शिकलेल्या माहितीचा जीवनात उपयोग करण्यास मदत करणारी प्रशाला
१ येत्या वर्षाच्या अर्थात २००६ सालच्या ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या आराखड्यात दिलेल्या साहित्यावर विचार करताना, या शास्त्रवचनीय माहितीचा आपल्या पवित्र उपासनेशी व दररोजच्या जीवनाशी कसा संबंध आहे हे समजून घेऊन त्यापासून फायदा मिळवण्याचा आपला प्रयत्न राहील. प्रशालेतून आपण जे शिकू त्यानुसार आचरण करण्याचा आपण संकल्प करू.—योहा. १३:१७; फिलिप्पै. ४:९.
२ टिपणी देणे: या वर्षीच्या आराखड्यात बायबलच्या ठळक मुद्द्यांची चर्चा करताना श्रोत्यांच्या सहभागाकरता आणखी एक मिनिट देण्यात आला आहे. याचा अर्थ, ठळक मुद्दे सादर करण्यास ज्या बांधवाला नेमण्यात आले आहे त्याने ती माहिती सहा मिनिटात नव्हे, तर पाचच मिनिटात सादर करण्याची काळजी घेतली पाहिजे. श्रोत्यांमधून जे टिपणी करतात त्यांनीही वेळेचे भान ठेवले पाहिजे. आधीपासूनच काळजीपूर्वक विचार केल्यास, ३० सेकंदात किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात एखादा उपयोगी मुद्दा सांगितला जाऊ शकतो. अशारितीने, श्रोत्यांच्या सहभागासाठी नेमलेल्या पाच मिनिटात जवळजवळ दहा व्यक्तींना अर्थपूर्ण टिपणी करणे शक्य झाले पाहिजे.
३ मार्गदर्शक भाषणे: बायबलचे ठळक मुद्दे व बोधप्रद भाषण या भागांत वक्त्यांनी दिलेल्या माहितीचा आपल्या सेवाकार्यात व दैनंदिन जीवनाच्या इतर पैलूंत कशाप्रकारे उपयोग करता येईल यावर भर द्यावा. केवळ विशिष्ट माहितीनुसार आचरण करण्याची इच्छा श्रोत्यांमध्ये जागृत करणे पुरेसे नाही. तर वक्त्याने स्पष्टपणे सांगावे की श्रोत्यांनी काय केले पाहिजे, ते कसे करता येईल आणि असे केल्यामुळे कोणते फायदे व आशीर्वाद मिळू शकतात. “हे वचन आपल्याला अशाप्रकारे मार्गदर्शन पुरवते,” किंवा “या वचनांचा आपण सेवाकार्यात अशाप्रकारे उपयोग करू शकतो” असे म्हणून वक्ता माहिती सादर करू शकतो. वडील व सेवा सेवकांना स्थानिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी नेमलेल्या साहित्याचे व्यावहारिक महत्त्व जास्तीतजास्त स्पष्टपणे सांगावे.
४ माहितीचे व्यावहारिक महत्त्व सांगताना बायबलमधील उदाहरणांचा उपयोग केल्यास ते अतिशय परिणामकारक ठरू शकते. बायबलमधील एखाद्या उदाहरणाचा उल्लेख केल्यानंतर वक्ता असे म्हणू शकतो: “कधीकधी तुम्हीही अशाच परिस्थितीत सापडू शकता.” बायबलच्या उदाहरणाचा व्यावहारिक जीवनात कसा उपयोग करता येईल हे सांगताना वक्त्याने याची खात्री करावी की तो जे सांगत आहे ते त्या वचनाच्या संदर्भाशी, सबंध बायबलशी व ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ प्रकाशित केलेल्या साहित्याशी जुळते.—मत्त. २४:४५.
५ बुद्धी म्हणजे ज्ञान व समज यांचा यशस्वीपणे उपयोग करण्याची क्षमता. “बुद्धी श्रेष्ठ आहे.” (नीति. ४:७, NW) ईश्वरशासित सेवा प्रशालेतील आपल्या अभ्यासातून आपण जसजशी व्यावहारिक बुद्धी संपादन करतो तसतशी ती दुसऱ्यांनाही देण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करावा.