१-७ जून, २०२६
गीत १११ आपल्या आनंदाची कारणं!
द्वेष केला जातो तेव्हाही आनंदी राहणं शक्य आहे!
“जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात . . . तेव्हा तुम्ही सुखी आहात.”—लूक ६:२२.
या लेखात:
यहोवाची सेवा केल्यामुळे लोक आपला द्वेष करतात तेव्हा आपण आनंदी का राहू शकतो ते पाहू या.
१. येशूने काय म्हटलं आणि आपल्याला याचं आश्चर्य का वाटू शकतं?
येशूने त्याच्या डोंगरावरच्या उपदेशात म्हटलं: “जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात . . . तेव्हा तुम्ही सुखी आहात.” (लूक ६:२२) येशूचे हे शब्द ऐकून लोकांना कदाचित आश्चर्य वाटलं असेल. कारण आपला द्वेष केला जातो, तेव्हा कोणालाच चांगलं वाटत नाही. मग येशूने असं का म्हटलं असावं? या प्रश्नावर विचार करणं खूप गरजेचंय. कारण लोक आजही येशूच्या शिष्यांचा द्वेष करतात. म्हणूनच या लेखात आपण पाहू, की लोक आपला द्वेष का करतात आणि असं होतं तेव्हा आपण आनंदी का राहू शकतो.
आपला द्वेष का केला जातो?
२-३. ख्रिश्चनांचा छळ होण्यामागचं एक कारण काय आहे? आणि त्यामुळे आपला छळ करणाऱ्यांबद्दल आपल्याला कसं वाटतं? (योहा. १६:२, ३)
२ आपण यहोवाची उपासना करत असल्यामुळे लोक आपला द्वेष करतात. आपल्या शिष्यांचा छळ करणाऱ्यांबद्दल, इतकंच काय तर त्यांची हत्या करणाऱ्यांबद्दल येशूने म्हटलं: “त्यांनी पित्याला आणि मला ओळखलं नाही.” (योहान १६:२, ३ वाचा.) पण जगातले लोक देवाच्या लोकांचा विरोध नेमकं कोणामुळे करतात? सैतानामुळे. कारण तो ‘या जगाच्या व्यवस्थेचा देव’ आहे. (२ करिंथ. ४:३, ४) तो लोकांना यहोवाबद्दल शिकू देत नाही आणि देवावर प्रेम करणाऱ्यांचा विरोध करायला तो त्यांना भाग पाडतो. (योहा. ८:४२-४४) मग ही गोष्ट समजल्यामुळे आपला विरोध करणाऱ्यांबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? खरंतर, सैतान लोकांना आपला द्वेष करायला भाग पाडतो, ही गोष्ट समजल्यामुळे आपल्याला त्यांचा राग येत नाही.
३ पावेलa नावाच्या भावाचा विचार करा. आपल्या कामावर बंदी असलेल्या एका देशात तो राहतो. यहोवाची विश्वासूपणे सेवा केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली, बेदाम मारण्यात आलं आणि बऱ्याच महिन्यांसाठी त्याला एकट्याला कोठडीत डांबण्यात आलं. पावेल म्हणतो: “सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांमुळेच माझा विरोध होतोय. मी यहोवाची सेवा करू नये अशी त्यांची इच्छा आहे हे मला समजलंय. खरंतर, तुरुंगात काम करणाऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे असं मला वाटत नाही. कारण ते तर फक्त त्यांचं काम करत आहेत.” क्रोएशियामध्ये राहणाऱ्या आणखी एका भावाचा विचार करा. सत्यात नसलेल्या त्याच्या आईवडिलांनी त्याचा क्रुरपणे छळ केला. पण तो म्हणतो: “खरंतर आईवडील माझे शत्रू नाहीत, तर सैतान माझा खरा शत्रू आहे.”—इफिस. ६:१२.
४. आपण येशूच्या आणि स्तेफनच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
४ आपण आपला विरोध करणाऱ्यांचा द्वेष करत नाही. खरंतर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. (मत्त. ५:४४) याबाबतीत आपण येशूकडून आणि स्तेफनकडून खूप काही शिकू शकतो. येशूला वधस्तंभावर खिळणाऱ्या रोमी सैनिकांसाठी येशूने अशी प्रार्थना केली: “बापा, यांना क्षमा कर.” (लूक २३:३४) येशूने फक्त त्यांच्यासाठीच नाही, तर तिथे गर्दीत उभ्या असलेल्या लोकांसाठीसुद्धा ही प्रार्थना केली असावी. त्याला माहीत होतं, की धार्मिक पुढाऱ्यांनी भडकवल्यामुळे हे लोक त्याला मृत्यूदंड मिळावा अशी मागणी करत होते. ते काय करत होते हे त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं. येशूसारखंच स्तेफननेसुद्धा त्याला मृत्यूदंड देणाऱ्यांना यहोवाने माफ करावं अशी प्रार्थना केली. (प्रे. कार्यं ७:५८-६०) मग यहोवाने येशूची आणि स्तेफनची प्रार्थना ऐकली का? हो. येशूला ठार मारण्यात सामील असलेल्या बऱ्याच जणांनी नंतर पश्चात्ताप केला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कार्यं २:३६-४१) तसंच, स्तेफनच्या हत्येत सामील असलेल्या निदान एका व्यक्तीने नंतर पश्चात्ताप केल्याबद्दल आपल्याला ठामपणे माहीत आहे. तो म्हणजे तार्सचा शौल. त्याच्याकडून नकळत घडलेल्या गोष्टींबद्दल त्याने पश्चात्ताप केला आणि तो ख्रिस्ती बनला.—१ तीम. १:१३.
येशू आणि स्तेफनसारखं आपणसुद्धा छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करू शकतो (परिच्छेद ४ पाहा)
५. सीझरच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
५ आजसुद्धा आपण आपला विरोध करणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो तेव्हा यहोवा त्या ऐकतो. व्हेनिझुएलामध्ये राहणाऱ्या सीझरच्या अनुभवाचा विचार करा. तो यहोवाचा साक्षीदार असल्यामुळे त्याचे वडील त्याचा खूप छळ करायचे. सीझर म्हणतो: “माझ्या आईने एक पत्नी आणि आई म्हणून तिची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली. तिने नेहमी यहोवाच्या सेवेला पहिली जागा दिली. पण तिने माझ्या वडिलांकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. तिने नेहमी आम्हा भावंडांना आमच्या वडिलांचा आदर करायला शिकवलं. जोपर्यंत ते आम्हाला यहोवाच्या इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट करायला सांगत नाहीत, तोपर्यंत आम्ही नेहमी त्यांचं ऐकावं असं तिने शिकवलं.” काही वर्षांनी सीझरच्या वडिलांचा स्वभाव बदलला. तो म्हणतो: “एकदा मी यहोवाला मनापासून प्रार्थना केली आणि माझ्या वडिलांना बायबल अभ्यासासाठी विचारलं. ते ‘हो’ बोलले तेव्हा मला किती आनंद झाला हे मी शब्दांत सांगू शकत नाही!” काही काळाने सीझरच्या वडिलांनी बाप्तिस्मा घेतला. हे खरंय, की आपला विरोध करणारे सगळेच कदाचित इतका मोठा बदल करणार नाहीत. पण आपलं वागणं-बोलणं बघून त्यांचा स्वभाव मात्र नक्कीच बदलू शकतो. “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” यहोवा अशा लोकांना दया दाखवतो आणि त्याच्याबद्दल शिकायला मदत करतो तेव्हा आपल्यालाही खरंच खूप आनंद होतो!—उत्प. १८:२५.
६. मार्क १३:१३ प्रमाणे, आणखी कोणत्या कारणामुळे लोक आपला विरोध करतात?
६ आपण येशूचा आदर करत असल्यामुळे लोक आपला द्वेष करतात. येशूने खऱ्या ख्रिश्चनांना असं म्हटलं, की “माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील.” (मार्क १३:१३ वाचा.) मग येशूच्या “नावात” काय सामील आहे? त्याच्या नावात त्याचे गुण आणि देवाच्या राज्याचा राजा म्हणून राज्य करायचा त्याचा अधिकार या गोष्टी सामील आहेत. जे लोक यहोवाने निवडलेल्या राजावर, म्हणजे येशू ख्रिस्तावर भरवसा ठेवण्याऐवजी जगातल्या पुढाऱ्यांवर भरवसा ठेवतात ते आपला द्वेष करतात. १९१४ पासून येशू देवाच्या राज्याचा राजा म्हणून राज्य करतोय. आणि तो लवकरच त्याचा विरोध करणाऱ्या सगळ्या सरकारांना काढून टाकेल.
७-८. कोणत्या कारणामुळे लोक यहोवाच्या साक्षीदारांची थट्टा करतात? (योहान १५:१८-२०) (चित्रंसुद्धा पाहा.)
७ आपण सैतानाच्या जगाला नाकारल्यामुळे लोक आपला द्वेष करतात. येशूने सांगितलं, की त्याचे शिष्य या ‘जगाचा भाग नसल्यामुळे’ लोक त्यांचा द्वेष करतील. (योहान १५:१८-२० वाचा.) सुरुवातीच्या ख्रिश्चनांसारखं आपणसुद्धा जगातल्या लोकांसारखं वाईट वागत नाही किंवा वाईट बोलतही नाही. यामुळेच आपल्या बऱ्याच भाऊबहिणींची कामाच्या ठिकाणी आणि शाळेत थट्टा केली जाते. (१ पेत्र ४:३, ४) पण आपल्या या भाऊबहिणींच्या चांगल्या वागण्याबोलण्यामुळे काही विरोध करणाऱ्यांच्या मनोवृत्तीत बदल झालाय हे पाहून आपल्याला खरंच किती आनंद होतो!
८ मध्य अमेरिकेत राहणाऱ्या इग्नेशियोच्या अनुभवाचा विचार करा. बायबल तत्त्वांनुसार जीवन जगल्यामुळे त्याच्या शाळेतले एक शिक्षक त्याची खूप थट्टा करायचे. पण, त्याचं शिक्षण पूर्ण होण्याआधी त्या शिक्षकांनी त्याला एक गोष्ट विचारली. ते म्हणाले, ‘लोकांचा इतका दबाव असूनही तू बायबलप्रमाणे जीवन कसं काय जगू शकलास?’ यावर इग्नेशियोने म्हटलं, की देवाच्या तत्त्वांमुळे त्याचं संरक्षण होतं असं त्याला वाटतं. मग इग्नेशियोने त्या शिक्षकांना सभेसाठी बोलावलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते सभेला आले. तिथलं प्रेमळ वातावरण पाहून त्यांना खूप छान वाटलं आणि ते पुढेही सभेला येत राहिले. मग त्यांनी बायबल अभ्यास सुरू केला. पण त्यांनाही विरोधाचा सामना करावा लागला. असं असूनसुद्धा ते प्रगती करत राहिले आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला.
आपण लहान असो किंवा मोठे, आपण आपल्या विश्वासाबद्दल धाडसाने साक्ष देऊ शकतो (परिच्छेद ८ पाहा)b
९-१०. (क) कोणत्या कारणामुळे आपण जगातल्या लोकांपेक्षा वेगळे दिसतो? (ख) प्रेषित पौलच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?
९ राजकीय गोष्टींच्या बाबतीत तटस्थ राहिल्यामुळे आणि युद्धात भाग न घेतल्यामुळे आपण वेगळे असल्याचं दिसून येतो. (योहा. १८:३६) हे खरंय, की आपण रोमकर १३:१ मध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या नियमांचं पालन करायचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण असं असलं तरी, ख्रिस्ती या नात्याने आपण राजकीय गोष्टींच्या बाबतीत तटस्थ राहतो. म्हणूनच आपण निवडणूकीला उभे राहत नाही किंवा कोणाला मत देत नाही. कारण आपण यहोवाला आणि येशूच्या राज्याला एकनिष्ठ राहतो. यामुळे बऱ्याच यहोवाच्या साक्षीदारांना तुरुंगात टाकलं जातं. पण तरीही ते तिथल्या लोकांना प्रचार करत राहतात. ते याबाबतीत प्रेषित पौलचं अनुकरण करतात. प्रेषित पौल बरीच वर्षं घरात आणि तुरुंगात कैद होता. (प्रे. कार्यं २४:२७; २८:१६, ३०) पण तरीही तो ऐकण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना प्रचार करत राहिला. त्याने तुरुंगातल्या सैनिकांना, न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना, राज्यपालांना, राजांना आणि कदाचित रोमी सम्राट निरो याच्या अधिकाऱ्यांनाही प्रचार केला.—प्रे. कार्यं ९:१५.
१० प्रेषित पौलसारखंच, तुरुंगात असणारे आपले भाऊबहीण आनंदाचा संदेश ऐकण्याची इच्छा असलेल्या सगळ्या लोकांना प्रचार करतात. ते न्यायाधीशांना, सरकारी अधिकाऱ्यांना आणि सैनिकांनाही प्रचार करतात. एका भावाचा विचार करा. राजकीय गोष्टींच्या बाबतीत तटस्थ राहिल्यामुळे सहा वर्षांपेक्षा जास्त काळ तो तुरुंगात होता. पण खरंतर त्याने या गोष्टीकडे शिक्षा म्हणून नाही, तर यहोवाकडून मिळालेली एक नेमणूक म्हणून पाहिलं. यहोवाने त्याला तिथे चांगली मनोवृत्ती असलेल्या लोकांना शोधायला पाठवलंय असं त्याला वाटायचं. विचार करा, जर यहोवाने आपल्यालासुद्धा अशा लोकांना शोधण्यासाठी वापरलं, तर आपल्यासाठी ती किती मोठी गोष्ट असेल! (कलस्सै. ४:३) आता आपण, यहोवाची उपासना करत असल्यामुळे लोक आपला द्वेष करत असले, तरी आणखी कोणत्या कारणांमुळे आपण आनंदी राहू शकतो हे पाहू या.
आपला द्वेष केला जातो तेव्हा आपण आनंदी का राहू शकतो?
११. छळामुळे आपला विश्वास मजबूत कसा होतो? उदाहरण द्या.
११ यामुळे बायबलची भविष्यवाणी पूर्ण होते. बायबलच्या पहिल्या भविष्यवाणीत सैतान आणि त्याला साथ देणारे यहोवाची उपासना करणाऱ्यांचा द्वेष करतील असं म्हटलंय. (उत्प. ३:१५) येशूनेसुद्धा म्हटलं होतं, की यहोवाची सेवा करणाऱ्यांचा द्वेष केला जाईल. याबद्दल आनंदाच्या संदेशाच्या चारही पुस्तकांत लिहिण्यात आलंय. (मत्त. १०:२२; मार्क १३:९-१२; लूक ६:२२, २३; योहा. १५:२०) इतकंच काय तर बायबलच्या इतर पुस्तकांमध्येही याबद्दल सांगण्यात आलंय. (२ तीम. ३:१२; याको. १:२; १ पेत्र ४:१२-१४; यहू. ३, १७-१९) म्हणून जेव्हा आपला छळ होतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटत नाही. उलट आपण आनंदी राहतो, कारण यामुळे भविष्यवाणी पूर्ण होते. आणि आपल्याला याची खातरी मिळते, की आपण खऱ्या देवाची उपासना करतोय. आपल्या कामावर बंदी असलेल्या देशात राहणारी एक बहीण म्हणते: “मी यहोवाला माझं जीवन समर्पित केलं, तेव्हा आज ना उद्या मला छळाचा सामना करावा लागेल हे मला माहीत होतं. म्हणून जेव्हा माझा छळ होऊ लागला, तेव्हा मी घाबरून गेले नाही किंवा मला आश्चर्य वाटलं नाही.” त्या बहिणीचा नवरासुद्धा तिचा खूप विरोध करायचा. तो तिच्याशी खूप वाईट वागायचा. इतकंच काय, तर त्याने तिचं बायबल आणि इतर प्रकाशनंही जाळून टाकली. पण घाबरून तिने माघार घेतली नाही. उलट ती विश्वासात मजबूत होत गेली. (इब्री १०:३९) ती म्हणते: “छळ होईल हे बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं. त्यामुळे माझ्यासोबतही हे घडेल हे मला माहीत होतं. या गोष्टीमुळे मला याची खातरी पटली, की हाच खरा धर्म आहे.”
१२. एका भावाला छळाचा सामना करायला कशामुळे मदत झाली?
१२ आपला छळ होईल हे माहीत असलं तरी, त्याचा सामना करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. एक भाऊ त्याचे तुरुंगातले दिवस आठवून म्हणतो: “तुरुंगात असताना कधीकधी मी खूप निराश व्हायचो, मला काळजी वाटायची आणि मी रडायचोसुद्धा.” या भावाला कशामुळे मदत झाली? तो म्हणतो: “मी सारखी प्रार्थना करायचो. दिवसाची सुरूवात मी प्रार्थनेने करायचो. एखादा कठीण प्रसंग आला की मी लगेच प्रार्थना करायचो. अन्यायामुळे मला राग यायचा तेव्हा मी बाथरूममध्ये जाऊन कळकळून प्रार्थना करायचो.” आपल्या या भावाने बायबल काळातल्या आणि आजच्या काळातल्या यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांच्या उदाहरणांवरही मनन केलं. त्यामुळे त्याला छळाचा सामना करायला मदत झाली. इतकंच काय, तर येशूने वचन दिल्याप्रमाणे त्याला शांतीसुद्धा मिळाली.—योहा. १४:२७; १६:३३.
१३. द्वेषाचा सामना करायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?
१३ आपलं प्रेम द्वेषापेक्षा खूप मोठं आहे. येशूने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत यहोवावर आणि त्याच्या मित्रांवर प्रेम केलं. (योहा. १३:१; १५:१३) जर आपणसुद्धा यहोवावर आणि आपल्या भाऊबहिणींवर असंच प्रेम केलं, तर आपल्याला द्वेषाचा सामना करता येईल. याबद्दल प्रेषित पौलने आपल्यासमोर खूप चांगलं उदाहरण मांडलंय. चला, आता याबद्दलच पाहू या.
१४. ठार मारलं जाईल हे माहीत असूनसुद्धा कोणत्या गोष्टीमुळे पौलला शेवटपर्यंत एकनिष्ठ राहायला मदत झाली?
१४ पौलची हत्या होण्यापूर्वी त्याने तीमथ्यला पत्रात असं म्हटलं: ‘देवाने आपल्याला जी पवित्र शक्ती दिली आहे, तिच्यामुळे भित्रेपणा नाही, तर सामर्थ्य आणि प्रेम निर्माण होतं.’ (२ तीम. १:७) पौलला नेमकं काय म्हणायचं होतं? पौल असं म्हणत होता, की यहोवावरच्या प्रेमामुळे आपण कोणत्याही परीक्षेला तोंड देऊ शकतो. (२ तीम. १:८) पौलला या गोष्टीची खातरी होती, की तो यहोवाची सेवा करत असल्यामुळे त्याला ठार मारलं जाईल. तरीसुद्धा यहोवावर असलेल्या प्रेमामुळे त्याला शेवटपर्यंत विश्वासू राहायला मदत झाली.—प्रे. कार्यं २०:२२-२४.
१५. आजच्या काळात भाऊबहिणींनी एकमेकांवर निःस्वार्थ प्रेम कसं दाखवलंय? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ आज आपल्या बऱ्याच भाऊबहिणींना छळाचा सामना करावा लागला, तरी ते सत्यात टिकून राहतात. त्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे! काही जण तर आज आपल्या भाऊबहिणींसाठी आपला जीव धोक्यात घालायलासुद्धा तयार असतात. असं करून ते अक्विल्ला आणि प्रिस्किल्लाच्या उदाहरणाचं अनुकरण करतात. त्यांनी पौलसाठी त्यांचा जीव धोक्यात घातला होता. (रोम. १६:३, ४) रशियामधल्या भाऊबहिणींचा विचार करा. त्यांच्यावर खटला चालू असताना बरेच भाऊबहीण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी न्यायालयात गेले. आपल्या एका बहिणीलाही असाच अनुभव आला. तिला प्रोत्साहन द्यायला न्यायालयात आलेल्या भाऊबहिणींना पाहून ती खूप भारावून गेली. इतकी की काय बोलावं हे थोडा वेळ तिला सुचलंच नाही! आपल्या भाऊबहिणींचं निःस्वार्थ प्रेम पाहून तिचा विश्वास आणखी मजबूत झाला आणि खरंतर त्या वेळी तिला त्याचीच गरज होती. खरंच, इतर जण आपला कितीही द्वेष करत असले तरी भाऊबहिणींच्या प्रेमासमोर तो द्वेष काहीच नाही!
आपल्या कामावर बंदी असली किंवा निर्बंध लावले असले, तरी आपण भाऊबहिणींना निःस्वार्थ प्रेम दाखवत राहू शकतो (परिच्छेद १५ पाहा)c
१६. देवाची सेवा केल्यामुळे ज्यांना छळाचा सामना करावा लागतो, त्यांच्याकडे आनंदी राहायचं कारण आहे असं प्रेषित पेत्रने का म्हटलं? (१ पेत्र ४:१४)
१६ यहोवा आपल्यावर खूश असतो. (१ पेत्र ४:१४ वाचा.) देवाची सेवा केल्यामुळे ज्यांना छळाचा सामना करावा लागतो, त्यांच्याकडे आनंदी राहायचं आणखी एक चांगलं कारण आहे. कारण प्रेषित पेत्रने म्हटलं, की अशांवर ‘देवाची गौरवशाली पवित्र शक्ती असते.’ याचाच अर्थ यहोवा त्यांच्यावर खूश असतो. पेत्रने स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या काही काळानंतर, प्रचार करत असताना पेत्र आणि काही प्रेषितांना अटक करण्यासाठी मंदिरातल्या शिपायांना पाठवण्यात आलं. पण त्या वेळी पेत्रने मोठं धाडस दाखवून आपल्या विश्वासाबद्दल साक्ष दिली. (प्रे. कार्यं ५:२४-२९) त्यामुळे त्यांना फटके मारण्यात आले. पण तरीही त्यांनी प्रचार करायचं सोडलं नाही. उलट, “येशूच्या नावासाठी अनादर करायच्या लायकीचं समजण्यात आलं, म्हणून ते आनंदाने न्यायसभेतून बाहेर गेले.” आज आपलासुद्धा छळ केला जातो तेव्हा आपणही आनंदी राहू शकतो.—प्रे. कार्यं ५:४०-४२.
१७. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने शिष्यांना काय म्हटलं?
१७ आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने शिष्यांना म्हटलं: “ज्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यावर माझा पिता प्रेम करेल आणि मीही प्रेम करीन.” (योहा. १४:२१) लवकरच अशी वेळ येत आहे, जेव्हा यहोवाची सेवा केल्यामुळे कोणीही आपला द्वेष करणार नाही. (२ थेस्सलनी. १:६-८) पण तोपर्यंत जरी आपला द्वेष करण्यात आला, तरी आपल्याकडे आनंदी राहायची बरीच कारणं आहेत हे आपण विसरू नये. असं केल्याने आपल्याला सांत्वन मिळेल आणि आपला विश्वास मजबूत ठेवायला आपल्याला मदत होईल.
गीत १४९ यहोवाच्या विजयाचं गीत
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b चित्राचं वर्णन: इग्नेशियो त्याच्या शिक्षकांना साक्ष देत असल्याचं नाट्यरूपांतर.
c चित्राचं वर्णन: यहोवाची सेवा केल्यामुळे एका बहिणीला तुरुंगात नेलं जात असल्याचं आणि इतर भाऊबहीण तिला प्रोत्साहन देत असल्याचं नाट्यरूपांतर.