वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 २/१ पृ. ८-१४
  • उद्देशयुक्‍त शिक्षण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उद्देशयुक्‍त शिक्षण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कुशल सेवक बनण्यासाठी चातुर्य हवे
  • शालेय शिक्षणाचे फायदे
  • पुरेसे शिक्षण
  • शिक्षणाचा समतोल दृष्टिकोन
  • किंमत मोजणे
  • संघटित, शिक्षित लोक
  • आणखी शिक्षण घेण्याबाबतीत योग्य निर्णय कसा घेता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • शिक्षणासंबंधी बायबल नापसंती दर्शवते का?
    सावध राहा!—१९९८
  • शिक्षण—यहोवाची स्तुती करण्यासाठी त्याचा वापर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • माझ्या मुलाने शाळेत जावे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 २/१ पृ. ८-१४

उद्देशयुक्‍त शिक्षण

“धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल.”—नीतीसूत्रे ९:९.

१. यहोवा ज्ञानासंबंधाने आपल्या लोकांकडून कसली अपेक्षा राखून आहे?

यहोवा हा “ज्ञाता देव आहे.” (१ शमुवेल २:३) तो आपल्या सेवकांना शिक्षण देतो. मोशेने म्हटले की, इस्राएलाच्या काळी राहणारे लोक त्या राष्ट्राबद्दल असे म्हणतीलः “हे मोठे राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.” (अनुवाद ४:६) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी देखील यासारखेच ज्ञानवान होण्यास हवे. त्यांनी देवाच्या वचनाचे उत्तम विद्यार्थी बनले पाहिजे. अशा अभ्यासाचा उद्देश पौलाने असे लिहून स्पष्ट केलाः “आम्हीही . . . तुम्हासाठी प्रार्थना व विनंति केल्याशिवाय राहात नाही; ती अशी की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धि यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे. यासाठी की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धि व्हावी.”—कलस्सैकर १:९, १०.

२. (अ) देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान संपादित करण्यासाठी कशाची जरुरी आहे? (ब) या विषयाला यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने कसे हाताळले?

२ देवाचे अचूक ज्ञान व त्याचे उद्देश याबद्दलची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो त्यासाठी साधारण स्वरुपाचे शिक्षण जरुरीचे आहे. परंतु, ज्यांना देवाच्या वचनातील सत्य शिकण्यास मिळाले आहे ते अशा राष्ट्रांत राहात आहेत, जेथे त्यांना प्रापंचिक शिक्षण जेमतेम मिळू शकले किंवा प्राप्त होऊ शकले नाही. अशाप्रकारे ते प्रतिकूल परिस्थितीत होते. या समस्येवर मात करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने गेल्या कित्येक वर्षांपासून जेथे मंडळ्यात शक्य आहे तेथे साक्षरता वर्ग संघटित करण्याचे सुचविले आहे. साधारण ३० वर्षांआधी डीʹआरयो डी मोझे या ब्राझिलच्या वर्तमानपत्रात “यहोवाचे साक्षीदार निरक्षरतेविरुद्ध लढा देत आहे” या शिर्षकाचा लेख आला होता. त्यात म्हटले होतेः “एक प्रशिक्षित शिक्षक . . . इतरांना धीराने लिहिण्या-वाचण्याचे शिक्षण देत आहे. . . . देवाचे सेवक या नात्याने जरुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान वाढविले पाहिजे म्हणजे त्यांना भाषणे देता येतील.” या पद्धतीमुळे जगभर हजारो लोक देवाच्या वचनाचे चांगले विद्यार्थी बनू शकले. आपल्या मनात उच्च ध्येय राखून त्यांनी हा मूलभूत शिक्षणक्रम पूर्ण केला.

कुशल सेवक बनण्यासाठी चातुर्य हवे

३, ४. (अ) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना शिक्षणाबद्दल रस का वाटतो? (ब) इस्राएलामध्ये कशी परिस्थिती होती, आणि आज आमच्या मंडळ्यात कोणते मूलभूत शिक्षण अत्यावश्‍यक आहे?

३ खऱ्‍या ख्रिश्‍चनांना शिक्षण घेण्यात रस वाटतो ते, त्यांना शिक्षण आवडते म्हणून नव्हे तर यहोवाचे अत्यंत कुशल सेवक बनावे म्हणून वाटतो. ख्रिस्ताने सर्व ख्रिश्‍चनांना “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य कर”ण्याची व “जे सर्व काही मी तुम्हांस आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिक”वण्याची आज्ञा केली. (मत्तय २८:१९, २०) इतरांना शिकवायचे आहे तर प्रथमतः त्यांनी स्वतः शिकून घ्यायचे होते व यासाठी चांगल्या शिक्षणपद्धतीची गरज असते. त्यांच्याठायी शास्त्रवचनांचे काळजीपूर्वक परिक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे. (प्रे. कृत्ये १७:११) याखेरीज, त्यांना आपली नेमणूक पूर्ण करण्यासाठी सुस्पष्ट वाचता येणेही जरुरीचे आहे.—पहा हबक्कूक २:२; १ तीमथ्य ४:१३.

४ आपण मागील लेखात पाहिले आहेच की, प्राचीन इस्राएलात लहान मुलांना देखील लिहिता वाचता येत होते हे मानण्याजोगे कारण आहे. (शास्ते ८:१४; यशया १०:१९) ख्रिस्ती सेवकांनी घरोघरचे साक्षीकार्य करीत असता सुवाच्य नोंदी घेणे जरुरीचे असते. ते पत्र लिहितात, सभांमध्ये नोंदी घेतात, आणि आपल्या अभ्यासाच्या साहित्यावर टीपाही लिहितात. याकरता सुवाच्य अक्षर हवे असते. ख्रिस्ती मंडळीत अहवालाच्या नोंदी ठेवण्यासाठी गणिताचे मूलभूत ज्ञान जरुरीचे आहे.

शालेय शिक्षणाचे फायदे

५. (अ) “शाळा” या शब्दाचा मूळ उगम काय आहे? (ब) युवकांनी कोणती संधी साधली पाहिजे?

५ “शाळा” हा शब्द स्खो․लेʹ या ग्रीक शब्दापासून उद्‌भवला असून त्याचा मूळ अर्थ “आराम” किंवा आरामाची वेळ शिकण्यासारख्या गंभीर कामासाठी देणे असा होत होता. नंतर तो शब्द, जेथे शिक्षण मिळते त्या स्थळाला अनुलक्षून वापरात येऊ लागला. याद्वारे असे दिसते की, ग्रीस व इतर देशात केवळ पात्रतेच्या लोकांनाच अशा आरामाची वेळ शिक्षणासाठी वापरण्यास मिळे. कामकरी वर्ग साधारणपणे अडाणीच राहिला. आज, बहुतेक सर्व देशात मुले व तरुण यांना शिकण्यासाठी वेळ दिला जातो. या कारणास्तव, युवक साक्षीदारांनी यहोवाचे ज्ञानवंत व समर्थ सेवक बनण्यासाठी मिळालेल्या संधीचा उत्तम फायदा घेतला पाहिजे.—इफिसकर ५:१५, १६.

६, ७. (अ) शालेय शिक्षणाचे कोणते फायदे आहेत? (ब) विदेशी भाषा शिकणे कसे उपयुक्‍त ठरू शकते? (क) शालेय जीवन संपल्यावर देखील काही युवकांची स्थिती कशाप्रकारे असल्याची आढळते?

६ युवक साक्षीदाराला इतिहास, भूगोल व विज्ञानशास्त्र याबद्दलचे मूलभूत ज्ञान समतोल बनण्यात मदत देईल. त्यांचे शालेय शिक्षण त्यांना पुष्कळ विषयांचीच नव्हे तर शिकून घेण्याच्या कलेचीही तालीम देईल. खरे ख्रिश्‍चन अर्थातच शाळा सोडल्यावर आपले शिकणे व अभ्यास सोडून देत नाही. त्यांना आपल्या अभ्यासातून जे काही मिळू शकते ते प्रामुख्यत्वे अभ्यास कसा करावा हे जाणून घेण्यावर अवलंबून राहते. प्रापंचिक व मंडळीचे शालेय शिक्षण त्यांना आपली विचारक्षमता वाढवण्यास मदत करू शकतात. (नीतीसूत्रे ५:१, २) वाचनामुळेच त्यांना महत्त्वाचे ते काय आहे, कशाची नोंद घेण्यास हवी व काय स्मरणात ठेवले पाहिजे हे चांगले समजू लागते.

७ उदाहरणार्थ, विदेशी भाषा शिकून घेण्यामुळे युवकांची मानसिक पातळीच वाढेल असे नाही, तर त्यांना यहोवाच्या संस्थेमध्ये अधिक उपयुक्‍त होता येते. वॉच टावर संस्थेच्या काही शाखांमधील पुष्कळ युवक बांधवांना इंग्रजी सुस्पष्टपणे बोलण्याचे व वाचण्याचे लाभदायक दिसून आले आहे. याशिवाय सर्व ख्रिस्ती सेवकांनी आपल्या मातृभाषेत स्पष्ट बोलण्याचे शिकून घेतले पाहिजे. राज्याच्या सुवार्तेची प्रस्तुति स्पष्ट, व्याकरणबद्ध व योग्य प्रकाराने करता आली पाहिजे. आज वस्तुस्थिती ही आहे की, पुष्कळ युवकांना शाळा सोडल्यानंतर देखील चांगले लिहिता वाचता येत नाही आणि साधे गणित देखील जमत नाही; तसेच इतिहास व भूगोल याबद्दलचे पुसटसे ज्ञान आहे.

पुरेसे शिक्षण

८. प्रापंचिक शिक्षण तसेच एखाद्याने स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासंबंधाने कोणती शास्त्रवचने माहिती देतात?

८ या कारणामुळे प्रापंचिक शिक्षणाबद्दल ख्रिश्‍चनांनी योग्य मनोवृत्ती बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असे दिसते. याबद्दल कोणते पवित्र शास्त्रीय तत्त्व येथे समर्पक असल्याचे दिसते? पहिले हे की, बहुतेक राष्ट्रांत, “कैसर” याला दाखवली जाणारी अधीनता ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे ही गोष्ट जरुरीची असल्याचे सांगते. (मार्क १२:१७; तीत ३:१) तरुण साक्षीदारांनी आपल्या गृहपाठाच्या बाबतीत कलस्सैकर ३:२३ जे म्हणते ते आठवणीत ठेवावे की, “जे काही तुम्ही करिता ते मनुष्यांसाठी म्हणून नका तर प्रभूसाठी [यहोवा, न्यू.व.] जिवेभावे करा.” दुसरे तत्त्व हे की, ख्रिश्‍चनांनी जरी पूर्ण वेळेची पायनियर सेवा पत्करली असली तरी त्याला स्वतःचा उदरनिर्वाह करता आला पाहिजे. (२ थेस्सलनीकाकर ३:१०-१२) कोणा पुरुषाचा विवाह झाला असल्यास त्याने आपल्या बायकोची व मुलांची काळजी करण्यासाठी, जे गरजवंत आहेत अशांना आधार देण्यासाठी आणि जागतिक प्रचारकार्याला हातभार द्यावा यासाठी काही कमवले पाहिजे.—इफिसकर ४:२८; १ तीमथ्य ५:८.

९, १०. (अ) पुष्कळ देशात कोणती प्रवृत्ती दिसून येते? (ब) एखादा पायनियर सेवक पुरेसा पगार कशाला म्हणू शकतो?

९ या पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा आदर करण्यासाठी आणि आपली ख्रिस्ती कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी एखाद्या तरुण ख्रिश्‍चनाने केवढे शिक्षण घ्यावे? हे देशादेशात भिन्‍न आहे. तथापि, एकंदरपणे, असे आढळून येते की, चांगला पगार मिळवता यावा यासाठी जेवढे शिक्षण घ्यावे तो दर्जा पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. वॉचटावर संस्थेच्या विविध शाखांमधून येणारे अहवाल दाखवतात की, कायद्याने सर्वसाधारण शिक्षण किती घ्यावे ते घेतल्यावर किंवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तरी कित्येक ठिकाणी चांगला पगार मिळणारी नोकरी मिळू शकत नाही.

१० “चांगला पगार” याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ भरमसाट पगार असा होत नाही. वेबस्टर्स डिक्शनरी “चांगला” याची व्याख्या “पुरेसा, समाधानी” अशी देते. मग, जे सुवार्तेचे पायनियर सेवक होऊ शकतात अशांच्या बाबतीत “चांगला” कोणता अर्थ राखून आहे? अशांनी अर्धवेळ नोकरी करावी, ज्यामुळे त्यांचे भाऊ किंवा कुटुंब यावर ते “भार” होणार नाहीत. (१ थेस्सलनीकाकर २:९) त्यांना मिळालेल्या पगारात ते चांगले राहू शकत असले व त्यांना आपल्या ख्रिस्ती सेवकपणासाठी पुरेसा वेळ व शक्‍ती देता येते तर तो पगार “पुरेसा,” किंवा “समाधान” देणारा आहे असे आम्ही म्हणू शकतो.

११. काही तरुणांनी पायनियर सेवा का सोडून दिली, आणि आता कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

११ आजची परिस्थिती बहुदा कशी दिसते? असा अहवाल मिळाला आहे की, काही देशातील चांगला हेतू बाळगणाऱ्‍या युवकांनी पायनियरींग करता यावी म्हणून जरुर असलेले कमीत कमी शिक्षण पुरे करून शाळा सोडली. त्यांनी कसलीही व्यवसाय किंवा प्रापंचिक गुणवत्ता मिळवली नाही. त्यांच्या पालकांनी त्यांना आर्थिक मदत दिली नसती तर अशांना अर्धवेळ नोकरी कोठेतरी बघावी लागली असती. काहींना तर आपली उपजीविका साधता यावी यासाठी दीर्घ मुदतीची नोकरी पत्करावी लागली. आता शारीरिकरित्या थकून जात असल्यामुळे त्यांनी पायनियर सेवा बंद केली. तर मग, स्वतःचा चरितार्थ करण्यासाठी आणि पुन्हा पायनियर सेवेत दाखल होण्यासाठी अशा बांधवांना काय करता येण्याजोगे आहे?

शिक्षणाचा समतोल दृष्टिकोन

१२. (अ) शिक्षणाच्या बाबतीत कोणत्या दोन प्रकारचा अतिरेकीपणा ख्रिश्‍चनांना टाळावासा वाटेल? (ब) यहोवाच्या समर्पित सेवकांसाठी व त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाने कोणता उद्देश साध्य करावा?

१२ शिक्षणाचा समतोल दृष्टिकोन येथे मदत करू शकतो. जगातील पुष्कळ युवकांना शिक्षण हे प्रतिष्ठेचे चिन्ह वाटते, ती त्यांना सामाजिक शिडी चढण्याला मदत करणारी, समृद्ध, जडवादी राहणीमानाची किल्ली वाटते. इतर काहींना तर शिक्षण हे रटाळ, होता होईल तितक्या लवकर संपवावे असे वाटते. यापैकीचे कोणतेही दृष्टिकोन ख्रिश्‍चनांना हितकारक नाहीत. तर मग, “समतोल दृष्टिकोण” कशाला समजावे? शिक्षण हे इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी वापरण्याजोगे माध्यम आहे असा ख्रिश्‍चनांनी दृष्टिकोन धरावा. या शेवटल्या काळी, यहोवाची सेवा शक्य आहे तितकी व प्रभावी रितीने करावी हे त्यांचे उद्दिष्ट असावे. ज्या देशात त्यांना कमीत कमी शिक्षण अशा नोकऱ्‍या देऊ शकेल जेथे त्यांना पुरेसा पगार मिळणार नाही व त्यामुळे स्वतःला पायनियर या नात्याने राखता येणार नाही, तेथे थोडे अधिक शिक्षण किंवा तालीम घेण्याचा विचार ठेवावा. हे, पूर्ण वेळेची सेवा हे ध्येय मनी बाळगून करावे.

१३. (अ) फिलिपाइन्समधील एक भगिनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवून पायनियरींग कशी करू शकली? (ब) कोणता इशारा समयोचित आहे?

१३ काहींनी विशिष्ट कलांचे अभ्यासक्रम पूर्ण केले, ज्यामुळे त्यांना अशा नोकऱ्‍या मिळू शकल्या ज्या त्यांना पूर्ण वेळेच्या सेवा करण्यासाठी वा त्यामध्ये परत येण्यासाठी साहाय्यक ठरल्या. फिलिपाइन्समध्ये एक भगिनी कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होती, पण तिला पायनियर बनण्याची इच्छा होती. शाखा दप्तर कळवतेः “तिला ते जमले, कारण तिने जाहीर लेखापाल हा शिक्षणक्रम पूर्ण करून दाखला मिळवला होता.” याच शाखा दप्तराच्या अहवालाने म्हटलेः “आमच्यामध्ये शालेय शिक्षणक्रम घेणारे व याच वेळी पायनियर बनण्याचा आराखडा ठेवलेले बरेच जण आहेत. सर्वसाधारणपणे ते अधिक अभ्यासदक्ष असल्यामुळे चांगले प्रचारक बनतात; त्यांनी जागतिक ध्येय बाळगण्याची आकांक्षा न धरली तर बरे.” हा शेवटला शेरा आम्हाला विचार करायला लावतो. जेथे गरज आहे तेथे घेतल्या जाणाऱ्‍या अधिक प्रापंचिक शिक्षणाचे उद्दिष्ट आपली दिशा बदलणे किंवा जडवादी ध्येय गाठणे हे नसावे.

१४, १५. (अ) शिक्षणाच्या बाबतीत कडक असा नियम का केला जाऊ नये? (ब) काही जबाबदार बांधवांनी कोणते प्रापंचिक शिक्षण घेतले, पण यामुळे कोणती भरपाई मिळाली?

१४ काही देशात माध्यामिक शाळेत व्यावसायिक शिक्षण देखील शिकवले जाते. यामुळे एखाद्या तरुण ख्रिश्‍चनाला आपली पदवी मिळाल्यावर एखादा व्यवसाय मिळवण्यासाठी सिद्ध बनवले जाऊ शकते. जेथे असे प्रकरण नाही त्या काही देशात युवकांना मूलभूत शिक्षणानंतर अर्धवेळ नोकरी मिळण्याची शक्यता आहे व ही नोकरी त्याला पायनियरींग करता येईल इतके पुरेसे उत्पन्‍न देते. यास्तव, अमुकच शिक्षण घ्यावे याकरता कडक नियम घालता येणार नाही.

१५ संस्थेच्या मुख्यालयात किंवा एखाद्या शाखा दप्तरी प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने जबाबदार पदी सेवा करणाऱ्‍यांपैकी अनेक जणांना केवळ मूलभूत शिक्षण मिळाले. ते विश्‍वासू पायनियर होते, त्यांनी शिकून घेण्याचे सोडले नाही, त्यांना तालीम मिळाली व आता मोठ्या जबाबदाऱ्‍या देण्यात आल्या आहेत. त्यांनी ही जी निवड केली त्याबद्दल त्यांना खंत वाटत नाही. उलटपक्षी, जगातील त्यांच्याच काही मित्रांनी विश्‍वविद्यालयीन शिक्षण घेण्याची निवड केली अशांना आध्यात्मिक प्रगती जमली नाही, ते खऱ्‍या विश्‍वासाचा नाश करणाऱ्‍या तत्त्वाज्ञानाने व ‘जगाच्या ज्ञाना’ने घेरले गेले.—१ करिंथकर १:१९-२१; ३:१९, २०; कलस्सैकर २:८.

किंमत मोजणे

१६. (अ) पुढे शिक्षण घ्यावे की न घ्यावे हे कोण ठरवू शकतो, आणि कोणती गोष्ट मनात अग्रगामी ठेवली पाहिजे? (ब) कोणती गोष्ट विचारात घेण्यास हवी?

१६ एखाद्या तरुण ख्रिश्‍चनाने पुढील शिक्षण किंवा तालीम घ्यावी की न घ्यावी हे कोणी ठरवावे? येथे पवित्र शास्त्रातील मस्तकपदाचे तत्त्व सामोरे येते. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ६:१) या आधारावर पालकांनी आपल्या मुलांना एखादा धंदा वा व्यवसाय आणि त्यासाठी लागणारे शिक्षणाचे प्रमाण याबद्दल मार्गदर्शन द्यावे. पुष्कळ देशात शैक्षणिक तसेच व्यावसायिक गोष्टींची निवड ही माध्यमिक शाळेतील शिक्षण सुरु असतानाच करावी लागते. ह्‍याच वेळी ख्रिस्ती पालक व युवक यांनी एकत्र बसून, राज्याची आस्था आपल्या मनात अग्रगण्य ठेवून योग्य ती निवड करावी म्हणून यहोवाच्या मार्गदर्शनाचा शोध घ्यावा. युवकांमध्ये वेगवेगळा कल व योग्यता असतात. सूज्ञ पालक या गोष्टींना देखील विचारात घेतील. सर्व प्रामाणिक काम हे सन्माननीय आहे, मग ते यांत्रिकीकरणातील असो किंवा कारकुनीतील असो. जग कार्यालयीन कामकाजाला प्रतिष्ठा देत असले आणि हातांनी केलेल्या अवजड कामाला हलके समजत असले तरी पवित्र शास्त्र असा दृष्टिकोन निश्‍चितच बाळगत नाही. (प्रे. कृत्ये १८:३) यास्तव, पालकांनी व ख्रिस्ती तरुणांनी सर्व गोष्टींचा पडताळा करून काळजीपूर्वक व प्रार्थनाशीलपणे माध्यमिक शाळेनंतर पुढचे शिक्षण घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय ठरवला असल्यास याबद्दल मंडळीतील इतरांनी त्यांची टिका करता कामा नये.

१७. काही पालक आपल्या मुलांसाठी कोणत्या गोष्टीची निवड करतात?

१७ आपल्या मुलांनी माध्यमिक शाळेनंतर पुढचे शिक्षण घ्यावे हे त्यांच्या पालकांनी जबाबदारीने ठरवल्यास तो त्यांचा विशेषाधिकार आहे. या अभ्याक्रमाचा कालावधी निवडलेला धंदा किंवा व्यवसाय याच्या अनुषंगाने वेगवेगळा असेल. पुष्कळ ख्रिस्ती पालकांनी आर्थिक कारणांमुळे आणि आपल्या मुलांना होता होईल तितक्या लवकर पूर्ण वेळेच्या सेवेत समाविष्ट होता यावे म्हणून व्यावसायिक किंवा तांत्रिक शाळेचा अल्पकालावधीचा अभ्यासक्रम निवडला आहे. या प्रकरणात युवकांना त्या विशिष्ट धंद्यासाठी उमेदवारीचे शिक्षण घ्यावे लागते, पण ते आपले पूर्ण जीवन यहोवाची सेवा करावी या ध्येयाने पुढे जगतात.

१८. अधिक शिक्षणक्रम घेण्याचे ठरवले असल्यास काय ध्यानात ठेवावे?

१८ अधिक शिक्षणक्रम हाती घेतला असल्यास त्यामागील हेतू प्रतिष्ठेने चकाकण्याकडे किंवा एखादे प्रतिष्ठित जागतिक ध्येय निवडावे हा नसावा. कोणत्याही शिक्षणक्रमाची काळजीपूर्वक निवड करावी. या मासिकाने उच्च शिक्षणाबद्दलच्या धोक्यांसंबंधाने जोर देऊन सांगितले आहे व ते उचित आहे, कारण बहुतेक उच्च शिक्षण पवित्र शास्त्राच्या “सुशिक्षणा”चा विरोध करते. (तीत २:१; १ तीमथ्य ६:२०, २१) याखेरीज, १९६०च्या काळापासून प्रगत शिक्षणाच्या पुष्कळ शाळा अधर्म व अनैतिकता यांच्या वाढीला उपयुक्‍त जागा बनल्या आहेत. अशाप्रकारच्या वातावरणात शिरण्याबद्दल “विश्‍वासू व बुद्धिमान दास” याने अगदी जोरदारपणे निषेध दर्शवला आहे. (मत्तय २४:१२, ४५) तथापि, हेही कबूल करावे लागेल की, अशाच प्रकारचे धोके माध्यमिक शाळा, तांत्रिक शिक्षण देणारी विद्यालये एवढेच काय पण नोकरीचे ठिकाण येथेही संभवत आहेत.—१ योहान ५:१९.a

१९. (अ) पुरवणी अभ्यासक्रम घेऊ इच्छिणाऱ्‍यांनी कोणती दक्षता घ्यावी? (ब) काहींनी आपले शिक्षण चांगल्या कारणास्तव कसे वापरले?

१९ अशा प्रकारातील पुरवणी शिक्षण घेण्याचे ठरवले गेल्यास ते शक्य आहे तर घरीच राहून घेतल्यास युवक साक्षीदारांना चांगलेच होईल. त्यामुळे आपल्या अभ्यासाच्या ख्रिस्ती सवया, सभांची उपस्थिती आणि प्रचार कार्य या नित्याच्या बाबी पूर्ण करता येतील. आरंभीच, पवित्र शास्त्रीय तत्त्वांबद्दल योग्य भूमिका ग्रहण करण्यास हवी. दानीएल व त्याचे तीन इब्री मित्र यांना बंदिवान असता बाबेलोनमध्ये प्रगत शिक्षण घेण्याचे बंधन लादले गेले, पण त्यांनी आपले सत्व नित्याने राखले. (दानीएल अध्याय १) कित्येक देशातील युवक साक्षीदारांनी, आध्यात्मिक आस्था प्रथम स्थानी राखून असता अशा शिक्षणक्रमाची निवड केली की ज्यामुळे त्यांना लेखापाल, दुकानदार, शिक्षक, भाषांतरकार, अनुवादक किंवा इतर कामे अर्धवेळ नोकरीच्या रुपात मिळून, त्याच्या पायनियरींग या प्रमुख ध्येयाला पुढे नेण्यासाठी पुरेशी मिळकत देऊ शकली. (मत्तय ६:३३) यापैकीचे पुष्कळ युवक नंतर प्रवासी पर्यवेक्षक किंवा बेथेल स्वयंसेवक बनले.

संघटित, शिक्षित लोक

२०. यहोवाच्या लोकात कोणता जागतिक भेद आढळत नाही?

२० यहोवाच्या सेवकांमध्ये एखाद्याचा व्यवसाय यांत्रिकी, कारकूनी, शेती किंवा इतर कामाचा असो, सर्वांनीच पवित्र शास्त्राचे चांगले अभ्यासक व निपुण शिक्षक असले पाहिजे. हे जग यंत्रकाम करणाऱ्‍या व कार्यालयात काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यात जो भेद राखते त्याला वाचन, अभ्यास आणि शिक्षण यामध्ये सर्वांनी मिळवलेले कौशल्य नाहीसे करते. यामुळे ऐक्य परस्परांचा आदर परिणामित होतो आणि हेच वॉचटावर संस्थेच्या बेथेल गृह व बांधणी कामात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यात दिसून येते. येथे आध्यात्मिक गुणवत्ता सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. येथे अनुभवी कार्यालयीन कर्मचारी परिश्रमी काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यांबरोबर खेळीमेळीने राहतात व प्रत्येक जण दुसऱ्‍यासोबत रसिकतापूर्ण प्रेमाचा व्यवहार करतो.—योहान १३:३४, ३५; फिलिप्पैकर २:१-४.

२१. ख्रिस्ती युवकांचे ध्येय कोणते असावे?

२१ पालकहो, तुम्ही आपल्या मुलांना नव्या जगाच्या समाजाचे उपयुक्‍त सदस्य बनण्याचे ध्येय गाठण्याबद्दल मार्गदर्शन करा! तरुण ख्रिश्‍चनांनो, तुम्ही उपलब्ध असणाऱ्‍या संधींचा शिक्षणासाठी उपयोग करून यहोवाची सेवा करण्याच्या तुमच्या हक्काला अधिक बळकट धरून राहण्यासाठी मदतनीस होऊ द्या! तुम्ही सर्व, शिक्षण प्राप्त झालेले या अर्थाने ईश्‍वरशासित संस्थेचे आता व नंतर देवाच्या वचनदत्त “नवी पृथ्वी”मध्ये चिरकालिकरित्या सिद्ध झालेले सदस्य असे स्वतःला राखा.—२ पेत्र ३:१३; यशया ५०:४; ५४:१३; १ करिंथकर २:१३.

[तळटीपा]

a द वॉचटावर, सप्टेंबर १, १९७५, पृ. ५४२-४ पहा.

आपली स्मरणशक्‍ती तपासा

▫ खरे ख्रिस्ती शिक्षणात का रस घेऊन आहेत?

▫ शिक्षणाबद्दलचे कोणते विपर्यस्त दृष्टिकोन खरे ख्रिस्ती टाळतील?

▫ वाढीव शिक्षणाचे कोणते धोके लक्षात घेतले पाहिजे, आणि कोणती दक्षता घ्यावी?

▫ यहोवाच्या लोकांमध्ये कोणत्या जागतिक भेदाला जागा नाही?

[९ पानांवरील चित्रं]

परिश्रमी अभ्यासामुळे युवक ख्रिश्‍चनांना नव्या जगाच्या संस्थेचे उपयुक्‍त सदस्य बनता येईल

[१२ पानांवरील चित्रं]

पुढे शिक्षण घेण्याचे निवडल्यास त्यामागील हेतू यहोवाची अधिक चांगलेपणाने सेवा करता यावी असा असावा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा