देव आणि कैसर
“कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरा.”—लूक २०:२५.
१. (अ) यहोवाचा उच्च दर्जा कोणता आहे? (ब) कैसराला आपण कधीच देऊ शकत नाही अशा कोणत्या गोष्टीबद्दल आपण यहोवाचे ऋणी आहोत?
येशू ख्रिस्ताने जेव्हा ही सूचना दिली तेव्हा देव आपल्या सेवकांकडून जी अपेक्षा करतो, त्यास कैसराच्या किंवा सरकाराच्या अपेक्षांऐवजी प्राधान्य मिळते याविषयी त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती. “तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्यधिकार [सार्वभौमत्व]a पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे,” अशा प्रकारे स्तोत्रकर्त्याने यहोवाला केलेल्या प्रार्थनेचा खरेपणा इतरांपेक्षा येशूला अधिक चांगल्याप्रकारे समजला. (स्तोत्र १४५:१३) दियाबलाने येशूला पृथ्वीवरील सर्व राज्यांचा अधिकार देऊ केला तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले: “‘परमेश्वर [यहोवा, NW] तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.” (लूक ४:५-८) ‘कैसराची’ उपासना केली जाऊ शकत नव्हती, मग तो कैसर रोमी सम्राट असो, इतर कोणताही मानवी शासक असो किंवा खुद्द सरकार असो.
२. (अ) या जगाच्या बाबतीत सैतानाचे कोणते अधिकाराचे स्थान आहे? (ब) सैतान कोणाच्या परवानगीने या स्थानावरून अधिकार गाजवतो?
२ जगाची राज्ये सैतानाची होती या गोष्टीचा येशूने इन्कार केला नाही. नंतर, त्याने सैतानाला “ह्या जगाचा अधिकारी” असे संबोधले. (योहान १२:३१; १६:११) सा. यु. पहिल्या शतकाच्या अंताला, प्रेषित योहानाने लिहिले: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) यहोवाने पृथ्वीवरील आपल्या सार्वभौमत्वाचा त्याग केला आहे, असा याचा अर्थ होत नाही. येशूला राजकीय सत्ता देताना सैतान काय म्हणाला त्याची आठवण करा: “ह्यांवरचा सर्व अधिकार . . . मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे.” (लूक ४:६) देवाच्या परवानगीमुळेच सैतान, जगाच्या राज्यांवर अधिकार गाजवतो.
३. (अ) राष्ट्रांच्या सरकारांचे यहोवासमोर कोणते स्थान आहे? (ब) या जगाच्या सरकारांना दाखवण्याच्या अधीनतेचा अर्थ खुद्द या जगाचा दैवत म्हणजे, सैतानाच्या अधीन होणे, असा होत नाही हे आपण कसे म्हणू शकतो?
३ त्याचप्रकारे, देवाने सार्वभौम शासक या नात्याने परवानगी दिल्यामुळे सरकार आपला अधिकार गाजवते. (योहान १९:११) म्हणूनच, ‘अस्तित्वात असलेले अधिकार’ “देवाने नेमलेले आहेत,” असे म्हटले जाऊ शकते. यहोवाच्या सर्वश्रेष्ठ सार्वभौम अधिकाराच्या तुलनेत त्यांचा अधिकार नक्कीच कमी आहे. परंतु, ते “देवाचा सेवक,” ‘देवाचे जनसामान्य सेवक’ असल्यामुळे आवश्यक सेवा पुरवणे, कायदा आणि व्यवस्था राखणे व अपराध्यांना शिक्षा देण्याचे कार्य करतात. (रोमकर १३:१, ४, ६) यास्तव ख्रिश्चनांनी हे समजून घेतले पाहिजे, की सैतान ह्या जगाचा किंवा या व्यवस्थीकरणाचा अदृश्य शासक असल्यामुळे, ते सरकाराप्रती आपल्या सापेक्ष अधीनतेला समजून घेतात तेव्हा सैतानाच्या अधीन होणार नाहीत. ते देवाची आज्ञा पाळतात. या वर्षी, म्हणजे १९९६ मध्ये, राजकीय सरकार अजूनही, ‘देवाच्या व्यवस्थेचा,’ अस्तित्वात राहण्यास देव परवानगी देतो अशा एका तात्पुरत्या व्यवस्थेचा भाग आहेत, व यहोवाच्या पार्थिव सेवकांनी त्यांस त्याप्रकारेच ओळखले पाहिजे.—रोमकर १३:२.
प्राचीन काळातील यहोवाचे सेवक आणि सरकार
४. यहोवाने योसेफला इजिप्तच्या सरकारात प्रमुख व्यक्ती का होऊ दिले?
४ ख्रिस्तपूर्व काळामध्ये, यहोवाने आपल्या काही सेवकांना राज्य सरकारांमध्ये प्रमुख हुद्दा धारण करण्याची अनुमती दिली. उदाहरणार्थ, सा. यु. पू. १८ व्या शतकामध्ये, योसेफ इजिप्तचा प्रधान मंत्री झाला, तो शासन करणाऱ्या फारोच्या खालोखालच्या हुद्यावर होता. (उत्पत्ति ४१:३९-४३) पश्चातकालीन घटनांनी स्पष्ट केले, की यहोवाने त्याचे उद्देश पूर्ण करण्यासाठी हे सर्व काही घडवून आणले जेणेकरून योसेफ ‘अब्राहामाची संतती,’ त्याच्या पूर्वजांचे संरक्षण करण्यासाठी एक साधन होऊ शकतो. पण आपण ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, की योसेफाला दास्यत्वात विकण्यात आले होते व तो अशा काळात जगत होता जेव्हा देवाच्या सेवकांकडे मोशेचे नियमशास्त्र किंवा “ख्रिस्ताचा नियम” नव्हता.—उत्पत्ति १५:५-७; ५०:१९-२१; गलतीकर ६:२.
५. यहुदी बंदिवानांना बॅबिलोनचे “हितचिंतन” करण्याची आज्ञा का देण्यात आली होती?
५ अनेक शतकांनंतर विश्वासू संदेष्टा यिर्मया याला, बॅबिलोनच्या बंदिवासात असलेल्या यहुदी बंदिवानांना, शासकांच्या अधीन राहण्यास व त्या शहराच्या शांतीसाठी देखील प्रार्थना करण्यास सांगण्यास यहोवाने प्रेरित केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटले: “सेनाधीश परमेश्वर, [यहोवा] इस्राएलचा देव . . . यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जावयास लावले त्या सर्व बंदिवान झालेल्यांस मी असे म्हणतो: ‘तुम्हांस पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित.’” (यिर्मया २९:४, ७) यहोवाची उपासना करण्यास स्वातंत्र्य मिळावे म्हणून, त्याच्या लोकांना सर्ववेळी, स्वतःसाठी व ते जेथे राहतात त्या राष्ट्रासाठी ‘शांतीच्या प्राप्तीकरता झटण्यास’ आधार आहे.—१ पेत्र ३:११.
६. दानीएल आणि त्याच्या तीन साथीदारांना उच्च सरकारी हुद्दे दिले असले तरी त्यांनी यहोवाच्या नियमशास्त्राच्या बाबतीत हातमिळवणी करण्यास कशा प्रकारे नकार दिला?
६ बॅबिलोनच्या बंदिवासात असताना दास म्हणून नेण्यात आलेले दानीएल आणि इतर तीन विश्वासू यहुदी, सरकाराकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणाच्या अधीन झाले व बॅबिलोनमध्ये उच्चपदस्थ नागरी सेवक बनले. (दानीएल १:३-७; २:४८, ४९) पण त्यांनी, आपल्या प्रशिक्षणाच्या काळातही आपला देव यहोवा याने मोशेद्वारे दिलेल्या नियमशास्त्राचे उल्लंघन करण्यास लावणाऱ्या अन्नविषयक बाबींबद्दल दृढ भूमिका घेतली. याबद्दल त्यांना आशीर्वादित करण्यात आले. (दानीएल १:८-१७) राजा नबुखद्नेस्सरने एका राजेश्वरी मूर्तीची स्थापना केली तेव्हा, दानीएलाच्या तीन हिब्रू साथीदारांना आपल्या सह अधिकाऱ्यांसोबत त्या सोहळ्याला उपस्थित राहण्यास भाग पाडण्यात आले. तरीदेखील, त्यांनी त्या राजेश्वरी मूर्तीपुढे “साष्टांग दंडवत” घालण्यास नकार दिला. पुन्हा एकदा यहोवाने त्यांच्या सचोटीबद्दल त्यांना प्रतिफळ दिले. (दानीएल ३:१-६, १३-२८) त्याचप्रमाणे आज, यहोवाचे साक्षीदार, ते ज्या राष्ट्रामध्ये राहतात त्या राष्ट्राच्या ध्वजाचा आदर करतात पण ते त्याची उपासना करणार नाहीत.—निर्गम २०:४, ५; १ योहान ५:२१.
७. (अ) बॅबिलोनच्या सरकारी व्यवस्थेमध्ये दानीएलाला उच्च पद असले तरी त्याने कोणता उत्तम पावित्रा घेतला? (ब) ख्रिस्ती काळामध्ये कोणते बदल घडून आले?
७ नव-बॅबिलोनियन साम्राज्याच्या पाडावानंतर, बॅबिलोनमध्ये त्याच्या जागी आलेल्या नवीन मेदो-पर्शियन साम्राज्याखाली दानीएलास एक उच्च-पदस्थ सरकारी हुद्दा बहाल करण्यात आला. (दानीएल ५:३०, ३१; ६:१-३) परंतु त्याने आपल्या उच्च पदाला त्याच्या निष्ठेबद्दल हातमिळवणी करू दिली नाही. एका विशिष्ट सरकारी नियमाने जेव्हा त्याच्याकडून यहोवाची उपासना करण्याऐवजी दारयावेश राजाची उपासना करण्याची अपेक्षा केली तेव्हा त्याने याला नकार दिला. यासाठी त्याला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले, पण यहोवाने त्याची सुटका केली. (दानीएल ६:४-२४) अर्थातच, हे ख्रिस्त-पूर्व काळामध्ये घडले होते. ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यावर, देवाचे सेवक ‘ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन’ झाले. ज्या अनेक गोष्टींना यहुदी व्यवस्थीकरणाखाली अनुमती होती त्यांच्याकडे आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे, यहोवा आता आपल्या लोकांबरोबर ज्याप्रमाणे व्यवहार करत होता त्याप्रमाणे पाहावयाचे होते.—१ करिंथकर ९:२१; मत्तय ५:३१, ३२; १९:३-९.
सरकारप्रती येशूची मनोवृत्ती
८. येशू राजकीय गोवणूक टाळण्यास ठामनिश्चयी होता हे कोणती घटना दाखवून देते?
८ येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा त्याने आपल्या अनुयायांसाठी उच्च मानक स्थापित केले व राजकीय अगर सैनिकी बाबींमध्ये कोणत्याही प्रकारे गोवण्यास नकार दिला. येशूने थोड्या भाकऱ्या आणि दोन लहान माशांनी हजारो लोकांना चमत्कारिकपणे जेवू घातल्यावर यहुदी लोक त्याला धरून राजकीय शासक करू इच्छित होते. पण येशू लगेच डोंगरांमध्ये पळून गेला आणि त्यांच्या तावडीतून सुटला. (योहान ६:५-१५) या घटनेविषयी, नव्या करारावरील नवे आंतरराष्ट्रीय विवेचन (इंग्रजी), हे पुस्तक असे म्हणते: “त्या काळच्या यहुद्यांमध्ये तीव्र राष्ट्रीय भावना होत्या आणि ज्यांनी ज्यांनी तो चमत्कार पाहिला त्यापैकी अनेकांना असे वाटले, की रोमी लोकांच्या विरुद्ध जाण्यामध्ये आपले नेतृत्व करण्यास हाच योग्य ईश्वरी अधिकृत नेता आहे. म्हणून त्याला राजा करण्याचा त्यांनी ठामनिश्चय केला.” तेच पुस्तक पुढे असे म्हणते, की येशूने राजकीय नेता होण्याची ही संधी “निर्णायकपणे नाकारली.” ख्रिस्ताने रोमी वर्चस्वाच्या विरुद्ध कोणत्याही यहुदी बंडखोरीला पाठबळ दिले नाही. पण आपल्या मृत्यूनंतर होणाऱ्या विद्रोहाच्या परिणामाबद्दल—जेरुसलेमच्या रहिवाशांवर अगणित अनर्थ आणि त्या शहराचा नाश याबद्दल त्याने भाकीत केले.—लूक २१:२०-२४.
९. (अ) आपल्या राज्याचा संबंध जगाशी कसा असल्याचे वर्णन येशूने केले? (ब) जगाच्या सरकारांबरोबर व्यवहार करण्याविषयी येशूने आपल्या अनुयायांना कोणते मार्गदर्शन पुरवले?
९ येशूने आपल्या मृत्यूच्या अल्प समयाआधीच, यहुदातील रोमी सम्राटाच्या एका खास प्रतिनिधीला सांगितले: “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” (योहान १८:३६) ख्रिस्ताचे राज्य जोपर्यंत राजकीय सरकारांच्या सत्तेचा अंत करीत नाही तोपर्यंत त्याचे शिष्य त्याचे अनुकरण करतील. ते त्या निर्धारित अधिकाऱ्यांप्रती आज्ञाधारक राहतात परंतु त्यांच्या राजकीय उपक्रमांमध्ये दखल देत नाहीत. (दानीएल २:४४; मत्तय ४:८-१०) “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा,” असे म्हणून येशूने आपल्या शिष्यांना मार्गदर्शन दिले. (मत्तय २२:२१) याच्याआधी म्हणजे डोंगरावरील प्रवचनात येशूने म्हटले होते: “जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.” (मत्तय ५:४१) या प्रवचनाचा संदर्भ पाहिल्यास येशू, कायदेशीर मागण्यांप्रती इच्छुक अधीनतेच्या तत्त्वाचे स्पष्टीकरण देत होता, मग ते मानवी नातेसंबंधात असो किंवा देवाच्या नियमाच्या सुसंगतेत असलेल्या सरकारी अपेक्षांबाबत असो.—लूक ६:२७-३१; योहान १७:१४, १५.
ख्रिस्ती आणि कैसर
१०. एका इतिहासकारानुसार, कैसराच्या बाबतीत आरंभीच्या ख्रिश्चनांनी कोणता कर्तव्यनिष्ठ पावित्रा टिकवून ठेवला?
१० या संक्षिप्त मार्गदर्शिका, ख्रिस्ती आणि सरकार यांच्यामधील नातेसंबंधाचे नियमन करणार होत्या. इतिहासकार ई. डब्ल्यू. बार्न्स यांनी ख्रिस्ती धर्माचा उदय (इंग्रजी), नावाच्या आपल्या पुस्तकात लिहिले: “पुढील शतकांमध्ये जर एखाद्या ख्रिश्चनाला सरकाराबद्दल आपल्या कर्तव्याविषयी शंका आली तर तो ख्रिस्ताच्या अधिकारयुक्त शिकवणीकडे पाहत असे. तो कर भरीत असे: आकारलेला कर कदाचित फारच भारी असेल—पाश्चिमात्य साम्राज्याच्या पाडावाआधी तो तर असह्य झाला—तरीदेखील ख्रिश्चन तो भरीत असे. देवाला देण्याच्या गोष्टी कैसराला द्याव्यात अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जात नाही तोवर तो इतर सर्व सरकारी नियमांचा स्वीकार करीत असे.”
११. जगिक शासकांसोबत व्यवहार करण्याबाबत पौलाने ख्रिश्चनांना कशा प्रकारे सल्ला दिला?
११ हे, ख्रिस्ताच्या मृत्यूच्या सुमारे २० वर्षांपेक्षा थोड्या अधिक काळानंतर प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्चनांना, “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे” असे जे सांगितले त्याच्या सुसंगतेत होते. (रोमकर १३:१) सुमारे दहा वर्षांनंतर, म्हणजे पौलाला रोममध्ये दुसऱ्यांदा कारागृहात टाकून न्यायदंड बजावण्यात आला त्याच्या काही काळाआधीच त्याने तीताला पुढील प्रमाणे लिहिले: “त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना [क्रेटन ख्रिश्चनांना] आठवण दे.”—तीत ३:१, २.
‘वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलची’ प्रगतिशील समज
१२. (अ) चार्ल्स टेझ रस्सल यांच्या दृष्टीने, सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत एखाद्या ख्रिश्चनाचा कोणता पावित्रा योग्य होता? (ब) सशस्त्र बल सेवेत काम करण्याबाबत, अभिषिक्त ख्रिश्चनांनी पहिल्या जागतिक युद्धादरम्यान कोणकोणते विसंगत दृष्टिकोन बाळगले?
१२ सन १८८६ मध्येच, चार्ल्स टेझ रस्सल यांनी युगांचा आराखडा (इंग्रजी), या पुस्तकात असे लिहिले: “येशू किंवा प्रेषितांपैकी कोणीही कोणत्याही प्रकारे पार्थिव शासकांच्या कामात लुडबूड केली नाही. . . . त्यांनी चर्चला नियमांच्या अधीन राहण्यास, अधिकारपदी असलेल्यांच्या हुद्यांमुळे त्यांना आदर देण्यास, . . . ठरवलेला कर भरण्यास, व सरकारी नियम देवाच्या नियमांच्या (प्रेषितांची कृत्ये ४:१९; ५:२९) विरोधात येत नाहीत तोवर कोणत्याही प्रस्थापित नियमाचा प्रतिकार न करण्यास शिकवले. (रोमकर १३:१-७; मत्तय २२:२१) येशू, प्रेषित आणि आरंभीचे चर्च, हे सर्व या जगाच्या सरकारांपासून अलिप्त होते, व त्यांनी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे भाग घेतला नाही तरीदेखील ते विधिचारी होते.” प्रेषित पौलाने उल्लेखलेले “उच्च अधिकारी” किंवा ‘वरिष्ठ अधिकारी,’ मानवी सरकारी अधिकाऱ्यांना लागू होतात याची या पुस्तकाने उचितपणे ओळख करून दिली. (रोमकर १३:१, किंग जेम्स वर्शन) सन १९०४ मध्ये नवी सृष्टी (इंग्रजी), हे पुस्तक असे म्हणाले, की ख्रिस्ती लोकांची “गणना, त्रास देणारे, भांडखोर, चुका शोधणाऱ्यांमध्ये नव्हे तर—सद्य काळातील सर्वात विधिचारी लोकांमध्ये झाली पाहिजे.” काहींनी याचा अर्थ, सत्तेवर असलेल्यांना पूर्ण आज्ञाधारकता दाखवणे, म्हणजे पहिल्या जागतिक युद्धादरम्यान सशस्त्र बलांतील सेवा देखील स्वीकारणे, असा समजला. परंतु, इतरांनी त्यास, “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील,” या येशूच्या विधानाच्या विरोधात असल्याच्या दृष्टिकोनातून पाहिले. (मत्तय २६:५२) वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रती ख्रिस्ती अधीनतेवर स्पष्ट समज हवी होती हे अगदी उघड आहे.
१३. सन १९२९ मध्ये उच्च अधिकाऱ्यांच्या ओळखीविषयीच्या स्मृतीत कोणता बदल सादर करण्यात आला, व हे फायदेशीर कसे ठरले?
१३ सन १९२९ मध्ये एके काळी जेव्हा विविध सरकारांच्या नियमांनी, देव ज्या गोष्टींची आज्ञा देतो त्यांची मनाई करण्यास किंवा देवाचे नियम ज्या गोष्टींची मनाई करतात त्यांची मागणी करू लागले तेव्हा, उच्च अधिकारी यहोवा देव आणि येशू ख्रिस्त असावेत असे जाणवले.b दुसऱ्या जागतिक युद्धाच्या आधीच्या व त्यादरम्यानच्या खडतर काळात तसेच शीत युद्धादरम्यानच्या दहशतीचा समतोलपणा व सैनिकी तयारीच्या काळापर्यंतही यहोवाच्या सेवकांमध्ये ही समज होती. सिंहावलोकन केल्यावर असे म्हटले पाहिजे, की यहोवा आणि त्याचा ख्रिस्त यांच्या सर्वोच्चतेला उंचावणाऱ्या दृष्टिकोनाने, या कठीण काळादरम्यान देवाच्या लोकांना हातमिळवणी न करता तटस्थ राहण्यास मदत केली.
सापेक्ष अधीनता
१४. सन १९६२ मध्ये रोमकर १३:१, २ तसेच त्याजशी संबंधित शास्त्रवचनांवर कशा प्रकारे आणखी प्रकाशझोत टाकण्यात आला?
१४ सन १९६१ मध्ये शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी), पूर्ण झाले. ते तयार करण्यासाठी शास्त्रवचनांच्या मूळ भाषेचा सखोल अभ्यास करावा लागला. केवळ रोमकर १३ व्या अध्यायातच नव्हे तर, तीत ३:१, २ व १ पेत्र २:१३, १७ च्या उताऱ्यांमध्ये वापरलेल्या शब्दांच्या अचूक भाषांतराने देखील हे स्पष्ट केले, की ‘वरिष्ठ अधिकारी’ ही संज्ञा यहोवा आणि त्याचा पुत्र येशू या सर्वोच्च अधिकाराला सूचित करत नाही तर मानवी सरकारी अधिकाऱ्यांना सूचित होते. सन १९६२ च्या उत्तरार्धात, टेहळणी बुरुज मध्ये, रोमकर १३ व्या अध्यायाचे अचूक स्पष्टीकरण देणारे लेख छापण्यात आले व त्या लेखांनी सी. टी. रस्सल यांच्या काळातील समजुतीची आणखी स्पष्ट समज देखील पुरवली. अधिकाऱ्यांप्रती ख्रिस्ती अधीनता पूर्ण असू शकत नाही हे या लेखांनी दर्शवले. ती सापेक्ष अर्थात, देवाच्या सेवकांना त्याच्या नियमांच्या विरोधात न नेणारी अधीनता असली पाहिजे. टेहळणी बुरुज मधील पुढील लेखांनी या महत्त्वपूर्ण मुद्यावर जोर दिला.c
१५, १६. (अ) रोमकर १३ व्या अध्यायाच्या नवीन समजुतीमुळे कोणता समतोल दृष्टिकोन प्राप्त झाला? (ब) कोणते प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत?
१५ रोमकर १३ व्या अध्यायाच्या अचूक समजुतीच्या गुरुकिल्लीने यहोवाच्या लोकांना राजकीय अधिकाऱ्यांबद्दलचा योग्य आदर महत्त्वपूर्ण शास्त्रवचनीय तत्त्वांच्या बाबतीत हातमिळवणी न करता भूमिकेशी समतोल राखण्यास मदत केली आहे. (स्तोत्र ९७:११; यिर्मया ३:१५) तिच्यामुळे ते, देवाबरोबरच्या त्यांच्या नातेसंबंधाचा आणि सरकारासोबतच्या त्यांच्या व्यवहाराचा योग्य दृष्टिकोन बाळगू शकतात. तिच्यामुळे त्यांना या गोष्टीची खातरी मिळाली आहे, की जेव्हा ते कैसराचे ते कैसराला देतात तेव्हा देवाला जे द्यावयाचे आहे ते देण्यात टाळाटाळ करत नाहीत.
१६ पण कैसराच्या गोष्टी आहेत तरी कोणत्या? एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीवर सरकार कोणते वैधिक दावे करू शकते? हे प्रश्न पुढील लेखात विचारात घेतले जातील.
[तळटीपा]
a स्तोत्र १०३:२२, NW, तळटीप पाहा.
b टेहळणी बुरुज, जून १ आणि १५, १९२९.
c टेहळणी बुरूज नियतकालिकाचे नोव्हेंबर १ आणि १५, डिसेंबर १, १९६२; नोव्हेंबर १, १९९०; फेब्रुवारी १, १९९३; जुलै १, १९९४, हे अंक पहा. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, रोमकराच्या १३ व्या अध्यायावरील समीक्षणात प्राध्यापक एफ. एफ. ब्रूस यांनी असे लिहिले: “प्रेषितीय लिखाणाच्या सामान्य संदर्भावरून त्या अध्यायाच्या संदर्भानुसार हे स्पष्ट आहे, की सरकारची ईश्वरी प्रस्थापना ज्या उद्देशांसाठी करण्यात आली आहे केवळ त्या उद्देशांच्या सीमांमध्येच ते आज्ञापालनाची योग्य मागणी करू शकते; विशेषतः देवाला जी निष्ठा दिली पाहिजे ती निष्ठा सरकार मागत असल्यास त्याचा विरोध करता येऊ शकतो, नव्हे केलाच पाहिजे.”
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
◻ वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रती अधीनतेचा अर्थ सैतानाला अधीन होणे असा का होत नाही?
◻ येशूचा आपल्या दिवसातील राजकारणाविषयी कोणता दृष्टिकोन होता?
◻ येशूने आपल्या अनुयायांना कैसराबरोबरच्या त्यांच्या व्यवहाराविषयी कोणता सल्ला दिला?
◻ राष्ट्रांच्या शासकांसोबत कसा व्यवहार करावा याबद्दल पौलाने ख्रिश्चनांना कोणता सल्ला दिला?
◻ कशा प्रकारे अनेक वर्षांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीबद्दलच्या समजूतीचे स्पष्टीकरण होत गेले आहे?
[१० पानांवरील चित्रं]
सैतानाने येशूला राजकीय अधिकार देऊ केला तेव्हा येशूने तो धुडकावला
[१३ पानांवरील चित्रं]
ख्रिश्चनांची ‘गणना विद्यमान काळातील सर्वात विधिचारी लोकांमध्ये झाली पाहिजे,’ असे रस्सल यांनी लिहिले