२७ जुलै–२ ऑगस्ट, २०२६
गीत ५६ सत्याच्या मार्गावर चालत राहा!
आणखी शिक्षण घेताना यहोवासोबतची मैत्री टिकवून ठेवा
“आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.”—फिलिप्पै. ३:१६.
या लेखात:
तुम्ही आणखी शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला, तर तुम्हाला कोणत्या चार बायबल तत्त्वांमुळे यहोवासोबतचं नातं टिकवून ठेवायला मदत होऊ शकते ते पाहा.
१-२. (क) तुम्ही आणखी शिक्षण घ्यायचं ठरवलं तर तुम्ही काय केलं पाहिजे? (क) ‘त्याच मार्गाने पुढेही नीट चालत राहा’ या शब्दांचा काय अर्थ होतो? (फिलिप्पैकर ३:१६)
काही भाऊबहिणींनी शालेय शिक्षण संपल्यानंतर आणखी शिक्षण घ्यायचं ठरवलंय. कारण यामुळे त्यांना चांगलं काम मिळेल आणि यहोवाची चांगल्या प्रकारे सेवा करता येईल असं त्यांना वाटतं. तुम्हीही जर आणखी शिक्षण घ्यायचं ठरवलं असेल, तर यहोवासोबतची तुमची मैत्री टिकून राहील याची तुम्ही खातरी कशी करू शकता? (याको. ४:८क) यहोवासोबतची तुमची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही शाळेत असतानाही मेहनत घेतली असेल, तशीच पुढेही घेत राहण्याची गरज आहे. बायबलमध्ये म्हटलंय: “आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.”—फिलिप्पैकर ३:१६ वाचा.
२ ‘त्याच मार्गाने पुढेही नीट चालत राहा’ या वाक्यांशासाठी असलेला ग्रीक शब्द, सैनिकांची तुकडी सोबत मिळून, न थांबता, मागे न वळता पुढे चालत राहते याला सूचित करायला सहसा वापरला जायचा. जर तुम्ही आणखी शिक्षण घ्यायचं ठरवलं असेल, तर तुम्हालाही न थांबता किंवा मागे न वळता यहोवाच्या सेवेत पुढे चालत राहायचंय. यासाठी तुम्हाला मदत व्हावी म्हणून या लेखात आपण चार बायबल तत्त्वांवर चर्चा करणार आहोत. ही तत्त्वं तुमच्यासाठी काही नवीन नाहीत. तुम्ही आधीसुद्धा ही लागू केली आहेत. पण आणखी शिक्षण घेताना आणि ते पूर्ण झाल्यावरही तुम्हाला ही तत्त्वं लागू करत राहायची गरज आहे.
यहोवासोबतची मैत्री घट्ट करण्यासाठी मेहनत घेत राहा
३. आणखी शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यावर तुमच्यासमोर कोणतं आव्हान येऊ शकतं?
३ हे करणं कठीण का आहे? आणखी शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यावर तुमची ओढाताण होऊ शकते. तुम्हाला साहजिकच चांगले मार्क मिळवायची इच्छा असेल. त्यामुळे कदाचित तुम्ही यहोवाच्या सेवेला कमी महत्त्व देऊ लागाल. कदाचित तुमचं सभांकडे, प्रचाराकडे, वैयक्तिक अभ्यासाकडे आणि प्रार्थनेकडे दुर्लक्ष होऊ शकतं.—प्रकटी. २:४.
४. ‘प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहायला’ तुम्हाला कशामुळे मदत होईल? (१ करिंथकर १५:५८)
४ १ करिंथकर १५:५८ वाचा. जर आपण सायकलचं पेडल मारत राहिलो, तरच ती चालत राहील. त्याच प्रकारे, आपण यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिलो, तरच त्याच्यासोबतचं आपलं नातं मजबूत राहील. म्हणूनच बायबल असं म्हणतं: “प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा.” यहोवाची सेवा फक्त नावापुरती करू नका. तर तुमच्यासाठी ती सगळ्यात जास्त महत्त्वाची असली पाहिजे आणि त्यानंतर तुमचं शिक्षण. (मत्त. २२:३७) आपली एक तरुण बहीण समॅन्था म्हणते: “मी ठरवलं होतं, की माझं शिक्षण जर यहोवाच्या सेवेच्या आड आलं, तर मी ते सोडून देईन.”
