१९९८ “ईश्वरी जीवनाचा मार्ग” प्रांतीय अधिवेशने
१ दर वर्षी सबंध जगभरातील यहोवाचे आधुनिक काळातले उपासक प्रांतीय अधिवेशनांमध्ये मोठ्या संख्येने एकत्र होण्याची उत्कंठेने वाट पाहतात. असे करताना, जेरूसलेमला यहोवाची उपासना करायला जाणाऱ्या प्राचीन इस्राएलमधील यहोवाच्या विश्वासू सेवकांसारखाच आत्मा ते प्रदर्शित करतात; वाटेवर ते हर्षाने स्तोत्र १२२ गात असत. त्या स्तोत्राचे पहिले वचन असे आहे: “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.” अशा प्रसंगी यशया २:२, ३ मधील प्रेरित शब्दांची पूर्णता होत असल्याचा जबरदस्त पुरावा आपल्यालाही पाहायला मिळतो.
२ नीतिसूत्रे १०:२९ येथे आपल्याला आठवण करून दिली आहे की, “परमेश्वराचा मार्ग . . . दुर्गरूप आहे.” या वर्षाच्या अधिवेशनाचे शीर्षक केवढे साजेसे आहे—“ईश्वरी जीवनाचा मार्ग”! त्या तीन दिवसीय कार्यक्रमात या विषयाची हाताळणी कशी केली जाईल? पुढे काय होईल याची आपल्या सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितले जातील.
३ उपस्थित राहण्याजोगे आहे: आफ्रिकेच्या खंडातील काही भागांमध्ये युद्ध आणि दंगल यांमुळे आपल्या बहुतेक बांधवांना हालअपेष्टा सोसावी लागली आहे. पण यहोवाच्या लोकांची अधिवेशने म्हणजे त्यांच्यासाठी जीवनरक्तच! काहींना अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता केवढ्या दूरदूरहून चालत यावे लागते पण तरीही अधिवेशन चुकवायचा विचारही त्यांना करवत नाही. काँगो लोकतंत्रीय गणराज्यातील (भूतपूर्व झैरे) ७३ वर्षांचे एक बांधव एका अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता ४५० किलोमीटर चालले. त्यांना चक्क १६ दिवस लागले, पाय सगळे सुजून टंब झालेले पण आपण अधिवेशनाला आलो याचा त्यांना केवढा आनंद झालेला. अधिवेशनानंतर तर अधिकच खुश झाले होते आणि आध्यात्मिक बळकटी मिळाली होती; घरी जाताना ते पुन्हा पायीच गेले. गेल्या कितीतरी वर्षांपासूनचा हा त्यांचा ठरलेला क्रम!
४ मोझाम्बिकमध्ये, एका प्रांतीय पर्यवेक्षकांना व त्यांच्या पत्नीला विभागीय संमेलनाला उपस्थित राहण्याकरता उंच डोंगर पार करावा लागला आणि एका मोठ्या माळरानातून पायी जावे लागले. हा ९० किलोमीटरचा प्रवास करायला त्यांना ४५ तास लागले. या जोडप्याचे उत्तम उदाहरण पाहून उपस्थित असलेल्या सर्वांना खूप उत्तेजन मिळाले. तेथे आलेल्या कित्येक कुटुंबांनी अधिवेशनाला उपस्थित राहायला असाच खडतर प्रवास केला होता. प्रांतीय पर्यवेक्षकांनी सांगितले की, काही बांधव तर २०० किलोमीटर चालून आले होते—त्यांच्यात ६० वर्षांचे एक बांधव होते.
५ या वर्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहायला तुम्ही काही निश्चित योजना केली आहे का? कदाचित तुम्हाला लांबून चालून यावे लागणार नाही, पण तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला उपस्थित राहण्याकरता काहीतरी प्रयत्न आणि त्याग करावाच लागेल. सुरवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची योजना करा. अनेक बायबल विद्यार्थी समर्पणाप्रत प्रगती करत आहेत. अधिवेशनाला ते उपस्थित राहिलेत तर त्यांना योग्य निर्णय घ्यायला मदत मिळेल. तुमच्यासोबत अधिवेशनाला येण्याचे आमंत्रण तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना आणि इतर आस्थेवाईक लोकांना दिले आहे का?
