वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ११/१ पृ. १३-१८
  • आपले तारण साधून घ्या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपले तारण साधून घ्या!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण स्वतःत करत असलेले “बांधकाम”
  • यहुदाचे राजे—त्यांनी स्वतः त्यांच्या निवडी केल्या
  • यहोवाचा तुमच्यावर विश्‍वास आहे!
  • निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य देऊन तो आपला आदर करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • तरुण वयात सुज्ञ निर्णय घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • तुम्हाला देवाचे वचन किती प्रिय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुमची मुलं मोठी झाल्यावर यहोवाची सेवा करतील का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ११/१ पृ. १३-१८

आपले तारण साधून घ्या!

“माझ्या प्रिय जनहो, . . . भीत व कापत आपले तारण साधून घ्या.”—फिलिप्पैकर २:१२.

१, २. कोणत्या लोकप्रिय समजुतींमुळे लोक, आपल्या जीवनावर आपला ताबा नाही असा विचार करतात?

“तुमचा जन्म असा झाला होता का?” असा प्रश्‍न अलिकडेच एका लोकप्रिय नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आला होता. मथळ्याखाली असे लिहिले होते: “व्यक्‍तिमत्त्व, स्वभाव, होय जीवनातील निवडीसुद्धा! हे सर्व तुमच्या जनुकांमध्येच असते, असे अलिकडील अभ्यास दाखवतात.” अशा दाव्यांमुळे काहींना वाटू लागेल, की आपल्याला आपल्या जीवनावर काहीच ताबा नाही.

२ काहींना अशी चिंता असते, की आज त्यांच्या जीवनातील दुःख त्यांच्या पालकांनी त्यांचे संगोपन चांगल्याप्रकारे केले नाही म्हणून किंवा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना चांगल्याप्रकारे शिकवले नाही म्हणून आहे. त्यांच्या मते, आपल्या पालकांनी केलेल्या चुका आपल्याही हातून घडणारच, त्यांच्या वाईट वृत्ती आपल्यात असणारच, यहोवाशी आपण शेवटपर्यंत विश्‍वासू राहणारच नाही. थोडक्यात, त्यांना वाटते, की आपल्या नशिबी चुकीच्या निवडी करणेच आहे. परंतु बायबल असे शिकवते का? बायबलही असेच काही तरी शिकवते, त्याला पूर्व-नियोजनाचा सिद्धान्त म्हणतात असेही म्हणणारे काही धार्मिक लोक आहेत. या सिद्धान्तानुसार म्हणे, तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना देवाने पूर्वीच ठरवलेली आहे.

३. भवितव्याची जबाबदारी आपण स्वतःवर घेऊ शकतो याविषयी बायबलमध्ये कोणता उत्तेजनकारक संदेश आहे?

३ या भिन्‍नभिन्‍न समजुतींमागे एकच सूर आहे: तुम्हाला निवड करण्याची मुभा नाही, तुमचे जीवन घडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हा निरुत्साहित करणारा संदेश आहे, हो ना? आणि निरुत्साहामुळे तर समस्येत आणखीच भर पडते. नीतिसूत्रे २४:१० म्हणते: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ति अल्प होय.” परंतु बायबलनुसार आपण “आपले तारण साधून” घेऊ शकतो ही गोष्ट समजल्यावर आपल्याला उत्तेजन मिळते. (फिलिप्पैकर २:१२) या सकारात्मक शास्त्रवचनीय शिकवणुकीवरील आपला भरवसा आपण आणखी मजबूत कसा करू शकू?

आपण स्वतःत करत असलेले “बांधकाम”

४. पहिले करिंथकर ३:१०-१५ मध्ये अग्नीरोधक साहित्यांनी बांधकाम करण्याविषयी सांगितलेले असले तरी, यावरून काय सुचवले जात नाही?

४ पहिले करिंथकर ३:१०-१५ येथील प्रेषित पौलाने दिलेल्या उदाहरणाचा विचार करा. तेथे तो एका ख्रिस्ती बांधकामाविषयी बोलत आहे; त्याच्या उदाहरणाचे तत्त्व आंतरिक आणि बाह्‍य सेवेला लागू होऊ शकते. एखाद्या शिष्याने यहोवाची सेवा करण्याची निवड केली व तो विश्‍वासू राहिला म्हणजे, ज्याने त्याला शिकवले, प्रशिक्षण दिले तोच यासाठी खरे तर जबाबदार आहे असे पौल सुचवत होता का? नाही. सर्वोत्तम बांधकाम करण्याकरता शिक्षक शक्यतो सर्व प्रयत्न करतो या महत्त्वावर तो जोर देत होता. परंतु मागील लेखात आपण शिकल्याप्रमाणे, विद्यार्थ्याला किंवा शिष्याला या बाबीविषयी निवड करता येत नाही असे तो म्हणत नव्हता. पौलाचे उदाहरण, स्वतःची रचना करण्याच्या कामाबद्दल नव्हे तर इतरांची रचना करण्याच्या कामाबद्दल होते. आणि हे स्पष्टच आहे कारण, पौल म्हणतो की कच्चे बांधकाम नाश होईल परंतु ते बांधणारा मात्र वाचेल. तरीसुद्धा, बायबल अधूनमधून, आपण स्वतःची रचना करण्याकरता जे काम करतो त्यासाठी याच भाषालांकाराचा उपयोग करते.

५. कोणती शास्त्रवचने दाखवतात, की ख्रिश्‍चनांनी स्वतःची “रचना” केली पाहिजे?

५ उदाहरणार्थ, यहुदा २०, २१ या वचनांचा विचार करा; तेथे म्हटले आहे: “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्‍वासावर स्वतःची रचना [बांधकाम] करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, . . . आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” पौलाने १ करिंथकराच्या ३ ऱ्‍या अध्यायात “बांधकाम” यासाठी जो ग्रीक शब्द वापरला तोच शब्द यहुदाने येथे वापरला आहे; पण यहुदाला, आपण आपल्या विश्‍वासावर स्वतःची रचना केली पाहिजे असे म्हणायचे आहे असे दिसते. खडकावर आपले घर बांधणाऱ्‍या मनुष्याचा येशूने दिलेला दाखला लिहिताना लूकनेही “पाया” यासाठी तोच ग्रीक शब्द वापरला जो पौलाने ख्रिस्ती बांधकामाच्या उदाहरणासाठी वापरला आहे. (लूक ६:४८, ४९) याशिवाय, सहख्रिश्‍चनांना आध्यात्मिक प्रगती करण्यास आर्जवताना ‘पायावर’ स्थिर होण्याच्या काल्पनिक वर्णनाचा पौल उपयोग करतो. होय, आपण स्वतःची “रचना” करण्याविषयी देवाचे वचन शिकवते.—इफिसकर ३:१५-१९; कलस्सैकर १:२३; २:७.

६. (अ) प्रत्येक ख्रिस्ती शिष्य एका संयुक्‍त बांधकाम प्रकल्पामुळे कसा तयार होतो त्याचे उदाहरण द्या. (ब) प्रत्येक शिष्याची काय जबाबदारी आहे?

६ एखाद्या ख्रिश्‍चनाची रचना करणे हे एकेरी काम आहे का? समजा, तुम्ही घर बांधायचे ठरवता. नकाशासाठी तुम्ही एखाद्या आर्किटेक्टकडे जाता. बहुतेक काम स्वतःच करण्याचा तुमचा विचार असला तरी, तुमच्याबरोबर काम करण्याकरता, तुम्हाला सर्वोत्तम पद्धतींविषयी सल्ला देण्याकरता तुम्ही एखादा कॉन्ट्रॅक्टर घेताच. तो एक पक्का पाया घालतो, नकाशा समजण्याकरता तुम्हाला मदत करतो, सर्वोत्तम साहित्य विकत घेण्यासंबंधी तुम्हाला सुचवतो, एवढेच नव्हे तर, बांधकामाविषयी बरेच काही शिकवतो तेव्हा, त्याने झकास काम केले हे तुम्ही मान्य करालच. पण तुम्ही जर त्याचा सल्ला मानला नाहीत, हलके साहित्य विकत आणले आणि आर्किटेक्टने दिलेल्या नकाशाच्या अगदी उलटच काहीतरी केले तर काय? घर कोसळून पडल्यावर तुम्ही निश्‍चितच कॉन्ट्रॅक्टरला किंवा आर्किटेक्टला दोष देऊ शकणार नाही! तसेच, एका संयुक्‍त बांधकाम प्रकल्पामुळे प्रत्येक ख्रिस्ती शिष्य तयार होतो. यहोवा थोर आर्किटेक्ट आहे. तो त्या विश्‍वासू ख्रिश्‍चनाला पाठबळ देतो जो ‘देवाचा सहकारी’ या नात्याने एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतो व त्याची रचना करतो. (१ करिंथकर ३:९) पण, यात विद्यार्थी देखील गोवलेला असतो. शेवटी, तोच आपल्या जीवनमार्गाबद्दल जबाबदार असतो. (रोमकर १४:१२) त्याला स्वतःमध्ये उत्तम ख्रिस्ती गुण हवे असतील तर त्याने ते प्राप्त करण्याकरता व स्वतःत ते विकसित करण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत.—२ पेत्र १:५-८.

७. काही ख्रिश्‍चनांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते व कशाद्वारे त्यांना सांत्वन मिळू शकेल?

७ पण मग याचा असा अर्थ होतो का, की आनुवंशिकता, वातावरण आणि आपल्या शिक्षकांच्या शिकवण्याची क्षमता, हे सर्व व्यर्थ? मुळीच नाही. देवाचे वचन या प्रत्येकाला महत्त्वपूर्ण व प्रभावकारी असे लेखते. अनेक पापी, नकारात्मक प्रवृत्ती जन्मतःच असतात व त्यांच्याविरूद्ध लढणे अतिशय कठीण असते. (स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२; ७:२१-२३) पालकांचे प्रशिक्षण आणि घरातील वातावरण यांचा तरुणांवर मोठ्या प्रमाणात चांगला आणि वाईट प्रभाव पडू शकतो. (नीतिसूत्रे २२:६; कलस्सैकर ३:२१) यहुदी धार्मिक नेत्यांच्या शिकवणुकीचा वाईट परिणाम इतरांवर पडत असल्यामुळे येशूने त्यांचा धिक्कार केला. (मत्तय २३:१३, १५) आज, अशाचसारखे प्रभाव आपल्या सर्वांवर नेहमी पडत राहतात. जसे की, देवाच्या काही लोकांना, त्यांच्या त्रासमय बालपणामुळे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशांना आपली दया आणि सहानुभूती हवी असते. तसेच, आपल्या पालकांच्या चुका आपल्या हातूनही घडतीलच किंवा आपण निश्‍चितच अविश्‍वासू होऊ हे पूर्वनियोजित नाही हे त्यांना बायबलमधून समजल्यावर सांत्वन मिळू शकेल. हा मुद्दा समजण्याकरता आपण प्राचीन यहुदाच्या काही राजांचा विचार करू या.

यहुदाचे राजे—त्यांनी स्वतः त्यांच्या निवडी केल्या

८. योथामाच्या बापाने कोणते खराब उदाहरण गिरवले, त्याने मात्र कोणती निवड केली?

८ उज्जीया अगदी कोवळ्या वयात, अर्थात १६ व्या वर्षी यहुदाचा राजा झाला आणि त्याने ५२ वर्षे राज्य केले. त्याच्या जीवनाच्या बहुतेक काळात त्याने “त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्‍वराच्या दृष्टीने जे नीट ते” केले. (२ राजे १५:३) यहोवाच्या आशीर्वादामुळे त्याला युद्धांमध्ये आश्‍चर्यकारक विजय मिळाले होते. परंतु दुःखाची गोष्ट, या विजयांमुळे त्याची छाती गर्वाने फुगली. तो मगरूर झाला आणि जे काम केवळ याजकांनीच करावयाचे होते म्हणजे मंदिरामध्ये धूप जाळण्याचे काम स्वतः करून यहोवाविरुद्ध बंड केले. याबद्दल उज्जीयाला फटकारण्यात आले, तर त्याला याचा राग आला. त्याचा गर्व उतरवण्यात आला—त्याला कोड उठले आणि आमरण एकांतवासात राहावे लागले. (२ इतिहास २६:१६-२३) यावर त्याचा पुत्र योथाम याची काय प्रतिक्रिया होती? आपल्या बापाची बाजू घेऊन त्याला यहोवाविषयी नक्कीच राग बाळगता आला असता. सर्वसाधारणतः लोकही चुकीच्या धार्मिक प्रथा पाळत असल्यामुळे त्यांचाही त्याच्यावर हानीकारक प्रभाव पडू शकला असता. (२ राजे १५:४) परंतु योथामाने स्वतःहून निवड केली. “परमेश्‍वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले.”—२ इतिहास २७:२.

९. आहाजावर काही कोणते चांगले प्रभाव होते पण त्याने आपले जीवन कशाप्रकारे व्यतीत केले?

९ योथामने १६ वर्षे राज्य केले; या सर्व वर्षांत तो यहोवाशी विश्‍वासू राहिला. विश्‍वासू पिता या नात्याने तो आपला पुत्र आहाज याच्यापुढे उत्तम उदाहरण होता. याशिवाय आहाजपुढे इतरही चांगली उदाहरणे होती. त्याच्या हयातीत, यशया, होशेय आणि मीखा यांसारखे विश्‍वासू संदेष्टे त्या देशात भविष्यवाणी करीत होते. तरीसुद्धा त्याने वाईटच निवड केली. “त्याचा पूर्वज दावीद याने परमेश्‍वराच्या दृष्टीने जे ठीक ते केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही.” त्याने बआलाच्या मूर्ती करून त्यांची उपासना केली; एवढेच नव्हे तर, आपल्या पोटच्या काही पुत्रांचा मूर्तीपूजक दैवतांपुढे होम केला. त्याच्या अवतीभोवती चांगली उदाहरणे असतानाही तो राजा व यहोवाचा सेवक या नात्याने पूर्णपणे उणा पडला.—२ इतिहास २८:१-४.

१०. आहाज कोणत्या प्रकारचा बाप होता पण त्याचा पुत्र हिज्कीया याने कोणती निवड केली?

१० शुद्ध उपासनेच्या दृष्टिने पाहिल्यास, आहाजापेक्षा नीच बापाची कल्पना करणे देखील कठीण आहे. परंतु अशा नीच बापाच्या पोटी हिज्कीयासारखा नेक पुत्र जन्माला आला होता! आहाजाने बआलापुढे होम केलेले आपले तरणेतांड पुत्र हिज्कीयाचे सख्खे भाऊ असावेत. या अशा वाईट कुटुंबात जन्माला आल्यामुळे हिज्कीया देखील यहोवाला अविश्‍वासू झाला का? उलट, हिज्कीया बोटावर मोजण्याइतक्या महान राजांपैकी होता. तो विश्‍वासू, सुज्ञ आणि प्रिय असा होता. “परमेश्‍वर त्याच्याबरोबर होता.” (२ राजे १८:३-७) खरे तर, हिज्कीया तरुण राजकुमार असतानाच, त्याने ११९ व्या स्तोत्राचे ईश्‍वरी प्रेरणेने लेखन केले, यावर आपण पूर्ण भरवसा बाळगू शकतो. म्हणूनच, त्याने “माझा जीव खेदाने गळून जातो” असे का लिहिले ते आपल्याला सहज समजते. (स्तोत्र ११९:२८) हिज्कीयाने त्याच्या पीडादायक त्रासातही यहोवाच्या वचनाला आपले जीवन मार्गदर्शक मानले. स्तोत्र ११९:१०५ म्हणते: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.” होय, हिज्कीयाने स्वतःहून—उचित निवड केली होती.

११. (अ) आपल्या पित्याचे चांगले उदाहरण असतानाही, मनश्‍शेने केवढ्यापर्यंत यहोवाविरुद्ध बंड केले? (ब) मनश्‍शेने आपल्या उतरत्या वयात कोणती निवड केली व यावरून आपण काय शिकू शकतो?

११ परंतु आता तुम्हाला एक विरोधाभास दिसेल; यहुदाच्या सर्वात उत्तम राजांपैकी एका राजाचा पुत्र मात्र अगदी बेकार निघाला. तो होता हिज्कीयाचा पुत्र मनश्‍शे; याने मूर्तीपूजा, भुताटकी, हिंसा यांचे थैमान माजवले. अहवाल सांगतो, की “परमेश्‍वराने मनश्‍शे व त्याचे लोक यांची कानउघाडणी केली;” कदाचित संदेष्ट्यांद्वारे केली असावी. (२ इतिहास ३३:१०) यहुदी परंपरेनुसार असे सांगण्यात येते, की यावर मनश्‍शेने यशयाला चिरले. (पडताळा इब्री लोकांस ११:३७.) हे कितपत खरे आहे हे माहीत नाही, पण एवढे मात्र खरे की मनश्‍शेने ईश्‍वरी चेतावणींकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर, त्यानेही आपला आजोबा आहाज याच्याप्रमाणे पोटच्या पुत्रांचा जिवंत होम केला होता. परंतु, याच दुष्ट मनुष्याने नंतर त्याच्या उतरत्या वयात परीक्षांचा सामना करत असताना पश्‍चात्ताप केला व आपला मार्ग बदलला. (२ इतिहास ३३:१-६, ११-२०) त्याच्या उदाहरणातून आपण हे शिकतो, की एखाद्याने आपल्या जीवनात चुकीच्या निवडी केल्या असल्या तर त्याला कधीच क्षमा नाही असे नाही. त्याचे परिवर्तन होऊ शकते.

१२. यहोवाच्या सेवेच्या बाबतीत आमोन आणि त्याचा पुत्र योशीया यांनी कोणत्या भिन्‍न निवडी केल्या?

१२ मनश्‍शेचा पुत्र आमोन, आपल्या पित्याने दाखवलेल्या पश्‍चात्तापातून पुष्कळ काही शिकू शकला असता. पण त्याने चुकीच्या निवडी केल्या. आमोन “अधिकाधिक पाप करीत गेला” आणि एके दिवशी त्याला ठार मारण्यात आले. त्याच्यात आणि त्याचा मुलगा योशीया याच्यात मात्र जमीन आस्मानाचा फरक होता. आपल्या आजोबांच्या बाबतीत जे काही घडले होते त्यातून योशीयाने धडा घेतला. त्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी राज्य करायला सुरवात केली. केवळ सोळा वर्षांत तो यहोवाचा शोध करू लागला व त्यानंतर एक उदाहरणीय, विश्‍वासू राजा शाबीत झाला. (२ इतिहास ३३:२०–३४:५) त्याने केलेली निवड योग्य होती.

१३. (अ) आपण ज्या यहुदी राजांबद्दल पाहिले त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो? (ब) पालकीय प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे?

१३ यहुदाच्या या सात राजांच्या या संक्षिप्त रुपातील परीक्षणातून आपल्याला एक प्रभावशाली धडा शिकायला मिळतो. काही बाबतीत, सर्वात नीच राजांचे नेक पुत्र होते तर सर्वात नेक राजांचे नीच पुत्र होते. (पडताळा उपदेशक २:१८-२१.) परंतु यामुळे पालकीय प्रशिक्षणाचे महत्त्व कमी होत नाही. आपल्या मुलांना यहोवाच्या मार्गांनुसार प्रशिक्षण देणारे पालक निश्‍चितच, यहोवाचे विश्‍वासू सेवक होण्याची सर्वोत्तम संधी त्यांना देत असतात. (अनुवाद ६:६, ७) पण, काही मुले आपल्या विश्‍वासू पालकांच्या उत्तम प्रयत्नांनंतरही चुकीचा मार्ग निवडतात. आणि इतर मुले आपल्या पालकांच्या वाईट उदाहरणानंतरही यहोवावर प्रेम करू लागतात व त्याची सेवा करण्याची निवड करतात. त्याच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनाचे सार्थक होते. तुमच्या बाबतीत काय होईल याचा कधी तुम्हीही विचार करता का? तुम्हीही उचित निवड करू शकता याबाबतीत स्वतः यहोवा देत असलेल्या काही हमींचा विचार करा!

यहोवाचा तुमच्यावर विश्‍वास आहे!

१४. यहोवा आपल्या मर्यादा जाणतो हे आपल्याला कसे माहीत आहे?

१४ यहोवा सर्व काही पाहतो. नीतिसूत्रे १५:३ म्हणते: “परमेश्‍वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.” राजा दावीद यहोवाविषयी असे म्हणाला: “मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकहि दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते.” (स्तोत्र १३९:१६) तेव्हा तुम्ही, वारसाने मिळालेल्या प्रवृत्तींविरुद्ध किंवा तुमच्या हाताबाहेर गेलेल्या इतर परिणामांमुळे उद्‌भवलेल्या कोणत्याही नकारात्मक प्रवृत्तींविरुद्ध लढत आहात हे यहोवाला माहीत आहे. यांचा तुमच्यावर नेमका कसा परिणाम झाला आहे हे त्याला माहीत आहे. तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीतच आहेत पण तुमच्यापेक्षा यहोवाला त्या आणखी चांगल्याप्रकारे माहीत आहेत. शिवाय तो दयाळू आहे. आपल्याला जितके करता येते त्याच्यापलीकडे करण्याची तो आपल्याकडून कधीच अपेक्षा करीत नाही.—स्तोत्र १०३:१३, १४.

१५. (अ) इतरांकडून मुद्दामहून दुखावलेल्यांना सांत्वन मिळण्याचा एक स्रोत कोणता आहे? (ब) यहोवा प्रत्येकाला कोणती जबाबदारी देऊन त्यांचा सन्मान करतो?

१५ परिस्थितीला बळी पडल्याने आपण असहाय आहोत असे यहोवा आपल्याला लेखत नाही. आपल्याला जर वाईट अनुभव आले असतील, तर आपल्याविरुद्ध मुद्दामहून केलेल्या अशा हानीकारक वर्तनाचा यहोवाला वीट आहे या पूर्ण खातरीमुळे आपल्याला सांत्वन मिळू शकते. (स्तोत्र ११:५; रोमकर १२:१९) पण मग जर आपण मागे फिरलो व जाणूनबुजून चुकीच्या निवडी केल्या तर यहोवा आपल्याला जाऊ देईल का? मुळीच नाही. त्याचे वचन म्हणते: “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५) यहोवा आपल्या प्रत्येक बुद्धिमान प्राण्याला उचित कार्य करण्याची व त्याची सेवा करण्याची जबाबदारी देऊन त्याचा सन्मान करतो. हे, मोशेने इस्राएल राष्ट्राला सांगितल्याप्रमाणे आहे; तो म्हणाला: “आकाश व पृथ्वी ह्‍यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील.” (अनुवाद ३०:१९) आपणही उचित निवड करू शकतो असा यहोवाला विश्‍वास आहे. हे आपल्याला कसे समजते?

१६. ‘स्वतःचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य’ करण्यात आपण यशस्वी कसे होऊ शकतो?

१६ प्रेषित पौलाने काय लिहिले त्याची नोंद घ्या: “म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असतानासुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो.” (फिलिप्पैकर २:१२, १३, ईझी-टू-रीड आवृत्ती, मराठी) ‘पूर्ण करणे,’ असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे तो मूळ ग्रीक शब्द, एखादी गोष्ट पूर्णत्वास नेण्याला सूचित करतो. म्हणून, आपल्या नशिबात असल्यामुळे आपण कोठे उणे पडत नाही किंवा चुकीच्या मार्गाला लागत नाही. यहोवा देवाने आपल्याला दिलेले काम, अर्थात तारण मिळवून देणारे काम आपण पूर्ण करू शकतो असा त्याला आपल्याबद्दल विश्‍वास होता; नाहीतर त्याने ते वाक्य प्रेरित केलेच नसते. परंतु आपल्याला यश कसे काय मिळेल? आपल्याच सामर्थ्याने आपल्याला ते जमणार नाही. आपण तितके सशक्‍त असतो तर आपल्याला ‘भीतीने कापण्याची’ काही गरज नसती. उलट, यहोवा ‘आपल्यामध्ये कार्य करतो,’ त्याचा पवित्र आत्मा आपले मन व अंतःकरण यात कार्य करतो आणि आपल्यामध्ये ‘कार्य करण्याची इच्छा निर्माण करण्यास व ते कार्य पूर्ण करण्यास’ साहाय्य करतो. ही प्रेमळ मदत असताना, जीवनात उचित निवडी न करण्याकरता व त्यांच्यानुसार जीवन व्यतीत न करण्याकरता आपल्याकडे काही कारण उरते का? नाहीच!—लूक ११:१३.

१७. आपण स्वतःत कोणते बदल करू शकतो व हे करण्यासाठी यहोवा आपल्याला साहाय्य कसे करतो?

१७ आपल्या अंगवळणी पडलेल्या वाईट सवयी व आपल्या विचारसरणीला कलुषित करू शकणारे हानिकारक प्रभाव यांसारख्या अनेक अडथळ्यांवर आपल्याला मात करावी लागेल. यहोवाच्या आत्म्याच्या साहाय्याने मात्र आपण यांवर मात करू शकू! करिंथमधील ख्रिश्‍चनांना पौलाने लिहिल्याप्रमाणे, देवाच्या वचनात “तटबंदी” जमीनदोस्त करण्याचे सामर्थ्य आहे. (२ करिंथकर १०:४) खरे तर, यहोवा आपल्याला स्वतःत संपूर्ण बदल घडवून आणण्याकरता मदत करू शकतो. त्याचे वचन आपल्याला ‘जुन्या मनुष्याचा’ त्याग करून “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” करण्यास आर्जवते. (इफिसकर ४:२२-२४) अशाप्रकारचे परिवर्तन करण्यास यहोवाचा आत्मा आपल्याला खरोखरच साहाय्य करू शकतो का? अर्थात! देवाचा आत्मा आपल्यात, फळे, अर्थात आपल्या सर्वांना विकसित करावेसे वाटतील असे सुरेख, मौल्यवान गुण उत्पन्‍न करतो. यांतील पहिला गुण आहे, प्रीती.—गलतीकर ५:२२, २३.

१८. प्रत्येक बुद्धीमान मानव कोणती निवड पूर्णपणे करू शकतो व यामुळे आपण कोणता पक्का निश्‍चय केला पाहिजे?

१८ यातच एक महान, मुक्‍ती देणारे सत्य समाविष्ट आहे. यहोवामध्ये प्रेमाची असीम क्षमता आहे आणि आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. (उत्पत्ति १:२६; १ योहान ४:८) तेव्हा आपण यहोवावर प्रीती करण्याची निवड करू शकतो. हीच प्रीती आपल्या भवितव्याची गुरूकिल्ली आहे; ख्रिस्ती बनण्यापूर्वीची आपली जीवनशैली किंवा आपल्या अंगवळणी पडलेल्या चुका अथवा चुका करण्याची वारशाने प्राप्त झालेली आपली प्रवृत्ती यांच्यानुसार आपले भवितव्य रेखाटले जात नाही. आदाम आणि हव्वेला एदेन बागेत विश्‍वासू राहण्याकरता यहोवा देवाबद्दल प्रीती हवी होती. हर्मगिदोनातून वाचण्याकरता व ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या समाप्तीस असलेल्या शेवटल्या परीक्षेतून पार होण्याकरता आपल्या प्रत्येकांमध्ये हीच प्रीती असली पाहिजे. (प्रकटीकरण ७:१४; २०:५, ७-१०) आपल्या प्रत्येकाची कोणतीही परिस्थिती असो, आपण ही प्रीती विकसित करू शकतो. (मत्तय २२:३७; १ करिंथकर १३:१३) तेव्हा, यहोवावर प्रीती दाखवण्याचा व त्या प्रीतीवर चिरकालासाठी स्वतःची रचना करण्याचा आपण पक्का निश्‍चय करू या.

तुम्हाला काय वाटते?

◻ कोणते लोकप्रिय समज, प्रत्येकाच्या जबाबदारीविषयी बायबलच्या सकारात्मक शिकवणीच्या विसंगत आहेत?

◻ प्रत्येक ख्रिश्‍चनाने स्वतःत कोणती रचना केली पाहिजे?

◻ प्रत्येक जण स्वतः निवड करतो हे यहुदाच्या राजांच्या उदाहरणांनी कसे दाखवून दिले?

◻ आपल्या सभोवती नकारात्मक प्रभाव असले तरी आपण जीवनामध्ये उचित निवडी करू शकतो याची हमी यहोवा आपल्याला कशी देतो?

[१५ पानांवरील चित्र]

तुमचे भवितव्य जनुकांनी ठरवले आहे का?

[१७ पानांवरील चित्र]

आपल्या पित्याने वाईट उदाहरण गिरवले असतानाही, राजा योशीयाने देवाची सेवा करण्याची निवड केली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा