“देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे” यहोवाच्या साक्षीदारांचे जिल्हा अधिवेशन
“मोठ्या मंडळीत मी तुझी उपकारस्तुती करीन; पुष्कळ लोकांमध्ये मी तुला स्तवीन.” (स्तोत्र ३५:१८, पं.र.भा.) हे दाविदाचे शब्द आहेत. आज आपल्या अधिवेशनांत हजारो लोक उपस्थित राहतात. या हजारो लोकांना यहोवाची स्तुती करताना पाहून दाविदाला किती आनंद झाला असता याची कल्पना करा! मागच्या वर्षी “देवाचे भविष्यसूचक वचन” या विषयावर सबंध भारतात २७ अधिवेशने भरवण्यात आली होती. नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००० पर्यंत चाललेल्या या अधिवेशनांत ३०,४६२ लोक उपस्थित राहिले. या वर्षी देखील अशीच अधिवेशने भरवण्यात येणार आहेत. या अधिवेशनांचा विषय असेल “देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे.” “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे” अनेक बंधुभगिनी तेथे असतील. त्या सर्वांच्या मनात “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो” हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. तुम्हालाही त्या सर्वांसोबत यहोवाची स्तुती करायला आवडणार नाही का?—मत्त. ५:३, NW; प्रकटी. २:२९.
२ निवास व्यवस्था: अधिवेशनाच्या शहरात तुमच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हा निवास व्यवस्था विभाग आहे. तुमच्या मंडळीच्या सेक्रेटरीकडे तुम्ही याविषयी विचारपूस करू शकता. ते तुम्हाला रूम रिक्वेस्ट फॉर्म देतील; तो भरून त्यांना परत द्या आणि मग सेक्रेटरी अधिवेशनाच्या नियुक्त बांधवाला तो फॉर्म पाठवतील. फॉर्मवर तुमच्या अधिवेशनाच्या तारखा स्पष्ट आणि ठळक अक्षरात लिहा. कारण काहीवेळा एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त अधिवेशनांची व्यवस्था केली जाते. सोबत तिकीट लावलेले व तुमचा पत्ता असलेले पाकीट द्यायला विसरू नका. कारण त्यामुळे अधिवेशनाच्या नियुक्त बांधवाला तुम्हाला हवी असलेली माहिती पाठवता येईल. हे सर्व करण्यासाठी शेवटल्या क्षणापर्यंत थांबू नका, आधीपासूनच योजना करा.
३ वयस्करांना आणि दुर्बलता असलेल्यांना साहाय्य: अधिवेशनातील वयस्कर, अपंग आणि आजारी लोकांना आपल्या मदतीची गरज ही लागणारच. अशा लोकांच्या नातेवाईकांना, मंडळीतील वडिलांना आणि इतरांना त्यांच्याकरता काय करता येण्यासारखे आहे? (पडताळा १ तीमथ्य ५:४.) त्यांच्या बसण्याची व्यवस्था करणे, त्यांना काही हवे असल्यास किंवा त्यांना बाहेर जायचे असल्यास त्यांची लागलीच अदबीने मदत करणे हा आपल्याकरता बहुमानच आहे. अशा लोकांच्या मदतीकरता पुढे आल्यामुळे अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा सर्वांना निश्चितच लाभ होईल.
४ एकही दिवस चुकवू नका: देवाच्या लोकांनी त्याच्या राज्याला जीवनात पहिले स्थान द्यावे असे सैतानाला कधीच वाटत नाही. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे सैतानाला त्याच्या या कामात पुष्कळ यशही मिळाले आहे. त्यामुळेच अनेकांना शुक्रवारच्या कार्यक्रमाचे इतके महत्त्व वाटत नाही. ते शुक्रवारच्या कार्यक्रमाला येत नाहीत आणि परिणामी त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शनाला मुकावे लागते आणि ख्रिस्ती बंधुभगिनींच्या सहवासाचा लाभ होत नाही.
५ मुळात कारण असे आहे, की अनेकांच्यासमोर शुक्रवारच्या दिवशी अधिकाऱ्यांना रजा कशी मागावी हा प्रश्न असतो. तुमचाही हाच प्रश्न आहे का? मग यहोवाला प्रार्थना करा, धैर्य गोळा करा आणि तुमच्या अधिकाऱ्यांना भेटा. त्यांना अधिवेशनाचे महत्त्व सांगा. नहेम्याने काय केले होते तुम्हाला आठवते का? (नहे. २:१-६) यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा, देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिले स्थान द्या आणि मग तुम्हाला याची खातरी पटल्याशिवाय राहणार नाही, की यहोवा तुमच्या आवश्यक गरजा निश्चित पूर्ण करील.—मत्त. ६:३२ब, ३३.
६अधिवेशनांचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो? अमेरिकेच्या एका तरुणीने संस्थेला हे आभार व्यक्त करणारे पत्र लिहिले. ती म्हणते: “१९९९ सालच्या अधिवेशनांबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. माझं पहिलं अधिवेशन मला अजूनही आठवतं. मी नुकतीच अभ्यास करायला सुरवात केली होती; माझ्या जीवनात नैतिकतेला कोणताच थारा नव्हता. पहिल्यांदा मी अधिवेशनाला गेले तेव्हा लग्नाआधीच मला दिवस गेले होते. सर्वजण “मिरियड्स ऑफ ब्रदर्स” हे गीत गाऊ लागले तेव्हा मी अक्षरशः रडू लागले. त्या सर्व लोकांना पाहून मी विचार केला, माझ्यासारख्या पापी व्यक्तीला यहोवा स्वीकारेल का? आणि त्या दिवशी मी ठरवलं की यापुढे मी शुद्ध अंतःकरणाने आणि नैतिकतेने यहोवाची सेवा करेन.” अधिवेशनामध्ये आपण यहोवाच्या नीतिप्रिय लोकांसोबत त्याची उपासना करतो याचा तुम्हाला आनंद वाटत नाही का?
७ शेवटल्या दिवसांच्या या अंतिम टप्प्यात आपले आध्यात्मिक आरोग्य आणि संतुलन टिकवून ठेवणे अतिशय गरजेचे आहे. आपले साहाय्य करण्याकरताच यहोवाने दर वर्षी प्रांतीय अधिवेशनांची तरतूद केली आहे. यंदा “देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे” या प्रांतीय अधिवेशनाला तीनही दिवशी उपस्थित राहण्याचा निर्धार करा. अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता? तिन्ही दिवसांकरता रजा मिळावी म्हणून आतापासूनच आपल्या अधिकाऱ्यांना विनंती करा. अधिवेशनाच्या वेळी पैशांची समस्या उद्भवू नये म्हणून आतापासूनच थोडे थोडे पैसे खास अधिवेशनाकरता जमा करायला सुरवात करा. कोणताही अडथळा आला तरी त्यावर मात करण्यासाठी यहोवाची मदत मागा. मग तुम्ही देखील आपल्या प्रेमळ पित्या यहोवाकडून मिळणारी सार्वकालिक जीवनाची वचने ऐकण्याकरता सर्व बंधुभगिनींसोबत आनंदाने एकत्र येऊ शकाल.—पडताळा योहान ६:६८.
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमाच्या वेळा
शुक्रवार आणि शनिवार
सका. ९:३० - सायं. ५:००
रविवार
सका. ९:३० - सायं. ४:००