१३-१९ जुलै, २०२६
गीत १२७ यहोवाला हवं तसं मी बनेन!
बायबल तत्त्वं वापरून आपला विवेक प्रशिक्षित करा
“प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.”—गल. ६:५.
या लेखात:
आपल्या विवेकाने आपल्याला चांगलं मार्गदर्शन द्यावं म्हणून आपण त्याला बायबल तत्त्वांचा वापर करून कसं प्रशिक्षण देऊ शकतो ते पाहा.
१-२. (क) आदाम-हव्वाला यहोवाने कोणती भेट दिली होती? (ख) त्या भेटीबद्दल कदर असल्याचं ते कसं दाखवू शकले असते?
यहोवाने मानवांना एक खास भेट दिली आहे. ती म्हणजे इच्छास्वातंत्र्य. या भेटीमुळेच आपण विचार करून स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. या भेटीसाठी आपण खरोखर यहोवाचे किती आभारी आहोत! पण प्राण्यांच्या बाबतीत मात्र असं नसतं. आणि मशीनसुद्धा ज्या कामासाठी बनवलेली असते, तितकंच काम करते. पण माणूस यांपेक्षा वेगळा आहे. कारण बायबलमध्ये असं म्हटलंय, की यहोवाने पहिल्या मानवाला म्हणजेच आदामला त्याच्यासारखं किंवा त्याच्या प्रतिरूपात बनवलं होतं. (उत्प. १:२६, २७) आदाम आणि त्याची पत्नी हव्वा या दोघांनाही यहोवाने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची क्षमता दिली होती.
२ यहोवाने आदाम आणि हव्वाला नियमांची लांबलचक यादी दिली नव्हती. त्याने त्यांना फक्त पृथ्वीची काळजी घ्यायला आणि त्यांच्या संततीने पृथ्वी व्यापून टाकायला सांगितलं होतं. तसंच, बरं आणि वाईट ठरवायच्या त्याच्या अधिकाराच्या अधीन राहायलाही त्याने त्यांना सांगितलं होतं. (उत्प. १:२८; २:१६, १७) मग आदाम आणि हव्वा त्यांना इच्छास्वातंत्र्य देणाऱ्या देवाचा आदर कसा करू शकले असते? यासाठी त्यांनी या साध्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे होतं. असं करून ते यहोवावर प्रेम असल्याचं, त्याला खूश करायची इच्छा असल्याचं आणि त्याने त्यांच्यासाठी जे केलंय त्याबद्दल कदर असल्याचं दाखवू शकले असते.—नीति. २३:१५.
३. आदाम आणि हव्वाने त्यांना मिळालेल्या भेटीचा कसा वापर केला?
३ बायबलमधून आपल्याला कळतं, की आदाम आणि हव्वाने त्यांना मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याचा चुकीचा वापर केला आणि ते यहोवाच्या विरोधात गेले. त्यांच्या निर्णयावरून त्यांनी दाखवून दिलं की ते स्वार्थी आहेत, त्यांचं यहोवावर प्रेम नाही आणि त्याने दिलेल्या गोष्टींची त्यांना जराही कदर नाही. (उत्प. ३:१-७) त्यांच्या निर्णयांचे दुष्परिणाम आपल्याला आजही भोगावे लागत आहेत.—रोम. ५:१२.
४. (क) गलतीकर ६:५ प्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकावर कोणती जबाबदारी आहे? (ख) आपण या लेखात आणखी कोणत्या भेटीबद्दल चर्चा करणार आहोत?
४ आपल्याला दररोज बरेच निर्णय घ्यावे लागतात आणि हे नेहमीच सोपं नसतं. (गलतीकर ६:५ वाचा.) कारण काही निर्णय घ्यायला आपल्याला खूप विचार करावा लागतो. मग यहोवाला आवडतील असे निर्णय घ्यायला आपल्याला कशामुळे मदत होईल? यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे हे आपण सगळ्यात आधी मान्य केलं पाहिजे. (नीति. १६:३; यिर्म. १०:२३) येशू परिपूर्ण असूनसुद्धा त्याला यहोवाच्या मदतीची गरज होती. (इब्री ५:७) आपण तर अपरिपूर्ण आहोत. मग आपल्याला यहोवाच्या मदतीची किती जास्त गरज आहे! म्हणूनच, यहोवाने आपल्याला आणखी एक भेट दिली आहे. ती म्हणजे आपला विवेक. चला याबद्दल आता आपण चर्चा करू या.
विवेक म्हणजे काय?
५. (क) विवेक म्हणजे काय? (ख) विवेकामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? (रोमकर २:१४, १५)
५ चूक काय आणि बरोबर काय यांतला फरक ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक. ज्या व्यक्तीला यहोवाच्या नियमांबद्दल काहीच माहीत नाही तिलासुद्धा विवेक असतो. (२ करिंथ. ४:२) विवेक हा एका न्यायाधीशासारखं काम करतो. चांगलं काम केलं तर तो आपल्याला शाबासकी देतो आणि वाईट काम केलं तर दोषी ठरवतो. (रोमकर २:१४, १५ वाचा.) चुकीचं काम करण्याआधी तो आपल्याला बजावतोसुद्धा. (१ शमु. २६:८-११) तसंच, चांगलं काम करायला तो आपल्याला प्रवृत्तही करतो. फक्त इच्छास्वातंत्र्याच्या बळावर आपण यहोवाला आवडतील असे निर्णय घेऊ शकत नाही. तर त्याला विवेकाची जोड असणंही गरजेचं आहे. कारण विवेकामुळेच आपल्याला योग्य आणि अयोग्य यांतला फरक ओळखता येतो.
६. योग्य निर्णय घ्यायला विवेक आपल्याला नेहमीच मदत का करू शकत नाही?
६ पण आपला विवेक आपल्याला नेहमीच योग्य निर्णय घ्यायला मदत करेल असं नाही. कारण आपल्यासारखाच तोही अपरिपूर्ण आहे. आपण ज्या कुटुंबात आणि संस्कृतीत वाढलो त्याचा आणि आपल्या पापी इच्छांचा त्यावर प्रभाव होऊ शकतो. बायबलमध्ये म्हटलंय, की आपला विवेक “कमजोर,” “अशुद्ध,” “तापलेल्या लोखंडाने डाग दिल्याप्रमाणे सुन्न” आणि “दुष्ट” बनू शकतो. (१ करिंथ. ८:१२; तीत १:१५; १ तीम. ४:२; इब्री १०:२२) असा विवेक आपलं चांगलं मार्गदर्शन करू शकत नाही. जसं घड्याळ बिघडल्यावर योग्य वेळ दाखवू शकत नाही, तसंच आपल्या विवेकाच्या बाबतीतही होऊ शकतं. म्हणून तो योग्य प्रकारे काम करतोय की नाही हे सतत तपासत राहणं गरजेचं आहे. (१ पेत्र ३:१६) मग आपण हे कसं करू शकतो?
आपण आपला विवेक कसा प्रशिक्षित करू शकतो?
७-८. (क) आपण आपला विवेक कसा प्रशिक्षित करू शकतो? (ख) बायबल तत्त्वं आपलं योग्य मार्गदर्शन कसं करू शकतात? उदाहरण द्या. (चित्रसुद्धा पाहा.)
७ आपण आपला विवेक कसा प्रशिक्षित करू शकतो? यासाठी आपण दररोज बायबल वाचलं पाहिजे. तसंच, चूक काय आणि बरोबर काय याबद्दल असलेला यहोवाचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. यहोवाने दिलेल्या नियमांचा अभ्यास केल्यामुळे तो कसा विचार करतो हे आपल्याला समजून घेता येतं. पण मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, नियम फक्त काही विशिष्ट परिस्थितींमध्येच लागू केले जाऊ शकतात. म्हणून आपण त्यामागची तत्त्वं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे यहोवा कसा विचार करतो आणि त्याला कसं वाटतं हे आपल्याला समजून घेता येईल.—यश. ५५:९.
८ कल्पना करा, तुम्ही एका ओसाड रानातून जात आहात. तिथे पक्के रस्ते नाहीत आणि दिशा समजण्यासाठी पाट्याही नाहीत. अशा वेळी तुम्ही फक्त सूर्याच्या आणि ताऱ्यांच्या मदतीने कदाचित दिशांचा अंदाज बांधू शकता. पण जर तुमच्याकडे नकाशा असेल तर तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल, नाही का? त्यात दाखवलेल्या चिन्हांचा वापर करून तुम्हाला योग्य दिशेला जायला मदत होईल. आणि जर तुम्ही वाट चुकला तर योग्य दिशेला पुन्हा यायला आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायलाही तुम्हाला मदत होईल. त्याचप्रमाणे यहोवाला खूश करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचायला बायबल आपल्याला नकाशाप्रमाणे मदत करतं. तसंच, बायबल तत्त्वं त्या नकाशातल्या चिन्हांसारखी आहेत. त्यांप्रमाणे चालल्यामुळे आपल्याला आपलं ध्येय गाठता येईल.
बायबल तत्त्वं ही नकाशावर असणाऱ्या चिन्हांसारखी आहेत. त्यामुळे आपण योग्य मार्गावर चालतोय की नाही याची आपल्याला खातरी करता येते (परिच्छेद ८ पाहा)
९. रोमकर ९:१ प्रमाणे आपला विवेक प्रशिक्षित करायला आपल्याला आणखी कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?
९ देवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीने आपण आपल्या विवेकाला योग्य प्रशिक्षण देऊ शकतो. (रोमकर ९:१ वाचा.) पवित्र शक्ती आपल्याला देवाचे विचार समजून घ्यायला मदत करते. ती ‘त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करायला आपल्यात तशी इच्छा निर्माण करते आणि ते कार्य करायची ताकदही देते.’ (फिलिप्पै. २:१३) पण मग आपल्याला पवित्र शक्ती कशी मिळवता येईल?
१०. आपल्याला पवित्र शक्तीची मदत कशी मिळू शकते? (लूक ११:१०, १३)
१० पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करा. (लूक ११:१०, १३ वाचा.) यहोवा आपल्याला त्याची पवित्र शक्ती नक्की देईल याची आपण पूर्ण खातरी बाळगू शकतो. (योहा. ३:३४) कारण त्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांना तो ती उदारपणे देतो. (नीति. १:२३; याको. १:५) आपल्या विवेकाला प्रशिक्षित करण्यासाठी आपल्याला आणखी कोणती गोष्ट मदत करू शकते?
११. (क) आपल्या जीवनातलं मुख्य ध्येय काय असलं पाहिजे? (ख) आपला विवेक प्रशिक्षित आहे आणि योग्य काम करतोय याची खातरी करणं का गरजेचं आहे?
११ नेहमी यहोवाला खूश करायचा प्रयत्न करा. (नीति. ८:३४, ३५) हेच आपल्या जीवनातलं मुख्य ध्येय असलं पाहिजे. आपल्या जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीत आपण हे ध्येय लक्षात ठेवलं, तर आपल्याला आपला विवेक प्रशिक्षित करायला मदत होईल. जर आपले विचार यहोवासारखे असतील आणि यहोवाला एखाद्या गोष्टीबद्दल कसं वाटतं याची आपल्याला पर्वा असेल, तर आपला विवेक प्रशिक्षित आहे असं आपण म्हणू शकतो. बायबलमध्ये ज्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे काही सांगितलेलं नाही अशा बऱ्याच गोष्टींबद्दल आज आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. जसं की, करमणूकीच्या, कामाच्या किंवा जगातल्या लोकांसोबत वेळ घालवण्याच्या बाबतीत. अशा वेळी आपण पेचात पडू शकतो. म्हणून जर आपला विवेक प्रशिक्षित असेल तर अशा परिस्थितींत आपल्याला योग्य निर्णय घेता येतील. पण आपल्या निर्णयांमुळे यहोवा खूश होईल की नाही याची आपण खातरी कशी करू शकतो?—२ करिंथ. १:१२.
१२. आपला विवेक योग्य प्रकारे काम करतोय की नाही हे आपल्याला कसं समजेल? (इफिसकर ५:१०)
१२ देवाच्या वचनातल्या गोष्टींवर मनन करा. (स्तो. ४९:३) बायबल वाचताना यहोवाचे विचार समजून घेण्यासाठी त्यातली तत्त्वं शोधा. (इफिसकर ५:१० वाचा.) खासकरून कठीण समस्या येतात तेव्हा असं करणं गरजेचं आहे. यामुळे आपला विवेक योग्य प्रकारे काम करतोय की नाही हे आपल्याला समजेल. (नीति. २:४-९, ११-१३) या तत्त्वांमुळे आपल्याला आपला विवेक प्रशिक्षित करायला आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगायलाही मदत होईल.—इब्री ५:१४.
१३. आपण काय करायचं टाळलं पाहिजे? उदाहरण द्या.
१३ आधी निर्णय घेऊन नंतर बायबल तत्त्वं शोधू नका. इ.स.पू. ६०७ मध्ये यरुशलेमचा नाश झाल्यावर जे इस्राएली यहूदामध्ये राहत होते, ते यिर्मयाला म्हणाले: “आम्ही काय करावं आणि कोणत्या मार्गाने चालावं, हे तुमचा देव यहोवा याने आम्हाला कळवावं.” (यिर्म. ४२:३-६) पण खरंतर काय करायचंय हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. म्हणून जेव्हा त्यांना यहोवाकडून त्यांच्या मनासारखं मार्गदर्शन मिळालं नाही, तेव्हा त्यांनी आधी ठरवल्याप्रमाणेच केलं. यामुळे पुढे त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. (यिर्म. ४२:१९-२२; ४३:१, २, ४) पण आपल्याला त्यांच्यासारखं वागायची मुळीच इच्छा नाही. म्हणून निर्णय घेण्याआधी आपण बायबल तत्त्वं शोधली पाहिजेत. त्यामुळे यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला कळेल आणि त्याला आवडतील असे निर्णय आपल्याला घेता येतील.
१४. निर्णय घेताना बायबल तत्त्वं लागू करणं का गरजेचं आहे?
१४ बायबल तत्त्वांच्या आधारावर निर्णय घ्या. (मत्त. ७:२४-२९; याको. १:२३-२५) असं केल्यामुळे आपण पवित्र शक्तीला आपलं मार्गदर्शन करू देतो. यामुळे यहोवा आपल्याला त्याची पवित्र शक्ती पुढेही देत राहील. (प्रे. कार्यं ५:३२) पण जर आपण पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चाललो नाही, तर आपण तिला ‘दुखवू.’ (इफिस. ४:३०; यश. ६३:१०; प्रे. कार्यं ७:५१) आणि यहोवा आपल्यावरून ती काढून घेईल. (स्तो. ५१:११; १ थेस्सलनी. ५:१९) असं झालं तर आपलं खूप नुकसान होऊ शकतं. कारण पवित्र शक्तीच्या मदतीशिवाय आपण योग्य निर्णय घेऊच शकत नाही.—इफिस. ३:१६.
परिस्थितीला लागू होणारी बायबल तत्त्वं कशी शोधता येतील?
१५-१६. (क) परिस्थितीला लागू होणारी बायबल तत्त्वं आपण कशी शोधू शकतो? (ख) धूम्रपान सोडण्यासाठी बायबल विद्यार्थ्याला कोणत्या तत्त्वांमुळे मदत होऊ शकते?
१५ अभ्यासासाठी असलेल्या साधनांचा वापर करा. जर आपल्याला बायबल तत्त्वं शोधता आली, तरच ती लागू करता येतील. उदाहरणार्थ, धुम्रपान करणं चुकीचं आहे हे जर तुमच्या बायबल विद्यार्थ्याला समजत नसेल तर काय? कदाचित तो असा तर्क करेल: ‘धुम्रपानाबद्दल बायबलमध्ये काहीच सांगितलेलं नाही. मग ते करणं चुकीचं आहे हे आपण कसं म्हणू शकतो?’ अशा वेळी त्याला बायबल तत्त्वं शोधायला आणि त्यांवर तर्क करायला तुम्ही कशी मदत कराल? यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक या पुस्तकामुळे त्याला मदत होऊ शकते. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला त्यातला “तंबाखू आणि धूम्रपान” हा विषय पाहायला सांगू शकता. याखाली “धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन काय?” हा लेख आहे. (जुलै-सप्टेंबर २०१४ चा टेहळणी बुरूज अंक पाहा.) मग हा लेख वाचल्यामुळे त्याला कोणती वचनं आणि तत्त्वं सापडतील?
१६ या लेखात पाच तत्त्वं दिली आहेत. (१) आपला मृत्यू होईल अशा कोणत्याही वाईट सवयीच्या आपण आहारी जाऊ नये. (रोम. ६:१६) (२) आपल्या शरीराचं नुकसान होईल अशा कोणत्याच गोष्टी आपण करू नये. (२ करिंथ. ७:१) (३) आपण यहोवाची पूर्ण मनाने सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे. (मत्त. २२:३७) (४) आपल्यामुळे इतरांचं नुकसान होऊ नये. (मत्त. २२:३९; १ करिंथ. १०:२४) (५) योग्य ते करायला यहोवा आपल्याला ताकद देऊ शकतो. (फिलिप्पै. ४:१३) म्हणून धूम्रपानाबद्दल बायबलमध्ये स्पष्टपणे काही सांगितलेलं नसलं, तरी या तत्त्वांमुळे यहोवा त्याबद्दल काय विचार करतो हे विद्यार्थ्याला समजेल.
१७. लग्नसमारंभाची तयारी करणारी जोडपी बायबल तत्त्वं कशी शोधू शकतात?
१७ लग्नसमारंभाची तयारी करणारी जोडपी बायबल तत्त्वं कशी शोधू शकतात? याबाबतीतही संशोधन मार्गदर्शक या पुस्तकामुळे मदत होऊ शकते. यात “लग्नसमारंभ आणि स्वागत समारंभ” या विषयाखाली बायबल तत्त्वं असलेल्या लेखांची यादी दिली आहे. यातली सहा तत्त्वं ते लक्षात घेऊ शकतात. (१) लग्नसमारंभाच्या व्यवस्थेमुळे यहोवाचा गौरव झाला पाहिजे. (१ करिंथ. १०:३१, ३२) (२) आपले कपडे कार्यक्रमाला शोभतील असे, शालीन आणि लोकांना अडखळण होणार नाही असे असावेत. (१ तीम. २:९; १ पेत्र ३:३, ४) (३) जगातले लोक करतात तसा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा दिखावा करू नये. (योहा. १७:१४; याको. १:२७; १ योहा. २:१५, १६) (४) सगळा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पडला पाहिजे. (१ करिंथ. १४:४०) (५) लग्नाचं रिसेप्शन रंगेल पार्ट्यांसारखं असू नये. तसंच, तिथे दारूबाजी होणार नाही याची खातरी करावी. (गलती. ५:२१) (६) कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी एखाद्याला त्याची देखरेख करायला नेमलं पाहिजे.—योहा. २:८, ९.
१८-१९. (क) आपल्याला आणखी कोणत्या साधनामुळे मदत होऊ शकते? (ख) एखाद्या कार्यक्रमात भाग घ्यायचा की नाही हा निर्णय घेण्यासाठी हे साधन आपल्याला कशी मदत करू शकतं? (“तुम्ही बायबल तत्त्वं शोधू शकता का?” ही चौकट पाहा.)
१८ ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं या पुस्तकामुळेसुद्धा बायबल तत्त्वं शोधायला मदत होऊ शकते. यात बरेच विषय दिले आहेत आणि त्यांखाली वचनांची यादी देण्यात आली आहे. एखादा विषय निवडल्यानंतर त्याबद्दल असलेली बायबल तत्त्वं समजून घेण्यासाठी तिथे वचनांसोबत काही प्रश्नही देण्यात आले आहेत. जसं की, एखाद्या कार्यक्रमाला जायचं की नाही असा कोणाला प्रश्न पडला असेल, तर त्याला “सणसमारंभ” या विषयाखाली असलेला “खरे ख्रिस्ती पाळत नाहीत असे सणसमारंभ” या उपशिर्षकामुळे मदत होऊ शकते.
१९ “खोट्या धर्माशी संबंधित असलेल्या सणवारांमध्ये भाग घेणं का चुकीचंय? (१कर १०:२१; २कर ६:१४-१८; इफि ५:१०, ११).” या भागाखाली काही माहिती दिली आहे आणि काही सणवारांची उदाहरणं देण्यात आली आहेत. तसंच, एखाद्याला प्रश्न पडेल की आपण ऐतिहासिक दिवस, युद्धांच्या आठवणीत पाळले जाणारे दिवस, किंवा महत्त्वपूर्ण व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी पाळले जाणारे दिवस यांसारखे दिवस पाळू शकतो का? अशा वेळी आपण “राष्ट्रीय समारंभ” याखाली असलेल्या बायबल तत्त्वांचा विचार केल्यामुळे मदत होऊ शकते. यहोवाच्या संघटनेने आपल्याला इतकी चांगली साधनं पुरवली आहेत यासाठी आपण खरंच किती आभारी आहोत!
तुमचा विवेक प्रशिक्षित आहे याची खातरी करा
२०. आपला विवेक प्रशिक्षित आहे याची आपण खातरी कशी करू शकतो?
२० आपल्याला मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याच्या भेटीसाठी आपण देवाचे किती आभारी आहोत! पण त्याचा योग्य वापर करायला आपल्या विवेकाला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. यामुळे यहोवाचा गौरव होईल आणि त्याला आवडतील असे निर्णय घ्यायला आपल्याला मदत होईल. यासाठी आपल्याला पवित्र शक्तीच्या मदतीची गरज आहे. म्हणून आपण नेहमी यहोवाकडे पवित्र शक्ती मागितली पाहिजे आणि तिच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलं पाहिजे. बायबल तत्त्वांमुळेसुद्धा आपला विवेक प्रशिक्षित करायला आपल्याला मदत होते. तर चला, आपण या भेटींचा योग्य वापर करू या आणि “देवाचं वचन जिवंत आणि प्रभावशाली आहे” हे स्वतः अनुभवू या.—२ तीम. ३:१६, १७; इब्री ४:१२.
गीत १३५ यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”