वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w23 फेब्रुवारी पृ. ८-१३
  • बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जे काही वाचता ते समजून घ्या
  • वाचत असताना मोलाचे धडे शोधा
  • वाचलेल्या गोष्टींप्रमाणे चाला
  • बायबल वाचल्यामुळे आनंद मिळतो
  • दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • वचनाप्रमाणे चालणारे बना!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • बायबलचा पूर्ण फायदा कसा घ्याल?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • बायबल वाचन फायदेकारक व आनंददायक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
w23 फेब्रुवारी पृ. ८-१३

अभ्यास लेख ७

बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा?

“नियमशास्त्रात काय लिहिलंय? तू काय वाचलं आहेस?”​—लूक १०:२६.

गीत ९६ देवाचं अनमोल वचन

सारांशa

१. येशूसाठी शास्त्रवचनं खूप महत्त्वाची होती हे कशावरून म्हणता येईल?

येशू लोकांना शिकवायचा तेव्हा त्यांना किती छान वाटलं असेल याचा विचार करा. कारण शिकवताना तो नेहमी शास्त्रवचनांचा उल्लेख करायचा. विशेष म्हणजे त्याला सगळी शास्त्रवचनं जशीच्या तशी आठवायची! खरंतर त्याच्या बाप्तिस्म्यानंतर त्याने जे शब्द म्हटले आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे जे शेवटचे शब्द होते, ते सगळे शास्त्रवचनांतलेच होते.b (अनु. ८:३; स्तो. ३१:५; लूक ४:४; २३:४६) आणि या दोन महत्त्वपूर्ण घटनांच्या मध्ये असलेल्या साडेतीन वर्षांच्या काळातही लोकांना शिकवताना त्याने शास्त्रवचनं वाचली, त्यांचा जसाच्या तसा उल्लेख केला आणि ती समजावून सांगितली.​—मत्त. ५:१७, १८, २१, २२, २७, २८; लूक ४:१६-२०.

कोलाज: १. येशू लहान असताना त्याचे आईवडील त्याला शिकवत आहेत आणि तो ऐकत आहे. २. थोडा मोठा झाल्यानंतर येशू आणि त्याचे आईवडील सभास्थानात शास्त्रवचनं वाचली जात असताना लक्ष देऊन ऐकत आहेत. ३. आणि मोठा झाल्यावर येशू स्वतः एका गुंडाळीतून वाचत आहे.

येशूने आपल्या संपूर्ण जीवनात दाखवून दिलं, की शास्त्रवचनांवर त्याचं प्रेम होतं आणि त्यांप्रमाणे तो चाललाही (परिच्छेद २ पाहा)

२. येशूला लहानपणापासून शास्त्रवचनांची चांगली ओळख व्हायला कशामुळे मदत झाली? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

२ पृथ्वीवर आपलं सेवाकार्य सुरू करायच्या कित्येक वर्षांआधीपासून येशूने बऱ्‍याचदा देवाचं वचन ऐकलं आणि वाचलं होतं. जसं की, त्याच्या कुटुंबात रोज शास्त्रवचनांवर चर्चा करताना त्याने नक्कीच मरीया आणि योसेफला शास्त्रवचनांचा जसाच्या तसा उल्लेख करताना ऐकलं असेल.c (अनु. ६:६, ७) याशिवाय, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी तो आपल्या कुटुंबासोबत सभास्थानात गेला असेल असं आपण खातरीने म्हणू शकतो. (लूक ४:१६) तिथे शास्त्रवचनं वाचली जात असताना त्याने ती खूप लक्ष देऊन ऐकली असतील. आणि काही काळाने तो स्वतः पवित्र लिखाणं वाचायला शिकला असेल. यामुळे येशूला शास्त्रवचनं फक्‍त चांगली माहीतच नव्हती, तर त्याला ती मनापासून आवडायची आणि त्यांप्रमाणे तो चालायचाही. उदाहरणार्थ, तो फक्‍त १२ वर्षांचा होता तेव्हा मंदिरात घडलेल्या त्या घटनेचाच विचार करा. त्या वेळी नियमशास्त्राची चांगली माहिती असणारे गुरूजन “त्याची समजशक्‍ती पाहून आणि त्याची उत्तरं ऐकून अगदी थक्क झाले होते.”​—लूक २:४६, ४७, ५२.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

३ आपणही नियमितपणे शास्त्रवचनं वाचली, तर आपल्यालाही त्यांची चांगली ओळख होईल आणि ती मनापासून आवडू लागतील. पण देवाचं वचन वाचताना आपल्याला त्यातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवता येईल? त्यासाठी नियमशास्त्राची चांगली ओळख असलेले शास्त्री, परूशी आणि सदूकी यांसारख्या लोकांना येशूने जे म्हटलं त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. हे धर्मगुरू नेहमी शास्त्रवचनं वाचायचे, पण त्यांपासून त्यांना काहीच फायदा झाला नाही. कारण अशा तीन गोष्टी होत्या ज्यांमध्ये ते कमी पडत होते. आणि त्या तीन गोष्टी काय आहेत हे येशूने त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्याने त्यांना जे सांगितलं त्यामुळे (१) आपण जे काही वाचतो ते समजून घ्यायला, (२) शास्त्रवचनांतली मौल्यवान रत्नं शोधायला आणि (३) देवाच्या वचनाप्रमाणे चालायला आपल्याला आणखी मदत होईल.

जे काही वाचता ते समजून घ्या

४. देवाचं वचन वाचण्याच्या बाबतीत लूक १०:२५-२९ मधून आपल्याला काय शिकायला मिळतं?

४ देवाचं वचन वाचताना आपण ते समजूनही घेतलं पाहिजे; नाहीतर त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. उदाहरणार्थ, ‘नियमशास्त्राचा जाणकार असलेल्या एका माणसाला’ येशू काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. (लूक १०:२५-२९ वाचा.) “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?” असं त्या माणसाने येशूला विचारलं, तेव्हा येशू त्याला म्हणाला: “नियमशास्त्रात काय लिहिलंय? तू काय वाचलं आहेस?”  तेव्हा देवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करण्याविषयी शास्त्रवचनांत जे सांगितलंय त्याचा त्या माणसाने जसाच्या तसा उल्लेख केला. (लेवी. १९:१८; अनु. ६:५) पण त्यानंतर लगेच तो येशूला म्हणाला: “मुळात माझा शेजारी कोण?” यावरून दिसून आलं, की त्याने जे काही वाचलं होतं, त्याचा खरा अर्थ त्याला कळला नव्हता. त्यामुळे साहजिकच ती शास्त्रवचनं जीवनात कशी लागू करायची हे त्याला माहीत नव्हतं.

समजून घेण्यासाठी आपण वाचनाचं कौशल्य वाढवू शकतो

५. प्रार्थना केल्यामुळे आणि हळूहळू वाचल्यामुळे देवाचं वचन समजून घ्यायला आपल्याला कशी मदत होऊ शकते?

५ देवाचं वचन चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला वाचनाची चांगली सवय असली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल? एक म्हणजे, वाचण्याआधी प्रार्थना  करा. शास्त्रवचनं समजून घेण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे लक्ष देऊन वाचण्यासाठी देवाकडे पवित्र शक्‍तीची मदत मागा. मग, वाचत असताना हळूहळू वाचा.  त्यामुळे वाचत असलेली माहिती समजून घ्यायला तुम्हाला मदत होईल. हवं तर तुम्ही मोठ्याने वाचू शकता किंवा बायबलची ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकतही वाचू शकता. आपण जेव्हा शब्द ऐकतो आणि त्याच वेळी ते पानावरही पाहतो, तेव्हा ती माहिती समजून घ्यायला, लक्षात ठेवायला आणि त्यापासून जास्तीत जास्त शिकायला आपल्याला मदत होऊ शकते. (यहो. १:८) आणि शेवटी, वाचून झाल्यावर पुन्हा प्रार्थना करा.  यहोवाने त्याचं वचन आपल्याला दिल्याबद्दल त्याचे आभार माना आणि वाचलेली माहिती जीवनात लागू करण्यासाठी त्याला मदत मागा.

कोलाज: १. एक बहीण काही नोट्‌स लिहून बायबलमध्ये ठेवत आहे. २. एक भाऊ त्याच्या टॅबवर एक लेख वाचत असताना हायलाईट करत आहे आणि त्याबद्दल काही गोष्टी थोडक्यात लिहून ठेवत आहे. ३. एक बहीण “JW Library” ॲपचा वापर करून तिच्या बायबलमध्ये हायलाईट करत आहे आणि नोट्‌स घेत आहे.

बायबमध्ये वाचलेल्या गोष्टी थोडक्यात लिहून ठेवल्यामुळे त्या समजण्यासाठी आणि आठवणीत ठेवण्यासाठी मदत कशी होऊ शकते? (परिच्छेद ६ पाहा)

६. वाचत असताना स्वतःला प्रश्‍न विचारल्यामुळे आणि काही गोष्टी थोडक्यात लिहून घेतल्यामुळे कसा फायदा होऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

६ बायबल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही आणखीनही काही गोष्टी करू शकता. एखादा अहवाल वाचताना स्वतःला काही प्रश्‍न विचारा.  जसं की, ‘यातली प्रमुख्य पात्रं कोण आहेत? कोण कोणाशी बोलतंय आणि का? ही घटना कुठे आणि केव्हा घडत आहे?’ यामुळे त्या अहवालावर विचार करायला आणि त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायला तुम्हाला मदत होईल. तसंच, वाचत असताना काही गोष्टी थोडक्यात लिहून काढा.  कारण आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपले विचार शब्दांत मांडले जातात आणि त्यामुळे आपली समज आणखी स्पष्ट होते. याशिवाय, लिहिल्यामुळे वाचलेल्या गोष्टी चांगल्या लक्षातही राहतात. पण तुम्ही काय लिहू शकता? बऱ्‍याच गोष्टी. जसं की, वाचत असताना तुमच्या मनात आलेले प्रश्‍न, संशोधनात सापडलेली माहिती, मुख्य मुद्द्‌यांचा सारांश; तसंच वाचलेली माहिती कशी लागू करता येईल, किंवा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एवढंसुद्धा तुम्ही लिहू शकता. यामुळे देवाचं वचन खास माझ्यासाठी लिहिलंय असं तुम्हाला वाटेल.

७. बायबल समजण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि का? (मत्तय २४:१५)

७ मत्तय २४:१५ वाचा. या वचनात म्हटलंय, की “वाचणाऱ्‍याने हे समजून घ्यावं.” यावरून देवाचं वचन समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी एका गोष्टीची गरज आहे ते दिसून येतं. ती गोष्ट म्हणजे, समजबुद्धी. समजबुद्धी म्हणजे एका गोष्टीचा दुसऱ्‍या गोष्टीशी काय संबंध आहे किंवा एखादी गोष्टी दुसऱ्‍या गोष्टीपासून कशी वेगळी आहे हे समजण्याची किंवा लगेच लक्षात न येणारी एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता. तसंच बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण करणाऱ्‍या घटना ओळखण्यासाठीही आपल्याला समजबुद्धीची गरज आहे असं येशूने म्हटलं. याशिवाय, बायबलमध्ये आपण जे काही वाचतो त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठीसुद्धा आपल्याला समजबुद्धीची गरज आहे.

८. वाचत असलेल्या गोष्टी आपण आणखी चांगल्या प्रकारे कशा समजून घेऊ शकतो?

८ यहोवा त्याच्या सेवकांना समजबुद्धी देतो. त्यामुळे हा गुण वाढवण्यासाठी तुम्ही त्याच्याकडे प्रार्थनेत मदत मागू शकता. (नीति. २:६) पण प्रार्थनेसोबतच तुम्ही त्यानुसार काम करणंसुद्धा गरजेचं आहे. हे तुम्ही कसं करू शकता? तुम्ही जे वाचता त्याचा तुम्हाला माहीत असलेल्या इतर गोष्टींशी कसा संबंध आहे याचं बारकाईने परीक्षण करा. यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  यासारख्या बायबल अभ्यासासाठी असलेल्या साधनांमध्ये संशोधन करू शकता. अशा साधनांमुळे तुम्हाला बायबलमधल्या अहवालांचा अर्थ समजून घ्यायला आणि त्यांतल्या गोष्टी आपल्या जीवनात कशा लागू करायच्या हे कळायलासुद्धा मदत होईल. (इब्री ५:१४) अशा प्रकारे समजबुद्धीचा वापर करून जर तुम्ही वाचलं तर शास्त्रवचनांबद्दलची तुमची समज आणखी वाढेल.

वाचत असताना मोलाचे धडे शोधा

९. सदूकी लोकांनी शास्त्रवचनांतल्या कोणत्या महत्त्वाच्या शिकवणीकडे दुर्लक्ष केलं होतं?

९ सदूकी लोकांना हिब्रू शास्त्रवचनांतली पहिली पाच पुस्तकं खूप चांगली माहीत होती. पण देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या या पुस्तकांत असलेल्या महत्त्वाच्या शिकवणी मात्र ते स्वीकारत नव्हते. उदाहरणार्थ, ते पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांनी मुद्दामहून त्या विषयावर येशूला एक प्रश्‍न विचारला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मोशेच्या पुस्तकातल्या झुडपाच्या अहवालात तुम्ही वाचलं नाही का?  तिथे देव मोशेला म्हणाला: ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे’?” (मार्क १२:१८, २६) सदूकी लोकांनी हा अहवाल नक्कीच बऱ्‍याचदा वाचला असेल. पण येशूच्या प्रश्‍नावरून दिसून आलं, की शास्त्रवचनांतल्या या महत्त्वाच्या शिकवणीकडे, म्हणजेच पुनरुत्थानाच्या शिकवणीकडे सदूकी लोकांनी दुर्लक्ष केलं होतं.​—मार्क १२:२७; लूक २०:३८.d

१०. बायबल वाचत असताना आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे?

१० यावरून आपण काय शिकतो? हेच की बायबलमधलं एखादं वचन किंवा अहवाल वाचताना त्यातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळतील याकडे आपलं नेहमी लक्ष असलं पाहिजे. बायबलमध्ये सांगितलेल्या मूलभूत गोष्टी तर आपण समजून घेतोच, पण त्यातल्या शब्दांमागे लपलेली महत्त्वाची सत्यं आणि तत्त्वंही आपण समजून घेतली पाहिजे.

११. बायबलमधली मौल्यवान रत्नं शोधायला २ तीमथ्य ३:१६, १७ हे वचन आपल्याला कशी मदत करू शकतं?

११ मग बायबलमधली ही मौल्यवान रत्नं आपण कशी शोधू शकतो? त्यासाठी २ तीमथ्य ३:१६, १७ मध्ये काय म्हटलंय त्याकडे लक्ष द्या. (वाचा.) तिथे म्हटलंय, “संपूर्ण शास्त्र” (१) शिकवण्यासाठी, (२) ताडन देण्यासाठी, (३) सुधारणूक करण्यासाठी आणि (४) शिस्त लावण्यासाठी “उपयोगी आहे.” बायबलमधला एखादा अहवाल वाचताना त्यातून तुम्हाला यहोवाबद्दल, त्याच्या उद्देशाबद्दल आणि तत्त्वांबद्दल काय शिकायला मिळतं  याचा विचार करा. यासोबतच स्वतःचं ताडन करण्यासाठी  ते कसं मदत करतं याचाही विचार करा; दुसऱ्‍या शब्दांत, बायबलची ही वचनं तुमच्यातल्या चुकीच्या प्रवृत्ती किंवा कल ओळखून त्यांत बदल करायला आणि यहोवाला विश्‍वासू राहायला कशी मदत करतात याचा विचार करा. त्यासोबतच बायबलचा हा अहवाल एखादा चुकीचा दृष्टिकोन सुधारायला  कशी मदत करतो याचाही विचार करा. उदाहरणार्थ, सेवाकार्यात तुम्हाला अशी एखादी व्यक्‍ती भेटली असेल जिचा एखाद्या विषयाबद्दल चुकीचा दृष्टिकोन असेल. मग तो सुधारण्यासाठी तुम्ही या अहवालाचा उपयोग कसा करू शकता याचा विचार करा. तसंच, बायबलची ही वचनं स्वतःला शिस्त लावायला,  म्हणजेच सगळ्या गोष्टींच्या बाबतीत यहोवासारखा विचार करायला कशी मदत करतात याचा विचार करा. बायबल वाचत असताना हे चार फायदे लक्षात ठेवल्यामुळे बायबलमधली मौल्यवान रत्नं शोधायला तुम्हाला मदत होईल आणि त्यामुळे बायबल वाचनातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल.

वाचलेल्या गोष्टींप्रमाणे चाला

१२. येशूने परूश्‍यांना “तुम्ही नियमशास्त्रात वाचलं नाही का?” असं का विचारलं?

१२ आणखी एका वेळी शास्त्रवचनांबद्दल परूशी लोकांचा दृष्टिकोन किती चुकीचा आहे हे दाखवून देण्यासाठी येशूने त्यांना विचारलं: “तुम्ही नियमशास्त्रात वाचलं नाही का?”  (मत्त. १२:१-७)e कारण तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांवर असा आरोप लावला होता, की त्यांनी शब्बाथाचा नियम मोडलाय. त्यांना उत्तर देताना येशूने शास्त्रवचनांतल्या दोन उदाहरणांचा आणि होशेय पुस्तकातल्या एका वचनाचा उल्लेख केला. अशा प्रकारे येशूने त्यांना दाखवून दिलं, की शब्बाथाचा नियम देण्यामागचा उद्देश त्यांना कळला नव्हता आणि त्यामुळे ते इतरांना दया दाखवत नव्हते. पण नियमशास्त्र चांगल्या प्रकारे माहीत असुनसुद्धा हे लोक त्याप्रमाणे का चालू शकले नाहीत? कारण ते स्वतःला इतरांपेक्षा खूप जास्त समजायचे आणि इतरांमध्ये चुका काढायच्या उद्देशानेच शास्त्रवचनं वाचायचे. आणि त्यामुळे ते जे काही वाचत होते त्याचा खरा अर्थ त्यांना कळत नव्हता.​—मत्त. २३:२३; योहा. ५:३९, ४०.

१३. आपण कोणती मनोवृत्ती ठेवून बायबल वाचलं पाहिजे आणि का?

१३ येशूच्या शब्दांवरून आपल्याला कळतं, की आपण योग्य मनोवृत्ती ठेवून बायबल वाचलं पाहिजे. परूश्‍यांसारखं आपण स्वतःला जास्त समजू नये किंवा इतरांमध्ये चुका काढण्याच्या उद्देशाने आपण बायबल वाचू नये; तर आपण प्रामाणिक असलं पाहिजे आणि शिकून घ्यायला नेहमी तयार असलं पाहिजे. तसंच, आपण ‘नम्र असलं पाहिजे  आणि देवाचं वचन आपल्या मनात रूजू दिलं पाहिजे.’ (याको. १:२१) यामुळे देवाचं वचन आपल्या मनापर्यंत जाईल आणि आपल्याला स्वतःमध्ये बदल करता येतील. तसंच दया, करूणा आणि प्रेम यांसारखे सुंदर गुण आपल्याला स्वतःमध्ये विकसित करता येतील आणि आपल्या वागण्या-बोलण्यातून ते दाखवता येतील.

आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहोत की नाही हे आपल्याला कसं कळेल? (परिच्छेद १४ पाहा)f

१४. आपण बायबलप्रमाणे चालतो की नाही हे आपल्याला कसं कळेल? (चित्रंसुद्धा पाहा.)

१४ आपण इतरांशी ज्या प्रकारे वागतो त्यावरून दिसून येईल, की आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालतो की नाही. परूश्‍यांनी देवाचं वचन वाचलं खरं, पण त्याप्रमाणे त्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही. आणि त्यामुळे ‘जे निर्दोष आहेत त्यांना ते दोष लावत राहिले.’ (मत्त. १२:७) अगदी तसंच, आपण इतरांबद्दल कशा प्रकारे विचार करतो आणि त्यांच्याशी कशा प्रकारे वागतो त्यावरून दिसून येईल, की देवाच्या वचनाप्रमाणे आपण स्वतःमध्ये बदल केले आहेत की नाही. उदाहरणार्थ, आपण सहसा इतरांच्या चांगल्या गुणांबद्दल बोलतो की त्यांच्या वाईट गुणांबद्दलच बोलत असतो? आपण इतरांना दया दाखवायला आणि मोठ्या मनाने क्षमा करायला तयार असतो का? की आपण नेहमी इतरांची टिकाच करतो आणि त्यांच्याबद्दल मनात राग धरतो? या प्रश्‍नांची आपण स्वतःला जी उत्तरं देऊ त्यावरून दिसून येईल, की देवाच्या वचनाप्रमाणे आपण आपले विचार, आपल्या भावना बदलतो का आणि त्याप्रमाणे चालतो का.​—१ तीम. ४:१२, १५; इब्री ४:१२.

बायबल वाचल्यामुळे आनंद मिळतो

१५. शास्त्रवचनांबद्दल येशूला कसं वाटायचं?

१५ शास्त्रवचनांवर येशूचं जिवापाड प्रेम होतं. त्याबद्दल त्याला कसं वाटेल हे स्तोत्र ४०:८ मध्ये आधीच सांगितलं होतं. तिथे म्हटलंय: “तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो आणि तुझं नियमशास्त्र माझ्या हृदयावर लिहिलेलं आहे.” शास्त्रवचनांवर येशूचं प्रेम असल्यामुळे तो आनंदाने यहोवाची सेवा करत राहू शकला. आपण जर देवाचं वचन वाचलं आणि त्यावर मनापासून प्रेम केलं, तर आपणही आनंदाने यहोवाची सेवा करत राहू शकतो.​—स्तो. १:१-३.

१६. बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? (“येशूचे शब्द आपल्याला वाचत असलेली माहिती समजून घ्यायला मदत करतात,” ही चौकट पाहा.)

१६ देवाचं वचन समजून घेण्याच्या बाबतीत येशूने जे म्हटलं आणि त्या बाबतीत त्याने स्वतःचं जे उदाहरण मांडलं ते लक्षात घेऊन आपणही बायबल वाचण्याची आपली कौशल्यं वाढवत राहू या. बायबलमधले अहवाल समजून घेण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, हळूहळू वाचलं पाहिजे, स्वतःला प्रश्‍न विचारले पाहिजे आणि शिकलेल्या गोष्टी थोडक्यात लिहून काढल्या पाहिजेत. तसंच, समजबुद्धीचा वापर करून आपण वाचलेल्या माहितीचं बारकाईने परीक्षण करू शकतो. आणि त्यासाठी बायबल आधारित प्रकाशनांची मदतही घेऊ शकतो. ज्या अहवालांबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही त्यांत लपलेली मौल्यवान रत्नं शोधून, ते अहवालसुद्धा आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. आणि शेवटी वाचत असताना आपण योग्य मनोवृत्ती ठेवून वाचू शकतो आणि त्याप्रमाणे चालू शकतो. अशा प्रकारे जर आपण बायबल वाचायचा प्रयत्न केला तर त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल आणि यहोवासोबतचं आपलं नातंही घट्ट होईल.​—स्तो. ११९:१७, १८; याको. ४:८.

येशूचे शब्द आपल्याला वाचत असलेली माहिती समजून घ्यायला मदत करतात

  • तुम्ही जे काही वाचता ते समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि ती माहिती लागू करण्यासाठी समजबुद्धी वापरा.​—मत्त. २४:१५; लूक १०:२५-३७.

  • बायबल अहवालांमध्ये लपलेली मौल्यवान रत्नं शोधून काढण्यासाठी त्या अहवालांचं बारकाईने परीक्षण करा.​—मार्क १२:१८-२७.

  • बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे चाला आणि इतरांशी प्रेमाने वागा.​—मत्त. १२:१-८.

बायबल वाचत असताना पुढे दिलेल्या गोष्टी करायला तुम्हाला कशी मदत होईल?

  • समजून घ्यायला.

  • मौल्यवान रत्नं शोधायला.

  • आणि त्याप्रमाणे वागायला.

गीत ९८ देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र

a यहोवाचे सगळे उपासक रोज त्याचं वचन वाचायचा प्रयत्न करतात. इतर बरेच लोकही ते वाचतात. पण त्याचा खरा अर्थ त्यांना समजत नाही. असे काही लोक येशूच्या काळातही होते. देवाचं वचन वाचणाऱ्‍यांना येशूने काय म्हटलं त्याकडे लक्ष दिल्यामुळे आपल्याला बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा मिळवायला मदत होईल.

b येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र शक्‍तीने त्याला अभिषिक्‍त करण्यात आलं, तेव्हा पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गातल्या जीवनाच्या त्याच्या सगळ्या आठवणी त्याला परत देण्यात आल्या.​—मत्त. ३:१६.

c मरीयाला शास्त्रवचनांचं खूप चांगलं ज्ञान होतं, आणि तिने बऱ्‍याच वेळा त्यांचा उल्लेखही केला. (लूक १:४६-५५) त्या काळात कदाचित योसेफ आणि मरीया शास्त्रवचनांची व्यक्‍तिगत प्रत विकत घेऊ शकत नव्हते. त्यामुळे सभास्थानात देवाचं वचन वाचलं जायचं तेव्हा त्यांनी ते खूप लक्ष देऊन ऐकलं असावं. आणि त्यामुळे ते त्यांच्या चांगलं लक्षात राहिलं असेल.

d ४ एप्रिल, २०१३ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “देवाच्या जवळ या​—‘तो “जिवंतांचा” देव आहे’” हा लेख पाहा.

e मत्तय १९:४-६, या वचनांमध्येसुद्धा येशूने परूश्‍यांना “तुम्ही वाचलं नाही का?” असाच प्रश्‍न विचारला होता. त्यांनी निर्मितीचा अहवाल बऱ्‍याचदा वाचला होता, ज्यात देवाने एका पुरुषाला आणि एका स्त्रीला लग्नाच्या बंधनात कसं बांधलं होतं याबद्दल सांगितलं आहे. पण लग्नाच्या व्यवस्थेबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे, याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं.

f चित्राचं वर्णन: राज्य सभागृहात सभा चालू असताना ऑडिओ-व्हिडिओचं काम सांभाळणारा एक भाऊ बऱ्‍याच चुका करतो. पण त्याच्या चुका दाखवण्याऐवजी सभेनंतर बांधव तो घेत असलेल्या मेहनतीचं कौतुक करतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा