मौखिक नियमशास्त्र—लेखी स्वरूपात का मांडावे लागले?
पहिल्या शतकातील अनेक यहुद्यांनी येशूला मशीहा म्हणून का स्वीकारले नाही? या गोष्टीचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने असे म्हटले: “नंतर तो [येशू] मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडील जन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” (मत्तय २१:२३) त्यांच्या मते, सर्वशक्तिमानाने यहुदी राष्ट्राला तोराह (नियमशास्त्र) दिला आणि या नियमशास्त्रानुसार देवाने काही लोकांना अधिकार बहाल केला होता. अशाप्रकारचा अधिकार येशूला होता का?
येशूला तोराहविषयी आणि त्यामुळे खरा अधिकार प्राप्त झालेल्या लोकांविषयी नितान्त आदर होता. (मत्तय ५:१७-२०; लूक ५:१४; १७:१४) पण देवाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर त्याने वारंवार दोषारोप लावला. (मत्तय १५:३-९; २३:२-२८) या लोकांनी मौखिक नियम म्हटल्या गेलेल्या परंपरा अनुसरल्या. अशा अधिकारास येशूने मान्य केले नाही. परिणामी अनेक लोकांनी त्याला मशीहा म्हणून स्वीकारले नाही. त्यांना असे वाटत होते, की त्यांच्या पुढाऱ्यांच्या त्या परंपरांचे समर्थन करणाऱ्या लोकांनाच देवाचा अधिकार मिळू शकत होता.
या मौखिम नियमाची सुरवात कोठून झाली? हा मौखिक नियम आणि शास्त्रवचनांतील लिखित नियमशास्त्र समान अधिकाराचे आहेत असे यहुदी लोक कसे मानू लागले? आणि हा मौखिक नियम केवळ एक मौखिक परंपरा होती, तर मग या नियमास लिखित स्वरूपात का मांडण्यात आले?
या परंपरांची सुरवात कोठून झाली?
सा.यु.पू. १५१३ मध्ये सियोन पर्वतावर यहोवाने इस्राएलच्या लोकांसोबत करार केला. त्यांना मोशेद्वारे कराराचे नियम देण्यात आले. (निर्गम २४:३) या नियमांचे पालन करण्याद्वारे ‘यहोवा देवाप्रमाणे आपणही पवित्र आहोत,’ हे त्यांना शाबीत करता येत होते. (लेवीय ११:४४) या नियमशास्त्राच्या करारानुसार, यहोवाच्या उपासनेत नेमलेल्या याजकवर्गाद्वारे अर्पण सादर करावे लागत असे. उपासना करण्यासाठी त्यांना एका केंद्रस्थानाची गरज होती आणि कालांतराने जेरुसलेमचे मंदिर ते केंद्रस्थान बनले.—अनुवाद १२:५-७; २ इतिहास ६:४-६.
मोशेच्या नियमशास्त्राने, राष्ट्र या नात्याने इस्राएलने यहोवाची उपासना कशी करावी याची एकंदर रूपरेषा दिली होती. पण काही सविस्तर गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नव्हता. उदाहरणार्थ, शब्बाथ दिवशी काम करण्यास नियमशास्त्राने मनाई केली असली, तरी काम आणि इतर लहानमोठी कामे यांतील भेद मात्र स्पष्ट करण्यात आला नव्हता.—निर्गम २०:१०.
यहोवाला असे करणे योग्य वाटले असते, तर त्याने मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाकरता सविस्तर नियमावली दिली असती. पण त्याने मनुष्याला सदसद्विवेकबुद्धीने बनवले आहे आणि त्याच्या या नियमांच्या चौकटीत थोडीफार सूट देऊन त्यांना स्वतः होऊन त्याची सेवा करू दिली. याजक, लेवीय आणि शास्ते यांनी न्यायदानाची प्रकरणे सांभाळण्याची तरतूदही नियमशास्त्रात करण्यात आली होती. (अनुवाद १७:८-११) ही प्रकरणे वाढत गेल्यावर ती हाताळण्यासाठी ठराविक पद्धत तयार करण्यात आली आणि यांपैकी काही पद्धती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत आल्या. यहोवाच्या मंदिरात याजकाच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात हे देखील वडिलांकडून त्यांच्या मुलांना सांगण्यात आले. इस्राएल राष्ट्र जितक्या काळापर्यंत अस्तित्वात होते तितक्याच प्रमाणात त्यांच्या परंपरांमध्येही वाढ होत गेली.
पण इस्राएलच्या उपासनेत मोशेला देण्यात आलेले लिखित नियमशास्त्रच अत्यावश्यक होते. निर्गम २४:३, ४ म्हणते: “मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले, तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्याप्रमाणे आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढिली.” (तिरपे वळण आमचे.) याच लिखित आज्ञांच्या एकवाक्यतेत देवाने इस्राएल लोकांसोबत करार केला. (निर्गम ३४:२७) खरे तर, मौखिक नियमाच्या अस्तित्वाविषयी शास्त्रवचनांमध्ये कोठेही वाचायला मिळत नाही.
“तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?”
मोशेच्या नियमशास्त्रात हे स्पष्ट केले आहे, की धार्मिक अधिकार चालवण्याचा आणि मार्गदर्शन देण्याचा विशेषतः याजकांना, अहरोनाच्या वंशजांना सांगण्यात आले होते. (लेवीय १०:८-११; अनुवाद २४:८; २ इतिहास २६:१६-२०; मलाखी २:७) पण जसजशी शतके उलटली तसतसे याजकांपैकी काही जण अविश्वासू आणि भ्रष्ट झाले. (१ शमुवेल २:१२-१७, २२-२९; यिर्मया ५:३१; मलाखी २:८, ९) ग्रीक अंमलाखाली अनेक याजकांनी धार्मिक गोष्टींमध्ये तडजोड केली. सा.यु.पू. दुसऱ्या शतकात, याजकपदावर अविश्वास दाखवणारा यहुदी धर्मातील एक नवीन गट असलेल्या परुशांनी नवीन परंपरा लोकांसमोर मांडण्यास सुरवात केली ज्यांमुळे सामान्य माणूसही याजकाप्रमाणे स्वतःला पवित्र समजू शकत होता. या परंपरा अनेक लोकांना पसंतही पडल्या, पण नियमशास्त्रात जोडलेल्या या परंपरा स्वीकार्य नव्हत्या.—अनुवाद ४:२; १२:३२ (यहुदी आवृत्तींमधील ३१:१).
यामुळे परुशी नियमशास्त्राचे नवे पंडित बनले आणि त्यांच्या मते याजक करत नसलेली कामे ते करू लागले. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये त्यांना अधिकार देण्यात आला नसल्यामुळे गुढार्थ देणाऱ्या गोष्टींद्वारे आणि स्वतःच्या दृष्टिकोनांचे समर्थन करणाऱ्या इतर नवीन पद्धती शोधण्याद्वारे ते शास्त्रवचनाचे स्पष्टीकरण करू लागले.a या परंपरांचे प्रमुख रखवालदार आणि पुरस्कर्ते या नात्याने त्यांनी इस्राएलमध्ये अधिकाराचा नवीन पाया घातला. सा.यु. पहिल्या शतकापर्यंत यहुदी धर्मामध्ये परुशांचा वरचष्मा झाला होता.
तेव्हाच्या मौखिक परंपरा गोळा करताना आणि स्वतःचे मत मांडण्यासाठी शास्त्रवचनांमध्ये शोधाशोध करताना परुशांना त्यांच्या कामाला अधिकारवाणीची गरज आहे हे लक्षात आले. या परंपरांच्या उगमाविषयी नवीन संकल्पना अस्तित्वात आली. रब्बींनी असे शिकवण्यास सुरवात केली: “मोशेला तोराह सियोन येथे मिळाला आणि त्याने तो यहोशवाला दिला, यहोशवाने वडिलांना आणि वडिलांनी संदेष्ट्यांना. आणि संदेष्ट्यांनी तो महासभेतील लोकांना दिला.”—एवॉट १:१, मिशना.
“मोशेला तोराह मिळाला,” असे म्हणण्याद्वारे रब्बी केवळ लिखित नियमांचाच नव्हे, तर त्यांच्या मौखिक परंपरांचाही उल्लेख करत होते. लोकांनी शोधून काढलेल्या आणि बनवलेल्या या परंपरा देवाने मोशेला सियोन येथे दिल्या, असा ते दावा करत होते. ते लोकांना असे शिकवत होते, की तोराहमधील ‘रिकाम्या जागा भरण्यास’ देवाने लोकांना परवानगी दिलेली नव्हती, पण लिखित नियमशास्त्रामध्ये न सांगितलेल्या गोष्टी तोंडी सांगण्यात आल्या होत्या. त्यांच्या मते, मोशेने हे मौखिक नियम याजकांच्या नव्हे, तर इतर गुरूंच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले. परुशी स्वतःविषयी असा दावा करत होते, की या अधिकाराच्या “अखंड” साखळीचे ते स्वाभाविक वारसदार होते.
नियमशास्त्र धोक्यात—एक नवीन उपाय
येशूला स्वतः देवाने अधिकार दिला होता तरी त्याच्या अधिकारावर यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी शंका घेतली; त्याने मंदिराच्या नाशाविषयी भाकीत केले होते. (मत्तय २३:३७–२४:२) सा.यु. ७० मध्ये रोमी लोकांनी मंदिराचा नाश केल्यानंतर मोशेच्या नियमशास्त्रात उल्लेख केलेली अर्पणे आणि याजकीय सेवा पार पाडता येत नव्हत्या. येशूच्या खंडणी बलिदानावर देवाने नवीन करार केला होता. (लूक २२:२०) मोशेच्या नियमशास्त्राचा करार नाहीसा करण्यात आला होता.—इब्री लोकांस ८:७-१३.
या सर्व घटना येशू मशीहा असल्याचा पुरावा आहेत, असे समजण्याऐवजी परुशांनी दुसराच उपाय शोधून काढला. त्यांनी आधीच याजकपदाचा पुष्कळसा अधिकार बळकावला होता. आणि मंदिराच्या विनाशानंतर ते आणखी एक पाऊल पुढे गेले. जाबनेह येथील रब्बी अकादमी, पुनर्स्थापित सन्हेद्रिन अर्थात यहुदी न्यायसभेचे केंद्र बनले. जाबनेह येथील योहानान बेन झाकाय आणि गमालिएल दुसरा यांच्या नेतृत्त्वाखाली यहुदी धर्माची पूर्णपणे नवीन रचना करण्यात आली. मंदिरातील उपासनेचे काम याजकांकडून पार पाडले जात होते पण आता मात्र सभास्थानातील सेवा रब्बींच्याद्वारे पार पाडली जाऊ लागली. प्रायश्चित्ताच्या दिवशी अर्पणे सादर केली जात होती पण त्याऐवजी आता फक्त प्रार्थना केली जाऊ लागली. परुशांनी अशी कारणमीमांसा केली की, मोशेला सियोन पर्वतावर दिलेल्या मौखिक नियमात या गोष्टी आधीच सांगितल्या होत्या आणि तशी व्यवस्थाही आधीच करून ठेवण्यात आली होती.
रब्बी अकादमींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या प्रमुख आभ्यासक्रमात सखोल चर्चा, पाठांतर आणि मौखिक नियमांचे अवलंबन या गोष्टी गोवलेल्या होत्या. पूर्वी, मौखिक नियमाच्या पायाचा शास्त्रवचनीय स्पष्टीकरण अर्थात मिद्रश याशी संबंध होता. आता, वाढत चाललेल्या या परंपरा वेगळ्या पद्धतीने शिकवल्या आणि संघटित केल्या जाऊ लागल्या. प्रत्येक मौखिक नियमांतील प्रत्येक नियम संक्षिप्त आणि लयबद्ध रूपात मांडण्यात आले.
मौखिक नियमशास्त्र लिखित स्वरूपात का?
रब्बी अकादमींची मुबलकता आणि रब्बी नियमांत होणारी वाढ यांमुळे एक नवीन समस्या सामोरी आली. रब्बी पंडित एदिन स्टाईनसॉल्ट्झ असे म्हणतो: “प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची वेगळी पद्धत होती आणि मौखिक नियमांना त्याच्या स्वतःच्या हतोटीत शिकवत असे. . . . शिवाय एका शिक्षकाची शिकवण पुरेशी नाही, तर इतर पंडितांच्या शिकवणींशीही विद्यार्थ्याला परिचित व्हावे अशी अपेक्षा करण्यात येऊ लागली. . . . अशाप्रकारे विद्यार्थ्याला ‘ज्ञानाच्या विस्फोटामुळे’ खूपच साहित्य लक्षात ठेवावे लागत असे.” ज्ञानसागराच्या गोंधळात विद्यार्थ्याच्या स्मरणशक्तीवर ताण पडून वेडे होण्याची पाळी येत असे.
सा.यु. दुसऱ्या शतकात यहुद्यांनी बार कोखबा याच्या नेतृत्त्वाखाली रोमविरुद्ध बंड पुकारल्यामुळे रब्बी पंडितांचा खूप छळ झाला. बार कोखबा याला पाठिंबा दिलेल्या आकिबॉ या प्रमुख रब्बीला आणि इतर प्रमुख पंडितांना देखील ठार मारण्यात आले. या छळामुळे आपल्या मौखिक नियमाचे अस्तित्व धोक्यात येते की काय अशी भीती रब्बींच्या मनात निर्माण झाली. त्यांना असे वाटत होते, की त्यांच्या परंपरा गुरूंकडून शिष्यांना तोंडी सुपूर्द करणे हाच उत्तम मार्ग आहे, पण परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे ज्ञानी लोकांच्या शिकवणीचे विस्मरण होऊ नये व त्या जतन करून ठेवता याव्यात म्हणून संघटित संरचना करण्याचे जोरात प्रयत्न सूरू झाले.
त्यानंतर रोमसोबत बऱ्यापैकी शांती असताना दुसऱ्या शतकाच्या अखेरीस आणि तिसऱ्या शतकांच्या सुरवातीस हयात असलेल्या जूदा हा-नसी या प्रमुख रब्बीने अनेक पंडितांना एकत्र केले आणि मौखिक परंपरांचा पुष्कळसा भाग सुव्यवस्थितपणे लिहून काढला. त्याने या लिखाणाचे सहा विभाग केले आणि प्रत्येक विभागाचे एकूण ६३ लहान-लहान उपविभाग केले. आणि याच संग्रहाला पुढे मिशना म्हणून ओळखण्यात येऊ लागले. मौखिक नियमाचा पंडित इफ्राईम उरबॉख असे म्हणतो: “मिशनाइतकी मान्यता आणि अधिकार तोराहला वगळता इतर कोणत्याही पुस्तकाला मिळाला नव्हता.” मशीहाला नाकारण्यात आले होते, मंदिर उजाड झाले होते, पण मौखिक नियम मिशनाच्या लिखित स्वरूपात टिकवून ठेवण्यात आला म्हणून यहुदी धर्माचे नवे पर्व सुरू झाले.
[तळटीपा]
a शास्त्रवचनाचा अशाप्रकारे अर्थ सांगण्याच्या पद्धतीला मिद्रश म्हटले जाते.
[२६ पानांवरील चित्र]
अनेक यहुद्यांनी येशूच्या अधिकाराला का स्वीकारले नाही?