२०-२६ जुलै, २०२६
गीत १३३ तारुण्यात यहोवाची सेवा करू!
आणखी शिक्षण घेण्याबाबतीत योग्य निर्णय कसा घेता येईल?
“शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.”—नीति. १४:१५.
या लेखात:
आणखी शिक्षण घ्यायचं की नाही हे ठरवताना आपण कोणत्या गोष्टी आणि बायबल तत्त्वं लक्षात घेऊ शकतो ते पाहा.
१-२. (क) तरुणांना कोणता निर्णय घ्यावा लागतो? (ख) या लेखात “आणखी शिक्षण” हे शब्द कोणत्या अर्थाने वापरण्यात आले आहेत? (“शब्दाचा अर्थ” पाहा.)
तरुणांनो, तुम्हाला कोणी असं विचारलंय का, “तुला मोठं होऊन काय बनायचंय?” नक्कीच विचारलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, पूर्ण वेळची सेवा करणं सगळ्यात चांगलं करिअर आहे. असं असलं तरी, तुम्हाला स्वतःचा खर्च उचलता आला पाहिजे. (२ थेस्सलनी. ३:१०) म्हणून तुम्ही पुढे काय काम करणार हे कदाचित तुम्हाला आताच ठरवावं लागेल.
२ शालेय शिक्षण संपल्यानंतर काही तरुण चांगली नोकरी मिळावी म्हणून आणखी शिक्षणa घ्यायचा निर्णय घेतात. यासाठी ते त्यांच्या आईवडिलांसोबतही चर्चा करतात. आणखी शिक्षण घ्यावं की नाही यावर कदाचित तुम्हीही विचार करत असाल. असं असेल तर तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, की ‘मी कोणतं शिक्षण घ्यावं?’ याबाबतीत तुम्हाला मदत व्हावी म्हणून या लेखात काही बायबल तत्त्वांवर चर्चा करण्यात आली आहे. हा लेख तरुणांसाठी असला, तरी आणखी शिक्षण घ्यायचा विचार करणाऱ्या इतर भाऊबहिणींनाही याचा फायदा होऊ शकतो. तसंच, यामुळे आईवडिलांनासुद्धा मुलांना योग्य मार्गदर्शन द्यायला मदत होऊ शकते.
आणखी शिक्षण घ्यावं का?
३. काही भाऊबहीण आणखी शिक्षण का घेतात?
३ काही ठिकाणी व्यवस्थित जीवन जगण्याइतके पैसे कमवण्यासाठी आणखी शिक्षण घ्यायची गरज पडत नाही. तर काही ठिकाणी, आणखी शिक्षण घेतल्यामुळे कामाच्या वेळा ठरलेल्या असतील आणि पुरेसा पैसाही कमवता येईल अशी नोकरी किंवा व्यवसाय करता येतो. तसंच, यामुळे बऱ्याचदा भाऊबहिणींना प्रचारात जास्त वेळ देता येतो किंवा इतर मार्गांनी यहोवाची सेवा करता येते. पण हे विसरून चालणार नाही, की आणखी शिक्षण घेण्यासाठी काही त्याग करावे लागतात आणि काही आव्हानांनाही तोंड द्यावं लागतं.
४. शिक्षणाच्या बाबतीत निर्णय घ्यायची जबाबदारी कोणाची आहे? (तळटीपसुद्धा पाहा.)
४ बायबलमध्ये असं सांगितलंय, की “प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.” (गलती. ६:५) त्यामुळे आणखी शिक्षण घ्यायच्या बाबतीतही प्रत्येक भाऊबहिणीने स्वतःचा निर्णय स्वतः घेतला पाहिजे.b तसंच, लहान मुलांच्या शिक्षणाबद्दल निर्णय घ्यायची जबाबदारी आईवडिलांची आहे. (इफिस. ६:१) आईवडिलांनी जर मुलांना याबाबतीत चांगलं मार्गदर्शन दिलं, तर मुलांना मोठं झाल्यावर योग्य निर्णय घ्यायला मदत होऊ शकते.—नीति. २२:६.
५. आणखी शिक्षण घ्यायचं की नाही याबद्दल केव्हा विचार केला पाहिजे आणि का? (चित्रसुद्धा पाहा.)
५ आणखी शिक्षण घ्यायचं की नाही याबद्दल तरुणांना सहसा शालेय शिक्षण घेत असतानाच ठरवावं लागतं. याबाबतीत जर ते आपल्या आईवडिलांशी बरंच आधी बोलले, तर फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सोबत मिळून विचार करायला आणि आपल्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत हे तपासून पाहायला पुरेसा वेळ मिळेल. आणि पुढे आणखी शिक्षण घ्यायला किंवा काम करायला मदत होईल असे विषय शाळेत असतानाच निवडता येतील. पण आणखी शिक्षण घ्यावं की नाही याबद्दल शाळेत असतानाच निर्णय घेणं गरजेचं आहे का? नाही. (नीति. २१:५) काही भाऊबहिणींनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं, काम केलं, पायनियर सेवा सुरू केली आणि मग आणखी शिक्षण घ्यायचं की नाही हे ठरवलं. आणखी शिक्षण घ्यायचा निर्णय तरुणपणातच नाही तर जीवनात नंतरही घेतला जाऊ शकतो.
आईवडिलांनी मुलांना शिक्षणाबद्दल योग्य निर्णय घ्यायला मदत केली पाहिजे (परिच्छेद ५ पाहा)
६. आणखी शिक्षण घेण्याच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?
६ आणखी शिक्षण घेण्याच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला कशामुळे मदत होईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याबद्दल प्रार्थना करा. (याको. १:५) याशिवाय, आणखी दोन गोष्टी करा. पहिली, शिक्षण घेण्यामागचा तुमचा हेतू काय आहे याचं प्रामाणिकपणे परीक्षण करा. (स्तो. २६:२) आणि दुसरी, तुम्ही जे शिक्षण घ्यायचा विचार करत आहात त्याबद्दल पूर्ण माहिती काढा. (नीति. १४:१५) आता आपण या दोन्ही गोष्टींवर एकेक करून चर्चा करू या.
तुमच्या हेतूंचं परीक्षण करा
७. आणखी शिक्षणाच्या बाबतीत कोणत्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे?
७ जर तुम्ही आणखी शिक्षण घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्ही स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. तो म्हणजे, ‘मला हे शिक्षण का घ्यायचंय?’ बरेच लोक आवडीचं काम मिळावं आणि चांगला पैसा कमवता यावा, म्हणून शिक्षण घेतात आणि यात काही चुकीचं नाही. (१ तीम. ५:८) पण, पैसाच सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच आपलं संरक्षण होऊ शकतं असा विचार करणं किती धोक्याचं आहे याबद्दल बायबल आपल्याला सांगतं. (नीति. २३:४, ५; १ तीम. ६:८-१०; १ योहा. २:१७) शिक्षण घेण्यामागचा तुमचा हेतू धनसंपत्ती आणि मोठं नाव कमवणं असेल तर तुम्हाला कधीच खरं समाधान मिळणार नाही. तसंच, यहोवासोबतचं तुमचं नातंही धोक्यात येऊ शकतं.
८-९. (क) शिक्षण आपल्यासाठी कितपत महत्त्वाचं असलं पाहिजे? (मत्तय ६:३३) (ख) जोसेफिना, मॉरीन आणि आयरिसच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
८ लक्षात असू द्या, यहोवाची सेवा करण्यापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट आपल्या जीवनात जास्त महत्त्वाची असू नये. (मत्त. २२:३७, ३८; फिलिप्पै. ३:८) यहोवाची सेवा पूर्ण मनाने करणं हा आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे आणि त्यासाठी गरजेच्या गोष्टी मिळवता याव्यात या हेतूने आपण शिक्षण घेतलं पाहिजे.—मत्तय ६:३३ वाचा.
९ काही भाऊबहिणींना आणखी शिक्षण घेण्याबद्दल योग्य दृष्टिकोन कसा ठेवता आला याचा विचार करा. चिलीमध्ये राहणारी जोसेफिना म्हणते: “यहोवाच्या सेवेला आणखी वेळ देता येईल अशी एखादी नोकरी मला करायची होती. त्यामुळेच मी आणखी शिक्षण घेतलं. पण शिक्षण घेताना मी या गोष्टीची खातरी केली, की यहोवासोबतचं माझं नातं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असेल आणि शिक्षण कधीच त्याची जागा घेणार नाही.” दुसरी एक बहीण मॉरीन, हिने हेअर स्टायलिस्ट बनण्यासाठी एक वर्षाचा कोर्स केला. ती म्हणते: “मला जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करायची होती. हेअर स्टायलिस्ट म्हणून काम केल्यामुळे मला तिथे जायला काही पैसे साठवता आले. आणि तिथे गेल्यावरही मला हे काम करता आलं.” आयरिस नावाच्या एका बहिणीने डेंटिस्ट बनण्यासाठी शिक्षण घेतलं. हा कोर्स थोडा मोठा होता. ती म्हणते: “आणखी शिक्षण घेतल्यामुळे काही फायदे तर होतात, पण त्यामुळे कधीच खरं समाधान आणि यश मिळू शकत नाही. फक्त यहोवाच्या उपासनेला पहिली जागा दिल्यामुळेच ते मिळू शकतं.” खरंच, आपण यहोवासोबतच्या आपल्या मैत्रीला सगळ्यात जास्त महत्त्व देतो, तेव्हा आपल्याला चांगले निर्णय घेता येतात आणि त्यामुळे आपण कायम आनंदी राहू शकतो.
पूर्ण माहिती काढा
१०. अनुवाद ३२:२९ यात दिलेल्या तत्त्वामुळे आणखी शिक्षण घेण्याच्या बाबतीत कशी मदत होऊ शकते?
१० तुम्ही कदाचित एखादा विशिष्ट कोर्स करायचा विचार करत असाल. पण फक्त त्या एकाच कोर्सचा विचार न करता तुमच्यासमोर असलेल्या इतर पर्यायांचाही विचार करा. (नीतिवचनं १८:१७ सोबत तुलना करा.) शिक्षण घेण्यासाठी आधी उपलब्ध नव्हते असे कितीतरी पर्याय आज उपलब्ध आहेत. जसं की, आज बरेच ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहेत. पण कदाचित आणखी शिक्षण न घेताही तुम्हाला नोकरी मिळवता येऊ शकते. या पर्यायाकडेसुद्धा दुर्लक्ष करू नका. फिनलंडमध्ये राहणाऱ्या जोआनाने तेच केलं. ती म्हणते: “शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी पार्ट-टाईम नोकरी करू लागले आणि पायनियर सेवाही करायला सुरुवात केली. मी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आणि असं करत असताना यहोवाने माझ्या सगळ्या गरजा कशा पुरवल्या हे मी पाहू शकले.” आणखी शिक्षण घेण्याबद्दल तुम्ही कुठलाही निर्णय घेतला तरी त्याचे काही फायदे आणि काही तोटे असणारच हे विसरू नका. म्हणून स्वतःला विचारा: ‘माझ्या निर्णयाचे फायदे जास्त होतील की तोटे?’ (अनुवाद ३२:२९ वाचा; १ करिंथ. १०:२३) या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला काही गोष्टींचा विचार करू या.
११. आपण जे शिक्षण निवडतो त्यात आपला किती वेळ जाईल याचा विचार करणं का महत्त्वाचं आहे? (चित्रंसुद्धा पाहा.)
११ किती वेळ खर्च करावा लागेल? कोर्ससाठी, क्लाससाठी आणि अभ्यासासाठी आठवड्यातले किती तास खर्च करावे लागतील याचा विचार करा. या गोष्टी करत असताना आध्यात्मिक गोष्टींसाठी आणि घरच्या जबाबदाऱ्यांसाठी तुमच्याकडे वेळ उरेल का हेही लक्षात घ्या. (फिलिप्पै. १:१०) तसंच, तुमच्या कोर्समुळे तुम्हाला इतकं थकायला होईल का, की तुमच्याकडे सभांची तयारी करायला आणि वैयक्तिक अभ्यास करायला वेळच उरणार नाही याचाही विचार करा. भारतात राहणाऱ्या जेरोझ या भावासोबत असंच काहीसं घडलं. तो म्हणतो: “माझ्या शिक्षणामुळे मला आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष देणं खूप कठीण गेलं. कधीकधी माझ्या सभाही चुकायच्या. आज मी त्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा मला वाटतं, की मी माझा वेळ आणि शक्ती वाया घालवली.” पण काही कोर्ससाठी खूप वेळ द्यावा लागत नाही आणि त्याचा जास्त अभ्यासही नसतो. मोझाम्बिकमध्ये राहणाऱ्या राबेकाने असाच एक कोर्स केला. आणि त्याबद्दल ती खूश आहे. ती म्हणते: “मला यासाठी दिवसांतले फक्त दोन तास द्यावे लागायचे. म्हणून मी पायनियर सेवाही करू शकले.”
जर तुम्ही आणखी शिक्षण घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडायला वेळ मिळेल याची खातरी करा (परिच्छेद ११ पाहा)
१२. वेळेचा चांगला उपयोग करता यावा म्हणून तुम्ही कोणत्या प्रश्नांचा विचार करू शकता? (उपदेशक १२:१)
१२ शिक्षण पूर्ण करायला किती वेळ लागेल? यासाठी पुढे दिलेल्या प्रश्नांचा विचार करा. तुम्ही निवडलेलं शिक्षण पूर्ण करायला किती महिने किंवा वर्षं लागतील? हे शिक्षण घेताना तुम्ही तुमच्या वेळेचा सगळ्यात चांगला उपयोग करताय हे दिसून येईल का? (इफिस. ५:१५-१७) तुम्ही तरुण असाल तर हे शिक्षण घेत असताना तुम्हाला यहोवाला तुमचं सगळ्यात चांगलं ते देता येईल का? शक्य असेल तर तरुणपणातच तुम्हाला पूर्ण वेळची सेवा करता येईल का? (उपदेशक १२:१ वाचा.) तुम्हाला ज्या क्षेत्रात नोकरी करायची आहे त्या क्षेत्रातला एखादा कमी वेळेचा कोर्स उपलब्ध आहे का? जसं की, युनिव्हर्सिटीच्या तुलनेत कमी पैसा आणि वेळ खर्च होईल असा एखादा व्यावसायिक किंवा टेक्निकल कोर्स तुम्ही निवडू शकता का? चिलीमध्ये राहणाऱ्या मारिओच्या अनुभवाचा विचार करा. तो म्हणतो: “मी युनिव्हर्सिटीपेक्षा कमी खर्चात होणारा दोन वर्षांचा एक टेक्निकल कोर्स करायचं ठरवलं. यासाठी मला आठवड्यातले फक्त चार दिवस क्लाससाठी जावं लागायचं. यामुळे मला पायनियर सेवा करता आली.”
१३. शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला घरापासून दूर जावं लागलं तर काय होऊ शकतं?
१३ शिक्षण कुठे घ्याल? कदाचित तुम्ही जे शिक्षण घ्यायचं ठरवाल त्यासाठी तुम्हाला घरापासून दूर जायची गरज पडणार नाही. पण जर शिक्षणासाठी तुम्हाला दुसऱ्या शहरात जावं लागणार असेल तर काय? किंवा त्यासाठी तुम्हाला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहावं लागणार असेल तर काय? लक्षात ठेवा, की घरापासून दूर राहिल्यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं बिघडू शकतं. खासकरून, तुम्हाला सत्यात नसलेल्या लोकांसोबत राहावं लागणार असेल तर. (नीति. २२:३; १ करिंथ. १५:३३) मोझाम्बिकमध्ये राहणाऱ्या मतायसने कमी खर्चाचा, एका वर्षाचा कोर्स करायचं ठरवलं. पण तरी त्याला त्याचा पस्तावा झाला. तो म्हणतो: “मला बोर्डिंगमध्ये राहावं लागलं आणि तिथे राहून मला चुकीच्या गोष्टी करायचा मोह होऊ लागला. माझ्या मते, तुम्हाला कुटुंबापासून लांब राहून शिक्षण घ्यावं लागणार असेल तर असं शिक्षण घेऊच नका.” रशियामध्ये राहणारी एक बहीण म्हणते: “शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी हॉस्टेल किंवा बोर्डिंगमध्ये राहिले नाही. त्यामुळे मला बरेच धोके टाळता आले.” तुम्हाला एखादा ऑनलाईन कोर्ससुद्धा करता येऊ शकतो का, याचाही तुम्ही विचार करू शकता.
१४. लूक १४:२८ मधल्या तत्त्वाचा आणखी शिक्षण घेण्याबाबतीत तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
१४ किती खर्च होईल? काही प्रकारचं शिक्षण खर्चिक नसतं. तर कधीकधी शिक्षणासाठी सरकार सवलती किंवा स्कॉलरशीपही देतं. यामुळे, एखाद्या नोकरीसाठी लागणारं कौशल्य मिळवायला जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. पण काही प्रकारचं शिक्षण खूप खर्चिक असू शकतं. एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये नुसता प्रवेश मिळवायला तुम्हाला प्रवेश परीक्षेत चांगले मार्क मिळवावे लागतील. आणि त्याच्या तयारीसाठी तुम्हाला ट्युशनला जावं लागू शकतं. या सगळ्यासाठी खूप पैसा ओतावा लागू शकतो. काही जणांनी शिक्षणासाठी मोठमोठे कर्ज घेतले आणि ते फेडायला त्यांना बरीच वर्षं लागली. मोझाम्बिकमध्ये राहणाऱ्या अडिलसनला आपल्या निर्णयाचा पस्तावा झाला. तो म्हणतो: “माझ्या कुटुंबाने अक्षरशः पोटाला चिमटा काढून माझ्या चार वर्षांच्या कोर्सचा खर्च भागवला.” म्हणून शिक्षणाबद्दल निर्णय घेताना स्वतःला विचारा: ‘यासाठी मला किती पैसा खर्च करावा लागेल? मला किंवा माझ्या कुटुंबाला इतका खर्च झेपेल का? कमी खर्चात शिक्षण घेता येईल असा एखादा पर्याय उपलब्ध आहे का?’ (लूक १४:२८ वाचा.) ‘मी कर्ज घेतलं, तर ते फेडायला मला किती वर्षं लागतील? मला जी नोकरी मिळेल त्यामुळे मला माझा खर्च भागवण्यासोबतच कर्जही फेडता येईल का?’—नीति. २२:७.
१५. एखाद्या प्रकारचं शिक्षण घेण्यापूर्वी त्या क्षेत्रात कामाच्या किती संधी आहेत हे पडताळून पाहणं का गरजेचं आहे?
१५ खरंच कामाची संधी आहे का? तुम्ही जिथे राहता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला राहायला जायचंय तिथे कामाच्या किती संधी उपलब्ध आहेत याचा विचार करा. स्वतःला विचारा: ‘जे शिक्षण घ्यायचा मी विचार करतोय त्यामुळे मला खरंच काम मिळेल का?’ बहुतेक कोर्समध्ये कामासाठी लागणारं व्यावहारिक ज्ञान दिलं जात नाही. उलट फक्त पुस्तकी ज्ञान किंवा तत्त्वज्ञान शिकवण्यावरच जास्त भर दिला जातो. (कलस्सै. २:८) भारतात राहणारी आपली एक बहीण म्हणते: “मी केलेल्या कोर्समध्ये नोकरीसाठी गरजेची असलेली कौशल्यं शिकवलीच गेली नाहीत. त्यामुळे मी जे शिक्षण घेतलं त्या क्षेत्रात मला नोकरी मिळाली नाही.” दुसरीकडे, काही कोर्समध्ये व्यावहारिक ज्ञान तर दिलं जातं, पण त्या क्षेत्रात नोकरीच्या संधी खूप कमी असतात. आफ्रिकेत राहणाऱ्या सुबलाईमने ए.सी. दुरुस्त करायचा कोर्स केला होता. पण तो म्हणतो: “मी राहतो त्या ठिकाणी सगळे लोक त्यांची उपकरणं स्वतःच दुरुस्त करतात. म्हणून इतक्या सहजासहजी काम मिळत नाही.”
१६. आपण घेत असलेल्या शिक्षणामुळे कोणत्या प्रकारचं काम मिळेल याचा विचार करणं का गरजेचं आहे?
१६ तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारचं काम मिळेल याचाही विचार करा. तुम्हाला ते काम करायला आवडेल का? (उप. ३:१२, १३) कामाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे लोक असतील? तिथे काम करणं सुरक्षित असेल का? तिथे चढाओढ असेल का? कामाचा खूप ताण असेल का? पगार किती मिळेल? सगळ्या गरजा भागतील का? नोकरी टिकवून ठेवण्यासाठी पुढेही शिक्षण घेत राहावं लागेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या नोकरीमुळे यहोवाच्या सेवेला जीवनात पहिली जागा देता येईल का? (उप. १२:१३) हे खरंय, की ज्या ठिकाणी कामाच्या कमी संधी उपलब्ध असतात तिथे आपल्या आवडीनिवडी कदाचित बाजूला ठेवाव्या लागतील. पण अशा वेळीही जर तुम्ही विचार करून एखादा कोर्स निवडला तर पुढे तुम्हाला काम मिळू शकतं. भारतात राहणाऱ्या तबीथाने सहा महिन्यांचा शिवणकामाचा कोर्स केला. ती म्हणते: “हे काम केल्यामुळे मला पायनियर सेवा करता येईल असा मी विचार केला. कारण या कामाला डिमांड खूप जास्त आहे, मी माझ्या वेळेत हे काम करू शकते आणि याला जास्त भांडवलही लागत नाही.” तबीथाने केलेल्या या कोर्समुळे तिला कामासोबत पायनियर सेवाही करता आली.
१७. (क) शिक्षणाबद्दल योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला आणखी माहिती कशी शोधता येईल? (ख) तुम्हाला कोणत्या बायबल तत्त्वांमुळे मदत होऊ शकते? (“या तत्त्वांचा विचार करा” ही चौकट पाहा.)
१७ आपण या लेखात बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पण शिक्षणाबद्दल योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला आणखी माहिती कशी शोधता येईल? तुमच्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल माहिती काढायला कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटला किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट द्या. त्या क्षेत्रात कामाच्या किती संधी आहेत याची माहिती काढा. ज्यांनी या किंवा यांसारख्या क्षेत्रात शिक्षण घेतलंय किंवा काम केलंय त्यांच्याशी बोला. (नीति. १३:१०) त्यांना विचारा: “या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आणि काम करायचे फायदे आणि तोटे काय आहेत?” तसंच, यहोवाची आनंदाने सेवा करत असलेल्या भाऊबहिणींचाही सल्ला घ्या. (नीति. १५:२२) ते कदाचित तुम्हाला अशा एखाद्या क्षेत्राबद्दल सांगतील ज्याबद्दल तुम्ही आधी कधीच विचार केला नसेल.
१८. आपण कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे?
१८ आपण आतापर्यंत चर्चा केल्याप्रमाणे, आणखी शिक्षण घेण्याचे काही फायदे तर काही तोटे आहेत. म्हणून प्रार्थना करून निर्णय घ्या. आणखी शिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला कदाचित चांगली नोकरी मिळेल आणि चांगला पैसाही कमवता येईल. पण खरा आनंद हा फक्त यहोवासोबतच्या जवळच्या मैत्रीमुळेच मिळू शकतो हे विसरू नका. (स्तो. १६:९, ११) तुमचं शिक्षण कमी असो किंवा जास्त, यहोवा तुम्हाला कधीच सोडणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा. (इब्री १३:५) पण तुम्ही आणखी शिक्षण घ्यायचं ठरवलं असेल, तर तुम्ही यहोवासोबतचं तुमचं नातं कसं जपू शकता? याबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.
गीत ४५ माझ्या मनातले विचार
a शब्दाचा अर्थ: या आणि पुढच्या लेखात आणखी शिक्षण हे शब्द या अर्थाने वापरण्यात आले आहेत: शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर घेतलं जाणारं कोणतंही शिक्षण किंवा ट्रेनिंग. जसं की, व्यावसायिक शिक्षण, टेक्निकल कोर्स, कॉलेज, युनिव्हर्सिटी, अपरेंटिसशिप इत्यादी.
b पूर्वी आपल्या प्रकाशनांमध्ये विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेऊ नये असं प्रोत्साहन देण्यात आलं होतं. उदाहरणार्थ, १ ऑक्टोबर २००५ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या “पालकांनो—तुमच्या मुलांकरता तुम्हाला कशाप्रकारचे भविष्य हवे आहे?” या लेखात विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेण्यात कोणते धोके असू शकतात याबद्दल सांगितलं होतं. हे खरंय, की हे धोके आजही आहेत. पण आणखी शिक्षण घ्यावं की नाही हा प्रत्येक भाऊबहिणीचा आणि मुलांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंब प्रमुखाचा वैयक्तिक निर्णय आहे. पण निर्णय घेण्याआधी प्रार्थना करणं, बायबलच्या तत्त्वांचा विचार करणं आणि त्या कोर्सच्या बाबतीत चारही बाजूंनी नीट विचार करणं गरजेचं आहे. जर एखाद्याने आणखी शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला, तर भाऊबहिणींनी इतकंच काय तर मंडळीतल्या वडिलांनीही त्याच्याबद्दल मत बनवू नये किंवा त्याची टीका करू नये.—याको. ४:१२.