बऱ्याच लोकांपर्यंत पोचण्याचा एक उत्तम मार्ग—टेलिफोन साक्षकार्य
आज जगातल्या परिस्थितीवर एक नजर टाकली, तर आपण “शेवटल्या काळात” जगत आहोत याची खात्री पटते. (२ तीम. ३:१) देवाच्या राज्याविषयी प्रचार करण्याकरता व लोकांना शिष्य बनवण्याकरता खरोखर आता फार कमी वेळ राहिला आहे. म्हणूनच, आपण प्रत्येकाने या काळाची गरज ओळखून कार्य केले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना यहोवा देवाच्या उपासनेकडे वळण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
२ पौलाने आपल्या विश्वासाविषयी इतरांना जाऊन सांगण्याची जबाबदारी ओळखली होती. (रोम. १०:१०) “सर्व माणसांचे तारण व्हावे” अशी देवाची इच्छा आहे याची त्याला जाणीव होती. (१ तीम. २:४) या जाणिवेमुळे, इतरांना सत्याचे ज्ञान देणे हे आपले कर्तव्य आहे असे तो समजत होता. स्वतःला तो लोकांचा ऋणी समजत होता. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सुवार्ता सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याने म्हटले: “सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला . . . तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.”—रोम. १:१४-१७.
३ आपल्याही भावना पौलासारख्याच आहेत का? लोकांना सत्याचे ज्ञान देणे हे आपले कर्तव्य आहे असे आपण समजतो का? आपल्या क्षेत्रातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची आपल्याला पौलाइतकीच उत्सुकता आहे का? बऱ्याच बांधवांना घरोघरच्या साक्षकार्यात किंवा रस्त्यावर प्रचार करताना लोकांना समोरासमोर भेटून त्यांना सुवार्ता सांगण्याची पद्धत जास्त सोपी वाटते. पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीनेही प्रचार केला जाऊ शकतो. आपल्या क्षेत्रात अद्याप बरेच लोक असे असतील जे आजपर्यंत कधीच यहोवाच्या साक्षीदारांना भेटलेले नसतील. याचे कारण काय असू शकते?
४ कार्य न झालेले क्षेत्र: तुमच्या क्षेत्रात अशा मोठमोठ्या अपार्टमेंट्स आहेत का, ज्यांत जायला वॉचमन मनाई करतात? कधीकधी तर बऱ्याच इमारतींची मोठी कॉम्प्लेक्सेस असतात, पण कडक सुरक्षा असल्यामुळे तेथे जाता येत नाही. तसेच डिफेन्स कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्समध्येही कधीकधी प्रचार करायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अशा इमारतींत राहणाऱ्या काही लोकांना यहोवाच्या साक्षीदारांना भेटण्याची किंवा देवाच्या राज्याची सुवार्ता ऐकण्याची कधी संधीच मिळत नाही. शिवाय काही असेही लोक असतात जे सहसा आपण जातो तेव्हा घरी भेटत नाहीत.
५ या लोकांची भेट घेणे कठीण आहे हे कबूल आहे, पण निराश होण्याची गरज नाही. यहोवाचा या बाबतीत कसा दृष्टीकोन आहे? प्रेषित पेत्र याचे उत्तर देतो: “कोणाचा नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.” (२ पेत्र ३:९, १५) यहोवाच्या नजरेत प्रत्येकाचे जीवन मोलाचे आहे. त्याला प्रत्येकाची काळजी आहे. (मत्त. १८:१४) मग आपणही यहोवाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीबद्दल काळजी कशी व्यक्त करू शकतो? यासाठी आपल्या क्षेत्रातल्या एकूणएक व्यक्तीला साक्ष देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.—प्रे. कृत्ये २०:२०, २१; प्रकटी. १४:६, ७.
६ सर्वांपर्यंत पोचण्याकरता: ज्यांना घराबाहेर पडता येत नाही अशा बांधवांना, किंवा आजारपणामुळे किंवा अपंगत्वामुळे अंथरूणाला खिळलेल्यांना टेलिफोनचा वापर करून साक्षकार्य करण्याचे प्रोत्साहन यापूर्वी संस्थेकडून दिले जायचे. जे लोक या परिस्थितीत आहेत अशांनी यापुढेही टेलिफोनचा वापर करून हे चांगले कार्य करत राहावे. पण अलीकडे अनेक बंधू व भगिनींनी, तसेच रेग्युलर व सहायक पायनियरांना देखील या पद्धतीने प्रचार करून फार चांगले परिणाम मिळाले आहेत.
७ काही मंडळ्यांनी टेलिफोन साक्षकार्य सुव्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी खास योजना आखल्या आहेत. असे पाहण्यात आले आहे, की जेव्हा मंडळीतले वडील या कार्यात जातीने लक्ष देतात तेव्हा प्रचारकांना अधिक चांगले परिणाम मिळतात. तशी या कार्याचे नियोजन करण्याची जबाबदारी खासकरून सर्व्हिस ओवरसियरची आहे. पण वडिलांपैकी कोणीएक किंवा वडिलांनी निवडलेला एखादा विश्वासू सेवा सेवक सर्व्हिस ओवरसियरला या कामात मदत करू शकतो.
८ बऱ्याच प्रचारकांना सुरवातीला हे कार्य करायला थोडी भीती वाटत होती; पण सुरवात केल्यानंतर हळूहळू त्यांची भीती गेली आणि या पद्धतीनेही चांगले परिणाम मिळत असल्याचे त्यांना दिसून आले. तुमच्याही मंडळीत कदाचित सुरवातीला दोनचारच प्रचारक आणि पायनियर टेलिफोन साक्षकार्य करू लागतील. पण हळूहळू त्यांना सवय झाल्यावर त्यांचा उत्साह पाहून आणि त्यांना आलेल्या चांगल्या अनुभवांविषयी ऐकून सर्वांनाच या पद्धतीने प्रचार करण्याचे उत्तेजन मिळेल.
९ सुरवात कशी करावी: अपार्टमेंट बिल्डिंगच्या गेटजवळ सहसा घरमालकांच्या नावाचा फलक असतो, त्यावरून किंवा पत्रपेट्यांवरून तुम्ही बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांची नावे लिहून घेऊ शकता. मग टेलिफोन डायरेक्टरीतून त्यांचे नंबर शोधू शकता. नवीन टेलिफोन डायरेक्टरीच्या पानांच्या झेरॉक्स घेऊन एकेका प्रचारकाला क्षेत्र वाटून द्यावे. एकाच प्रचारकाला खूप फोन नंबर देण्यात येऊ नयेत.
१० कोणत्याही पद्धतीने प्रचार केला तरी तो परिणामकारक होण्यासाठी, घरमालकांबद्दल अचूक माहिती लिहून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टेलिफोन साक्षकार्य याला अपवाद नाही. तेव्हा, हाउस टू हाउस रेकॉर्डवर घरमालकाबद्दलची माहिती, कोणत्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना कोणता विषय आवडला, पुढच्या वेळी कोणत्या विषयावर चर्चा करण्याचे ठरले हे सर्व सुस्पष्ट अक्षरात लिहून घ्या. पुढच्या वेळी पुन्हा फोनवरच बोलायचे ठरले, की घरी जाऊन भेटायचे ठरले हे देखील लिहून घ्या.
११ वैयक्तिक वेळापत्रक बनवा: बऱ्याच दिवसांतून एकदा करण्यापेक्षा, तुम्ही नियमितपणे टेलिफोन साक्षकार्य करत राहिला तर लवकरच तुमची भीती नाहिशी होऊन तुम्हाला आत्मविश्वास येईल. शक्यतो दर आठवड्यात एक ठराविक वेळ हे कार्य करण्याकरता राखून ठेवा. संध्याकाळी किंवा शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी सहसा लोक घरी असतात, तेव्हा यावेळी तुम्ही त्यांना फोन केल्यास ते तुमच्याशी निवांत बोलू शकतील. काहींना बुक स्टडीच्या आधी एक तास हे फोन कॉल्स करणे सोयीस्कर वाटते; त्यांना चांगले परिणाम देखील मिळाले आहेत. तुम्ही आपल्या क्षेत्रानुसार सर्वात उत्तम वेळ ठरवू शकता.
१२ तयारी कशी कराल: ज्यांना या पद्धतीने प्रचार करण्याचा सराव झाला आहे आणि चांगले परिणामही मिळाले आहेत अशा प्रचारकांशी तुम्ही बोलू शकता आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकू शकता. चांगले परिणाम जरूर मिळतील अशा आत्मविश्वासानेच सुरवात करा. यहोवाला प्रार्थना करा. तो तुम्हाला शक्ती देईल आणि तुमचे मार्गदर्शनही करेल. (स्तोत्र २७:१४; फिलिप्पै. ४:१३) घरोघरचे प्रचार कार्य ज्याप्रकारे तुम्ही उत्साहाने करता त्याचप्रकारे हे कार्यही पूर्ण मन लावून करण्याचा निर्धार करा.—पडताळा मार्क १२:३३.
१३ अनुभवावरून दिसून आले आहे, की फोनवर साक्षकार्य करताना समोर टेबल ठेवणे सोयीस्कर असते. एकतर खुर्चीवर ताठ बसल्यामुळे, स्पष्टपणे विचार करायला आणि लक्ष एकाग्र करायला मदत होते. तसेच टेबलावर तुम्हाला लागणारे सर्व साहित्य तुम्ही ठेवू शकता. ट्रॅक्ट्स, चालू महिन्यात देण्याकरता आमची राज्य सेवा यात सुचवलेले साहित्य, नवीन मासिके किंवा काही खास जुने अंक, बायबल, रीझनिंग पुस्तक, सर्व सभांच्या वेळा आणि किंगडम हॉलचा पत्ता लिहिलेला एक कागद, पेन किंवा पेन्सिल आणि हाउस टू हाउस रेकॉर्ड स्लिप्स जवळ ठेवा. ज्या मासिकाविषयी किंवा पुस्तकाविषयी तुम्ही सांगणार आहात ते हाताशीच ठेवा. वाटल्यास तुम्ही एखादा विशिष्ट लेखही उघडून ठेवू शकता. आपण काय बोलणार आहोत याचा आधीच विचार करा आणि वारंवार सराव करा. फोन करण्याचा तुमचा उद्देशही लक्षात ठेवा. तुम्हाला या व्यक्तीला साक्ष देऊन अधिक माहिती देण्याकरता लवकरात लवकर तिची भेट घ्यायची आहे हे लक्षात असू द्या.
१४ फोन लागल्यावर तुम्ही काय बोलणार: तुम्ही नेहमी बोलता तसेच सहज, स्वाभाविकपणे बोला. तुमच्या आवाजात तणाव किंवा भीती जाणवू नये. मैत्रिपूर्ण स्वरात बोलल्यामुळे सहसा चांगले परिणाम मिळतील. बोलताना तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल, तर आपोआपच तुमच्या आवाजातून ते कळून येईल. घाईघाईत न बोलता, हळूहळू आणि स्पष्टपणे बोला. फारच हळू किंवा फार मोठ्याने बोलू नका. आदराने, सौम्यतेने आणि मैत्रिपूर्णरितीने बोला. ती व्यक्ती तुमचे ऐकणार नाही, किंवा फोन खाली ठेवेल याची भीती बाळगू नका. उलट हे आधीपासूनच गृहित धरून चाला की सर्वच जण आपला संदेश ऐकून घेतील असे नाही. घरोघरच्या सेवेत ज्याप्रमाणे काही लोक ऐकतात काही ऐकत नाहीत, त्याचप्रमाणे टेलिफोन साक्षकार्यातही काही ऐकतील, काही ऐकणार नाहीत. तेव्हा याची जास्त काळजी करू नका.
१५ सर्वात आधी, आपले पूर्ण नाव सांगा. तुमच्या इमारतीत किंवा तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही सर्वांना फोन करत आहोत असे म्हणू नका. कारण यामुळे समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
१६ रीझनिंग पुस्तकात दिलेल्या बऱ्याच प्रस्तावना तुम्ही जशाच्या तशा पण बोली भाषेत वाचून दाखवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतःची असे म्हणून ओळख करून देऊ शकता, की “हॅलो, माझे नाव . . . आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नसल्यामुळे फोन केला.” असे म्हटल्यावर लगेच म्हणा: “मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, जगातली परिस्थिती कधी सुधारेल का? आज आपण जगतोय खरं, पण बऱ्याचदा असं वाटतं की ‘जीवनात खरं सुख, खरी शांती मिळणं शक्य नाही.’ तुम्हाला काय वाटतं याबद्दल? [त्यांच्या उत्तरासाठी थांबा.] मनुष्याच्या जीवनातला आनंद हिरावून घेणारी सर्वात मोठी समस्या कोणती आहे असं तुम्हाला वाटतं?” किंवा, नाव वगैरे सांगितल्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता: “मी एक स्वयंसेवक आहे, आणि काही विषयांवर तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे. जीवनाविषयी तुमचा काय दृष्टिकोन आहे? आपलं वय वाढतं तसतशी आपल्याला जाणीव होऊ लागते की मनुष्याचं जीवन किती कमी अवधीचं आहे. हाच जीवनाचा अर्थ आहे का? तुम्हाला काय वाटतं?” (रीझनिंग पुस्तकातील पृष्ठ १३ वर दिलेल्या “जीवन/आनंद” या शीर्षकाखाली पाहा.) आमची राज्य सेवाच्या जुलै १९९० अंकातील चवथ्या पानावर दिलेल्या सूचनांची उजळणी करा. यात टेलिफोन साक्षकार्य करण्याकरता कोणत्या प्रस्तावनांचा उपयोग करावा, कोणते आक्षेप घेतले जाऊ शकतात आणि त्यांना कसे उत्तर द्यावे याविषयी अधिक खुलासा केला आहे.
१७ तुमच्या चर्चेत बायबलचा उपयोग करायला फार वेळ थांबू नका. संभाषणात, योग्य ठिकाणी तुम्ही यहोवाचे साक्षीदार असल्याचा उल्लेख करा. घरमालकाला पण बोलण्याची संधी द्या. त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केल्यास घाबरू नका, ऐकून घ्या. त्यांनी आपले मत व्यक्त केले याबद्दल त्यांचे आभार माना, त्यांच्या विचारांची प्रशंसा करा. पण, ती व्यक्ती तुम्हाला बोलूच देत नसेल किंवा विनाकारण वाद घालत असेल तर समजूतदारपणे संभाषण बंद करा. देवाबद्दल ज्यांची योग्य मनोवृत्ती आहे अशांना शोधण्याचा प्रयत्न करत असताना देवाचा आत्मा जरूर तुम्हाला पाठबळ आणि मार्गदर्शन देईल.
१८ बोलून झाल्यानंतर घरमालक शेवटी काहीतरी म्हणेल अशी अपेक्षा करण्याऐवजी तुम्ही स्वतःच संभाषण समाप्त करा. यासाठी तुम्ही राज्य सभागृहाचा पत्ता आणि सभांची वेळ सांगून त्या व्यक्तीला जाहीर भाषण ऐकायला येण्याचे निमंत्रण देऊ शकता. किंवा त्यांच्या घरी येऊन या विषयावर अधिक चर्चा केल्यास आवडेल का असे तुम्ही त्यांना विचारू शकता. टेलिफोन साक्षकार्य करताना तुम्ही साहित्य देखील सादर करू शकता. मासिके आणून देण्याविषयी तुम्ही सांगू शकता आणि अशारितीने पुढे तुम्ही मॅगझीन रूट देखील सुरू करू शकता.
१९ टेलिफोन साक्षकार्याचा आनंद अनुभवून पाहा: ज्यांना ज्यांना फोन केला ते सर्वच जण बायबल अभ्यास करायला तयार होतील का? नाही, पण निदान काही जण तर होतील. उदाहरणार्थ एका बहिणीने एका महिन्यात ३०० लोकांना फोन केले. स्वतःचे नाव सांगितल्यानंतर ती प्रत्यक्ष येऊन भेटण्याऐवजी फोन का करत आहे हे समजावून सांगायची. मग ती आपला संदेश थोडक्यात सांगायची. याचा परिणाम असा झाला की १२ लोकांनी अधिक माहिती घेण्याची उत्सुकता दाखवली. यांपैकी तिघांशी ती अद्यापही फोनवरच चर्चा करते तर इतर चार जणांनी तिला घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे.
२० येशूने आपल्या शिष्यांना राज्याचे साक्षकार्य “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” नेण्याची आज्ञा दिली होती. (प्रे. कृत्ये १:८) काही क्षेत्रांत ही आज्ञा पाळण्यासाठी टेलिफोन साक्षकार्य करण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा वरील माहितीवर विचार केल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा: ‘माझ्या मंडळीला नेमलेल्या क्षेत्रात “सर्व माणसांना” सुवार्ता सांगण्यासाठी, तसेच आजपर्यंत कोणीच हात लावलेला नाही अशा क्षेत्रातील लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी काही अधिक प्रयत्न करू शकतो का?’ या सूचनांचा ज्यांनी अवलंब केला त्यांना फार चांगले परिणाम मिळाले. त्यामुळे या बांधवांना हे कार्य करण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. टेलिफोन साक्षकार्य हा “आपल्या सेवेला मोठेपणा” देण्याचा एक उत्तम मार्ग आहे हे त्यांना पटले आहे. (रोम. ११:१३) तुम्ही देखील या आनंदाचा अनुभव घेऊ शकता.