वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ५/१ पृ. ५-८
  • प्रारंभिक ख्रिस्ती विश्‍वास व सरकार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रारंभिक ख्रिस्ती विश्‍वास व सरकार
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जगिक नाहीत पण विरोधी देखील नाहीत
  • भक्‍ती नव्हे, मान
  • “समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर”
  • कैसराला ‘द्यावयाच्या’ गोष्टी त्यास देणे
  • दोन प्रतिस्पर्धी मागण्यांमध्ये काटेकोर संतुलन
  • सरकारसोबत तडजोड
  • देव आणि कैसर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • आदर्श नागरिक कोण असतो?
    सावध राहा!—१९९९
  • कैसराचे ते कैसराला देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना आमची सापेक्ष अधीनता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ५/१ पृ. ५-८

प्रारंभिक ख्रिस्ती विश्‍वास व सरकार

येशूच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते.” (योहान १५:१९) तथापि, ख्रिश्‍चन लोक या जगाच्या अधिकाऱ्‍यांप्रती एक विरोधी मनोवृत्ती पत्करणार होते असा याचा अर्थ होतो का?

जगिक नाहीत पण विरोधी देखील नाहीत

रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने सांगितले: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे.” (रोमकर १३:१) त्याचप्रमाणे प्रेषित पेत्राने लिहिले: “प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन; आणि अधिकारी हे वाईट करणाऱ्‍यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणाऱ्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठविलेले आहेत, म्हणून त्यांच्याहि अधीन असा.” (१ पेत्र २:१३, १४) सरकार व त्याद्वारे यथायोग्यपणे नियुक्‍त प्रतिनिधींप्रती अधीनता, हे प्रारंभिक ख्रिश्‍चनांत एक स्वीकृत तत्त्व होते. त्यांनी नियम पाळणारे नागरिक होण्याचा व सर्व माणसांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न केला.—रोमकर १२:१८.

“चर्च व सरकार” या शीर्षकाखाली धर्म विश्‍वकोष (इंग्रजी), असे म्हणतो: “इसवी सनाच्या पहिल्या तीन शतकांत, ख्रिश्‍चन चर्च हे अधिकृत रोमी समाजापासून मोठ्या प्रमाणावर अलिप्त होते. . . . तरीसुद्धा, ख्रिश्‍चन पुढाऱ्‍यांनी, . . . ख्रिश्‍चन विश्‍वासाने घालून दिलेल्या मर्यादांमध्ये, रोमी कायद्याला आज्ञाधारक व राजाला निष्ठावान राहण्याचे शिक्षण दिले.”

भक्‍ती नव्हे, मान

ख्रिश्‍चन लोक रोमी सम्राटाच्या विरोधात नव्हते. त्यांनी त्याच्या अधिकाराला मान दिला व त्याच्या हुद्याला यथायोग्य आदर दिला. सम्राट नेरोच्या कारकिर्दीत, प्रेषित पेत्राने रोमी राज्याच्या विविध भागांत राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “सर्वांस मान द्या. . . . राजाचा मान राखा.” (१ पेत्र २:१७) ग्रीक भाषिक जगात ‘राजा’ हा शब्द, केवळ स्थानीय राजांसाठीच नव्हे तर रोमी सम्राटाला संबोधण्यास देखील वापरण्यात येत असे. रोमी साम्राज्याच्या राजधानीत राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने सल्ला दिला: “ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; . . . ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान करा.” (रोमकर १३:७) रोमी सम्राटाने निश्‍चितच सन्मानाची मागणी केली. कालांतराने त्याने भक्‍तीची देखील मागणी केली. येथे मात्र ख्रिश्‍चनांनी आपली मर्यादा स्पष्ट केली.

अहवालानुसार सा. यु.  दुसऱ्‍या शतकात पॉलीकार्पने आपल्या न्यायचौकशीदरम्यान एका रोमी सुभेदारापुढे असे जाहीर केले: “मी एक ख्रिश्‍चन आहे. . . . देवाकडून अधिकार मिळालेल्या सत्तांना व अधिकारांना यथायोग्य आदर देण्याचे शिक्षण आम्हाला दिले जाते.” तथापि, सम्राटाची भक्‍ती करण्याऐवजी पॉलीकार्पने मरण पत्करले. दुसऱ्‍या शतकाचा आत्मसमर्थक, अंतुखियाचा थियोफिलस याने लिहिले: “मी सम्राटास मान देईन, अर्थात त्याची भक्‍ती करून नव्हे तर त्याच्यासाठी प्रार्थना करून. परंतु देवाची, जिवंत व खऱ्‍या देवाची मी भक्‍ती करतो.”

सम्राटासाठी उचित प्रार्थना, सम्राटाची भक्‍ती अथवा राष्ट्रवादाशी मुळीच संबंधित नव्हत्या. प्रेषित पौलाने त्यांचा उद्देश स्पष्ट केला: “तर सर्वात प्रथम हा बोध मी करितो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुति करावी; राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकरिता करावी, ह्‍यासाठी की, पूर्ण सुभक्‍तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.”—१ तीमथ्य २:१, २.

“समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर”

या आदरणीय आचरणामुळे सुरवातीचे ख्रिश्‍चन राहात होते त्या जगाची मैत्री, त्यांना मिळाली नाही. फ्रेंच इतिहासकार ए. आमॉन सांगतात, की प्रारंभिक ख्रिश्‍चन “समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर राहात होते.” खरे तर ते दोन समाजांच्या मुख्य प्रवाहाबाहेर होते, पहिला यहुदी व दुसरा म्हणजे रोमी, आणि परिणामस्वरूप त्यांना दोघांकडून बरेच पूर्वग्रह व गैरसमज यांस सामोरे जावे लागले.

उदाहरणार्थ, यहुदी पुढाऱ्‍यांनी पौलावर खोटा आरोप लावला होता तेव्हा त्याने रोमी सुभेदारासमोर आपली बाजू मांडताना असे म्हटले: “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही. . . . मी कैसराजवळ न्याय मागतो!” (प्रेषितांची कृत्ये २५:८, ११) यहुदी लोक आपल्याला ठार मारण्याचा कट करत आहेत याची पौलाला कल्पना असल्यामुळे त्याने नेरोकडे याचना केली व याद्वारे रोमी सम्राटाच्या अधिकारास मान्यता दर्शवली. यानंतर, रोममध्ये पहिल्या चौकशीच्या वेळेस, पौलाची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे दिसते. परंतु, कालांतराने त्यास पुन्हा तुरुंगवास झाला व नेरोच्या आदेशानुसार त्यास मृत्युदंड देण्यात आला असे परंपरागतपणे समजले जाते.

रोमी समाजात प्रारंभिक ख्रिश्‍चन लोकांच्या कठीण स्थितीबद्दल समाजशास्त्रज्ञ व धर्मशास्त्रज्ञ अर्न्स्ट ट्रोल्टश्‍च यांनी लिहिले: “मूर्तिपूजा, सम्राटाची उपासना किंवा रक्‍तपात अथवा देहान्त शिक्षेसोबत संबंधित असलेले किंवा मग ख्रिश्‍चनांना मूर्तिपूजक अनैतिकतेच्या संपर्कात आणतील असे सर्व हुद्दे व व्यवसाय प्रतिबंधित होते.” या पावित्र्यामुळे ख्रिश्‍चन लोक व सरकार यांत शांतिमय व परस्पर आदरणीय नातेसंबंध अगदीच अशक्य बनला होता का?

