आपल्या बायबल आधारित साहित्याचा विचारपूर्वक उपयोग करा
१, २. आपल्या साहित्याबद्दल बऱ्याचजणांच्या भावना काय आहेत आणि यावरून कोणता प्रश्न उद्भवतो?
१. “मी १९६५ सालापासून तुमच्या प्रकाशनांचा वाचक आहे. ही प्रकाशने वाचताना मी बायबलचे संदर्भ उघडून पाहत असतो. तुमच्या पुस्तकांत जे काही लिहिले आहे ते बायबलशी जुळते. देव व येशू यांच्याबद्दल सत्य काय आहे हे जाणून घेण्यास मी पूर्वीपासूनच उत्सुक होतो आणि मी अगदी प्रामाणिकपणे असे म्हणू शकतो की तुमच्या साहित्यातून व बायबलमधून मला माझ्या प्रश्नांची खरी उत्तरे मिळत आहेत.” हे आहेत यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाला एका माणसाने लिहिलेल्या पत्रातील शब्द. याच पत्रात त्याने बायबल अभ्यासाची विनंतीही केली.
२ त्या कृतज्ञ माणसाप्रमाणे, जगभरातील लाखो लोक ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या बायबल अभ्यासाच्या साहित्याबद्दल आभार व्यक्त करतात. (मत्त. २४:४५) प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे” म्हणून त्यांना मदत करण्याकरता दर वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात साहित्य तयार केले जाते. (१ तीम. २:४) तर या बायबल आधारित छापील साहित्याचा आपण विचारपूर्वक उपयोग कसा करू शकतो?
३. साहित्याचा अपव्यय आपण कसा टाळू शकतो?
३. अपव्यय टाळा: कधीकधी आपल्याजवळ भरपूर साहित्य गोळा होते व ते आपण वापरू शकत नाही. आपल्या बहुमोल साहित्याचा असा अपव्यय टाळण्याकरता आपण काय करू शकतो? सेवाकार्यात वापरण्याकरता साहित्य घेतानाच याचा विचार केला पाहिजे. आधीच एखाद्या साहित्याच्या खूप प्रती घेऊन ठेवण्याऐवजी सुरुवातीला आपण फक्त एखाद दोन प्रती घेऊ शकतो आणि मग त्या संपल्यानंतर आणखी प्रती घेऊ शकतो. यामुळे आपल्या घरात जादा साहित्य साठणार नाही. तसेच, जर आपल्याजवळ मासिकांच्या अनेक प्रती साठल्या असतील तर मंडळीकडून आपण मागवलेल्या मासिकांची संख्या कमी केली पाहिजे.
४. मंडळीकडे साहित्याचा अतिरिक्त साठा असल्यास काय करता येईल?
४. साहित्याचा अतिरिक्त साठा: मंडळीकडे जर विशिष्ट प्रकाशनांचा अतिरिक्त साठा असेल तर लिटरेचर कोऑर्डिनेटरने आपल्या जवळपासच्या मंडळ्या हे अतिरिक्त साहित्य वापरू इच्छितात का, यासंबंधी विचारपूस करावी. प्रचारक विश्वासात नसलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना, बायबल विद्यार्थ्यांना व इतरांना जुनी प्रकाशने देऊ शकतात. जे अलीकडेच मंडळीसोबत सहवास करू लागले आहेत त्यांनाही आपली वैयक्तिक ईश्वरशासित लायब्ररी तयार करण्यासाठी ही जुनी प्रकाशने उपयोगी पडू शकतात.
५. आपल्या साहित्याची आपण कदर करतो हे कसे दाखवता येईल?
५. आपली इच्छा आहे की आपले साहित्य जो मूळ उद्देश लक्षात ठेवून तयार केले जाते तो उद्देश पूर्ण झाला पाहिजे; आणि तो उद्देश म्हणजे, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना यहोवाच्या अद्भूत उद्देशांबद्दल जाणून घेण्यास साहाय्य करणे. ज्याप्रकारे येशूने चमत्कारिकरित्या लोकांच्या जमावाला खाऊ घातल्यानंतर उरलेले अन्न टाकून दिले नाही त्याचप्रकारे आपल्याला पुरवण्यात आलेले बहुमोल बायबल आधारित साहित्य व्यर्थ जाऊ नये हेच आपले ध्येय असले पाहिजे. (योहा. ६:११-१३) जर आपली पुस्तके व मासिके आपल्या घरांतील कपाटांत किंवा आपल्या बॅगेतच राहिलीत तर, त्या प्रकाशनांत असलेला जीवनदायक संदेश नीतिमान मनोवृत्तीच्या लोकांपर्यंत पोचूच शकणार नाही. म्हणूनच, सेवाकार्याकरता साहित्य घेताना आपण विचारपूर्वक असले पाहिजे व इतरांच्या फायद्याकरता या साहित्याचा आपण उचितपणे उपयोग केला पाहिजे.—फिलिप्पै. ४:५.