२४-३० ऑगस्ट, २०२६
गीत ६५ प्रगती करू या!
प्रचार सेवा गटाच्या व्यवस्थेमुळे कसा फायदा होऊ शकतो?
“मंडळीत आणि सरळ मनाच्या लोकांच्या बैठकीत मी [यहोवाचं] गुणगान करीन.”—स्तो. १११:१.
या लेखात:
प्रचार सेवा गटाच्या व्यवस्थेमुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो ते पाहा.
१-२. प्रचार सेवा गटाच्या व्यवस्थेबद्दल बऱ्याच जणांना काय वाटतं?
तुम्ही प्रचारक बनलात तो दिवस तुम्हाला आठवतो का? त्या दिवशी तुम्ही यहोवाची उपासना करणाऱ्या एका मोठ्या समुहाचा भाग बनलात. तुम्ही त्या दिवशी नक्कीच खूप आनंदी असाल! (स्तो. १४८:१, २, १२, १३) त्याच दिवशी तुम्ही एका छोट्या गटाचासुद्धा भाग बनलात; तो म्हणजे तुमचा प्रचार सेवा गट. प्रचार सेवा गटामुळे आपल्याला “संपूर्ण जगात” राज्याचा आनंदाचा संदेश सांगायचं काम पूर्ण करायला मदत होते.—मत्त. २४:१४.
२ प्रचार सेवा गटाच्या व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपली एक बहीण विनीa म्हणते: “ही किती प्रेमळ व्यवस्था आहे. यामुळे मला भाऊबहिणींकडून बरंच काही शिकता आलंय. मला प्रचाराचं आणि शिकवण्याचं कौशल्य वाढवता आलंय. यहोवाच्या सेवेत ध्येयं ठेवून ती गाठता आली आहेत. तसंच, चांगले मित्रही बनवता आले आहेत.” रिचर्ड नावाचा भाऊ म्हणतो: “प्रचार सेवा गटाचा पर्यवेक्षक म्हणून सेवा करणं माझ्यासाठी बहुमानच आहे. प्रचारक एका व्यक्तीला बाप्तिस्म्यापर्यंत पोहोचायला मदत करतो. पण एका गट पर्यवेक्षकाकडे त्या व्यक्तीला पुढेही यहोवाच्या सेवेत प्रगती करायला मदत करण्याची एक खास संधी असते.” आपली आणखी एक बहीण दीना म्हणते: “माझा प्रचाराचा गट माझ्यासाठी कुटुंबासारखाच आहे.”
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ गट पर्यवेक्षक आणि त्याच्या सहायकाची जबाबदारी काय आहे आणि ते त्यांच्या गटातल्या भाऊबहिणींना मदत कशी करतात याबद्दल आपण या लेखात सर्वात आधी पाहू या. त्यानंतर आपण पाहू, की आपण आपल्या प्रचाराच्या गटाला कशी मदत करू शकतो. मग शेवटी आपण पाहू, की या प्रेमळ व्यवस्थेमुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो.
गट पर्यवेक्षक आणि त्याचा सहायक
४. (क) गट पर्यवेक्षकाला कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात? (ख) गट पर्यवेक्षक त्याच्या गटातल्या भाऊबहिणींना कशी मदत करतो? (“गट पर्यवेक्षकासाठी मोलाचा सल्ला” ही चौकटसुद्धा पाहा.)
४ प्रचार सेवा गटातल्या भाऊबहिणींना यहोवाच्या सेवेत प्रगती करायला मदत करण्यासाठी वडीलवर्ग एका वडिलालाb नेमतात. त्यालाच गट पर्यवेक्षक असं म्हणतात. मग गट पर्यवेक्षक त्याच्या प्रचाराच्या गटाला कशी मदत करतो? पहिलं, तो गटातल्या प्रत्येक प्रचारकाकडे लक्ष देतो. (नीति. २७:२३) तो त्याच्या गटातल्या प्रत्येकाला चांगल्या प्रकारे ओळखतो, त्यांच्याशी नियमितपणे बोलतो आणि त्यांचं कसं चाललंय हेही तो जाणून घेतो. असं केल्यामुळे त्याला त्यांना प्रोत्साहन देता येतं, भावनिक आधार देता येतो आणि व्यावहारिक मदतही करता येते. (नीति. १२:२५; यश. ३२:२; याको. २:१५-१७) दुसरं, तो प्रचारकांना आवेशाने प्रचार करायचं प्रोत्साहन देतो. तो आवेशाने प्रचारात भाग घेतो; खासकरून आठवड्याच्या शेवटी. तो नियमितपणे भाऊबहिणींसोबत प्रचार करतो. त्यांना प्रोत्साहन देतो. तसंच, प्रचाराचं आणि शिकवण्याचं कौशल्य वाढवायला त्यांना प्रशिक्षणही देतो. जर एखाद्या तातडीच्या कामामुळे त्याला प्रचाराला येणं अगदीच शक्य नसेल, तर तो हे काम त्याच्या सहायकाला किंवा एखाद्या भावाला सोपवतो. तिसरं, बाप्तिस्मा झालेल्या भावांना मंडळीच्या जबाबदाऱ्या हाताळायला पात्र ठरण्यासाठी तो मदत करतो. (१ तीम. ३:१) तो त्यांची प्रशंसा करतो, त्यांना बायबलमधून सल्ला देतो. तसंच, तो त्यांना सहायक सेवक आणि वडील बनायला मदत व्हावी म्हणून नियमितपणे प्रशिक्षणही देतो. गट पर्यवेक्षकाचं काम खूप जबाबदारीचं असतं. त्यामुळे हे काम करण्यासाठी पात्र असलेल्या वडिलालाच वडीलवर्ग निवडतो.
५. काही गट पर्यवेक्षकांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं?
५ गट पर्यवेक्षकाला त्याच्या गटातल्या प्रत्येक प्रचारकाला मदत करणं काही गोष्टींमुळे कठीण जातं. जर्मनीमध्ये वडील म्हणून सेवा करणाऱ्या जॉर्जचा विचार करा. त्यालाही इतर बऱ्याच वडीलांसारखं मंडळीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतात. तो म्हणतो: “गट पर्यवेक्षक म्हणून काम करणं आणि त्याच वेळी इतर जबाबदाऱ्या हाताळणं नेहमीच सोपं नसतं. यामुळे मला माझ्या गटातल्या प्रत्येक भाऊबहिणीला भेटणं शक्य होत नाही.” युगांडामध्ये राहणारे ७० वर्षांचे एक वडील म्हणतात: “आमच्या मंडळीत फार कमी वडील आणि सहायक सेवक आहेत. त्यामुळे आमचे प्रचार सेवा गट खूप मोठे आहेत. म्हणून मला गटातल्या प्रत्येक प्रचारकाला नियमितपणे मेंढपाळ भेट देणं शक्य होत नाही.” सुरिनाममध्ये राहणारे ओबेद नावाचे आणखी एक वडील असं म्हणतात: “मला इतरांना प्रशिक्षण द्यायला फार आवडतं. पण यासाठी बराच वेळ आणि शक्ती खर्च करावी लागते आणि परिणामही लगेच दिसून येत नाहीत. यामुळे माझं इतरांना प्रशिक्षण देण्याकडे दुर्लक्ष होतं.” मग अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यायला वडिलांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?
६. प्रचाराचे गट छोटे असल्यामुळे गट पर्यवेक्षकाला प्रचारकांना मदत करणं कसं शक्य होतं?
६ शक्यतो प्रचार सेवा गटात कमी प्रचारक असले पाहिजेत. यामुळे गट पर्यवेक्षकाला त्याच्या गटातल्या प्रत्येक प्रचारकाला जाणून घेता येतं आणि यहोवाच्या सेवेत प्रगती करायला मदतही करता येते. पण जर मंडळीत कमी वडील असतील तर काय? अशा वेळी जर वडीलवर्गाने मोठे गट बनवले तर गट पर्यवेक्षकाला गटातल्या प्रत्येक प्रचारकाला मदत करणं शक्य होणार नाही. म्हणून गटाला मदत करण्यासाठी वडीलवर्ग, एका सहायक सेवकाला नेमू शकतो. जेव्हा प्रचाराचे गट छोटे असतात, तेव्हा गट पर्यवेक्षकांना त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या कामावर लक्ष देता येतं; ते म्हणजे भाऊबहिणींना यहोवाला विश्वासू राहायला आणि समस्यांचा धीराने सामना करायला मदत करणं.
७. मंडळीत जर कमी वडील असतील, तर गटातल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी गट पर्यवेक्षक काय करू शकतात? (१ पेत्र ५:२) (चित्रसुद्धा पाहा.)
७ जर तुम्ही गट पर्यवेक्षक म्हणून काम करत असाल आणि तुमच्या मंडळीत कमी वडील असतील, तर तुम्ही तुमच्या सहायकाला गटातल्या भाऊबहिणींना मदत करायचं प्रशिक्षण देऊ शकता. (१ पेत्र ५:२ वाचा.) तुम्ही त्याला काही कामं सोपवू शकता. जसं की, तुम्ही वेळोवेळी त्याला प्रचारात पुढाकार घ्यायला सांगू शकता. गटातल्या भाऊबहिणींना त्यांचं प्रचाराचं कौशल्य वाढवायला आणि यहोवाच्या जवळ यायला कशी मदत करता येईल याबद्दल त्याच्याशी चर्चा करू शकता. तसंच, तुम्ही नियमितपणे त्याला मेंढपाळ भेटीसाठी घेऊन जाऊ शकता. भेटीआधी तुम्ही त्या भावाला किंवा बहिणीला कसं प्रोत्साहन द्याल याबद्दल थोडं बोलू शकता. शिवाय, भेटीनंतर त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल तुम्ही त्याची प्रशंसा करू शकता आणि जर काही गोष्टींमध्ये त्याला सुधारणा करायची गरज असेल तर त्याबद्दलही त्याला सांगू शकता. असं केल्यामुळे काही काळातच तुमचा सहायक, गट पर्यवेक्षक म्हणून सेवा करायला पात्र ठरू शकतो. (२ तीम. २:२) तसंच, गटातल्या भाऊबहिणींना प्रशिक्षण द्यायला तुम्ही प्रौढ भाऊबहिणींचीही मदत घेऊ शकता. पायनियर आणि इतर अनुभवी प्रचारक हे नवीन आणि कमी अनुभव असलेल्या प्रचारकांना मदत करू शकतात. जसं की, संभाषण कसं सुरू करायचं, पुनर्भेटी कशा करायच्या आणि बायबल अभ्यास कसा चालवायचा हे ते त्यांना दाखवू शकतात. आता आपण पाहू, की आपण सगळे कोणत्या तीन मार्गांनी आपल्या प्रचाराच्या गटाला मदत करू शकतो.
वडील त्यांच्या गटातल्या सहायक सेवकाला प्रशिक्षण देण्यासाठी त्याला प्रचाराची सभा घ्यायला सांगू शकतात (परिच्छेद ७ पाहा)
प्रचाराच्या गटाला मदत करा
८. आपण आपल्या गटाला मदत कशी करू शकतो? (रोमकर १:१२)
८ गटासोबत प्रचाराला जा. गटासोबत प्रचाराला गेल्यामुळे तुम्हाला “एकमेकांना प्रोत्साहन” देता येईल. (रोमकर १:१२ वाचा.) सोबत मिळून प्रचार केल्यामुळे तुम्हाला बोलताना भीती वाटणार नाही आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. शिवाय, त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये प्रचार करताना तुम्ही सुरक्षित राहाल. पण तुमच्या कामामुळे जर तुम्हाला नियमितपणे गटासोबत प्रचारात जायला शक्य नसेल तर काय? अशा वेळी तुम्ही तुमच्या बॉसला तुमच्या कामाच्या वेळेत फेरबदल करायला विचारू शकता. आणि कोण जाणे, कदाचित तुमचा बॉस तुम्हाला परवानगी देईलही. (नहे. २:४-६) आजारपणामुळे किंवा वाढत्या वयामुळे तुम्हाला प्रत्यक्षरीत्या गटासोबत प्रचारासाठी भेटणं शक्य नसेल, तर तुम्ही गट पर्यवेक्षकासोबत याबद्दल बोलू शकता. गटासोबत मिळून पत्रलेखन करण्यासाठी आणि फोनद्वारे साक्षकार्य करण्यासाठी ते व्हिडिओ कॉलची व्यवस्था करतील. पण तुम्ही तरुण असाल आणि तुमचं आरोग्यही चांगलं असेल आणि तरी तुम्हाला प्रचाराला नियमितपणे जाणं कठीण वाटत असेल तर काय? जर असं असेल, तर दर आठवडी तुमच्या गटातल्या एखाद्या भावासोबत किंवा बहिणीसोबत प्रचाराला जायची तुम्ही आधीच योजना करू शकता. गटासोबत नियमितपणे प्रचाराला जाता यावं, यासाठी कदाचित तुम्हाला जीवनात कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत हे ठरवावं लागेल आणि वेळेचं चांगलं नियोजनही करावं लागेल. (रोम. १२:११; कलस्सै. ४:५) यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा, म्हणजे तो ‘तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करेल आणि ते कार्य करायची ताकदही देईल.’—फिलिप्पै. २:१३.
९. आपण प्रचाराच्या गटात प्रेमळ वातावरण कसं बनवू शकतो? (रोमकर १२:१३)
९ पाहुणचार करा. आपण भाऊबहिणींचा ‘पाहुणचार करतो,’ तेव्हा आपलं आपसातलं प्रेम वाढतं. (रोमकर १२:१३ वाचा.) यासाठी तुम्ही तुमच्या घरी प्रचाराची सभा ठेवायला विचारू शकता. काही मंडळ्यांमध्ये पाहुणा वक्ता येणार असेल त्या दिवशी सभेनंतर, एखाद्या गटातले भाऊबहीण वक्त्यासोबत जेवणाची आणि वेळ घालवण्याची व्यवस्था करतात. पण वक्त्याला जेवणासाठी थांबणं शक्य नसेल, तरी भाऊबहीण सोबत मिळून जेवण करतात आणि वेळ घालवतात. आपली एक खास पायनियर बहीण सारा म्हणते: “मी भाऊबहिणींना घरी बोलवते तेव्हा काय बनवावं आणि काय नाही याबद्दल मला जास्तच चिंता होते. म्हणून मी बरेच पदार्थ बनवण्याऐवजी त्यांच्यासोबत वेळ घालवण्यावर जास्त लक्ष देते.” जेव्हा आपल्या गटात प्रेमळ आणि कुटुंबासारखं वातावरण असतं, तेव्हा आपलं यहोवासोबतचं आणि भाऊबहिणींसोबतचं नातं मजबूत होतं.—नहे. ८:१०; प्रे. कार्यं २०:३५.
१०. आपलं कौशल्य वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? (नीतिवचनं १:५; २७:१७) (चित्रसुद्धा पाहा.)
१० प्रचाराचं आणि शिकवण्याचं कौशल्य वाढवा. आपण आपलं प्रचाराचं आणि शिकवण्याचं कौशल्य जितकं वाढवू, तितकं जास्त आपल्याला गटासोबत प्रचाराला जायला आवडेल. मग तुमचं कौशल्य वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? कदाचित तुम्ही स्वतःहून गटातल्या एखाद्या पायनियर किंवा अनुभवी प्रचारकाला मदतीसाठी विचारू शकता. (नीतिवचनं १:५; २७:१७ वाचा.) तुम्ही काही ध्येयं ठेवू शकता आणि त्याबद्दल तुमच्या गट पर्यवेक्षकाला सांगू शकता. ते तुम्हाला त्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील. तसंच, तुम्ही इतरांचीही मदत घेऊ शकता. हेदर नावाच्या बहिणीनेही हेच केलं. ती लाजाळू स्वभावाची असल्यामुळे इतरांकडून मदत घ्यायला कचरायची. पण ती म्हणते: “मला माझ्या पुनर्भेटी चांगल्या प्रकारे करता याव्यात म्हणून मी एका पायनियर बहिणीला मदत मागितली. ती खूप प्रेमळ आणि दयाळू होती. ती नियमितपणे माझ्यासोबत प्रचाराला यायची. इतकंच काय, तर मी ज्या व्यक्तीची पुनर्भेट करायचे तिचा बायबल अभ्यास सुरू करायलासुद्धा तिने मला मदत केली. बरं झालं मी त्या बहिणीकडून मदत घेतली. कारण यामुळेच मला आज प्रचारला जायला खूप आवडतं.” खरंच, आपण जर आपल्या प्रचाराच्या गटाला वेगवेगळ्या मार्गांनी मदत केली, तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
प्रचार सेवा गट छोटा असेल, तर आपल्याला गटातल्या प्रत्येकासोबत मैत्री करता येते आणि त्यांच्यासोबत प्रचारही करता येतो (परिच्छेद १० पाहा)
आपल्याला कसा फायदा होऊ शकतो
११-१२. प्रचार सेवा गटामुळे तुम्हाला कोणकोणते आध्यात्मिक फायदे होऊ शकतात? एक उदाहरण द्या.
११ आध्यात्मिक फायदे. प्रचार सेवा गटामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला यहोवासोबतचं नातं मजबूत करायला मदत मिळते. जसं की, गट पर्यवेक्षक वेळोवेळी विधवा, अनाथ आणि वयस्कर लोकांना मेंढपाळ भेटी देऊन प्रोत्साहन देतात. यावरून यहोवाचं त्यांच्यावर खास लक्ष आहे हे दिसून येतं. (१ थेस्सलनी. २:८; याको. १:२७) तसंच, गटासोबत प्रचाराला गेल्यामुळे आपल्याला चांगला प्रचारक आणि शिक्षकही बनता येतं. शिवाय, मंडळीत चांगलं उदाहरण असलेल्या भावांना आणखी जबाबदारीसाठी पात्र ठरता यावं म्हणून प्रशिक्षणही मिळतं.—१ तीम. ३:१०
१२ आधी उल्लेख केलेल्या विनीला प्रचार सेवा गटाच्या व्यवस्थेमुळे किती फायदा झाला याबद्दल ती म्हणते: “माझे पप्पा सत्यात नव्हते. ते आमचा विरोध करायचे. म्हणून माझ्या मम्मीला शनिवारी-रविवारी गटासोबत प्रचाराला जाणं शक्य नव्हतं. पण मला ते अडवत नव्हते. म्हणून मी प्रचाराला जायचे. एका वयस्कर पायनियर बहिणीने मला एका मैत्रिणीसारखी साथ दिली. तिने मला प्रचाराचं कौशल्य वाढवायला आणि मंडळीत प्रगती करायला खूप मदत केली. मला आठवतं, माझ्या गट पर्यवेक्षकाने त्या वेळी बायबलमधून मला जे सल्ले दिले त्यांचा आजही मला फायदा होतोय.”
१३. आपल्या प्रचार सेवा गटातल्या भाऊबहिणींकडून आपल्याला भावनिक आधार कसा मिळू शकतो? (चित्रसुद्ध पाहा.)
१३ भावनिक आधार. आपल्या गटातल्या भाऊबहिणींसोबत “खांद्याला खांदा लावून” सेवा केल्यामुळे त्यांच्यासोबत आपली मैत्री आणखी पक्की होते. (फिलिप्पै. १:२७) प्रचार सेवा गट छोटे असल्यामुळे फायदा होतो. त्यामुळे एखाद्याचा स्वभाव लाजाळू असला किंवा चारचौघांत बोलायला त्याला भीती वाटत असली, तरी भाऊबहिणींसोबत मैत्री करणं त्याला सोपं जातं. (२ करिंथ. ६:१३) तसंच, आपण आजारी पडतो, निराश होतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा हेच मित्र आपल्याला धीर आणि सांत्वन देतात. (१ थेस्सलनी. ५:१४) जसजसं मोठं संकट जवळ येत आहे, तसतसं आपल्याला अशा मित्रांची जास्त गरज पडणार आहे. (मत्त. २४:२१) हे खरंय, या जगात आपल्या सगळ्या समस्या सुटणार नाहीत. पण भाऊबहीण आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं आपल्यावर प्रेम आहे, ही गोष्ट माहीत असल्यामुळे आपल्याला समस्यांचा धीराने सामना करायला मदत होईल.—नीति. १७:१७.
एका प्रचार सेवा गटातल्या दोन बहिणी प्रचारासाठी जात आहेत (परिच्छेद १३ पाहा)
१४. विपत्तीच्या आणि तातडीच्या प्रसंगी आपल्याला प्रचार सेवा गटामुळे कसा फायदा होतो?
१४ व्यावहारिक मदत. आपण शेवटच्या काळात जगत असल्यामुळे अचानाक नैसर्गित विपत्ती, आर्थिक मंदी किंवा छळाची लाट येऊ शकते. किंवा मग महामारी आणि तातडीची वैद्यकीय परिस्थिती उद्भवू शकते. अशा वेळी आपल्याला आपल्या प्रचार सेवा गटाकडून व्यावहारिक मदत मिळते. उदाहरणार्थ, एखादी विपत्ती येते, तेव्हा गट पर्यवेक्षक त्याच्या गटातल्या प्रत्येक कुटुंबाशी संपर्क करतो आणि त्यांना सध्या कशाची गरज आहे हे माहीत करून घेतो. त्यांना औषधांची, खाण्यापिण्याची, राहण्याची किंवा कपड्यांची गरज आहे का हे तो पाहतो. यानंतर तो त्यांना गरज असलेल्या गोष्टी संघटनेकडून पुरवायची व्यवस्था करतो. तसंच, तो त्याच्या गटातल्या जास्त गरज असलेल्या भाऊबहिणींना कशी मदत करता येईल याबद्दल सेवा समितीसोबत चर्चा करतो आणि मदत पुरवायची योजना बनवतो. खरंच, अशा परिस्थितींत प्रचार सेवा गटामुळे आपल्याला किती मदत होते!
१५. यहोवाच्या कुटुंबात एकता का आहे?
१५ आधी उल्लेख केल्याप्रमाणे यहोवाचं कुटुंब खूप मोठं आहे. त्याच्या स्वर्गातल्या भागातच लाखो-करोडो स्वर्गदूत आहेत, तर पृथ्वीवर ९० लाखांपेक्षा जास्त उपासक आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (जख. ८:२३; प्रकटी. ५:११) यहोवाचे हे सगळे उपासक मिळून राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. (प्रकटी. १४:६, ७) म्हणून भाऊबहिणींनो, यहोवाचा मनापासून महिमा करण्यासाठी प्रचार सेवा गटाच्या या व्यवस्थेचा आपण सगळे फायदा घेत राहू या.—स्तो. १११:१.
गीत ६१ साक्षीदारांनो, पुढे चला!
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b गरज असेल तर, गटाची देखरेख करण्यासाठी एखादा वडील नियुक्त होईपर्यंत एखादा पात्र असलेला सहायक सेवक गटाला मदत करू शकतो. या सहायक सेवकाला गट सेवक म्हटलं जातं. कारण तो मंडळीत वडील म्हणून सेवा करत नाही. तसंच, गटाला मदत करण्यासाठी वडील त्याचं मार्गदर्शन करत असतात.