कैसराला ‘द्यावयाच्या’ गोष्टी त्यास देणे

“कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा,” असे घोषित करतेवेळी येशूने, रोमी सरकारप्रती किंवा कोणत्याही शासनाप्रती, ख्रिश्‍चन लोकांच्या व्यवहारास नियंत्रित करील असा नियम दिला. (मत्तय २२:२१) येशूच्या शिष्यांना दिलेला हा सल्ला, रोमी वर्चस्वाचा निषेध करणाऱ्‍या व परदेशी सत्तेला कर भरण्याच्या कायदेशीरपणाविषयी आक्षेप घेणाऱ्‍या अनेक राष्ट्रवादी यहुद्यांच्या मनोवृत्तीच्या अगदी विरोधात होता.

पुढे, रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चन लोकांना पौलाने सांगितले: “म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्‌विवेकबुद्धीमुळेहि अधीन राहणे अगत्याचे आहे. ह्‍या कारणास्तव तुम्ही करहि देता; कारण अधिकारी [सरकारी ‘वरिष्ठ अधिकारी’] देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्‍याच सेवेत तत्पर असतात. ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यावयाची त्याला ती द्या.” (रोमकर १३:५-७) ख्रिश्‍चन लोक जगाचे भाग नसले तरीही, प्रामाणिक तसेच, कर भरणारे नागरिक असणे व याद्वारे, सरकारकडून मिळालेल्या सेवांबद्दल त्यास मोबदला देणे, हे त्यांचे कर्तव्य होते.—योहान १७:१६.

परंतु येशूचे शब्द कर देण्यापर्यंतच मर्यादित आहेत का? कैसराचे काय व देवाचे काय, याचे येशूने स्पष्टपणे विवेचन न केल्यामुळे, काही मधल्यामधील प्रश्‍न, परिस्थितीप्रमाणे किंवा सबंध बायबलच्या आपल्या समजुतीला अनुलक्षून सोडवावे लागतील. दुसऱ्‍या शब्दांत बोलायचे झाल्यास, एखाद्या ख्रिश्‍चनाला कैसरास कोणत्या गोष्टी देता येतील हे ठरवण्यात कधीकधी, त्या ख्रिश्‍चनाचा बायबल तत्त्वांनी शिक्षित असलेला विवेक सम्मिलित असेल.

दोन प्रतिस्पर्धी मागण्यांमध्ये काटेकोर संतुलन

कैसराचे ते कैसराला दिले पाहिजे असे म्हटल्यानंतर “देवाचे ते देवाला द्या” असे येशूने पुढे म्हटले, हे सहसा पुष्कळ जण विसरून जातात. ख्रिश्‍चनांनी कोणाला प्राधान्य द्यावे हे प्रेषित पेत्राने दाखविले. ‘राजा‘ किंवा सम्राटाला तसेच त्याच्या ‘अधिकाऱ्‍यांना’ अधीन असण्याविषयी सल्ला दिल्यावर लगेच पेत्राने लिहिले: “दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करिता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा. सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.” (१ पेत्र २:१६, १७) प्रेषिताने दाखवले की ख्रिश्‍चन लोक मानवी शासनकर्त्याचे नव्हे तर देवाचे दास आहेत. त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींचा योग्य मान राखला पाहिजे व त्यांना आदर दिला पाहिजे हे खरे असले तरीसुद्धा, त्यांनी, ज्याचे नियम सर्वश्रेष्ठ आहेत त्याचे, अर्थात देवाचे भय राखून हे करायचे होते.

पेत्राने अनेक वर्षांपूर्वीच, मानवाच्या नियमांपेक्षा देवाचे नियम श्रेष्ठ असल्याची खात्री पटवून दिली होती. यहुदी न्यायसभा म्हणजे एक विधायक मंडळ होते, ज्यास रोमी लोकांनी मुलकी तसेच धार्मिक असे दोन्ही अधिकार सोपवले होते. या न्यायसभेने येशूच्या शिष्यांना ख्रिस्ताच्या नावाने प्रचार करण्याचे थांबवण्याचा आदेश दिला तेव्हा पेत्र व इतर प्रेषितांनी आदराने परंतु खंबीरपणे उत्तर दिले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२९) स्पष्टपणे, प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी देवाला आज्ञाधारकता व मानवी अधिकाऱ्‍यांना योग्य अधीनता या दोहोंत काटेकोर संतुलन राखायचे होते. सा. यु.  तिसऱ्‍या शतकाच्या सुरवातीच्या काळात टर्टुलियनने हे अशा प्रकारे व्यक्‍त केले: “सर्वकाही कैसराचे असल्यास देवासाठी काय उरेल?”

सरकारसोबत तडजोड

कालांतराने, प्रथम शतकातील ख्रिश्‍चनांनी सरकारसंबंधी पत्करलेला पावित्रा हळूहळू शिथिल होऊ लागला. येशू व प्रेषितांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे सा. यु.  दुसऱ्‍या व तिसऱ्‍या शतकांत धर्मत्याग फोफावला. (मत्तय १३:३७, ३८; प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ थेस्सलनीकाकर २:३-१२; २ पेत्र २:१-३) धर्मत्यागी ख्रिस्ती विश्‍वासाने रोमी जगताशी तडजोड केली, त्याचे मूर्तिपूजक सण व त्याचे तत्त्वज्ञान पत्करले आणि मुलकी सेवाच नव्हे तर लष्करी सेवा देखील स्वीकारली.

प्राध्यापक ट्रोल्टश्‍च यांनी लिहिले: “तिसऱ्‍या शतकापासून तर स्थिती आणखीनच बिकट झाली कारण समाजाच्या उच्च पदांवर व प्रमुख व्यवसायांत, लष्करात व अधिकारी वर्गांत ख्रिश्‍चन लोकांची संख्या वाढत गेली. [बायबलवर आधारित नसलेल्या] ख्रिश्‍चन लिखाणांच्या अनेक उताऱ्‍यांत, या गोष्टींत भाग घेण्याबद्दल संतप्त निषेध नमूद आहेत; तर दुसरीकडे पाहता तडजोड करण्याचेही प्रयास म्हणजेच अस्वस्थ विवेकांना शांत करतील अशा प्रकारे लिहिण्यात आलेल्या सबबीसुद्धा दिसून येतात . . . कॉन्स्टंटाइनच्या काळापासून मात्र या अडचणी नाहीशा झाल्या; ख्रिश्‍चन व मूर्तिपूजक लोकांमधील संघर्ष थांबला, व सरकारातील सर्व पदे खुली करण्यात आली.”

सा. यु.  चौथे शतक संपत आले होते तेव्हा, ख्रिस्ती विश्‍वासाचे हे दूषित झालेले, तडजोड करणारे रूप, रोमी साम्राज्याचा राष्ट्रीय धर्म बनले.

कॅथलिक, ऑर्थोडॉक्स व प्रॉटेस्टंट चर्चद्वारे प्रतिनिधीत्व करण्यात आलेल्या ख्रिस्ती धर्मजगताने आपल्या सबंध इतिहासात सरकारसोबत तडजोड करणे, स्वतःस त्याच्या राजकारणात पूर्णपणे गोवून घेणे व त्याच्या युद्धांत त्यास पाठिंबा देणे हे सुरूच ठेवले आहे. यामुळे थक्क झालेल्या अनेक प्रांजळ चर्च सदस्यांना जाणून आनंद होईल, की सरकारसोबतच्या नातेसंबंधाविषयी प्रथम शतकातील ख्रिश्‍चनांचा पावित्रा कायम राखणारे ख्रिश्‍चन अजूनही अस्तित्वात आहेत. पुढील दोन लेख याबाबतीत आणखीन तपशीलवार चर्चा करतील.

[५ पानांवरील चित्रं]

कैसर नेरो, ज्याबद्दल पेत्राने असे लिहिले, “राजाचा मान राखा”

[६ पानांवरील चित्रं]

सम्राटाची भक्‍ती करण्याऐवजी पॉलीकार्पने मृत्यू पत्करला

[७ पानांवरील चित्रं]

प्रारंभिक ख्रिश्‍चन लोक शांतीपूर्ण, प्रामाणिक, कर भरणारे नागरिक होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा