वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ६/१ पृ. २०-२४
  • यहोवा माझ्या पाठीशी राहिला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा माझ्या पाठीशी राहिला
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नेदरलॅन्ड्‌स येथे पायनियर सेवा
  • अतिरिक्‍त विशेषाधिकार
  • नात्सी सत्तेच्या टाचेखाली
  • तुरुंग व छळ छावण्या
  • युद्धोपरांत कार्य
  • सत्याहून आणखीन चांगलं काय असेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • माझ्या तारुण्यापासून मी सबुराईनं यहोवाची आस धरली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “विश्‍वास आमुचा, ना डगमगणारा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • परीक्षांमध्येसुद्धा यहोवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ६/१ पृ. २०-२४

यहोवा माझ्या पाठीशी राहिला

मॉक्स हेनिंग यांच्याद्वारे कथित

ते सन १९३३ होते आणि जर्मनीत अडॉल्फ हिट्‌लर नुकताच सत्तेवर आलेला होता. तरीसुद्धा बर्लिनच्या परिसरात असलेले जेमतेम ५०० यहोवाचे साक्षीदार डळमळले नाहीत. अनेक तरुणांनी पायनियर सेवा किंवा पूर्ण-वेळेची सेवा हाती घेतली आणि काहींनी तर इतर युरोपिय देशांतदेखील नेमणुका स्वीकारल्या. माझा मित्र वर्नर फ्लॉटन व मी एकमेकांच्यामागे नेट लावायचो: “आपण वेळ घालवत असे रेंगाळत का बसलोय? हिम्मत करून आपण पायनियर सेवा का सुरू करत नाही?”

सन १९०९ मध्ये माझ्या जन्मानंतर आठ दिवसांनीच मला प्रेमळ पालक मातापितांच्या हाती सोपवण्यात आले. वर्ष १९१८ मध्ये माझ्या बहिणीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे आमच्या कुटुंबावर आभाळच कोसळले. यानंतर काही दिवसांनी त्याकाळात बायबल अभ्यासक असे संबोधले जाणारे यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी आले व माझ्या पालक मातापितांचे अंतःकरण बायबल सत्यांचा स्वीकार करण्यासाठी खुले झाले. त्यांनी मला सुद्धा आध्यात्मिक गोष्टींबद्दल कदर दाखवण्यास शिकवले.

मी प्रापंचिक शिक्षण घेण्यास सुरवात केली व नळकारागीर बनलो. पण याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे मी आध्यात्मिकरित्या लक्षणीय पावले उचलली. मी व वर्नरने मे ५, १९३३ ला पायनियरींग सुरू केली. आम्ही बर्लिनपासून १०० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका गावी सायकलने जात असू व तेथे दोन आठवडे राहून प्रचार करत असू. मग महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही बर्लिनला परत येत होतो. यानंतर आम्ही आणखीन दोन आठवड्यांपर्यंत आमच्या प्रचार क्षेत्रात परत जात असू.

आम्ही दुसऱ्‍या एखाद्या देशात सेवा करण्यासाठी अर्ज केले व डिसेंबर १९३३ मध्ये आम्हाला तेव्हाच्या युगोस्लाव्हियात नेमणूक मिळाली. परंतु आम्ही तेथे जाण्यापूर्वीच आमची नेमणूक बदलण्यात आली व आम्हाला नेदरलंडमधील युट्रेच्ट येथे नेमण्यात आले. यानंतर लवकरच, माझा बाप्तिस्मा झाला. त्या काळात बाप्तिस्म्यावर फारसा जोर देण्यात येत नसे; सेवेला महत्त्व दिले जात होते. आता यहोवावर अवलंबून राहणे माझ्या जीवनात सातत्याची बाब बनली. बायबलच्या स्तोत्रकर्त्याचे हे शब्द मला अत्यंत सांत्वन देत: “पाहा, देव माझा साहाय्यकर्ता आहे; माझ्या जिवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू [यहोवा, NW] आहे.”—स्तोत्र ५४:४.

नेदरलॅन्ड्‌स येथे पायनियर सेवा

नेदरलॅन्ड्‌स येथे आल्यावर काही काळातच रॉटरडॅम या शहरात आमची फेरनियुक्‍ती करण्यात आली. आम्ही ज्यांच्यासोबत राहत होतो, त्या कुटुंबातील पिता व एक मुलगा देखील पायनियर होते. काही महिन्यांनी युट्रेच्टच्या जवळच असलेल्या लीरसम या गावात, पायनियरांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी एक मोठा बंगला विकत घेण्यात आला आणि वर्नर व मी तेथे राहायला गेलो.

या पायनियर निवासात राहताना आम्ही सायकलने जवळपासच्या क्षेत्रांत जात होतो व आणखी दूरच्या क्षेत्रांत जायचे असल्यास सात प्रवाशांसाठी असलेल्या मोटारीचा उपयोग करत होतो. त्या वेळी सबंध नेदरलॅन्ड्‌समध्ये जेमतेम शंभर साक्षीदार होते. त्या पायनियर गृहात राहून आम्ही ज्या क्षेत्रात कार्य केले होते त्या क्षेत्रात, आज ६० वर्षे उलटल्यावर, जवळजवळ ५० मंडळ्यांमध्ये ४,००० पेक्षा अधिक प्रचारक आहेत!

आम्ही सेवेत दररोज जवळजवळ १४ तास, कठीण परिश्रम करीत होतो व यामुळे आमचा आनंद टिकून राहिला. होता होईल तितक्या साहित्याचे वाटप करणे हा आमचा मुख्य उद्देश होता. सहसा आम्ही आस्थेवाईक लोकांना दरदिवशी शंभराहून अधिक पुस्तिका वाटत होतो. पुनर्भेटी घेणे व बायबल अभ्यास चालवणे अद्याप आमच्या नियमित कार्यातील भाग नव्हते.

एके दिवशी माझा जोडीदार व मी फ्रेसवेक या गावी कार्य करत होतो. तो एका लष्करी किल्ल्याच्या फाटकापाशी एका माणसाला साक्ष देत होता, त्यादरम्यान मी आपले बायबल वाचू लागलो. ते लाल व निळ्या शाईने पुष्कळ ठिकाणी रेखांकित केलेले होते. थोड्या वेळाने, जवळच्याच छतावर काम करत असलेल्या एका सुताराने फाटकापाशी उभ्या असलेल्या माणसाला, मी कदाचित गुप्तहेर असल्याचा इशारा दिला. याच्या परिणामस्वरूप, त्याच दिवशी एका दुकानदारास साक्ष देताना मला अटक झाली व माझे बायबल जप्त करण्यात आले.

मला न्यायालयात नेण्यात आले. माझ्या बायबलमधल्या खुणांमुळे, मी किल्ल्याचे चित्र काढण्याच्या प्रयत्नात होतो असा माझ्यावर न्यायालयात आरोप करण्यात आला. मला दोषी ठरवण्यात आले व न्यायाधीशाने मला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तथापि, त्या खटल्यासाठी अपील करण्यात आले व माझी निर्दोष सुटका झाली. सुटका झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला पण माझे बायबल त्यातील सर्व टिपणींसहित परत करण्यात आले तेव्हा तर मी आणखीनच आनंदित झालो!

सन १९३६ च्या उन्हाळ्यात, मी व पायनियर गृहातील एक पायनियर, रिचर्ड ब्राउनिंगने देशाच्या उत्तरेकडील भागात प्रचार करण्यात ते दिवस घालवले. पहिल्या महिन्यात आम्ही २४० तास सेवेत खर्च केले व भरमसाट साहित्याचे वाटप केले. आम्ही एका तंबूत राहिलो व धुणी, स्वयंपाक वगैरे सर्व कामे आमची आम्हीच केली.

यानंतर लाइटबेअर्‌र नावाच्या बोटीवर माझी बदली झाली. ही बोट नेदरलॅन्ड्‌सच्या उत्तरेकडे चांगलीच प्रसिद्ध झाली. या बोटीवर पाच पायनियर राहत होते व तिच्याद्वारे आम्ही पुष्कळशा एकांती क्षेत्रात पोहंचू शकलो.

अतिरिक्‍त विशेषाधिकार

सन १९३८ मध्ये मला परिमंडळ सेवक म्हणून नेमण्यात आले; त्या काळातील यहोवाच्या साक्षीदारांच्या विभागीय पर्यवेक्षकांना असेच म्हणत असत. यामुळे मी लाइटबेअर्‌र बोट सोडून तीन दक्षिणी राज्यांतील मंडळ्या व तेथील एकांती क्षेत्रांत असलेल्या साक्षीदारांना भेटी देण्यास सुरवात केली.

सायकल म्हणजे प्रवासासाठी उपलब्ध असलेले एकमात्र माध्यम होते. एका मंडळीतून दुसऱ्‍या मंडळीत किंवा आस्थेवाईक लोकांच्या एका समूहाकडून दुसऱ्‍या समूहाकडे जाण्यासाठी सहसा एक पूर्ण दिवस लागत असे. मी भेट दिलेल्या शहरांपैकी एक होते ब्रेडा, जेथे मी आता राहतो. त्या वेळी ब्रेडा येथे एकही मंडळी नव्हती व साक्षीदार आसलेले फक्‍त एकच वृद्ध जोडपे होते.

लिम्बर्ग येथील बांधवांची सेवा करताना खाणीत काम करणारा एक कर्मचारी योहान पीपर, याच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले. त्याने बायबल सत्यासाठी दृढ भूमिका घेतली व एक निर्भिड प्रचारक बनला. चार वर्षांनंतर त्याला छळ छावणीत जावे लागले व येथे त्याने साडे तीन वर्षे काढली. सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा प्रचार कार्य आवेशाने हाती घेतले व तो आजही एक विश्‍वासू वडील आहे. लिम्बर्गमधील १२ साक्षीदारांच्या त्या लहानशा मंडळीची वाढ होऊन आज तिच्याऐवजी, एकूण १,५५० प्रचारक असलेल्या १७ मंडळ्या आहेत!

नात्सी सत्तेच्या टाचेखाली

मे १९४० मध्ये नात्सी लोकांनी नेदरलॅन्ड्‌सवर आक्रमण केले. मला ॲमस्टरडॅम येथील वॉच टावर सोसायटीच्या शाखा दफ्तरात नेमण्यात आले. आम्हाला अत्यंत सावधगिरीने कार्य करावे लागले व यामुळे बायबलमधील या नीतिसूत्राचे आम्हाला महत्त्व पटले: “मित्र . . . विपत्कालासाठी . . . बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतिसूत्रे १७:१७) या तणावाच्या परिस्थितीत बळकट झालेल्या एकतेच्या सुखकर बंधनाचा माझ्या आध्यात्मिक विकासावर बराच प्रभाव पडला व यामुळे भविष्यातील अधिक कष्टमय काळासाठी माझी जणू तयारी करण्यात आली.

मला मंडळ्यांना साहित्य पोचते करण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आले होते व हे काम सहसा संदेशवाहकांद्वारे करण्यात येत होते. गेस्टॅपो, जर्मनीत जबरीने मजुरी करायला लावण्यासाठी सतत तरुण मुलांवर पाळत ठेऊन असल्यामुळे आम्ही संदेश पोहंचविण्यासाठी ख्रिस्ती भगिनींचा उपयोग करत होतो. कालांतराने द हेग येथून विल्हेलमीना बाकर हिला आमच्याकडे पाठवण्यात आले. तिला सर्वजण नोनी या नावाने ओळखत होते. आमचे शाखा पर्यवेक्षक आर्थर विंक्लर लपले होते त्या ठिकाणी मी तिला घेऊन गेलो. शक्यतोवर कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून मी डच शेतकऱ्‍यासारखा वेष धारण करून लाकडी बूट वगैरे घातले व स्ट्रीटकारने नोनीसोबत गेलो. नंतर मला कळले की नोनीच्या मते मी नजरेत न येणारा नव्हे तर आणखीनच लक्षवेधक दिसत होतो व यामुळे तिला हसू आवरणे कठीण झाले होते.

ऑक्टोबर २१, १९४१ या दिवशी आमचे ॲमस्टरडॅम येथील साहित्य व कागद साठवून ठेवण्याचे ठिकाण शत्रूच्या हाती लागले. गेस्टॅपोची धाड पडली तेव्हा विंक्लर व नोनी यांना अटक झाली. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा दोन गेस्टॅपो प्रतिनिधींचे संभाषण त्यांना ऐकू आले. हे प्रतिनिधी, “गडद रंगाच्या केसांच्या एका बुटक्या माणसाचा” पाठलाग करण्याबद्दल व रस्त्यांवरील गर्दीत तो कसा दिसेनासा झाला होता याबद्दल बोलत होते. ते माझ्याबद्दल बोलत होते यात शंका नव्हती, म्हणून विंक्लर यांनी बांधवांना कसाबसा एक संदेश पाठवला. लगेच मला द हेग येथे हलवण्यात आले.

यादरम्यान नोनीची तुरुंगातून सुटका झाली व ती पायनियर सेवा करण्यासाठी द हेग येथे परत आली. तेथे पुन्हा आमची भेट घडली. तथापि रॉटरडॅम येथील मंडळीच्या सेवकास अटक झाली तेव्हा त्याची जागा घेण्यासाठी मला पाठवण्यात आले. नंतर गाउडा मंडळीच्या मंडळ सेवकास अटक झाली व मला त्याची जागा घेण्यासाठी तेथे पाठवण्यात आले. शेवटी मार्च २९, १९४३ ला मला अटक झाली. आमचा बायबल साहित्याचा साठा तपासत असताना अचानक गेस्टॅपोची धाड पडल्याने मी दचकलो.

टेबलावर पसरून ठेवलेल्या बायबल साहित्याशिवाय ख्रिस्ती बंधू भगिनींच्या नावांची यादी देखील होती, पण ती सर्व नावं सांकेतिक रुपात होती. जे लोक प्रचार करण्यासाठी अद्याप मोकळे होते त्यांचे संरक्षण करण्याचा मार्ग मला सुचावा अशी मी यहोवाकडे उद्विग्न होऊन प्रार्थना केली. सर्वांच्या नकळत, मी नावांच्या त्या यादीवर माझा हात ठेवला आणि तो कागद माझ्या मुठीत चुरगळून टाकला. मग मी शौचालयात जाण्याची परवानगी मागितली व तेथे जाऊन त्या कागदाचे तुकडे करून त्यावर पाणी टाकले.

अशा दुःसह परिस्थितीतून जाताना, भूतकाळात यहोवाचे आपल्या लोकांसोबतचे व्यवहार आणि त्याने दिलेली बचावाची अभिवचने, यांतून सामर्थ्य मिळवण्यास मी शिकलो. माझ्या मनात ठसलेले एक प्रेरित अभिवचन हे आहे: “लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्‍वर [यहोवा, NW] आमचा पक्षाचा नसता, तर . . . त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते.”—स्तोत्र १२४:२, ३.

तुरुंग व छळ छावण्या

मला रॉटरडॅम तुरुंगात नेण्यात आले जेथे सुदैवाने माझे बायबल माझ्याजवळ होते. माझ्याजवळ तारण (इंग्रजी) हे पुस्तक, मुले (इंग्रजी) या पुस्तकाचे काही भाग होते, शिवाय हे सर्व साहित्य वाचण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळही होता. सहा महिन्यांनंतर मी खूप आजारी पडलो व मला इस्पितळात जावे लागले. तुरुंगातून बाहेर पडण्याआधी मी माझ्या गादीखाली हे साहित्य लपवले. नंतर मला समजले की दुसरा एक साक्षीदार पीट ब्रुर्टजस याची जागा बदलून त्याला माझ्या कोठडीत डांबण्यात आले व तेथे त्याला हे साहित्य सापडले. अशा प्रकारे आणखी इतरांना सामर्थ्य देण्यासाठी हे साहित्य उपयोगी पडत होते.

बरे वाटू लागल्यानंतर मला द हेग येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे असताना नात्सी ताब्याला विरोध करण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला कायद्याचा विद्यार्थी, लेओ सी. वॉन द तॉस यासोबत माझी भेट घडली. त्याने कधीच यहोवाच्या साक्षीदारांबद्दल ऐकले नव्हते व त्याला साक्ष देण्याची मला संधी मिळाली. कधी कधी तो मला रात्री अपरात्री झोपेतून उठवून प्रश्‍न विचारत असे. आपल्या विश्‍वासाचा त्याग जाहीर करणाऱ्‍या एका कागदावर केवळ सही केल्यास साक्षीदारांना सुटका होऊ शकते हे समजल्यावर विशेषतः त्याला साक्षीदारांची प्रशंसा केल्याशिवाय राहावले नाही. युद्ध संपुष्टात आल्यानंतर, लेओ वकील झाला व उपासनेच्या स्वातंत्र्यासंबंधी तो वॉच टावर सोसायटीच्या वतीने कित्येक खटले लढला.

एप्रिल २९, १९४४ रोजी, जर्मनीला जाणाऱ्‍या ट्रेनमध्ये मला बसवण्यात आले व १८ दिवसांचा एक जीवघेणा प्रवास सुरू झाला. मे महिन्याच्या १८ तारखेला मी बुछनवॉल्ड छळ छावणीत बंदिस्त झालो. जवळजवळ एका वर्षानंतर आम्हाला मित्र राष्ट्रांच्या सैन्याने सोडवले तोपर्यंतचे भयंकर जीवन वर्णन करून सांगताच येणार नाही. आम्ही आपल्या डोळ्यांनी हजारो लोकांना मरताना पाहिले. युद्ध साहित्याचे उत्पादन करणाऱ्‍या जवळच्याच एका कारखान्यात काम करण्यास नकार दिल्यामुळे मला गटाराचे काम करण्यास सांगण्यात आले.

एके दिवशी या कारखान्यावर बॉम्ब टाकण्यात आला. पुष्कळ माणसे जीव वाचवण्यासाठी बराकींत शिरली व बाकीचे लोक जंगलात पळाले. चुकून पडलेले बॉम्ब बराकींवर पडले व जंगलावर मुद्दामहून टाकण्यात आलेल्या बॉम्बमुळे तेथे आग लागली. केवढे भयानक दृश्‍य होते ते! कित्येक जण तर जिवंत होरपळून निघाले! मला लपण्याचे एक सुरक्षित ठिकाण सापडले होते आणि आग थोडी शमल्यावर मी त्या असंख्य मृत देहांना ओलांडून छावणीत परत गेलो.

नात्सी संहारादरम्यान घडलेल्या जीवाचा थरकाप उडवणाऱ्‍या घटना अनेकांना माहीत आहेत. यहोवाने माझ्या वैचारिक क्षमतेला बळकट केले, ज्यामुळे नंतरच्या वर्षांत या भयाण घटनांनी माझ्या विचारांवर वर्चस्व केलेले नाही व यासाठी मी त्याचा ऋणी आहे. माझ्या तुरुंगवासाच्या काळाबद्दल मी विचार करतो तेव्हा माझ्या मनात येणारी पहिली भावना, यहोवाच्या नावाची महिमा व्हावी म्हणून त्याला सचोटी राखल्याबद्दल संतुष्टी, हीच असते.—स्तोत्र १२४:६-८.

युद्धोपरांत कार्य

माझी सुटका होऊन ॲमस्टरडॅमला परतल्यावर, मी नेमणुकीसाठी सरळ शाखा दफ्तरात गेलो. माझ्या अनुपस्थितीत जे काही घडले होते त्याबद्दल इत्यंभूत माहिती मिळवण्यास मी उत्सुक होतो. नोनी आधीपासूनच तेथे कार्य करत होती. युद्धाच्या शेवटल्या वर्षी, तिने मंडळ्यांना बायबल साहित्य पोहंचविणाऱ्‍या संदेशवाहकाचे काम केले होते. तिला पुन्हा अटक झाली नव्हती, मात्र ती अनेक वेळा थोडक्यात बचावली होती.

मी थोडे दिवस हारलेम येथे पायनियर म्हणून सेवा केली परंतु १९४६ या वर्षी, मला वितरण खात्यात काम करण्यासाठी ॲमस्टरडॅम येथील शाखेत जाण्यास सांगण्यात आले. १९४८ च्या शेवटी शेवटी नोनी व मी विवाहबद्ध झालो व पायनियर सेवा करण्यासाठी आम्ही शाखा दफ्तर सोडले. आमची पायनियर नेमणूक ॲसेन येथे होती. बारा वर्षांपूर्वी रिचर्ड ब्राउनिंग व मी याच ठिकाणी तंबूत राहून व प्रचार करत उन्हाळा घालवला होता. रिचर्ड, एका छळ छावणीला जात असताना मार्गात गोळी लागून मरण पावला होता असे मला कळले.

माझ्या तुरुंगवासांमुळे साहजिकच माझी तब्येत खालावली होती. बुछनवॉल्ड येथून सुटल्यावर सहा वर्षांनंतर, आजारपणामुळे मी चार महिने अंथरुणाला खिळून होतो. अनेक वर्षांनी १९५७ मध्ये मी क्षयामुळे एक सबंध वर्षभर आजारी होतो. माझे शरीर झिजून गेले होते पण माझी पायनियर वृत्ती अजूनही बळकट होती. माझ्या आजारपणाच्या काळात, साक्ष देण्याची एकही संधी मी दवडली नाही. माझ्या मते माझ्या आजारपणांमुळे एक निकामी रोगी बनण्यापासून याच पायनियर वृत्तीने मला रोखले. जोपर्यंत आमचे आरोग्य साथ देते तोपर्यंत पूर्ण-वेळेच्या सेवेला धरून ठेवायचे असा नोनी व माझा निर्धार आहे.

मी आजारातून उठल्यावर, आम्हाला ब्रेडा शहरात नेमण्यात आले. मी परिमंडळ सेवक या नात्याने या शहराला पहिल्यांदा भेट दिली होती तेव्हापासून आता २१ वर्षे उलटली होती. आम्ही १९५९ मध्ये आलो तेव्हा तेथे ३४ साक्षीदारांची लहानशी मंडळी होती. आज ३७ वर्षांनंतर, ती मंडळी वाढून तिच्याऐवजी आता एकूण ५०० साक्षीदार असलेल्या सहा मंडळ्या आहेत व तीन राज्य सभागृहांत त्यांच्या सभा होतात! आमच्या स्थानिक सभांमध्ये व संमेलनांमध्ये आम्हाला असे अनेक लोक आढळतात ज्यांना आमच्या काही प्रयत्नांमुळे बायबल सत्याचे ज्ञान प्राप्त झाले. आम्हाला अनेकदा प्रेषित योहानासारखे वाटते जे तो आपल्या पुढील शब्दांत व्यक्‍त करतो: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.”—३ योहान ४.

आता आम्ही वृद्ध झालो आहोत. माझे वय ८६ व नोनीचे ७८ आहे, पण पायनियर सेवा एक आरोग्यदायी पेशा आहे हे मला कबूल करावेच लागेल. मी ब्रेडा येथे आहे तेव्हापासून, तुरुंगवासाच्या काळात जडलेल्या माझ्या पुष्कळशा आरोग्याच्या तक्रारी नाहीशा झाल्या आहेत. तसेच यहोवाच्या सेवेत मला अनेक फलदायी वर्षे लाभली आहेत.

अनेक वर्षांच्या सुफल सेवेकडे मागे वळून पाहणे आम्हा दोघांसाठी आनंददायी आहे. आमच्या जिवात जीव आहे तोवर तुझी सेवा करण्यासाठी शक्‍ती व बळ दे अशी आम्ही रोज यहोवाला प्रार्थना करतो. आम्ही खात्रीपूर्वकपणे स्तोत्रकर्त्याच्या शब्दांत आपले मनोगत व्यक्‍त करतो: “पाहा, देव माझा साहाय्यकर्ता आहे; माझ्या जिवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे.”—स्तोत्र ५४:४.

[२३ पानांवरील चित्रं]

पायनियर सेवा करताना १९३० च्या शतकात आम्ही वापरत असलेल्या तंबुच्या शेजारी उभे असताना

[२३ पानांवरील चित्रं]

एकांती क्षेत्रात पोहंचण्यासाठी आम्ही हीच बोट वापरत होतो

[२३ पानांवरील चित्रं]

सन १९५७ मध्ये एका अधिवेशन कार्यक्रमात मुलाखत देताना

[२४ पानांवरील चित्रं]

माझ्या पत्नीसोबत आता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा