वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ५/१ पृ. २५-२९
  • यहोवाच्या प्रेमळ हाताखाली सेवा करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या प्रेमळ हाताखाली सेवा करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आजारपण आशीर्वाद ठरते
  • थोडक्यात बचावणे
  • आध्यात्मिक प्रगती
  • अनेकदा अटक व तुरुंगवास
  • वेगळ्या प्रकारची परीक्षा
  • चौकस असणे
  • विश्‍वासू जोडीदार मिळणे
  • बेथेल सेवा
  • पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “सोन्याऐवजी मला हिरे सापडले”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवा ज्यास पात्र आहे ते त्याला देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • विश्‍वसनीय देवाची सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ५/१ पृ. २५-२९

यहोवाच्या प्रेमळ हाताखाली सेवा करणे

लॉम्प्रोस झुम्पोस यांच्याद्वारे कथित

मी कोंडीत सापडलो होतो: माझ्या श्रीमंत काकांच्या स्थावर संपत्ती मालमत्तेवर व्यवस्थापक होण्याचा त्यांचा प्रस्ताव स्वीकारून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक समस्या सोडवाव्यात—अथवा यहोवा देवाचा पूर्ण वेळेचा सेवक व्हावे, असे दोन पर्याय माझ्यापुढे होते. मी शेवटी जो निर्णय घेतला त्यावर कोणत्या बाबींनी प्रभाव पाडला हे मला आधी सांगू द्या.

ग्रीसमधील वोलॉस या गावी १९१९ साली माझा जन्म झाला. माझे वडील पुरुषांच्या कपड्यांचे विक्रेते होते व आम्ही सुसंपन्‍न होतो. तथापि १९२० च्या दशकाच्या शेवटास आलेल्या आर्थिक मंदीमुळे वडिलांवर भिकेला लागण्याची पाळी आली व त्यांचे दुकान त्यांच्या हातून गेले. मी जेव्हा जेव्हा माझ्या बाबांचा निराश चेहरा पाहात असे तेव्हा तेव्हा मला फार वाईट वाटे.

काही काळ माझ्या कुटुंबाने अत्यंत गरिबीत दिवस काढले. शिधा वाटपाच्या ओळीत उभे राहण्यासाठी मी दररोज शाळेतून एक तास सुटी काढत असे. गरीब असलो तरीसुद्धा आमच्या कुटुंबात शांती होती. माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, परंतु माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला किशोरावस्थेतच शाळा सोडून नोकरी करावी लागली.

नंतर, दुसऱ्‍या जागतिक महायुद्धादरम्यान, जर्मन व इटॅलियन लोकांनी ग्रीसवर ताबा मिळवला व तेव्हा भयंकर दुष्काळ पडला. मी अनेक वेळा मित्रांना व ओळखीच्या लोकांना उपासमारीने रस्त्यांवर मरताना पाहिले—ती हृदयद्रावक दृश्‍ये मी कधीही विसरणार नाही! एकदा आमच्या कुटुंबाने ब्रेड, अर्थात ग्रीसमधील मुख्य खाद्यपदार्थाशिवाय तब्बल ४० दिवस काढले. पोटाची आग शमवण्यासाठी माझा थोरला भाऊ व मी आपल्या मित्रांकडून तसेच नातेवाईकांकडून बटाटे आणण्यासाठी जवळपासच्या खेड्यांत जात असू.

आजारपण आशीर्वाद ठरते

मी १९४४ सालाच्या सुरवातीला एका प्रकारच्या फुफ्फुसावरणदाहामुळे खूप आजारी पडलो. इस्पितळात घालवलेल्या तीन महिन्यांच्या काळात एकदा माझ्या एका चुलत भावाने माझ्यासाठी दोन पुस्तिका आणल्या व म्हणाला: “ह्‍या वाच; तुला आवडतील याची मला खात्री आहे.” या पुस्तिका, देव कोण आहे? (इंग्रजी) व संरक्षण (इंग्रजी), वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आल्या होत्या. वाचून झाल्यावर मी वाचलेल्या गोष्टी इतर रुग्णांना देखील सांगितल्या.

इस्पितळ सोडल्यावर, मी यहोवाच्या साक्षीदारांच्या वोलॉस मंडळीसोबत सहवास राखणे सुरू केले. तथापि, मला बाह्‍यरुग्ण म्हणून एक महिना घरातच राहावे लागले व मी दिवसातून सहा ते आठ तास, टेहळणी बुरूज नियतकालिकाचे जुने अंक तसेच वॉच टावर सोसायटीची इतर प्रकाशने वाचत असे. परिणामस्वरूप, माझी आध्यात्मिक प्रगती फार जलदगतीने झाली.

थोडक्यात बचावणे

सन १९४४ च्या मध्यात एके दिवशी मी वोलॉस येथे एका उद्यानातील बाकावर बसलो होतो. अचानक जर्मन शांतिरक्षक सैन्याला साहाय्य करणाऱ्‍या मदतनीस सैन्य ताफ्याने त्या ठिकाणास वेढले व तेथे असलेल्या प्रत्येकाला अटक केली. आम्हाला, म्हणजे सुमारे चोवीस जणांना तंबाखूच्या गोदामात असलेल्या गेस्टॅपोच्या मुख्यालयात नेण्यात आले.

काही मिनिटांनी, मला व उद्यानात मी ज्या इसमाशी बोलत होतो त्याला कोणीतरी नावाने हाक मारल्याचे मला ऐकू आले. एका ग्रीक सैन्य अधिकाऱ्‍याने आम्हाला बोलावले व सांगितले, की सैनिक आम्हाला घेऊन जात असताना माझ्या एका नातेवाईकाने पाहिले व तेव्हा त्याने या अधिकाऱ्‍यास आम्ही यहोवाचे साक्षीदार असल्याचे सांगितले. मग या ग्रीक अधिकाऱ्‍याने आम्ही घरी जाण्यास मोकळे आहोत असे आम्हाला सांगितले व पुन्हा अटक झाल्यास कामी पडेल म्हणून स्वतःचे अधिकृत कार्ड दिले.

दुसऱ्‍या दिवशी आम्हाला कळले, की विरोधी ग्रीक सैनिकांनी दोन जर्मन जवानांना ठार मारले याचा बदला म्हणून जर्मन लोकांनी अटक केलेल्यांपैकी बहुतेक जणांना मारून टाकले होते. कदाचित मृत्यूच्या विळख्यातून वाचण्याशिवाय, या घटनेमुळे मला ख्रिस्ती तटस्थतेचे महत्त्व देखील पटले.

मी १९४४ सालाच्या पानझडीच्या ऋतूत, यहोवाला माझ्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. त्यानंतरच्या उन्हाळ्यात, बांधवांनी माझ्यासाठी डोंगरांवर असलेल्या स्क्लीथ्रो मंडळीसोबत सहवास राखण्याची व्यवस्था केली जेथे मी पूर्णपणे बरा होऊ शकलो. जर्मन सैन्याने ताबा सोडल्यावर ग्रीसमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धाचा जोर, त्यावेळेस वाढलेला होता. त्याचे असे झाले, की नेमके मी राहात होतो तेच खेडे गनिमी सैन्याचे तळ होते. स्थानीय पाळकाने व दुसऱ्‍या एका वाईट माणसाने माझ्यावर सरकारी सैन्यासाठी हेरगिरी करण्याचा आरोप लावला व स्वतःच नेमलेल्या गनिमी लष्कराच्या न्यायालयात माझी कसून चौकशी देखील केली.

या बनावट न्यायालयात त्या परिसराच्या गनिमी सैन्याचा पुढारी उपस्थित होता. मी त्या खेड्यात का राहात आहे व ख्रिश्‍चन असल्याकारणाने गृहयुद्धात मी पूर्णपणे तटस्थ आहे याचे मी स्पष्टीकरण दिल्यावर, त्या पुढाऱ्‍याने इतरांना सांगितले: “या माणसाला कोणी हात लावला तर माझ्याशी गाठ आहे!”

नंतर, मी शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा, विश्‍वासात अधिक सुदृढ होऊन माझ्या गावी म्हणजे वोलॉसला परत गेलो.

आध्यात्मिक प्रगती

यानंतर लवकरच मला स्थानीय मंडळीत जमाखर्च पाहणारा सेवक म्हणून नियुक्‍त करण्यात आले. पाळकांनी चिथावलेल्या धर्मांतराच्या खोट्या आरोपामुळे अनेक लोकांना झालेली अटक तसेच गृहयुद्धामुळे निर्माण झालेल्या अनेक अडचणी असूनसुद्धा—ख्रिस्ती सेवेत भाग घेणे, माझ्यासाठी व आमच्या मंडळीतील इतर लोकांसाठी देखील अत्यंत आनंदप्रद होते.

पुढे १९४७ सालाच्या सुरवातीला, आम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रवासी पर्यवेक्षकांनी भेट दिली. दुसऱ्‍या जागतिक महायुद्धानंतर ही अशा प्रकारची पहिलीच भेट होती. त्या वेळेस आमच्या वोलॉसच्या प्रगतिशील मंडळीचे विभाजन करून दोन मंडळ्या करण्यात आल्या व यांपैकी एका मंडळीचे अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून मला नेमण्यात आले. त्यादरम्यान मदतनीस सैन्याच्या व राष्ट्रवादी संघटना, लोकांत दहशत निर्माण करत होत्या. पाळकांनी या परिस्थितीचा फायदा उचलला. यहोवाचे साक्षीदार कम्युनिस्ट आहेत किंवा डाव्या मतप्रणालीचे समर्थक आहेत अशी खोटी अफवा पसरवून त्यांनी अधिकाऱ्‍यांना साक्षीदारांविरुद्ध चिथावले.

अनेकदा अटक व तुरुंगवास

सन १९४७ मध्ये मला जवळजवळ दहा वेळा अटक झाली आणि तीन वेळा माझी न्यायचौकशी करण्यात आली. प्रत्येक वेळेस माझी निर्दोष सुटका झाली. सन १९४८ च्या वसंतऋतूत, धर्मांतराच्या आरोपावरून मला चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मी वोलॉस तुरुंगात ही शिक्षा भोगली. या काळादरम्यान आमच्या मंडळीतील राज्य प्रचारकांची संख्या दुप्पट झाली व बांधवांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

ऑक्टोबर १९४८ मध्ये आमच्या मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍या इतर सहा जणांसोबत माझी सभा चालली असताना पाच पोलीस जबरीने घरात शिरले व त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला अटक केली. अटक करण्याचे कारण न सांगता ते आम्हाला पोलीस स्थानकात घेऊन गेले व तेथे आम्हाला मारहाण करण्यात आली. पूर्वी मुष्टियोद्धा असलेल्या एका पोलिसाने माझ्या तोंडावर वारंवार बुक्के मारले. यानंतर आम्हाला एका कोठडीत टाकून देण्यात आले.

थोड्या वेळाने तेथील व्यवस्था पाहणाऱ्‍या अधिकाऱ्‍याने मला त्याच्या कार्यालयात बोलावले. मी दार उघडले तेव्हा त्याने माझ्या अंगावर दौत फेकली पण त्याचा नेम चुकला व ती भिंतीवर आपटून फुटली. त्याने मला घाबरवण्याच्या इराद्याने असे केले. यानंतर त्याने मला एक कागद व पेन दिला आणि फर्मावले: “वोलॉसमधील सर्व यहोवाच्या साक्षीदारांची नावे यावर लिहून सकाळी माझ्याकडे यादी घेऊन ये. नाहीतर परिणाम काय होईल तुला माहितच आहे!”

मी काहीच उत्तर दिले नाही, परंतु कोठडीत परत आल्यावर बाकीच्या बांधवांनी व मी यहोवाकडे प्रार्थना केली. मी त्या कागदावर फक्‍त माझे नाव लिहिले व मला पुन्हा केव्हा बोलवण्यात येईल याची वाट पाहू लागलो. पण त्यानंतर मला त्या अधिकाऱ्‍याने बोलावलेच नाही. त्या रात्री विरुद्ध लष्करी सैन्य आले होते व या सैन्याविरुद्ध लढण्यासाठी त्याने आपल्या माणसांचे नेतृत्व केले होते. परिणामस्वरूपात घडलेल्या चकमकीत त्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा एक पाय कापून टाकावा लागला. कालांतराने आमच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली व आमच्यावर बेकायदेशीर सभा चालविण्याचा आरोप लावण्यात आला. आम्हा सातही जणांना पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

तुरुंगातील रविवारच्या प्रार्थनेला उपस्थित राहाण्यास नकार दिल्यामुळे मला एकांतवासाची शिक्षा देण्यात आली. तिसऱ्‍या दिवशी, तुरुंगाच्या प्रमुखाशी बोलू देण्यात यावे अशी मी विनंती केली. मी त्यांना म्हटले, “लहान तोंडी मोठा घास, पण एखादा आपल्या विश्‍वासाखातर पाच वर्षे तुरुंगात घालवण्यास तयार असताना त्याला अशी शिक्षा करणे निरर्थक आहे.” त्यांनी याबद्दल गांभिर्याने विचार केला व शेवटी ते म्हणाले: “उद्यापासून, तू येथे माझ्यासोबत माझ्या कार्यालयात काम करशील.”

शेवटी मला तुरुंगातील डॉक्टरांना साहाय्य करण्याचे काम मिळाले. यामुळे, मी आरोग्यविषयक अनेक गोष्टी शिकलो ज्या नंतर मला फार कामी पडल्या. तुरुंगात असताना, मला प्रचार करण्याच्या अनेक संधी मिळाल्या व तीन जणांनी प्रतिसाद दिला आणि यहोवाचे साक्षीदार बनले.

तुरुंगात जवळजवळ चार वर्षे घालवल्यानंतर मला शेवटी १९५२ साली परिवीक्षेवर सोडण्यात आले. नंतर मला तटस्थतेच्या प्रश्‍नावरून करिंथच्या न्यायालयात हजर राहावे लागले. (यशया २:४) तेथे मला थोडा वेळ सैनिकी कारागृहात ठेवण्यात आले व दुर्व्यवहाराचा तोच प्रकार पुन्हा सुरू झाला. काही अधिकारी धमक्या देण्याचे नवनवीन प्रकार शोधून काढण्यात पटाईत होते, ते म्हणत: “मी खंजीरीने तुझ्या हृदयाचे तुकडे बाहेर काढीन,” किंवा, “सहा गोळ्या झेलून लगेच मृत्यू येईल असे समजू नको.”

वेगळ्या प्रकारची परीक्षा

तथापि, मी लवकरच घरी परतलो, पुन्हा वोलॉस मंडळीसोबत सेवा व अर्ध-वेळेची नोकरीसुद्धा करू लागलो. एके दिवशी, मला अथेन्समधील वॉच टावर सोसायटीच्या शाखा दफ्तराकडून पत्र आले ज्यात मला दोन आठवड्यांचे प्रशिक्षण घेऊन, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळींना एक विभागीय पर्यवेक्षक या नात्याने भेटी देणे सुरू करण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. याच वेळेस, निःसंतान व पुष्कळ स्थावर संपत्ती मालमत्तेचे मालक असलेल्या माझ्या काकांनी त्यांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करण्यास मला सांगितले. माझे कुटुंब अजूनही दारिद्र्‌यात राहात होते व या नोकरीने त्यांच्या आर्थिक समस्या सोडवल्या असत्या.

मी या प्रस्तावाबद्दल आभार व्यक्‍त करण्यासाठी माझ्या काकांना भेटण्यास गेलो परंतु मी ख्रिस्ती सेवेत एक खास नेमणूक स्वीकारण्याचे ठरवले असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकून ते उठले, गंभीर मुद्रेने माझ्याकडे पाहिले व अचानक त्या खोलीतून बाहेर गेले. त्यांनी परत येताना एक उदार भेटवस्तू म्हणून पैसे आणले; हे पैसे काही महिने माझ्या कुटुंबाला आधार देऊ शकत होते. ते म्हणाले: “हे ठेव, तुला योग्य वाटतील तसे खर्च कर.” त्या क्षणी माझ्या मनात आलेल्या भावनांचे मी आजही शब्दांत वर्णन करू शकत नाही. जणू यहोवा मला सांगत होता, ‘तू अगदी योग्य निर्णय घेतला. मी तुझ्या पाठीशी आहे.’

माझ्या कुटुंबाचा निरोप घेऊन, १९५३ साली मी अथेन्सला जाण्यास निघालो. फक्‍त आईच साक्षीदार बनली असली तरीही, माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांनी माझ्या ख्रिस्ती कार्याला विरोध केला नाही. मी अथेन्सच्या शाखा दफ्तरात गेलो तेव्हा मला आश्‍चर्याचा आणखी एक सुखद धक्का बसला. तेथे माझ्यासाठी माझ्या बहिणीचा टेलिग्राम होता ज्यात, कल्याण योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीवेतन मिळविण्यासाठी बाबांनी दोन वर्षे केलेला खटाटोप शेवटी, आज कारणी लागल्याचे तिने कळविले होते. मला आणखी काय हवे होते? जणू यहोवाच्या सेवेत उंच भरारी मारण्यासाठी पंख मिळाल्याचा मला भास झाला!

चौकस असणे

विभागीय कार्याच्या सुरवातीच्या वर्षांत मला अत्यंत सावध राहावे लागत असे कारण यहोवाच्या साक्षीदारांचा धार्मिक व राजनैतिक अधिकाऱ्‍यांकडून फार छळ होत होता. आपल्या ख्रिस्ती बांधवांना, विशेषतः लहान गावांत व खेड्यांत राहणाऱ्‍या बांधवांना भेटण्यासाठी मी रात्रीच्या अंधारात तासनतास चालत असे. अटक होण्याची जोखीम पत्करून बांधव एका घरात जमत व माझ्या येण्याची वाट पाहात. त्या भेटींतून आम्हा सर्वांना केवढे प्रोत्साहन मिळत असे!—रोमकर १:११, १२.

ओळखले जाऊ नये म्हणून कधीकधी मी वेषांतर करत असे. आध्यात्मिक मेंढपाळकत्वासाठी अत्यंत आसूसलेल्या बांधवांपर्यंत पोहंचण्याखातर रस्त्यावरील अडथळा पार करण्यासाठी एकदा मी मेंढपाळाचा वेष धारण केला. दुसऱ्‍या वेळेस १९५५ साली, मी व एका सहविश्‍वासू बांधवाने, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून लसूण विकणाऱ्‍यांचे रूप घेतले. आमचे काम ऑरगॉस ऑरेस्टीकॉन या लहानशा गावात, अक्रियाशील झालेल्या काही ख्रिस्ती बांधवांशी संपर्क साधणे हे होते.

आम्ही आमचा माल गावातील सार्वजनिक बाजारात विकण्यासाठी मांडला. परंतु, तेथे गस्त घालणाऱ्‍या एका तरुण पोलिसाला संशय आला व प्रत्येक वेळेस तेथून जाताना तो सारखा आमच्याकडे विचित्र नजरेने पाहात होता. शेवटी तो मला म्हणाला: “तुम्ही लसूण विकणाऱ्‍यासारखे दिसत नाही.” तेवढ्यात तीन स्त्रिया आल्या ज्यांना लसूण विकत घ्यायचा होता. आमच्या मालाकडे बोट दाखवून मी म्हटले: “हा तरुण शिपाई असाच लसूण खातो, बघा तर किती तगडा आणि देखणा आहे!” त्या स्त्रिया शिपायाकडे बघून हसल्या. तोही हसला व मग तेथून निघून गेला.

तो गेल्यावर मी संधीचा फायदा उचलून, शिंप्याच्या दुकानात काम करणाऱ्‍या आपल्या बांधवांकडे गेलो. त्यांतील एकाला मी माझ्या जॅकेटचे मुद्दामहून काढलेले बटन शिवून देण्यास सांगितले. तो शिवत असताना मी पुढे वाकून त्याच्या कानात कुजबुजलो: “मी तुम्हाला भेटण्यास शाखा दफ्तरातून आलोय.” सुरवातीला बांधवांना भीती वाटली कारण ते अनेक वर्षांपासून सहसाक्षीदारांच्या संपर्कात नव्हते. मी होता होईल तितके त्यांना प्रोत्साहित केले व आणखी बोलण्यासाठी गावातील स्मशानात त्यांना पुन्हा भेटण्याचे ठरवले. सुदैवाने, ही भेट उभारणीकारक ठरली व ते पुन्हा एकदा ख्रिस्ती सेवेत आवेशी झाले.

विश्‍वासू जोडीदार मिळणे

प्रवासी कार्य सुरू केल्यावर तीन वर्षांनी म्हणजेच १९५६ साली, प्रचार कार्यावर मनापासून प्रेम करणारी व आपले जीवन पूर्ण वेळेच्या सेवेत व्यतीत करू इच्छिणारी एक तरुण ख्रिस्ती स्त्री, नीकी, माझ्या जीवनात आली. आम्ही प्रेमात पडलो व जून १९५७ साली विवाहबद्ध झालो. त्यावेळी ग्रीसमध्ये साक्षीदारांवर असलेल्या प्रतिकूल परिस्थितींत, नीकीला प्रवासी कार्य झेपेल का याबद्दल मी साशंक होतो. यहोवाच्या मदतीने ती ते करू शकली व ग्रीसमधील विभागीय कार्य करण्यास आपल्या पतीसोबत जाणारी ती पहिलीच स्त्री ठरली.

आम्ही दोघे दहा वर्षे प्रवासी कार्य करत राहिलो व या काळात आम्ही ग्रीसमधील अधिकांश मंडळ्यांची सेवा केली. अनेकदा आम्ही वेषांतर करून व हातात सूटकेस घेऊन, एखाद्या मंडळीपर्यंत पोहंचण्यासाठी रात्रीच्या अंधारात तासनतास चालत असू. अनेकदा आम्हाला प्रचंड विरोधाला तोंड द्यावे लागले तरीही, साक्षीदारांच्या संख्येत झालेली अभूतपूर्व वाढ प्रत्यक्ष पाहणे रोमहर्षक होते.

बेथेल सेवा

जानेवारी १९६७ मध्ये नीकी व मला बेथेल, अर्थात यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. या आमंत्रणाने आम्हा दोघांना आश्‍चर्य वाटले पण यामागे नक्कीच यहोवाचा हात आहे अशी खात्री बाळगून आम्ही ते स्वीकारले. ईश्‍वरशासित कार्यहालचालींच्या या केन्द्रस्थानी सेवा करणे हा केवढा मोठा विशेषाधिकार आहे याची आम्हाला कालांतराने जाणीव झाली.

आम्ही बेथेल सेवेत रुजू झाल्यानंतर तीन महिन्यांनी एका लष्करी पक्षाने सत्ता बळकावली व यहोवाच्या साक्षीदारांना त्यांचे कार्य भूमिगत मार्गांनी सुरू ठेवावे लागले. आम्ही लहान गटात भेटू लागलो, जंगलात संमेलने पार पाडली, सावधपणे प्रचार कार्य केले व गुप्तपणे बायबल साहित्य मुद्रित करून त्याचे वाटप केले. या परिस्थितींना जुळवून घेणे तितकेसे कठीण नव्हते कारण मागील वर्षांत आमच्या कार्यहालचाली सुरू ठेवण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतींना आम्ही केवळ पुनरुज्जीवन केले. प्रतिबंध असूनसुद्धा, १९६७ मध्ये ११,००० पेक्षा कमी असलेली साक्षीदारांची संख्या वाढून, १९७४ मध्ये १७,००० पेक्षा अधिक झाली.

बेथेल सेवेत जवळजवळ ३० वर्षे घालवल्यावर नीकी व मी, आरोग्याची व वाढत्या वयाची बंधने असूनसुद्धा आजवर आमचे आध्यात्मिक आशीर्वाद सतत उपभोगत आहोत. दहा वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत आम्ही अथेन्समधील कॉरतॉली स्ट्रीटवरील शाखेच्या आवारात राहिलो. सन १९७९ मध्ये अथेन्सचे एक उपनगर, मॉरूसी येथे एक नवीन शाखा दफ्तर समर्पित करण्यात आले. परंतु, १९९१ सालापासून आम्हाला अथेन्सच्या उत्तरेकडे ६० किलोमीटरवर स्थित एलीऑनातील नवीन ऐसपैस शाखा सुविधा लाभल्या आहेत. येथे मी बेथेलच्या रुग्णालयात सेवा करतो, जेथे तुरुंगातील डॉक्टरचा मदतनीस म्हणून काम करताना प्राप्त झालेले प्रशिक्षण माझ्या कामी पडले आहे.

चार दशकांपेक्षा अधिक काळाच्या माझ्या पूर्ण वेळेच्या सेवेदरम्यान, यिर्मयासारखेच मला देखील यहोवाच्या पुढील अभिवचनाचे महत्त्व पटले आहे: “ते तुजबरोबर सामना करितील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे, असे परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो.” (यिर्मया १:१९) खरोखर, नीकी व मी, दोघांनी यहोवाकडून ओसंडून वाहणाऱ्‍या आशीर्वादांचा पुरेपूर आनंद लुटला आहे. त्याला आमच्याविषयी असलेल्या विपुल प्रेमळ कळकळीने व त्याच्या अपात्री कृपेने, आम्हाला सतत आनंद लाभला आहे.

मी यहोवाच्या संघटनेतील तरुण लोकांना पूर्ण वेळेच्या सेवेसाठी प्रयास करण्याचे प्रोत्साहन देतो. असे केल्याने, “आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो” हे यहोवाचे अभिवचन तो पूर्ण करतो की नाही याची प्रतीती करण्याचे त्याचे आमंत्रण हे तरुण लोक स्वीकारू शकतात. (मलाखी ३:१०) माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी तुम्हा तरुणांना खात्री देतो, की यहोवावर संपूर्णपणे भरवसा राखणाऱ्‍या तुम्हा सर्वांना तो खरोखर उदंड आशीर्वाद देईल.

[२६ पानांवरील चित्रं]

लॉम्प्रोस झुम्पोस व त्यांची अर्धांगिनी, नीकी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा