‘देवाबरोबर चाला’ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन २००४
१ कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला आपली वार्षिक प्रांतीय अधिवेशने विशेष वाटतात? ‘विश्वासू व बुद्धिमान दासवर्गाने बनवलेल्या’ उभारणीकारक भाषणांमुळे व बायबल आधारित नाटकामुळे? (मत्त. २४:४५-४७) आध्यात्मिक पोषण देणाऱ्या समयोचित नवीन प्रकाशनांमुळे? बायबलमुळे आपले जीवन कसे सुधारले हे सांगणाऱ्या बंधू व भगिनींच्या अनुभवांमुळे? राज्य प्रचाराचे कार्य इतर देशांत कसे वाढत चालले आहे त्याच्या अहवालांमुळे? सर्व वयोगटांतील आपल्या सहविश्वासू बंधूभगिनींच्या सहवासामुळे? होय, या आणि इतर अनेक कारणांमुळे आपण आपल्या प्रांतीय अधिवेशनांची आतुरतने वाट पाहत असतो!
२ तिन्ही दिवशी उपस्थित राहा: मोशेद्वारे यहोवाने अशी आज्ञा दिली: “सर्व लोकांना . . . जमव म्हणजे ते ऐकून शिकतील.” (अनु. ३१:१२) विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाकरवी यहोवाने आपल्या अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसासाठी शिक्षणाचा खास कार्यक्रम तयार केला आहे. “जे हितकारक ते” तो आपल्याला शिकवत असल्यामुळे आपण सर्वांनी त्याच्या सूचना ऐकण्यासाठी तेथे हजर असले पाहिजे. (यश. ४८:१७) परंतु, गेल्या वर्षाच्या “देवाचे गौरव करा” या प्रांतीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची अर्थात शुक्रवारची उपस्थिती, शनिवार आणि रविवारच्या मानाने कमी होती. याचा अर्थ, आपल्या पुष्कळ बांधवांनी, अधिवेशनात सादर केलेली महत्त्वपूर्ण माहिती गमावली. शिवाय, सहविश्वासू बंधूभगिनींबरोबरचा आल्हाददायक सहवासही ते गमावून बसले.
३ इतर गोष्टींना आड येऊ देऊ नका: शुक्रवारी अधिवेशनाला न येण्यामागचे एक कारण, नोकरीवरून काढून टाकण्याची भीती, हे असू शकते. इतरांना कदाचित त्यांची सुटी किंवा पैसा इतर कारणासाठी वाचवून ठेवायचा असेल. तुमचा मालक तुम्हाला सुटी देणार नाही किंवा अधिवेशनाचे एक किंवा दोन दिवस चुकवले तर काही बिघडत नाही, असा विचार करू नका. नहेम्याने जसे धाडस दाखवले त्याप्रमाणे, मालकाला सुटीसाठी विनंती करायच्या आधी, यहोवाला प्रार्थना करून मग मालकाशी बोला. (नहे. १:११; २:४) आणि मग, आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान दिल्यास तुमच्या आर्थिक गरजा भागवल्या जातील हे ओळखून यहोवाने दिलेल्या वचनांवर पूर्ण भरवसा ठेवा. (मत्त. ६:३३; इब्री १३:५, ६) शिवाय, होता होईल तितक्या लवकर, तुमच्या घरातल्या सत्यात नसलेल्या सदस्यांना अधिवेशनाविषयी सांगणे, प्रेमळपणाचे ठरेल.
४ “जे अधिक महत्त्वाचे आहे” त्याच्याबद्दल कदर बाळगणे, ही सर्वात मुख्य गोष्ट आहे. (फिलिप्पै. १:१०, ११, NW; स्तो. २७:४) यामुळे आपण, यहोवाकडून येत असलेल्या या महत्त्वपूर्ण तरतुदीचा पूर्ण लाभ घेण्याकरता आधीपासूनच योजना करण्यास प्रवृत्त होऊ. आतापासूनच निश्चित योजना करायला लागा आणि तिन्ही दिवशी तुम्ही हजर राहाल असा दृढनिश्चय करा!
५ राहण्याची व्यवस्था: गेल्या वर्षाप्रमाणे, या वर्षी देखील सुलभ रुमींग व्यवस्था असेल. रुमींग डिपार्टमेंट, हॉटेलमध्ये ॲडव्हान्स बुकींग करणार नाही. त्याऐवजी ते, हॉटेलांच्या नावांची आणि त्यांच्या रुम्सच्या भाड्यांची यादी मंडळ्यांना पाठवतील जेणेकरून जे हॉटेलमध्ये राहू इच्छितात ते आपल्या आवडीनुसार थेट हॉटेलशी संपर्क साधू शकतील आणि त्यांना हव्या तितक्या खोल्यांचे आरक्षण करू शकतील. अधिवेशन व्यवस्थापन, केवळ डॉर्मेट्रीत राहण्याची व्यवस्था करेल. याबाबतीत, अधिवेशन रुमिंग डिपार्टमेंटकडून अधिक माहिती मंडळ्यांना पाठवली जाईल. डॉमेट्रीत राहण्याची व्यवस्था करायची असेल तर तुमच्या विनंत्या होता होईल तितक्या लवकर पाठवा. पृष्ठ ४ वरील “रुमिंग व्यवस्थेला तुम्ही सहकार्य कसे देऊ शकाल” या पेटीतील मुद्द्यांची उजळणी करा.
६ विशेष गरजा: प्रेषित पौलाने गलती येथील मंडळ्यांना “आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे” अशी आठवण करून दिली. (गलती. ६:१०) वय झालेले बंधूभगिनी, आजारी असलेले, एकटे पालक किंवा पूर्ण-वेळेच्या सेवेत असलेले, तुमच्याकडे मदत मागणार नाहीत परंतु अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल. अशांचे तुम्ही ‘बरे करू’ शकाल का आणि काही ना काही मदत देऊ शकाल का? ख्रिस्ती नातेवाईकांनी व वडिलांनी अशा बंधूभगिनींच्या गरजांची विशेष जाणीव बाळगली पाहिजे.
७ एखाद्या प्रचारकाने स्पेशल नीड्स रूम रिक्वेस्ट फॉर्म भरून दिला असेल तर मंडळीची सेवा समिती त्यावरील सूचनांचा उपयोग करून तो फॉर्म पडताळून पाहील. त्या अमुक बांधवाच्या किंवा भगिनीच्या गरजा स्थानीयरीत्या पूर्ण केल्या जाऊ शकतात की नाही याचाही समितीतील बांधवांनी विचार करावा. ही तरतूद, केवळ अशा प्रचारकांसाठीच आहे ज्यांचे मंडळीत चांगले नाव आणि ज्यांच्या मुलांचे चांगले आचरण आहे. रुमिंग डिपार्टमेंटला, खास गरजेच्या विनंतीविषयी काही प्रश्न असतील तर ज्या मंडळीने तो फॉर्म पाठवला आहे त्या मंडळीच्या सचिवांशी ते संपर्क साधतील.
८. दुसऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहणे: तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला कदाचित, दुसऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहावे लागेल जे तुमच्या मंडळीला नेमलेले नाही. त्या अधिवेशनाविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर कृपया आपल्या मंडळीच्या सचिवांना विचारा. भारतात या वर्षी होणाऱ्या अधिवेशनांची त्यांच्या तारखांनुसार त्याचप्रमाणे प्रत्येक अधिवेशन मुख्यालयाच्या पत्त्याची माहिती, आमची राज्य सेवा याच्या नंतरच्या एका अंकात प्रकाशित केली जाईल. उचित पत्त्यावर आपली मागणी पोस्टाने पाठवा; सोबत स्वतःचा पत्ता लिहिलेले आणि तिकीट चिकटवलेले एक रिकामे पाकीटही पाठवा. एकाच शहरात दोन किंवा त्याहूनही अधिक अधिवेशने होणार असतील तर, तुम्ही ज्या अधिवेशनाला उपस्थित राहू इच्छिता त्या अधिवेशनाच्या तारखा तुमच्या फॉर्मवर लिहायला विसरू नका. त्या अधिवेशनाचे रुमिंग डिपार्टमेंट तुम्हाला हॉटेलांच्या पत्त्यांच्या व तेथील खोल्यांच्या दरांच्या माहितीची नवीन यादी पाठवतील.
९ जवळजवळ २,५०० वर्षांपूर्वी, यहोवाच्या लोकांच्या एका अधिवेशनात एज्रा आणि त्याच्या सहलेवीयांनी जमलेल्या लोकांना देवाच्या वचनातून काही भाग वाचून दाखवले आणि त्यांचा अर्थ समजावून सांगितला. याचा परिणाम काय झाला? नहेम्या ८:१२ आपल्याला सांगते, की “सर्व लोक . . . मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांस वाचून दाखविली होती ती त्यांस समजली होती.” अभिषिक्त दास वर्ग, एज्रा आणि लेवीयांप्रमाणे देवाच्या वचनाचा उपयोग करत आहे, त्याचा अर्थ समजावून सांगत आहे आणि त्यातील गोष्टींचे आपल्या जीवनात अनुकरण कसे करायचे हे दाखवत आहे यामुळे आपण त्यांचे आभारी नाही का? असे करण्याद्वारे हा दासवर्ग, यहोवाला आपल्या सर्व लोकांबद्दल असलेले खरे प्रेम व काळजी प्रदर्शित करतो. तेव्हा, ‘देवाबरोबर चाला’ प्रांतीय अधिवेशनाचा एकही दिवस न चुकवण्याचा दृढ निश्चय करा!
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमाची वेळ
शुक्रवारी आणि शनिवारी
सका. ९:३० - संध्या. सुमारे ५:१०
रविवारी
सका. ९:३० - संध्या. सुमारे ४:०५
[४ पानांवरील चौकट]
रुमिंग व्यवस्थेला तुम्ही सहकार्य कसे देऊ शकाल
◼ सुचवलेल्या हॉटेलांच्या यादींतील सर्व हॉटेलमधील खोल्या बुक झाल्या असतील किंवा यादीतील एखाद्या हॉटेलच्या बाबतीत तुम्हाला काही समस्या असेल तर तुमच्या मंडळीच्या सचिवांना याविषयी सांगा. ते तुमच्या अधिवेशनाच्या रुमिंग डिपार्टमेंटशी संपर्क साधतील.
◼ तुम्हाला लागतील तितक्याच खोल्यांचे आरक्षण करा.
◼ एकदा आरक्षण केले तर ते बदलू नका.
◼ केवळ डॉर्मेट्रीची व्यवस्था रुमिंग डिपार्टमेंट करेल. यास्तव, कृपया हॉटेलच्या खोल्या बुक करण्यासाठी रुमिंग डिपार्टमेंटला पैसे पाठवू नका.
◼ तुमच्या विनंतीवरच डॉर्मेट्रीतील खोल्या बुक केल्या जातात. तेव्हा, ज्या डॉर्मेट्रीत तुमची राहण्याची सोय केली आहे त्याच डॉर्मेट्रीत राहा. तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही जितक्या लोकांसाठी डॉर्मेट्रीत राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली होती त्याच्यापेक्षा जास्त लोकांची राहण्याची व्यवस्था करण्याची अपेक्षा करू नका.
◼ अधिवेशन झाल्यावर घरी परतण्याआधी, तुम्ही डॉर्मेट्रीच्या भाड्याचे पूर्ण पैसे रुमिंग डिपार्टमेंटला दिल्याची खात्री करा.