यहोवाकडे आकर्षित होण्यास लोकांना मदत
“माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.”—योहान १४:६.
१. पुनरुत्थित येशूने आपल्या शिष्यांना कोणती आज्ञा दिली, व यहोवाच्या साक्षीदारांनी त्या आज्ञेचे पालन केल्यामुळे त्याचा काय परिणाम झाला आहे?
येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या” अशी आज्ञा दिली. (मत्तय २८:१९) गेल्या दहा वर्षांत यहोवाच्या साक्षीदारांनी तीस लाखांपेक्षा अधिक लोकांना देवाजवळ येण्यास व त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांनी केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेण्यास मदत केली आहे. लोकांना देवाकडे आकर्षित करण्यास आपल्याला किती आनंद होतो!—याकोब ४:८.
२. अनेक नवीन लोकांचा बाप्तिस्मा होत असला तरी काय घडले आहे?
२ परंतु ज्या देशात नवीन शिष्यांचा बाप्तिस्मा झाला आहे त्या देशात राज्य प्रचारकांच्या संख्येत तितकी वाढ झालेली नाही. अर्थातच, मरण पावलेल्यांची गोष्ट वेगळी आहे; वार्षिक मृत्यूचे प्रमाण जवळजवळ १ टक्का होते. तरीपण, गेल्या काही वर्षांत, पुष्कळ जण काही कारणास्तव संस्था सोडून गेले आहेत. का? लोक यहोवाजवळ आकर्षित कसे होतात व काही जण संस्थेच्या बाहेर का जातात त्यांची संभाव्य कारणे, यांचे परीक्षण या आणि पुढील लेखात केले जाईल.
आपल्या प्रचाराचा उद्देश
३. (अ) येशूच्या शिष्यांना देण्यात आलेली कामगिरी आणि प्रकटीकरण १४:६ मधील देवदूताची कामगिरी सारखीच कशी आहे? (ब) राज्य संदेशाबद्दल लोकांची आस्था जागृत करण्याचा कोणता मार्ग प्रभावशाली सिद्ध झाला आहे, पण कोणती समस्या अद्यापही राहते?
३ या ‘अंतसमयात’ येशूच्या शिष्यांवर ‘राज्याच्या सुवार्तेसंबंधी’ असलेल्या ‘खऱ्या ज्ञानाचा’ प्रचार करण्याची कामगिरी सोपवण्यात आली आहे. (दानीएल १२:४; मत्तय २४:१४) त्यांची कामगिरी, देवदूताच्या कामगिरीसारखीच आहे; त्याला “पृथ्वीवर राहणाऱ्यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांस . . . सार्वकालिक सुवार्ता” सांगण्याची कामगिरी मिळाली होती. (प्रकटीकरण १४:६) सांसारिक कोशात गुरफटलेल्या या जगात, लोकांमध्ये देवाच्या राज्याबद्दल आवड निर्माण करून त्यांना देवाकडे आकर्षित करण्यास मदत करण्याचा सर्वात प्रभावशाली मार्ग म्हणजे परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेविषयी त्यांना सांगणे. परादीसमध्ये जाता येईल केवळ या कारणासाठी देवाच्या लोकांबरोबर संगती करणारे जीवनाकडे जाणाऱ्या अरुंद मार्गावर जास्त काळ चालू शकत नाहीत हे समजण्याजोगे आहे.—मत्तय ७:१३, १४.
४. येशू आणि अंतराळात उडणारा देवदूत यांच्यानुसार आपल्या प्रचार कार्याचा उद्देश काय आहे?
४ येशू म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) अंतराळाच्या मध्यभागी उडणारा देवदूत ‘सार्वकालिक सुवार्तेची’ घोषणा करतो व पृथ्वीवर राहणाऱ्यांना सांगतो: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.” (प्रकटीकरण १४:७) यास्तव, लोकांना येशू ख्रिस्ताद्वारे यहोवा देवाकडे आकर्षित होण्यास मदत करणे हा सुवार्ता प्रचार करण्यामागचा आपला उद्देश आहे.
यहोवाच्या कार्यातील आपली भूमिका
५. आपण आपले नव्हे तर यहोवाचे कार्य करीत आहोत हे पौल आणि येशू यांच्या कोणत्या बोलण्यावरून दिसते?
५ सहअभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिताना प्रेषित पौल ‘समेटाच्या सेवेविषयी’ बोलतो व म्हणतो, की देव येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर लोकांशी समेट करतो. हे जणू “देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे” आहे व ‘देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी जणू आपण ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीत’ आहोत, असे पौल म्हणतो. किती हा प्रेमळ विचार! आपण “ख्रिस्ताच्या वतीने वकिली” करणारे असो किंवा पृथ्वीवर जगण्याची आशा असलेले संदेशवाहक असो, हे कार्य आपले नव्हे तर यहोवाचे आहे हे आपण विसरून चालणार नाही. (२ करिंथकर ५:१८-२०) देवच खरे तर लोकांना आकर्षित करतो व येशूजवळ येणाऱ्यांना शिकवतो. येशू म्हणाला: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.”—योहान ६:४४, ४५.
६. यहोवा प्रारंभिक मार्गाने राष्ट्रांना कसे हलवत आहे व त्याचबरोबर त्याच्या ‘भवनात’ कोण आश्रय घेत आहे?
६ यहोवा या शेवटल्या काळात लोकांना कशाप्रकारे आकर्षित करून त्यांच्यासाठी “विश्वासाचे दार” उघडत आहे? (प्रेषितांची कृत्ये १४:२७; २ तीमथ्य ३:१) एक प्रमुख मार्ग म्हणजे, तो आपल्या साक्षीदारांना या दुष्ट व्यवस्थीकरणाविरुद्ध तारणाच्या व न्यायदंडाच्या संदेशांची घोषणा करावयास सांगतो. (यशया ४३:१२; ६१:१, २) या जगव्याप्त घोषणेमुळे राष्ट्रांना प्रारंभिक हालवले जात आहे—हे हालवणे, लवकरच येणाऱ्या न्यायदंडाची एक झलक आहे. त्याच वेळी, देवाच्या नजरेत “मौल्यवान” असलेल्या लोकांना या व्यवस्थीकरणातून काढले जात आहे व हे लोक खऱ्या उपासनेच्या ‘भवनात’ आश्रय घेत आहेत. अशाप्रकारे यहोवा आपले भविष्यसूचक शब्द पूर्ण करत आहे जे हाग्गयने लिहून ठेवले होते: “मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु येतील; आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन.”—हाग्गय २:६, ७, NW तळटीप; प्रकटीकरण ७:९, १५.
७. यहोवा लोकांचे अंतःकरण कसे उघडतो व स्वतःकडे आणि पुत्राकडे लोकांना कसे आकर्षित करतो?
७ यहोवा या देव-भीरू लोकांचे—“सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तूंचे”—अंतःकरण उघडत आहे, जेणेकरून ते त्याच्या साक्षीदारांच्या “सांगण्याकडे लक्ष” देतील. (हाग्गय २:७, यहुदी प्रकाशन संस्था; प्रेषितांची कृत्ये १६:१४) पहिल्या शतकाप्रमाणे यहोवा, मदतीसाठी त्याच्याकडे धावा करणाऱ्या प्रामाणिक लोकांपर्यंत त्याच्या साक्षीदारांना नेण्याकरता काही वेळा आपल्या देवदूतांचा उपयोग करतो. (प्रेषितांची कृत्ये ८:२६-३१) आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाने केलेल्या अद्भुत तरतुदींविषयी लोक शिकतात तेव्हा ते यहोवाच्या प्रीतीद्वारे त्याच्याकडे आकर्षित होतात. (१ योहान ४:९, १०) होय, देव त्याच्या “वात्सल्याने” किंवा “एकनिष्ठ प्रीतीने” स्वतःकडे आणि आपल्या पुत्राकडे लोकांना आकर्षित करतो.—यिर्मया ३१:३, NW तळटीप.
यहोवा कोणाला आकर्षितो?
८. यहोवा कोणत्या प्रकारच्या लोकांना आकर्षित करतो?
८ यहोवा आपला शोध करणाऱ्यांना स्वतःकडे व आपल्या पुत्राकडे आकर्षितो. (प्रेषितांची कृत्ये १७:२७) ख्रिस्ती धर्मजगत आणि खरे तर संपूर्ण जगात “होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे” टाकत असलेल्या लोकांना तो आपल्याकडे आकर्षितो. (यहेज्केल ९:४) त्यांना “आध्यात्मिक गरजेची जाणीव” आहे. (मत्तय ५:३, NW) होय, ते ‘पृथ्वीवरील नम्र [“लीन,” NW तळटीप] लोक’ आहेत जे परादीस पृथ्वीवर कायम राहतील.—सफन्या २:३.
९. लोकांचा “सार्वकालिक जीवनाकडे योग्य कल” आहे हे यहोवा कसे पाहू शकतो व अशांना तो कसे आकर्षित करतो?
९ यहोवा मनुष्याचे अंतःकरण ओळखू शकतो. राजा दावीदाने आपला पुत्र शलमोन यांस सांगितले: “परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात, तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल.” (१ इतिहास २८:९) अंतःकरण व स्वभाव किंवा प्रभावी मनोवृत्ती याच्या आधारावर यहोवा एखाद्याला पाहू शकतो, की पापांच्या क्षमेसाठी असलेल्या ईश्वरी तरतूदींना व देवाच्या धार्मिक नवीन व्यवस्थेतील सार्वकालिक जीवनाच्या आशेला तो किंवा ती प्रतिसाद देण्याची शक्यता आहे की नाही. (२ पेत्र ३:१३) साक्षीदार प्रचार करत व शिकवत असलेल्या त्याच्या वचनाद्वारे यहोवा “सार्वकालिक जीवनाकडे योग्य कल” असलेल्यांना स्वतःकडे आणि आपल्या पुत्राकडे आकर्षित करतो आणि हे सर्व “विश्वास” ठेवणारे होतात.—प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW.
१०. यहोवा काहींना आकर्षित करतो तर काहींना करत नाही हे पूर्व-नियोजित नसल्याचे कशावरून दिसते?
१० यहोवा काहींना आकर्षित करतो तर काहींना करत नाही, मग यांत पूर्व-नियोजनाचा काही प्रकार आहे का? मुळीच नाही! देवाने लोकांना आकर्षित करणे हे त्यांच्या उत्कट इच्छेवर अवलंबून आहे. तो त्यांच्या स्वतंत्र इच्छेचा आदर करतो. यहोवाने सुमारे ३,००० वर्षांपूर्वी इस्राएलांपुढे जी निवड ठेवली होती तीच निवड तो आज पृथ्वीवरील लोकांसमोर ठेवतो; मोशे याविषयी म्हणाला होता: “जीवन व सुख, आणि मरण व दुःख, ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; . . . आकाश व पृथ्वी ह्यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायु होशील.”—अनुवाद ३०:१५-२०.
११. इस्राएली लोकांना जीवनाची निवड कशी करायची होती?
११ ‘यहोवा देवावर प्रीती करून, त्याची वाणी ऐकण्याद्वारे व त्याला जडून राहण्याद्वारे’ इस्राएली लोकांना जीवन निवडायचे होते, ही गोष्ट लक्षात घ्या. हे सांगण्यात आले तेव्हा इस्राएल लोकांना अद्याप वाग्दत्त देशाचा ताबा मिळालेला नव्हता. यार्देन नदी पार करून कनान देशात प्रवेश करण्यासाठी ते सर्व मवाबाच्या पठारावर सज्ज होते. त्यांना लवकरच ज्याचे वतन मिळणार होते त्या “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत” अशा “चांगल्या व मोठ्या” देशात जाण्याचे ते स्वाभाविकतः स्वप्न पाहत असले तरी, यहोवाबद्दल त्यांनी प्रीती दाखवली, त्याच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष देऊन त्यानुसार ते जगले तरच त्यांचे हे स्वप्न साकार होणार होते. (निर्गम ३:८) आणि मोशेने अशाप्रकारे हे स्पष्ट केले: “तू आपला देव यहोवा ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ, ही यहोवा देवाची आज्ञा तू जर पाळलीस तर तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव यहोवा तुला बरकत देईल.”—अनुवाद ३०:१६, NW.
१२. इस्राएली लोकांच्या उदाहरणावरून आपण आपल्या प्रचार व शिकवण्याच्या कार्याविषयी काय शिकू शकतो?
१२ या पूर्वोदाहरणातून आपण या अंतसमयातील आपल्या प्रचार व शिकवण्याच्या आपल्या कार्याबद्दल काही शिकू शकतो का? आपण पृथ्वीवर येणाऱ्या परादीसचा विचार करतो व त्याच्याविषयी आपल्या सेवेत बोलतो. पण, स्वार्थी कारणांसाठी आपण देवाची सेवा करत असलो किंवा ज्यांना आपण शिकवतो ते करत असले तर, या अभिवचनाची पूर्ती कोणीच पाहू शकणार नाही. इस्राएल लोकांप्रमाणे आपण स्वतः आणि आपण ज्यांना शिकवतो त्यांनी ‘यहोवावर प्रेम करण्यास, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देण्यास त्याच्याशी जडून राहण्यास शिकले पाहिजे.’ सेवा करताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली तर लोकांना आकर्षित करण्यात वास्तविकतेत आपण देवाला सहयोग देत असू.
देवाचे सहकारी
१३, १४. (अ) आपण १ करिंथकर ३:५-९ नुसार देवाचे सहकारी कशाप्रकारे होतो? (ब) कोणत्याही वाढीचे श्रेय कोणास गेले पाहिजे व का?
१३ पौलाने, शेताची मशागत करण्याविषयी सांगून देवाला सहयोग देण्याबद्दलचा मुद्दा स्पष्ट केला. त्याने लिहिले: “अपुल्लोस कोण? आणि पौल कोण? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत; ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराहि काही नाही; तर वाढविणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो; तुम्ही देवाचे शेत” आहात.—१ करिंथकर ३:५-९.
१४ देवाचे सहकारी या नात्याने आपण सर्व लोकांच्या अंतःकरणात “राज्याचे वचन” विश्वासूपणे पेरले पाहिजे; मग आस्था दिसल्यास चांगल्या तयारीनिशी पुनर्भेटी व बायबल अभ्यासांद्वारे पाणी घातले पाहिजे. जमीन अर्थात अंतःकरण चांगले असल्यास, यहोवा बायबल सत्याच्या बिजाची एका फलदायी रोपट्यात वाढ करून आपली भूमिका पार पाडील. (मत्तय १३:१९, २३) तो स्वतःकडे आणि आपल्या पुत्राकडे त्या व्यक्तीला आकर्षित करील. आणि शेवटी मग, राज्य घोषकांच्या संख्येतील वाढ ही यहोवाने लोकांच्या अंतःकरणात कार्य केल्याचा परिणाम असेल कारण त्याने सत्याचे बीज वाढवले आहे व अशा लोकांना स्वतःकडे आणि आपल्या पुत्राकडे आकर्षित केले आहे.
टिकाऊ बांधकाम
१५. विश्वास विकसित करण्यास आपण इतरांना कशी मदत करतो हे दाखवण्यासाठी पौलाने कोणता दाखला दिला?
१५ होणाऱ्या वाढीचा आपल्याला आनंद तर होतोच शिवाय आपण हेही अपेक्षितो, की लोकांनी यहोवावर प्रीती करीत राहावी, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत राहावे आणि त्याला जडून राहावे. काही जणांचा उत्साह कमी होऊन ते मागे पडल्याचे आपण पाहतो तेव्हा आपल्याला वाईट वाटते. असे होऊ नये म्हणून आपण काही करू शकतो का? दुसऱ्या एका उदाहरणात पौल, आपण इतरांना विश्वास विकसित करण्यास कशी मदत करू शकतो हे दाखवतो. तो लिहितो: “येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो; तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.”—१ करिंथकर ३:११-१३.
१६. (अ) पौलाने दिलेल्या दोन दाखल्यांचे धडे भिन्न कसे आहेत? (ब) आपले बांधकाम असमाधानकारक व अग्नीत न टिकणारे कसे होऊ शकते?
१६ पौलाने शेताच्या दिलेल्या दाखल्यात, वाढ ही विश्वासूपणे पेरणी करणे, नियमितरीत्या पाणी घालणे आणि देवाचा आशीर्वाद यावर निर्भर आहे. प्रेषित पौलाने दिलेला दुसरा दाखला, एखाद्या ख्रिस्ती सेवकाच्या बांधकामाच्या परिणामाला तो स्वतः जबाबदार आहे यावर जोर देतो. त्याने उत्तम दर्जाच्या साहित्यांचा वापर करून मजबूत पायावर बांधकाम केले आहे का? पौल ताकीद देतो: “बांधकाम आपण कसे करीत आहो ह्याविषयी प्रत्येकाने जपावे.” (१ करिंथकर ३:१०) परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेविषयी सांगून एखाद्याची आस्था जागृत केल्यानंतर, आपण फक्त मूलभूत शास्त्रवचनीय ज्ञानावर व मग चिरकालिक जीवन मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने काय केले पाहिजे यावरच अधिक जोर देतो का? ‘परादीस पृथ्वीवर जगायचं आहे तर बायबलचा अभ्यास केला पाहिजे, सभांना गेलं पाहिजे व प्रचार कार्यात भाग घेतला पाहिजे,’ केवळ हीच शिकवण आपण देतो का? असल्यास, आपण त्या व्यक्तीचा विश्वास एका मजबूत पायावर बांधत नसतो, आणि जे बांधत असतो ते अशा साहित्याचे असते जे परीक्षांच्या अग्नीत अथवा दीर्घकाळपर्यंत टिकू शकत नाही. आता फक्त काही वर्षांसाठी त्याची सेवा केली तर त्या बदल्यात तुम्हाला परादीसमध्ये जीवनाची आशा मिळू शकेल असे लोकांना सांगून त्यांना यहोवाची सेवा करायला आकर्षित करणे म्हणजे, “लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी” बांधकाम करण्यासारखे आहे.
देव आणि ख्रिस्त यांच्याबद्दल प्रीती वाढवणे
१७, १८. (अ) एखाद्याचा टिकाऊ विश्वास असण्याकरता कशाची अत्यंत आवश्यकता आहे? (ब) ख्रिस्ताने एखाद्याच्या अंतःकरणात वास करावा म्हणून आपण त्याला किंवा तिला मदत कशी करू शकतो?
१७ टिकाऊ विश्वास असण्याकरता तो येशू ख्रिस्ताद्वारे यहोवा देवाबरोबरच्या व्यक्तिगत नातेसंबंधावर आधारित असला पाहिजे. अपरिपूर्ण मानव असल्यामुळे आपण देवाबरोबरचा असा शांतिपूर्ण नातेसंबंध केवळ त्याच्या पुत्राद्वारे जोडू शकतो. (रोमकर ५:२०) येशू काय म्हणाला त्याची आठवण करा: “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” इतरांना त्यांचा विश्वास वाढवायला मदत करण्यासाठी “येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.” यामध्ये काय गोवले आहे?—योहान १४:६; १ करिंथकर ३:११.
१८ ख्रिस्ताला पाया बनवून त्यावर बांधकाम करण्याचा अर्थ, बायबल विद्यार्थ्याला अशाप्रकारे शिकवणे की तो, येशूला तारक, मंडळीचा मस्तक, प्रेमळ महायाजक आणि राज्य करणारा राजा या त्याच्या भूमिकांबद्दलच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याच्याबद्दल गाढ प्रेम विकसित करील. (दानीएल ७:१३, १४; मत्तय २०:२८; कलस्सैकर १:१८-२०; इब्री लोकांस ४:१४-१६) याचा अर्थ, येशू त्यांना इतका खरा वाटण्यास आपण त्यांना मदत केली पाहिजे की तो त्यांच्या अंतःकरणात वास करू लागेल. त्यांच्यासाठी आपण करत असलेली विनंती, इफिसमधील ख्रिश्चनांबद्दल पौलाने केलेल्या विनंतीसारखी असली पाहिजे. त्याने लिहिले: “पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करितो की, . . . ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे” व्हावे.—इफिसकर ३:१४-१७.
१९. आपल्या बायबल विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात ख्रिस्ताबद्दल प्रेम विकसित केल्याचा कोणता परिणाम झाला पाहिजे, पण आपण त्यांना काय शिकवले पाहिजे?
१९ आपल्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात ख्रिस्ताबद्दलचे प्रेम विकसित होईल असे बांधकाम आपण केल्यास, यामुळे यहोवा देवाबद्दलही आपोआप प्रेम विकसित होऊ लागेल. येशूचे प्रेम, त्याच्या भावना आणि त्याची दया यहोवाच्या गुणांची हुबेहूब पडछाया आहे. (मत्तय ११:२८-३०; मार्क ६:३०-३४; योहान १५:१३, १४; कलस्सैकर १:१५; इब्री लोकांस १:३) यास्तव, लोक जेव्हा येशूला ओळखू लागतात व त्याच्यावर प्रेम करू लागतात तेव्हा ते यहोवालाही ओळखू लागतील, त्याच्यावर प्रीती करू लागतील.a (१ योहान ४:१४, १६, १९) ख्रिस्ताने मानवजातीसाठी जे काही केले आहे त्यामागे यहोवा असल्यामुळे तो आपल्या कृतज्ञतेला, स्तुतीला ‘तारणकर्ता देव’ या नात्याने आपल्या उपासनेला पात्र आहे, हे आपण बायबल विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे.—स्तोत्र ६८:१९, २०; यशया १२:२-५; योहान ३:१६; ५:१९.
२०. (अ) लोकांनी देव आणि त्याचा पुत्र यांच्याकडे आकर्षित होण्याकरता आपण त्यांची मदत कशी करू शकतो? (ब) पुढील लेखात कशावर चर्चा केली जाईल?
२० देवाचे सहकारी या नात्याने आपण लोकांना त्याच्याजवळ आणि त्याच्या पुत्राजवळ आकर्षित होण्यास, त्यांच्या अंतःकरणात प्रीती व विश्वास विकसित करण्यास साहाय्य करू या. अशाप्रकारे यहोवा त्यांना खरा वाटू लागेल. (योहान ७:२८) ख्रिस्ताद्वारे ते देवाबरोबर जवळचा नातेसंबंध जोडू शकतील, त्याच्यावर प्रीती करू लागतील व त्याला जडून राहतील. त्यांच्या प्रेमळ सेवेला वेळेचे बंधन नसेल. यहोवाची अद्भुत वचने त्याच्या नियुक्त समयी पूर्ण होतील असा विश्वास ते बाळगतील. (विलापगीत ३:२४-२६; इब्री लोकांस ११:६) पण, इतरांना विश्वास, आशा आणि प्रीती विकसित करण्यास मदत करताना आपण आधी स्वतःचा विश्वास मजबूत केला पाहिजे जेणेकरून तो सर्वात भयंकर वादळात टिकाव धरू शकणाऱ्या दणकट जहाजाप्रमाणे ठरू शकेल. पुढील लेखात यावर चर्चा केली जाईल.
[तळटीपा]
a सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित पुस्तक, येशू व त्याच्याद्वारे त्याचा पिता यहोवा यांची चांगल्याप्रकारे ओळख करून घेण्याचे सर्वोत्तम साधन आहे.
उजळणीद्वारे
◻ राज्य संदेशाबद्दल आपण लोकांची आस्था कशी जागृत करतो पण तरीही कोणता धोका राहतो?
◻ यहोवा कोणत्या प्रकारच्या लोकांना स्वतःकडे आणि आपल्या पुत्राकडे आकर्षित करतो?
◻ इस्राएल लोकांचे वाग्दत्त देशात प्रवेश करणे कशावर अवलंबून होते व आपण यातून काय शिकू शकतो?
◻ लोकांना यहोवा आणि त्याचा पुत्र यांच्याकडे आकर्षित करण्यात आपण कोणती भूमिका बजावतो?
[१० पानांवरील चित्र]
परादीसमधील सार्वकालिक जीवनाच्या आशेबद्दल आपण लोकांना सांगत असलो तरी, आपला मुख्य हेतू त्यांना यहोवाकडे आकर्षित करण्याचा आहे
[१३ पानांवरील चित्र]
चांगल्याप्रकारे तयारी केल्यास आपल्या पुनर्भेटी प्रभावी होऊ शकतात