“देवाच्या वचनाचे शिक्षक,” २००१ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
१ यशया संदेष्ट्याने म्हटले की यहोवा महान शिक्षक आहे व तो आपल्याला एका प्रेमळ पित्याप्रमाणे आर्जवतो, की “हाच मार्ग आहे; याने चला.” (यश. ३०:२०, २१) पण मग यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्या लाभास्तव आपल्याशी बोलतो? यहोवा आज बायबलमार्फत आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकडून’ येणारी बायबल आधारित प्रकाशने, सभा, विभागीय संमलने आणि प्रांतीय अधिवेशने यांमार्फत त्याच्या लोकांशी बोलतो. (मत्त. २४:४५) आपण कोणत्या मार्गाने चालले पाहिजे त्याबद्दलचे तो आपल्याला मार्गदर्शन देत राहतो म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजेत.
२ दर वर्षी, प्रांतीय अधिवेशनांमुळे आपल्याला सहउपासकांसोबत संगती करण्याची व यहोवाच्या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची संधी मिळते. गेल्या वर्षी, “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या प्रांतीय अधिवेशनांना ३२,३४९ लोक हजर होते. या अधिवेशनांना उपस्थित राहिल्यामुळे त्यांना आध्यात्मिकरीत्या तजेला मिळाला. २००१ साली, संपूर्ण भारतभर “देवाच्या वचनाचे शिक्षक” हे तीन दिवसीय प्रांतीय अधिवेशन आयोजित केले जाणार आहे. या अधिवेशनांना उपस्थित राहण्याच्या योजना करण्याची तुम्ही वाट पाहत आहात याची आम्हाला कल्पना असल्यामुळे आम्ही तुम्हाला पुढील सूचना पुरवत आहोत, ज्यांचा तुम्हाला फायदा होऊ शकेल.
३ राहण्याची व्यवस्था: प्रत्येक अधिवेशनात रूमिंग डिपार्टमेंट असते. हे डिपार्टमेंट तुम्हाला, ज्या शहरात अधिवेशन होणार आहे तेथे तुमच्या राहण्याची सोय करता यावी म्हणून तुम्हाला हवी ती माहिती देईल व तुमच्या राहण्याची व्यवस्था देखील करेल. तेव्हा, या बाबतीत तुम्ही आधीच चांगली योजना करा. रूम रिकवेस्ट फॉर्म तुम्ही तुमच्या मंडळीच्या सेक्रटरीकडून घेऊ शकता. फॉर्मवरील माहिती भरल्यावर तुम्ही तो फॉर्म तुमच्या मंडळीच्या सेक्रटरीलाच द्यावा. आणि मग सेक्रटरी तुमचा फॉर्म, तुम्ही ज्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहात तेथील अधिवेशन मुख्यालयाला पाठवतील. तुमच्या पत्राचे उत्तर पाठवता यावे म्हणून नेहमी अधिवेशन मुख्यालयाला पोष्टाचे तिकीट, तुमचा पत्ता असलेले पाकीट पाठवा. एकाच शहरात दोन पेक्षा अधिक अधिवेशने होणार असल्यास, तुम्ही ज्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहात त्या अधिवेशनाच्या तारखा सुवाच्य अक्षरात लिहाव्यात.
४ हॉटेल मालकांचे यहोवाच्या साक्षीदारांबद्दलचे मत: यहोवाच्या लोकांच्या चांगल्या वर्तनाविषयी बोलल्यावर मिडवेस्टमधील एका हॉटेलच्या जनरल मॅनेजरने म्हटले: “यहोवाचे साक्षीदार गुरूवारी राहायला आल्यापासून सोमवार सकाळपर्यंत मी ‘बाहेरच’ असतो. कारण मला माहीत आहे की जर कसली समस्या आलीच तर ती क्षुल्लकच असेल. तुमचे लोक इथं येतात तेव्हा मला नेहमी आनंद होतो.” एका हॉटेलमधल्या एका सेल्सगर्लने म्हटले: “तुमचे लोक फार चांगले आहेत! कोणीही ‘थँक्यू’ म्हटल्याशिवाय जात नाही.” आपल्या बांधवांविषयी हे प्रशंसोद्गार ऐकून तुम्हाला अभिमान वाटत नाही का? यहोवा देवाच्या नावाची स्तुती होते याप्रकारे आपण आपले आचरण ठेवतो तेव्हा त्याला किती आनंद होत असेल याची कल्पना करा!
५ वृद्धांची आणि विशिष्ट समस्या असलेल्यांची काळजी घेणे: वृद्ध, आजारी किंवा विशिष्ट समस्या असलेल्या इतर बंधूभगिनींच्या परिस्थितींची जाणीव त्यांच्या नातेवाईकांना, मंडळीतील वडिलांना व इतरांना माहीत असल्यास, ते त्यांना अधिवेशनाला उपस्थित राहण्यास प्रेमळ साहाय्य देऊ शकतात; त्यांची प्रेमळ काळजी घेऊ शकतात. (पडताळा १ तीमथ्य ५:४.) अधिवेशनात त्यांच्या बसण्याची सोय अशा ठिकाणी करा जेथून त्यांना अधिवेशन कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा घेता येईल. कार्यक्रमादरम्यान जर अशा बंधूभगिनींबरोबर एखादा बंधू किंवा भगिनी स्वेच्छेने बसत असल्यास उत्तम! ते त्यांच्याबरोबर दुपारचे जेवण करू शकतात, त्यांना पिण्याचे पाणी आणून देऊ शकतात, त्यांना शौचालयास घेऊन जाऊ शकतात. अशा गरजू बांधवांना मदत करण्यासाठी पुष्कळ बंधूभगिनी पुढे आल्यास सर्वांनाच, (मग ते, सहसा त्यांची काळजी घेणारे त्यांचे नातेवाईक असोत किंवा मंडळीतील इतर जण असोत) कार्यक्रमाचा लाभ होऊ शकतो. या प्रेमळ सूचनेचे पालन केल्याने, आपल्या ख्रिस्ती बांधवांबद्दल आपल्याला असलेले प्रेम व्यक्त करण्याची व मीपणाची जगिक मनोवृत्ती टाळण्यास संधी मिळते.—१ करिंथ. १०:२४.
६ समाप्ती: तुमचे प्रांतीय अधिवेशन जसजसे जवळ येईल तसतसे तुम्ही यहोवाकडे प्रार्थना करू शकता जेणेकरून अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता तुम्ही करत असलेल्या योजना तो सफल करेल आणि अधिवेशन कार्यक्रमाचा होता होईल तितका फायदा तुम्ही करून घेऊ शकाल. प्रांतीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्याबरोबर तुम्ही देखील नोकरीच्या ठिकाणी सुटीसाठी अर्ज देऊ शकता; म्हणजे शेवटच्या मिनिटाला तुम्हाला सुटीसाठी योजना कराव्या लागणार नाहीत, कारण शेवटच्या मिनिटाला मागितलेल्या सुट्या सहसा दिल्या जात नाहीत. विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाने यंदा “देवाच्या वचनाचे शिक्षक” हे प्रांतीय अधिवेशन आपल्याला आध्यात्मिक सूचना देण्यासाठी आणि आपला विश्वास मजबूत करण्यासाठी तयार केले आहे. तेव्हा उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच योजना करायला सुरवात करा आणि “प्रभु जो देव त्याचा जनसभात धन्यवाद करा,” या स्तोत्रकर्त्याच्या सल्ल्याचे पालन करा.—स्तोत्र ६८:२६.
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमाच्या वेळा
शुक्रवार आणि शनिवार
सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:००.
रविवार
सकाळी ९:३० ते संध्याकाळी ४:००.