तुमचे काम आगीत टिकून राहील का?
“[पायावरचे] बांधकाम आपण कसे करीत आहोत ह्याविषयी प्रत्येकाने जपावे.”—१ करिंथकर ३:१०.
१. भावी शिष्यांविषयी विश्वासू ख्रिश्चनांना कोणती आशा वाटते?
एक ख्रिस्ती दांपत्य आपल्या नवजात बालकाकडे एकटक पाहतात. एक राज्य प्रचारक एका बायबल विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उत्सुकतेचे, आस्थेचे भाव पाहतो. स्टेजवरून शिकवणाऱ्या ख्रिस्ती वडिलांचे लक्ष, बसलेल्या श्रोत्यांमध्ये, नव्याने आस्था घेणाऱ्या एकाकडे जाते जो अगदी उत्सुकतेने आपल्या बायबलमधून शास्त्रवचने पाहत आहे. यहोवाच्या या सर्व विश्वासू सेवकांना आशा वाटते, की ‘आपण ज्याला पाहत आहोत तो यहोवावर प्रीती करून त्याची सेवा करून त्याच्याशी विश्वासू राहील का?’ अर्थातच हे सर्व आपोआप घडणार नाही. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील.
२. प्रेषित पौलाने शिकवण्याच्या कार्याच्या महत्त्वाची आठवण इब्री ख्रिश्चनांना कशी करून दिली व यामुळे आपण कोणते आत्म-परीक्षण करण्यास प्रवृत्त होऊ?
२ स्वतः एक निपुण शिक्षक असलेल्या प्रेषित पौलाने शिकवण्याच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याच्या महत्त्वावर जोर देत असे लिहिले: “इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे.” (इब्री लोकांस ५:१२) त्याने ज्या ख्रिश्चनांना हे उद्देशून म्हटले होते ते सत्यात येऊन अनेक वर्षे झाली होती परंतु त्या मानाने त्यांनी फारच कमी प्रगती केली होती. त्यांचे शिक्षक होणे तर दूरच राहिले होते उलट त्यांनाच सत्याच्या काही मूलभूत पैलूंची आठवण करून द्यावी लागत असे. आज, आपल्यातील सर्व, जेव्हा शिक्षक या नात्याने आपल्या क्षमतांचे परीक्षण करून आपल्याला कोठे सुधारणा करता येतील हे वेळोवेळी पाहतात तेव्हा उचित करतात. अनेकांचे जीव धोक्यात आहेत. आपण काय करू शकतो?
३. (अ) प्रेषित पौलाने ख्रिस्ती शिष्य बनवण्याच्या कार्याची तुलना कशाबरोबर केली? (ब) ख्रिस्ती बांधकाम करणारे या नात्याने आपणा सर्वांना कोणता विशेषाधिकार आहे?
३ एका विस्तृत दाखल्यात, पौलाने शिष्य बनवण्याच्या कार्याची तुलना इमारतीच्या बांधकामाशी केली. त्याने असे म्हणून सुरवात केली: “आम्ही देवाचे सहकारी आहो; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा.” (१ करिंथकर ३:९) म्हणजे आपण अशा एका बांधकामात आहोत ज्यात लोकांचा समावेश आहे; ख्रिस्ताचे शिष्य म्हणून त्यांची रचना करीत आहोत. हे आपण, ज्याने ‘सर्व काही बांधले’ त्याचे सहकारी या नात्याने करत आहोत. (इब्री लोकांस ३:४) किती मोठा विशेषाधिकार! पौलाने करिंथकरांना दिलेला ईश्वरप्रेरित सल्ला, आपल्या कामात अधिक कुशल होण्यास आपल्याला कशी मदत करू शकतो ते पाहू या. आपण आपले लक्ष खासकरून ‘शिकवण्याच्या कलेवर’ केंद्रित करू या.—२ तीमथ्य ४:२, NW.
उचित पाया घालणे
४. (अ) ख्रिस्ती बांधकामात पौलाची काय भूमिका होती? (ब) येशू आणि त्याचे श्रोते यांना भक्कम पायांचे महत्त्व माहीत होते असे का म्हणता येऊ शकते?
४ इमारत स्थिर व टिकाऊ हवी तर तिचा पाया चांगला असला पाहिजे. म्हणून पौलाने लिहिले: “माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला.” (१ करिंथकर ३:१०) अशाच एका दाखल्याचा उपयोग करून येशू ख्रिस्ताने एका घराविषयी सांगितले जे, वादळात टिकून राहिले कारण ते बांधणाऱ्याने पायासाठी मजबूत जमीन निवडली होती. (लूक ६:४७-४९) पाया किती महत्त्वाचा असतो हे येशूला माहीत होते. यहोवाने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तो तेथे उपस्थित होता.a (नीतिसूत्रे ८:२९-३१) येशूच्या श्रोत्यांनाही भक्कम पायांचे महत्त्व होते. भक्कम पाया असलेली घरेच केवळ पॅलेस्टाईनमध्ये केव्हा केव्हा येणाऱ्या पुरांत व भूकंपांत टिकून राहू शकत होती. परंतु पौल कोणत्या पायाचा विचार करीत होता?
५. ख्रिस्ती मंडळीचा पाया कोण आहे व हे कसे भाकीत करण्यात आले होते?
५ पौलाने लिहिले: “येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.” (१ करिंथकर ३:११) येशूची तुलना पायासोबत करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. खरे तर, यशया २८:१६ ने भाकीत केले होते: “प्रभु परमेश्वर म्हणतो; पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसविणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे.” आपल्या पुत्राने ख्रिस्ती मंडळीचा पाया व्हावे हे यहोवाने फार पूर्वीच उद्देशिले होते.—स्तोत्र ११८:२२; इफिसकर २:१९-२२; १ पेत्र २:४-६.
६. पौलाने करिंथच्या ख्रिश्चनांकरता उचित पाया कसा घातला?
६ प्रत्येक ख्रिश्चनाचा पाया काय आहे? पौलाने म्हटले त्याप्रमाणे खऱ्या ख्रिश्चनाला स्वतंत्र पाया नाही, तर देवाच्या वचनात घालून दिलेला अर्थात येशू ख्रिस्त हा एकच पाया आहे. पौलाने निश्चितच असा एक पाया घातला. तत्त्वज्ञानाला जिथे जास्त मानले जायचे त्या करिंथमध्ये त्याने जगिक ज्ञानाने लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट पौलाने, राष्ट्रांनी ज्याला “मूर्खपणा” समजून दुर्लक्ष केले होते त्या “वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त” याचा प्रचार केला. (१ करिंथकर १:२३) येशू यहोवाच्या उद्देशांतील केंद्र आहे असे पौलाने शिकवले.—२ करिंथकर १:२०; कलस्सैकर २:२, ३.
७. पौलाने स्वतःचा उल्लेख ‘कुशल कारागिर’ असा केला त्यावरून आपण काय शिकू शकतो?
७ अशा प्रकारचे शिकवणे आपण “कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे” केले असे पौल म्हणतो. असे म्हणण्याद्वारे पौल स्वतःचे गौरव करीत नव्हता. तर, यहोवाने त्याला कामाचे संघटन करण्याची किंवा आयोजन करण्याची अद्भुत देणगी दिल्याचे तो कबूल करतो. (१ करिंथकर १२:२८) पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणे आज आपल्याला चमत्कारिक देणगी देण्यात आलेली नाही हे कबूल आहे. शिवाय, आपण स्वतःला गुणयुक्त शिक्षक समजणार नाही. परंतु एका महत्त्वपूर्ण अर्थाने आपण गुणयुक्त शिक्षकच आहोत. अंमळ विचार करा: आपल्याला मदत करण्याकरता यहोवा आपला पवित्र आत्मा देतो. (पडताळा लूक १२:११, १२.) आणि आपली यहोवावर प्रीती आहे व त्याच्या वचनाच्या मूलभूत शिकवणींचे आपल्याला ज्ञान आहे. या खरोखरच अद्भुत देणग्या आहेत ज्यांचा इतरांना शिकवण्याकरता उपयोग केला जाऊ शकतो. तेव्हा, चांगला पाया घालण्याकरता आपण त्यांचा उपयोग करण्याचा दृढ निश्चय करू या.
८. भावी शिष्यांमध्ये आपण ख्रिस्ताला पाया म्हणून कसे घालतो?
८ ख्रिस्ताला आपण पाया म्हणून घालतो तेव्हा, त्याला गव्हाणीतले असाह्य बाळ किंवा त्रैक्यात यहोवाच्या तुल्य असलेला असे सादर करत नाही. असे अशास्त्रीय समज नकली ख्रिश्चनांकरता पाया ठरतात. पण आपण असे शिकवतो, की तो सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य आहे, त्याने आपल्याकरता त्याचे परिपूर्ण जीवन बहाल केले व आज तो यहोवाचा नियुक्त राजा या नात्याने स्वर्गात राज्य करीत आहे. (रोमकर ५:८; प्रकटीकरण ११:१५) आपल्या विद्यार्थ्यांना येशूच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या गुणांचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करावयासही आपण पाहतो. (१ पेत्र २:२१) सेवेबद्दल येशूठायी असलेला आवेश, नम्र आणि गांजलेल्यांबद्दल त्याने दाखवलेली कणव, आपल्याच अपराधाच्या दोषीभावनेने दबून गेलेल्यांप्रती त्याची दया, परीक्षांत त्याचे अढळ धैर्य या गुणांचा त्यांच्यावर प्रभाव व्हावा असे आपल्याला वाटते. होय, येशू एक अत्युत्तम पाया आहे. पण यानंतर काय?
योग्य साहित्यांनी बांधणे
९. पौल प्रामुख्याने पाया घालणारा होता तरी, त्याने शिकवलेले सत्य स्वीकारणाऱ्यांबद्दल त्याला काय वाटत होते?
९ पौलाने लिहिले: “ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो; तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.” (१ करिंथकर ३:१२, १३) पौलाचे तात्पर्य काय होते? पार्श्वभूमीचा विचार करा. पौल स्वतः पाया घालणारा होता. आपल्या मिशनरी दौऱ्यादरम्यान त्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करून ख्रिस्ताविषयी कधीच न ऐकलेल्या पुष्कळ लोकांना प्रचार केला. (रोमकर १५:२०) त्याने शिकवलेल्या सत्याचा लोक जसजसा स्वीकार करीत गेले तसतशा मंडळ्या तयार होत गेल्या. या विश्वासू लोकांची पौलाला खूप काळजी होती. (२ करिंथकर ११:२८, २९) परंतु, त्याच्या कामामुळे त्याला सारखे फिरतीवर राहावे लागत असे. म्हणून करिंथमध्ये पाया घालण्यासाठी १८ महिने राहिल्यानंतर तो इतर शहरांत प्रचार करावयास गेला. तरीसुद्धा, त्याने तेथे सुरु केलेले काम इतरांनी पुढे कसे नेले हे जाणून घेण्यास तो उत्सुक होता.—प्रेषितांची कृत्ये १८:८-११; १ करिंथकर ३:६.
१०, ११. (अ) बांधकाम साहित्यांतील फरक पौलाने कसा दाखवला? (ब) प्राचीन करिंथमध्ये कदाचित कोणत्या प्रकारच्या इमारती होत्या? (क) कोणत्या प्रकारच्या इमारती अग्नीतून वाचण्याची दाट शक्यता आहे व यातून ख्रिस्ती शिष्य बनवणाऱ्यांना कोणता वस्तुपाठ मिळतो?
१० असे दिसते, की करिंथमध्ये पौलाने घातलेल्या पायावर काही जण कच्चे बांधकाम करीत होते. समस्येचा उलगडा करण्याकरता पौलाने दोन प्रकारच्या बांधकाम साहित्यांतील फरक दाखवला: एका बाजूला सोने, रुपे आणि मौल्यवान पाषाण आणि दुसऱ्या बाजूला लाकूड, गवत आणि पेंढा. उत्तम, टिकाऊ, अग्नीरोधक साहित्यांचा उपयोग करून एखादा इमारत बांधू शकतो; किंवा टाकाऊ, तात्पुरत्या व ज्वालाग्राही साहित्यांचा उपयोग करून घाईगडबडीतही बांधकाम करू शकतो. करिंथसारख्या मोठ्या शहरात दोन्ही प्रकारच्या इमारती होत्या. तेथे, मोठमोठ्या, कदाचित काही भाग सोन्यारुप्याचा थर दिलेल्या किंवा सजवलेल्या महागड्या दगडांची दिमाखदार मंदिरे होती.b या टिकाऊ दिमाखदार इमारतींपुढे, ओबडधोबड लाकडी चौकट्यांच्या व गवताच्या बनवलेल्या झोपड्या, स्टॉल्स कदाचित ठेंगणी वाटत असावीत.
११ अशा इमारतींना आग लागलीच तर काय झाले असते? पौलाच्या दिवसात उत्तर स्पष्टच होते आणि आज आपल्याही दिवसात उत्तर स्पष्टच आहे. खरे तर, सा.यु.पू. १४६ मध्ये रोमी जनरल ममीयस याने करिंथ शहरावर कब्जा करून त्याला आग लावली. लाकूड, गवत किंवा खुंटाच्या बनवलेल्या इमारतींची राखरांगोळीच झाली. दगड आणि सोन्यारुप्याने सजवलेल्या कणखर इमारतींचे काय? त्या नक्कीच टिकल्या. करिंथमधील पौलाचे विद्यार्थी दररोज अशा इमारतींजवळून ये-जा करीत असावेत—या टिकलेल्या दगडी इमारतींपुढे कच्च्या इमारती केव्हाच जमीनदोस्त झाल्या होत्या. आपल्या श्रोत्यांसमोर किती छान चित्र उभे करून पौलाने आपला मुद्दा स्पष्ट केला! शिकवताना आपण स्वतःला बांधकाम करणारे समजले पाहिजे. आपण सर्वोत्तम, सर्वात टिकाऊ साहित्यांचा उपयोग केला पाहिजे. तेव्हा आपले काम जास्त टिकाऊ बनू शकते. ते टिकाऊ साहित्य काय आहे व त्यांचा उपयोग करणे इतके महत्त्वाचे का आहे?
तुमचे काम अग्नीचा प्रतिकार करू शकेल का?
१२. करिंथमधील काही ख्रिश्चनांचे बांधकाम ओबडधोबड कसे होते?
१२ स्पष्टतः, पौलाला वाटले की करिंथमधील काही ख्रिश्चनांचे काम कच्चे होते. त्यांचे काय चुकत होते? संदर्भानुसार, मंडळीत फुटी पडत होत्या; मंडळीच्या ऐक्याला तडा जाण्याचा धोका होता तरीदेखील लोकांचेच जास्त कौतुक होत होते. काही म्हणत होते, “मी पौलाचा,” तर काही “मी अपुल्लोसाचा,” असे म्हणत होते. काहींना आपल्या बुद्धीचा जास्त गर्व वाटत होता. म्हणूनच याचा परिणाम असा झाला, की तेथील वातावरणाला दैहिक विचारसरणीचा, आध्यात्मिक अप्रौढतेचा आणि “हेवा व कलह” यांचा दर्प येऊ लागला. (१ करिंथकर १:१२; ३:१-४, १८) ही त्यांची मनोवृत्ती मंडळीत व सेवेत जे शिकवले जात होते त्यातून प्रकट होऊ लागली. परिणामतः, हलक्या साहित्यांनी इमारत बांधल्याप्रमाणे शिष्य बनवण्याचे त्यांचे कार्य ओबडधोबड होते. हे त्यांचे काम ‘अग्नीत’ टिकणार नव्हते. पौल कोणत्या अग्नीविषयी बोलत होता?
१३. पौलाच्या दाखल्यातील अग्नी कशाला चित्रित करते, व सर्व ख्रिश्चनांनी कशाविषयी जागृत असावयास हवे?
१३ आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक अग्नीपरीक्षा असते; आपल्या विश्वासाची परीक्षा. (योहान १५:२०; याकोब १:२, ३) आपल्याला जशी एक गोष्ट माहीत असावयास हवी तशीच करिंथमधील ख्रिश्चनांना देखील एक गोष्ट माहीत असावयास हवी होती, की आपण ज्यांना सत्य शिकवू त्या सर्वांची परीक्षा होईलच. आपण व्यवस्थितरीत्या शिकवले नाही तर त्याचे दुःखद परिणाम घडू शकतात. पौलाने इशारा दिला: “ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल; परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.”c—१ करिंथकर ३:१४, १५.
१४. (अ) शिष्य बनवणाऱ्या ख्रिश्चनांना “तोटा” कसा होऊ शकतो पण तरीसुद्धा ते अग्नीतून कसे काय वाचू शकतात? (ब) आपण हानी कमी कशी करू शकू?
१४ खरेच किती गंभीर विचार! खूप परिश्रमानंतर एखाद्याला शिष्य बनण्यास मदत केल्यावर, त्याने मोहपाशासमोर किंवा छळात हार मानली आणि कालांतराने सत्याचा मार्ग सोडून दिला तर ती अतिशय दुःखाची गोष्ट असू शकते. अशा वेळी आपलीच हानी होते हे पौल कबूल करतो. एक मनुष्य जसा अग्नीत आपले सर्व काही गमावतो परंतु फक्त स्वतः मरता मरता वाचतो त्याप्रमाणे हा अनुभव अतिशय क्लेशकारक जणू “अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा” असू शकतो. तेव्हा, ही हानी आपण कशाप्रकारे कमी करू शकतो? बांधकामासाठी टिकाऊ साहित्यांचा उपयोग करा! आपल्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात जाईल अशाप्रकारे आपण शिकवतो व बुद्धी, समज, यहोवाबद्दलचे भय आणि अस्सल विश्वास यांसारख्या मौल्यवान ख्रिस्ती गुणांचे महत्त्व जाणण्यास त्यांना प्रवृत्त करतो म्हणजेच, आपण टिकाऊ, अग्नीरोधक साहित्यांचा उपयोग करून बांधकाम करीत असतो. (स्तोत्र १९:९, १०; नीतिसूत्रे ३:१३-१५; १ पेत्र १:६, ७) हे गुण प्राप्त करणारे देवाची इच्छा पूर्ण करीत राहतील; अनंतकाळ जगण्याची पक्की आशा त्यांना आहे. (१ योहान २:१७) परंतु, पौलाचा दाखला आपण वास्तविकतेत कसा काय उतरवू शकतो? काही उदाहरणांचा विचार करा.
१५. आपल्या बायबल विद्यार्थ्यांच्या संबंधात आपण कच्चे बांधकाम करणार नाही याची आपण खात्री कशी करू शकतो?
१५ बायबल विद्यार्थ्यांना शिकवताना, आपण यहोवा देवापेक्षा मानवांना बढावा देता कामा नये. आपल्यालाच त्यांनी बुद्धीचा प्रमुख स्रोत समजावे हा त्यांना शिकवण्यामागचा आपला उद्देश नाही. त्यांनी यहोवा, त्याचे वचन आणि त्याची संघटना याजकडून मार्गदर्शन मिळवावे अशी आपली इच्छा आहे. म्हणूनच, त्यांनी प्रश्न विचारल्यावर आपण फक्त आपले विचार त्यांच्यापुढे मांडत नसतो. उलट, आपण त्यांना, बायबलचा आणि ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांचा उपयोग करून स्वतःहून उत्तरे शोधण्यास शिकवतो. (मत्तय २४:४५-४७) याच कारणांसाठी आपण, आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी आपल्याव्यतिरिक्त इतर कोणाबरोबरही अभ्यास करू नये असा विचार करीत नाही. इतर लोक त्यांच्यामध्ये आस्था घेऊ लागतात तेव्हा चिडण्याऐवजी आपण आपल्या विद्यार्थ्यांना, प्रेम दाखवण्यात “विशाल” होण्याचे, मंडळीत होता होईल तितक्यांशी ओळख करून त्यांची कदर करण्याचे उत्तेजन दिले पाहिजे.—२ करिंथकर ६:१२, १३.
१६. अग्नीरोधक साहित्यांचा उपयोग करून वडील बांधकाम कसे करू शकतात?
१६ शिष्यांची रचना करण्यात ख्रिस्ती वडिलांचा देखील सिंहाचा वाटा आहे. मंडळीपुढे शिकवताना ते अग्नीरोधक साहित्यांचा उपयोग करून बांधकाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शिकवण्याची क्षमता, अनुभव आणि व्यक्तिमत्त्व यात बरीच भिन्नता असू शकते, पण लोकांना आपल्याकडे खेचण्याकरता ते या खास गुणांचा फायदा उपटत नाहीत. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०.) करिंथमधील काहीजण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” असे का म्हणत होते हे आपल्याला नेमके माहीत नाही. परंतु यातील एकाही विश्वासू वडिलांनी मतभेद उत्पन्न करणाऱ्या अशा विचारसरणीला खतपाणी घातले नाही अशी आपण खात्री बाळगू शकतो. अशा बोलण्याने पौल लगेचच हरबऱ्याच्या झाडावर चढला नाही; त्याने त्यांचा कडकडून विरोध केला. (१ करिंथकर ३:५-७) तसेच आजही, वडीलजन हे लक्षात ठेवतात की ते “देवाच्या कळपाचे” पालन करीत आहेत. (तिरपे वळण आमचे.) (१ पेत्र ५:२) तो कोणत्याही मानवाचा कळप नाही. यास्तव, एका मनुष्याने कळपावर अथवा वडील वर्गावर वर्चस्व गाजवण्याच्या कोणत्याही प्रकारच्या प्रवृत्तीविरुद्ध वडील जन ठाम असतात. मंडळीची सेवा करण्याची, अंतःकरणाप्रत पोहंचण्याची व यहोवाची सेवा पूर्ण मनाने करण्यास मेंढरासमान लोकांना मदत करण्याची त्यांची जोपर्यंत विनम्र इच्छा आहे तोपर्यंत ते अग्नीरोधक साहित्यांचा उपयोग करून बांधकाम करतात.
१७. ख्रिस्ती पालक अग्नीरोधक साहित्यांचा उपयोग करण्याचा कसा प्रयत्न करतात?
१७ ख्रिस्ती पालकांना देखील याबाबतीत नितान्त काळजी आहे. आपल्या मुलांनी अनंतकाळ जगावे हीच सदिच्छा त्यांना आहे! म्हणूनच, ते आपल्या मुलांच्या अंतःकरणात देवाचे वचन ‘बिंबवण्याकरता’ इतका परिश्रम घेतात. (अनुवाद ६:६, ७) आपल्या मुलांनी सत्य, एक नियमावली किंवा वास्तविकतांचा मंत्र म्हणून नव्हे तर पूर्ण, प्रतिफलदायी व जीवनाचा आनंदी मार्ग म्हणून शिकावे असे त्यांना वाटते. (१ तीमथ्य १:११) आपल्या मुलांची रचना ख्रिस्ताचे विश्वासू शिष्य म्हणून करण्याकरता प्रेमळ पालक अग्नीरोधक साहित्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या मुलांबरोबर धीराने वागतात, यहोवाला ज्या गुणांचा वीट आहे असे गुण स्वतःतून काढून टाकण्यास तसेच जे गुण आवडतात असे गुण विकसित करण्यास ते त्यांना मदत करतात.—गलतीकर ५:२२, २३.
कोण जबाबदार आहे?
१८. एखादा शिष्य हितकारक शिकवण नाकारतो तेव्हा त्यात, जो त्याला शिकवण्याचा व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो त्याची चूक असतेच असे नाही, ते का?
१८ या चर्चेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण ज्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो तो सत्यातून बाहेर जातो तेव्हा, याचा अर्थ असा होतो का, की आपण शिक्षक या नात्याने उणे पडलो—आपण कदाचित हलक्या साहित्यांचा उपयोग करून बांधकाम केले असेल? असे काही नाही. पौल आपल्याला आठवण करून देतो, की आपली सर्वात महान जबाबदारी म्हणजे शिष्यांची रचना करण्याच्या कार्यात भाग घेणे. पक्के बांधकाम करण्याकरता आपण आपल्याला शक्य ते सर्व करू इच्छितो. परंतु आपण ज्यांना मदत करतो ते सत्य सोडून जातात तेव्हा, सर्व दोष स्वतःवर घेऊन दोषी भावनेच्या दडपणाखाली राहा, असे देवाचे वचन आपल्याला सांगत नाही. बांधकाम करण्याच्या आपल्या भूमिकेव्यतिरिक्त आणखी पुष्कळ गोष्टींचा यात समावेश आहे. जसे की, कच्चे बांधकाम केलेल्या शिक्षकाबद्दलही पौल काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या: “त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल.” (१ करिंथकर ३:१५) हा शिक्षक बचावतो; पण विद्यार्थ्यामध्ये ख्रिस्ती व्यक्तीमत्त्व निर्माण करण्याचा प्रयत्न एका अग्नीमय परीक्षेत “जळून” जातो असे त्या उदाहरणात दाखवले आहे; तेव्हा यावरून आपण काय निष्कर्ष काढावा? हाच, की आपण विश्वासू मार्गाक्रमण करायचे की नाही असा निर्णय घेणाऱ्या विद्यार्थ्याला यहोवा प्रथम जबाबदार ठरवतो.
१९. पुढील लेखात कशावर विचार केला जाईल?
१९ व्यक्तिगत जबाबदारी ही महत्त्वाची बाब आहे. आपल्या प्रत्येकावर तिचा परिणाम होतो. बायबल खासकरून या विषयावर काय शिकवते? आमच्या पुढील लेखात यावर विचार केला जाईल.
[तळटीपा]
a ‘पृथ्वीचा पाया’ कदाचित निसर्गशक्तींना लागू होत असावा जो पृथ्वीला आणि सर्व खज्योतींना आपआपल्या जागी स्थिर उभे करतो. तसेच, पृथ्वीची रचनाच अशाप्रकारे करण्यात आली आहे की ती कधीही “ढळणार” नाही अथवा तिचा नाश होणार नाही.—स्तोत्र १०४:५.
b पौलाने उल्लेखलेले “मोलवान पाषाण,” हिरे व माणिक यांसारखे रत्नच होते असे नाही. ते, संगमरवर, अलाबास्त्र किंवा वज्रतुंड यासारखे महागडे बांधकामाचे दगड असावेत.
c बांधकाम करणाऱ्यावर नव्हे तर बांधकाम करणाऱ्याच्या ‘कामाची’ पौल शंका करीत होता. मराठी कॉमन लँग्वेज भाषांतरात हे वचन अशाप्रकारे आहे: “ज्या मनुष्याचे त्या पायावर रचलेले बांधकाम टिकेल त्याला मोबदला मिळेल. ज्याचे बांधकाम जळून जाईल त्याची हानी होईल हे खरे पण तरीही तो स्वतः मात्र वाचेल. परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तो वाचेल.”
तुमचे उत्तर काय असेल?
◻ खऱ्या ख्रिश्चनामध्ये ‘पाया’ काय आहे व तो कसा घातला जातो?
◻ वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकाम साहित्याविषयी आपण काय शिकू शकतो?
◻ ‘अग्नी’ कशाला चित्रित करते व तिच्यामुळे काहींचा “तोटा” कसा होईल?
◻ बायबल शिक्षक, वडील आणि पालक अग्नीरोधक साहित्यांचा उपयोग करून बांधकाम कसे करू शकतात?
[९ पानांवरील चित्र]
अनेक प्राचीन शहरांत, अग्नीरोधक दगडी इमारतींबरोबर हलक्या दर्जाच्या इमारती देखील होत्या