रब्बी म्हणविण्यास कोण पात्र आहे?
रहदारीच्या गर्दीबद्दल शासंक नसणाऱ्या पर्यटकास वेळेवर विमानतळावर पोचण्याची शक्यता कमी होती. शेकडो पोलिसांनी जेरुसलेमच्या रस्त्यावरील ३,००,००० पेक्षा अधिक शोक करणाऱ्या लोकांचे संरक्षण तसेच वाहतुकीचे मार्गदर्शन यांसाठी प्रयत्न केले. द जेरुसलेम टपाल (इंग्रजी) ने यास “अशी विस्तृत अंतयात्रा म्हटले जी सामान्यपणे राष्ट्रपती, राजे किंवा सत्ताधारी हुकुमशहांसाठी राखून ठेवलेली असते.” जिच्यामुळे इस्राएलच्या राजधानीत इतकी स्तब्धता घडली त्या अशा भक्तीच्या प्रदर्शनाकरता कोण जबाबदार होते? एक आदरणीय रब्बी. रब्बीचा हुद्दा यहुद्यांमध्ये अशा प्रकारच्या आदराची आणि भक्तीची अपेक्षा का करतो? पहिल्यांदा “रब्बी” हा हुद्दा केव्हा वापरण्यात आला? तो कोणास उचितपणे लागू होतो?
मोशे रब्बी होता का?
मोशे, हे नाव यहुदी धर्मामध्ये सर्वात आदरणीय आहे, जो इस्राएलच्या नियमशास्त्राच्या कराराचा मध्यस्थ होता. धार्मिक यहुदी त्यास “मोशे ‘आमचा रब्बी’” असे म्हणतात. तथापि, बायबलमध्ये कोठेही मोशेला “रब्बी” या पदवीद्वारे संबोधण्यात आलेले नाही. वस्तुतः, “रब्बी” ही संज्ञा इब्री शास्त्रवचनांमध्ये कोठेही आढळत नाही. तर मग, यहुदी लोकांनी मोशेला असे म्हणण्यास कशी सुरवात केली?
इब्री शास्त्रवचनांनुसार, अहरोनाचे वंशज, लेवीय वर्गातील याजकांना नियमशास्त्र शिकविण्याची आणि समजावून सांगण्याची जबाबदारी आणि अधिकार दिला होता. (लेवीय १०:८-११; अनुवाद २४:८; मलाखी २:७) तथापि, सा. यु. पू. दुसऱ्या शतकात, यहुदी धर्मामध्ये सूक्ष्म क्रांती होण्यास सुरवात झाली ज्याचा त्या समयापासून या बाबतीत असणाऱ्या यहुदी विचारसरणीवर चिरस्थायी परिणाम झाला.
या आध्यात्मिक बदलाच्या संबंधाने, डॅनिएल जरेमी सिल्वर यहुदी धर्माचा इतिहास (इंग्रजी) मध्ये लिहितात: “[त्या] वेळी याजक नसलेल्या शास्त्र्यांचा आणि विद्वानांचा एक वर्ग तोराह [मोशेचे नियमशास्त्र] उलगडून सांगण्याच्या याजकीय अधिकाराच्या कायदेशीरपणास आव्हान देऊ लागला. मंदिरातील कार्यकर्ते या नात्याने याजकांची आवश्यकता आहे, या विषयावर सर्वजण सहमत होते; परंतु त्यांचे मतप्रतिपादन अखेरचे मानण्याची काय जरूरी होती?” याजकीय अधिकाराबद्दल अशा आव्हानास खतपाणी घालणारे लोक कोण होते? यहुदी धर्मामध्ये एक नवीन गट होता त्यास परुशी असे संबोधण्यात येत असे. सिल्वर पुढे म्हणतात: “परुश्यांनी आपल्या अकादमींतील प्रवेश जन्मावर [याजकीय वंश] नव्हे, तर पात्रतेवर ठरवला आणि धार्मिक नेतृत्वामध्ये यहुद्यांचा एक नवीन वर्ग आणला.”
सामान्य युग पहिल्या शतकापर्यंत, या परुशी अकादमींमध्ये पदवीधर होणाऱ्या लोकांना यहुदी कायद्याचे शिक्षक किंवा गुरू या नावाने ओळखण्यात येऊ लागले. त्यांना आदर देण्याच्या दृष्टीने इतर यहुद्यांनी त्यांचा उल्लेख “माझे शिक्षक” किंवा “माझे गुरू,” इब्रीमध्ये रब्बी, असे म्हणून करण्यास सुरवात केली.
यहुदी इतिहासात ज्याला सर्वथोर शिक्षक मानण्यात येत होते त्या मोशेला ही पदवी लागू करण्याशिवाय त्या नव्या पदवीला इतर कशानेही कायदेशीरपणा प्राप्त होऊ शकत नव्हता. याचा परिणाम याजकत्वाच्या महत्त्वास आणखी कमीपणा, पण लोकांच्या विचारधारेत परुश्यांची प्रतिमा अधिक प्रभावी करण्यामध्ये होणार होता. अशा प्रकारे मोशेच्या मृत्यूनंतर १,५०० पेक्षा अधिक वर्षांनी त्याला कायदेशीरपणे “रब्बी” असे संबोधण्यात आले.
गुरूचे अनुकरण करणे
“रब्बी” (“माझा गुरू”) या अभिव्यक्तीचा काही वेळा लोकांद्वारे ते आदर देत असलेल्या दुसऱ्या शिक्षकांचा उल्लेख करण्यासाठी उपयोग केला जात होता, तरी ही संज्ञा सामान्यपणे परुश्यांमध्ये अर्थात “ज्ञानी” लोकांमधील शिक्षकांना लागू केली जात होती. सा. यु. ७० मध्ये मंदिराचा नाश झाल्याबरोबरच तर याजकत्वाचा अधिकार संपुष्टात आला आणि परुशी रब्बी यहुदी धर्माचे बिनविरोध नेते बनले. त्यांच्या विनाप्रतिस्पर्धी हुद्द्याद्वारे रब्बी ज्ञानी लोकांवर केंद्रित असणाऱ्या पंथाच्या विकासास उत्तेजन दिले गेले.
सामान्य युग पहिल्या शतकाच्या या पारंपारिक काळाची चर्चा करताना, प्रोफेसर डोव ज्लोटनीक टिपणी करतात: “‘ज्ञानी लोकांच्या दिम्मतीला राहणे’ तोराहचा अभ्यास करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे झाले.” यहुदी विद्वान जेकब नोससनर पुढे सांगतात: “‘ज्ञानी लोकांचा शिष्य’ असा विद्यार्थी आहे ज्याने स्वतःचा संबंध रब्बी लोकांसोबत जोडला आहे. त्यास ‘तोराह’ शिकायचे असल्यामुळे तो असे करतो. . . . तोराह नियमशास्त्रानुसार शिकविला जात नाही, तर ज्ञानी लोकांचे हावभाव व कार्ये यांतून उतरलेल्या नियमाला पाहून शिकता येते. ते सांगण्याद्वारेच नव्हे तर आपल्या कार्याद्वारे देखील नियमशास्त्र शिकवत होते.”
तालमूद विद्वान एडीन स्टाईनसॉल्टस् याची पुष्टी देतात आणि लिहितात: “ज्ञानी लोकांनी स्वतःस म्हटले, ‘ज्ञानी लोकांचे सामान्यपणे संभाषण, विनोद किंवा अनौपचारिक विधानांचा अभ्यास करायचा असतो.’” हे कितपत लागू होऊ शकत होते? स्टाईनसॉल्टस् लिहितात: “याचे एक अतिशयोक्तीचे उदाहरण एका शिष्याचे आहे ज्याच्याविषयी सांगण्यात आले आहे, की त्याने आपल्या महान शिक्षकाच्या पलंगाखाली स्वतःस लपविले जेणेकरून त्याला हे समजावे, की तो आपल्या पत्नीसोबत कसा व्यवहार करतो. त्याच्या उत्सुकतेविषयी त्याला विचारण्यात आल्यानंतर त्या तरुण शिष्याने उत्तर दिले: ‘हे तोराह आहे आणि अभ्यासाकरिता उचित आहे,’ अशी पद्धत रब्बी आणि विद्यार्थी दोघांद्वारे उचित मानून स्वीकारली जात असे.”
तोराह—रब्बीद्वारे तोराह शिकणे—याऐवजी रब्बीवर अधिक जोर आल्यामुळे सा. यु. पहिल्या शतकापासून यहुदी धर्म रब्बी-मार्गदर्शित धर्म बनला. एखादा मनुष्य देवाच्या जवळ प्रेरित लिखित वचनाद्वारे येत नाही, तर व्यक्तिगत आदर्श, एक गुरू, रब्बी यांद्वारे येतो. अशा प्रकारे, साहजिकच महत्त्व प्रेरित शास्त्रास न मिळता, रब्बींच्या तोंडचे नियमशास्त्र आणि रितीरिवाजास मिळाले. तेव्हापासून, तालमूदसारखे यहुदी साहित्य देवाकडील जाहीर निवेदनांपेक्षा रब्बींच्या चर्चा, गोष्टी आणि व्यवहार या बाबींवर केंद्रित झाले.
युगाच्या काळातील रब्बी
ते अधिकांश अधिकार आणि प्रभावाचा उपयोग करीत होते तरी देखील आरंभीच्या रब्बींनी आपल्या धार्मिक कार्याद्वारे स्वतःचा उदरनिर्वाह चालवला नाही. एन्सायक्लोपीडिया जुडायका (इंग्रजी) म्हणतो: “तालमूदचा रब्बी . . . सध्याच्या काळातील ही पदवी प्राप्त केलेल्या लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. तालमूदचा रब्बी बायबल आणि तोंडी नियमशास्त्राचे एक दुभाषी आणि व्याख्याता होता तसेच त्याच्याकडे किंबहुना नेहमी असे काम होते ज्यावर तो स्वतःचा उदरनिर्वाह चालू शकत होता. परंतु, मध्य युगातच . . . यहुदी मंडळी किंवा संप्रदायाचे शिक्षक, प्रचारक आणि आध्यात्मिक मस्तक झाले.”
रब्बींनी आपल्या हुद्द्यास वेतनी पेशा बनविण्यास सुरवात केली तेव्हा काही लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड सोडली. मैमोनाईड्स, १२ व्या शतकातील एक सर्वज्ञात रब्बी, वैद्य म्हणून स्वतःचा चरितार्थ चालवत होता, त्याने अशा रब्बींची मोठ्या प्रमाणात टीका केली. “[त्यांनी] स्वतःकरिता व्यक्ती आणि संप्रदाय यांपासून आर्थिक गोष्टी निर्धारित केल्या आणि ज्ञानी व विद्वान लोक तसेच तोराहचा अभ्यास करणाऱ्या लोकांची [आर्थिकरित्या] मदत करणे बांधिलकी आणि योग्य आहे, असे लोकांना वाटायला लागून त्यांना मूर्खात काढले. अशा प्रकारे त्यांचा तोराह त्यांचा पेशा झाला. परंतु हे सर्व चुकीचे होते. या गोष्टीस समर्थन देईल, असा एकही शब्द तोराह किंवा ज्ञानी लोकांच्या व्यक्तव्यांमध्ये नाही.” (मिशनावरील समालोचन, इंग्रजी, एवॉट ४:५) परंतु मैमोनाईड्स याने केलेल्या आरोपाकडे रब्बींच्या नंतरच्या पिढ्यांद्वारे कानाडोळा करण्यात आला.
यहुदी धर्माने आधुनिक युगात प्रवेश केला, तशी ही सुधारणा पुराणमतवादी आणि परंपरावादी विश्वास पक्षगटांत विभागली गेली. अनेक यहुद्यांकरिता धार्मिक विश्वास आणि परंपरा इतर चिंतेच्या बाबींची तुलना करता दुय्यम झाल्या. परिणामी रब्बीचा हुद्दा प्रभावहीन झाला. पण रब्बी, प्रामुख्याने, मंडळीकरिता नियुक्त मस्तक झाले आणि आपल्या समूहातील सदस्यांसाठी वेतनी, पेशेवर शिक्षक आणि सल्लागार म्हणून काम पाहू लागले. परंतु अतिशय परंपरावादी हेसाइडिक समूहामध्ये गुरू आणि आदर्श म्हणून रब्बीची कल्पना आणखी विकसित झाली.
हेसाइडिक हबॉड-लुबाविच चळवळीबद्दल आपल्या पुस्तकात एडवर्ड हॉफमैन यांच्या टिपणीकडे लक्ष द्या: “आरंभीच्या हेसाइडिमने सुद्धा या गोष्टीवर जोर दिला, की प्रत्येक पिढीमध्ये एक असा यहुदी नेता, एक जड्डिक [एक धार्मिक मनुष्य] असतो जो आपल्या काळातील मोशे असतो, त्याची विद्वत्ता आणि उपासना अतुलनीय आहे. त्याच्या विस्मयकारी धर्मशीलतेद्वारे हेसाइडिमच्या प्रत्येक समूहास याचा अनुभव आला, की त्यांचा रब्बी [यीड्डिशमध्ये “रब्बी”] सर्वशक्तिमानाच्या हुकुमनाम्यांस देखील प्रभावित करू शकतो. त्याच्या प्रकटीकरणाबद्दलच्या भाषणांद्वारे त्यास केवळ एक आदर्श म्हणून पूज्य मानले जात नव्हते, तर मानवतेस उन्नत करणारी आणि ईश्वरी मार्गाकडे मार्मिक संकेत करणारी त्याची जीवनशैली सुद्धा (‘तो आपल्या बुटांचे बंद कसे बांधतो,’ जसे अभिव्यक्त करण्यात आले होते) यांकडेही पाहण्यात आले.”
‘तुम्ही आपणांस रब्बी म्हणवून घेऊ नका’
येशू, पहिल्या शतकातील यहुदी ज्याने ख्रिस्तीत्वाची सुरवात केली होती, एका अशा काळात जगला जेव्हा रब्बीच्या परुशी कल्पनेने यहुदी धर्मावर प्रस्थ गाजविण्यास नुकतीच सुरवात केली होती. तो परुशी नव्हता आणि त्याने त्यांच्या अकादमींमध्ये शिक्षण देखील घेतले नव्हते, तरी देखील त्यालाही रब्बी संबोधण्यात आले.—मार्क ९:५; योहान १:३८; ३:२.
यहुदी धर्माच्या रब्बी प्रवृत्तीस उघडपणे दोष देताना येशूने म्हटले: “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत; जेवणावळींतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानांतील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी [“रब्बी”, NW] म्हणवून घेणे त्यांस आवडते. तुम्ही तरी आपणांस गुरुजी [रब्बी] म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा.”—मत्तय २३:२, ६-८.
येशूने यहुदी धर्मामध्ये विकसित होणाऱ्या पाळक-अयाजकीय वर्गाच्या वेगळेपणाविरुद्ध इशारा दिला. मनुष्यांस अशा प्रकारचे अयोग्य प्राधान्य देण्याबद्दल येशूने निंदा केली. “तुमचा गुरु एक आहे,” त्याने धैर्याने घोषित केले. हा एक गुरू कोण होता?
मोशे, “परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा” होता आणि त्यास स्वतः ज्ञानी लोकांनी ‘आमचा रब्बी’ असे म्हटले; तरी तो एक अपरिपूर्ण मनुष्य होता. त्याने देखील चुका केल्या. (अनुवाद ३२:४८-५१; ३४:१०; उपदेशक ७:२०) मोशे हा अखेरचे उदाहरण असे म्हणून जोर देण्याऐवजी, यहोवाने त्यास म्हटले: “मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदांतून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन; त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकावयाचा नाही त्याला मी जाब विचारीन.”—अनुवाद १८:१८, १९.
बायबलच्या भविष्यवाण्या शाबीत करतात, की या शब्दांची पूर्णता येशू अर्थात मशीहामध्ये होते.a येशू मात्र मोशे’प्रमाणे’ नव्हता, तर त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ होता. (इब्री लोकांस ३:१-३) शास्त्रवचन प्रकट करते, की येशू परिपूर्ण पुरुष म्हणून जन्माला आला होता आणि त्याने देवाची “निष्पाप” सेवा केली; तो याबाबतीत मोशेसारखा नव्हता.—इब्री लोकांस ४:१५.
आदर्शाचे अनुकरण करा
रब्बीच्या प्रत्येक कार्य आणि वक्तव्याच्या सूक्ष्म अभ्यासाने यहुद्यांना देवाच्या नजीक आणले नाही. कदाचित एखादा इसम प्रामाणिकपणाचे एक उदाहरण असेल, परंतु आपण त्याच्या प्रत्येक कार्याचा अभ्यास आणि अनुसरण केल्यास, आपण त्याच्या चुका आणि अपरिपूर्णतांसोबत त्याच्या चांगल्या गुणांचेही अनुसरण करू. आपण निर्माणकर्त्याऐवजी निर्माण केलेल्या मनुष्याला अवाजवी महिमा देऊ.—रोमकर १:२५.
परंतु यहोवाने मानवजातीकरता एक आदर्श दिला आहे. शास्त्रवचनानुसार, येशू मानव म्हणून जन्माला येण्यापूर्वीच अस्तित्वात होता. खरे तर, “तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे,” असे त्याच्याविषयी म्हटले जाते. (कलस्सैकर १:१५) देवाचा “कुशल कारागीर” या नात्याने अगणित सहस्राब्दीपर्यंत स्वर्गात सेवा केल्यामुळे, यहोवाला ओळखण्यात आपल्याला मदत करण्यासाठी येशू सर्वोत्तम स्थितीत आहे.—नीतिसूत्रे ८:२२-३०; योहान १४:९, १०.
यामुळे पेत्र लिहू शकला: “ख्रिस्तानेहि तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊन ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना “विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत” राहण्याचे उत्तेजन दिले. त्याने हे देखील सांगितले, की “ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.” (इब्री लोकांस १२:२; कलस्सैकर २:३) इतर कोणतीही व्यक्ती—मोशे किंवा कोणताही रब्बी—अशा अवधानास योग्य नाही. केवळ येशूचे लक्षपूर्वक अनुसरण करावयाचे आहे. देवाच्या लोकांना रब्बीसारख्या पदवीची विशेषतः या आधुनिक दिवसांना लक्षात ठेवता, काहीएक आवश्यकता नाही. परंतु रब्बी म्हणण्यास कोणी पात्र होता, तर तो होता येशू.
[तळटीपा]
a येशूच अभिवचनयुक्त मशीहा आहे, याच्या पुराव्यासाठी अधिक माहितीकरता वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित माहितीपत्रक युद्धरहित जग कधी असेल का? (इंग्रजी) पृष्ठे २४-३० पाहा.