जगावरील दृष्टिक्षेप
महागड्या मयती
टाईम्स ऑफ झँबिया या वृत्तपत्राच्या अहवालानुसार “आज राहणीमानाचा खर्च तर वाढतोच आहे, पण मरणाचा खर्च त्याहून वाढत आहे.” झँबियासोबतच आफ्रिकेच्या बऱ्याचशा भागांत तब्बल एक आठवडा आणि कधीकधी तर त्याहून अधिक दिवस चालणाऱ्या शोक संस्कारांत दूरुन येणाऱ्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना सहभाग घेता यावा म्हणून अंत्यसंस्कारात नको तितकी दिरंगाई केली जाते. त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय पाहावी लागते. शिवाय, परतण्याचा खर्चही गरजू लोकांना द्यावा लागतो. अशा मयतींमुळे शोकित कुटुंबे आणखीनच दारिद्र्याच्या खाईत लोटली जातात. सदर अहवाल म्हणतो, “काडीचीही मदत न करणाऱ्या असंख्य शोकितांमुळे आधुनिक मयती अधिकाधिक खर्चिक होत आहेत.” शोकित कुटुंबावरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी एखाद्याचा मृत्यू झाल्यास लागलीच मयत आटोपली जावी असा सल्ला हे वृत्तपत्र देते.
हिरवा चहा—कर्करोगावरील संभाव्य इलाज
अभ्यासांवरून निष्पन्न होते, की हिरवा चहा घेणाऱ्या लोकांना सहसा कर्करोग होत नाही आणि ज्या प्राण्यांना हा चहा दिला जातो त्यांच्यावरही हिरव्या चहाचा हाच परिणाम होत असल्याचे दिसून येते. याचे एक कारण काय असावे हे अलीकडेच इंडियाना, यु.एस.ए. मधील पर्ड्यू विद्यापीठातील संशोधकांच्या लक्षात आले आहे, असा विज्ञान वार्ता (इंग्रजी) नियतकालिकाचा अहवाल म्हणतो. हिरव्या चहामध्ये असलेला एपिगॅलोकेटिचीन गॅलेट (इजीसीजी) नावाचा एक पदार्थ कॅन्सरच्या पेशींची वाढ उत्तेजित करण्यास आवश्यक असणारे विशिष्ट प्रथिन प्रक्रिया निष्क्रिय करून टाकते. अर्थात, सर्वसाधारण पेशींवर देखील इजीसीजीचा असाच परिणाम होत असल्याचे दिसत नाही. आज जगभरात चहा पिणाऱ्यांपैकी सुमारे ८० टक्के लोक काळा चहा पितात; पण, काळ्या चहात फारच कमी इजीसीजी पदार्थ असतो. टेस्ट ट्यूबइतक्या वाढवलेल्या कॅन्सरच्या पेशींमधील प्रथिन प्रक्रिया निष्क्रिय करण्यात हिरव्या चहाच्या तुलनेत काळा चहा केवळ एक दशांश ते एक शतांश इतकाच परिणामकारक का असतो हे वरील वस्तुस्थितीवरून स्पष्ट होते असे संशोधकांचे म्हणणे आहे.
मुलांनो, कुत्र्यापासून सावध!
युसी बर्कली व्हेलनेस लेटरच्या अहवालानुसार जास्तकरून लहान मुलेच कुत्र्यांच्या चाव्याला बळी पडतात. पण, हे टाळता येण्यासारखे आहे असे सदर अहवालाचे म्हणणे आहे. त्यासाठी व्हेलनेस लेटर असा सल्ला देते, की सर्वात प्रथम, पालकांनी चांगल्या सवयी असलेल्या पिल्लाची निवड करावी; मग, त्याचे जननेंद्रिय काढून टाकावे आणि त्याला प्रेमाने पण तितक्याच कडकपणे आज्ञा पाळण्याचे, लोकांशी आणि खासकरून मुलांशी मैत्रिपूर्ण असण्यास शिकवले जावे. व्हेलनेस लेटर असेही म्हणते: “सगळ्यात सुस्वभावी, शांत कुत्रा देखील घरात नवजात बालकाच्या आगमनाने खूष होईलच किंवा बाळाचा आदर करीलच असे नाही. तेव्हा, त्याच्यावर सतत लक्ष असू द्या.” मुलांनी स्वतःहून कुत्र्याशी ओळख करण्याचा प्रयत्न करू नये; तर कुत्र्याच्या मालकाने मुलांना कुत्र्याची ओळख करून द्यावी ही गोष्ट मुलांना सांगण्यात यावी. ओळख करून दिल्यानंतर कुत्र्याशी बोला आणि वास घेण्यासाठी झाकली मूठ कुत्र्यासमोर करा. कुत्रा गुरगुरला किंवा रागावला तर शांत राहा, तिथून पळून जाऊ नका. कारण, “लांडग्यांप्रमाणे कुत्री देखील पळून जाणाऱ्याचा पिच्छा करून त्याच्यावर हल्ला करतात,” असे व्हेलनेस लेटरचे म्हणणे आहे.
अपघात टाळण्यासाठी संतुलित व्यायाम
द न्यू यॉर्क टाईम्स अहवाल देते की, “वयाची पासष्टी ओलांडलेल्या एकतृतीयांश लोकांचा वर्षातून एकदा तरी तोल जाऊन अपघात होतो आणि त्यात बहुतेकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती होतात; उदाहरणार्थ, कधीही बरी न होऊ शकणारी कमरमोड.” वय वाढत जाते तसे तोल सांभाळण्याची शरीराची क्षमता कमी-कमी होत जाते. अलीकडेच, कनेक्टिकट वैद्यकीय प्रशालेच्या विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासातून दिसून आले, की एका पायावर उभे राहणे किंवा एखाद्या फळीवरून चालणे यांसारखे तोल सांभाळण्याचे व्यायाम नियमितपणे केल्याने वयोवृद्धांना आपला तोल सांभाळण्यास अधिक मदत होऊ शकते. पण, तोल सांभाळण्याचे हे व्यायाम हळूहळू सुरवात करून आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा दहा मिनिटांपर्यंत करावे असे सलीवन ॲण्ड क्रॉम्वेल कॉर्पोरेट फिटनेस सेंटरच्या जीना आल्चिन सल्ला देतात. “अर्थात, अशा प्रकारची तालीम फार फसवी असू शकते; एकदा-दोनदा केल्यानंतर तुम्हाला ते अधिकाधिक करावेसे वाटते. पण, व्यायामाचा अतिरेक झाल्यास भयंकर थकवा किंवा अंगदुःखी जाणवण्याची शक्यता असते,” असेही त्या म्हणतात.
शिक्षण आणि बालमृत्यूप्रमाण
द स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन १९९९—एज्युकेशन या संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधी अहवालानुसार, “इ.स. २०१० पर्यंत जगभरातील सर्वांना कमीतकमी प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी पुढील दशकात ७०० कोटी डॉलरची आवश्यकता आहे. पण, ही रक्कम, युरोपियन लोक आइस्क्रीमवर किंवा अमेरिकन लोक सौंदर्यप्रसाधनांवर खर्च करतात त्याच्यासमोर काहीच नाही.” टाईम्स ऑफ इंडियानुसार, भारतात केवळ ६६ टक्के पुरुष आणि ३८ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. ज्या स्त्रिया निदान प्राथमिक शाळेपर्यंत शिकतात त्यांच्यातील बालमृत्यू प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ, अशा मूलभूत शिक्षणाचा परिणाम भारताच्या दक्षिण राज्यात अर्थात केरळमध्ये दिसून येतो; त्या ठिकाणी ९० टक्के साक्षरता असून “विकसनशील देशांपैकी तेथील बालमृत्यू प्रमाण सगळ्यात कमी आहे.”
पहिले दहा संसर्गजन्य मारक
दरवर्षी संसर्गजन्य रोग जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतात. नैसर्गिक इतिहास (इंग्रजी) या नियतकालिकानुसार १९९७ साली पुढील दहा संसर्गजन्य रोग सगळ्यात जीवघेणे रोग ठरले. न्यूमोनिआसारखा तीव्र स्वरूपी कमी-श्वसन संसर्ग रोग पहिल्या क्रमांकावर होता आणि तो ३७ लाख लोकांच्या जीवावर बेतला. त्याच्या खालोखाल असलेल्या क्षयरोगाने २९ लाख लोकांचा बळी घेतला. कॉलरा आणि अतिसाराचे इतर रोग तिसऱ्या क्रमांकावर होते आणि त्यात २५ लाख लोक मृत्यूमुखी पडले. चवथ्या क्रमांकावरील एड्सने चक्क २३ लाख लोकांना स्मशानाची वाट दाखवली. त्यानंतर अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमावर असलेल्या मलेरियामुळे १५ ते २७ लाख लोक, तर गोवरामुळे ९,६०,००० लोक मरण पावले. सातव्या क्रमांकावर असलेल्या हेपाटायटिस बीमुळे ६,०५,००० लोक मृत्यूमुखी पडले. मग, आठव्या क्रमांकावर होता डांग्या खोकला ज्याने ४,१०,००० लोकांचा बळी घेतला. त्यानंतर धनुर्वात या नवव्या रोगामुळे २,७५,००० लोक वारले. आणि शेवटी, दहाव्या क्रमावर असलेल्या डेंग्यू/डेंग्यूच्या तापामुळे १,४०,००० लोक दगावले. मनुष्याने आपली सगळी शक्ती पणाला लावूनसुद्धा हे जुने संसर्गजन्य रोग अजूनही जगातल्या बऱ्याचशा लोकांच्या आरोग्याला धोका ठरत आहे.
हलकेफुलके वाचन
भरपूर पुस्तके बाळगणारा मनुष्य पुस्तक वेडा असतोच असे नाही. उदाहरणार्थ, क्रिस माटेअस नामक एक दुकानदार कबूल करतो: “मला माझ्या अवतीभोवती भरपूर पुस्तकं मांडायला आवडतात; पण खरं तर फारच क्वचित मी पुस्तकं वाचतो.” यावर माटेअस एक परवडण्याजोगा उपाय सूचवतात. वेसर-कुरिअर वृत्तपत्राच्या अहवालानुसार माटेअसने एका व्यक्तीच्या भागीदारीने नकली पुस्तकांचे पहिले दुकान जर्मनीमध्ये उघडले. त्यात कला, तत्त्वज्ञान आणि विज्ञानाच्या विषयावरील सुमारे २,८०० “नकली पुस्तके” लिलावात विक्रीला मांडली होती. ही नकली पुस्तके, साध्या पुठ्ठ्याच्या पुस्तकांपासून उच्च श्रेणीच्या, महागड्या सागवानी पुस्तकांपर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या रचनेची होती. एरवी सोन्याच्या भावाने विकली जाणारी कलाविषयक आकर्षक नकली पुस्तके फक्त १० ते १५ डॉलरला विकली गेली. माटेअस म्हणतात: “पुस्तकांची किंमत त्यातील विषयांवर नव्हे तर आकारावर ठरवली जाते.”
आरोग्यदायी व्हिडिओ गेम्स
‘व्हिडिओ गेम्सचा’ उल्लेख करताच अनेकांच्या डोळ्यांसमोर हिंसात्मक खेळाचे दृश्य उभे राहते. टेक्नोलॉजी रिव्ह्यूच्या अहवालानुसार “उचित प्रकारचा खेळ मुलांना आपला मधूमेह आणि दमा आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण देऊ शकतो.” स्टॅन्फोर्ड विद्यापीठ वैद्यकीय केंद्राने मधूमेह झालेल्या ८ ते १६ वर्षे वयोगटांतील सुमारे ६० मुलांचा अभ्यास केला. या पैकी निम्मी मुले सर्वसामान्य व्हिडिओ गेम खेळणारी होती; तर बाकीची सर्व, पॅकी ॲण्ड मार्लोन नावाचे गेम खेळणारी होती; या दुसऱ्या खेळात, ॲनिमेट केलेले दोन हत्ती खेळाडूंना योग्य आहाराची निवड करण्यात, आपले ग्लूकोज प्रमाण तपासण्यात आणि इंस्यूलीनचा उचित उपयोग करण्यात मार्गदर्शित करतात. याचा परिणाम असा झाला, की सहा महिन्यांच्या कालावधीत, सर्वसाधारण व्हिडिओ गेम खेळणाऱ्या मुलांच्या तुलनेत हत्ती खेळ खेळणाऱ्या मुलांचे “तातडीने डॉक्टरांकडे धावणे किंवा तातडीच्या विभागात हलवण्याचे प्रमाणात ७७ टक्के घसरले” असे टेक्नोलॉजी रिव्ह्यू म्हणते. दमा आटोक्यात आणण्यासाठी तसेच धूम्रपान टाळण्यासाठी मुलांना मदत करणारे असे आणखीनही व्हिडिओ गेम्स काढले गेले आहेत.
एड्सचे थैमान
गेल्या दशकात आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिणेकडील भागात, जन्माच्या वेळेची अपेक्षित आयुर्मर्यादा जवळजवळ सहा वर्षांनी घसरली असून पुढे ती आणखीन घसरण्याची शक्यता आहे. असे का? कारण या देशांत “एड्सच्या साथीने आपली घोडदौड सुरू केली आहे,” असे युनेस्को कोरिअरचा अहवाल म्हणतो. आजमितीला, या प्रदेशातील १० टक्क्यांहून अधिक लोकांना, एड्सला जन्मी घालणाऱ्या जीवाणूची अर्थात एचआयव्हीची लागण झालेली आहे. या रोगाचा सगळ्यात जबरदस्त तडाखा बसला आहे तो बोट्स्वाना, मलावी, मोझांबिक, नामिबिया, दक्षिण आफ्रिका, झँबिया आणि झिम्बाब्वे या देशांना. याशिवाय, संयुक्त राष्ट्र म्हणते की, “एड्समुळे दररोज ५,५०० लोक दगावतात,” असा द न्यू यॉर्क टाईम्सचा अहवाल आहे.