यहोवाच्या सेवेतील समृद्ध, फलदायी जीवन
लिओ कॅलिओद्वारा कथित
ते वर्ष १९१४ होते, व फिनलंडच्या टर्कू शहरातील उपनगरात उन्हाळ्याच्या उत्तरार्धातील एक दिवस मावळत आला होता. अचानक, उद्भवलेल्या मोठ्या युद्धाच्या बातमीने शांतता भंग पावली. लवकरच त्या घटनांचा अर्थ सांगणाऱ्यांनी रस्ते भरून गेले. प्रौढांचे गंभीर चेहरे पाहून, काय होईल याचे आम्हा मुलांना आश्चर्य वाटले. मी नऊ वर्षाचा होतो, मला आठवते की, मुलांच्या शांतीच्या खेळाचे रुपांतर युद्धाच्या खेळात झाले.
फिनलंड पहिल्या जागतिक युद्धापासून (१९१४-१८) अलिप्त राहिले होते तरी, १९१८ मध्ये मुलकी युद्धाने देशाची फारच नासधूस झाली होती. राजकारणात भिन्न दृष्टिकोन असल्यामुळे नातेवाईक आणि आधी मित्र असलेल्यांनी एकदुसऱ्यांविरुद्ध हत्यारे हाती घेतली. सात जणांच्या आमच्या कुटुंबाने या द्वेषाचा अनुभव घेतला. माझे वडील, त्यांचे मत व्यक्त करण्यात स्पष्टवक्ते असल्यामुळे त्यांना अटक करुन सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. नंतर त्यांना निर्दोष ठरवण्यात आले परंतु तोपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली होती.
या खडतर काळात आमच्या कुटुंबाला भूक आणि आजार सहन करावे लागले. माझ्या तीन लहान बहीणी मरण पावल्या. टॅम्परे शहरात राहात असलेल्या माझ्या चुलत्याने आमच्या विपत्तीविषयी ऐकले व त्यांनी माझ्या आई वडिलांना व उरलेल्या आम्हा दोन मुलांना त्यांच्यासोबत राहण्याचे आमंत्रण दिले.
टॅम्परे शहरात राहात असताना काही वर्षांनंतर, मी सिल्वी नावाच्या एका सुंदर मुलीला भेटलो. तिची पार्श्वभूमी देखील माझ्यासारखीच होती. तिच्या वडिलांना मुलकी युद्धात मारले होते, व त्यानंतर पॉरी शहरातील तिच्या कुटुंबाचा निकटचा मित्र, कॉर्लो वसंतो, याने तिला, तिच्या मोठ्या बहिणीला व तिच्या आईला त्याच्या घरात बोलावले. त्याने सिल्वीच्या आईला काम मिळण्यासाठी व मुलांना शाळेत जाण्यासाठी व्यवस्था केली. नंतर, सिल्वी काम मिळण्यासाठी टॅम्परे येथे गेली, आणि तेथेच आमची भेट झाली.
माझे जीवन बदलले, ती संध्याकाळ
सिल्वीची १९२८ मध्ये माझ्याशी मागणी झाल्यावर, एके दिवशी आम्ही कॉर्लो वसंतो व त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी पॉरीचा प्रवास केला. कोणत्याही इतर घटनेचा माझ्या जीवनावर इतका निर्णायकपणे परिणाम झाला नाही. कॉर्लो हा दुडकी चाल शिकवलेल्या घोड्यांचा मालक व शर्यतीत भाग घेणारा होता, परंतु तो व्यवसाय त्याने सोडला होता. तो व त्याची पत्नी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचे आवेशी प्रचारक झाले होते. यहोवाच्या साक्षीदारांचा १९९०चा वार्षिक अहवाल (इंग्रजी), “लाखो जिवंत असलेले कधीही मरणार नाहीत” हे शब्द त्याच्या दुमजली घराच्या भिंतीवर रंगवण्यासाठी त्याने भाडे देऊन लोकांना कामाला कसे लावले, याचे वर्णन करते. वेगाने धावणाऱ्या रेल्वेतून सहज वाचता येईल इतकी मोठी ती अक्षरे होती.
त्या रात्री कॉर्लो आणि मी पहाटेपर्यंत बोललो. मी, “का? का? का?” असे प्रश्न विचारत राहिलो आणि कॉर्लोने त्याबद्दल स्पष्टीकरण दिले. अक्षरशः त्या रात्री मी पवित्र शास्त्राचे मूलभूत सत्य शिकलो. विविध शिकवणींचे स्पष्टीकरण देणाऱ्या शास्त्रवचनांना मी लिहून घेतले. नंतर घरी परतल्यावर, मी वही आणली आणि त्या शास्त्रवचनांचा शब्दन्शब्द मी लिहून काढला. मला अजूनही पवित्र शास्त्राचा परिचय नसल्यामुळे, बांधकाम करणाऱ्या ठिकाणी मी काम करत असताना तेथील लोकांना साक्ष देण्यासाठी मी त्या वहीचा उपयोग करू लागलो. खोट्या धर्माच्या शिकवणी उघड करताना, मी कॉर्लोच्या शब्दांची पुनरावृत्ती करत असल्याचे अनेकदा मला कळले की: “मित्रांनो, तुम्हाला खरेच फसवले आहे!”
कॉर्लोने मला टॅम्परेमधील एका टुमदार घराचा पत्ता दिला, जेथे ३० पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांची सभा चालली होती. तेथे दरवाज्याजवळील कोपऱ्यात घराचा मालक, बंधू ॲण्डरसनजवळ मी नमून बसत असे. माझी उपस्थिती अनियमित होती परंतु प्रार्थना मला साहाय्यक ठरली. कामात गंभीर समस्या आल्या तेव्हा, मी एकदा प्रार्थना केली: “हे देवा, या समस्यांतून सुटण्यास कृपया तू मला मदत केली तर, प्रत्येक सभेला उपस्थित राहण्याचे मी तुला वचन देतो.” परंतु परिस्थिती अधिकच वाईट झाली. यहोवावर मी अटी लादत असल्याचे मला नंतर कळले, यामुळे मी माझ्या प्रार्थनेत असा बदल केला: “काहीही झाले तरी मी प्रत्येक सभेला उपस्थित राहीन असे मी तुला वचन देतो.” त्यानंतर माझ्या विपत्त्या कमी झाल्या, व मी सभेला नियमित उपस्थित राहणारा झालो.—१ योहान ५:१४.
आधीच्या वर्षातील आमची सेवा
सिल्वी आणि माझा १९२९ मध्ये विवाह झाला, व १९३४ मध्ये आम्ही दोघांनीही, यहोवाला आमच्या जीवनाचे समर्पण करून पाण्याने बाप्तिस्मा घेतला. त्या दिवसातील आमच्या सेवेत, लोकांच्या घरी ग्रामोफोन आणि तबकडी घेऊन पवित्र शास्त्रावर एक भाषण मोफत सादर करू शकतो का त्याविषयी दयाळूपणे विचारणे या गोष्टींचा समावेश होता. लोक अनेकदा आम्हाला घरात बोलावत, व ध्वनीमुद्रित केलेले भाषण ऐकल्यावर, ते संभाषणात सहभाग घेत व आमच्या काही साहित्याचा स्वीकार करीत.
अधिकाऱ्यांच्या परवानगीने, बागेमध्ये आम्ही हीच पवित्र शास्त्र भाषणे ध्वनिवर्धक यंत्राद्वारे सादर केली. शिवाय उपनगरात आम्ही दूरध्वनिक्षेपक यंत्राला धाब्यावर किंवा धुराड्याच्या वरील भागाला अडकवत होतो. इतर प्रसंगी, तळ्याच्या समोर मोठ्या संख्येने जमलेल्या शहरातील लोकांना ते ऐकवत असू. आम्ही नावेत, फक्त ध्वनिवर्धक यंत्र घेत असू, व नाव किनाऱ्यावरून हळूहळू वल्हवित जात असू. रविवारी खेडेगावात प्रचार करण्यासाठी, आम्ही आमचे ध्वनिवर्धक यंत्र व भरपूर साहित्याने सज्ज होऊन बसने प्रवास केला.
आमचा विश्वासाची पारख करणारा एक बदल
मी, पायनियर या नात्याने पूर्ण-वेळेच्या सेवेत १९३८ मध्ये पदार्पण केले, परंतु गवंड्याचे काम देखील मी करत होतो. पुढील वसंत ऋतुत, मला संस्थेच्या शाखा दप्तरातून, ज्याला आता विभागिय पर्यवेक्षक म्हटले जाते, ते फिरते सेवक होण्याविषयीचे निमंत्रण आले. त्याचा स्वीकार करणे माझ्यासाठी सोपे नव्हते, कारण टॅम्परे मंडळीसोबत कार्य करण्यात मला आनंद वाटत होता. शिवाय आमचे स्वतःच्या मालकीचे घर होते, आम्हाला सहा वर्षांचा मुलगा, ऑर्टो होता जो लवकरच शाळेत जाणार होता; व सिल्वी दुकानात विक्रीचे काम करत होती जे काम तिला आवडत होते. तरीसुद्धा, एकत्र मिळून विचार केल्यावर, राज्य सेवेच्या या पुढील सुसंधीचा मी स्वीकार केला.—मत्तय ६:३३.
त्यानंतर आणखी एका कठीण काळाची सुरवात झाली. सोविएत टोळी फिनलंडवर चाल करून आल्यावर नोव्हेंबर ३०, १९३९ मध्ये युद्ध सुरू झाले. हिंवाळी युद्ध म्हटलेले ते युद्ध मार्च १९४० मध्ये फिनलंड शांततेचा करार करण्यास सहमती दाखवूपर्यंत चालले. मला आठवते त्याप्रमाणे, तो अतिशय थंड हिंवाळा होता, व जणू निसर्गही युद्धाला गेल्यासारखे वाटत होते. तपमापकाने शुन्य सेंटिग्रेडच्या ३० अंशाखाली नोंद दाखवली त्या हवामानात एका मंडळीकडून दुसऱ्या मंडळीकडे जाण्यासाठी मी सायकलवर प्रवास केला!
फिनलंडमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर १९४० मध्ये बंदी घातली गेली. त्यानंतर अनेक तरुण फिनिश साक्षीदारांना तुरुंगात टाकण्यात आले व अमानुष परिस्थितीमध्ये राहण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. मी दुसऱ्या महायुद्धाच्या संपूर्ण कालावधीत, म्हणजे, १९३९ ते १९४५ पर्यंत, मंडळ्यांमध्ये सेवा करू शकलो याबद्दल फार कृतज्ञ आहे. हे करण्यासाठी अनेकदा मला सिल्वी आणि ऑर्टो पासून महिन्यांच्या काळाकरता दूर राहण्याची गरज होती. शिवाय, बेकायदेशीर कार्य चालू ठेवण्याबद्दल अटक केले जाण्याची सतत भीती देखील होती.
पेटी, प्रकाशनांची थैली, ग्रामोफोन व तबकडीचे ओझे लादलेली सायकल मी चालवत असल्याचे ते दृश्य फारच विचित्र वाटत असेल. ग्रामोफोन तबकडी वागवत असल्याचे एक कारण म्हणजे, समजा अटक केली तर, रशियासाठी टेहळणी करणारा मी छत्रीधारी सैनिक नाही हे सिद्ध करण्याचे होते. मी असा वाद करू शकलो असतो की; छत्रीधारी सैनिक असतो तर, उडी मारताना तबकडी मोडली असती, नाही का.
तरीसुद्धा, हेरांविषयी इशारा दिलेल्या शेजारच्या वसाहतीला भेट देत असताना, एकदा साक्षीदारांच्या कुंटुंबाचा माझ्याविषयी गैरसमज झाला. हिंवाळ्यातील काळोख्या रात्री मी त्यांचे दार ठोठावले, व दार उघडण्यासाठी त्यांनाही अतिशय भीती वाटली. यामुळे मी ती रात्र धान्याच्या कोठारातील गवतात गरम राहण्यासाठी घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी गैरसमज दूर झाला, व त्यानंतरच्या माझ्या भेटीत घरातील त्या सदस्यांनी मला अधिक चांगल्याप्रकारे आदरातिथ्य दाखवले असे मी मुद्दाम सांगू इच्छितो!
युद्धाच्या वर्षांमध्ये, मध्य आणि उत्तरेकडील फिनलंड येथील मंडळ्यांमध्ये फक्त बंधू जोहान्स् कोशकिनन व मी सेवा केली. आम्हा प्रत्येकाला ६०० किलोमीटरच्या मोठ्या प्रदेशाची काळजी घ्यावयाची होती. आम्हाला अनेक मंडळ्यांना भेट द्यावयाची असल्यामुळे प्रत्येक मंडळीत दोन किंवा तीन दिवसच थांबावे लागत होते. रेल्वे क्वचित एकदा वेळेवर येत, शिवाय बससेवा कमी असल्यामुळे त्यांना इतकी गर्दी असे की आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचे होते तेथे आम्ही पोंहचत असू हेच आश्चर्याचे होते.
शिकस्तीने झालेली सुटका
एकदा, हिंवाळी युद्धाच्या सुरवातीला, मी हेलसिंकी येथील शाखा दप्तरात गेलो व रेल्वेने जाताना मंडळ्यांना पोहचवण्यासाठी माझ्यासोबत बंदी असलेल्या प्रकाशनाची चार वजनदार खोकी घेतली. रीहीमॉकी रेल्वे स्थानकावर असताना, हवाई हल्ल्याच्या इशाऱ्याची घोषणा झाली. रेल्वेतच सैनिकांनी त्यांचे हिमगौर कपडे घातले व उतारुंना त्वरित रेल्वे सोडून स्थानकाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेवर जाण्यास सांगितले.
मी खोक्यांचे महत्त्व सांगून सैनिकांना ते वाहून नेण्यास सांगितले. त्या चौघांपैकी प्रत्येकाने एक एक खोकं घेऊन आम्ही बर्फाच्छादित प्रदेशातून काही २०० मीटर अंतरापर्यंत पळालो. आम्ही स्वतःला जमीनीवर झोकून दिले, आणि कोणीतरी माझ्यावर ओरडले: “अरे नागरिका, थोडीसुद्धा हालचाल करू नको! बॉम्ब हल्लेवाल्यांनी थोडीसुद्धा हालचाल पाहिली तर ते आमच्यावर बॉम्बचा हल्ला करतील.” कुतूहलाने मी चेहरा वर करून आकाशाकडे पाहिले, तेव्हा २८ विमाने मी मोजली!
बॉम्बच्या स्फोटामुळे अचानक ती जमीन हादरली. स्थानकावर हल्ला झाला नव्हता तरी, आम्ही आलेल्या रेल्वेवर हल्ला झाला होता. नासाडी झालेली रेल्वे आणि वाकडे तिकडे झालेल्या रूळाचे ते दृश्य किती विचित्र वाटत होते! दुसऱ्या दिवशी खोकी घेऊन पुन्हा मी माझा प्रवास सुरू करू शकलो, व सैनिकांनी दुसऱ्या रेल्वेने त्यांचा प्रवास सुरू केला. युद्ध संपल्यावर, त्यांच्यातील एक जण साक्षीदार झाला, व त्याने मला सांगितले की, खोकी असलेल्या विचित्र नागरिकाबद्दल नंतर सैनिक बोलत होते.
काही काळानंतर बंधू कोशकिनन उत्तरेच्या फिनलंडमधील रोवानिमी या लहान मंडळीत सेवा करण्यासाठी प्रवास करत असताना, रेल्वेतून उतरण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगात बंद करण्यात आले, तेथे त्यांना अतिशय वाईट वागणूक मिळाली. त्याच मंडळीत सेवा करण्याची माझी पाळी आली तेव्हा, कोइव्ह्यू या लहान स्थानकावर उतरण्याची मी व्यवस्था केली. बहीण हेल्मी पाल्लारी हिने दुधाची ने-आण करणाऱ्या गाडीने माझी जाण्याची व्यवस्था केली. रोवानिमी मंडळीतील माझी भेट यशस्वी झाली. परंतु सोडताना मला अडचणींचा अनुभव घ्यावा लागाला.
मला व माझ्या सोबत्याला, रेल्वे स्थानकाकडील आमच्या रस्त्यावर, जाणा-येणाऱ्यांची कागदपत्रे तपासणाऱ्या दोन लष्करी अधिकाऱ्यांचा सामना करावा लागला. मी म्हटले, “त्यांच्याकडे पाहू नको. तुझी नजर सरळ ठेव.” ते तिथे नाहीत असे समजून आम्ही त्या दोघांच्या मधून चालत गेलो. नंतर ते आमचा पाठलाग करत आले. शेवटी, रेल्वे स्थानकावरील गर्दीमुळे मी त्यांच्या नजरेआड होऊन चालत्या रेल्वेत उडी मारली. त्या दिवसातील प्रवासी कार्यात खळबळजनक घटनांची उणीव नव्हती!
एकदा मला अटक झाली व नागरिकांची नोंदणी करून सक्तीने लष्करातील कामाकरता निवड करणाऱ्या मंडळाकडे नेण्यात आले. मला युद्धभूमीच्या अग्रभागी पाठवण्याचा त्यांचा हेतू होता. परंतु टेलिफोनची बेल वाजली, व माझी मुलाखत घेण्याच्या तयारीत असलेल्या लष्करी अधिकाऱ्याने उत्तर दिले. फोनवरील तिकडचा आवाज मी ऐकू शकत होतो, तो ओरडला: “अरे तुम्ही अशा रोगट व निरर्थक माणसांना का पाठवत आहात? त्या सर्वांना तुम्ही परत पाठवून द्या. आम्हाला कामास योग्य असणाऱ्या माणसांची गरज आहे!” माझ्याजवळ असलेल्या वैद्यकीय सर्टिफिकेटवर, मला आरोग्याची समस्या असल्याचे लिहिलेले होते त्याबद्दल मला धन्यता वाटली. मी ते त्यांना दाखवले तेव्हा त्यांनी मला जाण्यास परवानगी दिली व कोणत्याही व्यत्ययाविना मी मंडळ्यामधील कार्य चालू ठेवले!
परीक्षेत मदत करणे
युद्धाचा उद्रेक वाढत असताना, माझा मित्र ऑती लॉइस्ते याला अटक करण्यात आली. त्याच्या पत्नीने मला बोलावले. त्यांच्या घरी गेल्यावर, ऑतीच्या कागदपत्रात, ध्वनिमुद्रित केलेली भाषणे शहरातील सार्वजनिक बागेत सादर करण्यासाठी स्थानिक पोलीसांनी त्याला दिलेल्या परवानगीची कागदपत्रे मला सापडली. कागदपत्रे घेऊन आम्ही कोर्टात गेलो. कागदपत्रे त्यांनी वाचून पाहिल्यावर, मी ती कागदपत्रे बंधू लॉइस्ते यांच्याकडे सोपवली. न्यायाधिशांनी ग्रामोफोन आणि ध्वनिमुद्रित केलेल्या पवित्र शास्त्रातील अनेक सादरता कोर्टाने ऐकवण्याकरता त्या आणण्यासाठी एका सैनिकाला पाठवले. ती प्रत्येक सादरता ऐकल्यावर, न्यायाधीश म्हणाले की, त्यात जे म्हटले आहे ते काही वावगे असल्याचे मला वाटत नाही.
त्यानंतर, कोर्ट निर्णय घेईपर्यंत ऑती, त्याची पत्नी व मला बाहेर वऱ्हांड्यात पाठवण्यात आले. तेथे आम्ही पुढे काय होणार याविषयीची आतुरतेने वाट पाहत थांबलो. शेवटी आम्ही असे म्हटल्याचा आवाज ऐकला: “आरोपीने, कोर्टात हजर व्हावे.” बंधू लॉइस्तेला निर्दोष ठरवले! बंधू आणि बहीण लॉइस्ते त्यांच्या स्थानिक मंडळीत, व मी माझ्या प्रवासी कार्यात जाताना यहोवासाठी आमची हृदये कृतज्ञेने भरलेली होती.
युद्ध संपते —आमची सेवा चालू राहते
युद्ध संपल्यावर आमच्या कार्यावरील बंदीला उठवले गेले, व बंधूवर्गाची तुरुंगातून सुटका झाली. माझ्या सेवेतील अनेक वर्षांमध्ये, राज्य कार्यात बहिणींनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तसेच त्यांच्या पतींना पाठिंबा दिल्याबद्दल मजवर खूप मोठी छाप पडली. विशेषपणे मी सिल्वीने केलेला त्याग व पाठिंब्याबद्दल फारच ऋणी आहे. त्यामुळे कुठलाही व्यत्यय न येता ते प्रवासी कार्य ३३ वर्षे तसेच त्यानंतर खास पायनियर या नात्याने माझी सेवा चालू ठेवू शकलो.
सिल्वी आणि मी आम्ही दोघांनीही ऑर्टोला शाळा संपल्यावर पायनियरींग सुरू करण्याचे, इंग्रजी शिकण्याचे व अमेरिकेत वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्याचे उत्तेजन दिले. तो १९५३ मध्ये गिलियड प्रशालेतून पदवीधर झाला. नंतर त्याने एवॉ हिच्याशी विवाह केला, व दोघांनीही पूर्णवेळेतील विविध प्रकारच्या सेवेत जसे की, विभागीय कार्य, बेथेल सेवा, आणि खास पायनियरींगमध्ये सहभाग घेतला. खास पायनियरींग करत असताना १९८८ मध्ये ते सिल्वी व माझी काळजी घेण्यासाठी आमच्या टॅम्परे शहरातील निवासस्थानी आले.
आमची शक्ती आता अधिकच क्षीण झालेली असली तरी, सिल्वी आणि मी, आम्हाला उत्तेजन देणाऱ्या अनेक समृद्ध आणि आशीर्वादित जीवनाचा आनंद घेतला. आम्ही पाहिलेल्या वाढीबद्दल विचार करणे अधिक फलदायक आहे. मी १९३९ मध्ये मंडळ्यांना भेट देण्यास सुरवात केली तेव्हा, फिनलंडमध्ये ८६५ राज्य घोषक होते, परंतु आता तेथे, १८,००० पेक्षाही अधिक आहेत!
मी १९३८ मध्ये पूर्णवेळेची सेवा सुरू केल्यानंतर ५५ वर्षांनी त्यातील सहभागाचा आनंद घेऊ शकेन असा मी विचार देखील केला नव्हता. उतारवय असतानाही, आमच्या प्रतिफळाकडे पाहून आम्ही यहोवाच्या सामर्थ्याने कार्य करत आहोत. आम्ही स्तोत्रकर्त्याच्या शब्दांवर भरवसा ठेवतो: “परमेश्वर [यहोवा, NW] चांगला आहे; त्याची दया सनातन आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.”—स्तोत्रसंहिता १००:५.
[२१ पानांवरील चित्रं]
लिओ आणि सिल्वी कॉर्लो यांनी १९३४ मध्ये यहोवाला त्यांचे समर्पण चिन्हांकित केले
[२३ पानांवरील चित्रं]
लिओ आणि सिल्वी त्यांच्या ६० वर्षाच्या समर्पित सेवेत पोहचत असताना घेतलेला सध्याचा फोटो