१७-२३ ऑगस्ट, २०२६
गीत ९० एकमेकांना प्रोत्साहन देऊ या!
मैत्री कशी टिकवून ठेवता येईल?
“करुणा, दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता यांचं वस्त्र घाला.”—कलस्सै. ३:१२.
या लेखात:
भाऊबहिणींसोबतची मैत्री टिकवून ठेवणं कठीण जातं तेव्हा आपण काय करू शकतो ते पाहा.
१. आपल्याला खरे मित्र कुठे मिळू शकतात?
शेवटच्या दिवसांत आपलं जीवन खूप कठीण झालंय. त्यातल्या त्यात आपल्याला जर खरे मित्र नसतील, तर आपल्यासाठी हे जीवन आणखीनच कठीण होऊ शकतं. यहोवाला ही गोष्टी माहीत आहे. म्हणूनच त्याने आपल्याला संघटनेत भाऊबहीण दिले आहेत. आपण त्यांच्यासोबत मैत्री करू शकतो. खरंतर हा एक आशीर्वादच आहे! (स्तो. ११९:६३) आपले भाऊबहीण आपलं कुटुंब आहे. या कुटुंबातले सगळे लोक यहोवाची उपासना करतात आणि एकमेकांवर मनापासून प्रेम करतात.
२. आपली भाऊबहिणींसोबतची मैत्री कशी असली पाहिजे?
२ आपल्याला आपल्या भाऊबहिणींसोबत फक्त नावापूरती मैत्री करायची नाही. उलट, आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचंय आणि त्यांच्यासोबत जवळचं नातं जोडायचंय. हे खरंय, की सगळ्या भाऊबहिणींचं यहोवा आणि येशूवर प्रेम असल्यामुळे आपल्यात एकता आहे. (योहा. १३:३५) पण यामुळे आपल्यातली मैत्री आपोआप घट्ट होईल असं नाही, तर यासाठी मेहनत घ्यावी लागेल. भरीत भर म्हणजे, आपल्या अपरिपूर्णतेमुळे येणाऱ्या समस्यांमुळेही आपली मैत्री टिकवून ठेवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं.
३. आपल्यातली मैत्री टिकवून ठेवणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं?
३ आपली सगळ्याच भाऊबहिणींसोबत जवळची मैत्री होईल असं नाही. कारण प्रत्येकाचा स्वभाव, आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळेच भाऊबहिणींसोबतची मैत्री टिकवून ठेवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. कधीकधी आपल्यात खटके उडू शकतात आणि त्यामुळे आपल्या मैत्रीच्या नात्याला तडा जाऊ शकतो. तसंच, आपला स्वभाव वेगळा असल्यामुळे आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायलाही आवडणार नाही. शिवाय, आपले भाऊबहीण गंभीर आजारांचा सामना करतात किंवा खचलेले असतात, तेव्हाही मैत्री टिकवून ठेवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण जर आपण येशूचं अनुकरण केलं, तर समस्या आल्यावर आपण आपली मैत्री टिकवून ठेवू शकतो. याबद्दलच आपण या लेखात पाहणार आहोत. पण त्याआधी आपण पाहू, की मैत्रीचं नातं घट्ट करण्यासाठी आपल्याला यहोवाच्या कोणत्या चांगल्या गुणांमुळे मदत होऊ शकते.
यहोवासारखे गुण दाखवा
४. आपण मैत्रीचं नातं घट्ट कसं करू शकतो?
४ भाऊबहिणींसोबतची मैत्री घट्ट करण्यासाठी आपण त्यांच्यातले चांगले गुण पाहिले पाहिजेत. यासाठी आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. प्रेषित पौललाही भाऊबहिणींसोबत वेळ घालवायची इच्छा होती. म्हणून त्याने थेस्सलनीकामधल्या भाऊबहिणींना असं लिहिलं: “आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.” (१ थेस्सलनी. २:१७) प्रत्यक्ष भेटून बोलल्यामुळे, वेळ घालवल्यामुळे मैत्रीचं नातं घट्ट करायला आणखी मदत होते. आपण जेव्हा प्रचाराला, सभेला, संमेलनाला किंवा अधिवेशनाला जातो, तेव्हा आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायच्या आणखी बऱ्याच संधी मिळतात. पण समस्या आल्यावर मैत्री टिकवून ठेवण्यासाठी फक्त सोबत वेळ घालवणंच पुरेसं नाही.
५. समस्या असतानाही आपल्याला मैत्रीचं नातं कसं टिकवून ठेवता येईल? उदाहरण द्या. (कलस्सैकर ३:१२)
५ यहोवासारखे गुण दाखवल्यामुळे समस्या असतानाही आपल्याला आपलं मैत्रीचं नातं टिकवून ठेवता येईल. (कलस्सैकर ३:१२ वाचा.) यासाठी आपण नम्रता, सहनशीलता, दयाळूपणा आणि प्रेम यांसारखे गुण वाढवणं गरजेचं आहे. जसं गाडीत ऑईल टाकल्यामुळे ती सुरळीतपणे चालत राहू शकते, तसंच देवासारखे गुण दाखवल्यामुळे आपल्याला मैत्रीचं नातं टिकवून ठेवायला मदत होऊ शकते. पण कोणत्या गोष्टींमुळे आपल्या मैत्रीच्या नात्याला तडा जाऊ शकतो? चला, आता आपण तीन गोष्टींबद्दल चर्चा करू या. यासोबतच, येशूसारखं नम्रता, सहनशीलता, दयाळूपणा आणि प्रेमळपणा हे गुण दाखवल्यामुळे आपल्याला इतरांचे चांगले मित्र बनायला कशी मदत होईल हेही आपण पाहू या.
मतभेद होतात तेव्हा
६. मतभेदांमुळे मैत्री धोक्यात कशी येऊ शकते?
६ मैत्री धोक्यात का येऊ शकते? मतभेद होतात तेव्हा आपलंच मत योग्य आहे असं आपल्याला वाटू शकतं. विचार करा, प्रचाराच्या गटासाठी प्रचाराची योजना करण्याबाबतीत दोन भावांची वेगवेगळी मतं आहेत. आणि दोघांनाही आपलंच मत योग्य वाटतं. मग तुम्हाला काय वाटतं, या गोष्टीमुळे या भावांच्या मैत्रीच्या नात्याला तडा जाऊ शकतो का? जर गर्वामुळे ते आपल्याच मतावर अडून बसले, तर असं नक्कीच होऊ शकतं. त्यांनी जर आपसात बोलून वाद मिटवला नाही, तर त्यांच्या मनात एकमेकांबद्दल राग निर्माण होऊ शकतो. आणि जर त्यांनी वेळीच पाऊल उचललं नाही, तर त्यांची मैत्री पूर्णपणे तुटू शकते. हे सगळं फक्त एका क्षुल्लक कारणामुळे होऊ शकतं!
७. नम्रतेमुळे मतभेत सोडवता येतात ही गोष्ट येशूने त्याच्या शिष्यांना कशी शिकवली?
७ येशूसारखं नम्र व्हा. आपल्यात नम्रता असल्यामुळे मतभेद सोडवता येतात ही गोष्ट येशूने त्याच्या शिष्यांना शिकवली. आपल्यात श्रेष्ठ कोण या विषयावर त्याच्या शिष्यांमध्ये बऱ्याचदा वाद व्हायचा. येशूला माहीत होतं, की हे विचार त्याच्या शिष्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. म्हणून आपण इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजावं असं त्याने त्यांना समजावून सांगितलं. (मत्त. २०:२५-२८) तो त्यांना नम्र व्हायला शिकवत होता. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्रीसुद्धा एका सेवकाचं काम करून, म्हणजे त्याच्या शिष्यांचे पाय धुऊन त्याने ‘त्यांच्यासमोर आदर्श ठेवला.’ (योहा. १३:३-५, १२-१६) असं करून त्याने त्यांना मैत्री टिकवून ठेवण्याच्या बाबतीत एक मोलाचा धडा शिकवला; तो म्हणजे इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजल्यामुळे मतभेद झाल्यावरही मैत्री टिकवून ठेवता येते.
८. मतभेद होतात तेव्हा नम्रतेमुळे मैत्री टिकवून ठेवायला आपल्याला कशी मदत होऊ शकते? (कलस्सैकर ३:१३) (चित्रंसुद्धा पाहा.)
८ मैत्री कशी टिकवून ठेवता येईल? क्षुल्लक कारणांमुळे मतभेद होतात तेव्हा त्यांकडे दुर्लक्ष करायला आणि एकमेकांना मनापासून माफ करायला आपल्याला नम्रतेमुळे मदत होते. (कलस्सैकर ३:१३ वाचा.) तसंच, आपल्यात नम्रता असेल तर मतभेत झाल्यावर आपण रागवण्याऐवजी आपली मैत्री टिकवून ठेवायचा प्रयत्न करू. (स्तो. ४:४) आपण एकमेकांना चुकून वाईटसाईट बोललो तरी आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की सगळ्यांनाच कधी न् कधी आपल्या बोलण्याचा पस्तावा होतो. (उप. ७:२१, २२) म्हणून मतभेद झाल्यावर स्वतःला विचारा: ‘आमच्या मैत्रीपेक्षा माझं मत जास्त महत्त्वाचं आहे असा मी विचार करतो का?’ इतरांचं मत पटत नसलं तरी त्यांच्या मतांशी सहमत व्हायचा प्रयत्न करा. तसंच, मतभेद झाल्यावर त्याच गोष्टींचा विचार करत बसू नका आणि झालेल्या गोष्टी पुन्हा उकरूनही काढू नका.
नम्रतेमुळे आपल्याला क्षुल्लक कारणांमुळे होणाऱ्या मतभेदांकडे दुर्लक्ष करायला आणि एकमेकांना मनापासून माफ करायला मदत होते (परिच्छेद ८ पाहा) a
९. मतभेद सोडवणं कठीण जात असलं तरी नम्रतेमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? (नीतिवचनं १७:९)
९ मतभेद सोडवणं कठीण जातं तेव्हाही नम्रतेमुळे आपल्याला मदत होऊ शकते. आपलंच म्हणणं बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी वाद घातल्याने कोणाचाच फायदा होत नाही. (नीतिवचनं १७:९ वाचा; १ करिंथ. ६:७) आपलं ध्येय मैत्री टिकवून ठेवणं हे असलं पाहिजे. शांती टिकवून ठेवायला आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. (स्तो. ३४:१४) यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला म्हणू शकता: ‘माझ्यासाठी आपली मैत्री खूप महत्त्वाची आहे. जे झालं त्याबद्दल थोडं बोलायचं का?’ मग बोलताना तुमची चूक कबूल करा. तुमच्या मित्राला तुमच्यामुळे त्रास झाला असेल हेही मान्य करा. त्याची माफी मागा. शिवाय, त्याने तुमची माफी मागितली तर नम्रता दाखवा आणि त्याला लगेच माफ करा. (लूक १७:३, ४) तुमचं ध्येय कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं नाही, तर झालं ते विसरून मैत्री टिकवून ठेवणं हे असलं पाहिजे.—नीति. १८:२४.
स्वभाव वेगळे असतात तेव्हा
१०. मैत्री टिकवून ठेवणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं?
१० मैत्री धोक्यात का येऊ शकते? आपल्याला कदाचित आपल्यापेक्षा वेगळ्या स्वभावांच्या भाऊबहिणींसोबत मैत्री टिकवून ठेवायला कठीण जाऊ शकतं. काहींच्या सवयींमुळे आपली चिडचिड होऊ शकते. काही जणांचं वागणं आपल्याला विचित्र वाटू शकतं. कारण कदाचित त्यांना पूर्वी चुकिची वागणून मिळाली असेल. तसंच त्यांच्या संस्कृतीमुळे ते एकतर खूप लाजाळू असतील किंवा बडबडे आणि अती उत्साही असतील. किंवा कदाचित आपल्याला लोकांमध्ये मिळूनमिसळून राहायला आवडत असेल, पण त्यांच्या बाबतीत मात्र तसं नसेल.
११. येशूने त्याच्यापेक्षा वेगळा स्वभाव असलेल्यांशी मैत्री कशी टिकवून ठेवली?
११ येशूसारखी सहनशीलता दाखवा. येशूने त्याच्यापेक्षा वेगळा स्वभाव असलेल्यांशी मैत्री टिकवून ठेवली. याकोब आणि योहानचंच उदाहरण घ्या. इतरांनी आपल्याला महत्त्वाचं समजावं या उद्देशाने त्यांनी येशूकडे त्याच्या राज्यात महत्त्वाचं स्थान मागितलं. (मार्क १०:३५-३७) पण येशू त्यांच्यापेक्षा खूप वेगळा होता. तो नम्र होता. म्हणूनच त्याने स्वर्गातलं त्याचं उच्च स्थान आणि बहुमान सोडला आणि तो पृथ्वीवर आला. (फिलिप्पै. २:५-८) खरंच, त्यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा किती वेगळे होते! असं असलं तरी, येशू याकोब आणि योहानशी तसंच, इतरांशीही सहनशीलतेने वागला.
१२. येशूला आपल्या मित्रांशी सहनशीलतेने वागायला कशामुळे मदत झाली?
१२ येशूने त्याच्या मित्रांकडून कधी अवाजवी अपेक्षा केली नाही. इतरांनी आपल्याला महत्त्वाचं समजावं असं याकोब आणि योहानसारखंच इतर शिष्यांनाही वाटत होतं या गोष्टीची येशूला जाणीव होती. (मार्क ९:३४) येशूसुद्धा त्यांच्याच संस्कृतीत लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे त्या संस्कृतीतल्या लोकांसाठी समाजातलं स्थान किती महत्त्वाचं आहे हे येशूला माहीत होतं. म्हणून येशूने त्यांना समजून घेतलं. तो त्यांच्याशी सहनशीलतेने वागला. इतक्या वर्षांत खोलवर रुजलेल्या गर्वीष्ठपणाच्या भावना त्यांनी लगेच काढून टाकाव्यात अशी त्याने त्यांच्याकडून अपेक्षा केली नाही.—मार्क १०:४२-४५.
१३. सहनशीलतेमुळे आपल्याला इतरांसोबतची मैत्री टिकवून ठेवायला कशी मदत होऊ शकते? (इफिसकर ४:२)
१३ मैत्री कशी टिकवून ठेवता येईल? इतरांच्या काही सवयींमुळे तुमची चिडचिड होत असेल तर सहनशीलतेचा गुण वाढवायचा प्रयत्न करा. (नीति. १४:२९) आपल्या प्रत्येकाच्या सवयी, स्वभाव, राहणीमान आणि गुण वेगवेगळे असतात. त्यांना आपण कमतरता म्हणू शकत नाही, तर त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतात. म्हणून इतर लोक आपण आहोत तसं आपल्याला स्वीकारतात तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. (इफिसकर ४:२ वाचा.) तसंच, आपणही इतरांना आहे तसं स्वीकारलं पाहिजे. काही लोकांचा स्वभाव शांत आणि लाजाळू असतो. त्यामुळे त्यांना इतरांसोबत बोलायला, वेळ घालवायला किती अवघड जात असेल याचा विचार करा. दुसरीकडे, काही जण खूप उत्साही असतात आणि त्यांना इतरांसोबत राहायला, बोलायला खूप आवडतं. अशा लोकांसोबत आपल्याला सहशीलतेने वागावं लागू शकतं. हे खरंय, की स्वभाव वेगवेगळा असल्यामुळे सगळेच आपले जिवलग मित्र बनणार नाहीत. पण तरी आपल्याला सगळ्यांसोबत चांगले नातेसंबंध टिकवून ठेवणं नक्कीच शक्य आहे.
१४. सहनशीलतेमुळे आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष देऊ?
१४ सहनशीलतेमुळे आपल्याला आपल्या भाऊबहिणींच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्यायला मदत होते. या गुणांमुळे आपल्यातल्या वेगळेपणाला आपण आपल्या मैत्रीच्या आड येऊ देणार नाही. विचार करा, याकोब आणि योहनने येशूकडे स्वार्थीपणे देवाच्या राज्यात महत्त्वाची जागा मागितली. पण यावरून देवाचं राज्य त्यांच्यासाठी किती खरंय आणि त्यावर त्यांचा किती विश्वास आहे हे दिसून आलं. आणि ही गोष्ट येशूनेही ओळखली. आपणही जेव्हा आपल्या मित्रांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो, तेव्हा आपण यहोवा आणि येशूसारखं वागत असतो.
१५. मैत्री टिकवून ठेवायला आपण कोणाकडे मदत मागू शकतो?
१५ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपल्यापेक्षा वेगळ्या स्वभावच्या लोकांसोबत मैत्री टिकवून ठेवायला आपण यहोवाकडे मदत मागू शकतो. कोणत्या परिस्थितीत तुम्हाला मैत्री टिकवून ठेवणं कठीण जाऊ शकतं याचा आधीच विचार करा. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला शांत राहता यावं यासाठीही आधीच प्रार्थना करा. नेहमी लक्षात असू द्या, यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे आपण सगळे वेगळे आहोत हे त्याला चांगलं माहीत आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा खातरी बाळगा, की मैत्री टिकवून ठेवायला तुम्हाला कशाची गरज आहे हे यहोवाला माहीत आहे. आणि जेव्हा तुमच्या सहनशीलतेची परीक्षा होत असल्यासारखं तुम्हाला वाटतं, तेव्हा तुमच्याकडून काही चुकीचं घडू नये म्हणून यहोवाकडे पवित्र शक्ती मागा.—लूक ११:१३; गलती. ५:२२, २३.
भाऊबहीण कठीण परिस्थितीचा सामना करतात तेव्हा
१६. भाऊबहीण दुःखात असतात तेव्हा मैत्री टिकवून ठेवणं कठीण का जाऊ शकतं?
१६ मैत्री धोक्यात का येऊ शकते? जेव्हा आपले भाऊबहीण गंभीर आजाराचा सामना करतात किंवा खचून जातात तेव्हा त्यांना कदाचित एकटं राहवंसं वाटेल, त्यांची चिडचिड होईल किंवा ते आपल्याशी विचित्र वागतील. इतकंच काय, तर आपल्याला वाईट वाटेल असंही ते वागतील. (ईयो. ६:२, ३) अशा परिस्थितींत आपल्याला त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी धीराने वागणं कठीण जाऊ शकतं. आपले भाऊबहीण कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे आपल्याला पूर्णपणे समजत नसल्यामुळे कधीकधी आपण त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा करू शकतो.
१७. येशू बार्तीमयशी जसा वागला त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१७ येशूसारखी दया आणि प्रेम दाखवा. येशू दुःखात असलेल्या लोकांशी, अगदी अनोळखी लोकांशीसुद्धा खूप दयेने आणि प्रेमाने वागायचा. तो बार्तीमय नावाच्या एका अंध माणसाशी कसा वागला याचा जरा विचार करा. बार्तीमयला जेव्हा कळलं, की येशू त्याच्याजवळून जातोय तेव्हा त्याने खूप गोंधळ घातला. येशूचं लक्ष वेधून घ्यायला तो मोठमोठ्याने त्याच्या नावाने ओरडू लागला. तिथल्या लोकांनी त्याला गप्प राहायला सांगितलं. पण त्याला कोणत्याही परिस्थितीत बरं व्हायचं असल्यामुळे तो आणखीनच मोठ्याने ओरडू लागला. तुम्हाला काय वाटतं, तिथल्या लोकांना त्याचं वागणं पाहून कसं वाटलं असेल? त्यांना नक्कीच राग आला असेल. पण येशूला मात्र त्याचा “कळवळा आला.” यावरून कळतं, की येशूला त्याची परिस्थिती पाहून खूप दया आली. (मत्त. २०:३४; मार्क १०:४६-५२) तो त्याच्याशी प्रेमाने बोलला आणि त्याने त्याच्या विश्वासाची प्रशंसा केली. तसंच, त्याने चमत्कार करून त्याला त्याची दृष्टीही परत दिली.
१८. दुःखात असलेल्या आपल्या मित्रांशी आपण कसं वागलं पाहिजे? (१ थेस्सलनीकाकर ५:१४)
१८ मैत्री कशी टिकवून ठेवता येईल? आपणही नेहमी इतरांशी दयेने आणि प्रेमाने वागलं पाहिजे. या गुणांमुळे आपल्याला गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या आणि खचून गेलेल्या भाऊबहिणींचं “सांत्वन” करायला मदत होईल. (१ थेस्सलनीकाकर ५:१४ वाचा.) नेहमी लक्षात असू द्या, खरा मित्र कायम “दुःखाच्या प्रसंगी” मदतीला धावून येतो. (नीति. १७:१७) असा मित्र फक्त सांत्वन द्यायचं काम करत नाही, तर तो त्याच्या मित्रांना मदत करायला शक्य ते सगळं करतो. जसं की, तो त्यांना आधार देतो, प्रोत्साहन देतो आणि व्यावहारिक मार्गांनी मदतही करतो.
१९. आपण आपल्या भाऊबहिणींशी दयेने आणि प्रेमाने कसं वागू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१९ आपण आपल्या भाऊबहिणींच्या सगळ्या समस्या काढून टाकू शकतं नाही. पण असं असलं तरी आपण काही व्यावहारिक मार्गांनी त्यांना दया आणि प्रेम दाखवू शकतो. त्यांना कसं वाटतंय आणि ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करू शकतो. (मत्त. ७:१२; १ पेत्र ३:८) ते त्यांच्या भावना व्यक्त करतात तेव्हा त्यांचं लक्ष देऊन ऐकू शकतो आणि योग्य वेळ पाहून त्यांना सांत्वन देऊ शकतो. (नीति. १२:२५) ते काही बोलले तर आपण त्याचा चुकीचा अर्थ काढणार नाही. (नीति. १८:१३) उलट, आपण त्यांच्याशी धीराने वागू आणि त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा करायचं टाळू.—इफिस. ४:३२.
खरे मित्र दयेने आणि प्रेमाने वागून आपल्या मित्राचं सांत्वन करतात (परिच्छेद १९ पाहा)
२०. तुम्हाला कसा मित्र व्हायचंय?
२० खरे मित्र आपल्याला फक्त यहोवाच्या संघटनेतच मिळतात. हे खरंय, आपण सगळे अपरिपूर्ण आहोत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना जीवनात वाईट अनुभव आले आहेत. त्यामुळे आपण नकळत इतरांचं मन दुखावू शकतो. पण असं होतं तेव्हाही आपले भाऊबहीण आपल्याशी नम्रतेने, सहनशीलतेने, दयेने आणि प्रेमाने वागतात. तर चला, आपणही हे गुण वाढवण्याचा आणि इतरांचे चांगले मित्र बनण्याचा प्रयत्न कर राहू या.
गीत १२४ कायम एकनिष्ठ राहू या!
a चित्राचं वर्णन: प्रचाराची योजना करण्याबद्दल एका वयस्कर आणि तरुण भावाची वेगवेगळी मतं आहेत. नंतर ते सोबत मिळून प्रचार करतात.