५. यहोवाच्या सेवेत व्यस्त राहायला तुम्ही काय केलं पाहिजे?
५ आणखी शिक्षण घ्यायला सुरू करण्याआधी तुम्ही काय करू शकता? तुम्ही यहोवाच्या सेवेला सगळ्यात जास्त महत्त्व द्याल याची खातरी करा. स्वतःला विचारा: ‘नियमितपणे सभांना आणि प्रचाराला जायला तसंच वैयक्तिक अभ्यास करायला मी काय करू शकतो?’ (यहो. १:८; मत्त. २८:१९, २०; इब्री १०:२५) तसंच, शाळेत असताना तुम्ही या गोष्टींना पहिली जागा द्यायला काय केलं होतं याचाही विचार करा. तेव्हा जर तुम्ही असं करण्यात कमी पडला होता, तर पुन्हा तसं होऊ नये म्हणून तुम्ही आता काय करू शकता? आणखी शिक्षण घेताना यहोवाच्या सेवेत व्यस्त राहायचा निश्चय करा. शिक्षणाकडे लक्ष द्या; पण यहोवासोबतचं तुमचं नातं धोक्यात घालू नका.a—मत्त. ६:२४.
६. स्वतःचं परीक्षण करायला तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
६ दर महिन्याला स्वतःचं परीक्षण करा. स्वतःला विचारा: ‘मी आताही यहोवाच्या सेवेला पहिली जागा देतोय का?’ धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. जसं की, तुम्ही सभा चुकवू लागला आहात का? किंवा सभेला उशीरा येऊ लागला आहात का? सभा सुरू असतानाही तुम्ही फक्त अभ्यासाचाच विचार करता का? तुम्ही अलिकडे सभेला ऑनलाईन उपस्थित राहू लागला आहात का? तसंच, तुमची प्रार्थना करायची आणि बायबल वाचायची सवय मोडली आहे का? तुम्ही प्रचाराला जायचं म्हणून जाता का? प्रचारात गेल्यावर मी कधी एकदाचा घरी जाईन असं तुम्हाला वाटतं का? या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर पटकन पाऊल उचला. तुमच्या शिक्षणाला कधीच यहोवाच्या सेवेच्या आड येऊ देऊ नका. फक्त यहोवाच्या सेवेलाच जीवनात पहिली जागा द्या.
शिक्षणामुळे यहोवाच्या सेवेला पहिली जागा द्यायचं सोडू नका (परिच्छेद ६ पाहा)
‘विचारशक्तीचं रक्षण करा’
७. काही प्रकारच्या शिक्षणाचा आपल्या विचारसरणीवर कसा प्रभाव होऊ शकतो?
७ हे करणं कठीण का आहे? काही प्रकारच्या शिक्षणात “जगाच्या विचारसरणीनुसार असलेलं तत्त्वज्ञान आणि निरर्थक अशा फसव्या गोष्टी” शिकवल्या जातात. त्यात नास्तिकवाद आणि उत्क्रांतिवादाची शिकवणसुद्धा सामील आहे. (कलस्सै. २:८) तसंच, त्यात फक्त स्वतःवर भरवसा ठेवायलाही शिकवलं जातं. एक तरुण भाऊ असं म्हणतो: “आम्हाला फक्त कौशल्यच नाही, तर विचार करायची एक विशिष्ट पद्धतही शिकवली जायची. आणि ही विचारसरणी यहोवाच्या विचारसरणीच्या अगदी उलट होती. जसं की, जर आपण स्वतःवर भरवसा ठेवला तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असं आम्हाला शिकवलं जायचं. यामुळे आनंदी राहण्यासाठी मला यहोवाच्या मदतीची गरज नाही असा मी विचार करू लागलो. म्हणून यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवणं मला कठीण जाऊ लागलं.”
८. ‘आपल्या विचारशक्तीचं रक्षण करणं’ का गरजेचं आहे? (नीतिवचनं ५:१, २)
८ नीतिवचनं ५:१, २ वाचा. बायबल आपल्याला आपल्या ‘विचारशक्तीचं रक्षण करायचं’ प्रोत्साहन देतं. सहसा ज्या गोष्टींवर हल्ला होऊ शकतो, त्याच गोष्टींचं रक्षण करावं लागतं. आणि हे आपल्या विचारशक्तीच्या बाबतीतही खरंय. (१ पेत्र ५:८) जगाच्या विचारसरणीचा आपल्या विचारसरणीवर जबरदस्त प्रभाव होऊ शकतो. नैतिकता, जीवनाची सुरुवात किंवा देवाचं अस्तित्व याबाबतीत असलेल्या आपल्या विश्वासाबद्दल आपल्या मनात शंका येऊ शकते. लोकांना वाटतं, उच्च शिक्षणामुळे त्यांचे विचारही “उच्च” होतात. पण खरंतर “या जगाची बुद्धी ही देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे” असं बायबलमध्ये म्हटलंय.—१ करिंथ. ३:१८-२०.
९. तुम्ही तुमच्या विचारशक्तीचं रक्षण कसं करू शकता?
९ आणखी शिक्षण घ्यायला सुरू करण्याआधी तुम्ही काय करू शकता? आणखी शिक्षण घेण्याआधी बायबलमधल्या शिकवणींवरचा तुमचा विश्वास पक्का करा. यामुळे तुम्हाला तुमच्या विचारशक्तीचं रक्षण करता येईल. यासाठी तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘देव खरंच अस्तित्वात आहे असं मी का मानतो? बायबल देवाचं वचन आहे असं मला का वाटतं? जगाच्या स्तरांपेक्षा बायबलचे नैतिक स्तर खूप उच्च आहेत याची मला खातरी का आहे?’ तसंच, याचाही विचार करा: ‘शाळेत उत्क्रांतीबद्दल शिकवलं होतं तेव्हा माझा विश्वास डगमगला होता का? इतर मुलांची अनैतिक जीवनशैली पाहून मलाही तसं वागायचा मोह झाला होता का?’ जर याबाबतीत तुम्ही त्या वेळी कमी पडला असाल, तर त्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही आता तुमचा इरादा पक्का कसा करू शकता याचाही विचार करा. खरंच, आणखी शिक्षण घेण्याआधी आपल्या विचारशक्तीचं रक्षण करायचा निश्चय पक्का करणं खूप गरजेचं आहे.—२ तीम. २:१६-१८.b
१०. आणखी शिक्षण घेत असताना तुम्ही तुमच्या विचारशक्तीचं रक्षण कसं करू शकता?
१० आणखी शिक्षण घेत असतानाही वेळोवेळी स्वतःला विचारा: ‘जगातल्या लोकांची जीवनशैली आता मला चांगली वाटू लागली आहे का? जगातलं तत्त्वज्ञान म्हणजे फक्त लोकांचे पोकळ विचार आहेत आणि त्यात काहीच तथ्य नाही हे मला ओळखता येतं का? मानवांच्या सगळ्या समस्या फक्त देवाचं राज्यच काढून टाकू शकतं यावर माझा पूर्ण भरवसा आहे का?’ तुम्ही जर नियमितपणे बायबलचा अभ्यास केला, तर तुम्हाला तुमच्या विचारशक्तीचं रक्षण करता येईल. तसंच, वाचलेल्या गोष्टींवर मनन केल्यामुळे बायबलमधल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत यावरचा तुमचा भरवसाही वाढेल.—१ तीम. ४:१५.
वेळेचं चांगलं नियोजन करा
११. शिक्षण घेताना वेळेचं नियोजन करणं कठीण का जाऊ शकतं?
११ हे करणं कठीण का आहे? आणखी शिक्षण घेत असताना वेळेचं नियोजन करणं कठीण जाऊ शकतं. खासकरून, परीक्षेचा अभ्यास करायचा असतो आणि एखादं प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करायचं असतं तेव्हा. जर तुम्ही विचार करून वेळेचं नियोजन केलं नाही, तर तुम्हाला ताण येऊ शकतो आणि तुमची दगदग होऊ शकते. म्हणून शिक्षण घेताना स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या तब्येतीचीही काळजी घ्या.
१२. शिक्षण घेत असताना काय केल्याने आपण ‘वेळेचा चांगला उपयोग करतोय’ असं म्हणता येईल? (इफिसकर ५:१५, १६)
१२ इफिसकर ५:१५, १६ वाचा. आणखी शिक्षण घेताना एकाच वेळी बऱ्याच गोष्टी कराव्या लागत असल्यामुळे ‘वेळेचा चांगला उपयोग करणं’ कठीण जाऊ शकतं. हे खरंय, की तुम्हाला अभ्यास करणं भाग आहे. पण घरच्यांसोबत आणि भाऊबहिणींसोबत वेळ घालवणं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे हे लक्षात असू द्या. (स्तो. १३३:१; नीति. १८:१) तसंच, आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा आपल्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची असू नये. (मत्त. ६:३३) तुमच्यावर कदाचित घरची जबाबदारी असेल आणि त्यासाठी तुम्हाला नोकरीही करावी लागत असेल. तसंच, तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी पुरेशी झोप घेणं आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. (उप. ४:६; १ तीम. ४:८) या सगळ्या गोष्टी करायला वेळेचं चांगलं नियोजन करणं खूप गरजेचं आहे.
१३. वेळेचा चांगला उपयोग करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
१३ आणखी शिक्षण घ्यायला सुरू करण्याआधी तुम्ही काय करू शकता? चांगल्या योजना केल्यामुळे यश मिळतं असं बायबलमध्ये सांगितलंय. (नीति. २१:५) ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे तुम्हाला आणखी शिक्षण सुरू करण्याआधी चांगला आराखडा बनवायला मदत होईल. विचार करा: ‘शाळेत असताना तुम्ही वेळेचं नियोजन कसं केलं होतं? जर याबाबतीत तुम्ही त्या वेळी कमी पडला असाल, तर आता तुम्ही कोणते फेरबदल करू शकता?’ नेहमी लक्षात ठेवा, वेळेला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका, तर तुम्ही वेळेला ताब्यात ठेवा. याचा काय अर्थ होतो? जर तुम्ही चांगला आराखडा बनवला, तर सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल.c
१४. तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकता?
१४ आणखी शिक्षण घेत असतानाही वेळोवेळी स्वतःला विचारा: ‘मला पुरेशी झोप घ्यायला आणि व्यायाम करायला वेळ मिळतो का? मला भाऊबहिणींसोबत वेळ घालवायला जमतं का? मला माझा अभ्यास वेळेवर पूर्ण करता येतो का? जर नाही, तर का नाही? माझ्याकडे करायला बऱ्याच गोष्टी आहेत म्हणून, की मी आजचं काम उद्यावर ढकलतोय म्हणून? मला स्वतःमध्ये काही बदल करायची गरज आहे असं इतरांना आणि माझ्या घरच्यांनाही वाटतं का?’ जर तुम्हाला तुमच्या आराखड्यात बदल करायची किंवा स्वतःला शिस्त लावायची गरज असल्याचं जाणवलं, तर लगेच पाऊल उचला. जर तुम्हाला याबाबतीत मदतीची गरज असेल, तर ज्यांना वेळेचा चांगला उपयोग करता येतो त्यांच्याशी बोला.—नीति. ११:१४.
“बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल”
१५. आणखी शिक्षण घेताना कोणती समस्या येऊ शकते?
१५ हे करणं कठीण का आहे? आणखी शिक्षण घेत असताना तुमचे वर्गसोबती तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला सांगू शकतात. आणि तुम्हालाही तसं करावसं वाटू शकतं. तुम्हाला असंही वाटेल, की तुमच्या आवडीनिवडी भाऊबहिणींपेक्षा वर्गसोबत्यांशी जास्त जुळतात. कारण साहजिकच तुम्ही वर्गात त्यांच्यासोबत वेळ घालवता. पण खरंतर हा एक धोक्याचा इशारा आहे. तुमच्या वर्गसोबत्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या असल्या, तरी तुमच्यात खूप फरक आहे. तुम्हाला यहोवाला खूश करायची इच्छा आहे, पण तुमचे वर्गसोबती तसा विचार करत नाहीत. तुम्ही जितका जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवाल तितकं जास्त त्यांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर होईल. (१ करिंथ. १५:३३) आणि हे किती खरंय हे मायकलला जाणवलं. त्याने चार वर्षांची इलेक्ट्रीकल अपरेंटिसशिप केली. तो म्हणतो: “मी आठवड्यातले ४० पेक्षा जास्त तास कामावरच्या सोबत्यांसोबत घालवायचो. विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा, ते ज्या प्रकारचं संगीत ऐकायचे त्याचा आणि त्यांच्या घाणेरड्या भाषेचा माझ्यावर प्रभाव होऊ लागला होता.”
१६. “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल” याचा काय अर्थ होतो? (नीतिवचनं १३:२०)
१६ नीतिवचनं १३:२० वाचा. चुकीच्या लोकांसोबत मैत्री केल्यामुळे आपल्याला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागू शकतो, असं बायबलमध्ये लिहिलंय. पण, “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल” असंसुद्धा त्यात लिहिलंय. त्यामुळे हे स्पष्ट आहे, की आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो, त्यांच्यासारखंच बनतो. म्हणून जे तुमच्या भल्याचा विचार करतात आणि ज्यांना तुमच्यासारखं यहोवाची मनापासून सेवा करायची इच्छा आहे अशांसोबत मैत्री करा.—स्तो. १०१:६, ७; ११९:६३.
१७. चुकीची संगत टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
१७ आणखी शिक्षण घ्यायला सुरू करण्याआधी तुम्ही काय करू शकता? तुम्ही वर्गसोबत्यांसोबत किती वेळ घालवाल हे आधीच ठरवा. आपला भाऊ ट्रेंटन म्हणतो: “मी माझ्या वर्गातल्या मुलांसोबत चांगलं वागतो. पण क्लासनंतर मी त्यांच्यासोबत वेळ घालवत नाही. ते फक्त माझे वर्गसोबती आहेत, जवळचे मित्र नाहीत.” वर्गसोबत्यांसोबत किती वेळ घालवायचा हे तुम्ही कसं ठरवाल? विचार करा: शाळेत असताना तुम्ही हे कसं केलं होतं? जर याबाबतीत तुम्ही त्या वेळी कमी पडला असाल, तर आता तुम्ही कोणते फेरबदल करू शकता? जे यहोवावर प्रेम करत नाहीत त्यांच्यासोबत संगती करायचं टाळा आणि ‘बुद्धिमानांसोबत चालत’ राहायचा निश्चय करा.d
१८. स्वतःचं परीक्षण केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१८ वेळोवेळी स्वतःचं परीक्षण करण्यासाठी स्वतःला विचारा: ‘माझ्या वर्गसोबत्यांसोबत मी आधीपेक्षा जास्त वेळ घालवतोय का? त्यांच्या सवयींचा, वागण्या-बोलण्याचा माझ्यावर प्रभाव होतोय का? याबद्दल यहोवाला कसं वाटत असेल?’ (स्तो. १:१) जर तुमच्यात काही बदल झाल्याचं तुम्हाला जाणवत असेल, तर लगेच पाऊल उचला. तुमचे सगळ्यात जवळचे मित्र तुमच्यासारखंच यहोवावर प्रेम करणारे असले पाहिजेत. तसंच, तुमच्या वर्गसोबत्यांना साक्ष द्यायला मागेपुढे पाहू नका. इतर कोणाहीपेक्षा तुमच्याकडे त्यांना साक्ष द्यायची संधी आहे हे विसरू नका.
तुमच्या वर्गसोबत्यांना साक्ष द्यायला मागेपुढे पाहू नका (परिच्छेद १८ पाहा) e
तयार असा
१९. आणखी शिक्षण घेताना येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही आताच कसं तयार राहू शकता? उदाहरण द्या.
१९ एक गिर्यारोहक डोंगर चढण्याआधी सगळी तयारी करतो. जसं की, तो त्याच्या तब्येतीची काळजी घेतो, वातावरणाप्रमाणे योग्य कपडे घालतो आणि त्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवतो. वाटेत कोणकोणते अडथळे येतील हे त्याला माहीत नसलं, तरी या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत होऊ शकते. आणखी शिक्षण घेताना तुम्हीसुद्धा गिर्यारोहकासारखं तयार राहू शकता. तुम्ही तुमचा विश्वास मजबूत करू शकता आणि ‘देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करू’ शकता. तसंच, जगाच्या दृष्टीने यश मिळवायचा प्रयत्न न करता सगळ्या बाबतीत यहोवाचा गौरव करायचं ध्येय ठेवू शकता.—इफिस. ६:११-१३; १ करिंथ. ९:२६, २७; १०:३१.
२०. “तुम्ही विश्वासात आहात की नाही याची पारख” कशी करत राहू शकता?
२० बायबल आपल्याला असं उत्तेजन देतं: “तुम्ही विश्वासात आहात की नाही याची पारख करत राहा. तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे सतत तपासून पाहा.” (२ करिंथ. १३:५) आणखी शिक्षण घेत असतानाही तुम्ही हेच करू शकता. ते कसं? या लेखात दिलेल्या गोष्टींचा वेळोवेळी विचार करा. जसं की, यहोवासोबतचं नातं मजबूत करण्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात का? जगाच्या विचारसरणीचा तुमच्यावर प्रभाव होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या विचारशक्तीचं रक्षण करत आहात का? तुम्ही तुमच्या वेळेचं चांगलं नियोजन करत आहात का? वाईट संगतीपासून दूर राहून भाऊबहिणींसोबतचं नातं घट्ट करण्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात का? तुम्ही शिक्षण घेत असला, काम करत असला किंवा कुठेही असला तरी तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करत असला तरी तुमचा विश्वास मजबूत करायचा निश्चय करा. तुम्ही जर असं केलं तर तुम्ही खातरी बाळगू शकता की यहोवा तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल.—नीति. ३:५, ६.
गीत ८७ या आणि ताजेतवाने व्हा
a तुम्हाला यहोवाच्या सेवेत व्यस्त राहायला काय करता येईल याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी jw.org वरचा “नौजवानों के सवाल . . . बपतिस्मे के बाद मुझे क्या करना है? भाग 1—उपासना से जुड़े काम करते रहिए” हा लेख पाहा.
b तुम्ही तुमच्या विचारशक्तीचं रक्षण कसं करू शकता हे जाणून घेण्यासाठी मे २०१९ च्या टेहळणी बुरूज अंकातला “‘जगाच्या बुद्धीमुळे’ फसू नका!” हा लेख पाहा.
c तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन कसं करू शकता याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी, jw.org वर असलेला “नौजवानों के सवाल . . . समय का सही इस्तेमाल कैसे करें?” हा लेख पाहा.
d तुम्ही तुमचे मित्र काळजीपूर्वक कसे निवडू शकता हे पाहण्यासाठी कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला “विचार करून मित्र निवडा!” हा ४८वा धडा पाहा.
e चित्राचं वर्णन: हेअर स्टायलिस्ट बनण्याचा कोर्स करणारी एक बहीण, तिच्यासोबत शिकत असलेल्या एका मुलीला साक्ष देत आहे.