वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ११/१ पृ. २२-२७
  • पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • माझ्या प्रश्‍नांची उत्तरे
  • अटक
  • मृत्यूदंड
  • युद्धोत्तर कार्य
  • अधिक काळ एकटा नाही
  • यहोवाचा समृद्ध आशीर्वाद
  • यहोवाच्या प्रेमळ हाताखाली सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवा ज्यास पात्र आहे ते त्याला देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • माझ्या तारुण्यापासून मी सबुराईनं यहोवाची आस धरली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवानं आम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ११/१ पृ. २२-२७

पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’

इमॅन्युएल पतरकीस यांच्याद्वारे कथित

प्रेषित पौलाला एकोणीस शतकांआधी एक असामान्य आमंत्रण मिळाले: “इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर.” “लोकांना सुवार्ता” सांगण्याची ही नवी संधी पौलाने राजीखुशी स्वीकारली. (प्रेषितांची कृत्ये १६:९, १०) मला मिळालेले आमंत्रण इतके जुने नसले तरीसुद्धा सुमारे ५० पेक्षा अधिक वर्षांआधी मी नवीन क्षेत्रांमध्ये ‘भेटी देण्यास’ तयार झालो. हे मी यशया ६:८ मधील आत्म्याच्या अनुषंगाने केले जेथे लिहिले आहे: “हा मी आहे, मला पाठीव.” माझ्या अनेक दौऱ्‍यांमुळे मला अखंड पर्यटक असे टोपणनाव मिळाले, पण माझे कार्य आणि पर्यटन यात काहीच साम्य नव्हते. हॉटेलमधल्या खोलीत पोहंचल्यावर, मी कितीतरी वेळा गुडघे टेकवून त्याच्या संरक्षणाबद्दल यहोवाचे आभार मानले.

माझा जन्म जानेवारी १६, १९१६ रोजी, क्रीट येथील हायरापेत्रा येथे एका अत्यंत धार्मिक कर्मठ कुटुंबात झाला. मी लहान होतो तेव्हापासूनच माझी आई मला आणि माझ्या इतर तीन बहिणींना रविवारच्या दिवशी चर्चला नेई. पण माझ्या बाबांनी घरात राहून बायबल वाचणे पसंत केले. मी माझ्या बाबांचा आदर करतो, ते प्रामाणिक, नेक आणि क्षमाशील होते व मी नऊ वर्षांचा होतो तेव्हा त्यांचा मृत्यू झाला ज्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला.

मी पाच वर्षांचा होतो तेव्हा शाळेत एक वचन वाचल्याचे मला अजूनही आठवते: “आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी देवाच्या अस्तित्वाची घोषणा करतात.” मी मोठा होत गेलो तसतसे मला या गोष्टीची पूर्ण खात्री पटली. म्हणूनच, वयाच्या ११ व्या वर्षी मी स्तोत्र १०४:२४ वर एक निबंध लिहिण्याचे ठरवले ज्याचा विषय होता: ‘हे यहोवा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.’ निसर्गाच्या विस्मयकारक गोष्टींनी, मूळ वृक्षाच्या छायेपासून वाऱ्‍याने उडून जाणाऱ्‍या एका पंखयुक्‍त बीजासारख्या लहान गोष्टीने देखील मी मोहीत झालो. माझा निबंध देऊन एक आठवड्यानंतर माझ्या बाईंनी तो संपूर्ण वर्गाला आणि मग संपूर्ण शाळेला वाचून दाखवला. त्यावेळेला, शिक्षक कम्युनिस्ट कल्पनांविरुद्ध लढत होते व मी देवाच्या अस्तित्वाची बाजू घेत असल्याचे पाहून त्यांना आनंद वाटला. पण मला तर फक्‍त, मी निर्माणकर्त्यावर विश्‍वास प्रकट करत असल्याचा आनंद होत होता.

माझ्या प्रश्‍नांची उत्तरे

सन १९३० दशकाच्या सुरवातीला माझी यहोवाच्या साक्षीदारांसोबत पडलेली गाठ अजूनही माझ्या स्मृतीत ठळक आहे. इमॅन्यूएल लिऑनुडॉकीस क्रीटच्या सर्व गावांत व खेड्यांत प्रचार करत होते. मी त्यांच्याकडून पुष्कळ पुस्तिका घेतल्या, पण मृत कोठे आहेत? (इंग्रजी), या पुस्तिकेने माझे विशेष लक्ष आकर्षित केले. मला मृतांबद्दल इतकी भयानक भीती होती की माझे बाबा ज्या खोलीत वारले होते त्या खोलीत मी कधीच जात नव्हतो. मी ही पुस्तिका अनेक वेळा वाचून काढली व बायबल मृतांच्या स्थितीबद्दल काय शिकवते हे मला समजल्यावर माझ्या मनातून ते अंध भय नाहीसे झाले.

वर्षातून एकदा उन्हाळ्यात, साक्षीदार आमच्या गावाला भेट देत व माझ्यासाठी पुष्कळ साहित्य आणत. हळूहळू शास्त्रवचनांबद्दलची माझी समज वाढू लागली, पण मी अजूनही ऑर्थडॉक्स चर्चलाच जात होतो. परंतु, मुक्‍ती (इंग्रजी), नामक एका पुस्तकाने नवीन कलाटणी दिली. त्या पुस्तकाने यहोवाची व सैतानाची संघटना यांतील फरक स्पष्टपणे दाखवला. तेव्हापासून मी बायबलचा व माझ्या हातात पडणाऱ्‍या वॉचटावर संस्थेच्या कोणत्याही साहित्याचा आणखी नियमितपणे अभ्यास करू लागलो. यहोवाच्या साक्षीदारांवर ग्रीसमध्ये बंदी असल्यामुळे मी रात्रीच्या वेळी गुप्तपणे अभ्यास करी. तरीसुद्धा मी जे काही शिकत होतो ते इतरांना सांगण्याची मला इतकी उत्सुकता असायची की इतरांना सांगितल्याशिवाय मला चैन पडत नसे. लागलीच पोलीसांना मी हवासा झालो, साहित्यांच्या शोधासाठी वेळी अवेळी ते मला भेटी देऊ लागले.

सन १९३६ मध्ये मी पहिल्यांदा एका सभेला उपस्थित राहिलो जी १२० किलोमीटर दूर असलेल्या इरकलियॉन येथे होती. मला साक्षीदारांना भेटून अतिशय आनंद झाला. त्यांच्यातील बहुतेक जण साधारण लोक जास्तकरून शेतकरी होते, पण हेच सत्य असल्याची खात्री पटण्यास त्यांनी मला मदत केली. त्या क्षणी मी यहोवाला माझे समर्पण केले.

माझ्या बाप्तिस्म्याचा प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. सन १९३८ मध्ये एके रात्री, माझ्या दोन बायबल विद्यार्थ्यांना व मला बंधू लिऑनुडॉकीसने काळ्याकुट्ट अंधारात समुद्रकिनाऱ्‍यावर नेले. प्रार्थना केल्यानंतर, त्यांनी आम्हाला पाण्यात बुडवले.

अटक

थोडक्यात सांगायचे तर, मी प्रचार करण्यासाठी गेलो तो पहिला दिवस घटनापूर्ण होता. मी माझ्या शाळेतील एका जुन्या मित्राला भेटलो जो पाळक झाला होता, आम्ही दोघांनी एकत्र बसून खूप चांगली चर्चा केली. पण नंतर त्याने मला सांगितले, की बिशपच्या हुकूमानुसार त्याला मला अटक करायची होती. जवळच्या खेड्यातून पोलीस येण्याची आम्ही नगराध्यक्षांच्या कार्यालयात वाट पाहत बसलो होतो तेव्हा बाहेर लोकांचा समूह जमला होता. म्हणून मी कार्यालयात असलेले एक ग्रीक बायबल घेतले आणि मत्तय अध्याय २४ वर आधारित एक भाषण देण्यास सुरवात केली. पहिल्यापहिल्यांदा लोकांना ऐकण्याची इच्छा नव्हती, पण मग तो पाळक मध्ये येऊन म्हणाला: “त्याला बोलू द्या. हे आमचेच बायबल आहे.” मी तेथे जवळजवळ दीड तास बोलू शकलो. अशाप्रकारे सेवेतील माझा पहिला दिवस माझ्या पहिल्या जाहीर भाषणाचाही दिवस होता. माझे भाषण देऊन संपले तरी पोलीसांचा पत्ता नसल्यामुळे नगराध्यक्ष व पाळक या दोघांनी ठरवले की मला गावातून हाकलून लावण्यासाठी काही लोकांचा उपयोग करावा. रस्त्याच्या पहिल्या वळणावर माझ्यावर होणाऱ्‍या दगडांच्या वर्षावापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी होता होईल तितक्या जोराने पळू लागलो.

दुसऱ्‍या दिवशी दोन पोलीस आणि एक बिशप माझ्या कामाच्या ठिकाणी मला अटक करण्यासाठी आले. पोलीस ठाण्यावर मी बायबलमधून त्यांना साक्ष देऊ शकलो, पण माझ्या बायबल साहित्यांवर कायद्यानुसार बिशपचा शिक्का नसल्यामुळे, धर्मांतर करणारा व बेकायदेशीर साहित्यांचे वाटप करणारा म्हणून माझ्यावर आरोप ठेवण्यात आला. मला प्रलंबित न्यायचौकशीवर सोडण्यात आले.

माझी न्यायचौकशी एक महिन्यानंतर झाली. माझ्या बचावात मी त्यांच्या निर्दशनास आणून दिले की मी प्रचार करण्याबद्दल ख्रिस्ताच्या आज्ञेव्यतिरिक्‍त दुसरे काही करत नव्हतो. (मत्तय २८:१९, २०) न्यायाधीशाने उपरोधिकपणे मला उत्तर दिले: “अरे बाळा, ज्याने ही आज्ञा दिली त्यालाच खांबावर टांगण्यात आले. दुर्दैवाने, अशाप्रकारची शिक्षा ठोठवण्याचा मला अधिकार नाही.” परंतु, एक तरुण वकील ज्याला मी ओळखत देखील नव्हतो माझ्या वतीने उभा राहिला व म्हणाला, की इतका साम्यवाद व निरीश्‍वरवाद असताना तरुण लोक देवाच्या वचनाचा बचाव करण्यास तयार असल्याचे पाहून न्यायालयाला गर्व वाटला पाहिजे. मग तो माझ्याजवळ आला आणि माझ्या फाईलमध्ये असलेला माझा लेखी बचाव पाहून त्याने माझे अभिनंदन केले. मी लहान असल्याचे पाहून तो प्रभावित झाल्यामुळे माझा बचाव विनामूल्य करण्याची त्याने इच्छा दाखवली. कमीतकमी तीन महिन्यांच्या तुरूंगवासाच्या शिक्षेऐवजी माझ्यावर केवळ १० दिवसांचा तुरूंगवास व ३०० ड्राखमा दंड भरण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अशा प्रकारच्या विरोधाने, यहोवाची सेवा करण्याचा व सत्याचा बचाव करण्याचा माझा दृढनिश्‍चय आणखीनच बळकट केला.

दुसऱ्‍या एका प्रसंगी, मला अटक केल्यानंतर, मी बायबल किती सहजपणे हाताळत होतो ते न्यायाधिशांनी पाहिले. “तुम्ही तुमचे काम केले. आता मी याचे काय करायचे ते पाहून घेईन,” असे म्हणून त्यांनी बिशपला त्यांच्या कार्यालयातून बाहेर जाण्यास सांगितले. मग त्यांनी आपले बायबल काढले व आम्ही संपूर्ण दुपार देवाच्या राज्याविषयी बोललो. अशा प्रकारच्या प्रसंगांनी मला संकटमय परिस्थितींमध्ये टिकाव धरून राहण्यास उत्तेजन दिले.

मृत्यूदंड

सन १९४० मध्ये माझी सक्‍तीने सेनाभरती करण्यात आली पण माझ्या प्रवेशाकरता मी होकार का देऊ शकत नाही याबद्दल मी एक पत्र लिहिले. दोन दिवसांनंतर, मला अटक करण्यात आली आणि पोलीसांनी मला बेदम मारले. त्यानंतर, मग मला अल्बेनियातील फ्रन्टवर पाठवण्यात आले, तेथे मी युद्धात भाग घेण्यास नकार दिल्यामुळे मला सैनिकी न्यायालयात नेण्यात आले. सैनिकी अधिकाऱ्‍यांनी मला सांगितले, की माझे बरोबर होते की चूक हे जाणून घेण्यापेक्षा त्यांना माझ्या उदाहरणाचा इतर सैनिकांवर कोणता प्रभाव पडेल याची जास्त काळजी लागली होती. मला मृत्यूदंड देण्यात आला पण कायद्याच्या एका चुकीमुळे ही शिक्षा दहा वर्षांचा तुरूंगवास इतकी सौम्य करण्यात आल्यामुळे मला बरे वाटले. माझ्या जीवनाचे काही महिने मी ग्रीसमधील एका सैनिकी तुरूंगात अतिशय हलाखीत घालवले, ज्याचे शारीरिक दुष्परिणाम मी अजूनही भोगतो.

पण तुरूंगवासाने मला प्रचार करण्यापासून थांबवले नाही. मुळीच नाही! संभाषण अगदी सहजरीत्या चालू करता येत होते कारण पुष्कळांना प्रश्‍न पडला होता, की एक नागरिक सैनिकी तुरूंगात का होता. एका प्रामाणिक मनुष्याबरोबर केलेल्या अशाच प्रकारच्या चर्चेमुळे मी तुरूंगाच्या आवारात त्याचा बायबल अभ्यास घेण्यास सुरवात केली. अडतीस वर्षांनंतर मी याच मनुष्याला एका संमेलनात पुन्हा एकदा भेटलो. त्याने सत्य स्वीकारले होते व लेफकास नावाच्या बेटावर तो मंडळीचा पर्यवेक्षक या नात्याने कार्य करीत होता.

सन १९४१ मध्ये हिटलरच्या सैन्याने युगोस्लावियावर स्वारी केली तेव्हा आम्हाला दक्षिणेकडे दूरवर प्रेवेझा येथील एका तुरूंगात हलविण्यात आले. प्रवास करत असताना, जर्मन बाँम्बफेकी विमानाने आमच्या रक्षक जहाजावर हल्ला केल्यामुळे आम्हा कैद्यांना अन्‍न देण्यात आले नाही. माझ्याजवळचा पावाचा एक लहानसा तुकडा संपल्यानंतर, मी देवाला प्रार्थना केली: “मला मृत्यूदंडापासून वाचवल्यानंतर मी भुकेने मरावे अशी तुझी इच्छा असल्यास तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”

दुसऱ्‍या दिवशी एका अधिकाऱ्‍याने रोल कॉलच्या वेळी मला बाजूला घेतले व माझा ठावठिकाणा, माझे आईवडील कोण होते, मी तुरूंगात का आलो होतो हे समजल्यानंतर मला त्यांच्या मागे येण्यास सांगितले. त्यांनी मला गावात असलेल्या अधिकाऱ्‍यांच्या भोजनालयात नेले व पाव, चीझ आणि भाजलेली मेंढी ठेवलेल्या टेबलाकडे बोट दाखवून हवे ते घेण्यास सांगितले. पण मी त्यांना म्हणालो, की इतर ६० कैदी उपाशी असल्यामुळे माझा विवेक मला खाऊ देणार नाही. अधिकाऱ्‍याने म्हटले: “मी सर्वांनाच खाऊ घालू शकत नाही. तुझ्या बाबांनी माझ्या बाबांना सढळ हाताने मदत केली होती. म्हणून इतरांना नव्हे तर तुला मदत करण्याचे माझे नैतिक कर्तव्य आहे.” मी त्यांना म्हणालो: “असे आहे तर मग मी जातो.” त्या अधिकाऱ्‍याने जरा वेळ विचार केला आणि होता होईल तितके अन्‍न भरता येईल अशी एक मोठी पिशवी माझ्या हातात दिली.

तुरूंगात पोहंचल्यावर, मी पिशवी खाली ठेवून म्हणालो: “मित्रांनो, हे तुमच्यासाठी आहे.” योगायोगाने, आदल्या दिवशी संध्याकाळी, मी कुमारी मरियेला प्रार्थना करण्यात सहभाग घेत नसल्यामुळे इतर सर्व कैद्यांच्या दयनीय परिस्थितीस कारणीभूत होतो असा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला होता. परंतु, एक साम्यवादी माझा बचाव करण्यास आला होता. आता, मी आणलेले अन्‍न पाहिल्यावर तो इतरांना म्हणाला: “कुठे गेली तुमची ‘कुमारी मरिया?’ या मनुष्यामुळे आपण मरून जाऊ असे तुम्ही म्हणाला होता ना, पण त्यानेच आपल्यासाठी अन्‍न आणले.” मग माझ्याकडे वळून तो मला म्हणाला: “इमॅन्युएल! इकडे येऊन प्रार्थना कर.”

यानंतर काही काळातच, जर्मन सैन्य चाल करून आल्यामुळे तुरूंग रक्षक सर्व कैद्यांना मुक्‍त करून पळून गेले. मी मे १९४१ च्या अंताला अथेन्सला जाणार होतो तर त्याच्याआधी इतर साक्षीदारांना शोधण्यासाठी थेटपणे पात्रासला गेलो. तेथे मला कपड्यांचे व बूटांचे काही जोड मिळाले आणि एका पेक्षा अधिक वर्षांनंतर मला आंघोळ करायला मिळाली. जर्मनांचा ताबा समाप्त होईपर्यंत, मी प्रचार करत असताना ते मला नेहमी रोकत असत पण त्यांनी मला केव्हाही अटक केली नाही. त्यातील एक जण मला म्हणाला: “जर्मनीमध्ये आम्ही यहोवाच्या साक्षीदारांना गोळी घालतो. पण येथे आमचे सर्व शत्रू साक्षीदार असते तर किती बरे झाले असते!”

युद्धोत्तर कार्य

ग्रीसने जणू काय पुरेसे युद्ध केले नसल्यामुळे, १९४६ ते १९४९ च्या मुलकी युद्धादरम्यान पुढे त्याचे विभाजन झाले आणि परिणामी हजारोंचा मृत्यू घडला. केवळ सभांना उपस्थित राहिल्याने अटक केली जाऊ शकत होती अशा वेळी दृढ राहण्यासाठी बांधवांना खूप उत्तेजनाची आवश्‍यकता होती. कैक बांधवांना त्यांच्या तटस्थ भूमिकेबद्दल मृत्यूदंड मिळाला. परंतु असे असतानाही, पुष्कळ लोक राज्य संदेशाला प्रतिसाद देत होते व प्रत्येक आठवडी आमच्याकडे एक किंवा दोन बाप्तिस्मे होत. सन १९४७ पासून मी दिवसा अथेन्समधील संस्थेच्या कार्यालयात काम करू लागलो आणि रात्री प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने मंडळ्यांना भेटी देण्याचे काम करीत होतो.

सन १९४८ मध्ये मला संयुक्‍त संस्थानातील वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेत उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाल्याचा आनंद झाला. पण एक समस्या होती. माझ्या पूर्वीच्या दोषारोपामुळे मला पासपोर्ट मिळाला नाही. पण माझ्या एका बायबल विद्यार्थ्याची एका सेनापतीशी ओळख होती. या विद्यार्थ्यामुळे काही आठवड्यातच मला माझा पासपोर्ट मिळाला. निघायच्या काही काळ आधी, टेहळणी बुरूज नियतकालिकांचे वाटप करण्याबद्दल मला अटक करण्यात आली तेव्हा मला चिंता वाटू लागली. एका पोलीसाने मला अथेन्स येथील राज्य सुरक्षा पोलीस प्रमुखाकडे नेले. आश्‍चर्याची गोष्टी म्हणजे तो माझा शेजारी निघाला! मला धरून आणलेल्या पोलीसाने मला अटक केल्याचे कारण सांगून नियतकालिकांचा गठ्ठा त्याला दिला. माझ्या शेजाऱ्‍याने त्याच्या टेबलाच्या ड्रॉअरमधून वॉचटावर नियतकालिकांची थप्पी काढली आणि मला म्हणाला: “माझ्याकडे अलीकडील अंक नाही. मी एक प्रत घेऊ का?” अशा बाबतीत यहोवाचा हात पाहून मला किती हलके वाटले!

सन १९५० मधील गिलियडचा १६ वा वर्ग अत्युत्तम अनुभव होता. त्याच्या अंताला, मला सायप्रसला नेमण्यात आले. तेथे पाळकांचा विरोध ग्रीसपेक्षाही भयंकर असल्याचे मला लगेच आढळून आले. आम्हाला बहुतेकवेळा कर्मठ पाळकांनी चेतवलेल्या पिसाट धर्मवेड्यांच्या समूहाला तोंड द्यावे लागत असे. सन १९५३ मध्ये सायप्रसला जाण्याकरता माझ्या विसाचे नविनीकरण न केल्यामुळे मला इस्तंबुल, तुर्कस्थान येथे पुनः नेमण्यात आले. येथेही मला जास्त काळ राहता आले नाही. तुर्कस्थान व ग्रीसमधील प्रचार कार्याचे चांगले प्रतिफळ मिळत असले तरी या दोघांतील राजकीय तणावामुळे मला माझ्या दुसऱ्‍या नेमणुकीकरता—इजिप्तला जावे लागले.

मी तुरूंगात होतो तेव्हा मला स्तोत्र ५५:६, ७ वचने आठवत असत. तेथे दावीदाने रानात पळून जाण्याची इच्छा व्यक्‍त केली. एके दिवशी मीही तेथेच असेन असे मला मुळीच वाटले नाही. सन १९५४ मध्ये, ट्रेन व नाईल नदीवरून बोटीने अनेक दिवसांच्या कंटाळवाण्या प्रवासानंतर मी सरतेशेवटी माझ्या इष्ट स्थानी—सुदानमधील खार्टूम येथे पोहंचलो. मला छानपैकी आंघोळ करून झोपून जावेसे वाटत होते. पण ती दुपार होती हे माझ्या लक्षातच आले नाही. छतावरील टाकीत साठवून ठेवलेल्या पाण्यामुळे माझ्या डोक्यावरील कातडी भाजली व ती बरी होईपर्यंत मला अनेक महिने तेथील लोकांप्रमाणे भेंडाची टोपी घालावी लागली.

मला तेथे बहुतेकवेळा एकाकी वाटले, सहाराच्या मध्यभागी, जवळपासच्या मंडळीपासून सोळाशे किलोमीटर दूर अगदी एकटा पडल्यासारखे वाटत होते, पण यहोवाने मला टिकवून ठेवले व टिकून राहण्यासाठी त्याने मला बळ दिले. केव्हाकेव्हा तर अगदी अनपेक्षित लोकांकडून उत्तेजन मिळे. एके दिवशी, मी खार्टूम संग्रहालयाच्या व्यवस्थापकाला भेटलो. तो मोकळ्या मनाचा मनुष्य असल्यामुळे आमची चांगली चर्चा झाली. मी मूळचा ग्रीक आहे हे त्याला समजल्यानंतर त्याने मला संग्रहालयात जाऊन सहाव्या शतकातील एका चर्चमध्ये सापडलेल्या हस्तनिर्मितींवर कोरलेल्या काही लेखांचे भाषांतर करून त्याची मदत करू शकेन का असे विचारले. एका कोंदटलेल्या तळघरात पाच तास काम केल्यानंतर, यहोवाचे नाव कोरलेली, चार इब्री वर्ण असलेली एक बशी मला सापडली. मला झालेल्या आनंदाची कल्पना करा! युरोपमधील चर्चेसमध्ये ईश्‍वरी नाव दिसणे नवलाईची गोष्ट नाही, पण सहाराच्या मध्यभागी दिसणे सर्वात असामान्य होते!

सन १९५८ च्या आंतरराष्ट्रीय संमेलनानंतर, मला मध्य आणि निकट पूर्व तसेच भूमध्य यांतील २६ राष्ट्रांतील आणि क्षेत्रांतील बांधवांना भेट देण्याकरता परिमंडल पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले. एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर कसे पडावे हे मला बहुधा कळत नसे, पण यहोवाने नेहमी मला त्यातून बाहेर काढले.

यहोवाची संघटना विशिष्ट राष्ट्रांत एकाकी राहत असलेल्या साक्षीदारांची किती काळजी घेते हे पाहून मी नेहमी प्रभावित झालो. एके प्रसंगी मी एका भारतीय बांधवाला भेटलो जो तेलाच्या खाणीत काम करत होता. त्या राष्ट्रामध्ये तो एकटाच साक्षीदार होता हे उघड आहे. त्याच्या लॉकरमध्ये १८ विविध भाषांतील प्रकाशने होती, तो ती त्याच्या कर्मचाऱ्‍यांना देत असे. सर्व परक्या धर्मांवर कडक बंदी असलेल्या या राष्ट्रातही आपला बांधव सुवार्तेचा प्रचार करण्याची त्याची जबाबदारी विसरला नव्हता. त्याची भेट घेण्यासाठी त्याच्याच धर्मांतील एकाला पाठवलेले पाहून त्याच्या सोबत काम करणारे प्रभावित झाले.

सन १९५९ या वर्षी मी स्पेन व पोर्तूगालला भेट दिली. हे दोन्ही राष्ट्र त्या वेळेला सैनिकी हुकूमाखाली होते व यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर कडक बंदी होती. एका महिन्यात, मी शेकडोपेक्षा अधिक सभा भरवू शकलो, संकटात असतानाही धीर न सोडण्याचे बांधवांना उत्तेजन दिले.

अधिक काळ एकटा नाही

सुमारे २० वर्षांपासून अविवाहित राहून मी यहोवाची पूर्ण वेळ सेवा करत होतो, पण मला अचानक माझा कायमचा ठावठिकाणा नसलेल्या निरंतर प्रवासाचा कंटाळा आला. अशा वेळी माझी भेट ट्यूनिशिया येथे, खास पायनियर म्हणून कार्य करणाऱ्‍या ॲनी बायऑनूकी हिच्याबरोबर झाली. १९६३ मध्ये आमचा विवाह झाला. यहोवा आणि सत्याबद्दलचे तिचे प्रेम, शिकवण्याची कला व वेगवेगळ्या भाषांचे तिचे ज्ञान यासोबतच सेवेबद्दलची तिची निष्ठा, उत्तर व पश्‍चिम आफ्रिका व इटली येथील आमच्या मिशनरी व विभागीय कार्यात खरोखरच एक आशीर्वाद ठरली.

ऑगस्ट १९६५ मध्ये आम्हा दोघांना डाकार, सेनेगल येथे नेमण्यात आले. तेथे मला स्थानिक शाखा कार्यालयाची व्यवस्था करण्याचा सुहक्क मिळाला. सेनेगल राष्ट्र धार्मिक सहिष्णुतेकरता उल्लेखनीय होते. राज्यातील काही आफ्रिकन प्रमुखांपैकी या राष्ट्राचे राष्ट्रपती, लीओपॉल्ड सेनघर यांनी, मलावीचे राष्ट्रपती बांडा यांना, १९७० च्या दशकामध्ये मलावीत होणाऱ्‍या भयंकर छळादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांना पाठिंबा देणारे एक पत्र लिहिले असल्यामुळे ते उल्लेखनीय होते यात काही शंका नाही.

यहोवाचा समृद्ध आशीर्वाद

सन १९५१ मध्ये गिलियड नंतर सायप्रसला येताना मी सात सुटकेस घेऊन प्रवास केला. तुर्कस्तानला जाताना माझ्याकडे केवळ पाच होत्या. पण इतका प्रवास करायचा असल्यामुळे मला केवळ २० किलोग्रॅम (४४ पाऊंड) सामानाच्या मर्यादेची सवय करून घायची होती. यामध्ये माझ्या फाईली आणि एका ‘लहानशा’ टंकलेखन यंत्राचा समावेश होता. तेव्हा वॉच टावर संस्थेचे अध्यक्ष असलेल्या बंधू नॉर यांना एकदा मी म्हणालो: “भौतिकवादापासून तुम्ही माझे संरक्षण करता. मला फक्‍त २० किलोग्रॅम वजनाचे सामान घेऊन जीवन जगवण्यास लावता, पण मी यात समाधानी आहे.” पुष्कळ गोष्टी नसल्यामुळे मला कधीही माझ्याकडून काही हिरावून घेतले जात आहे असे वाटले नाही.

प्रवास करताना माझी एक मुख्य समस्या होती व ती म्हणजे राष्ट्रांमध्ये ये-जा करणे. एके दिवशी, बंदी असलेल्या एका देशात एक सीमाशुल्क अधिकारी माझ्या फाईली चाळू लागला. यामुळे त्या राष्ट्रातील साक्षीदारांना धोका होता, म्हणून मी माझ्या जॅकेटमधून माझ्या पत्नीचे पत्र काढले आणि त्या सीमाशुल्क अधिकाऱ्‍याला म्हणालो: “मला वाटतं तुम्हाला पत्र वाचायला आवडतात. या फाईलींमध्ये नसलेलं माझ्या पत्नीचं हे पत्र तुम्हाला वाचायला हवंय का?” त्याला लाज वाटली आणि त्याने मला जाऊ दिले.

सन १९८२ पासून मी आणि माझी पत्नी फ्रान्सच्या दक्षिणेस असलेल्या नीस येथे मिशनरी म्हणून कार्य करीत आहोत. माझ्या ढासळणाऱ्‍या तब्येतीमुळे पूर्वीप्रमाणे मी आता करू शकत नाही. परंतु आमचा आनंद कमी होत चालला आहे असा याचा अर्थ होत नाही. ‘प्रभूमध्ये आमचे श्रम व्यर्थ नाहीत,’ हे आम्ही पाहिले आहे. (१ करिंथकर १५:५८) अनेक वर्षांपासून मला ज्यांच्यासोबत अभ्यास करण्याचा सुहक्क मिळाला होता त्या अनेकांना तसेच माझ्या कुटुंबातील ४० पेक्षा अधिक सदस्यांना यहोवाची सेवा विश्‍वासूपणे करताना पाहण्याचा आनंद मला लाभला आहे.

‘भेटी देण्याच्या’ माझ्या जीवनामुळे मला जे त्याग करावे लागले त्याचा मला मुळीच खेद वाटत नाही. कारण, आपण करत असलेल्या कोणत्याही त्यागाची तुलना आपण यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या दोघांनी आपल्यासाठी जे केले त्याच्यासोबत करू शकत नाही. जेव्हा मी, सत्य मिळाल्यापासूनच्या गत ६० वर्षांकडे मागे वळून पाहतो तेव्हा मी म्हणू शकतो, की यहोवाने मला विपुल आशीर्वाद दिला आहे. नीतिसूत्रे १०:२२ म्हणते, “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो.”

यहोवाचे “वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे,” यात काहीच संदेह नाही. (स्तोत्र ६३:३) उतारवयातील गैरसोयी वाढत असल्यामुळे मी माझ्या प्रार्थनांमध्ये नेहमी ईश्‍वरप्रेरित स्तोत्रकर्त्याच्या शब्दांचा उल्लेख करतो: “हे परमेश्‍वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नको. कारण, हे प्रभू, परमेश्‍वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्‌भुत कृत्ये वर्णिली आहेत. . . . मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.”—स्तोत्र ७१:१, ५, १७, १८.

[२५ पानांवरील चित्रं]

आज, माझी पत्नी ॲनी हिच्यासोबत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा