सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल काय शिकवते पुस्तकाचा किंवा आनंदाची बातमी माहितीपत्रकाचा उपयोग करून अभ्यास कसा सुरू करायचा ते दाखवा
हे का महत्त्वाचं: ‘आम्ही मोफत गृह बायबल अभ्यास घेतो,’ असं जेव्हा आपण लोकांना म्हणतो, तेव्हा त्यांना आपल्या बोलण्याचा अर्थ लगेच कळत नाही. त्यांना वाटतं की त्यांना कुठल्यातरी अभ्यास गटात सामील व्हावं लागेल किंवा मग पत्रानं हा अभ्यास करावा लागेल. तर, ‘आम्ही मोफत गृह बायबल अभ्यास घेतो,’ असं नुसतं म्हणण्याऐवजी अभ्यास कसा केला जातो तेच त्यांना आपण दाखवू शकतो. केवळ काही मिनिटांत दारात उभे असतानाच तुम्ही त्यांना बायबल अभ्यास कसा केला जातो ते दाखवू शकता. यावरून त्यांना कळेल, की हा अभ्यास किती सोपा आहे आणि यातून बरंच काही शिकायला मिळतं.
हे कसं करावं:
• स्वतःची ओळख करून दिल्यानंतर घरमालकाला म्हणा: ‘आज अनेक लोकांना वेगवेगळ्या चिंता आहेत. तुम्हालाही कदाचित भवितव्याची चिंता असेल.’
• नंतर, त्याला बायबल काय शिकवते पुस्तकातील किंवा देवाकडून आनंदाची बातमी माहितीपत्रकातील विषय दाखवा. भवितव्याबद्दल आणि बाकीच्या इतर विषयांबद्दल बायबल काय सांगतं ते या प्रकाशनात अतिशय सोप्या भाषेत समजावलं आहे, असं त्याला सांगा.
• मग त्याच्या हातात ते प्रकाशन देऊन त्याला त्यातला एखादा विषय निवडू द्या. त्यानं विषय निवडल्यावर त्या अध्यायाच्या सुरुवातीला असलेले प्रश्न दाखवा आणि यांची उत्तरं पुढील परिच्छेदांमध्ये दिली आहेत, हे सांगा.
• घरमालकाची हरकत नसेल तर त्याला पहिला परिच्छेद वाचायला सांगा. मग प्रश्न विचारल्यावर एकत्र मिळून उत्तराची चर्चा करा. तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तराखाली रेघ मारली आहे ते त्याला दाखवा. तसंच बायबल उघडून त्या उत्तराशी संबंधित असलेल्या वचनांची चर्चा करा.
• मग पुढचा परिच्छेद वाचा. पण आता, घरमालकाला उत्तर शोधून ते त्याच्या स्वतःच्या शब्दांत द्यायला सांगा.
• उत्तर दिल्यावर त्याची प्रशंसा करा. सुरू केलेला धडा पूर्ण करण्यासाठी पुढच्या भेटीची व्यवस्था करा.
• उचित असेल तर त्याला, jw.org/mr या आपल्या वेबसाईटवरील ‘बायबलचा अभ्यास का करावा?’ हा व्हिडिओ दाखवा.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
• नवीन बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवाचे आशीर्वाद मागा.—फिलिप्पै. २:१३.
• सेवेत गेल्यावर निदान एकदा तरी, बायबल काय शिकवते पुस्तकाचा किंवा देवाकडून आनंदाची बातमी या माहितीपत्रकाचा उपयोग करून अभ्यास कसा केला जाऊ शकतो हे दाखवा किंवा ‘बायबलचा अभ्यास का करावा?’ हा व्हिडिओ दाखवा.