६ तीन दिवसीय कार्यक्रम: भारतामध्ये या वर्षी २० ठिकाणी हा कार्यक्रम सादर केला जाईल. इंग्रजीव्यतिरिक्त, कन्नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये अधिवेशने भरवली जातील. या पुरवणीच्या ६ व्या पानावर त्या अधिवेशनांच्या तारखा आणि पत्ते दिले आहेत.
७ खास सूचना: शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी हा कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी ५ वाजता आणि रविवारी संध्याकाळी ४ वाजता कार्यक्रम संपेल. दररोज सकाळी ८ वाजता प्रवेशद्वार उघडण्यात येईल. त्याआधी, कामाची काही नियुक्ती असलेल्यांनाच आत जाण्याची परवानगी दिली जाईल. तरीही, सकाळी ८ आधी कोणालाही जागा राखायला परवानगी नसेल.
८ अधिवेशनाला ये-जा करताना अनौपचारिक साक्षीकार्याची संधी साधण्याचा आपण प्रयत्न करावा. पेट्रोल पंपावरचे कामगार, दुकानदार, हॉटेल कर्मचारी आणि वेटर यांना कदाचित राज्य संदेशात रुची असेल. पत्रिका, चालू नियतकालिके, माहितीपत्रके किंवा इतर साहित्य सोबत ठेवून तयारीत राहा; म्हणजे एरवी ज्यांना सुवार्ता ऐकवण्याची संधी मिळत नाही अशांना साक्ष देता येईल.—२ तीम. ३:१७.
९ “तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा”: अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्यांनी लूक ८:१८ येथील सल्ला मनावर घेतला तर त्यात सुज्ञता आहे. सर्वांना बायबल, गीतपुस्तक आणि एक वही आणण्याचे उत्तेजन दिले जाते. सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक भागातील मुख्य मुद्दे लक्षपूर्वक ऐका आणि संक्षिप्त टीपा लिहा. स्वतःच्या बाबतीत साहित्य कसे लागू कराल हे स्वतःलाच विचारा. अधिवेशनाला जाऊन आल्यावर दररोज रात्री झोपण्याआधी, तुमच्या टिपणींची उजळणी करून यहोवाच्या जीवनमार्गानुरूप तुम्ही कितपत आहात याचे परीक्षण का करू नये?—नीति. ४:१०-१३.
१० असे निरीक्षण करण्यात आले आहे की, कार्यक्रम चालू असताना, काहीजण उठून बाहेर जातात आणि त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसतात; अशाने त्यांचा कार्यक्रम चुकतो. इतरजण जागेवर बसून कार्यक्रम ऐकण्याऐवजी विनाकारण हॉलच्या आवारात फेरफटके मारत असतात. ऐन दुपारच्या वेळी काही तरुणांना अधिवेशन सोडून बाहेर जाताना पाहिले आहे. यहोवाच्या काही सेवकांनी, यहोवाकडून येणाऱ्या स्मरणिका लक्षपूर्वक न ऐकल्याने गतकाळात गंभीर चुका केल्या आहेत. असे काही आपल्या हातून घडू नये. (२ राजे १७:१३-१५) ‘विश्वासू आणि बुद्धमान दासाने’ आपल्या सर्वांना आवश्यक असणारे शिक्षण तयार केले आहे. तीन दिवसांच्या अधिवेशन कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात ‘ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावावे’ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक दिवशी आपल्या खास अभिरुचीचे काहीतरी सादर केले जाईलच; यामध्ये आपल्या भविष्यातील जीवनपद्धतीवर हितकर प्रभाव पाडणारी माहिती देखील सादर केली जाईल. येत्या अधिवेशनांमध्ये लक्ष दिल्याने व यहोवा आपल्यासाठी पुरवत असलेल्या आध्यात्मिक गोष्टींचा पुरेपूर उपयोग केल्याने आपला विश्वास बळकट होईल म्हणजे आपण देवाच्या जीवनमार्गापासून “वाहवत” जाणार नाही.—मत्त. २४:४५; इब्री २:१.
११ यहोवाचा मान राखणारी वेशभूषा: या खडतर काळात, जगाच्या आत्म्याचा प्रभाव आपल्यावर होऊ नये म्हणून आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. (१ करिंथ. २:१२) आपली वेशभूषा आणि केशभूषा सभ्य असावी आणि त्यावरून आपण ज्या देवाची उपासना करतो त्याची श्रेष्ठता दिसून यावी. (१ तीम. २:९, १०) “आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणणाऱ्या लोकांपैकी असण्याकरता महागडे कपडे घालण्याची गरज नाही. (तीत २:१०) जून १५, १९९७ टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे १७ आणि १८, परिच्छेद १४-१८ मधील उत्तम व्यावहारिक आणि शास्त्रवचनीय सल्ला लक्षात घ्या. यहोवाचा आदर होईल अशातऱ्हेने वेशभूषा करून आपण जी शक्तिशाली साक्ष देऊ शकतो ती क्षुल्लक लेखू नका.
१२ एका १६ वर्षीय साक्षीदार मुलीने सांगितले की, कार्यक्रमानंतर संध्याकाळी ती तिच्या भावासोबत एका हॉटेलात गेली तेव्हा काही बांधव व बहिणी अनुचित पेहराव करून तेथे आलेले तिने पाहिले. परंतु, शालीन, नीटनेटका पोषाख घातलेल्या व बॅज कार्ड लावलेल्या साक्षीदारांबद्दल हॉटेलांमध्ये आलेल्या अनेक लोकांची प्रतिक्रिया चांगली होती. यामुळे तेथे आलेल्या काही लोकांना साक्ष देता आली.
१३ यहोवाची स्तुती करणारे वर्तन: इतरजण खऱ्या उपासनेला कोणत्या दृष्टीने पाहतात यावर ख्रिस्ती वर्तनाचा प्रभाव पडू शकतो हे आपल्याला ठाऊकच आहे. म्हणून, नेहमी सुवार्तेला शोभणारे आणि यहोवाची स्तुती करवणारे वर्तन असावे.—फिलि. १:२७.
१४ मागच्या वर्षी, उत्तर अंगोलात प्रथमच एक प्रांतीय अधिवेशन भरवण्यात आले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, दंगा होऊ नये म्हणून दोन पोलिस अधिकाऱ्यांना तेथे पाठवण्यात आले. ते सबंध दिवसभर तेथे राहिले. कार्यक्रम संपल्यावर, त्यांनी जे ऐकले होते आणि जी सुव्यवस्था तेथे पाहिली होती त्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली. त्यातील एकाने म्हटले: “आम्हाला इथं पाठवलंच कशाला? यहोवाचे साक्षीदार शांतताप्रिय आहेत हे तर आम्हाला ठाऊकच आहे.”
१५ एका आफ्रिकन देशातील राजकीय पक्षाचा एक सदस्य युरोपला पळून गेला; का तर, त्याच्या पक्षातल्या सर्वांचा खून झाला होता म्हणून. त्याच्या अनेक समस्या होत्या आणि तो खचून गेला होता. कालांतराने त्याने बायबल अभ्यास स्वीकारला. आपल्या पहिल्याच अधिवेशनाला उपस्थित असताना इतक्या विविध पार्श्वभूमीतले लोक कसे शांती आणि प्रेमाने एकत्र जमलेत ते पाहून तो प्रभावित झाला. आपल्याला सत्य मिळाले आहे याची त्याला खात्री पटली आणि त्या अधिवेशनातच सर्व राजकीय संबंध तोडून टाकण्याचा निश्चय त्याने केला. नंतर त्याचा बाप्तिस्मा झाला आणि आता तो व त्याची मुले यहोवाची उपासना करताहेत.
१६ यंदा, पहिल्याच वेळी अधिवेशनाला येणाऱ्यांवर आपल्या वर्तनाचा कसा प्रभाव पडेल? सर्वांना स्वयंसेवक म्हणून एकत्र काम करताना पाहून आपल्यातला सहयोगी आत्मा त्यांच्या लक्षात येईल का? आपला परिसर कसा स्वच्छ आहे आणि जाण्याआधी आपण स्वतः व आपली मुले आपल्या बैठकांच्या आसपास पडलेला कचरा उचलतो हे पाहून ते प्रभावित होतील का? ये-जा करताना आणि अधिवेशनाच्या ठिकाणी आपल्या सुव्यवस्थित वर्तणुकीचे निरीक्षण ते करतील का? आपण पालक असलो, तर आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेवतो याचे निरीक्षण ते करतील का? आपले निरीक्षण करणाऱ्यांवर आपण चांगली छाप पाडण्याची खात्री करू या.
१.७ अधिवेशनाचे खर्च भागवणे: आजच्या बाहेरच्या जगात, एखाद्या क्रिडेचे प्रवेश तिकीट किंवा स्टेडियम अथवा गृहात होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रवेश तिकीट अत्यंत महाग असू शकते. काही प्रमाणात, मुख्य शहरी भागांतल्या खर्चीक भाड्यामुळे तिकीट महाग असू शकते. परंतु, अधिवेशनांमध्ये मात्र “मोफत प्रवेश, देणग्या गोळा केल्या जाणार नाहीत” हेच संस्थेचे धोरण राहिले आहे. मग, अधिवेशनाचे भाडे आणि इतर खर्च कसे भागवले जातील? अधिवेशनाला येणाऱ्यांच्या उदार देणग्यांनी. यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे देवाच्या सेवकांनी गतकाळात दाखवलेल्या उदारतेचा आत्मा तुम्हीही दाखवाल याची आम्हाला खात्री आहे. (२ करिंथ. ८:७) सर्व देणग्या सुरक्षित ठेवल्या जातील, त्यांची नोंद ठेवली जाईल आणि ठरवलेल्या उद्देशाखातर उपयोगात आणल्या जातील याची फार काळजी घेतली जाते. चेकद्वारे केल्या जाणाऱ्या कोणत्याही देणग्या “वॉचटावर” च्या नावावर पाठवाव्यात.
१८ बैठक: गेल्या कित्येक वर्षांपासून देण्यात आलेली सूचना या वेळीही लागू होते, ती म्हणजे, जागा केवळ तुमचे जवळचे कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रवास करतात त्यांच्यासाठीच राखता येऊ शकते. यात खूप सुधारणा झाल्याचे पाहून आनंद वाटतो आणि यामुळे अधिवेशनांमधील प्रेमळ वातावरणाला आणखीनच प्रोत्साहन मिळाले आहे. काही ठिकाणी, काही बैठका इतरांपेक्षा सोयीस्कर असतात. कृपया विचारशील असा आणि वृद्ध अथवा गरजवंत लोकांसाठी अधिक सोयीच्या बैठका सोडा. प्रीती “स्वार्थ पाहत नाही” हे लक्षात ठेवा.—१ करिंथ. १३:४, ५; फिलिप्पै. २:४.
१९ कॅमेरा, कॅमकॉर्डर आणि ऑडिओकॅसेट रेकॉर्डर: अधिवेशनांमध्ये कॅमेरा आणि रेकॉर्डींगची उपकरणे वापरता येतील. परंतु, इतरांना त्यांचा त्रास होऊ नये. कार्यक्रम चालू असताना फोटो काढत इकडे-तिकडे फिरत राहिल्याने कार्यक्रमाकडे लक्ष देणाऱ्यांना विकर्षण होऊ शकते. इलेक्ट्रिकल किंवा साऊंड सिस्टिम्सना कोणतीही उपकरणे जोडण्यात येऊ नयेत किंवा मार्गात अथवा लोकांना समोरचे दिसणार नाही अशा ठिकाणी ती ठेवण्यात येऊ नयेत.
२० प्रथमोपचार: प्रथमोपचार विभाग केवळ तातडीच्या प्रसंगांसाठीच आहे. कृपया आपापली ॲस्प्रिन, पाचक गोळ्या, बँडेज, सेफ्टी पिन वगैरे आणावे कारण या गोष्टी अधिवेशनात दिल्या जाणार नाहीत. झटके, इन्सुलिन शॉक, हृदयविकाराच्या समस्या वगैरेंचा त्रास होणाऱ्या लोकांनी सोबत आपापली आवश्यक औषधे आणावीत. अशा व्यक्तीसोबत एखादा कौटुंबिक सदस्य किंवा ज्याला त्या व्यक्तीच्या आजाराविषयी माहिती आहे असे मंडळीतले कोणीतरी सतत असावे म्हणजे समस्या उद्भवलीच तर त्याला तो प्रसंग हाताळता येईल. अधिवेशनांमध्ये अशा घटना घडल्या आहेत जेव्हा जुनाट स्वास्थ्य समस्या असलेल्या व्यक्तींची प्रकृती बिघडली आणि त्यांच्या मदतीला जवळपास कोणीही नव्हते. खास स्वास्थ्य समस्या असलेल्यांचे कोणी मदत करणारे कौटुंबिक सदस्य नसल्यास, वडिलांना याविषयी कळवावे आणि त्यांची मदत करण्यासाठी आवश्यक योजना केल्या जाव्यात. ज्यांना पर्यावरणाशी संबंधित आजार आहेत अथवा ॲलर्जी आहे अशांसाठी अधिवेशनाच्या ठिकाणी खास खोल्यांची व्यवस्था करणे शक्य नाही.
२१ अधिवेशनातील भोजन: उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दुपारच्या लहानशा सुटीत बाहेर जेवायला जाण्याऐवजी स्वतःसाठी काहीतरी सोबत आणावे. पोषक आणि सोबत आणायला सोयीस्कर असे हलके फुलके जेवण पुरेसे होईल. जुलै १९९५ आमची राज्य सेवा यात काय आणावे याविषयी काही टिपणी दिली आहे. अधिवेशनाच्या ठिकाणी काचेची पात्रे आणि मादक पेय आणण्याची परवानगी नाही. पेय थंड ठेवण्याचे कूलर किंवा इतर बॅगा तुमच्या जागेखाली मावतील इतक्या लहान असाव्यात. प्रेक्षकांमध्ये काहींना कार्यक्रम चालू असताना खाताना व पिताना पाहिले गेले आहे. हे कार्यक्रमाबद्दल अनादर दाखवणारे आहे.
२२ लवकरच, १९९८ “ईश्वरी जीवनाचा मार्ग” अधिवेशन सुरू होईल ही केवढ्या आनंदाची गोष्ट! अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या तुमच्या योजना पूर्ण झाल्या का? तुमचा प्रवास सुखाचा होवो आणि घरी परतताना तुम्ही तजेला प्राप्त केलेले असावे; यहोवाच्या अमूल्य सेवेत अशीच प्रगती करण्याच्या ठाम निश्चयासह देवाचा जीवनाचा मार्ग अनुसरत राहा जेणेकरून तुम्हाला सदासर्वदाचा आशीर्वाद प्राप्त होईल.
अधिवेशन स्मरणिका
▪ बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी सकाळी कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांच्यासाठी नेमलेल्या जागेत बसावे. बाप्तिस्मा घेणाऱ्या प्रत्येकाने सभ्य पोषाख आणि टॉवेल आणावा. गतकाळात काहींनी अनुचित पोषाख घातला होता आणि म्हणून त्या प्रसंगाचे गांभीर्य राहिले नाही. बाप्तिस्म्याच्या उमेदवारांसोबत आपली सेवा पुस्तकातील प्रश्नांची उजळणी घेणारे वडील प्रत्येकाला हे मुद्दे समजले आहेत याची खात्री करतील. बाप्तिस्मा हा एखाद्याच्या समर्पणाचे द्योतक असून ही गोष्ट यहोवा व त्या व्यक्तीमधील वैयक्तिक व खाजगी बाब आहे. त्यामुळे बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी एकमेकांना मिठीत घेऊन किंवा हात पकडून बाप्तिस्मा घेणे अनुचित ठरेल.
▪ बॅज कार्ड: अधिवेशन ज्या शहरात आहे तेथे असताना आणि अधिवेशनाला ये-जा करताना नेहमी १९९८ बॅज कार्ड कृपया लावा. यामुळे आपल्याला बहुतेकदा उत्तम साक्ष द्यायला वाव मिळतो. बॅज कार्ड आणि होल्डर तुमच्या मंडळीतून प्राप्त करावीत कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतील. तुमच्याकरता आणि तुमच्या कुटुंबाकरता कार्ड हवे असल्यास, अधिवेशन तोंडावर येईस्तोवर थांबून राहू नका. तुमचे चालू आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड देखील सोबत आणायला विसरू नका.
▪ राहण्याची व्यवस्था: या संदर्भात तुम्हाला काही समस्या असेल, तर तुम्ही अद्याप अधिवेशनात असनाताच रुमिंग डिपार्टमेंटच्या पर्यवेक्षकांच्या लक्षात ती गोष्ट आणून द्या म्हणजे तिथल्या तिथे समस्या सोडवता येईल. प्रत्येक मंडळीच्या सचिवांनी, रूम रिक्वेस्ट फॉर्म्स उचित उधिवेशन मुख्यालयांच्या पत्त्यांवर तत्परतेने पाठवावेत. तुमच्या राहण्याची सोय तुम्हाला रद्द करायची असल्यास, अधिवेशनाच्या रुमिंग डिपार्टमेंटला तत्काळ कळवावे जेणेकरून खोली दुसऱ्या कोणास उपलब्ध करून देता येईल.
▪ स्वयंसेवक सेवा: अधिवेशनात एखाद्या विभागात मदत करण्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता का? दोन-चार तासांसाठी का होईना पण आपल्या बांधवांची सेवा केल्यास तेवढीच मदत होते आणि तुम्हाला व्यक्तिगत समाधानही लाभते. तुम्ही मदत करू शकत असल्यास, कृपया अधिवेशनातील स्वयंसेवक सेवा खात्यास कळवा. १६ वर्षांखालील मुलेही, त्यांच्या पालकांच्या किंवा इतर जबाबदार प्रौढांच्या निर्देशनाखाली काम करून उत्तम प्रकारे हातभार लावू शकतात.
▪ सावधानतेचा इशारा: तुमच्या गाडीला सतत कुलूप लावून ठेवत जा आणि अशी कोणतीही वस्तू वरती राहू देऊ नका ज्यामुळे कोणी चोरीचा प्रयत्न करील. चोर आणि खिसेकापू नेहमी मोठ्या मेळाव्यांमध्येच हात मारायचा प्रयत्न करत असतात. आपल्या जागेवर मौल्यवान वस्तू ठेवून जाणे सुरक्षित नाही. आपल्या सभोवतालची प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ती आहे याची आपल्याला खात्री असू शकत नाही. मग, संधी तरी का द्यावी? बाहेरच्या लोकांनी लहान मुलांना भुलवून नेण्याचा प्रयत्न केला आहे असे वृत्त मिळाले आहे. तुमची मुले सतत तुमच्या नजरेखाली राहू द्या.
पुष्कळ हॉटेलांमध्ये उपलब्ध असलेल्या टीव्ही आणि व्हिडिओ सेवेद्वारे अश्लील कार्यक्रम दाखवले जातात. आपल्या मुलांना रूममध्ये कोणी नसताना टीव्ही लावायला अनुमती देऊ नका.
कृपया अधिवेशन सभागृहाच्या व्यवस्थापनेला फोन करून किंवा पत्रव्यवहाराद्वारे अधिवेशनाच्या बाबींबद्दल विचारणा करू नका. वडिलांकडून माहिती उपलब्ध नसल्यास, मे १९९८ आमची राज्य सेवा अंकाच्या पृष्ठ ५ वरील एखाद्या विशिष्ट अधिवेशनाच्या पत्त्यावर तुम्ही पत्र पाठवू शकता. तुम्ही कोईमतूर किंवा मदुराई येथील अधिवेशनांना उपस्थित राहण्याची योजना करत असल्यास, या आमची राज्य सेवा अंकाच्या पृष्ठ ७ वर अधिवेशन मुख्यालयांचे पत्ते दिले आहेत.