अभ्यास लेख ३२
गीत ३८ तो तुला बळ देईल
यहोवा आपल्याला धीर धरायला कशी मदत करतो?
“सर्व प्रकारची अपार कृपा करणारा देव . . . तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल आणि स्थिर उभं राहायला मदत करेल.”—१ पेत्र ५:१०.
या लेखात:
आपल्याला धीर धरता यावा म्हणून यहोवाने कोणत्या तरतुदी केल्या आहेत आणि आपण त्यांचा फायदा कसा घेऊ शकतो, ते पाहा.
१. कोणत्या कारणांमुळे धीर धरणं कठीण जाऊ शकतं आणि कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होऊ शकते? (१ पेत्र ५:१०)
आज आपल्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे कधीकधी धीर धरणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. काही जण बऱ्याच काळापासून गंभीर आजाराचा सामना करत आहेत. काही जणांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला मृत्यूमध्ये गमावलंय आणि काही जणांना घरच्यांकडून किंवा सरकाराकडून विरोधाचा सामना करावा लागतोय. (मत्त. १०:१८, ३६, ३७) पण तुम्ही कोणत्याही समस्येचा सामना करत असला, तरी तुम्ही एका गोष्टीची खातरी ठेवू शकता. ती म्हणजे, यहोवा तुम्हाला धीर धरायला नक्की मदत करेल.—१ पेत्र ५:१० वाचा.
२. धीर धरायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होते?
२ धीर धरणं म्हणजे समस्यांचा, छळाचा किंवा मोहांचा सामना करत असतानाही यहोवाला एकनिष्ठ राहणं आणि आनंदाने त्याची सेवा करणं. तसंच, धीर धरण्यात परिस्थिती सुधारेल यावर विश्वास ठेवणंही सामील आहे. आपण आपल्या स्वतःच्या बळावर धीर धरू शकत नाही. तर, यहोवा आपल्याला “असाधारण सामर्थ्य” देऊन धीर धरायला मदत करतो. (२ करिंथ. ४:७) आपल्याला धीर धरता यावा म्हणून यहोवाने कोणत्या चार तरतुदी केल्या आहेत आणि आपण त्या प्रत्येक तरतुदीचा फायदा कसा घेऊ शकतो, यावर या लेखात आपण चर्चा करू या.
प्रार्थना
३. आपण प्रार्थना करू शकतो ही एक जबरदस्त गोष्ट का आहे?
३ आपल्याला धीर धरता यावा म्हणून यहोवाने एक खास तरतूद केली आहे. त्या तरतुदीमुळे आपण पापी असूनही यहोवाशी बोलू शकतो. (इब्री ४:१६) जरा विचार करा, आपण कधीही आणि कोणत्याही विषयाबद्दल यहोवाशी बोलू शकतो. आपण कुठेही असलो, कोणतीही भाषा बोलत असलो, इतकंच काय तर आपण एकटे असलो किंवा तुरुंगात असलो तरीही यहोवा आपलं ऐकू शकतो. (योना २:१, २; प्रे. कार्यं १६:२५, २६) काही वेळा आपण इतके चिंतेत असतो, की प्रार्थना करताना आपल्याला शब्दच सुचत नाहीत. पण अशा वेळीसुद्धा आपल्याला काय बोलायचंय हे यहोवाला समजतं. (रोम. ८:२६, २७) खरंच, आपण प्रार्थना करू शकतो ही किती जबरदस्त गोष्ट आहे!
४. धीर धरण्यासाठी केलेल्या प्रार्थना यहोवाच्या इच्छेनुसार आहेत, असं आपण का म्हणू शकतो?
४ यहोवा त्याच्या वचनात आपल्याला अशी खातरी देतो, की “त्याच्या इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं [ऐकेल].” (१ योहा. ५:१४) मग आपल्याला धीर धरता यावा म्हणून आपण यहोवाकडे मदत मागू शकतो का? हो नक्कीच! कारण ते यहोवाच्या इच्छेप्रमाणे आहे. आपण असं का म्हणू शकतो? जेव्हा आपण समस्यांचा धीराने सामना करतो, तेव्हा आपण यहोवाला सैतानाला उत्तर द्यायची एक संधी देत असतो. (नीति. २७:११) त्यासोबतच बायबल आपल्याला असं सांगतं, की “ज्यांचं मन पूर्णपणे यहोवाकडे लागलेलं असतं, त्यांच्यासाठी आपली शक्ती प्रकट करायला” तो आतुर आहे. (२ इति. १६:९) म्हणून आपण याची खातरी ठेवू शकतो, की आपल्याला धीर धरायला मदत करायची यहोवाकडे शक्ती आणि इच्छासुद्धा आहे.—यश. ३०:१८; ४१:१०; लूक ११:१३.
५. प्रार्थनेमुळे आपल्याला मनाची शांती कशी मिळू शकते? (यशया २६:३)
५ बायबल आपल्याला म्हणतं, की जेव्हा आपण आपल्या समस्यांबद्दल यहोवाला कळकळीने प्रार्थना करतो, तेव्हा “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती . . . [आपल्या] मनाचं आणि बुद्धीचं रक्षण” करते. (फिलिप्पै. ४:७) याचा नेमका काय अर्थ होतो, याचा विचार करा. यहोवाची उपासना न करणारे लोक जेव्हा समस्यांचा सामना करतात, तेव्हा ते मनःशांतीसाठी वेगवेगळे उपाय करून पाहतात. उदाहरणार्थ, काही लोक आपल्या मनातले सगळे विचार, चिंता काढून टाकण्यासाठी एक प्रकारचं ध्यान करतात. पण मनातले सगळे विचार काढणं हे आध्यात्मिक रित्या धोक्याचं आहे. (मत्तय १२:४३-४५ सोबत तुलना करा.) याउलट, प्रार्थना केल्यामुळे यहोवाकडून आपल्याला जी शांती मिळते, ती अशा प्रकारचं ध्यान केल्यामुळे मिळणाऱ्या शांतीपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. ते कसं? जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा आपण यहोवावर पूर्णपणे अवलंबून असल्याचं दाखवतो आणि तो आपल्याला “कायम टिकणारी शांती” देतो. (यशया २६:३ वाचा.) ही शांती देण्याचा एक मार्ग म्हणजे, यहोवा आपल्याला बायबलमधली दिलासा देणारी वचनं आठवायला मदत करतो. त्या वचनांमुळे आपल्याला याची आठवण होते, की यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपल्याला मदत करायची त्याची इच्छा आहे.—स्तो. ६२:१, २.
६. तुम्ही प्रार्थनेच्या तरतुदीचा पूर्ण फायदा कसा घेऊ शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
६ तुम्ही काय करू शकता? परीक्षांचा धीराने सामना करत असताना ‘तुमचं सगळं ओझं यहोवावर टाकून द्या’ आणि शांतीसाठी त्याला प्रार्थना करा. (स्तो. ५५:२२) समस्यांचा सामना करताना काय करायचं हे ठरवता यावं, म्हणून यहोवाकडे बुद्धीही मागा. (नीति. २:१०, ११) तसंच, धीर धरण्यासाठी यहोवाकडे याचना करण्यासोबतच त्याचे आभार मानायला विसरू नका. (फिलिप्पै. ४:६) प्रत्येक दिवशी तुम्हाला धीर धरता यावा म्हणून तो कशी मदत करतोय, याचा विचार करा आणि त्यासाठी त्याचे आभार माना. तसंच, त्याने तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठीही त्याचे आभार माना. तुमच्या समस्यांमुळे इतकेही भारावून जाऊ नका, की यहोवाने आधीच तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत.—स्तो. १६:५, ६.
तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही यहोवासोबत बोलत असता आणि जेव्हा तुम्ही बायबल वाचता, तेव्हा यहोवा तुमच्याशी बोलत असतो (परिच्छेद ६ पाहा)b
बायबल
७. बायबलमुळे आपल्याला धीर धरायला कशी मदत होऊ शकते?
७ आपल्याला धीर धरता यावा म्हणून यहोवाने आपल्याला बायबलमध्ये बरीच वचनं दिली आहेत. त्यांमुळे आपल्याला याची खातरी पटते की यहोवा आपल्या पाठीशी आहे. जसं की, मत्तय ६:८. तिथे असं म्हटलंय: “तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही मागायच्या आधीच तुमच्या पित्याला माहीत असतं.” हे शब्द येशूचे आहेत. आणि इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा तो यहोवाला सगळ्यात चांगलं ओळखतो. त्यामुळे आपण पूर्ण भरवशाने असं म्हणू शकतो, की जेव्हा आपण समस्यांचा सामना करत असतो, तेव्हा आपल्याला कशाची गरज आहे हे यहोवाला माहीत असतं. आणि तो आपल्याला नक्की मदत करेल. धीर धरण्यासाठीचा आपला निश्चय पक्का करणारी यासारखी बरीच वचनं बायबलमध्ये आहेत.—स्तो. ९४:१९.
८. (क) धीर धरायला मदत करणारं बायबलचं एक तत्त्व सांगा. (ख) गरजेच्या वेळी बायबलची तत्त्वं आठवायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?
८ बायबलची तत्त्वं आपल्याला धीर धरायला मदत करू शकतात. कारण, त्यांतून आपल्याला चांगले निर्णय घेण्यासाठी व्यावहारिक बुद्धी मिळू शकते. (नीति. २:६, ७) जसं की, बायबल आपल्याला सांगतं की भविष्यात काय होईल याची आपण चिंता करू नये; तर यहोवावर भरवसा ठेवावा. (मत्त. ६:३४) जर आपल्याला बायबल वाचायची आणि त्यावर मनन करायची सवय असेल, तर गरजेच्या वेळी आपल्याला बायबलची तत्त्वं आठवायला जास्त सोपं जाईल.
९. यहोवा आपल्याला मदत करेल, या गोष्टीवरचा आपला भरवसा बायबलच्या अहवालांवरून कसा वाढतो?
९ बायबलमध्ये आपल्यासारख्याच लोकांच्या जीवनात घडलेल्या खऱ्याखुऱ्या घटनांबद्दलसुद्धा सांगितलंय. त्या लोकांनी यहोवावर भरवसा ठेवला आणि यहोवाने त्यांना मदत केली. (इब्री ११:३२-३४; याको. ५:१७) जेव्हा आपण या घटनांचा विचार करतो, तेव्हा यहोवा आपल्यालाही मदत करेल यावरचा आपला भरवसा वाढतो. तो “[आपला] आश्रय आणि [आपलं] सामर्थ्य आहे, संकटाच्या वेळी साहाय्य करण्यासाठी तो नेहमी तयार असतो.” (स्तो. ४६:१) जेव्हा आपण जुन्या काळातल्या या विश्वासू सेवकांचा विचार करतो, तेव्हा त्यांच्यासारखाच विश्वास आणि धीर दाखवायची आपल्याला प्रेरणा मिळते.—याको. ५:१०, ११.
१०. आपण बायबलचा पूर्ण फायदा कसा घेऊ शकतो?
१० तुम्ही काय करू शकता? बायबलचं दररोज वाचन करा आणि तुम्हाला ज्या विशिष्ट वचनांमुळे मदत झाली आहे त्याची यादी करून ठेवा. बऱ्याच जणांना दिवसाची सुरुवात दैनिक वचनाने केल्यामुळेही खूप फायदा झालाय. यामुळे त्यांना दिवसभरात प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींवर विचार करायला मदत झाली आहे. मेरीa नावाच्या एका बहिणीलासुद्धा यामुळे खूप मदत झाली. तिच्या आईला आणि वडिलांना एकाच वेळी कॅन्सर झाला होता आणि त्यांची अवस्था खूप खराब झाली होती. मग कोणत्या गोष्टीमुळे तिला धीर धरायला मदत झाली? ती म्हणते: “मी रोज सकाळी दैनिक वचन वाचून त्यावर मनन करायचे. या सवयीमुळे मला माझ्या समस्यांवर नाही, तर यहोवावर आणि तो बायबलमधून शिकवत असलेल्या सुंदर गोष्टींवर विचार करायला मदत झाली.”—स्तो. ६१:२.
भाऊबहीण
११. इतरांनीही आपल्यासारख्याच समस्यांचा सामना केलाय हे समजल्यामुळे आपल्याला सांत्वन कसं मिळतं?
११ आपल्याला धीर धरता यावा म्हणून यहोवाने आपल्याला जगभरातले आपले भाऊबहीण दिले आहेत. बायबल म्हणतं: ‘संपूर्ण जगातल्या आपल्या भावांनी अशाच प्रकारचं दुःख सोसलंय.’ यामुळे आपण एकटे नाही ही गोष्ट आपल्याला समजते. म्हणून आपल्याला सांत्वन मिळतं. (१ पेत्र ५:९) आपल्या भाऊबहिणींना आपल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागलाय आणि त्यांनी त्या धीराने सहन केल्या आहेत. याचा अर्थ आपणसुद्धा आपल्या समस्यांचा धीराने सामना करू शकतो!—प्रे. कार्यं १४:२२.
१२. आपले भाऊबहीण आपल्याला कशी मदत करू शकतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो? (२ करिंथकर १:३, ४)
१२ धीर धरत असताना आपल्या भाऊबहिणींमुळे आपल्याला सांत्वन आणि प्रोत्साहन मिळू शकतं. प्रेषित पौललासुद्धा भाऊबहिणींकडून खूप मदत मिळाली. जेव्हा तो घरात कैद होता, तेव्हा त्याला मदत करणाऱ्या भाऊबहिणींचे त्याने त्याच्या पत्रात नाव घेऊन आभार मानले. त्या भाऊबहिणींनी पौलला दिलासा दिला, प्रोत्साहन दिलं आणि व्यावहारिक मार्गाने मदतसुद्धा केली. (फिलिप्पै. २:२५, २९, ३०; कलस्सै. ४:१०, ११) आज आपल्यालासुद्धा अशीच मदत मिळते. जेव्हा आपल्याला धीर धरण्यासाठी मदतीची गरज असते, तेव्हा आपले भाऊबहीण आपल्यासोबत असतात आणि जेव्हा त्यांना मदतीची गरज असते, तेव्हा आपण त्यांच्यासोबत असतो.—२ करिंथकर १:३, ४ वाचा.
१३. एका बहिणीला धीर धरायला कशामुळे मदत झाली?
१३ रशियामध्ये राहणाऱ्या माया नावाच्या बहिणीचं उदाहरण घ्या. २०२० मध्ये रशियाच्या अधिकाऱ्यांनी तिच्या घराची झडती घेतली. तिने तिच्या विश्वासाबद्दल इतरांना सांगितल्यामुळे तिच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्या वेळी भाऊबहिणींमुळे मायाला खूप प्रोत्साहन मिळालं. ती म्हणते: “त्या काळात मी खूप दुःखी होते, खूप खचून गेले होते. पण भाऊबहीण मला फोन करायचे, पत्रं लिहायचे, मेसेज करायचे आणि त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायचे. मला माहीत होतं, की माझे भाऊबहीण माझ्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण २०२० नंतर मला ते जास्त जाणवू लागलं.”
१४. भाऊबहिणींकडून मिळत असलेल्या मदतीचा फायदा घेण्यासाठी आपण काय करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१४ तुम्ही काय करू शकता? धीर धरत असताना भाऊबहिणींसोबत बोला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा. तसंच, वडिलांकडे मदत मागायला कचरू नका. ते तुमच्यासाठी “वाऱ्यापासून निवारा आणि वादळी पावसापासून मिळणारा आसरा” ठरू शकतात. (यश. ३२:२, तळटीप) हेसुद्धा लक्षात ठेवा, की तुमचे भाऊबहीणसुद्धा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना मदत करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या समस्यांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला आणि आनंदी राहायला मदत होऊ शकते.—प्रे. कार्यं २०:३५.
आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवा (परिच्छेद १४ पाहा)c
आपली आशा
१५. आशेमुळे येशूला कशी मदत झाली आणि आपल्याला कशी मदत होऊ शकते? (इब्री लोकांना १२:२)
१५ आपल्याला धीर धरता यावा म्हणून यहोवाने आपल्याला खरी आशा दिली आहे. (रोम. १५:१३) आशेमुळे येशूला पृथ्वीवर असताना सगळ्यात कठीण समस्येचा सामना करायला कशी मदत झाली, हे आठवायचा प्रयत्न करा. (इब्री लोकांना १२:२ वाचा.) येशूला माहीत होतं, की तो विश्वासू राहिल्यामुळे यहोवाच्या नावावर लागलेला कलंक मिटवण्यासाठी हातभार लागेल. त्याला हेसुद्धा माहीत होतं, की पुढे तो त्याच्या पित्यासोबत स्वर्गात असेल आणि काही काळाने तो राजा होऊन अभिषिक्त भावांसोबत राज्य करेल. त्याच प्रकारे आपल्याला देवाच्या नवीन जगात सर्वकाळ जगण्याची आशा मिळाली आहे. त्यामुळे सैतानाच्या या जगात आपल्यावर कोणतीही समस्या आली, तरी त्याचा धीराने सामना करायला आपल्याला मदत होऊ शकते.
१६. आशेमुळे एका बहिणीला धीर धरायला कशी मदत झाली आणि तिने जे म्हटलं त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१६ आशेमुळे रशियामधल्या ॲला नावाच्या बहिणीला कशी मदत झाली, याचा विचार करा. तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आली आणि सुनावणी आधी त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. ॲला म्हणते: “मी यहोवाशी नेहमी आपल्या आशेबद्दल बोलायचे. तसंच, आपल्या आशेवर मननसुद्धा करायचे. यामुळे मला मदत झाली. मी निराशेत बुडून गेले नाही. मला माहीतए, की या समस्या कायम अशाच राहणार नाहीत. यहोवाचा नक्कीच विजय होईल आणि आपलाही.”
१७. आपण आपल्या आशेबद्दल कदर असल्याचं कसं दाखवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ तुम्ही काय करू शकता? यहोवाने आपल्यासाठी जी सुंदर आशा दिली आहे, त्याच्यावर विचार करायला वेळ काढा. स्वतःला नवीन जगात पाहायचा प्रयत्न करा. तिथे तुम्हाला जे आशीर्वाद मिळतील, त्यांची कल्पना करायचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आता कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असला, तरी ती समस्या “तात्पुरती आणि हलकी” वाटेल. (२ करिंथ. ४:१७) तसंच, आपल्या आशेबद्दल इतरांना सांगण्यासाठी जमेल ते सगळं करा. जे लोक यहोवाची उपासना करत नाहीत, त्यांचं आयुष्य किती कठीण आहे याचा विचार करा. त्यांनासुद्धा आपल्यासारख्याच समस्यांचा सामना करावा लागतोय. पण त्यांच्याकडे आपल्यासारखी आशा नाही. म्हणून आपल्या आशेबद्दल इतरांना सांगायची संधी शोधा. तुम्ही त्यांना आपल्या आशेबद्दल थोडंसं जरी सांगितलं, तरी त्यांना आणखी जाणून घ्यायची इच्छा होऊ शकते.
यहोवाने आपल्याला जी सुंदर आशा दिली आहे त्यावर विचार करायला वेळ काढा (परिच्छेद १७ पाहा)d
१८. यहोवा त्याचं वचन पूर्ण करेल यावर आपण भरवसा का ठेवू शकतो?
१८ ईयोबने यशस्वीपणे बऱ्याच समस्यांचा सामना केला. त्यानंतर तो यहोवाला म्हणाला: “आता मला कळलंय, की तू सर्वकाही करू शकतोस; मनात आलेली कोणतीच गोष्ट करणं तुला अशक्य नाही.” (ईयो. ४२:२) ईयोब शिकला की कोणतीच गोष्ट यहोवाच्या उद्देशाच्या आड येऊ शकत नाही. आणि ही गोष्ट माहीत झाल्यामुळे आपल्याला धीर धरायची ताकद मिळते. हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. कल्पना करा, एक स्त्री खूप आजारी आहे आणि तिने वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचार घेतले. पण कोणीच तिला बरं करू शकलं नाही. त्यामुळे ती खूप निराश होते. पण नंतर तिला एक अनुभवी आणि भरवशालायक डॉक्टर सापडतो. तिला काय झालंय हे त्याला समजतं आणि तो तिचा कसा उपचार करणार आहे हेसुद्धा तो तिला सांगतो. त्यामुळे त्या स्त्रीला खूप बरं वाटतं. त्या स्त्रीचा आजार बरा व्हायला अजून वेळ असला, तरी तिला चांगलं वाटतं. कारण आपण बरं होणार आहोत, ही आशा असल्यामुळे त्या स्त्रीला धीर धरायला मदत होते. त्याच प्रकारे आपल्याला पूर्ण खातरी आहे, की देव नंदनवन आणण्याचं त्याचं वचन पूर्ण करणार आहे. यामुळे आपल्याला धीर धरायला मदत होऊ शकते.
१९. धीर धरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
१९ आपण पाहिलं की यहोवा प्रार्थना, बायबल, भाऊबहीण आणि आशा यांद्वारे आपल्याला समस्यांचा धीराने सामना करायला मदत करतो. आपण जर यहोवाने पुरवलेल्या या तरतुदींचा पूर्ण फायदा घेतला, तर तो कोणत्याही समस्येत आपला सांभाळ करेल. त्यामुळे आपल्याला सैतानाच्या या जगाचा आणि सगळ्या समस्यांचा अंत होईपर्यंत धीर धरता येईल.—फिलिप्पै. ४:१३.
गीत ३३ आपला भार यहोवावर टाक
a या लेखातली काही नावं बदलण्यात आली आहेत.
b चित्राचं वर्णन: एक वयस्कर भाऊ बऱ्याच वर्षांपासून धीराने समस्यांचा सामना करतोय आणि यहोवाला विश्वासू राहतोय.
c चित्राचं वर्णन: एक वयस्कर भाऊ बऱ्याच वर्षांपासून धीराने समस्यांचा सामना करतोय आणि यहोवाला विश्वासू राहतोय.
d चित्राचं वर्णन: एक वयस्कर भाऊ बऱ्याच वर्षांपासून धीराने समस्यांचा सामना करतोय आणि यहोवाला विश्वासू राहतोय.