२५-३१ मे, २०२६
गीत १३५ यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”
“सखोल समज दाखवणाऱ्याला यश मिळेल”
“सखोल समज दाखवणाऱ्याला यश मिळेल.”—नीति. १६:२०.
या लेखात:
सखोल समज दाखवल्यामुळे, कठीण परिस्थितींमध्ये आपल्याला कशी मदत होऊ शकते ते पाहा.
१-२. सखोल समज म्हणजे काय? आणि ती दाखवल्यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?
तुमचा कधी कोणी अपमान केलाय का? किंवा गैरसमज झाल्यामुळे कोणी तुमच्याशी कधी चुकीचं वागलंय का? किंवा एखाद्या परिस्थितीत तुम्हाला घाबरल्यासारखं वाटलंय का? अशा वेळी, तुम्हाला योग्य रितीने वागणं किंवा बोलणं कदाचित कठीण गेलं असेल. पण बायबलमध्ये लिहिलंय, की आपल्यात सखोल समज असेल तर अशा परिस्थितींमध्ये आपल्याला खूप मदत होऊ शकते.
२ सखोल समज असल्यामुळे आपण गोष्टींकडे फक्त वरवर पाहत नाही, तर त्यांवर खोलवर विचार करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्यासोबत असं का घडलं किंवा कोणी आपल्याशी असं का वागलं, हे समजायला आपल्याला मदत होते. आणि आपल्याला समंजसपणे वागता येतं. जसं की, आपल्याला आपल्या “जिभेवर ताबा” ठेवता येतो आणि गप्प राहायची योग्य वेळ कोणती हे ठरवता येतं. (नीति. १०:१९; स्तो. ४:४) तसंच, कोणी आपलं मन दुखावलं तर आपल्याला शांत राहून त्यांना माफ करायला मदत होते. शिवाय, आपल्याला कोणी सल्ला दिला किंवा आपली चूक सुधारली तेव्हाही आपल्याला या गुणामुळे मदत होते. (नीति. १९:२०) खासकरून, जेव्हा आपल्या भावना अनावर होतात किंवा रागाच्या भरात कोणाला काही बोलायचा आपल्याला मोह होतो, तेव्हा हा गुण दाखवल्यामुळे आपल्याला आणि इतरांनाही फायदा होतो. तसंच, यहोवाही त्यामुळे खूश होतो. खरंच, सखोल समज दाखवणं खूप महत्त्वाचंय. तर मग, या गुणामुळे आपल्याला नम्र राहायला, शांत राहायला आणि यहोवावर विसंबून राहायला कशी मदत होऊ शकते? चला, याबद्दल बायबलच्या तीन अहवालांवर आपण लक्ष देऊ या.
गर्विष्ठपणे नाही तर नम्रतेने वागा
३. नामान कोण होता?
३ योग्य ते करत राहण्यासाठी आपण नम्र असणं गरजेचंय. (१ पेत्र ५:५) काही करण्याआधी आपण त्याबद्दल खोलवर विचार केला, तर आपल्याला गर्विष्ठपणा टाळता येतो हे आपल्याला नामानच्या उदाहरणावरून कळतं. तो इस्राएलच्या उत्तरेकडे असलेल्या सीरियाचा सेनापती होता. पण त्याला गंभीर आजार म्हणजे कुष्ठरोग होता.—२ राजे ५:१.
४. नामानच्या वागण्यावरून तो समंजस असल्याचं कसं दिसून आलं?
४ एक लहान इस्राएली मुलगी नामानच्या बायकोची दासी होती. तिने नामानच्या बायकोला सांगितलं, की इस्राएलमधला एक संदेष्टा नामानला बरं करू शकतो. (२ राजे ५:२, ३) मग नामानने असा विचार केला का, ‘या शत्रू राष्ट्राच्या दासीचा सल्ला खरंच माझ्या फायद्याचा असू शकतो का?’ नाही. उलट त्याने तिच्या बोलण्यावर विचार केला. तो गर्विष्ठपणे वागला नाही तर त्याने तिच्या सांगण्याप्रमाणे केलं. त्याने सीरियाच्या राजाची परवानगी घेतली आणि बरं होण्यासाठी तो इस्राएलला गेला.—२ राजे ५:४, ५.
५. इस्राएलला आल्यावर नामानसोबत काय घडलं?
५ नामान बरं होण्यासाठी इस्राएलचा राजा यहोराम याच्याकडे आला. पण, यहोरामला वाटलं, की सीरियाचा राजा त्याच्याशी भांडण करायचं कारण शोधतोय. जेव्हा अलीशा संदेष्ट्याला हे कळलं तेव्हा त्याने नामानला आपल्याकडे बोलावून घेतलं. (२ राजे ५:६-९) पण नामानने अपेक्षा केली होती तसं अलीशा वागला नाही. तो त्याला भेटायला किंवा बोलायला घरातून बाहेरसुद्धा आला नाही. उलट, नामानने बरं होण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्याने त्याला आपल्या दूताद्वारे कळवलं.—२ राजे ५:१०.
६. (क) नामानने अलीशाच्या दूताच्या सूचना का पाळल्या नाहीत? (ख) नामानच्या सेवकांनी काय केलं आणि त्याचा काय परिणाम झाला? (२ राजे ५:१३, १४)
६ सुरुवातीला अलीशाच्या दूताने दिलेल्या सूचना नामानला आवडल्या नाहीत. तो “संतापला आणि परत जायला निघाला.” (२ राजे ५:११, १२) याचं काय कारण असावं? तो सेनापती असल्यामुळे अलीशाने त्याला हवा तसा मान दिला नाही असं कदाचित त्याला वाटलं असावं. तसंच, अलीशाने सीरियाचा अपमान केला असंही त्याला वाटलं असावं. त्याला इतका राग आला, की बरं होण्याऐवजी तो तसाच घरी जायला निघाला. पण त्याच्या सेवकांना मात्र समजलं, की अलीशाला खरंच नामानला मदत करायची इच्छा आहे. म्हणून त्यांनी त्याला त्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करायला सांगितलं. नामानने समंजसपणा दाखवला आणि नम्रपणे अलीशाचा सल्ला ऐकला. त्यामुळे तो बरा झाला.—२ राजे ५:१३, १४ वाचा.
७. नामानच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? (नीतिवचनं २२:४) (चित्रंसुद्धा पाहा.)
७ आपण काय शिकू शकतो? बऱ्याच वेळा गोष्टी जशा बाहेरून दिसतात तशा नसतात. म्हणून आपल्याकडे सखोल समज असण्याची गरज आहे. आपण कधीच भावनांच्या आहारी जाऊन कोणताच निर्णय घेऊ नये. आपल्याकडे सखोल समज असेल तर आपल्याला नम्र राहायला मदत होईल. आणि त्यामुळे आपल्याला नेहमीच सगळं माहीत असतं, असा आपण विचार करणार नाही. म्हणून आपण इतरांकडून आणि यहोवाकडून मदत घ्यायला नेहमी तयार असू. नामान जरी यहोवाची उपासना करत नसला, तरी त्याने इतरांचा सल्ला लागू करून त्याच्याकडे सखोल समज असल्याचं दाखवलं. जसं की, त्याने इस्राएली दासीचा सल्ला ऐकला, त्याच्या सेवकांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवाने नेमलेल्या संदेष्ट्याचं, अलीशाचं ऐकलं. तो फक्त आपल्या दुखावलेल्या भावनांचाच विचार करत बसला नाही. यामुळे तो योग्य निर्णय घेऊ शकला आणि बरा झाला. यावरून आपण काय शिकतो? कधीकधी आपल्याला बायबलमधून सल्ला मिळू शकतो किंवा संघटनेकडून काही मार्गदर्शन मिळू शकतं. आपल्याला कदाचित तो सल्ला आवडणार नाही किंवा ते मार्गदर्शन पूर्णपणे कळणार नाही. अशा वेळी आपण काही बोलण्याआधी किंवा करण्याआधी थोडं थांबून विचार केला पाहिजे. या परिस्थितीत आपण जे बोलू किंवा करू त्यावरून आपण नम्र आहोत की गर्विष्ठ हे दिसून येईल.—नीतिवचनं २२:४ वाचा.
जेव्हा आपल्याला सल्ला मिळतो, कोणी आपल्याला त्यांच्या समस्येबद्दल सांगतं, किंवा संघटनेकडून आपल्याला मार्गदर्शन मिळतं तेव्हा आपण नामानसारखं नम्रपणे ऐकलं पाहिजे (परिच्छेद ७ पाहा)
रागाने नाही तर शांतपणे वागा
८. कोणत्या परिस्थितींमध्ये आपल्याला शांत राहणं कठीण जाऊ शकतं?
८ कधीकधी आपल्याला खूप राग येईल असं काहीतरी आपल्यासोबत घडू शकतं. पण आपल्याकडे सखोल समज असेल तर आपल्याला शांत राहायला मदत होईल. हे खरंय, की असं करणं नेहमीच सोपं नसतं; खासकरून जेव्हा दुसरे लोक आपल्याशी वाईट वागतात तेव्हा. (इफिस. ४:२६) दावीद आणि अबीगईल यांनी एका कठीण परिस्थितीत सखोल समज कशी दाखवली ते पाहू या.
९. नाबाल दावीदशी कसा वागला?
९ दावीद आणि त्याची माणसं शौलपासून आपला जीव वाचवायला पारानच्या ओसाड रानात राहत होती. (१ शमु. २५:१) तिथे त्यांनी एका श्रीमंत माणसाच्या मेंढपाळांचं आणि त्यांच्या कळपांचं रक्षण केलं. त्या श्रीमंत माणसाचं नाव नाबाल होतं. (१ शमु. २५:१५, १६) लोकर कातरण्याचा काळ सुरू झाला, तेव्हा दावीदने आपल्या माणसांना पाठवून नाबालकडे खाण्यापिण्याच्या काही वस्तू देण्याची विनंती केली. (१ शमु. २५:६-८) पण नाबालने उपकारांची जाण ठेवली नाही. त्याने दावीदची विनंती मान्य केली नाही. उलट त्याने दावीदचा आणि त्याच्या माणसांचा खूप अपमान केला.—१ शमु. २५:१०, ११.
१०. दावीद आणि अबीगईलने त्यांच्याकडे सखोल समज असल्याचं कसं दाखवलं? (१ शमुवेल २५:३२, ३३) (चित्रसुद्धा पाहा.)
१० तुम्ही दावीदच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं? कदाचित तुम्हालाही दावीदसारखा खूप राग आला असता. दावीदला इतका राग आला की तो नाबालचा जीव घ्यायला निघाला! (१ शमु. २५:१३, २१, २२) पण वाटेत त्याला नाबालच्या बायकोने, अबीगईलने रोखलं. अबीगईल समंजस होती. तिने तिच्याकडे सखोल समज असल्याचं कसं दाखवलं? तिने ओळखलं, की जरी दावीदला खूप राग आला असला तरी तो मुळात चांगला माणूस आहे. म्हणून त्याचा राग शांत करायला तिच्याकडून होताहोईल ते सगळं तिने केलं. तिने त्याला पुष्कळ भेटी दिल्या आणि चांगला सल्लाही दिला. (१ शमु. २५:१८, २३-३१) दावीदनेही समंजसपणा दाखवला. त्याने तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं. ती गोष्टींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहत असल्याचं त्याने ओळखलं. त्यामुळे त्याचा राग शांत झाला आणि तो एक गंभीर पाप करण्यापासून वाचला.—१ शमुवेल २५:३२, ३३ वाचा.
कठीण परिस्थितीत दावीद आणि अबीगईलने सखोल समज दाखवल्यामुळे मोठी समस्या टळली (परिच्छेद १० पाहा)
११. राग येतो तेव्हा सखोल समज दाखवल्यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? (नीतिवचनं १९:११)
११ आपण काय शिकू शकतो? आपल्याकडे सखोल समज असेल तर राग येण्याचं योग्य कारण असतानासुद्धा आपल्याला शांत राहायला मदत होईल. अशा परिस्थितीत आपल्या बोलण्याचा आणि वागण्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपल्याला थोडं थांबून विचार करता येईल. (नीतिवचनं १९:११ वाचा.) अबीगईलने दावीदला जेव्हा यहोवासारखा दृष्टिकोन ठेवायला सांगितलं, तेव्हा दावीद आपल्या रागावर ताबा मिळवू शकला. त्याचप्रमाणे तुम्हालाही राग येतो किंवा तुमची चिडचिड होते, तेव्हा विचार न करता बोलायचा मोह टाळा. (याको. १:१९) यहोवाकडे मदत मागा आणि त्याच्यासारखा विचार करायला थोडा वेळ घ्या. त्यामुळे तुमचा राग शांत करायला तुम्हाला मदत होईल.
१२. शांत राहायला आणि योग्य निर्णय घ्यायला इतर जण आपल्याला कशी मदत करू शकतात?
१२ यहोवाने अबीगईलचा वापर करून दावीदला आपला दृष्टिकोन समजून घ्यायला मदत केली. तसंच तो आज भाऊबहिणींचा वापर करून आपल्यालाही मदत करू शकतो. म्हणून आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप राग येतो, तेव्हा आपण प्रौढ भाऊबहिणींशी बोललं पाहिजे. ते आपल्याला यहोवाचा दृष्टिकोन समजून घ्यायला मदत करू शकतात. (नीति. १२:१५; २०:१८) त्यासोबतच, तुमचा मित्र काही कारणामुळे दुखावला गेला किंवा त्याला राग आला तर तुम्ही अबीगईलसारखं वागू शकता. तुम्ही त्याला यहोवाचा दृष्टिकोन समजून घ्यायला मदत करू शकता. खातरी बाळगा, की हे सगळं करायला यहोवा नक्की तुम्हाला मदत करेल.
भीती वाटते तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा
१३. भीती वाटते तेव्हा सखोल समज असल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल?
१३ काही वेळा आपल्यासमोर अशी परिस्थिती येऊ शकते जेव्हा आपल्याला भीती वाटेल. पण यहोवा सगळ्यात शक्तिशाली आहे याचा विचार केल्यामुळे आपल्याला त्याच्यावर भरवसा ठेवायला मदत होऊ शकते. (स्तो. २७:१) एखाद्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग कदाचित आपल्याला दिसणार नाही. पण अशा वेळीही यहोवा आपली मदत करू शकतो. ही गोष्ट योना संदेष्ट्याच्या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळते. योनाचं यहोवावर प्रेम होतं. पण एक कठीण जबाबदारी पार पाडताना तो घाबरून गेला.
१४. यहोवाने दिलेलं काम करण्यापासून योना मागे का हटला?
१४ यहोवाने योनाला एक काम सोपवलं. त्याला निनवेला जाऊन तिथल्या लोकांना सांगायचं होतं, की त्यांचा लवकरच नाश होणार आहे. (योना १:१, २) हे काम सोपं नव्हतं. इस्राएलपासून निनवेला चालत जायला योनाला जवळपास एक महिना लागणार होता. आणि निनवेमध्ये राहणारे अश्शूरी लोक खूप क्रूर आणि हिंसक होते. म्हणून निनवेला ‘रक्तपात करणारी नगरीसुद्धा’ म्हटलंय. (नहू. ३:१, ७) विचार करा, तुम्ही योनाच्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असतं? योनाने ही जबाबदारी स्वीकारली नाही. उलट, तो पळून गेला.—योना १:३.
१५. योनाचा यहोवावरचा भरवसा कशामुळे वाढला? (योना २:६-९)
१५ पुढे, यहोवाने चमत्कार करून योनाचा जीव वाचवला. त्यामुळे यहोवा किती शक्तिशाली आहे हे त्याला कळलं. (योना १:१५, १७) त्याला कळलं, की त्याला निनवेच्या लोकांना घाबरायची गरज नाही. कारण यहोवा त्याला कोणत्याही परिस्थितीतून वाचवू शकत होता. (योना २:६-९ वाचा.) म्हणून यहोवाने योनाला परत निनवेला जायला सांगितलं तेव्हा तो तिथे गेला. त्याने तिथल्या लोकांना संदेश सांगितला आणि त्यांचा जीव वाचला.—योना ३:५.
१६. आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण काय करू शकतो? (नीतिवचनं २९:२५) (चित्रंसुद्धा पाहा.)
१६ आपण काय शिकू शकतो? यहोवाची सेवा करत असताना आपल्याला कोणालाच किंवा कशालाच घाबरायची गरज नाही. (नीतिवचनं २९:२५ वाचा.) सखोल समज असल्यामुळे योना त्याच्या भीतीवर मात करू शकला. त्याने लक्षात ठेवलं, की यहोवा त्याला मदत करेल. आपणसुद्धा योनासारखं आपल्या भीतीवर मात करू शकतो. यहोवाने आपल्याला आधी कशी मदत केली आहे यावर विचार केल्याने आपल्याला फायदा होईल. तसंच, ज्या भाऊबहिणींनी यहोवावर भरवसा ठेवून कठीण जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांच्या उदाहरणांवरही आपण विचार करू शकतो. (इब्री १३:६) आपण जर यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला आणि दुसऱ्यांनाही असं करायला मदत केली, तर आपल्याकडे सखोल समज असल्याचं आपण दाखवू.
सखोल समज असल्यामुळे आपण योनासारखं यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारू आणि कठीण परिस्थितीचा सामना करू शकू (परिच्छेद १६ पाहा)
यहोवासारखा विचार करायला शिका
१७. आपण सखोल समज कशी मिळवू शकतो?
१७ आपण चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडे सखोल समज असेल तर कठीण परिस्थितींत आपल्याला मदत होऊ शकते. सखोल समज मिळवायला यहोवाने आपल्याला बायबल आणि पवित्र शक्ती दिली आहे. (नहे. ९:२०; स्तो. ३२:८) भावनांवर ताबा मिळवायला आणि योग्य निर्णय घ्यायला यहोवा आपल्याला सल्ला देतो. (स्तो. ११९:९७-१०१) जेव्हा आपण बायबलचा चांगला अभ्यास करतो आणि यहोवाकडे पवित्र शक्ती मागतो तेव्हा आपल्याला सखोल समज मिळू शकते. आणि त्यामुळे गोष्टींकडे यहोवासारखं पाहायला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आपल्याला मदत होऊ शकते.—नीति. २१:११, तळटीप.
१८. तुम्ही काय करायचं ठरवलंय?
१८ तर चला, आपण नेहमी सखोल समज मिळवायला यहोवावर विसंबून राहू या. (स्तो. १४:२) आपण हा गुण दाखवायचं कधीच सोडू नये. (नीति. २१:१६) आपण जर प्रत्येक वेळी आणि प्रत्येक परिस्थितीत असं करत राहिलो तर आपण यहोवाला खूश करू.
गीत ४२ देवाच्या सेवकाची प्रार्थना