यहोवाला का दिले पाहिजे?
सीदोनातील सारफथ नावाच्या लहानशा नगरावर सूर्य आपला रोष व्यक्त करत असताना, काटक्या गोळा करण्याकरता एक विधवा खाली वाकली. थोडेसे अन्न शिजवण्याकरता तिला चूल पेटवायची होती—हे कदाचित त्या मायलेकाचे शेवटले भोजन ठरणार होते. दीर्घ काळापासून पडलेली कोरड व दुष्काळ यामध्ये स्वतःला आणि आपल्या मुलाला जिवंत ठेवण्यासाठी ती खूप झटली होती आणि याचा आता दुःखद अंत होणार होता. त्यांची उपासमार होत होती.
एक मनुष्य तिच्याजवळ आला. त्याचे नाव एलीया होते. तो यहोवाचा एक संदेष्टा असल्याचे त्या विधवेने लगेच ओळखले. असे दिसते की तिने या देवाबद्दल ऐकले होते. ती राहत असलेल्या सीदोनात ज्या बआल दैवताची क्रूर, विकृत उपासना प्रचुर प्रमाणात होती त्याच्यापासून यहोवा फार वेगळा होता. म्हणून एलीयाने जेव्हा तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले तेव्हा ती त्याला मदत करण्यास उत्सुक होती. अशाने तिला यहोवाची मर्जी प्राप्त होईल असे कदाचित तिला वाटले असावे. (मत्तय १०:४१, ४२) पण, एलीया आणखी काही तरी दुसरे मागतो—थोडेसे अन्न. तिने त्याला सांगितले, की तिच्याकडे शेवटच्या भोजनापुरतेच अन्न शिल्लक आहे. तरीही, एलीया तिला अन्न आणण्याची गळ घालून, यहोवा तिला अवर्षण संपेपर्यंत चमत्कारिकपणे अन्न पुरवेल याची खात्री देतो. तिने काय केले? बायबल म्हणते: “तिने जाऊन एलीयाच्या सांगण्याप्रमाणे केले.” (१ राजे १७:१०-१५) हे साधे शब्द मोठ्या विश्वासाचे वर्णन करतात—इतका मोठा, की वास्तविक पाहता, येशू ख्रिस्ताने जवळजवळ दोन हजार वर्षांनंतरही त्या विधवेची प्रशंसा केली!—लूक ४:२५, २६.
तरीसुद्धा, यहोवाने इतक्या गरीब स्त्रीकडून इतके मागितले हे जरा विचित्र वाटेल. असे खासकरून तेव्हा वाटेल जेव्हा आपण एका प्रख्यात मनुष्याने केलेल्या प्रार्थनेचा विचार करतो. राजा दावीदाने, मंदिराच्या बांधकामात उपयोगात आणण्याकरता आपला मुलगा शलमोन यासाठी वर्गण्या गोळा केल्याने दानशूरतेला बढावा मिळाला. आधुनिक भाषेत सांगायचे तर आलेल्या देणग्यांचे मोल शेकडो कोटी डॉलर इतके होते! पण, दावीद यहोवाला प्रार्थनेत म्हणाला: “आम्हास या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करिता यावी असा मी कोण? व माझे लोक तरी कोण? सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते; तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहो.” (१ इतिहास २९:१४) दावीदाने म्हटल्याप्रमाणे सर्व काही यहोवाचे आहे. यास्तव, शुद्ध उपासनेच्या वाढीकरता आपण जेव्हा जेव्हा देतो तेव्हा आपण केवळ त्याचे जे आहे तेच त्याला सादर करत असतो. (स्तोत्र ५०:१०) म्हणून मग असा प्रश्न उभा राहतो, की प्रथम आपण यहोवाला द्यावे अशी तो आपल्याकडून अपेक्षा का करतो?
खऱ्या उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग
याचे अगदी सरळ उत्तर हे आहे, की आरंभीच्या काळापासून यहोवाने देण्याला शुद्ध उपासनेचा एक महत्त्वपूर्ण भाग बनवले आहे. विश्वासू पुरुष हाबेल याने त्याच्या मोलवान पशुधनामधून काही यहोवाला अर्पण केले. नोहा, अब्राहाम, इसहाक, याकोब आणि ईयोब या कुलपित्यांनी अशाच प्रकारची अर्पणे वाहिली.—उत्पत्ति ४:४; ८:२०; १२:७; २६:२५; ३१:५४; ईयोब १:५.
मोशेच्या नियमशास्त्राने यहोवाला वर्गणी देण्याविषयीचा हुकूम दिला व तो नियमितही केला. उदाहरणार्थ, सर्व इस्राएली लोकांना दशमांश देण्याची, किंवा त्यांच्या भूमीच्या उपजाचा व त्यांच्या वाढत्या पशूधनाचा दहावा भाग देण्याची आज्ञा दिली होती. (गणना १८:२५-२८) इतर वर्गण्या इतक्या काटेकोरपणे नियमित केलेल्या नव्हत्या. जसे की, प्रत्येक इस्राएलीकडून त्याने आपल्या पशूधनाचे व उपजाचे प्रथम फळ यहोवाला देण्याची अपेक्षा केली जात होती. (निर्गम २२:२९, ३०; २३:१९) तरीसुद्धा, जोपर्यंत एखादा मनुष्य आपल्या प्रथम फळातून सर्वोत्कृष्ट देईल तोपर्यंत तो केवढ्या प्रमाणात देईल हे ठरवणे त्याच्यावर अवलंबून होते. नियमशास्त्राने उपकारस्तुतीच्या व नवसाच्या अर्पणांची देखील तरतूद केली जी पूर्णपणे स्वखुशीने करायची होती. (लेवीय ७:१५, १६) यहोवाने त्याच्या लोकांना ज्याप्रकारे आशीर्वाद दिला होता त्याप्रकारे त्यांना देण्याचे उत्तेजन दिले. (अनुवाद १६:१७) निवासमंडप आणि मग मंदिराच्या बांधणीच्या बाबतीत होते त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या अंतःकरणाने प्रवृत्त केल्यानुसार दिले. (निर्गम ३५:२१; १ इतिहास २९:९) निश्चितच, अशा प्रकारच्या स्वेच्छिक वर्गण्या यहोवास संतुष्ट करणाऱ्या होत्या!
‘ख्रिस्ताच्या नियमाखाली’ सर्व देणे स्वेच्छिक होते. (गलतीकर ६:२; २ करिंथकर ९:७) याचा अर्थ, ख्रिस्ताच्या अनुयायांनी देण्याचे थांबवले किंवा त्यांनी कमी प्रमाणात दिले असा होत नाही. याच्या अगदी उलट! येशू आणि त्याचे प्रेषित इस्राएलमध्ये प्रचार करत होते तेव्हा स्त्रियांचा एक गट त्यांच्या मागे जाऊन आपल्या पैशाअडक्याने त्यांनी त्यांची सेवाचाकरी केली. (लूक ८:१-३) त्याचप्रमाणे, प्रेषित पौलालाही आपल्या मिशनरी कार्यास आधार देण्याकरता भेटवस्तू मिळाल्या व त्याच्याबदली त्याने गरजू लोकांना निधी देण्यासाठी काही मंडळ्यांना उत्तेजन दिले. (२ करिंथकर ८:१४; फिलिप्पैकर १:३-५) जेरुसलेममधील नियमन मंडळाने, मिळालेल्या वर्गण्यांचे गरजू लोकांत वाटप होत आहे याची खातरी करण्यासाठी जबाबदार पुरुषांना नेमले. (प्रेषितांची कृत्ये ६:२-४) स्पष्टतः आरंभीच्या ख्रिश्चनांनी, अशा मार्गांनी खऱ्या उपासनेला आधार देणे एक विशेषाधिकार समजला.
तरीसुद्धा, यहोवा देण्याला आपल्या उपासनेचा एक भाग का बनवतो याचा तुम्हाला प्रश्न पडेल. चार कारणांचा विचार करा.
आपण का देतो
प्रथम, यहोवा देण्याला आपल्या उपासनेचा एक भाग बनवतो कारण असे केल्याने आपले भले होते. देवाच्या चांगुलपणाबद्दल आपल्याला असलेल्या गुणग्राहकतेवर ते जोर देते. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाने आपल्या पालकासाठी एखादे बक्षीस विकत आणले किंवा बनवले तर पालकाची मुद्रा प्रसन्न का होते बरे? पालकाला कदाचित एखादी आवश्यकता पूर्ण करता आली नसती म्हणून ते बक्षीस ती आवश्यकता पूर्ण करते का? कदाचित नाही. उलट, मुलाने कृतज्ञतेचा व देण्याचा आत्मा विकसित केल्याचे पाहून पालकाला आनंद वाटतो. अशाच कारणांमुळे यहोवा आपल्याला देण्याचे उत्तेजन देतो व आपण तसे करतो तेव्हा त्याला आनंद होतो. यावरूनच आपण त्याला त्याची अमर्याद दया व दानशूरता याची आपल्याला कदर असल्याचे प्रदर्शित करतो. तो “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा असल्यामुळे त्याचे आभार मानण्याकरता आपल्याकडे अगणित कारणे आहेत. (याकोब १:१७) यासर्वांहून अधिक, यहोवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, आपल्याला अनंतकाळ जगता यावे म्हणून त्याने त्याचा मृत्यू होऊ दिला. (योहान ३:१६) आपण त्याचे कधी पूर्णपणे आभार मानू शकू का?
दुसरी गोष्ट म्हणजे, आपण देण्याची सवय लावून घेतल्यास, एका सर्वात महत्त्वपूर्ण बाबतीत आपण यहोवा आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांचे अनुकरण करण्यास शिकतो. यहोवा नेहमीच देतो, तो निरंतर उदार आहे. बायबल म्हणते त्याप्रमाणे त्याने आपल्या सर्वांना “जीवन, प्राण व सर्व काही” बहाल केले आहे. (प्रेषितांची कृत्ये १७:२५) आपण घेत असलेल्या प्रत्येक श्वासाबद्दल, आपण स्वाद घेत असलेल्या अन्नाच्या प्रत्येक घासाबद्दल, आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदी व समाधानकारक क्षणाबद्दल आपण त्याचे उचितपणे आभार मानू शकतो. (प्रेषितांची कृत्ये १४:१७) येशूने आपल्या पित्याप्रमाणे देण्याचा आत्मा प्रदर्शित केला. त्याने स्वतःला पूर्णपणे देऊ केले. येशूने चमत्कार केले तेव्हा त्याला काही प्रमाणात हानी झाल्याचे तुम्हाला माहीत आहे का? शास्त्रवचने आपल्याला अनेक वेळा सांगतात, की तो आजाऱ्यांना बरे करी तेव्हा “त्याच्यातून सामर्थ्य निघून” जाई. (लूक ६:१९; ८:४५, ४६) येशू इतक्या उदार मनाचा होता की त्याने मृत्यूपर्यंत आपला जीव, आपले जीवन देऊ केले.—यशया ५३:१२.
यास्तव, जेव्हा आपण आपला वेळ, आपली शक्ती किंवा आपली साधनसंपत्ती देतो तेव्हा यहोवाचे अनुकरण करतो व त्याचे अंतःकरण आनंदवितो. (नीतिसूत्रे २७:११; इफिसकर ५:१) तसेच, आपण येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी घालून दिलेला मानवी वर्तनाचा परिपूर्ण नमुना अनुसरतो.—१ पेत्र २:२१.
तिसरी गोष्ट, दिल्याने खऱ्या व महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण होतात. हे खरे की यहोवा, ज्याप्रमाणे वचनाचा प्रचार करण्याकरता आपल्या ऐवजी धोंड्यांना ओरडण्यास लावू शकला असता, त्याचप्रमाणे आपल्या मदतीविना तो सहजरीत्या राज्य आस्था पूर्ण करू शकला असता. (लूक १९:४०) पण त्याने आपल्याला हे विशेषाधिकार देऊन मोठेपणा देण्यास निवडले. यास्तव, जेव्हा आपण राज्य आस्थांच्या पुरस्काराकरता आपली साधनसंपत्ती देतो तेव्हा, या जगात होणाऱ्या सर्वात महत्त्वपूर्ण कार्यात आपण एक वास्तविक भूमिका निभावत आहोत हे जाणल्याने आपल्याला मोठे समाधान प्राप्त होते.—मत्तय २४:१४.
यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त कार्याच्या वित्तव्यवस्थेसाठी पैशाची गरज आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. १९९५ च्या सेवा वर्षादरम्यान, फक्त खास पायनियर, मिशनरी, प्रवासी पर्यवेक्षक यांना त्यांच्या क्षेत्र सेवेच्या नेमणुकींमध्ये काळजी घेण्यासाठी संस्थेने जवळजवळ ६ कोटी डॉलर खर्च केले. परंतु, संपूर्ण जगभरातील शाखा दफ्तरांच्या बांधकामाच्या आणि कामकाजाच्या तसेच छापखान्याच्या तरतुदींच्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च सापेक्षरीत्या कमी आहे. तरीदेखील, हे सर्व काही स्वेच्छिक वर्गण्यांद्वारे शक्य केले जाते.
यहोवाचे लोक सामान्यपणे, ते स्वतः सुस्थितीत नसल्यास त्यांनी इतरांना जू घेऊ द्यावे असा ग्रह करून घेत नाहीत. अशा प्रकारच्या मनोवृत्तीमुळे आपण आपल्या उपासनेचा हा पैलू चुकवू शकतो. प्रेषित पौलानुसार, मॅसिडोनियातील ख्रिस्ती “कमालीचे दारिद्र्य” सहन करीत होते. तरी, त्यांनी देण्याचा विशेषाधिकार आग्रहपूर्वक मागितला. पौलाने याची ग्वाही दिली, की त्यांनी जे काही दिले ते त्यांच्या ‘शक्तीपलीकडचे’ होते.—२ करिंथकर ८:१-४.
चौथी गोष्ट, दिल्याने आपल्याला आनंदी होण्यास मदत होत असल्यामुळे, यहोवाने देण्याला आपल्या खऱ्या उपासनेचा एक भाग बनवले आहे. स्वतः येशू म्हणाला: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) यहोवाने आपली घडणच तशी केली आहे. आपण त्याला कितीही दिले तरी, याची तुलना आपल्या अंतःकरणात आपल्याला त्याच्याबद्दल केवढी कदर आहे याजशी होऊ शकत नाही असे आपल्याला का वाटू शकते हे दुसरे एक कारण आहे. परंतु, आपण जेवढे देऊ शकतो त्याच्याहून अधिक यहोवा आपल्याकडून अपेक्षित नाही ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला जे देता येते ते आपण आनंदाने देतो तेव्हा त्याला संतोष होतो याचा आपल्याला भरवसा आहे!—२ करिंथकर ८:१२; ९:७.
देण्याचा आत्मा प्रदर्शित केल्यामुळे आशीर्वाद मिळतात
आपल्या आधीच्या उदाहरणाचा पुनर्विचार करण्याकरता, कल्पना करा, की एलीयाला एका वेळेच्या भोजनाची असलेली गरज कोणीतरी दुसरे पूर्ण करील असा जर सारफथच्या त्या विधवेने तर्क केला असता. मग केवढा महान आशीर्वाद तिने चुकवला असता!
देण्याचा आत्मा प्रदर्शित करणाऱ्यांना यहोवा आशीर्वाद देतो यात प्रश्नच नाही. (नीतिसूत्रे ११:२५) सारफथच्या विधवेला तिला वाटणारे तिचे शेवटले भोजन दिल्याने काही सहन करावे लागले नाही. यहोवाने तिला चमत्काराद्वारे प्रतिफळ दिले. एलीयाने वचन दिल्याप्रमाणे अवर्षण टळेपर्यंत तिचे पिठाचे मडके रिकामे झाले नव्हते व तेलाची कुपी आटली नव्हती. पण याहूनही मोठे प्रतिफळ तिला मिळाले. तिचा मुलगा आजारी पडून मरण पावला तेव्हा खऱ्या देवाचा मनुष्य, एलीया, याने त्याला पुन्हा जिवंत केले. यामुळे तिची आध्यात्मिकता केवढी वाढली असावी!—१ राजे १७:१६-२४.
आज चमत्कारांद्वारे आशीर्वाद मिळण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही. (१ करिंथकर १३:८) पण, यहोवा आपली सेवा मनापासून करणाऱ्यांना टिकवून ठेवील याची तो आपल्याला खात्री देतो. (मत्तय ६:३३) यास्तव, या बाबतीत आपण सारफथच्या त्या विधवेसारखे होऊ शकतो, यहोवा आपली काळजी घेईल या भरवशाने औदार्याने देऊ शकतो. यासोबतच आपण मोठ्या आध्यात्मिक प्रतिफळांचा उपभोग घेऊ शकतो. आपले देणे तुरळक, तात्कालिक स्फूर्तीने असण्यापेक्षा नियमित नित्यक्रमाचा एक भाग असल्यास येशूने शिफारस केल्याप्रमाणे ते आपल्याला आपली नजर साधी ठेवण्यास व राज्य आस्थेवर ठेवण्यास मदत करील. (लूक ११:३४; पडताळा १ करिंथकर १६:१, २.) शिवाय, आपण यहोवाचे आणि येशूचे सहकर्मी म्हणून त्यांच्या जवळ असल्यासारखे आपल्याला वाटण्यास ते आपली मदत करील. (१ करिंथकर ३:९) यामुळे संपूर्ण विश्वभरात यहोवाच्या उपासकांना आधीच चिन्हांकित करणारा उदारतेचा आत्मा म्हणजेच देण्याचा आत्मा यात आणखी वाढ होईल.
[३१ पानांवरील चौकट]
काही जण निवडतात असे देण्याचे विविध मार्ग
जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या
अनेक जण, “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या—मत्तय २४:१४” हे लेबल असलेल्या दान पेटीत टाकण्यासाठी आधीच पैसे जमा करतात किंवा किती टाकणार याचा अंदाज लावतात. मंडळ्या प्रत्येक महिन्याला ही रक्कम वॉच टावर संस्थेच्या ब्रुकलिन न्यूयॉर्क मधील मुख्यालयास अथवा स्थानिक शाखा कार्यालयास पाठवतात.
स्वेच्छेने दिलेल्या पैशाच्या देणग्या, थेटपणे Watch Tower Bible and Tract Society of India, H-58 Old Khandala Road, Lonavla, 410 401, Mah., या पत्त्यावर किंवा तुमच्या राष्ट्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयासही पाठवल्या जाऊ शकतात. दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची देखील देणगी दिली जाऊ शकते. या वर्गण्या थेट दान आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्र देखील यासोबत पाठवावे.
सशर्त-देणगी योजना
देणगी देणाऱ्याच्या मृत्यूपर्यंत, वॉच टावर संस्थेकडे पैसे सुपूर्त केले जाऊ शकतात; वैयक्तिक गरज भासल्यास देणगी देणाऱ्याला हे पैसे परत केले जाऊ शकतील अशी देखील योजना आहे. अधिक माहितीकरता, कृपया वर दिलेल्या संस्थेच्या पत्त्यावर संपर्क साधा.
योजनापूर्वक देणे
रोख पैशाचे दान व पैशाच्या सशर्त देणग्या यांसोबत जगव्याप्त राज्य सेवेच्या लाभासाठी देण्याचे इतर आणखी मार्ग आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
विमा: वॉच टावर संस्थेला, आयुर्विमा पत्राचा उपभोग घेणारी किंवा सेवानिवृत्ती/निवृत्तीवेतन योजना असे नाव दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही धोरणांबद्दल संस्थेला कळवावे.
बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाणपत्र किंवा वैयक्तिकाचे सेवानिवृत्ती खाते, स्थानिक बँकेच्या अपेक्षांनुसार, वॉच टावर संस्थेच्या विश्वस्तासाठी किंवा संस्थेला मृत्यूनंतरचे देय म्हणून दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही योजनेबद्दल संस्थेला कळवावे.
शेअर भाग आणि बंधपत्रे: वॉच टावर संस्थेला शेअर भाग आणि बंधपत्रे, थेट दानाकरवी किंवा दात्याला त्याची प्राप्ती सतत मिळेल अशा योजनेकरवी दिली जाऊ शकतात.
स्थावर संपत्ती: वॉच टावर संस्थेला विक्रीयोग्य स्थावर संपत्ती, थेट दानाकरवी किंवा दाता त्याच्या किंवा तिच्या जीवनभर त्यावर जगू शकतो, अशी जीवन संपत्ती राखून ठेवण्याद्वारे दिली जाऊ शकते. स्थावर संपत्तीचा लेखी करार करण्याआधी, त्या व्यक्तीने संस्थेशी संपर्क साधला पाहिजे.
मृत्यूपत्रे आणि ठेवी: मालमत्ता किंवा पैसा कायद्याने निष्पादन केलेल्या मृत्युपत्राद्वारे वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीला दिला जाऊ शकतो, किंवा संस्थेला उपभोग घेणारी ठेव करार हे नाव देण्याद्वारे दिला जाऊ शकतो. धार्मिक संस्थेचा लाभ करत असलेली ठेव, विशिष्ट कराचे फायदे देऊ शकते. मृत्युपत्र किंवा ठेव कराराची एक प्रत संस्थेला पाठवली पाहिजे.
या योजनापूर्वक देण्याच्या व्यवस्थांमध्ये इच्छुक असलेल्यांनी वर दिलेल्या संस्थेच्या पत्त्यावर किंवा तुमच्या राष्ट्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या व्यवस्थांपैकी कोणत्याही व्यवस्थेशी संबंधित असलेल्या प्रस्तुत दस्तऐवजाची एक प्रत संस्थेला मिळाली पाहिजे.