बायबलचा दृष्टिकोन
आदर्श नागरिक कोण असतो?
दुसऱ्या महायुद्धानंतर, युरोप आणि जपानमधल्या ज्या लोकांना स्वतःविषयी असे वाटले होते, की ते कायदेकानूनांचे काटेकोर पालन करणारे आदर्श नागरिक आहेत त्यांच्यापैकीच काही लोकांना, युद्धांत गुन्हे केल्याबद्दल चौकशी करून गुन्हेगार ठरवण्यात आले. यामध्ये लष्करातले मोठमोठे अधिकारी, वैज्ञानिक आणि इतर पेशेवाईक मंडळीही होती. आपल्या कृत्यांची सफाई देताना यांपैकी काही गुन्हेगारांनी असा खुलासा दिला, की कोणत्याही आदर्श नागरिकाप्रमाणे ते केवळ कायद्याचे पालन करत होते. पण वास्तवात, स्वतःला आदर्श नागरिक म्हणवणारे हे लोक माणुसकीविरुद्ध भीषण कृत्ये करून बसले होते.
दुसऱ्या बाजूला पाहता, जगात असेही काही लोक आहेत जे सरकारी अधिकाराचा मान राखत नाही. यांपैकी काहीजण अगदी उघडपणे सरकारी नियमांचे उल्लंघन करतात; तर इतर काहीजण, पकडले जाण्याचा फारसा धोका नसतो तोपर्यंत कायद्याचे उल्लंघन करण्यास तयार असतात. अर्थात, बहुतांश लोक मान्य करतात, की अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहणे जरूरीचे आहे; कारण तसे न केल्यास सर्वत्र अराजकता आणि गोंधळ माजेल. तेव्हा, प्रश्न येतो, की एखाद्याने नागरिक या नात्याने कोठवर आपले कर्तव्य पार पाडावे आणि कोठवर कायद्याचे पालन करावे? याबाबतीत पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना एक समतोल दृष्टिकोन बाळगण्यास मदत केलेल्या काही मूलभूत सिद्धान्तांचा आपण विचार करू या.
अधिकाऱ्यांप्रती ख्रिश्चनांची अधीनता
पहिल्या शतकातील ख्रिस्ती, स्वेच्छेने ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांचे’ अर्थात तत्कालीन राज्यकर्त्यांचे कायदेकानून पाळत होते. (रोमकर १३:१) ‘सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहणे आणि त्यांच्या आज्ञा पाळणे’ जरूरीचे आहे असे ते मानत. (तीत ३:१) ख्रिस्त आपला स्वर्गीय राजा आहे हे ते मान्य करत होते पण त्याचवेळी मानवी राज्यकर्त्यांचेही कायदेकानून ते अगदी प्रामाणिकपणे पाळत होते; शिवाय, राष्ट्राला धोकेदायक ठरतील अशी कोणतीही कृत्ये ते करत नव्हते. खरे तर, नेहमी ‘राजाचा मान राखण्याचे’ उत्तेजन त्यांना देण्यात आले होते. (१ पेत्र २:१७) इतकेच काय, प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना असेही उत्तेजन दिले: “तर सर्वात प्रथम हा बोध मी करितो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुति करावी; राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.”—१ तीमथ्य २:१, २.
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांवर लादलेले कर कधी कधी त्यांना पेलवत नसले तरीही न चुकता, अगदी प्रामाणिकपणे ते सर्व कर भरायचे. या बाबतीत, प्रेषित पौलाने ईश्वरप्रेरणेने दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन त्यांनी केले: “ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या.” (रोमकर १३:७) समाजात शांती आणि स्थैर्य आणण्यात रोमी सरकारचा आणि रोमी अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असल्यामुळे ते देवाच्या संमतीने राज्य करतात आणि एका अर्थाने ते ‘देवाची सेवा’ करतात असे येशूच्या शिष्यांचे मत होते.—रोमकर १३:६.
“प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध”
सरकारने लादलेल्या नागरी कर्तव्यांचे पालन करण्याचे उत्तेजनही पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना देण्यात आले होते. नागरी अधिकाऱ्यांनी जी मागणी केली होती, प्रसंगी त्यापेक्षा अधिक करण्याचा सल्ला खुद्द येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दिला होता. त्याने म्हटले: “जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.” (मत्तय ५:४१) ख्रिश्चनांनी या सल्ल्याचे अनुकरण केले आणि असे करण्याद्वारे त्यांनी हेच दाखवले, की काहीएक योगदान न करता आयत्या सुसंस्कृत समाजात राहण्याचे लाभ त्यांना उठवायचे नव्हते. ते नेहमी “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध” होते.—तीत ३:१; १ पेत्र २:१३-१६.
आपल्या शेजाऱ्यांवर ते मनापासून प्रेम करायचे आणि आपल्या शेजाऱ्यांना मदत करण्यासही ते नेहमी तयार असायचे. (मत्तय २२:३९) त्यांच्या या प्रेमामुळे आणि त्यांचे आचरण नेहमी उच्च नैतिक दर्जांनुसार असल्यामुळे पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी समाजावर सकारात्मक प्रभाव पाडला. म्हणूनच, आपला शेजारी एक ख्रिस्ती आहे याचा त्यांच्या शेजाऱ्यांना आनंद वाटणे साहजिक होते. (रोमकर १३:८-१०) पण, ख्रिश्चनांनी आपले हे प्रेम दाखवून दिले ते केवळ वाईटापासून दूर राहून नव्हे; तर इतरांसोबत मनमिसळून, इतरांबद्दल कृतिशील कळकळ दाखवून आणि “सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे” करून देखील आपले प्रेम व्यक्त करण्याचे त्यांना प्रोत्साहन दिले जात असे.—गलतीकर ६:१०.
‘मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा माना’
पण, पहिल्या शतकातील ख्रिस्ती, वरिष्ठ अधिकाऱ्यांना जी आज्ञाधारकता दाखवत होते ती मर्यादित स्वरूपाची होती. ज्यामुळे आपल्या सदसद्विवेकाचे उल्लंघन होईल किंवा देवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येईल असे कोणतेही काम करायला ते तयार झाले नाहीत. उदाहरणार्थ, येरूशलेमच्या धार्मिक अधिकाऱ्यांनी प्रेषितांना आपले प्रचार कार्य बंद करण्याचा हुकूम दिला तेव्हा प्रेषितांनी साफ नकार दर्शवला. “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे” असे त्यांनी जाहीरपणे म्हटले. (प्रेषितांची कृत्ये ५:२७-२९) तसेच, मूर्तीपूजेत मोडणारी सम्राटाची उपासना करण्यासही ख्रिश्चनांनी निग्रहाने नकार दिला. (१ करिंथकर १०:१४; १ योहान ५:२१; प्रकटीकरण १९:१०) याचा परिणाम काय झाला? इतिहासकार जे. एम. रॉबट्र्स यांच्या मते, याचा परिणाम असा झाला की, “लोकांनी त्यांची प्रखर टीका केली; ते ख्रिस्ती होते म्हणून नव्हे तर त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले होते म्हणून.”—शॉर्टर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड.
पण, प्रश्न हा आहे की या ठिकाणी पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी ‘कायद्याचे उल्लंघन’ का केले? कारण, ‘वरिष्ठ अधिकारी’ देवाच्या संमतीने सत्ता गाजवत असून समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात ते “देवाचे सेवक” या अर्थाने कार्य करत असल्याचे त्यांना माहीत असले तरीही त्यांच्यासाठी देवाचा कायदा सर्वांत श्रेष्ठ होता. (रोमकर १३:१, ४) आपल्या होणाऱ्या अनुयायांसाठी येशू ख्रिस्ताने जो समतोल सिद्धान्त घालून दिला होता तो त्यांच्या लक्षात होता: “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” (मत्तय २२:२१) होय, कैसराच्या मागण्यांच्या तुलनेत देवाप्रती असलेल्या त्यांच्या कर्तव्यांना त्यांना सर्वाधिक महत्त्व द्यायचे होते.
आणि असे करणे रास्तच होते; ही गोष्ट, अनेक नामधारी ख्रिश्चनांनी येशूने घालून दिलेल्या उत्तम सिद्धान्तांचे पालन न केल्यामुळे निष्पन्न झालेल्या परिणामांवरून दिसून येते. उदाहरणार्थ, “लष्करी दल उभारण्यासाठी तसेच त्यावर देखरेख ठेवण्यासाठी” ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मत्यागी नेते “नागरी सरकारच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्यांसारखे” बनले असे लष्करी इतिहासकार जॉन कीगनचे म्हणणे आहे. परिणामस्वरूप, या धर्मत्यागी नेत्यांच्या अनुयायांनी युद्धांत भाग घेऊन लाखो निरपराधी लोकांचे रक्त सांडले. “लोकांचे रक्त तापले तेव्हा त्यांनी देवाचे कायदेकानून धाब्यावर बसवून दिले,” असे कीगनने म्हटले.
पण, याबाबतीत पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी मात्र उचित समतोल राखून एक उल्लेखनीय उदाहरण मांडले. ते खरोखरच आदर्श नागरिक होऊन गेले. आपली नागरी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या अगदी कर्तव्यनिष्ठ भावनेने त्यांनी पार पाडल्या. पण, त्याच वेळी जीवनाच्या हरएक पैलूत बायबलमध्ये घालून दिलेले सिद्धान्त त्यांनी लागू केले आणि बायबलद्वारे प्रशिक्षित केलेल्या आपल्या विवेकानुसार ते वागले.—यशया २:४; मत्तय २६:५२; रोमकर १३:५; १ पेत्र ३:१६.
[२६ पानांवरील चित्र]
‘तर मग कैसराचे ते कैसराला भरा’