आश्चर्यानं पाहायचे, पण कुणी मला वाईट वागणूक दिली नाही. हळूहळू, मला वाचता येऊ लागलं. मग माझा आत्मविश्वास वाढला आणि आध्यात्मिक दृष्टीनेही माझी प्रगती झाली.
माझं पहिलं अधिवेशन
मार्च १९५१ मध्ये मी यहोवाला माझं जीवन समर्पित केलं; तेव्हाच माझ्या जीवनातल्या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या: पाण्याचा बाप्तिस्मा आणि यहोवाच्या साक्षीदारांचं माझं पहिलं अधिवेशन. पण त्याच्यासाठी मला सिडनीसारख्या मोठ्या शहरी जावे लागणार होते, आणि माझ्यासारख्या खेडवळ बाईसाठी हे काम काही साधंसोपं नव्हतं. त्यातल्या त्यात, माझ्याजवळ ट्रेनचं तिकीट घ्यायलाही पैसे नव्हते. करावे तरी काय?
तिकिटाचे पैसे मिळवण्यासाठी मी जुगार खेळण्याचं ठरवलं. ‘आपण यहोवासाठीच हे करत असल्यामुळे, तो आपल्याला नक्कीच मदत करील,’ असे म्हणून मी स्वतःची समजूत घातली. दोनतीन डावांतच मला खात्री पटली की तो मला मदत करतोय कारण जाऊन परत येण्याकरता पुरतील इतके पैसे माझ्याजवळ जमले.
बेनना मी सिडनीला जाणार असल्याचं माहीत होतं, त्यामुळे पुढच्या वेळी ते आमच्याकडे आले तेव्हा माझ्याजवळ पुरेसे पैसे आहेत की नाही असं त्यांनी मला विचारलं. मी उत्तर दिलं, “हो हो, आहेत ना! मी जुगार खेळून पुरेसे पैसे मिळवले!” माझं हे उत्तर ऐकून त्यांचा चेहरा इतका काही पाहण्यालायक झाला की आपण काहीतरी चुकीचं बोललो हे मला लगेच कळलं. पण तरी आपली बाजू मांडायला मी म्हणाले: “का, काय झालं? मी चोरले तर नाहीत!”
धक्क्यातून थोडं सावरल्यावर, बेननी प्रेमानं समजावून सांगितलं की ख्रिस्ती लोक जुगार का खेळत नाहीत आणि मग मला धीर देण्यासाठी म्हणाले: “तुमची चूक नाही. मी तुम्हाला आधी सांगायला हवं होतं.”
मला दाखवलेला आपलेपणा
मार्च २२-२५, १९५१ च्या त्या चार दिवसांच्या अधिवेशनात मी पहिल्यांदाच इतक्या साक्षीदारांना भेटले. बेन यांच्याशिवाय फार थोड्या बांधवांनाच मी ओळखत असल्यामुळे, आपल्याला हे सर्वजण कसे वागवतील असा मला प्रश्न पडला होता. पण माझ्या भावी आध्यात्मिक बहीणभावांनी माझं अगदी आपुलकीनं स्वागत केलं, आणि जराही दुजाभाव दाखवला नाही तेव्हा मला किती आनंद झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. मला अगदी आपल्याच लोकांत असल्यासारखं वाटलं.
माझ्या मनात त्या अधिवेशनाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, विशेषतः, त्या प्रसंगी बॉटनी बे येथे बाप्तिस्मा घेतलेल्या १६० जणांपैकी मीही एक असल्यामुळे. ऑस्ट्रेलियन ॲबॉरिजिन लोकांपैकी यहोवाची साक्षीदार बनणारी मी पहिलीच होते. रविवारच्या वृत्तपत्रात आणि सिनेमा हॉल्समध्ये दाखवल्या जाणाऱ्या बातमीपटातही माझे चित्र झळकले.
गावातली एकटी साक्षीदार
सिडनीहून परतल्यावर एका महिन्याने आम्ही क्वीन्सलँडच्या वायव्य दिशेला असणाऱ्या माउन्ट आयझा या गावात राहायला गेलो; या गावात खाणकाम चालायचं. आम्ही गावाबाहेर असणाऱ्या एका प्लॉटवर केअरटेकर म्हणून सहा वर्षे एका शेडमध्ये राहिलो. जवळच्या जंगलातून तोडलेल्या लाकडापासून आम्ही त्या शेडला भिंती केल्या आणि छतासाठी जुने डांबराचे ड्रम कापून त्याचे पत्रे केले. मार्टिनना रेल्वेत नोकरी मिळाली, पण त्यांच्या पिण्याच्या सवयीमुळे त्यांची तब्येत खालावतच गेली. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. १९७१ साली ते वारले.
सुरवातीला माउन्ट आयझा येथे मी एकटीच साक्षीदार होते. बेन साधारण सहा महिन्यांतून एकदा यायचे कारण त्यांच्या मोठ्या प्रचार क्षेत्रात माउन्ट आयझा देखील होते. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळला जातो त्या वेळेस ते गावात असले तर ते आमच्या घरी तो साजरा करायचे; कधीकधी आम्ही बाहेर झाडाखाली हा लहानसा कार्यक्रम करायचो. बेनना स्वर्गात जाण्याची आशा असल्यामुळे त्यांच्यासाठी हा फारच खास दिवस असायचा.
सहसा बेन लवकर निघून जायचे, त्यामुळे मुलं आणि मी स्वतःहूनच प्रचार करायचो. आमच्या सोबतीला कुणी नव्हतं हे खरं आहे, पण यहोवाच्या आत्म्याची शक्ती आणि त्याची प्रेमळ संघटना आमच्या पाठीशी होती. कितीतरी वर्षांपर्यंत आमचा लहानसाच गट होता तरीसुद्धा प्रवासी पर्यवेक्षक आपल्या पत्नींसोबत उन्हातान्हात, माशा, धूळ कशाची पर्वा न करता, खाचखळग्यांच्या रस्त्यांवरून माउन्ट आयझाला फक्त आम्हाला प्रोत्साहन देण्याकरता यायचे. शिवाय, १,२०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डार्विन या सर्वात जवळच्या ठिकाणी नवीनच सुरू झालेल्या मंडळीतले साक्षीदार देखील अधूनमधून आम्हाला भेटायला यायचे.
नव्या मंडळीची स्थापना
डिसेंबर १९५३ मध्ये माउन्ट आयझा येथे एक मंडळी सुरू करण्यात आली. बेनना पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आणि त्यांच्याशिवाय मी आणि माझी मुलगी ॲन इतकीच जणं क्षेत्र सेवेत भाग घ्यायचो. पण लवकरच आणखी साक्षीदार गावात राहायला आले. आमच्या क्षेत्रातूनही नव्या शिष्यांचे भरघोस पीक निघू लागले आणि हळूहळू काही ॲबॉरिजिन लोकही येऊ लागले.
आमच्या मंडळीत सारखी वाढ होत होती आणि लवकरच सभा चालवण्यासाठी आम्हाला राज्य सभागृहाची गरज भासू लागली. १९६० सालच्या मे महिन्यात खूप कष्ट करून आम्ही आमचा स्वतःचे नवीन राज्य सभागृह बांधून पूर्ण केले. पुढच्या १५ वर्षांत दोन वेळा हे सभागृह मोठे करावे लागले. १९७० च्या मध्यापर्यंत आमच्या मंडळीत १२० जणं क्षेत्र सेवेत भाग घेऊ लागली होती आणि पुन्हा सभागृह लहान पडू लागले. त्यामुळे १९८१ साली २५० लोकांना पुरेल इतके मोठे प्रशस्त राज्य सभागृह बांधून समर्पित करण्यात आले. इतक्या लोकांची बसण्याची क्षमता असल्यामुळे याच सभागृहात आणखी मोठ्या सभा म्हणजे विभागीय संमेलने देखील घेण्यात आली आहेत.
ॲबॉरिजिन लोकांत वाढ
माउन्ट आयझा मंडळीसोबत कार्य करणाऱ्या ॲबॉरिजिन लोकांचा १९९६ साली एक ॲबॉरिजिन आणि आयलँडर गट सुरू करण्यात आला तेव्हा मला फार आनंद झाला. आयलँडर हे ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रदेशाजवळच्या बेटांवर राहणारे ॲबॉरिजिन लोक आहेत. हा स्वतंत्र गट सुरू करण्याचा एक प्रमुख उद्देश असा होता की त्यामुळे ॲबॉरिजिन लोकांना साक्ष देण्याचं कार्य आणखी चांगल्याप्रकारे पार पाडता यावं कारण त्यांच्यापैकी पुष्कळांना गोऱ्या लोकांबरोबर सहज संभाषण करणं कठीण जातं.
ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारचे जवळजवळ २० ॲबॉरिजिन गट आहेत. शिवाय, ॲडिलेड, केर्न्झ, इप्सविच, पर्थ आणि टाउन्सव्हिल या शहरांतही ॲबॉरिजिन लोकांच्या मंडळ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गटांत आणि मंडळ्यांमध्ये माझ्या स्वतःच्या कुटुंबासोबतच इतर ५०० लोक सभांना उपस्थित राहतात. ॲबॉरिजिन लोकांपैकी कमीतकमी १० टक्के प्रचारक पायनियर किंवा पूर्ण-वेळेचे सेवक आहेत!
१९७५ साली मला मधुमेह झाला आणि कितीतरी ॲबॉरिजिन लोकांना होणाऱ्या या रोगाने तेव्हापासून मलाही त्रस्त केले आहे. अलीकडे मला वाचन करणं देखील फार कठीण जाऊ लागलं आहे. तरीसुद्धा, यहोवा मला अजूनही सांभाळतो आणि आनंदी ठेवतो.
माझ्या कुटुंबाला आणि मला आध्यात्मिक मदत केलेल्या सर्व धैर्यवान सेवकांची मी अत्यंत कृतज्ञ आहे. क्वीन्सलँडच्या आऊटबॅक प्रदेशातल्या धुळकट, निर्मनुष्य रस्त्यांवरून आणि पायवाटांवरून सायकलींवर आमच्यासाठी आध्यात्मिक धन आणणाऱ्या बांधवांच्या दांडग्या उत्साहामुळे आणि त्यांच्या प्रेमामुळेच आम्हाला बायबलची सत्ये शिकून घेणे शक्य झाले. आता मी पूर्ण विश्वासाने त्या काळाची वाट पाहतेय जेव्हा पृथ्वीवरील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची माझी इच्छा कायमची तृप्त होईल.
[तळटीपा]
a बेन ब्रिकेल यांची विलक्षण जीवनकथा सप्टेंबर १, १९७२ सालच्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) नियतकालिकात पृष्ठे ५३३-६ वर प्रकाशित झाली होती.
[१३ पानांवरील नकाशा/चित्र]
पर्थ
डार्विन
केर्न्झ
टाउन्सव्हिल
माऊन्ट आयझा
रॉकहॅम्पटन
एमरल्ड
स्प्रिंगश्युअर
वूराबिन्डा
इप्सविच
सिडनी
ॲडिलेड
आता डॉरथी अशी दिसते
[११ पानांवरील चित्र]
बेन यांच्यासोबत १९५० च्या दशकात प्रचार कार्याला जाण्याआधी सराव करताना