आमच्या मुलांमध्ये ख्रिस्ती व्यक्तीमत्व उभारणे
वँडाची आई एकटीच होती, कारण तिचा पती तिला सोडून गेला होता, पण अशा दशेत तिने आपल्या मुलीमध्ये ख्रिस्ती गुणांची वाढ करण्यात बरेच कष्ट घेतले. वॅन्डा जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा या शिक्षणाची कसोटी लागण्याची वेळ आली. वॅन्डाला तिच्या छोट्या भाऊ व बहिणीबरोबर तिच्या आईला सोडून वडीलांबरोबर काही काळ राहण्याची जबरदस्ती करण्यात आली. तिचे वडील विश्वासातील नव्हते. मग आई लक्ष ठेवण्यास नसताना वॅन्डाने कसे वागायचे होते?
सर्व ख्रिस्ती पालकांवर अखेर एक प्रसंग येतोच, तो म्हणजे त्यांच्या मुलांनी स्वतः निर्णय घेण्याची वेळ येते, आणि या वेळी त्यांच्या विश्वासाची कसोटी होते. वॅन्डाप्रमाणे ती मुले आपल्या ख्रिस्ती पालकांपासून दूर असली तरी, शाळेत असताना एखादे चुकीचे कृत्य करण्यास त्यांच्यावर जोराचा दबाव येऊ शकतो. किंवा जोरदार मोहाला त्यांना तोंड द्यावे लागले. ख्रिस्ती पालक आशा करतात व प्रार्थना करतात की, जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा त्यांच्या मुलांचे ख्रिस्ती व्यक्तिमत्व इतके कणखर असावे की, त्यांना या परिक्षेला सहज तोंड देता येईल.
आपल्या मुलांमध्ये ही ख्रिस्ती गुणवत्ता पालक कशी उभारु शकतील? वॅन्डाच्या बाबतीत काय झाले हे समजून घेण्यापूर्वी पवित्र शास्त्र त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्हास कशी मदत करते हे पाहू या. प्रेषित पौलाने करिंथमधील ख्रिश्चनांना उद्देशून बोललेल्या शब्दांमध्ये त्या उत्तराचा आधार मिळेल. तो म्हणतोः “येशू ख्रिस्त हा घातलेला पाया याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, तर कोणी लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो. तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परिक्षा त्या अग्नीनेच होईल.”—१ करिंथकर ३:११-१३.
पाया
पौलाने हे शब्द का बरे लिहिले असतील? त्याने करिंथमध्ये ख्रिस्ती गुणवत्ता उभारण्याची सुरवात केली होती, परंतु पुढे समस्याही आल्या. अर्थात, पौलाची ही उभारणी योजना त्याच्या दैहिक मुलांसाठी नव्हती, तर त्याच्या सुवार्ता प्रचाराद्वारे जे ख्रिस्ती झाले होते ते यात गोवलेले होते. परंतु तो यांना आध्यात्मिक मुले म्हणत होता व म्हणूनच तो जे बोलला ते पालकांसाठीही महत्त्वाचे आहे.—१ करिंथकर ४:१५.
सुरवातीच्या काळात पौल करिंथ येथे आला व तेथे त्याने ख्रिस्ती मंडळीची स्थापना केली. ज्यांनी त्याच्या सुवार्तेला प्रतिसाद दिला त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. पूर्वी कोणी व्यभिचारी, चोर, मूर्तिपूजक व दारुबाजही असतील. (१ करिंथकर ६:९-११) परंतु ख्रिश्चन तत्त्वप्रणालीनुसार बदल करणे शक्य झाले, कारण जसा पाहिजे तसा चांगला पाया पौलाने घातला होता. हा पाया कोणता? “येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.”—१ करिंथकर ३:११.
करिंथमधील नवविश्वासूंना शिकवताना पौलाने हा पाया कसा घातला? तो आम्हाला सांगतोः “बंधुजनहो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हास सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्ताशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा ठाम निश्चय केला.” (१ करिंथकर २:१, २; प्रे. कृत्ये १८:५) त्याने स्वतःकडे लक्ष वेधवले नाही, व सत्य म्हणजे काहीतरी विद्वत्ता आहे असेही भासवले नाही. उलट येशू ख्रिस्ताकडे व देवाने त्याचा कोणत्या मार्गाने उपयोग केला आहे तिकडे लक्ष वळवले.
खरोखर, ख्रिस्ती उभारणीसाठी येशू हा अत्यंत भव्य असा पाया आहे. त्याने खंडणी पुरविली. तो आता स्वर्गीय राजा आहे व हर्मगिदोनमध्ये तो लवकरच देवाच्या शत्रूंचा नाश करणार आहे. त्याच्या एक हजार वर्षांच्या कारकिर्दीत देवाचे नीतीमत्त्व तो बहाल करणार आहे व देवाचा महायाजक या नात्याने तो मानवजातीला पूर्णत्वाकडे नेणार आहे. मग, मनुष्याला अजून कोणत्या प्रकारचा पाया हवा?
या कारणास्तव, आमच्या मुलांमध्ये ख्रिस्ती व्यक्तीमत्त्वाची उभारणी करताना आम्ही योग्य रितीने पौलाचे अनुकरण केले पाहिजे व या महत्त्वाच्या घटकांची ते गुणग्राहकता बाळगतात की नाही याची ही खात्री करून घेतली पाहिजे. त्यांच्या बाळपणापासूनच येशूने जे काही केले आहे व अजूनही आमच्यासाठी करत आहे त्याविषयी प्रीती बाळगण्यास आम्ही मुलांना शिक्षण दिले पाहिजे.—१ पेत्र १:८.
उभारणी
परंतु पौलाने जरी हा पाया घातला तरी तो निघून गेल्यावर उभारणीच्या कामात पिछेहाट झाली. (१ करिंथकर ३:१०) आजच्या पालकांना ज्याचा अनुभव येतो त्या समस्येपेक्षा ती वेगळी नव्हती. ख्रिस्ती विश्वासात ते मुलांची वाढ करतात व सत्य म्हणजे काय हे आता मुलांना समजले आहे याची खात्री बाळगतात. परंतु जसेजसे वय वाढते तसे मुले विश्वासापासून बहकतात किंवा त्याचा अनादर करतात. असे का बरे? बहुतेक वेळा जे साहित्य तुम्ही उभारणीसाठी वापरता त्यामुळे.
पौल म्हणाला की, व्यक्तित्व हे मौल्यवान साहित्यानेही बांधले जाऊ शकते, जसे की, सोने, चांदी, रत्ने. तसेच ते लाकूड, गवत, व पेंढा या सामान्य साहित्यानेही बांधले जाऊ शकते. (१ करिंथकर ३:१२) आता बांधणारा जर सोने, चांदी किंवा रत्नांचा वापर करत असेल तर तो नक्कीच एक उत्तम मौल्यवान वास्तुशिल्प उभे करतो. परंतु बांधणारा जर लाकूड, गवत व पेंढा यांचा वापर करतो तर तो एक कामचलाऊ, तात्पुरती व हलक्या दर्जाची बांधणी उभारेल.
करिंथमध्ये वापरण्यात आलेले आध्यात्मिक साहित्य ठिसूळ होते, असे आढळून येते. काही जण पौलाने सांगितलेल्या पायावर हलक्या दर्जाचे बांधकाम करत होते. त्यामुळे भक्कम व टिकाऊ अशी रचना झाली नाही. करिंथकरांनी लोकांचे अनुकरण करण्यास सुरवात केली होती व यामुळे तेथे फूट, द्वेष व भांडणे सुरु झाली. (१ करिंथकर १:१०-१२; ३:१-४) याला कशामुळे आळा बसणार होता? त्यांच्या चांगल्या प्रतिच्या व टिकाऊ साहित्याच्या वापरामुळे.
या गोष्टी ख्रिस्ती व्यक्तीमत्वाचा महत्त्वाचा भाग असलेल्या अमूल्य गुणविशेषांचे प्रतिनिधीत्व करतात. कोणते गुणविशेष? प्रेषित पेत्राने एकाचा उल्लेख केला आहे. तो म्हणतोः “सोन्यापेक्षा मूल्यावान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे.” (१ पेत्र १:६, ७) राजा शलमोनाने अजून दोघांचा उल्लेख केला आहेः ज्ञान व सूज्ञता यांची प्राप्ती होणे हे “रुप्याच्या सौद्यापेक्षा उत्तम आहे.” (नीतीसूत्रे ३:१३-१५) शिवाय दावीद राजाने आम्हाला आठवण दिली आहे की यहोवाचे भय व त्याच्या आज्ञांबद्दलची गुणग्राहकता “सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत.”—स्तोत्रसंहिता १९:९, १०.
आमच्या मुलांना परीक्षांमधून निभावण्यासाठी हे व इतर मूल्यवान साहित्य यांची उभारणी ख्रिस्ती व्यक्तीमत्वात केली पाहिजे. पण याच साहित्याद्वारे उभारणी होत आहे ही खात्री आम्ही कशी बाळगू शकतो? आमच्या व आमच्या मुलांच्या अंतःकरणाकडे लक्ष देण्याद्वारे.
यशस्वी बांधणीकाम
पालकांच्या अंतःकरणाची जी भूमिका या बांधणीकामात असली पाहिजे, ती यहोवा देवाने प्राचीन इस्राएल राष्ट्रातील पालकांना दिलेल्या आज्ञेमध्ये दिसून येतेः “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहेत त्या तुझ्या हृदयात ठसव.” त्याने पुढे म्हटले की, “त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव.” (अनुवाद ६:६, ७) यास्तव, इतरांची उभारणी करण्याआधी आम्हाला आमची उभारणी करायला हवी. आम्ही ज्या गोष्टी सांगतो व करतो त्याद्वारे आमच्या मुलांना दिसून आले पाहिजे की, आमचे व्यक्तीमत्त्व योग्य अशा साहित्याने उभारले आहे.—कलस्सैकर ३:९, १०.
मग, आमची शिकवण त्यांच्या हृदयापर्यंत पोहंचली पाहिजे. येशू, जो ख्रिस्ती व्यक्तिमत्व उभारण्यात अत्यंत यशस्वी होता तो दाखल्यांद्वारे व प्रश्नांद्वारे अंतःकरणापर्यंत पोहंचत होता. (मत्तय १७:२४-२७; मार्क १३:३४) हे शिकवण्याचे तंत्र अत्यंत परिणामकारक आहे असे पालकांना आढळून आले आहे. त्यांच्या तरुण मुलांच्या अंतःकरणावर सत्याचा प्रभाव पाडण्यासाठी ते दाखल्यांचा उपयोग करतात. त्यांची मोठी मुले ज्या गोष्टींचा विचार करतात त्यांना सूज्ञता प्राप्त असलेले विचारपूर्ण प्रश्न वापरतात व त्याबद्दल त्यांच्या मनात ते कसा उहापोह करतात ते बघतात.—नीतीसूत्रे २०:५.
मोशे इस्राएली लोकांच्या मनात विश्वासू राहण्याच्या इच्छेची उभारणी करत होता तेव्हा तो म्हणालाः “आणि यहोवाच्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे, ते तू पाळावे.” (अनुवाद १०:३३) त्याचप्रमाणे पालकांनी केवळ देवाची गुणवत्ता काय आहे हेच केवळ व्यवस्थितरित्या सांगायचे नाही, तर प्रामाणिकपणा, नैतिक शुद्धता, चांगली मैत्री त्यांच्या भल्यासाठीच कशी आहे हे त्यांना पटवून द्यावयाचे होते.
शेवटी, येशू म्हणालाः “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) बाळपणीच वैयक्ती रितीने मुलांची यहोवाशी ओळख होते तेव्हा ते त्यांच्या समस्यांविषयी त्याच्याबरोबर बोलायचे शिकतात व त्यांच्या प्रार्थनांना तो जी उत्तरे देतो त्याचा ते अनुभव घेऊ शकतात व ख्रिस्ती व्यक्तीमत्वातील अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये ते प्रगति करू शकतातः त्यांच्या निर्मात्याबरोबर त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध जुळतात!
अग्नी
पौलाला हे दिसून आले की, करिंथमधील बांधणीचे काम व्यवस्थितरित्या न केले गेल्यामुळे जगिक दोष जसे की पक्षभेद व कलह यांनी तेथे मूळ धरले आहे. ही गोष्ट अतिशय घातक होती, कारण तो म्हणतोः “प्रत्येकाचे काम कसे आहे याची परिक्षा ह्याच अग्नीने होईल.”—१ करिंथकर ३:१३.
हा अग्नी काय आहे? सैतान ख्रिश्चनांवर आणवणारी ती कोणत्याही प्रकारची परिक्षा असू शकते. तो जबरदस्त दबाव असेल किंवा दैहिक आकर्षण, भौतिकवाद, छळ अथवा संशयामुळे गंज चढविण्याचा परिणाम. अशा परिक्षा नक्कीच ओढवणार. “बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघडकीस येईल. तो दिवस ते उघडकीस आणील. कारण तो अग्नीने प्रकट होईल.” सूज्ञ मातापिता आपल्या मुलांची उभारणी, आपल्या मुलांची परिक्षा होईलच ही अपेक्षा धरुनच करतील. परंतु त्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे की, यहोवाच्या मदतीने त्यांची मुले त्या परिक्षेतून बचावू शकतील. जर पालकांचा असा दृष्टीकोण असेल तर नक्कीच त्यांना भरपूर आशीर्वाद मिळू शकतील.
बक्षीस
पौल म्हणालाः “ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल.” (१ करिंथकर ३:१४) प्रेषित पौलाला बक्षीस मिळाले. थेस्सलनीकातील ख्रिश्चनांना जेथे त्याने हे बांधकाम केले होते, असे लिहिलेः “कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभु येशू ह्याच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आहा ना? कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहा.”—१ थेस्सलनीकाकर २:१९, २०.
वॅन्डाच्या आईला हेच बक्षीस मिळाले. जेव्हा वॅन्डा तिच्या आईपासून दूर गेली तेव्हा झोपताना तिला रडू फुटले. पण मग, यहोवाबरोबर प्रार्थनेत समस्यांची सादरता करावी हा तिच्या आईचा सल्ला तिला आठवला. तिने प्रार्थना केली व लगेच तिला दूरध्वनी पुस्तकात जवळपास कोणी यहोवाचे साक्षीदार राहतात का हे शोधण्याची कल्पना सुचली. तिने त्यांच्याशी संपर्क साधला व तिला समजले की, तिच्या वडीलांच्या घराजवळच एक कुटुंब राहात आहे. वॅन्डा म्हणते, “मला किती आनंद झाला.”
या कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे आपल्या लहान बहीण व भावाला ख्रिस्ती हालचालीत योजनाबद्ध रितीने वॅन्डाने पुढे आणले. ती सांगतेः “सभांची तयारी करण्यास मी जबाबदार होते; मला कपडे धुवावे लागत; केस विंचरावे लागत व आम्ही स्वच्छ व टापटीप आहोत की नाही हे बघावे लागे.” एका छोट्या मुलीसाठी हे जरा अवघडच काम होत. परंतु तिने ते केले. एक वेळ अशी आली की, वडीलांनी सभांना जाण्यापासून त्यांना थोपविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी विनंत आग्रह केला व मग त्यांनी त्यांना जाऊ दिले.
नंतर आई व मुलांचे परत मिलन झाले. वॅन्डा १५ वर्षांची झाल्यावर ती एक बाप्तिस्मा झालेली ख्रिश्चन व्यक्ती बनली व मिशनरी बनण्याची इच्छा तिने प्रकट केली. होय, वॅन्डाच्या आईच्या कामाची परिक्षा झाली व त्यात ती यशस्वी ठरली. आपली मुलगी सत्यासाठी स्वतः खंबीरतेत दृढ राहिली याचा आनंद उपभोगण्याचे बक्षीस तिला मिळाले. आपल्या मुलांना ख्रिस्ती व्यक्तिमत्वात वाढविण्याचे काम करणाऱ्या सर्व पालकांना असेच यश मिळो.
[३० पानांवरील चौकट]
या लेखात दाखविल्याप्रमाणे पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये ख्रिस्ती व्यक्तिमत्वाची उभारणी करण्यात श्रम घेतले पाहिजेत, तरी मुलांवरही जबाबदारी आहे. सर्व ख्रिश्चनांप्रमाणे यांनीही स्वतःमध्ये ते उभारणीकार्य केले पाहिजे. (इफिसकर ४:२२-२४) जरी पालकांना यात मदत देण्याची अभूतपूर्व संधि मिळाली असली तरी शेवटी प्रत्येक वैयक्तिकाला—त्याला किंवा तिला—यहोवाची सेवा करण्याचा निर्णय स्वतःच ठरवावयाचा आहे.