कैसराचे ते कैसराला देणे
“ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या.”—रोमकर १३:७.
१, २. (अ) येशूच्या मते, ख्रिश्चनांनी देव आणि कैसर यांच्या बंधनांमध्ये कशाप्रकारे समतोल राखला पाहिजे? (ब) यहोवाच्या साक्षीदारांचे प्रथम कर्तव्य कोणते आहे?
येशूच्या मते, आपल्याला देव आणि कैसर किंवा सरकार, यांना काही गोष्टी द्याव्या लागतात. येशू म्हणाला: “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” या मोजक्या शब्दांतच त्याने आपल्या शत्रूंना गोंधळात टाकले आणि देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधात आणि सरकारसोबतच्या आपल्या व्यवहारातील समतोल दृष्टिकोन संक्षिप्तपणे सांगितला. त्याचे श्रोते “त्याच्याविषयी फार आश्चर्य” करू लागले यात काही नवल नाही!—मार्क १२:१७.
२ अर्थात, यहोवाच्या सेवकांचे प्रथम कर्तव्य देवाचे ते देवाला देणे हे आहे. (स्तोत्र ११६:१२-१४) परंतु असे करत असताना ते, त्यांनी विशिष्ट गोष्टी कैसराला दिल्या पाहिजेत असे येशू जे म्हणाला होता त्याला विसरून जात नाहीत. त्यांचे बायबल-प्रशिक्षित विवेक त्यांना, कैसर जे काही मागतो ते किती प्रमाणात ते देऊ शकतील याचा प्रार्थनापूर्वक विचार करावयास लावतात. (रोमकर १३:७) आधुनिक काळामध्ये, अनेक विधिवेत्त्यांनी हे जाणले आहे, की सरकारी सत्तेच्या काही सीमा आहेत व लोकांवर आणि सरकारांवर सर्वत्र नैसर्गिक नियमाचे बंधन आहे.
३, ४. नैसर्गिक नियम, प्रकट नियम आणि मानवी नियम याबद्दल कोणती उल्लेखनीय विवेचने करण्यात आली आहेत?
३ “देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीहि सबब राहू नये,” असे जगाच्या लोकांविषयी लिहिले तेव्हा या नैसर्गिक नियमाचा प्रेषित पौलाने उल्लेख केला: जर त्यांनी त्याला प्रतिसाद दिला तर नैसर्गिक नियम त्या विश्वास न ठेवणाऱ्या लोकांच्या विवेकांना देखील प्रवृत्त करु शकतो. अशा प्रकारे पौल पुढे म्हणाला: “ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेकबुद्धिहि त्यांना साक्ष देते.”—रोमकर १:१९, २०; २:१४, १५.
४ १८ व्या शतकात, प्रसिद्ध इंग्रज विधिवेत्ता विल्यम ब्लॅकस्टोन यांनी असे लिहिले: “निसर्गाचा हा नियम [नैसर्गिक नियम], मानवजातीचा समकालीन [तिच्याच वयाचा] व स्वतः देवाने प्रेरित केलेला असून बाध्यतेमध्ये इतर कोणत्याही नियमापेक्षा खरोखरच श्रेष्ठ आहे. तो संपूर्ण पृथ्वीवर, सर्व राष्ट्रांमध्ये, आणि सर्वदा बंधनकारक आहे: मानवी नियम त्याच्या विरोधात असल्यास त्यांचे काहीच महत्त्व राहत नाही.” ब्लॅकस्टोन पुढे बायबलमध्ये आढळणाऱ्या ‘प्रगट नियमाविषयी’ बोलले व त्यांनी असे विवेचन केले: “निसर्गाचा नियम आणि प्रकटीकरणाचा नियम, या दोन पायांवर सर्व मानवी नियम आधारित आहेत; म्हणजे, कोणत्याही मानवी नियमांना यांच्या विरोधात जाण्याची मुभा [परवानगी] देता कामा नये.” ही गोष्ट मार्क १२:१७ मध्ये लिहिल्याप्रमाणे देव आणि कैसर यांच्याबाबतीत येशू जे काय म्हणाला त्याच्या सुसंगतेत आहे. स्पष्टतः, कैसर एखाद्या ख्रिश्चनाकडून जी मागणी करतो त्यास देवाच्या मर्यादा असणारे काही क्षेत्र आहेत. सन्हेद्रिनने प्रेषितांना येशूबद्दल प्रचार करण्याचे थांबवण्यास सांगितले तेव्हा ते अशा क्षेत्रात भरकटले. म्हणूनच, प्रेषितांनी उचितपणे प्रतिसाद दिला: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२८, २९.
‘देवाच्या गोष्टी’
५, ६. (अ) सन १९१४ मधील राज्याच्या जन्माच्या अनुषंगाने ख्रिश्चनांनी कोणती गोष्ट अधिक ध्यानात ठेवली पाहिजे? (ब) एक ख्रिस्ती सेवक असल्याचा पुरावा कसा देतो?
५ सर्वसमर्थ यहोवा देवाने ख्रिस्ताच्या मशीही राज्याद्वारे शासन करण्यास सुरवात केली त्या १९१४ पासून विशेषतः, ख्रिश्चनांनी देवाच्या गोष्टी कैसराला न देण्याविषयी खात्री करावयाची होती. (प्रकटीकरण ११:१५, १७) पूर्वी कधी नव्हते तितके आता देवाचा नियम ख्रिश्चनांना ‘जगाचे न होण्यास’ आर्जवतो. (योहान १७:१६) त्यांचा जीवनदाता, देव याला समर्पित असल्यामुळे त्यांनी हे स्पष्टपणे प्रदर्शित केले पाहिजे, की ते आता स्वतःचे नाहीत. (स्तोत्र १००:२, ३) पौलाने लिहिले त्यानुसार, “आपण प्रभूचेच [यहोवाचेच, NW] आहो.” (रोमकर १४:८) शिवाय, एक ख्रिश्चनाच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याला देवाचा सेवक म्हणून नियुक्त केले जाते जेणेकरून तो पौलाप्रमाणे म्हणू शकतो: “[देवानेच] आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले.”—२ करिंथकर ३:५, ६.
६ प्रेषित पौलाने असेही लिहिले: “मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो.” (रोमकर ११:१३) निश्चितच, आपणही असेच केले पाहिजे. सेवेमध्ये आपण पूर्ण वेळेसाठी किंवा अर्ध वेळेसाठी भाग घेत असलो तरी आपण ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, की यहोवाने स्वतः या सेवेसाठी आपल्याला नियुक्त केले आहे. (२ करिंथकर २:१७) काही जण आपल्या या हुद्याविषयी हरकत घेतील या कारणास्तव प्रत्येक समर्पित, बाप्तिस्मा प्राप्त ख्रिश्चनाने, तो सुवार्तेचा खरोखरच एक सेवक असल्याचा स्पष्ट आणि सकारात्मक पुरावा सादर करण्यास तयार असले पाहिजे. (१ पेत्र ३:१५) त्याची सेवा त्याच्या वर्तनातूनसुद्धा दिसली पाहिजे. देवाचा सेवक या नात्याने, एका ख्रिश्चनाने शुद्ध नीतितत्त्वांचे समर्थन केले व आचरले पाहिजे, कौटुंबिक ऐक्य कायम केले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे व कायदा व व्यवस्थेचा आदर केला पाहिजे. (रोमकर १२:१७, १८; १ थेस्सलनीकाकर ५:१५) एका ख्रिश्चनाच्या जीवनामध्ये देवासोबतचा त्याचा नातेसंबंध आणि त्याची ईश्वराकडून नेमलेली सेवा, या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. कैसराच्या आज्ञेवरून तो त्यांचा त्याग करू शकत नाही. स्पष्टतः, जे “देवाचे” त्यामध्ये त्यांना गणले जाऊ शकते.
‘कैसराच्या गोष्टी’
७. कर भरण्याविषयी यहोवाच्या साक्षीदारांचे कोणते नावलौकिक आहे?
७ यहोवाच्या साक्षीदारांना माहीत आहे, की त्यांना ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या’ अर्थात, सरकारी शासकांच्या अधीन असावयास हवे. (रोमकर १३:१) यास्तव, जेव्हा कैसर, म्हणजेच सरकार वैध मागणी करतो तेव्हा त्यांचे बायबल प्रशिक्षित विवेक ह्या मागण्या पूर्ण करण्यास त्यांना अनुमती देतात. उदाहरणार्थ, खरे ख्रिस्ती, पृथ्वीवर कर भरणाऱ्यांपैकी सर्वात उदाहरणीय आहेत. जर्मनीतील मुंक्नर मरकुर नावाचे वृत्तपत्रक यहोवाच्या साक्षीदारांविषयी असे म्हणाले: “ते फेडरेल रिपब्लिकमधील सर्वात प्रामाणिक व सर्वात वक्तशीर करदाते आहेत.” इटलीतील लॉ स्टॅम्पॉ या वृत्तपत्रकाने असे निरिक्षिले: “ते [यहोवाचे साक्षीदार] हवेसे असणारे सर्वात एकनिष्ठ नागरिक आहेत, ते कोणालाही आवडतीलच कारण: ते कधीही कर भरण्याची टाळाटाळ करत नाहीत किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी गैरसोयीच्या नियमांना चुकवण्याचा प्रयत्न करत नाहीत.” यहोवाचे साक्षीदार आपल्या ‘सदसद्विवेकबुद्धीमुळे’ असे करतात.—रोमकर १३:५, ६.
८. कैसराला आपण जे दिले पाहिजे ते केवळ पैशापुरतेच मर्यादित आहे का?
८ ‘कैसराच्या गोष्टी’ केवळ कर भरण्याएवढेच मर्यादित आहे का? नाही. पौलाने इतर गोष्टींची देखील यादी दिली जसे, की भय आणि आदर. जर्मन विद्वान हाईनरी मेयर यांनी त्यांच्या मत्तयाच्या शुभवर्तमानाची समीक्षणात्मक व स्पष्टीकरणात्मक हस्तपुस्तिका (इंग्रजी), या आपल्या पुस्तकात असे लिहिले: “[कैसराच्या गोष्टी] . . . यावरून आपण केवळ नागरी कर इतकेच समजू नये, तर कैसराच्या वैध नियमाच्या अधिकाराप्रमाणे सर्व काही, असे समजावे.” इतिहासकार ई. डब्ल्यू. बार्न्स आपल्या ख्रिस्ती धर्माचा उदय (इंग्रजी), या पुस्तकात निरीक्षण करतात, की जर एखाद्या ख्रिश्चनाला कर द्यावयाचे आहेत तर ते तो भरीत असे व “अशाप्रकारे जर त्याच्याकडून देवाला द्यावयाच्या गोष्टी कैसराला द्याव्यात अशी मागणी करण्यात आली नाही तर तो सरकाराच्या इतर सर्व बाध्यतांना स्वीकारत असे.”
९, १०. कैसराला त्याच्या गोष्टी देते वेळी एखाद्या ख्रिश्चनाला कोणत्या शंका येतील, पण त्याने कोणत्या वस्तुस्थिती ध्यानात ठेवल्या पाहिजेत?
९ देवाला योग्यपणे द्यावयाच्या गोष्टींवर अतिक्रमण न करता, सरकार, कोणत्या गोष्टींची कदाचित मागणी करील? काहींना वाटले आहे, की ते सरकारला इतर काही नाही पण कराच्या रुपाने वैधपणे पैसे देऊ शकतात. ईश्वरशासित कार्यांसाठी वापरण्यात येणारा वेळ ज्यामुळे खर्च होऊ शकेल अशी कोणतीही गोष्ट कैसराला देताना त्यांना निश्चितच बरे वाटणार नाही. आपण “आपला देव परमेश्वर [यहोवा] ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीति” केली पाहिजे हे खरे असले तरी, आपल्या पवित्र सेवेच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींकरिता आपण वेळ खर्च करावा अशी तो अपेक्षा करतो. (मार्क १२:३०; फिलिप्पैकर ३:३) उदाहरणार्थ, एका विवाहित व्यक्तीला आपल्या विवाह सोबत्याला खूष करण्यास वेळ खर्च करावा असा सल्ला दिला जातो. या गोष्टी वाईट नव्हेत, पण प्रेषित पौल म्हणतो, की त्या ‘जगाच्या गोष्टी’ आहेत, ‘प्रभूच्या गोष्टी’ नव्हेत.—१ करिंथकर ७:३२-३४; पडताळा १ तीमथ्य ५:८.
१० पुढे, ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना कर ‘देण्याची’ परवानगी दिली, व यामध्ये निश्चितच यहोवाला समर्पित केलेल्या वेळेचा वापर करणे समाविष्ट आहे—कारण आपले संपूर्ण जीवनच अशा प्रकारे समर्पित आहे. एखाद्या राष्ट्रातील सरासर कराधान, मिळकतीच्या ३३ टक्क्यांचा (काही राष्ट्रांमध्ये यापेक्षा अधिक आहे) असल्यास, याचा अर्थ, एक सामान्य कामगार प्रत्येक वर्षी आपल्या मिळकतीतून चार महिन्यांच्या पगाराइतकी किंमत सरकारच्या खजिन्यात भरतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, एका सामान्य कामगाराने आपल्या कामाच्या काळाच्या शेवटास ‘कैसराला’ द्यावयाचा कराचा पैसा मिळवण्यासाठी सुमारे १५ वर्षे काम केलेले असेल. तसेच, शालेय शिक्षणाचा देखील विचार करा. बहुतेक राष्ट्रांमध्ये, पालकांनी आपल्या मुलांना विशिष्ट कालावधीसाठी शाळेत पाठवावे अशी मागणी कायदा करतो. शालेय शिक्षणाची कालमर्यादा प्रत्येक राष्ट्रांत वेगवेगळी असते. बहुतेक ठिकाणी त्याची कालमर्यादा अधिक असते. हे खरे, की अशा प्रकारचे शिक्षण बहुधा फायदेशीरच असते, पण एखाद्या मुलाच्या जीवनाचा केवढा भाग याप्रकारे खर्च केला जावा याचा निर्णय कैसर घेतो आणि ख्रिस्ती पालक कैसराच्या या निर्णयाला मान देतात.
सक्तीची सैनिकी सेवा
११, १२. (अ) अनेक राष्ट्रांमध्ये कैसर कोणती मागणी करतो? (ब) आरंभीच्या ख्रिश्चनांनी सैनिकी सेवेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले?
११ काही राष्ट्रांमध्ये कैसर आणखी एक मागणी करतो व ती आहे सक्तीची सैनिकी सेवा. २० व्या शतकामध्ये, ही व्यवस्था अनेक राष्ट्रांनी युद्धाच्या काळात किंवा काही राष्ट्रांनी शांतीच्या काळात देखील प्रस्थापित केली आहे. फ्रान्समध्ये अनेक वर्षांसाठी या बंधनाला रक्त कर असे संबोधले जात होते, ज्याचा अर्थ, प्रत्येक युवकाला सरकारसाठी आपला जीव देण्यास तयार असलेच पाहिजे, असा होता. यहोवाला समर्पित असलेले ही मागणी कर्तव्यनिष्ठेने पूर्ण करू शकतात, अशी ही गोष्ट आहे का? पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले?
१२ आरंभीचे ख्रिश्चन चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या विश्वासाने त्यांना, सरकारसाठी इतरांचे जीव घेण्यास किंवा स्वतःच्या जीवनाचे बलिदान देण्यास अनुमती दिली नाही. एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन म्हणतो: “टर्टुलियन व ओरीजन यांच्यासहित आरंभीच्या चर्च पाळकांनी निश्चयपूर्वक सांगितले, की मानवांचे जीव घेण्यापासून ख्रिश्चनांना मनाई करण्यात आली होती, ते एक असे तत्त्व होते ज्याने त्यांना रोमी सेनेत भाग घेण्यापासून परावृत्त केले.” आरंभीचे चर्च आणि जग (इंग्रजी), या पुस्तकात प्राध्यापक सी. जे. कॉडु लिहितात: “निदान मार्कस ऑरेलियसच्या कारकिर्दीपर्यंत तरी [सा. यु. १६१-१८०], कोणताही ख्रिश्चन आपल्या बाप्तिस्म्यानंतर सैनिक होणार नाही.”
१३. ख्रिस्ती धर्मजगतातील बहुतेक जण सैनिकी सेवेकडे आरंभीच्या ख्रिश्चनांप्रमाणे का पाहत नाहीत?
१३ ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चच्या सदस्यांचा आज असा दृष्टिकोन का नाही? चौथ्या शतकात घडलेल्या एका आमूलाग्र बदलामुळे. ख्रिस्ती परिषदांचा इतिहास (इंग्रजी), नावाचे एक कॅथलिक पुस्तक असे स्पष्टीकरण देते: “मूर्तीपूजक सम्राटांच्या अधिकाराखाली अनेक ख्रिश्चनांचे, . . . सैनिकी सेवेविषयी धार्मिक कारणामुळे शासंक होते, व त्यांनी शस्त्र घेण्यास ठामपणे नकार दिला किंवा ती सेवाच सोडून दिली. कॉन्स्टनटाईनने प्रस्तुत केलेल्या बदलांचा [सा. यु. ३१४ मध्ये भरलेल्या अर्ल्सच्या] धर्मसभेने विचार करताना असे बंधन केले, की ख्रिश्चनांशी मैत्री ठेवणाऱ्या एका युवराजासोबत चर्च शांतीत (पेस मध्ये) असल्यामुळे ख्रिश्चनांनी युद्धामध्ये भाग घेतलाच पाहिजे.” येशूच्या या शिकवणीला त्यागल्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत, काही लोकांनी नैतिक अथवा धार्मिक तत्त्वांच्या आधारावर आक्षेप घेतला असला तरी ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी आपल्या कळपांना राष्ट्रांच्या सेनादलात सेवा करण्यास उत्तेजन दिले आहे.
१४, १५. (अ) काही ठिकाणी ख्रिस्ती जन कोणत्या आधारावर सैनिकी सेवेतून सूट मागतात? (ब) जेथे सूट उपलब्ध नाही तेथे, कोणती शास्त्रवचनीय तत्त्वे एखाद्या ख्रिश्चनाला सैनिकी सेवेबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करील?
१४ या बाबतीत ख्रिश्चनांना बहुतांश लोकांचे अनुसरण करणे बंधनकारक आहे का? नाही. एक समर्पित, बाप्तिस्मा प्राप्त ख्रिस्ती, अशा राष्ट्रात राहत असेल जेथे धर्माच्या सेवकांना सैनिकी सेवेपासून सूट दिली जाते तेव्हा तो तरतुदीचा उपयोग करू शकतो कारण तो वास्तविकतेत एक सेवक आहे. (२ तीमथ्य ४:५) संयुक्त संस्थाने आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहित अनेक राष्ट्रांनी युद्धकाळात देखील अशा प्रकारची सूट दिली आहे. तसेच शांतीकाळात सक्तीने सैनिकी सेवा राखणाऱ्या अनेक राष्ट्रांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना धर्माचे सेवक या नात्याने सूट दिली जाते. अशा प्रकारे, ते आपल्या जाहीर सेवेद्वारे लोकांना सतत मदत करू शकतात.
१५ परंतु धर्माच्या सेवकांना सूट दिली जात नाही अशा राष्ट्रामध्ये एखादा ख्रिस्ती राहत असल्यास काय? तेव्हा त्याला आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाला अनुसरून व्यक्तिगत निर्णय घ्यावा लागेल. (गलतीकर ६:५) कैसराच्या अधिकाराला लक्षात घेताना यहोवाला जे दिले पाहिजे ते तो काळजीपूर्वकतेने तोलून पाहील. (स्तोत्र ३६:९; ११६:१२-१४; प्रेषितांची कृत्ये १७:२८) ख्रिस्ती व्यक्तीला हे आठवणीत राहील, की त्याच्या सर्व सहविश्वासूंबद्दल, इतर राष्ट्रांमध्ये राहणाऱ्या किंवा दुसऱ्या जातीच्या सहविश्वासूंबद्दलची प्रीती, खऱ्या ख्रिश्चनाचे ओळखचिन्ह आहे. (योहान १३:३४, ३५; १ पेत्र २:१७) तसेच, यशया २:२-४; मत्तय २६:५२; रोमकर १२:१८; १४:१९; २ करिंथकर १०:४; व इब्री लोकांस १२:१४, या सर्व वचनांमध्ये आढळणारी शास्त्रवचनीय तत्त्वे तो विसरून जाणार नाही.
नागरी सेवा
१६. काही राष्ट्रांमध्ये, जे लोक सैनिकी सेवा स्वीकारत नाहीत अशांकडून कैसर कोणत्या असैनिकी सेवेची मागणी करतो?
१६ परंतु अशीही काही राष्ट्रे आहेत, ज्यांतील सरकार धर्माच्या सेवकांना सूट देत नसले तरी, काही लोक कदाचित सैनिकी सेवेवर आक्षेप घेतील, असे कबूल करतात. अशा प्रकारची अनेक राष्ट्रे, कर्तव्यनिष्ठेने नकार देणाऱ्या व्यक्तींना सैनिकी सेवेमध्ये येण्याची सक्ती करू नये यासाठी तरतुदी करतात. काही ठिकाणी आवश्यक नागरी सेवा जसे, की समाजातील एखादे उपयोगी काम, याकडे असैनिकी राष्ट्रीय सेवा या दृष्टीने पाहिले जाते. अशी सेवा एखादा ख्रिश्चन स्वीकारू शकतो का? येथे सुद्धा, एका समर्पित, बाप्तिस्मा प्राप्त ख्रिश्चनाला आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाच्या आधारावर स्वतःच निर्णय घ्यावा लागेल.
१७. असैनिकी नागरी सेवेसाठी बायबलमध्ये पूर्वोदाहरण आहे का?
१७ असे दिसते, की बायबल काळातसुद्धा सक्तीची सेवा होत असे. इतिहासाचे एक पुस्तक म्हणते: “यहुदाच्या रहिवाशांकडून कर आणि देय आकारण्याव्यतिरिक्त वेठबिगारी [जन अधिकारी फुकटात करवून घेत असलेली मजुरीची कामे] करवून घेतली जात असे. मध्य पूर्वेतील ही प्राचीन संस्था होती जिला हेलेनीस्टिक व रोमी अधिकाऱ्यांनी कायम राखली. . . . नवीन करार देखील यहुदातील वेठबिगारीच्या उदाहरणांचा उल्लेख करते, यावरून ही पद्धत केवढी रूढ होती हे दिसून येते. या रुढीमुळेच, सैनिकांनी कुरेनेकरच्या शिमोनावर येशूचा क्रॉस [वधस्तंभ] उचलण्याचा दबाव घातला (मत्तय ५:४१; २७:३२; मार्क १५:२१; लूक २३:२६).”
१८. सामाजिक सेवेच्या कोणत्या असैनिकी, धार्मिक नसलेल्या प्रकारांना यहोवाचे साक्षीदार वारंवार सहकार्य देतात?
१८ त्याचप्रमाणे, आज काही राष्ट्रांतील नागरिकांकडून विविध रूपांच्या सामाजिक सेवांमध्ये भाग घेण्यासाठी सरकार किंवा स्थानीय अधिकारी मागणी करतात. काही वेळा हे एखाद्या विशिष्ट नियुक्त कार्यासाठी असते, जसे की, विहिरी खोदणे किंवा रस्ते बांधणे; काही वेळा ते नियमितरीत्या असते, जसे की, रस्ते, शाळा किंवा इस्पितळे यांच्या स्वच्छतेमध्ये प्रत्येक आठवडी भाग घेणे. अशा प्रकारची नागरी सेवा, जेथे समाजाच्या भल्यासाठी असते व तिचा संबंध खोट्या धर्माशी किंवा इतर कोणत्याही प्रकारे ती यहोवाच्या साक्षीदारांच्या विवेकाला आक्षेपार्ह नसते तेथे बहुधा ती मान्य करण्यात आली आहे. (१ पेत्र २:१३-१५) यामुळे अनेकवेळा उत्तम साक्ष देण्यात आली आहे व काही वेळा, साक्षीदार सरकारविरोधी आहेत असा त्यांच्यावर जे दोषारोप करतात अशांची तोंडे बंद करण्यात आली आहेत.—पडताळा मत्तय १०:१८.
१९. कैसर एखाद्या ख्रिश्चनाकडून काही काळासाठी असैनिकी राष्ट्रीय सेवा करण्याची मागणी करतो तेव्हा त्याने ही बाब कशी हाताळावी?
१९ परंतु, सरकार एखाद्या ख्रिश्चनाकडून काही काळासाठी, नागरी व्यवस्थेखालील राष्ट्रीय सेवेचा भाग असलेली नागरी सेवा करण्याची मागणी करत असल्यास काय? येथेही ख्रिश्चनांनी प्रशिक्षित विवेकाच्या आधारावर आपला वैयक्तिक निर्णय घेतला पाहिजे. “आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहो.” (रोमकर १४:१०) कैसराकडून एखाद्या गोष्टीची मागणी होते तेव्हा ख्रिश्चनांनी याबाबतीत प्रार्थनापूर्वक परीक्षण व मनन केले पाहिजे.a मंडळीतील प्रौढ ख्रिश्चनांसोबत याबद्दल बोलणे देखील सुज्ञतेचे ठरू शकते. यानंतर व्यक्तिगत निर्णय घेतला जावा.—नीतिसूत्रे २:१-५; फिलिप्पैकर ४:५.
२०. कोणते प्रश्न आणि शास्त्रवचनीय तत्त्वे एखाद्या ख्रिश्चनाला असैनिकी राष्ट्रीय नागरी सेवेबद्दल तर्क करण्यास मदत करतील?
२० अशा प्रकारचे संशोधन करताना ख्रिस्ती अनेक बायबल तत्त्वांचा विचार करतील. आपण “सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. . . . प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; . . . सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे,” असे पौलाने म्हटले. (तीत ३:१, २) त्याचवेळी, ख्रिस्ती जन त्यांना प्रस्तुत केलेल्या नागरी कार्याचे परीक्षण करतात तेव्हा बरे असते. त्याचा स्वीकार केल्यास ते आपली ख्रिस्ती तटस्थता टिकवू शकतील का? (मीखा ४:३, ५; योहान १७:१६) त्यामुळे ते कोणत्याही खोट्या धर्मामध्ये गोवले जातील का? (प्रकटीकरण १८:४, २०, २१) ते कार्य करताना, त्यांच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या पूर्ण करण्यापासून त्यांचा अटकाव किंवा गैरवाजवीपणे मर्यादा घालील का? (मत्तय २४:१४; इब्री लोकांस १०:२४, २५) दुसऱ्या बाजूला पाहता, ते आध्यात्मिक प्रगती करू शकतील का, कदाचित आवश्यक सेवेसोबत त्यांना पूर्ण वेळेच्या ख्रिस्ती सेवेमध्ये भाग घेता येईल का?—इब्री लोकांस ६:११, १२.
२१. असैनिकी राष्ट्रीय नागरी सेवेची बाब हाताळणाऱ्या बांधवाचा निर्णय काही असला तरी मंडळीने त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
२१ या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे एखाद्या ख्रिश्चनाला, अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहून राष्ट्रीय नागरी सेवा हे “चांगले कार्य” तो करू शकतो, असा निष्कर्ष काढण्यास प्रवृत्त करीत असल्यास काय? तो यहोवासमोर त्याचा निर्णय आहे. नियुक्त वडिलांनी आणि इतरांनी त्याच्या विवेकाचा पूर्णपणे आदर करावा व चांगल्या दृष्टिकोनातून त्याला एक ख्रिस्ती या नात्याने वागवावे. परंतु, जर एखाद्या ख्रिश्चनाला वाटत असेल, की तो ही नागरी सेवा करू शकत नाही तरी देखील त्याच्या या निर्णयाचा आदर केला जावा. त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिले जावे व त्यालाही प्रेमळ पाठिंबा मिळण्यास हवा.—१ करिंथकर १०:२९; २ करिंथकर १:२४; १ पेत्र ३:१६.
२२. आपल्या समोर कोणतीही परिस्थिती आली तरी आपण काय करत राहू?
२२ ख्रिस्ती या नात्याने आपण “ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान” करण्याचे थांबवणार नाही. (रोमकर १३:७) आपण सुव्यवस्थेचा आदर करू व शांतीमय, विधिचारी नागरिक होण्याचा प्रयत्न करू. (स्तोत्र ३४:१४) आपले ख्रिस्ती जीवन आणि कार्य यांच्यावर प्रभाव करणारे निर्णय त्यांना घ्यावे लागतात या कारणास्तव आपण “राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता” देखील प्रार्थना करू शकतो. कैसराचे ते कैसराला दिल्याने “पूर्ण सुभक्तिने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण” करण्याची आशा बाळगतो. (१ तीमथ्य २:१, २) सर्वांहून अधिक, आपण मानवजातीची एकमात्र आशा असलेल्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत राहू व अशा तऱ्हेने जे देवाचे आहे ते देवाला कर्तव्यनिष्ठेने देत राहू.
[तळटीपा]
a मे १५, १९६४ चे टेहळणी बुरुज, पृष्ठ ३०८, परिच्छेद २१ पाहा.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
◻ कैसर आणि यहोवा या दोघांसोबतच्या नातेसंबंधात समतोल राखत असता एखाद्या ख्रिश्चनाचे प्रथम कर्तव्य काय आहे?
◻ आपण कैसराला कधीच देऊ शकत नाही अशा कोणत्या गोष्टीबद्दल आपण यहोवाला ऋणी आहोत?
◻ कोणत्या गोष्टी आपण योग्यपणे कैसराला देतो?
◻ सक्तीच्या सैनिकी सेवेबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी कोणती शास्त्रवचने आपली मदत करतात?
◻ आपल्याला असैनिकी राष्ट्रीय नागरी सेवेसाठी बोलावण्यात आल्यावर आपण कोणत्या गोष्टींना ध्यानात ठेवले पाहिजे?
◻ यहोवा आणि कैसर यांच्याबाबत आपण काय करीत राहतो?
[१६, १७ पानांवरील चित्रं]
प्रेषितांनी सन्हेद्रिनला सांगितले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे”