माजी न्यायाधीश माफी मागतात—४५ वर्षांनंतर
बर्लिनमधील एका न्यायालयात, ऑगस्ट १९९५ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाने एका यहोवाच्या साक्षीदाराला ४५ वर्षांआधी केलेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला.
ऑक्टोबर १९५० मध्ये, जर्मन डेमॉक्रॅटिक रिपब्लिकने (जीडीआर) नऊ यहोवाच्या साक्षीदारांवर राज्यविद्रोही आंदोलन व हेरगिरी करणारे असा दोषारोप लावला. दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर सात जणांना—ज्यामध्ये २२ वर्षीय लॉथर हॉर्निग, चित्रातील उजवीकडून चौथा प्रतिवादी, याचा देखील समावेश होता—दीर्घ कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
चाळीस वर्षांनंतर जीडीआर, फेडेरल रिपब्लिक ऑफ जर्मनी याचा एक भाग बनले. तेव्हापासून सरकारने माजी जीडीआरने केलेल्या अन्यायांची बारीक तपासणी करण्यास सुरवात केली आहे व जबाबदार लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एक असा अन्याय, १९५० मधील साक्षीदारांची सर्वोच्च न्यायालयीन चौकशी, हा होता.
नऊ साक्षीदारांना चौकशीसाठी आणण्यात आले तेव्हा, आता ८० वर्षांचे ए. टी., हे तीन न्यायाधीशांपैकी एक होते ज्यांनी न्याय दिला होता. न्यायाचा विपर्यास करण्याच्या आरोपाखाली आता ते, बर्लिनमधील प्रादेशिक न्यायालयात त्यांच्या अधिनिर्णयाचे स्पष्टीकरण देण्यासाठी हजर होते.
न्यायालयात सांगताना, या माजी न्यायाधीशाने कबूल केले, की त्यांनी ४५ वर्षांआधी, कमी कडक शिक्षा देण्याचा विचार केला असला तरी एका दोषी संनिश्चयाला आपले मत दिले होते. परंतु त्या प्रकरणाने त्यांना पुन्हा एकदा विचार करावयास लावले होते. का बरे? दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान हिटलरला आपला पाठिंबा देण्यास यहोवाच्या साक्षीदारांनी नकार दिल्यामुळे नात्सी त्यांचा छळ करीत होते. युद्धानंतर साक्षीदारांचा पुन्हा एकदा छळ करण्यात आला, आणि या वेळेला तो कम्युनिस्ट राजवटीकडून होता. यामुळे न्यायाधीश “अतिशय अस्वस्थ” झाले.
लॉथर हॉर्निगने न्यायालयास सांगितले, की त्याने साडेपाच वर्षे एकांतपरिरोधात घालवले व १९५९ पर्यंत ब्रॅडनबर्ग तुरूंगातून त्याची सुटका करण्यात आली नव्हती. हॉर्निगचे हे विधान ऐकल्यावर या माजी न्यायाधीशांना आपले अश्रू अनावर झाले. “मला कृपया क्षमा करा, मला खरोखरच त्याचे वाईट वाटते,” असे हुंदके देत ते म्हणाले. हॉर्निगने त्यांची याचना स्वीकारली.—पडताळा लूक २३:३४.