वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w23 फेब्रुवारी पृ. १४-१९
  • “सावध राहा, जागे राहा!”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सावध राहा, जागे राहा!”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जगातल्या घडामोडींवर नजर ठेवत असतानाच, सावध आणि जागे राहा
  • स्वतःकडे लक्ष देण्याचा काय अर्थ होतो?
  • वेळेचा चांगला उपयोग करा
  • आपल्याला ‘जागृत राहण्याची’ गरज का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • वाट पाहण्याचं थांबवू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • “जागृत राहा”—न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
w23 फेब्रुवारी पृ. १४-१९

अभ्यास लेख ८

“सावध राहा, जागे राहा!”

“सावध राहा, जागे राहा!”​—१ पेत्र ५:८.

गीत १४४ नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!

सारांशa

१. अंत केव्हा येईल याबद्दल येशूने शिष्यांना काय म्हटलं, आणि त्याने त्यांना कोणता इशारा दिला?

येशूच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी येशूचे चार शिष्य त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले: “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?” (मत्त. २४:३) त्या शिष्यांना कदाचित असा प्रश्‍न पडला असेल, की यहुदी व्यवस्थेचा अंत जवळ आलाय हे कसं ओळखायचं? त्यांना उत्तर देताना येशू फक्‍त यहुदी व्यवस्थेच्या समाप्तीबद्दलच बोलला नाही; तर ‘जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीबद्दलही,’ म्हणजे सध्या आपण ज्या दुष्ट जगात जगतोय त्याच्या अंताबद्दलही बोलला. अंत केव्हा येईल हे सांगताना येशू म्हणाला: “त्या दिवसाबद्दल किंवा त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही; स्वर्गदूतांना नाही आणि मुलालाही नाही, तर फक्‍त पित्याला माहीत आहे.” मग त्याने आपल्या सगळ्या शिष्यांना ‘सावध आणि जागे राहण्याचा’ इशारा दिला.​—मार्क १३:३२-३७.

२. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी नेहमी सावध आणि जागे राहणं इतकं गरजेचं का होतं?

२ पहिल्या शतकातल्या यहुदी ख्रिश्‍चनांनी सावध आणि जागे राहणं खूप गरजेचं होतं. कारण त्यामुळेच पुढे त्यांचा जीव वाचणार होता. यहुदी व्यवस्थेचा अंत जवळ आलाय हे कसं ओळखायचं ते येशूने आपल्या अनुयायांना सांगितलं. त्याने म्हटलं: “जेव्हा तुम्ही यरुशलेमला सैन्यांनी वेढलेलं पाहाल, तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे हे ओळखा.” त्या वेळी येशूने दिलेल्या इशाऱ्‍याप्रमाणे त्याच्या अनुयायांनी ‘डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करायची होती.’ (लूक २१:२०, २१) रोमी सैन्यांनी जेव्हा यरुशलेमचा नाश केला तेव्हा ज्यांनी येशूच्या या इशाऱ्‍याप्रमाणे केलं त्यांचं जीवन वाचलं.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

३ आज आपण या दुष्ट जगाच्या शेवटच्या काळात जगत आहोत. त्यामुळे आपणसुद्धा नेहमी सावध आणि जागे राहिलं पाहिजे. या लेखात आपण हे पाहणार आहोत, की जगातल्या घडामोडींवर नजर ठेवत असतानाच, आपण सावध आणि जागे कसे राहू शकतो. यासोबतच, आपण स्वतःकडे कसं लक्ष देऊ शकतो आणि उरलेल्या वेळेचा चांगला उपयोग कसा करू शकतो, हेसुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत.

जगातल्या घडामोडींवर नजर ठेवत असतानाच, सावध आणि जागे राहा

४. जगातल्या घडामोडींमुळे बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत हे पाहायची आपल्याला उत्सुकता का असली पाहिजे?

४ जगभरात सध्या ज्या घटना घडत आहेत त्यांमुळे बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत हे पाहायची आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. आणि ती असलीही पाहिजे. कारण येशूने अशा काही विशिष्ट घटना सांगितल्या होत्या ज्यांमुळे या दुष्ट जगाचा अंत जवळ आलाय हे ओळखायला आपल्याला मदत होणार होती. (मत्त. २४:३-१४) तसंच, आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी प्रेषित पेत्रनेसुद्धा आपल्याला बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत याकडे लक्ष द्यायचं प्रोत्साहन दिलं. (२ पेत्र १:१९-२१) शिवाय, बायबलच्या शेवटच्या पुस्तकाची सुरुवातही या शब्दांनी करण्यात आली आहे: “येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण, जे देवाने त्याला यासाठी दिलं, की लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या सेवकांना दाखवाव्यात.” (प्रकटी. १:१) म्हणून, जगातल्या घडामोडींबद्दल आणि त्यांमुळे कदाचित बायबलची भविष्यवाणी कशी पूर्ण होऊ शकते याबद्दल आपल्याला उत्सुकता असते. आणि याविषयी इतरांसोबत चर्चा करायलाही कदाचित आपल्याला आवडेल.

कोलाज: १. एक जोडपं जगातले नेते शांतीचा करार करत असल्याची बातमी टिव्हीवर पाहात आहेत. २. नंतर राज्य सभागृहात ते त्यांची ठाम मतं दोन बहिणींना सांगत आहेत.

बायबलच्या भविष्यवाण्यांबद्दल चर्चा करत असताना आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? (परिच्छेद ५ पाहा)b

५. आपण काय केलं पाहिजे, आणि काय नाही केलं पाहिजे? (चित्रंसुद्धा पाहा.)

५ पण बायबलच्या भविष्यवाण्यांबद्दल चर्चा करताना आपण अंदाज किंवा तर्क नाही लावले पाहिजेत. का बरं? कारण त्यामुळे मंडळीत फूट पडून तिची एकता धोक्यात येऊ शकते. आणि असं काही व्हावं अशी आपली मुळीच इच्छा नाही. उदाहरणार्थ, जगात चालू असलेला एखादा मोठा वादविषय सोडवून शांती आणि सुरक्षा कशी आणता येईल, यावर जगातले मोठमोठे नेते आपसात चर्चा करत असल्याचं कदाचित आपल्या कानांवर येईल. अशा वेळी, १ थेस्सलनीकाकर ५:३ मधली भविष्यवाणी पूर्ण तर होत नसेल ना, असा तर्क आपण लावू नये. त्याऐवजी संघटनेने अलीकडे प्रकाशित केलेली माहिती आपल्याला माहीत असली पाहिजे. यहोवाच्या संघटनेने प्रकाशित केलेल्या माहितीच्या आधारावर आपण एकमेकांसोबत चर्चा करतो तेव्हा सगळ्यांची “विचारसरणी एकसारखी” राहते आणि मंडळीतली एकीसुद्धा टिकून राहते.​—१ करिंथ. १:१०; ४:६.

६. २ पेत्र ३:११-१३ मधून आपण काय शिकतो?

६ २ पेत्र ३:११-१३ वाचा. बायबलच्या भविष्यवाण्यांवर विचार करताना योग्य दृष्टिकोन ठेवायला प्रेषित पेत्र आपल्याला मदत करतो. तो आपल्याला ‘यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवायचा’ सल्ला देतो. ते कशासाठी? हर्मगिदोन नेमकं कोणत्या ‘दिवशी’ आणि कोणत्या ‘वेळी’ येईल हे माहीत करून घेण्यासाठी नाही, तर उरलेल्या वेळेचा उपयोग आपली ‘वागणूक पवित्र ठेवण्यासाठी आणि देवाच्या भक्‍तीची कार्यं करण्यासाठी’ आपल्याला करायचा आहे. (मत्त. २४:३६; लूक १२:४०) दुसऱ्‍या शब्दांत, आपल्याला आपलं आचरण चांगलं ठेवायची आणि यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो ते त्याच्यावरच्या प्रेमापोटी करायची आपली इच्छा आहे. आणि हे करण्यासाठी आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे.

स्वतःकडे लक्ष देण्याचा काय अर्थ होतो?

७. स्वतःकडे लक्ष देणारी व्यक्‍ती काय करते? (लूक २१:३४)

७ येशूने आपल्या शिष्यांना जगातल्या घडामोडींकडेच नाही, तर स्वतःकडेही लक्ष द्यायला सांगितलं. ही गोष्ट त्याने लूक २१:३४ मध्ये दिलेल्या इशाऱ्‍यातून आपल्याला कळते. (वाचा.) तिथे येशूने म्हटलं: “स्वतःकडे लक्ष द्या.” जी व्यक्‍ती स्वतःकडे लक्ष देते ती यहोवासोबतचं आपलं नातं कोणत्या गोष्टींमुळे तुटू शकतं हे लगेच ओळखते आणि त्यांपासून दूर राहायचा प्रयत्न करते. असं करून ती स्वतःला देवाच्या प्रेमात टिकवून ठेवते.​—नीति. २२:३; यहू. २०, २१.

८. प्रेषित पौलने ख्रिश्‍चनांना काय सल्ला दिला?

८ प्रेषित पौलनेसुद्धा ख्रिश्‍चनांना स्वतःकडे लक्ष द्यायचा सल्ला दिला. जसं की, इफिसमधल्या ख्रिश्‍चनांना त्याने म्हटलं: “तुम्ही कसं चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखं नाही, तर बुद्धिमानांसारखं चाला.” (इफिस. ५:१५, १६) यहोवासोबतची आपली मैत्री तोडण्याचा सैतान सतत प्रयत्न करतो. त्यामुळे बायबल आपल्याला सल्ला देतं, की “यहोवाची इच्छा काय आहे, हे ओळखायचा नेहमी प्रयत्न करा.” म्हणजे मग सैतानाच्या कोणत्याही हल्ल्यापासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करता येईल.​—इफिस. ५:१७.

९. यहोवाची इच्छा काय आहे हे आपण कसं ओळखू शकतो?

९ यहोवासोबतची आपली मैत्री ज्या गोष्टीमुळे तुटू शकते ती प्रत्येक गोष्ट बायबलमध्ये सांगितलेली नाही. त्यामुळे ज्या गोष्टींच्या बाबतीत बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं नाही, त्या बाबतींत सहसा आपल्याला स्वतःलाच निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी आपण “यहोवाची इच्छा काय आहे” हे ओळखायचा किंवा समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण बायबलचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. जितकं जास्त आपण यहोवाची इच्छा आणि “ख्रिस्ताचं मन” समजून घ्यायचा प्रयत्न करू तितके जास्त आपण ‘बुद्धिमानांसारखे चालू.’ ज्या गोष्टींच्या बाबतीत बायबलमध्ये स्पष्ट नियम दिलेले नाहीत त्या बाबतींतही आपल्याला योग्य निर्णय घेता येतील. (१ करिंथ. २:१४-१६) पण यहोवासोबतची आपली मैत्री धोक्यात आणणाऱ्‍या गोष्टी ओळखणं काही वेळी सोपं, तर काही वेळा कठीण असतं.

१०. आपण कोणत्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे?

१० अशा बऱ्‍याचशा गोष्टी आहेत ज्यांमुळे यहोवासोबतची आपली मैत्री तुटू शकते. जसं की, फ्लर्टिंग किंवा इश्‍कबाजी करणं, खूप जास्त दारू पिणं, अतिप्रमाणात खाणं; तसंच हिंसक मनोरंजन, पोर्नोग्राफी किंवा अश्‍लील साहित्य आणि अशा बऱ्‍याच गोष्टी. (स्तो. १०१:३) यहोवासोबतची आपली मैत्री तोडण्यासाठी आपला शत्रू सैतान हा टपूनच बसलेला आहे. (१ पेत्र ५:८) त्यामुळे आपण जर नेहमी सावध आणि जागे राहिलो नाही, तर सैतान आपल्या मनात ईर्ष्या, अप्रामाणिकपणा, लोभ, द्वेष, गर्वाची भावना आणि राग यांसारख्या गोष्टींचं बी पेरू शकतो. (गलती. ५:१९-२१) सुरवातीला आपल्याला या गोष्टी इतक्या चुकीच्या वाटणार नाहीत. पण त्या मुळासकट उपटून काढण्यासाठी आपण जर वेळीच पाऊल उचललं नाही, तर एका विषारी रोपाप्रमाणे त्या वाढत जातील आणि पुढे आपल्यालाच त्यांचा त्रास होईल.​—याको. १:१४, १५.

११. आणखी कोणता एक धोका आहे जो आपण टाळला पाहिजे? आणि का?

११ पण अशाही काही गोष्टी असतात ज्यांमागचा धोका आपल्या लगेच लक्षात येणार नाही. जसं की, वाईट संगत. एका परिस्थितीचा विचार करा. असं समजा, की तुम्ही ऑफिसमध्ये अशा एका व्यक्‍तीसोबत काम करत आहात जो सत्यात नाही. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल त्याने चांगला विचार करावा म्हणून तुम्ही त्याच्याशी नेहमी प्रेमाने वागता आणि त्याला मदत करता. अधूनमधून कधीतरी तुम्ही ऑफिसमध्ये त्याच्यासोबत दुपारचं जेवणही करता. पण नंतर तुम्ही रोजच त्याच्यासोबत जेवण करू लागता. गप्पांच्या ओघात कधीकधी घाणेरडे विषयही निघतात. सुरवातीला तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करता. पण नंतर त्या गोष्टीची तुम्हाला इतकी सवय होऊन जाते, की त्यात तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाही. मग एक दिवस तो तुम्हाला म्हणतो: ‘आज ऑफिसनंतर थोडं भेटू या का? आणि थोडीशी घेऊ या का?’ आणि तुम्ही हो म्हणता. हळूहळू तुम्ही त्याच्यासारखाच विचार करू लागता. आता विचार करा, अशा वेळी त्या व्यक्‍तीसारखंच वागायला तुम्हाला किती वेळ लागेल? हे खरंय, की आपण सगळ्यांशीच प्रेमाने आणि आदराने वागतो. पण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्या वागण्या-बोलण्याचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव पडत असतो. (१ करिंथ. १५:३३) त्यामुळे येशूने सांगितल्याप्रमाणे आपलं जर स्वतःकडे लक्ष असेल, तर यहोवाच्या स्तरांप्रमाणे जीवन न जगणाऱ्‍या लोकांसोबत आपण विनाकारण वेळ घालवणार नाही. (२ करिंथ. ६:१५) उलट, त्यामागचा धोका ओळखून आपण त्यापासून लांब राहू.

वेळेचा चांगला उपयोग करा

१२. यहुदी व्यवस्थेच्या अंताची वाट पाहत असताना येशूच्या शिष्यांनी काय करायचं होतं?

१२ यहुदी व्यवस्थेच्या अंताची वाट पाहत असताना येशूच्या शिष्यांनी नुसतंच बसून राहायचं नव्हतं. येशूने त्यांना एक महत्त्वाचं काम दिलं होतं. त्याने त्यांना “यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायला सांगितलं होतं. (प्रे. कार्यं १:६-८) ही खरंच खूप मोठी जबाबदारी होती. आणि या कामात स्वतःला झोकून देऊन शिष्यांनी वेळेचा चांगला उपयोग केला.

१३. आपण वेळेचा चांगला उपयोग का केला पाहिजे? (कलस्सैकर ४:५)

१३ कलस्सैकर ४:५ वाचा. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपण आपल्या वेळेचा कसा उपयोग करतो याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आपल्यापैकी कोणासोबतही “अनपेक्षित घटना” घडू शकतात. (उप. ९:११) आणि आपल्या जिवाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही.

टिव्हीवर बातमी बघणारी आणि नियमन मंडळाचा रिपोर्ट पाहणारी बहीण एका स्त्रीचा बायबल अभ्यास घेत आहेत. आणि तिला “यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?” हे व्हिडिओ दाखवत आहेत.

आपण आपल्या वेळेचा चांगला उपयोग कसा करू शकतो? (परिच्छेद १४-१५ पाहा)

१४-१५. आपण आपल्या वेळेचा चांगला उपयोग कसा करू शकतो? (इब्री लोकांना ६:११, १२) (चित्रसुद्धा पाहा.)

१४ यहोवाची इच्छा पूर्ण करून आणि त्याच्यासोबतची मैत्री आणखी घट्ट करून आपण आपल्या वेळेचा चांगला उपयोग करू शकतो. (योहा. १४:२१) तसंच, आपण ‘खंबीर आणि स्थिर राहून प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहिलं पाहिजे.’ (१ करिंथ. १५:५८) मग जेव्हा अंत येईल, मग तो आपल्या जीवनाचा असो किंवा या दुष्ट जगाचा असो, आपल्याला मुळीच पस्तावा होणार नाही.​—मत्त. २४:१३; रोम. १४:८.

१५ आज येशूचे अनुयायी जगभरात देवाच्या राज्याचा संदेश सांगत आहेत आणि येशू त्यांचं मार्गदर्शन करत आहे. प्रचाराचं काम कसं करायचं हे यहोवाच्या संघटनेद्वारे तो आपल्याला शिकवतो आणि त्या कामासाठी लागणारी साधनंही पुरवतो. (मत्त. २८:१८-२०) अशा प्रकारे येशूने जे वचन दिलं होतं ते त्याने पूर्ण केलंय. पण आपल्याबद्दल काय? प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात नेहमी व्यस्त राहून आणि या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत असताना कायम जागे राहून आपण आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. तसंच, इब्री लोकांना ६:११, १२ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपली आशा “शेवटपर्यंत” डोळ्यांसमोर ठेवली पाहिजे.​—वाचा.

१६. आपण काय करायचा निर्धार केला पाहिजे?

१६ सैतानाच्या या दुष्ट जगाचा अंत करण्यासाठी यहोवाने एक विशिष्ट दिवस आणि वेळ आधीच ठरवली आहे. तो दिवस येईल तेव्हा नवीन जगाबद्दल यहोवाने त्याच्या वचनात दिलेल्या सगळ्या भविष्यवाण्या तो नक्की पूर्ण करेल. मात्र त्या दिवसाची वाट पाहत असताना, काही वेळा आपल्याला वाटेल, की अंत यायला खूपच उशीर होतोय. पण यहोवाचा तो दिवस यायला मुळीच “उशीर होणार नाही!” (हब. २:३) त्यामुळे आपण ‘यहोवाकडे डोळे लावून आपलं तारण करणाऱ्‍या देवाची धीराने वाट पाहायचा’ निर्धार करू या.​—मीखा ७:७.

तुमचं उत्तर काय असेल?

  • जगातल्या घडामोडींवर नजर ठेवत असतानाच आपण सावध आणि जागे कसे राहू शकतो?

  • स्वतःकडे लक्ष देण्याचा काय अर्थ होतो?

  • आपण आपल्या वेळेचा चांगला उपयोग कसा करू शकतो?

गीत १३९ नव्या जगी स्वतःला पहा

a या लेखात आपण हे पाहणार आहोत, की जगातल्या घडामोडींवर नजर ठेवत असतानाच, आपण सावध आणि जागे कसे राहू शकतो. यासोबतच, आपण स्वतःकडे कसं लक्ष देऊ शकतो आणि आपल्या वेळेचा चांगला उपयोग कसा करू शकतो हेसुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत.

b चित्राचं वर्णन: (वर) एक जोडपं बातम्या बघत आहे. मग मंडळीच्या सभेनंतर या बातम्यांमध्ये सांगितलेल्या गोष्टींबद्दल त्यांची स्वतःची ठाम मतं ते इतर भाऊबहिणींना सांगत आहेत. (खाली) दुसरं एक जोडपं बायबलच्या भविष्यवाण्यांची अलीकडची समज काय आहे हे जाणून घेण्यासाठी नियमन मंडळाकडून रिपोर्ट हा व्हिडिओ बघत आहे. ते इतरांना विश्‍वासू दासाने पुरवलेलं बायबल आधारित साहित्य देत आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा