३१ ऑगस्ट-६ सप्टेंबर, २०२६
गीत ८९ ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!
तुम्ही कशा प्रकारे ऐकता याकडे लक्ष द्या
“तुम्ही कशा प्रकारे ऐकता याकडे लक्ष द्या.”—लूक ८:१८.
या लेखात:
आपण सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणं का गरजेचं आहे आणि आपण ते कसं करू शकतो हे आपण पाहणार आहोत.
१-२. (क) आज यहोवा त्याच्या लोकांच्या आध्यात्मिक गरजा कशा पुरवतोय? (स्तोत्र २३:१, २, ५) (ख) या लेखात आपण सभांबद्दल काय शिकणार आहोत?
आज यहोवा आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न पुरवतोय आणि त्यामुळे आपल्याला दावीदसारखंच वाटतं. त्याने म्हटलं: “यहोवा माझा मेंढपाळ आहे. मला कशाचीच कमी नाही.”—स्तोत्र २३:१, २, ५ वाचा.
२ यहोवा आपल्याला बऱ्याच मार्गांनी शिकवतो. त्यातला एक मार्ग म्हणजे, आपल्या मंडळीच्या सभा. या सभांमध्ये बऱ्याचदा आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी ऐकायला मिळतात. आपण ‘सत्यात अगदी खंबीर’ असलो, तरी या गोष्टी वारंवार ऐकल्यामुळे आपल्याला फायदा होतो. (२ पेत्र १:१२) पण सभांमध्ये आधीच शिकलेल्या गोष्टी तुम्ही पुन्हा ऐकता, तेव्हा त्यांकडे लक्ष देणं तुम्हाला कठीण जातं का? जर असं असेल, तर या लेखामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. आपण या लेखात पाहू, की आपण सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणं का गरजेचं आहे. यासोबतच, इतरांना लक्ष देऊन ऐकणं सोपं जावं, म्हणून भाषण देणारे भाऊ काय करू शकतात आणि चांगल्या प्रकारे ऐकणारे बनण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करतील हेही आपण पाहू या. पण सर्वात आधी आपण पाहू, की सभांमध्ये आपल्याला नेमकं कोण शिकवत असतं.
सभांमध्ये यहोवा आपल्याला शिकवतो हे लक्षात ठेवा
३. यहोवा आपल्याला कसं शिकवतो आणि त्याचे लोक त्याच्या वचनाचा चांगला वापर कसा करतात?
३ यहोवा बायबलमधून आपल्याला शिकवतो. (२ तीम. ३:१६, १७) येशूला ही गोष्टी चांगल्या प्रकारे माहीत होती. त्याने देवाच्या वचनाचा इतक्या कुशलतेने वापर केला, की ऐकणाऱ्यांना असा प्रश्न पडला: “हा माणूस धर्मगुरूंच्या शाळांमध्ये शिकला नाही. मग याला शास्त्राचं इतकं ज्ञान कसं काय?” (योहा. ७:१५) येशू लोकांना देवाचं वचन समजावून सांगायचा तेव्हा नम्र मनाचे लोक थक्क व्हायचे. प्रेषित पौल आणि अपुल्लो यांसारख्या पहिल्या शतकातल्या ख्रिश्नांनीसुद्धा इतरांशी तर्क करताना बऱ्याच शास्त्रवचनांचा वापर केला. (प्रे. कार्यं १७:२, ३; १८:२४, २८) आजही आपली संघटना पुरवत असलेले लेख, ब्रॉडकास्टिंग, भाषणाच्या रूपरेषा आणि व्हिडिओ बायबलवर आधारित असतात. आपल्या सभांमध्ये नवीन लोक येतात तेव्हा आपल्याला बायबलचा कुशलपणे वापर करताना पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. तसंच, सभांमध्ये हाताळले जाणारे भाग पूर्णपणे बायबलवर आधारित असतात. इतकंच काय, तर आपल्याला फक्त बायबलमधून वाचून दाखवलं जात नाही, तर त्यातल्या गोष्टी कशा लागू करायच्या हेही समजावून सांगितलं जातं.—लूक २४:३२.
४. बायबलमध्ये “ऐकणं” हा शब्द कोणत्या अर्थाने वापरण्यात आलाय?
४ बायबलमध्ये “ऐकणं” हा शब्द बऱ्याचदा आज्ञा पाळणं या अर्थाने वापरण्यात आलाय. यहोवा आपल्याला सभांमध्ये त्याच्या वचनातून शिकवतो. त्यामुळे त्याची इच्छा काय आहे हे आपल्याला कळतं आणि त्याच्या आज्ञा पाळणंही सोपं जातं. आपण त्याचं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो, तेव्हा तो खूश होतो.—नीति. २७:११.
आपण सभांमध्ये लक्ष देऊन ऐकतो, कारण . . .
५. यहोवावरच्या प्रेमामुळे आपण काय करायला प्रवृत्त होतो? (योहान ४:२३, २४; १ योहान ५:३)
५ आपलं यहोवावर प्रेम आहे. (मत्त. २२:३७) आपण जितकं जास्त यहोवाबद्दल शिकू, तितकं जास्त आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढेल. या प्रेमामुळेच आपण त्याचं ऐकायला, त्याच्या आज्ञा पाळायला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची उपासना करायला प्रवृत्त होतो.—योहान ४:२३, २४; १ योहान ५:३ वाचा.
६. सभांमध्ये आपण इतरांना मदत करण्याबद्दल काय शिकतो?
६ आपलं लोकांवर प्रेम आहे. (मत्त. २२:३९) आपण आपल्या भाऊबहिणींना आणि इतर लोकांना कशी मदत करू शकतो, हे यहोवा आपल्याला सभांमधून शिकवतो. जसं की, लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा या माहितीपत्रकामुळे आपल्याला चांगले गुण वाढवायला मदत होते. त्यामुळे आपण प्रचारात लोकांशी चांगल्या प्रकारे बोलू शकतो. पण तुम्हाला संभाषण सुरू करणं कठीण जात असेल तर काय? आठवड्यादरम्यान होणाऱ्या सभेत विद्यार्थी भागांकडे लक्ष दिल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.
७. यहोवाचं ऐकणं आपल्यासाठी का गरजेचं आहे?
७ आपल्याला आता आनंदी राहायचंय आणि पुढे कायम जगायचंय. आपल्याला जर आनंदी राहायचं असेल आणि कायम जगायचं असेल तर आपण यहोवाच्या आज्ञा पाळणं खूप गरजेचं आहे. हीच गोष्टी यहोवाने त्याच्या जुन्या काळातल्या सेवाकांना सांगितली होती. (अनु. ३२:४४-४७) सभांमध्ये लक्ष दिल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं. तसंच, समस्यांचा धीराने सामना कसा करायचा आणि नवीन जगाची धीराने वाट कशी पाहायची हेही शिकायला मिळतं. (रोम. ८:२५) आपण शेवटच्या दिवसांत जगत असल्यामुळे यहोवाचं ऐकणं आणि त्याच्या सेवेत व्यस्त राहणं आज आपल्यासाठी कधी नव्हे इतकं गरजेचं आहे.—मत्त. २४:४२-४४; प्रकटी. १:३.
इतरांना लक्ष देऊन ऐकणं सोपं जावं म्हणून . . .
८. मंडळीत शिकवणाऱ्या भावांनी आपलं बोलण्याचं कौशल्य वाढवणं का गरजेचं आहे?
८ जे भाऊ मंडळीत शिकवतात; खासकरून जे जाहीर भाषण देतात त्यांनी आपलं बोलण्याचं कौशल्य वाढवत राहणं खूप गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे तयार केलेल्या जाहीर भाषणात लोकांना सत्याकडे आकर्षित करायची आणि भाऊबहिणींना सत्यात टिकून राहायला मदत करायची जबरदस्त ताकद असते. तुम्ही जेव्हा भाग सादर करता तेव्हा लक्षात असू द्या, तुम्ही विचारही केला नसेल इतका इतरांना त्याचा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला जाहीर भाषण द्यायची संधी मिळाली, तर तुम्ही पुढे दिलेले मुद्दे लक्षात ठेवू शकता. हे मुद्दे जरी जाहीर भाषण देणाऱ्यांना लक्षात ठेवून सांगितले असले, तरी मंडळीत भाग सादर करणाऱ्या सगळ्यांनाच याचा फायदा होऊ शकतो.—२ तीम. ४:२; तीत १:९.
९. भाषण मुद्देसूद असणं का गरजेचं आहे?
९ आपलं भाषण मुद्देसूद असू द्या. तुम्ही भाषण देता तेव्हा ते इतरांना समजायला सोपं जावं अशी तुमची इच्छा असते. पण जर तुमच्या भाषणात बरेच मुद्दे असतील किंवा ते समजायला कठीण असतील, तर ऐकणाऱ्यांचं लक्ष विचलीत होऊ शकतं. मग तुमचं भाषण मुद्देसूद असावं म्हणून तुम्ही काय करू शकता? (१) भाषणाच्या सुरुवातीलाच भाषणात कोणकोणते मुख्य मुद्दे आहेत ते सांगा. (२) एका वेळी एकच मुद्दा स्पष्ट करा. तो मुद्दा संपल्यावर थोडं थांबा आणि पुढचा मुख्य मुद्दा सुरू करताना तो कशाबद्दल आहे हे सांगा. (३) भाषणाच्या शेवटी मुख्य मुद्द्यांची उजळणी करा.
१०. भाषणाच्या विषयाबद्दल स्वतःची उत्सुकता वाढवणं का गरजेचं आहे?
१० विषयाबद्दल स्वतःची उत्सुकता वाढवा. भाषणातले मुद्दे जर तुम्हाला स्वतःला आवडले, तरच तुम्ही त्याबद्दल चांगल्या प्रकारे बोलू शकाल आणि ही गोष्टी तुमचं ऐकणाऱ्यांनाही जाणवेल. (नीति. २:४, ५; प्रे. कार्यं ४:२०) यासाठी तुम्हाला भाषणाच्या रूपरेषेवर आणि शास्त्रवचनांवर मनन केल्यामुळे मदत होऊ शकते. अमेरिकेत राहणाऱ्या एका ७० वर्षांच्या भावाला त्यांनी तरुणपणी ऐकलेलं भाषण अजूनही आठवतं. ते म्हणतात: “भाषण देणाऱ्या भावाने बायबल वाचताना वचनांवर मनन करायचं ज्या प्रकारे प्रोत्साहन दिलं ते मला अजूनही आठवतं. ते खूप खातरीने बोलत होते आणि ही गोष्ट कशी करता येईल हे त्यांनी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं होतं. त्या भाषणाने माझ्या जीवनाला एक वळण दिलं. यामुळे बायबल वाचताना त्यातून जास्तीत जास्त शिकण्यासाठी मला मदत झाली आणि यहोवासोबतचं माझं नातंही मजबूत झालं.”
११. ऐकणाऱ्यांना कशाची गरज आहे याचा विचार करणं आणि व्यावहारिक फायदे सांगणं का महत्त्वाचं आहे? (१ तीमथ्य ४:१३-१६)
११ ऐकणाऱ्यांना कशाची गरज आहे याचा विचार करा आणि व्यावहारिक फायदे सांगा. बरीच माहिती देण्याऐवजी किंवा वरवर माहिती सांगण्याऐवजी, शास्त्रवचनांचा वापर करून ऐकणाऱ्यांना विशिष्ट सल्ले आणि प्रोत्साहन द्या. याबाबतीत प्रेषित पौलचं आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे. तीमथ्य इफिसमधली त्याची नेमणूक पूर्ण करत होता, तेव्हा तो यहोवासोबतचं त्याचं नातं मजबूत कसं ठेवू शकतो याबद्दल पौलने त्याला काही विशिष्ट सल्ले दिले. (१ तीमथ्य ४:१३-१६ वाचा.) पौलसारखंच तुम्हीही ऐकणाऱ्यांच्या गरजांचा विचार करा आणि देत असलेली माहिती जीवनात कशी लागू करायची हेही सांगा.
१२. भाषण देताना आपण एरवी जसं बोलतो, तसं बोलणं का गरजेचं आहे?
१२ मोठ्याने बोलून भाषणाचा सराव करा म्हणजे तुम्हाला सहजपणे ते सादर करता येईल. भाषणातला शब्द न् शब्द लिहून, ते वाचून काढण्याऐवजी तुम्ही एरवी जसं बोलता तसं भाषण द्या. यामुळे ऐकणाऱ्यांना भाषणाकडे लक्ष द्यायला आणि ते समजून घ्यायला सोपं जाईल. वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा या माहितीपत्रकात असं म्हटलंय: “आपण एरवी जसं बोलतो तसं आणि प्रामाणिकपणे बोला. यावरून, तुम्ही बोलत असलेल्या विषयाबद्दल आणि लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे समोरच्याला समजलं पाहिजे.” तुम्ही जर मनापासून बोलला, तर ऐकणाऱ्यांना तुमचं भाषण जिवंत वाटेल, त्यांना ते आवडेल आणि भाषणातले मुद्दे लागू करायची प्रेरणाही मिळेल.
१३. एखाद्या अनुभवी भावाचा सल्ला घेणं का गरजेचं आहे? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ एखाद्या अनुभवी भावाचा सल्ला घ्या. तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही तयार केलेलं भाषण आधीच एखाद्या अनुभवी भावाला दाखवा आणि त्यांनी दिलेले सल्ले लागू करा. तसंच, तुम्ही त्यांना तुमचं भाषणही ऐकवू शकता, म्हणजे तुम्हाला कुठे सुधार करायची गरज आहे हे त्यांना तुम्हाला सांगता येईल. (नीति. १:५) आपण कुठे कमी पडतोय हे आपल्याला नेहमीच कळत नाही. म्हणून आपण एखाद्याची मदत घेतली, तर आपल्याला कुठे सुधार करायची गरज आहे हे ते आपल्याला सांगू शकतील. आपल्या सगळ्यांनाच एक चांगला वक्ता आणि शिक्षक व्हायचंय, कारण आपल्याला इतरांना बायबलची सत्यं चांगल्या प्रकारे समजून घ्यायला आणि ती लागू करायला मदत करायची इच्छा आहे.a
चांगला शिक्षक बनण्यासाठी एखाद्या अनुभवी शिक्षकाकडून मदत घ्या (परिच्छेद १३ पाहा)
चांगल्या प्रकारे ऐकणारे बना
१४. आपण स्तोत्र ११९ च्या लेखकासारखा दृष्टिकोन का ठेवला पाहिजे? (स्तोत्र ११९:२४, १११, १६७)
१४ यहोवा वारंवार देत असलेल्या सूचनांकडे लक्ष द्या. बायबलमध्ये म्हटलंय: “शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल.” म्हणून याचा सामना करण्यासाठी आपल्याला यहोवा वारंवार देत असलेल्या सूचनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. (२ तीम. ३:१) पण जर आपल्याला वाटलं, की आपल्याला सारख्यासारख्या त्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत, तर अशा वेळी स्तोत्र ११९ च्या लेखकाने देवाच्या स्मरण-सूचनांबद्दल जसा दृष्टिकोन ठेवला तसाच आपणही ठेवू शकतो.—स्तोत्र ११९:२४, १११, १६७ वाचा.
१५. सभांमधून आपल्याला मिळत असलेल्या आध्यात्मिक अन्नाबद्दलची कदर आपण कशी टिकवून ठेवू शकतो?
१५ इस्राएली लोक ओसाड रानात होते, तेव्हा यहोवाने त्यांना खाण्यासाठी मान्ना पुरवला होता. त्याबद्दल त्यांनी चांगला दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं होतं. त्याचप्रमाणे आज यहोवा पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्नाबद्दल आपणही चांगला दृष्टिकोन टिकवून ठेवणं गरजेचं आहे. (निर्ग. १६:१५, ३१) इस्राएली लोकांना मान्नाबद्दल सुरुवातीला कदर होती, यात काही शंका नाही. कारण, तो यहोवाने दिला होता, चविष्ट होता आणि त्यांच्यासाठी जीवनावश्यकही होता. पण काही काळाने ते मान्ना खाऊन वैतागले. (गण. २१:५) आज आपल्यालाही बऱ्याचदा सभेत आधी ऐकलेल्या गोष्टी वारंवार ऐकायला मिळतात. पण आपण त्याबद्दलची कदर कमी होऊ देऊ नये. आध्यात्मिक अन्न यहोवाच पुरवतोय ही गोष्ट आपण लक्षात ठेवली, तर त्याबद्दल कदर वाढवत राहायला आपल्याला मदत होईल. तसंच, यहोवाची संघटना खूप विचार करून हे आध्यात्मिक अन्न बनवते ही गोष्टही आपण लक्षात ठेवली पाहिजे. शिवाय, यातून जे ज्ञान मिळतं त्यामुळे आपलं जीवन वाचू शकतं यावरही आपण विचार केला पाहिजे.—नीति. ३:१३, १६-१८; योहा. १७:३.
१६. बऱ्याच वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्या भाऊबहिणींना सभांमध्ये लक्ष द्यायला कशामुळे मदत होते? (“चांगल्या प्रकारे ऐकणारे बनण्यासाठी” ही चौकटसुद्धा पाहा.)
१६ व्यावहारिक सल्ले लागू करा. बऱ्याच वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्या भाऊबहिणींना सभांमध्ये लक्ष द्यायला कशामुळे मदत होते याचा विचार करा. ३० पेक्षा जास्त वर्षांपासून यहोवाची सेवा करणारी ॲशली नावाची बहीण म्हणते: “सभांची चांगली तयारी केल्यामुळे मला सभांमध्ये लक्ष द्यायला मदत होते. जर माझी तयारी झाली नसेल तर मला उत्तरं देता येत नाहीत आणि माझं लक्ष भरकटतं.” ५२ वर्षांपासून यहोवाची सेवा करणारे योजेफ म्हणतात: “मला माहीत असलेल्या विषयांबद्दल पुन्हा ऐकायला मला आवडतं. एखाद्या विषयाबद्दल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे त्या विषयाबद्दलची माझी समज आणखी वाढते.” ते पुढे म्हणतात: “एखादा भाऊ जर प्रभावी वक्ता नसेल, तरी तो भाऊ कसा बोलतो याकडे नाही, तर तो देवाच्या वचनातून काय सांगतो याकडे मी लक्ष देतो.”
१७. सभांमध्ये लक्ष देऊन ऐकण्यासाठी तुम्ही काय करू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ सभांमध्ये तसंच, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये लक्ष देऊन ऐकण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या गोष्टी करू शकता. (१) जर तुम्ही सभांना जेवून जाणार असाल तर हलकं-फुलकं खाऊन जा, म्हणजे तुम्हाला सभेत झोप येणार नाही. (२) सभेला लवकर जा आणि कार्यक्रम सुरू होण्याआधी कुठे बसायचं हे ठरवा. (३) तुमच्या फोनमुळे तुमचं लक्ष भरकटणार नाही अशा प्रकारे तो सेट करा. (४) सभेमध्ये कायकाय होणार आहे याचा विचार करा. (५) वक्त्याकडे लक्ष द्या; इतर गोष्टींमुळे ते भरकटू देऊ नका. (६) थोडक्यात नोट्स घ्या किंवा त्यांची चित्रं काढा. (७) मुख्य शास्त्रवचनांचा आणि वक्ता सांगत असलेल्या मुद्द्यांशी त्यांचा कसा संबंध आहे याचा विचार करा. (८) स्वतःला विचारा: ‘मी या माहितीचा वापर मंडळीत आणि प्रचारात इतरांना मदत करण्यासाठी कसा करू शकतो?’ (९) संमेलनात आणि अधिवेशनात होणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमावरून, भाषणांच्या विषयांवरून आणि मुख्य शास्त्रवचनांवरून नजर फिरवा. (१०) संगीत व्हिडिओ सुरू होण्याआधी आपापल्या जागेवर बसून त्याकडे लक्ष द्या, म्हणजे कार्यक्रमासाठी तुमचं मन तयार होईल.
यहोवा वारंवार देत असलेल्या सूचनांकडे लक्ष द्या आणि फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे तुमचं लक्ष भरकटू देऊ नका (परिच्छेद १७ पाहा)
यहोवाचं ऐकत राहा
१८. आपण सभांमध्ये नेहमी लक्ष देऊन ऐकणं का गरजेचं आहे?
१८ सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे. यामुळे यहोवा आपल्याला “नीतीच्या मार्गांवर चालवतो.” (स्तो. २३:३; ३१:३) जशी एखादी नाव जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याने चुकीच्या दिशेला वाहवत जाऊ शकते, तसंच यहोवा सभांमध्ये वारंवार देत असलेल्या सल्ल्यांकडे आपण लक्ष दिलं नाही, तर आपणही वाहवत जाऊ शकतो. म्हणून आपण कशा प्रकारे ऐकतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि सभांमधून मिळणारं मार्गदर्शन लागू केलं पाहिजे. (लूक ८:१८) जर आपण असं केलं तर आपल्याला आजही आनंदी राहता येईल आणि भविष्यात कायमचं जीवन जगता येईल.—स्तो. ११९:२, १४.
गीत ८७ या आणि ताजेतवाने व्हा
a आपण चांगला वक्ता आणि शिक्षक कसे बनू शकतो, याबद्दल आणखी माहितीसाठी वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा हे माहितीपत्रक आणि परमेश्वर की सेवा स्कूल से फायदा उठाइए हे पुस्तक पाहा.